दिनांक: ०६-०३-२०१६
पहिले वाचन: यहोशवा ५:९-१२.
दुसरे वाचन: करिंथकरांस दुसरे पत्र ५:१७-२२.
शुभवर्तमान: लुक १५:१-३, ११-३२.
“हा तुझा भाऊ मेला होता, तो
जिवंत झाला आहे”
प्रस्तावना:
आज आपण प्रायश्चित काळातील चौथा
रविवार साजरा करीत आहोत. देवाच्या करुणेचा अपरंपार दयेचा आणि निरपेक्ष प्रेमाचा
अनुभव घेण्यासाठी आजची उपासना आपल्याला आमंत्रित करीत आहे.
यहोशवा या पुस्तकातून घेतलेल्या
पहिल्या वाचनात आपण ऐकतो की, आपल्या वतन-भूमीत प्रवेश केल्यानंतर इस्रायली लोक व्हलांडण
सण पाळतात. मान्ना सोडून त्यांनी आपल्या देशातील उत्पन्न सेवन केले. जुने ते सोडून
त्यांनी नवीन जीवनाला प्रारंभ केला. संत पौल करिंथकरास लिहिलेल्या दुसऱ्या पत्रात,
“परमेश्वराने ख्रिस्ताद्वारे आमचा स्वत:बरोबर समेट केला”. जर कोणी ख्रिस्ताठायी
असेल तर तो नवीन उत्पती आहे असे म्हणतो. आजच्या शुभवर्तमानात आपण ‘उधळ्या पुत्राचा’
प्रसिद्ध दाखला ऐकणार आहोत.
उधळ्या पुत्राप्रमाणे आपल्यापैकी प्रत्येकजण देवपित्यापासून
दूर गेलेला आहे. देवाच्या क्षमेद्वारेच आपल्याला त्याच्या प्रेमाच्या शक्तीचा प्रत्यय
येत असतो. देवपिता, आपला नक्कीच स्विकार करील; कारण तो दयाळू व मंद्क्रोध आहे.
आपला देवाशी व शेजाऱ्याशी समेट घडून यावा म्हणून आपण ह्या मिस्साबालीदानात
प्रार्थना करूया.
सम्यक विवरण:
पहिले वाचन: यहोशवा ५:९-१२
इजिप्त देशातून प्रयान केल्यावर एलीस व सिनाय यांच्यामधील
सीन नावाच्या वाळवंटात लोकांनी देवाविरुद्ध कुरकुर केली (प्रयान १६:३). ते मोजेसला
म्हणाले “या साऱ्या समाजाला उपाशी मारावं म्हणूनच तुम्ही आम्हाला इथ वाळवंटात आणल आहे
का? म्हणून देवाने इस्रायली घराण्याने त्या अन्नाचे नाव मांन्ना ठेवले, कारण ते तांदळासारखे
शुभ्र असून चवीला मध घालून केलेल्या पोळीसारखे होते (प्रयान १६:३१).
पुढे मोशेच्या मृत्यूनंतर यहोशवाच्या नेतृत्वाखाली इस्रायल
लोकांनी कानन देशावर स्वारी केली व तो प्रदेश काबीज केला. दुधा-मधाच्या नद्या
ज्यातून वाहत होत्या, तो प्रदेश द्यायचे अभिवचन परमेश्वराने पूर्ण केले. इस्रायली
लोकांनी गीलागालात तळ दिल्यावर व्हलांडणाचा सन साजरा केला; व्हलांडण सणाच्या
दुसऱ्या दिवशी त्या देशात उत्पन्न झालेल्या धान्याची भाकर आणि हुरडा त्यांनी
खाल्ला. त्या दिवसापर्यंत ते देवावर व देवाने पाठविलेल्या अन्नावर ते अवलंबून
होते. ज्या दिवशी, त्यांनी त्या देशातील धान्य खाल्ले त्या दिवशी मांन्ना बंद झाला
व पुन्हा इस्रायली लोकांना मांन्ना मिळाला नाही.
आपल्या वतनभूमीत परत आल्यावर व
देवाने दिलेले वचन पूर्ण केल्यावर इस्रायली जनतेने नव्या जीवनास प्रारंभ केला. जुने
ते मागे ठेवून नव्या जीवनाची मोठ्या आशेने त्यांनी सुरुवात केली.
दुसरे वाचन: करिंथकरांस दुसरे पत्र ५:१७-२२.
पौलाचे करिंथकरातील लोकांशी तणावाचे संबंध झाले होते. काही
सदस्यांनी त्याच्यावर कडाडून हल्ले चढविले होते. काही लोक स्वत:ला खरे प्रेषित
म्हणवीत होते व पौलावर ‘खोटा प्रेषित’ असल्याचा आरोप लादीत होते. नितिमत्ता ढासळत
होती. अशा परिस्थितीत समझोता घडवून आणण्याची पौलाची तीव्र तळमळ ह्या त्याच्या
पत्रातून दिसते.
पौल करिंथकरांस श्रद्धेचे जीवन जगण्यासाठी
प्रेरित करतो व त्यासाठी तो म्हणतो, ‘आपली देवाशी मैत्री ही ख्रिस्तामुळे झाली
आहे. परमेश्वराने ख्रिस्ताबरोबर समेट केला व जो कोणी ख्रिस्ताशी संयुक्त झालेला
आहे, तो ‘नवी निर्मिती’ आहे’. आपल्या पापांसाठी गंधसुद्धा नव्हता, तरी देवाने त्याला
पापी असे गणले. म्हणून देवाने हे योजिले. त्यामुळे प्रभूमध्ये नीतिमान जीवन जगून
ख्रिस्ताच्या एकीत राहावे म्हणून संत पौल नव्याने सुरुवात करावयास सांगत आहे. जुने
ते घेऊन गेले आता नव्याचे आगमन झाले आहे व ही सर्व देवाची करणी आहे असे मार्गदर्शन
तो करतो.
शुभवर्तमान: लुक: १५:१-३, ११-३२.
आजच्या शुभवर्तमानात आपण
उधळ्या पुत्राचा प्रसिद्ध दाखला ऐकतो. प्रभू येशूच्या काळात जकातदार हे भ्रष्टाचाराचे
एक बोलके प्रतिक होते. ख्रिस्ताच्या श्रोत्यांमध्ये, भक्तांमध्ये जकातदार व पापी
लोकांचा झालेला भरणा पाहून, परुशी व शास्री कुरूकुर करू लागले की, ‘येशू हा पापी
लोकांचा मित्र असून तो त्यांच्या बरोबर पंगतीला बसतो’. मग प्रभू त्यांना हरवलेले
मेंढरू, हरवलेले नाणे व हरवलेला मुलगा असे दाखले देऊन दैवी आनंदाविषयी शिकवण देतो.
देव इतका दयाळू, ममताळू व करुणेचा विशाल सागर असेल, असा विचार शास्री व परुशी करू
शकत नव्हते. आपण चांगले केले तर देव आपल्याला आशिर्वाद देईल व पाप केले तर, शिक्षा
करील अशी त्यांची धारणा होती. त्यामुळे येशूचे पाप्यांबरोबर उठणे-बसणे त्यांना
खटकत होते. परंतु प्रभू येशू त्यांना संदेश देतो की, पश्चातापाची आवश्यकता
नसलेल्या नव्व्यानव सज्जनांपेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पाप्याबद्दल स्वर्गात
अधिक आनंद होतो.
बोधकथा:
केवळ चांगल्या माणसांवरच नव्हे, तर ज्यांच्या हातून नैतिक
अपराध घडले आहेत; पापी म्हणून जे बदनाम झाले आहेत, त्यांच्याबाबत माणसाने किती
करुणेने वागावे हे ख्रिस्ताने पटवून दिले आहे.
एक दिवस अब्राहम लिंकन ह्यांनी एका गरीब भिकारी व्यक्तीला
घरी जेवणासाठी आमंत्रित केले. जेव्हा लिंकन ह्यांनी जेवनाअगोदर प्रार्थनेस सुरुवात
केली, तेव्हा ती गरीब व्यक्ती रागावली. देवाला शिव्याशाप देऊन आपल्या
परिस्थितीबद्दल देवाला दोषी ठरवत वाईट, अपशब्द उच्चारले. लिंकन ह्यांना न राहून
त्यांनी त्या व्यक्तीस जेवण न देताच पळवून लावले.
त्या रात्री लिंकन ह्यांना
स्वप्नात देव म्हणाला, ‘अब्राहम मी त्या व्यक्तीला ४० वर्षे सहन करत आहे. सर्व
शिव्या शाप वाईट गोष्टी ऐकून मी रोज त्याला जेवण देत आहे; तू एक घटकाही त्याला द्या
दाखवू शकला नाहीस का?’
आपल्याला क्षमा मिळाली आहे
ह्यासाठी कि, आपणा दुसऱ्यांना क्षमा करावी. आपल्याला प्रेमाच्या शक्तीचा प्रत्यय
येतो आणि प्रेमामुळेच खऱ्या शांतीचा अविष्कार घडून येत असतो.
मनन चिंतन:
आजच्या शुभवर्तमानातील ‘उधळ्या
पुत्राचा’ दाखला हा बायबलमधील प्रसिद्ध दाखला आहे. ह्या दाखल्यामुळे अनेक हृदयाचे
परिवर्तन घडले आहे.
आपण सारे देवाच्या करुणेचे
लाभार्थी आहोत. त्याच्या उपकारांचे डोंगर आपल्या खांद्यावर आहेत. इतरांवर द्या
करून आपण देवाच्या ऋणातून मुक्त होण्याचा अल्प-स्वल्प प्रयत्न करु शकतो. त्यासाठी
आपली नजर देवाकडे लागली पाहिजे. गरजवंताना दया करणे चुकलेल्यांना क्षमा करणे, कठीण
वाटू लागले कि, देवाकडे पाहावे. ‘देवा जसा प्रेमळ आहे, तसा होण्याचा प्रयत्न करा,
असा उपदेश करून ख्रिस्ताने सामान्य माणसाला देव होण्याचे आमंत्रण दिले आहे.
यापेक्षा मनाचा मोठा गौरव तो कुठला? आपण कशासाठी ह्या जगात आलो आहोत? हे शास्री-परुशी
व इतरांना पटवून देण्यासाठी प्रभू येशूने जे अनेक दाखले सांगितले, त्यातील उधळ्या
पुत्राचा दाखला हा सर्व पिढ्यांना आणि सर्व देशांतील लोकांना भावणारा, मनात ठसणारा
असा दाखला आहे.
परुशी व शास्री ह्यांनी केलेल्या कुरकुरीला उत्तर देत
येशूने हा दाखला सांगितला. एका मनुष्याला दोन मुलगे होते. त्यापैकी धाकटा पित्याला
म्हणाला, ‘बाबा, मालमत्तेचा माझा वाटा मला दया’. यहुदी समाजाच्या नियमाप्रमाणे
व्यक्तीच्या मृत्यू शिवाय त्याच्या कुठल्याही संपत्तीची वाटणी करता येत नसे.
त्यामुळे जेव्हा धाकटा मुलगा संपत्ती मागत होता, तेव्हा तो बापाला म्हणत होता कि, ‘तुम्ही
माझ्यासाठी मरण पावले, माझा तुमचा संबंध संपला, किंवा मला तुमची गरज नाही’. परंतु
आपण ऐकतो कि, त्याने आपल्या संपत्तीची त्यांच्यात वाटणी केली व धाकटा मुलगा दूर
देशी निघून गेला. त्याने आपली सर्व मालमत्ता खर्चून टाकल्यावर त्याला अडचण पडू
लागली व डुकरे चारण्याची वेळ त्याच्यावर आली.
यहुदी समाजात डुकरे चारणे म्हणजे धिक्कार करण्यासारखे काम
होते. मग प्रभू म्हणतो, ‘तो शुद्धीवर येऊन म्हणाला (when he came to
himself) ह्याचाच अर्थ कि, तो कोण आहे? आपली ओळख काय? आपण ‘डुक्कर चारणारा’ नव्हे, तर
‘वारस’ आहोत. श्रीमंत बापाचा भिकारी मुलगा अशी वेळ का आली? तो स्वत:ला उठवून
म्हणाला, ‘मी वडिलांकडे जाईन’. तो उठून वडिलांकडे निघाला, दूर आहे तोच वडिलांनी
त्याला पाहिले व त्याला, त्याचा कळवळा आला. मुलाने जे काही म्हटले, त्याचे उत्तर न
देता बाप दासांना म्हणाला, ‘लवकर उत्तम झगा त्याच्या अंगात घाला, हातात अंगठी व
पायात जोडा घाला व पुष्ट वासरू आणून कापा. ‘उत्तम झगा’ कारण एखाद्याची ओळख, त्याची
लायकी, ही त्याने घातलेल्या झग्यावरून होत असते. ‘अंगठी’ हे अधिकाराचे प्रतिक आहे,
तसेच ‘पायातील जोड’ हा स्वातंत्र्याचे प्रतिक आहे.
अनेक लेखकांच्या मते हा दाखला ‘उधळ्या पुत्राचा’ न म्हणता, ‘प्रेमळ
पित्याचा’ आहे असे म्हटले पाहिजे. कारण मुलगा ह्या कथेचा नायक नव्हे, तर पिता आहे.
हा दाखला मुलाच्या पापांबद्दल नाही तर पित्याच्या प्रेमाविषयी आहे. तसेच ह्या
कथेतील उधळ्या पुत्राप्रमाणे आपल्यापैकी प्रत्येकजण देवापित्याकडून दूर गेला आहे आणि
देवाने दिलेली संपत्ती आपण उधळून टाकली आहे, म्हणूनच आपल्याला देवाकडे वळण्याची
आवश्यकता आहे.
तसेच मोठ्या भावाचे व्यक्तिमत्व हे
फार गुंतागुंतीचे आहे. त्याला वाईट वाटते कि, त्याचा भाऊ परत आला आहे; आपल्या
पित्याच्या आनंदात सहभागी होण्याऐवजी, तो रागावला व आत गेला नाही. जकातदार व पापी,
येशूचे देवाविषयी वचने ऐकण्यास येत आहेत हे पाहून आनंद वाटण्याऐवजी, शास्री व
परुशी कुरूकुर करतात. स्वर्गीय पित्याची त्यांना जाणीव नव्हती. इतकी वर्षे मोठ्या
मुलाचा आज्ञाधारकपणा एखाद्या कामाप्रमाणे व ड्यूटीप्रमाणे होता; जेथे प्रेमाला
स्थान नव्हते. तो आपल्या धाकट्या भावाला भाऊ न म्हणता हा ‘तुमचा मुलगा’ असे
संबोधितो. पिता म्हणजे काय? त्या पित्याच्या प्रेमाची किंमत कशाने करता येईल? वडिलांजवळ
राहूनही तो त्यांच्यापेक्षा कितीतरी दूर होता. संत लुक ह्या कथेचा शेवट न करताच,
दाखला संपवितो असे अनेक ईशज्ञानी म्हणतात. तो थोरला मुलगा घरात आला का? आपल्या
धाकट्या भावाशी त्याने समेट केला का? ही उत्तरे लुक देत नाही.
हे वर्ष करुणेच वर्ष आहे. ईश्वर
माणसावर पावसासारखा बरसत असतो. माणसाचे लाख अपराध पोटात घालीत असतो. माणसाने
दुष्टपणाचा कळस गाठला आहे. तरी देवाची माया कधी आटत नाही माणसाने, दयार्द्र असावे
असे प्रभूने शिकवले आहे. दया मनात असून पुरेशी नाही तर ती कृतीमधून व्यक्त झाली
पाहिजे. शास्री, परुशी हे जरी धार्मिक होते, तरी ते अध्यात्मिक नव्हते. अध्यात्मिक
प्रवृत्तीचा माणूस कसा ओळखावा? ज्या भक्ताच्या काळजातून करुणेची कारंजी उचंबळत
असते, त्याच्याच जीवनात अध्यात्माची आणि संस्कृतीची पहाट झालेली असते. असा मनुष्य
आप-पर भावाच्या पलीकडे जातो आणि सर्वांना आपलेसे म्हणतो. “दया करणे जे पुत्रासि/
तेची दासा आणि दासी// तुका म्हणे सांगू किती/ तोची भगवंताची मूर्ती//” असे दयाळू
माणसाचे व्यक्तिमत्व असते. दया ही भक्तीवर आलेली साय असते. दयाळू माणूस अवघ्या
चराचराला कवेत घेत असतो. करुणेमुळे ‘मृदू सबाह्य नवनीत’ अशा प्रकारचे अंत:करण
त्याला लाभते आणि मग मित्र, शत्रूच नव्हे तर वृक्षवल्ली आणि वनचरे हे सारे त्याला
आपले सोयरे वाटू लागतात.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो दया कर व आमची प्रार्थना ऐक.
१. आपले परमगुरु पोप फ्रान्सिस, महागुरू, धर्मगुरू व व्रतस्थ यांनी, त्यांचावर
सोपवलेल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात व लोकांना दैवी दयेचा अनुभव घेण्यास मदत
करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. जे निराश होऊन देवापासून दूर गेले आहेत, त्यांना प्रभूने स्पर्श करावा व त्यांच्या
जीवनात परिवर्तन व्हावे व त्यांनी परत एकदा प्रभूने दाखवलेल्या मार्गावर चालावे
म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आपल्या देशाचा कारभार सांभाळण्यासाठी जे राज्यकर्ते नेमलेले आहेत, त्यांनी
आपल्या विवेकबुद्धीला जागून, सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून जनतेचे प्रश्न व
अडचणी सोडवाव्यात व देशाच्या प्रगतीसाठी झटावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आज जगात अनेक गरीब राष्ट्रांतील लोकांना तसेच आपल्या समाजात अनेकांना
वेगवेगळ्या प्रकारचा अन्याय व छळ सहन करावा लागत आहे; अशा सर्व लोकांना प्रभूने,
त्यांच्यावर अन्याय व छळ करणाऱ्यांना क्षमा करण्यास प्रेरणा द्यावी म्हणून आपण
प्रार्थना करूया.
५. येथे जमलेल्या भाविकांनी निस्वार्थीपणे जीवन जगून आपल्या जीवनात
प्रार्थनेला प्राधान्य द्यावे व उदार मनाने आपल्या शेजाऱ्यांची सेवा करावी म्हणून
आपण प्रार्थना करूया.
Inspiring homily
ReplyDelete