Saturday, 19 March 2016

Reflection for the Homily of Maundy Thursday  (24/03/2016) By: Br. Wilson Gonsalves. 







आज्ञा गुरुवार



दिनांक: २४/३/२०१६.  
पहिले वाचन: निर्गम १२:१-८,११-१४.
दुसरे वाचन: १करींथ ११:२३-२६.
शुभवर्तमान: योहान १३: १-१५.   



“मी सेवा करून घेण्यासाठी नव्हे, तर सेवा करण्यासाठी आलो आहे”






प्रस्तावना:

प्रभू येशू त्याच्या अंतिम श्वासापर्यंत आज्ञाधारक राहिला, अन् त्याद्वारे त्याने परमेश्वर पित्याला परिपूर्णरित्या गौरविले. आजच्या ह्या विधीमध्ये पवित्र मिस्साबलीची स्थापना, गुरुपदाची स्थापना, नम्रता व सेवेचा महामंत्र ह्या शाश्वत मूल्याचा त्रिवेणी संगम झालेला आहे.
आपल्या दु:खसहनापूर्वी प्रभू येशू खिस्ताने आपल्या शिष्याबरोबर वल्हांडणाचे अखेरचे भोजन घेतले. हेच अखेरचे भोजन त्याच्या अतिपवित्र शरीर व रक्ताच्या बलिदानाचे व अखिल मानवजातीवरील नी:स्सीम प्रेमाचे दर्शक ठरले. हेच शाश्वत बलिदान आज पवित्र मिस्साद्वारे साजरे केले जात आहे. कारण तसा त्याने आपणास आदेश दिला आहे. खरे नेतृत्व, नम्रता व सेवा ह्याद्वारे विकसित होते. हे दर्शविण्यासाठी प्रभू येशू खिस्त, साक्षात देवपुत्र व गुरुंचा गुरु पराकोटीचा नम्र होऊन आपल्या शिष्यापुढे नतमस्तक होतो व त्यांचे पाय आपल्या पवित्र हातांनी धुतो.
“मी तर तुम्हांमध्ये सेवा करणाऱ्यासाठी आहे.” ह्या अनोख्या कृतीद्वारे प्रभूख्रिस्ताने आपणा प्रत्येकास सेवेचा, नम्रतेचा व समेटाचा महामंत्र बहाल केला आहे. आजच्या दिवशी त्याने पवित्र मिस्साबलीदानाची व धर्मगुरुपदाची स्थापना केली. पवित्र मिस्सा हा ख्रिस्ती श्रद्धेचा पाया व कळस आहे. ह्या मिस्साबलीदानात गौरव व मानवाचे तारण सामावलेले आहे. क्रूसावरील ख्रिस्ताच्या अजरामर बलिदानाद्वारे सिद्ध झालेली पापक्षमा प्रत्येक साजऱ्या केल्या जाणाऱ्या मिस्साद्वारे भाविकांना प्राप्त होत असते. आजच्या मंगल विधीमध्ये गुंफलेल्या ह्या महान व उदात्त कृपादानाची अनुभूती आपणा प्रत्येकास यावी म्हणून श्रध्देने ह्या विधीत आपण सहभाग घेऊया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: निर्गम १२:१-८,११-१४.

निर्गम ह्या पुस्तकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनामध्ये वल्हांडण सण कशा प्रकारे करावा ह्याबद्ल परमेश्वराने मोशेला केलेल्या मार्गदर्शनाबदल ऐकतो. पास्काचे भोजन म्हणजे वल्हांडण सण; गुलामगिरी ओलांडून स्वात्रत्र्यांकडे जाणे.
     यहुदी लोकांनी आपल्या सुटकेच्या स्मरणार्थ साजरा करावयाचा वल्हांडण सणाविषयीचे वर्णन सादर केलेले येथे आपणास आढळते. परमेश्वर आपणाबरोबर आहे व आपल्या शत्रुंपासून तो आपल्याला सोडवितो याची साक्ष हे वाचन आपणास देते. वल्हांडण सणाचे नियम हे कौटुंबिक प्रितीभोजनावर आधारलेले आहे. एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होऊन मुक्तीचा अनुभव घेण्यासाठी हा सण समाजाच्या एकोप्यावर भर देतो. फारो राजाच्या गुलामगिरीतून इस्रायल लोकांची झालेली सुटका ह्याविषयीचा इतिहास येथे वाचावयास मिळतो.  
        
दुसरे वाचन: १ करिंथकरांस पत्र ११:२३-२६.

आपल्या मरणाची घटका जवळ येते आहे हे ओळखून ख्रिस्ताने आपल्या शिष्याबरोबर अखेरचे भोजन घेतले. घ्या आणि खा हे माझे शरीर आहे.” “हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवीन करार आहे, हे माझ्या स्मरणार्थ करा.” ख्रिस्ताने ‘शरीर’ आपल्याला नवजीवन लाभावे म्हणून तर ‘रक्त’ पापाची क्षमा मिळावी म्हणून सांडले.  
संत पौलाने प्रभूभोजनाचे महत्व व गांभीर्य करिंथ येथील मंडळीच्या नजरेस संत पौल आणून देतो. प्रभू येशूने प्रीतीभोजनाद्वारे स्थापिलेल्या नव्या कराराविषयी तो आपणास आठवण करून देत आहे.

शुभवर्तमान: योहान १३:१-१५.

आजच्या पवित्र शुभवर्तमामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांबरोबर अखेरचे भोजन घेऊन धर्मगुरूपदाची आणि पवित्र मिस्स्साबलीची स्थापना कशी केली या दोन अतिशय महत्वपूर्ण घटनांचा संदर्भ येतो. दु:खसह्नापुर्वी आपल्या शिष्यांबरोबर अखेरचे भोजन घेत असताना येशूने आपल्या शिष्यांचे पाय धुतले व त्यांना सेवेचा महामंत्र घालून दिला.
 “वल्हांडण सणापूर्वी असे झाले की, येशूने आता ह्या जगांतून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली आहे हे जाणून ह्या जगांतील स्वकीयांवर त्याचे जे प्रेम होते ते त्याने शेवटपर्यंत केले(योहान १३:१). ह्या वचनातून आपणास पाय धुण्याचे खरे महत्व काय आहे ते समजून घेण्याची दिशा मिळते; आपली वेळ आल्याची येशूला झालेली सखोल जाणीव आणि त्याचे स्वतःच्या लोकांवरील असलेले त्याचे उदात्त प्रेम आपणास दिसून येते (योहान १३:२ ह्या वचनावरून शिमोनाचा मुलगा यहुदा इस्कार्योतद्वारे सैतानाने येशूविरुद्ध चालविलेली कारवाई स्पष्ट होते); तसेच येशूच्या कार्याचा उगम व भवितव्य स्वर्गीय असल्याची येशूची प्रबळ खात्री आपणास दिसून येते.
भोजन सुरु असताना ख्रिस्त, परमेश्वर आणि गुरु असूनही आपल्या शिष्यांचे पाय धुतो व त्यांना सेवेचा, नम्रतेचा तसेच समेटाचा महामंत्र देतो, नि त्यांना, “तुम्हांला हे उदारहणादाखल केले आहे, तुम्ही माझे अनुकरण करा” असे म्हणतो. ख्रिस्ताच्या सेवेचे आमंत्रण आपण सुवार्तेद्वारे  ऐकतो. 
         
मनन चिंतन:

पवित्र मिस्साबालीदानाचा विधी हा ख्रिस्ती जीवनाचा पाया, केंद्रबिंदू आणि कळस मानला जातो. हा संपूर्ण विधी म्हणजे एक सर्वश्रेष्ठ प्रार्थना आहे; तिच्यामध्ये परमेश्वराचा गौरव आणि माणसाचे तारण सामावलेले आहे. ख्रिस्ताच्या क्रूसावरील बलिदानाने उपलब्ध होणारी पापक्षमा प्रत्येक पवित्र मिस्साबलीदानाच्या विधीमुळे आपल्याला मिळत असते. यामुळेच तर प्रत्येक मिस्सामध्ये पवित्र ख्रिस्तशरीराचे सेवन केल्यानंतर श्वाश्वत ख्रिस्ताचे दर्शन आम्हाला घडते असा आमचा विश्वास आहे. ‘आज्ञा गुरूवारी’ प्रभू येशू ख्रिस्ताने १) पवित्र मिस्साबलिदान २) धर्मगुरूपद ह्या दोन महत्वपूर्ण संस्कारांची स्थापना करून संपूर्ण जगाला ‘बंधू-प्रेमाची’ आज्ञा केली. दोन हजार सोळा वर्षापूर्वी अशाच एका रम्य सांयकाळी प्रभू येशूने आपल्या शिंष्यासमवेत भोजन घेतले. यहुदी समाजात भोजनाप्रसंगी द्राक्षरस व भाकर ह्यांचे सेवन केले जाई. प्रभू येशूने ह्याच चिन्हांचा आधार घेऊन पवित्र मिस्साबलिदानाची स्थापना केली. भाकर मोडून त्याने दुस-या दिवशी कालवरी डोंगरावर घडणा-या चित्तथरारक नाट्याची कल्पना आपल्या शिष्यांना दिली. क्रुसावर घळघळ वाहणा-या रक्ताचे थेंब त्याने द्राक्षरसाच्या रूपाने आपल्या शिंष्यापुढे सादर केले आणि त्यामुळेच प्रत्येक वेळी जेव्हा आपण मिस्साबली अर्पण करतो, त्यावेळी शेवटच्या भोजनाचे आणि कालवरीच्या घटनेचे स्मरण करतो.

तू याजक युगायुगाचा, जगतातूनी मी तुज निवडीले, देण्या शुभर्वाता सकला माझी.”

“धर्मगुरू पद हे प्रभू येशु ख्रिस्ताच्या अतिपवित्र हृद्यातील प्रेमाचे प्रतिबिंब आहे” असे  उद्गार धर्मगुरूंचा आश्रयदाता संत जॉन मारी व्हियानी ह्यांनी काढलेले आहेत. धर्मगुरू पदाचे पाचारण हे समर्पित सेवेद्वारे प्रभूच्या मिशन कार्यात सहभागी होऊन देव-राज्याची प्रस्थापना करण्याचे पाचारण आहे. पवित्र ख्रिस्तसभेचे काही विशेष प्रेषितकार्य करण्यासाठी काही सभासदांना खुद्द् देवाने पाचारण केले आहे. हे सेवक गुरूदीक्षा विधीद्वारे अभिषिक्त केले जातात व निवडले जातात. गुरूदीक्षेद्वारे मिळणा-या पवित्र आत्माच्या कृपेमुळेच ख्रिस्तसभेतील सर्वांच्या सेवेसाठी ख्रिस्ताच्या नावाने कार्य करण्याचे सामर्थ्य त्यांना मिळते. दीक्षित धर्मगुरू हा ‘प्रमुख याजक’ ख्रिस्त यांची जितीजागती प्रतिमाच असते.
दिव्यांचे कार्य असते अंधाराला नाहीसे करण्याचं; थंडगार वा-याचे कार्य असते, उकाडा कमी करण्याचे; फुलाचे कार्य असते सुगंध देण्याचं, त्याचप्रमाणे धर्मगुरूचे कार्य असते आशिर्वाद देण्याचे, आपल्या सेवामय जीवनाद्वारे लोकांना ख्रिस्त देण्याचे, र्निजीव झालेल्यांना सजीव करण्याचे, ज्याच्याकडे समाजाने पाठ फिरवलेली आहे अशा लोकांचे जीवन फुलविण्याचे व आशेचे बी पेरण्याचे. धर्मगुरू जन्मापासून ते मरणापर्यंत आपल्या सोबत असतात. मिस्साद्वारे आपल्या बरोबर असतात.
‘धर्मगुरू म्हणजे काय?’ ह्याचे वर्णन लेखक ‘सायमन मार्टिन’ सुंदररीत्या आपल्यासमोर मांडतात. इटलीतील लान्सियानो शहरात एक धर्मगुरू मिस्सा अर्पण करीत होते. भाकर व द्राक्षरस आर्शिवादित करीत असताना त्याच्या मनात शंका आली की ही भाकर व द्राक्षरस जे मी आर्शिवादित करीत आहे, त्याचे रूपांतर खरोखर येशूच्या पवित्र शरीरात व रक्तात होते का? ह्या शंकेस्तव धर्मगुरूंनी दोनदा भाकर व द्राक्षरस आर्शिवादित केले आणि काय आश्चर्य! ‘भाकरीचे’ रुपांतर ‘मांसात’ झाले व ‘द्राक्षरसाचे’ येशूच्या ‘रक्तात’ झाले. ह्या येशूच्या रुपांतरीत मांसावर व येशूच्या रक्तावर खूप संशोधन करण्यात आले. परंतु शेवटचे संशोधन १८ नोव्हेंबर १९७० रोजी ‘लेनोली’ व ‘बारतोली’ ह्या दोन शास्रज्ञांनी केले व आपल्या संशोधनाचा अहवाल २१ मार्च १९७१ रोजी सादर केला; तो असा की, ते ‘रक्त’ व ‘मांस’ हे खरे आहे. ते एकाच माणसाचे रक्त व मांस आहे. त्या मांसाचे तंतू हे हृदयाचे आहेत. हे जिवंत माणसाचे रक्त व शरीर आहे.
     आपल्या अखेरच्या भोजनाद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला आदर्श ख्रिस्ती सेवेचा परिपाठ घालून दिला आहे. आपल्या विनम्र सेवेद्वारे त्याने आम्हांवरील आपल्या प्रेमाची परिपूर्ती केली आहे आणि आम्हांला दाखवून दिले की, ‘नम्रपणे कोणताही गाजावाजा न करता केलेली सेवा ही सर्वोतम सेवा असते’. त्याग, नम्रता आणि बलिदान हे तिचे अंगभूत घटक असतात. म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, “मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही तर सेवा करावयास आणि पुष्कळांच्या पापांसाठी खडणी भरावयास या जगात आला आहे.” प्रभू येशूने शिष्यांचे पाय धुऊन आपणा सर्वांना सेवेचा उत्तम महामंत्र दिलेला आहे. ही ख्रिस्ताची आज्ञा आपण सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनात सातत्याने आचरणात आणावी म्हणून आपण ह्या उपासनेमध्ये विशेष प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: परमेश्वरा आमचे प्रत्येकाचे पालन-पोषण कर.

१. आपल्या सेवाकार्याद्वारे  ख्रिस्ताची ओळख जगाला करून देणारे आमचे परमगुरु, महागुरू  व धर्मगुरू ह्यांना परमेश्वराने आध्यात्मिक बळ, चांगले आरोग्य व दीर्घायुष्य देऊन आशीर्वादित करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. ख्रिस्ताने शिष्यांचे पाय धुऊन सेवेचा व नम्रतेचा महामंत्र दिला. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने आपल्या दैनंदिन जीवनात हा संदेश कृतीत उतरावा, म्हणून आपण प्रार्थना करूया. 
३. पवित्र कोकराच्या बलिदानाने सर्व मानवजातीचा उद्धार केला, पवित्र मिस्साबलिदान हे त्याचे सदैव प्रतिक असावे म्हणून आपण प्रार्थना करूया.        
४. पवित्र मिस्साबलिदानास आपल्या कुटुंबात महत्त्वाचे स्थान असावे व पवित्र ख्रिस्तशरीराद्वारे मिळणा-या येशूच्या कृपेचा व शांतीचा अनुभव आपणास यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आपल्या धर्मग्रामातील धर्मगुरूंना, धर्मभगिनींना त्यांच्या धार्मिक कार्यात येशूची प्रेरणा, कृपा व शक्ती मिळावी, त्याचप्रमाणे जे धर्मगुरू, धर्मभगिनी आजारी व वयस्कर आहेत त्यांना चांगले आरोग्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. ह्या उपवास काळातील शेवटच्या दिवसांत आपण पूर्ण मनाने व अंतकरणाने परमेश्वराकडे वळून आपल्या जीवनाद्वारे प्रेम व सेवा ही ख्रिस्ताची मुल्ये आपल्या कुटुंबात, समाजात पसरावी म्हणून आपण प्रार्थना करूया.


No comments:

Post a Comment