Tuesday, 22 March 2016



Reflections for the homily of Easter Sunday  (27/03/2016) By: Sadrick Dapki.


 पास्काचा सण








दिनांक: २७/०३/२०१६.
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये १०: ३४, ३७-४३
दुसरे वाचन: कलस्सैकरास पत्र ३:१-४
शुभवर्तमान: योहान २०:१-९.



“पुनरुत्थान व जीवन मीच आहे”







प्रस्तावना:

ख्रिस्त मरणातून उठला आहे. त्याने मरणावर विजय मिळविला आहे. आपल्या ख्रिस्ती जीवनातील अति महत्त्वाचे घटक म्हणजे, ‘येशू ख्रिस्ताचे मरण व पुनरुत्थान.  आजच्या उपासनेतील तिन्ही वाचने आपणांस ‘सत्य’ पटवून देत आहेत की, ख्रिस्ताने मरणावर विजय मिळवून संपूर्ण जगाला दाखविले की, आपला देव हा जिवंत देव आहे.
पहिल्या वाचनात पेत्र ज्यांनी ख्रिस्ताची सुवार्ता ऐकली नाही व जे खऱ्या जिवंत देवाविषयी उत्सुक आहेत, त्यांना प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देतो. दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला आपले लक्ष स्वर्गीय येशू ख्रिस्तावर केंद्रित करण्यास सांगत आहे. कारण प्रभू येशूने मृत्यूवर व जगावर विजय मिळविला आहे. शुभवर्तमानात आपण पाहतो की, येशू ख्रिस्त हा मरणावर विजय मिळवून उठला आहे.
येशू ख्रिस्त म्हणतो, ‘पुनरुत्थान व जीवन मीच आहे’ आणि आपण त्याच पुनरुत्थित ख्रिस्ताचे अनुयायी आहोत. ‘प्रत्येक अंधारमय भोगद्यानंतर आशेचा किरण दिसत असतो’, म्हणून मृत्यू हा आपल्या जीवनाचा शेवट न मानता आपणदेखील प्रभूच्या पुनरुत्थानात एकदिवस सामील होणार आहोत हा आपला विश्वास वृद्धिंगत व्हावा म्हणून या ख्रिस्तयागात आपण विशेष प्रार्थना करुया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये १०: ३४, ३७-४३

प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकात प्रामुख्याने आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताने पुनरुत्थित झाल्यानंतर आपल्या शिष्यांना दिलेल्या दर्शनाविषयी तसेच शुभवर्तमानाच्या केलेल्या प्रचाराविषयी वृत्तांत आढळून येतात. आजच्या पहिल्या वाचनात आपण मरणातून पुनरुत्थित झालेल्या ख्रिस्ताविषयी संत पेत्राने दिलेल्या ग्वाहीबद्दल ऐकतो. संत पेत्र म्हणतो, ‘पवित्र आत्म्याने अभिषिक्त केलेल्या नाझरेथकर येशूने मरणावर विजय मिळवून, तो जिवंताचा व मेलेल्यांचा न्यायाधीश बनला आहे. त्याच्यावर श्रद्धा ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या नावात पापांची क्षमा लाभली आहे’.
ख्रिस्ताने मरणावर विजय मिळवून आम्हाला स्वर्गीय जीवनाचे भागीदार बनविले आहे. ज्या देवाने ख्रिस्ताला मरणातून उठविले आहे, तोच देव आम्हालासुद्धा न्याय-दिनाच्या दिवशी मरणातून उठवून मांगल्यमय जीवनाचे स्पर्थक घडवून आणील.

दुसरे वाचन: कलस्सैकरांस पत्र ३:१-४

आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल कलस्सैकरांना, “ख्रिस्ताबरोबर पुनरुत्थित होण्याचे स्पष्टपणे नमूद करून देत असताना आपल्याला उद्देशून म्हणतो की, ख्रिस्ताबरोबर आपण देखील उठवले गेलो आहोत. आता आपण त्याच्या पुनरुत्थित जीवनात सहभागी झालो आहोत. ह्यास्तव, आपले जीवन आता वेगळे असायला हवे. स्वर्गीय गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी संत पौल आपल्याला विनंती करतो. कारण तेथे ख्रिस्ताच्या प्रकाशाची, प्रेमाची व सत्याची सत्ता स्थापित केली आहे.

शुभवर्तमान: योहान २०:१-९

संत योहान आपल्या शुभवर्तमानात येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयीच्या घडलेल्या घटनेचे विवरण करीत असताना, ‘रिकामी कबर’ ह्या प्रसंगाचा उल्लेख प्रथमरीत्या नमूद करतो. येशूची ‘रिकामी कबर’ हा आपल्या ख्रिस्ती विश्वासाचा गाभा मानला जातो व ख्रिस्ताच्या गौरवशाली पुनरुत्थानाचा एक अविभाज्य असा भाग मानला जातो.
प्रत्येक शुभवर्तमानकार ह्या प्रसंगाबद्दल वेगवेगळे प्रसंग मांडतो. जसे संत योहान २०:१ मध्ये म्हणतो, ‘मरिया माग्दालीया एकटीच कबरेजवळ गेली’. संत मत्तय २८:१ मध्ये, ‘मरिया माग्दालीया व दुसरी मरिया, ह्या दोन व्यक्ती कबरेजवळ गेल्याचे नमूद करतो’, तर संत मार्क १६:१ मध्ये म्हणतो, ‘मरिया माग्दालीया, याकोबची आई मरिया व सलोम ह्या तीन व्यक्ती तेथे हजर होत्या’. ह्या विविध वृत्तांवरून आपल्याला एकच महत्त्वाची गोष्ट साध्य करावयास भेटते, ती म्हणजे येशू ख्रिस्त हा मरणातून उठला आहे व ‘त्याने मेलेल्यांतून पुन्हा उठावे’ असा शास्त्रलेख जो लिहिला गेला होता तो पूर्ण झाला आहे.
तसेच आजच्या शुभवर्तमानात येशूच्या बारा शिष्यांपैकी दोन शिष्यांचा उल्लेख केला गेला आहे पण त्यापैकी फक्त एकाच शिष्याचे नाव स्पष्टपणे मांडण्यात आले आहे आणि ते म्हणजे ‘शिमोन पेत्र’ व दुसऱ्या शिष्याचे नाव गुपित असल्याचे दिसून येते. परंतु उल्लेखाप्रमाणे आपणास, येशूचा अतिप्रिय शिष्य संत योहानच आहे असे स्पष्ट होते. मरिया माग्दालीया हिने दिलेल्या वृत्तांतावरून दोन शिष्य, पेत्र व योहान, येशूच्या रिकाम्या कबरेजवळ येतात व ख्रिस्ताने सांगितल्याप्रमाणे, “मी तिसऱ्या दिवशी मरणातून पुन्हा उठेन” ह्या वचनावर विश्वास ठेवतात.

बोधकथा:

लंडन ह्या शहरात घडलेली हि सत्य घटना आहे. १६६६ मध्ये संत पौलाला समर्पित केलेल्या एका महामंदिराला भल्या पहाटे आग लागली व काही क्षणातच ते महामंदिर त्या आगीने भस्म करून टाकले. तब्बल दहा-बारा वर्षाचा काळ उलटल्यानंतर पोप महाशयांनी ‘ख्रिस्तोफर बेल्न’ ह्या नव-शिक्या शिल्पकाराला त्या चर्चच्या पुन:बांधकामासाठी हवा असलेला आराखडा बनविण्यास सांगितला. ख्रिस्तोफरने त्या जागेचे चांगल्याप्रकारे निरीक्षण केले व परिसराचा अभ्यास केला. सुरुवातीला काम थोडे अवघड दिसत होते कारण, त्याला हवे असलेले निकाल मिळत नव्हते.
     परंतु एके दिवशी उध्वस्त झालेल्या त्या चर्चच्या ढिगाऱ्यातून, त्याने एक शिल्प उचलले व त्यावर कोरलेल्या शब्दांना वाचून तो आश्चर्यचकित झाला. आता त्याचा विश्वास बसला की, ह्या चर्चची  पुन: बांधनी होणे शक्य आहे. कारण त्यावर  शिल्पकाराने कोरलेले शब्द होते, ‘होय मी पुन्हा उठेन’. आणि ह्याच शब्दावर विश्वास ठेऊन त्याने त्याचे काम पूर्ण केले व आपणास आज भव्य महामंदिर पहावयास भेटते.

मनन चिंतन:

आपण गोष्टी ऐकतो व त्या गोष्टींमध्ये रमून जातो. काही गोष्टींतून आपणास बोध मिळतो. आणि आपणास काहीतरी शिकावयास भेटते. पण जर ती गोष्ट अपुरी असली तर आपण बैचेन होतो, कारण आपणास त्या गोष्टीचा शेवट भेटत नाही. एक लहान मुलगी शुभवर्तमान वाचावयास बसली, ती येशू ख्रिस्तामध्ये हरवून गेली आणि अचानक रडत-रडत आईकडे धावत येऊन म्हणाली, “त्यांनी त्याला मारले, त्यांनी त्याला मारले”. म्हणून तिच्या आईने तिला दिलासा देऊन म्हटले, “जा आणि गोष्ट पूर्ण कर”.
त्या मुलीप्रमाणे आपल्याला सुद्धा येशूच्या मरण व पुनरुत्थानाची गोष्ट माहित आहे. आपले हृद्य व मन हे पराभूत झालेल्या गोष्टी ऐकून नाहीत तर विजयी झालेल्या गोष्टी ऐकून भरून जाते व आनंदी होते. येशू ख्रिस्त मरण पावल्याने सर्वांनाच दुःख झाले होते व सर्वजण खोलीत बसून शोक करत होते. मरिया माग्दालीया सुद्धा त्या शोकात येशू ख्रिस्ताच्या थडग्याजवळ आली; ती येशू ख्रिस्ताच्या मृत्यूबद्दल विचार करत होती. ती जीवनामध्ये मृत्यूचा शोध करीत होती; जिवंत देवाला थडग्यामध्ये शोधत होती. परंतु जेव्हा तिला कळून चुकले कि येशू ख्रिस्त येथे नाही तो जिवंत झाला आहे, तिचा आंनद गगणात मावेनासा झाला, तिने गोष्टीचा शेवट बघितला व आनंदित झाली.
‘येशू ख्रिस्त हा जिवंत देव आहे’ आणि त्याच्यामध्ये आपले जीवन आहे. येशू ख्रिस्त हा पुनरुत्थित झाला हे आपणास त्याची रिकामी कबर पाहून समजले. येशू ख्रिस्ताच्या मरणाने व पुनरुत्थानाने आपले तारण झाले. हे सर्व त्याने केले ते आपल्या प्रेमाखातीर. ‘देवाने जगावर खूप प्रेम केले’ व जेव्हा हे जग पापामध्ये बुडायला लागले, तेव्हा त्याने आपल्या प्रेमळ पुत्रास पाठविले. जेणेकरून आपण ह्या पापांतून मुक्त होऊ. येशू ख्रिस्ताने आपणावर शेवटपर्यंत प्रेम केले आणि ते प्रेम आपण उत्तम शुक्रवार (Good Friday) च्या दिवशी पाहिले, आणि हेच प्रेम आज पर्यंत जिवंत आहे.
येशू ख्रिस्ताचे प्रेम हे शेवटी विजयी झाले कारण त्याने पापांवर आणि मरणावर विजय मिळविला. तो आपल्याला जीवनाचे नाविन्य देतो. हा पास्काचा उत्सव आपणास मूलगामी नाविन्याची भेट वस्तू देतो. सर्व काही बदलणार, पाप व मृत्यू कधीच विजय मिळवणार नाही, कारण आपण मिस्साबलीदानात विश्वासाने म्हणतो, ‘ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल’.
हे आपले नाविन्यमय जीवन जे आपल्याला देवाच्या प्रेमाने लाभले आहे ते चिन्हाद्वारे दृश्यमय केलेले आहे. वेदीसमोर आपण एक पेटती नवीन आशीर्वाद केलेली ‘पास्कल कॅन्डल’ पाहतो. जिची जळती वात येशू ख्रिस्त हा प्रकाश आहे असे दर्शवते. होय, येशू ख्रिस्त हा प्रकाश आहे, जो आपल्या जीवनमय वाटचालीत मार्ग दाखवतो, पापांचा व मृत्यूचा अंधकार नाहीसा करतो. एकटेपणामध्ये कठीण परिस्थितीमध्ये प्रेमळ उब देतो आणि आपल्या भय व अनिश्चितते मध्ये मार्गदर्शन करतो. हे आपले नाविन्यमय जीवन जे आपल्याला देवाच्या प्रेमाने लाभले आहे ते पाण्याच्या चिन्हाद्वारे दृश्यमय केले आहे. लवकरच रात्री आशीर्वादित केलेले पाणी तुमच्या अंगावर शिंपडले जाईल. हे पाणी, ‘येशू ख्रिस्त हा जीवन आहे’ असे चिन्हांकित करते, जे आपल्याला आपले रोजचे जीवन ख्रिस्तासारखे व त्याच्या शिकवणीसारखे जगायला समर्थ करत असते.
यंदाच्या वर्षी आपण असामान्य करुणा वर्ष (ज्युबिली वर्ष) पाळत आहोत. देवाची दया हि अपार आहे. तो आपल्याला कधीच वाळीत टाकत नाही; त्याच्याच दयेमुळे आज आपण पापांपासून मुक्त झालो आहोत. म्हणून आज आपण पुनरुत्थित  येशूच्या ऐक्यात राहण्याचे वचन घेत असताना त्याच्याकडे प्रार्थना करुया, जेणेकरून आपण त्याच्यासारखे जीवन जगू आणि ‘पास्काचे साक्षीदार’ बनू. जे अंधारात भटकत आहेत त्यांना पुनरुत्थित येशूचा प्रकाश दाखवू. आणि हा पास्काचा आनंद सर्वांना देऊ..... आल्लेलूया.... आल्लेलूया....आल्लेलूया..... आमेन.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभू आम्हाला तुझे दर्शन दे.

१. ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे, पोप महाशय, बिशप्स, सर्व धर्मगुरु, व्रतस्थ बंधू व भगिनी जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करत आहेत, ह्या सर्वांना परमेश्वराचा आशीर्वाद लाभावा व त्यांनी देवाचे कार्य चालू ठेऊन एक उत्तम जीवन जगावं म्हणून आपण प्रार्थना करुया.
 २. पुनरुत्थित येशू ख्रिस्ताच्या विजयाचा, आनंदाचा व प्रकाशाचा संदेश जे धर्मगुरू व धर्मभगिनी आज इतरांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करतात त्यांना त्यांच्या कार्यात, प्रभूची कृपा व शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करुया.
३.  जे लोक ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाहीत, त्यांना पुनरुत्थित ख्रिस्ताचा अनुभव यावा, तसेच त्यांनी पापाच्या अंधकारातून प्रभूच्या प्रकाशात एक नविन जीवनाला सुरुवात करावी म्हणून आपण प्रार्थना करुया.
४. आपल्या देशाचा कारभार सांभाळण्यासाठी जे कार्यकर्ते नेमेले गेले आहेत, त्यांनी आपल्या विवेकबुद्धीला जागवून सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून जनतेचे प्रश्न व अडचणी जाणून घ्याव्यात व देशाच्या प्रगतीसाठी झटावे म्हणून आपण प्रार्थना करुया.
५. आपल्या धर्मग्रामात जे लोक वेगवेगळ्या आजाराने ग्रासलेले आहेत त्यांना पुनरुत्थित प्रभू परमेश्वराच्या कृपेचा स्पर्श व्हावा आणि नविन जीवनाची वाट त्यांना दिसावी म्हणून आपण प्रार्थना करुया.
६. आपण आपल्या वैयक्तिक व सामाजिक गरजांसाठी शांतपणे प्रार्थना करुया.

No comments:

Post a Comment