Reflections for the homily of 5th Sunday in Lent (13/03/2016)
By: Brandon Noon.
उपवास काळातील पाचवा रविवार
दिनांक: १३/०३/२०१६
पहिले वाचन: यशया ४३: १६-२१
दुसरे वाचन: फिलिप्पैकरांस पत्र ३:८:१४
शुभवर्तमान: योहान ८:१-११
“जा, ह्यापुढे पाप करू
नकोस”
प्रस्तावना:
आज आपण उपवास काळातील पाचवा रविवार
साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्याला ‘भूतकाळाच्या गोष्टी न करता, वर्तमानकाळात
राहून, भविष्यासाठी कार्य करायला हवे’, ह्याविषयी सांगत आहे. परमेश्वर दयेचा सागर
आहे, तो आपल्या चुकांकडे न पाहता आपण त्याची चांगली लेकरे बनावेत यासाठी आपल्याला
कृपा देत असतो.
यशया संदेष्टा पहिल्या वाचनात, पुर्वीच्या
गोष्टींकडे पाठ फिरवून नव्या गोष्टी स्वीकारण्यास आमंत्रित करीत आहे. दुसऱ्या
वाचनात, संत पौल सांगतो की, मी मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून, पुढील गोष्टीकडे
लक्ष लावले, ख्रिस्त येशूच्याठायी देवाने केलेले पाचारण आणि त्या संबंधीचे बक्षीस
मिळविण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे धावलो. आजच्या मार्कलिखीत शुभवर्तमानात आपण
ऐकतो की, ‘येशू व्यभिचार करणाऱ्या स्त्रीला दोषी ठरवित नाही तर ह्यापुढे पाप करू
नकोस असे सांगून जीवनाला नव्याने सुरुवात करण्यास संधी देत आहे.
आपला परमेश्वर हा क्षमाशील देव आहे. तो पापी माणसाचा नव्हे
तर त्याने केलेल्या पापांचा द्वेष करतो. आपणही परमेश्वराच्या दयेचा आनंद घ्यावा व
दुसऱ्यांच्या चुकांकडे लक्ष न देता उलट त्यांच्यातला चांगुलपणा शोधावा म्हणून ह्या
मिस्साबलीदानात आपण प्रार्थना करूया.
सम्यक विवरण
पहिले वाचन: यशया ४३:१६-२१
यशया संदेष्टा बाबिलोनच्या हद्दपारीतील लोकांचे सांत्वन
करतो व सांगतो कि, ‘जो समुद्रात, मार्ग, प्रचंड प्रवाहात, वाट करितो व ज्याने रथ व
घोडे, सैन्य व वीर ह्यांस बाहेर काढल्यामुळे ते एकत्र पडते आहेत, तोच परमेश्वर
म्हणतो कि, ‘पूर्वीच्या गोष्टीची आठवण करु नका, जुन्या गोष्टी मनात आणू नका. कारण
मी एक नवीन गोष्ट करणार आहे. मी तुम्हाला सर्वांना एकत्र करणार आहे. तसेच परमेश्वर
सांगत आहे कि, ‘तुम्ही तुमच्या जुन्या गोष्टीवर विचार करत बसू नका, तर पुढे काय
करणार त्यावर विचार करा. कारण मी तुमचा परमेश्वर अरण्यात सडक करीत, मरुभूमीत नद्या
वाहवीन’. जर परमेश्वराचा ह्या सर्व गोष्टी शक्य असतील तर परमेश्वर आपल्याला, वाईट
मार्गावरून चागल्या मार्गावर जाण्यासाठी नक्कीच मद्दत करील.
दुसरे वाचन: फिलिप्पैकरांस ३:८-१४
ख्रिस्त येशू माझा प्रभू याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे
पौलाला यहुदी समाजात मोठ्या आदराचे स्थान होते. त्यामुळे जे काही छळ त्यानी केले
होते ते त्याला ख्रिस्तासमोर केरकेचरा वाटू लागल्या होत्या व त्या सर्व गोष्टी
हानिकारक अशाच वाटू लागल्या होत्या. कारण त्या गोष्टी ख्रिस्ताविषयीचे ज्ञान
मिळविण्याच्या आड येत होत्या. ख्रिस्त विश्वासणाऱ्यात व विश्वासणारे ख्रिस्तात हे
सत्य, आपल्या जीवनात प्रगट व्हावे अशी पौलाची इच्छा होती. नियमशास्त्र पाळून
नीतिमान ठरण्याच्या मागे तो लागला नव्हता. तर ख्रिस्तावरील विश्वासाने देवापासून
मिळालेल्या नितीमत्वाने तो पूर्ण समाधानी होता.
ख्रिस्ताची ओळख अधिकाअधिक होत जावी
ही पौलाची इच्छा होती. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे मिळणारे सामर्थ्य त्याला
विपुल असावे व त्याद्वारे ख्रिस्ताला त्याचा नकार झाल्यामुळे जे दु:ख सोसावे लागते
ते दु:ख अनुभवता यावे अशी पौलाची इच्छा होती. यामुळे ह्या मृतशरीरामध्ये त्याला
आत्मिक व नैतिक पुनरूत्थानाचे सामर्थ्य प्रगट करता आले.
पौलाने अजूनही आपले ध्येय गाठले नव्हते. कारण त्याचे तारण
होऊन सुमारे ३० वर्षे लोटली होती. ‘मी अजून पूर्ण झालो नाही असे तो म्हणतो आणि आपण
सर्वांनी हे सत्य नम्रपणे कबुल करावे.
‘आपण ख्रिस्ताप्रमाणे म्हणजे
ख्रिस्ताचा स्वभावाचे व्हावे’ या ध्येयाच्या मागे पौल लागला होता. ह्यासाठीच
ख्रिस्ताने त्याला स्वतःचेच केले होते. तो मोठ्या निश्चयाने हे महान ध्येय
गाठण्यासाठी धावत होता. त्याच्या जीवनातील मागील गोष्टीकडे त्याने मुद्दामच
निश्चयाने दुर्लक्ष केले होते.
त्याने जे मिळवले होते किंवा
ख्रिस्ती जीवनात जी वाटचाल केली होती तिच्या विषयीही तो विचार करीत बसला नाही. तर
ख्रिस्ताने त्याला ज्या उपदेशाकरिता निवडले होते ते पूर्ण व्हावे व यासाठी
धावण्याच्या शर्यतीत पहिले स्थान मिळविण्याच्या इच्छेने धावावे तसे, तो त्या धैर्यामागे
लागला होता. ख्रिस्तासारखा होण्यासाठी मी जसा धावत आहे तसेच तुम्ही माझे अनुयायी
व्हा’, असे पौल आपणास सांगतो. पौल त्यांचा आदर्श नव्हता, तर त्यांचा आदर्श
ख्रिस्तच होता. पौलाच्या वृत्तीने त्यांनी ख्रिस्तासारखे झटावे.
शुभवर्तमान: योहान ८:१-११
शास्त्री आणि परुशी एका स्त्रीला मंदिरात घेऊन आले. कारण
तिने व्यभिचाराचे पाप केले होते. मोशेच्या नियमशास्त्रांत व्यभिचाराचे पाप केलेल्या
स्त्रीयेस दगड मार करावा अशी आज्ञा दिलेली आहे. शास्त्री आणि परुशी येशूसमोर तिला उभी
करतात परंतु येशू तिला दोषी ठरवित नाही कारण येशूने जर दगड मार करा असे म्हटले असते
तर तो रोमी कायद्याविरुद्ध चिथावणी देतो असा आरोप त्यांनी ठेवला असता आणि जर दगड
मार करून नका असे उत्तर दिले असते तर हा मोशेने दिलेले नियमशास्त्र पाळू नका असे
शिकवतो असा प्रचार त्यांनी केला असता. परंतु येशूने ठामपणे उभे राहून त्या धर्म
पुढाऱ्यांना म्हटले, ‘तुम्हांमध्ये जो निष्पाप आहे त्यांनी प्रथम दगड भिरकावा.
प्रभू येशूला त्या प्रत्येकाचे
जीवन चरित्र ठाऊक होते. त्यामुळे ख्रिस्ताच्या पावित्र्यासमोर त्यांना स्वत:च्या
पापाची इतकी लाज वाटली कि, ते सर्व तेथून निघून गेले. मग येशूने त्या स्रीला
पापक्षमा करून पुन्हा पाप न करण्याची आज्ञा केली.
मनन चिंतन:
आज आपण ख्रिस्ताच्या दु:ख सहनात भाग घेण्यासाठी एकत्र आलो
आहोत. ख्रिस्त सर्व दु:ख सहन करतो. आपल्या पापांसाठी, आपल्याला बंधनात मुक्त
करण्यासाठी आणि म्हणून आज ह्याच ख्रिस्ताच्या परिवर्तानात्मक शक्तीचा अनुभव घेऊया.
एकदा एका धर्मग्रामातील जॉन नावाचा
मुलगा होता. तो रोज दृढीकरणाच्या क्लासला जायचा. एके दिवशी धर्मभगिनी क्लास घेत
असताना म्हणाल्या, ‘सर्वांनी आपले पहिले बोट एक दुसऱ्याकडे करा. तेव्हा सर्वांनी आपली
बोटे एकमेकांकडे केली, परंतु जॉनला काही समजल नाही कि, ह्या धर्मभगिनीने आपल्याला
एक दुसऱ्याकडे बोट कशाला करायला लावले? तेंव्हा जॉनने तिला प्रश्न विचारून ह्यामागचा
हेतू काय? ते आम्हाला समजावा. तेंव्हा ती म्हणाली. जॉन जेंव्हा आपण दुसऱ्याकडे एक
बोट दाखवतो तेव्हा आपल्याकडे तीन बोटे असतात. तुम्हीही तुमच्या जीवनात स्वत:च्या
चुका सुधारण्यासाठी वेळ दया. जेणेकरून तुम्हाला दुसऱ्यांच्या चुका शोधण्यासाठी वेळ
नसेल.
होय आजच्या शुभवर्तमानात आपण अशाप्रकारची गोष्ट ऐकलेली आहे
आणि यामुळे आपल्याला आपल्या जीवनातील केलेल्या चुकांकडे लक्ष देण्यास पाचारण केले
जात आहे, जेणेकरून आपण दुसऱ्यांच्या चुकांकडे लक्ष देणार नाही. हे शास्त्री व
परुशी चांगले लोक व वाईट लोक असा भेदभाव करत असत. त्यांना वाटत होत कि ते खूप
चांगले आहेत व दुसरे लोक वाईट. परंतु ख्रिस्ताला ठाऊक होत कि, हे लोक किती पापी
आहेत. म्हणून येशू ख्रिस्त त्यांना उत्तर न देता, उलट प्रश्न विचारतो. तुम्ही
कशावरून सांगता कि, ‘तुम्ही पापी नाही आहात व फक्त ती बाई पापी आहे? आणि आपल्याला
ठाऊक आहे कि जेव्हा येशूने प्रश्न विचारला कि तुमच्यातला जो पापी नाही त्यांनी
पहिला दगड मारावा, तेव्हा सर्व तेथून निघून गेले, फक्त व्याभिचारी स्त्री व
ख्रिस्त हजर होता. येशू ख्रिस्त दयेचा सागर त्या बाईला क्षमा करतो.
उपवास काळात आपल्याला काय संदेश
मिळतो? आपण आपल्या पापांचे जबाबदार आहोत. प्रत्येकाला आपला भूतकाळ माहित आहे. आपण
सर्वांनी पापे केली आहेत व त्याचे दु:ख आपल्याला वाटत आहे. परमेश्वराची दया व
प्रेम स्वीकारायला कमी पडलो आहोत. मग का आपण दुसऱ्यांच्या चुकाकडे किंवा पापांकडे लक्ष
देतो?
म्हणून आपण आपल्या स्वत:च्या चुका
सुधारायला हव्यात. कारण परमेश्वर दयाळू, क्षमेचा व करुणेचा सागर आहे. तो आपणा
सर्वांना पापांपासून स्वच्छ करून नवीन माणूस बनवणार आहे. तो आपल्याला नवीन जीवन
जगायला संधी देणार व देत आहे त्या शुभवर्तमानातल्या स्त्रीसारखे आपण देखील बदलायला
तयार आहोत का?
परमेश्वर आज आपल्याला सांगत आहे कि,
‘मी तुमच्या भूतकाळापेक्षा, भविष्यामध्ये काय करणार, ह्यावर लक्ष देणार आहे.
म्हणूनच आपण पहिल्या वाचनात ऐकले, जुन्या गोष्टीची आठवण करु नका व जुन्या गोष्टी मनात
आणू नका. परमेश्वराने आपल्या चुका माफ
केल्या आहेत. “जा आणि पुन्हा पाप करु नको” हे काही देवाचा त्या बाईला निर्णय नाही
तर प्रोत्साहीत करणारे शब्द आहेत. जेणेकरून ती बाई चांगले जीवन जगेल.
परमेश्वर आपल्या चुकाकडे लक्ष न
देता, आपण कशाप्रकारे या पापांपासून मुक्त होऊन चांगले जीवन जगू याकडे लक्ष देत
असतो. जर आपल्याला जीवनात चांगले जीवन जगायचे असेल किंवा यशस्वी व्हायचं असेल तर
आपण आपल्या धैर्याकडेच पहायला पाहिजे. जर आपण धावत असताना सतत मागे बघत राहिलो तर
आपण रस्त्यावर न धावता झाडाला टक्कर देऊन जखमी होऊ. म्हणूनच संत पौल दुसऱ्या
वाचनात सांगतात कि, मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करा व पुढील गोष्टीकडे लक्ष दया.
आपणही आपल्या रोजच्या जीवनात,
घरात, शेजोळात, दुसऱ्यांच्या चुकाकडे लक्ष देत असतो मग आपण विसरतो कि आपणही पापी
आहोत, आपणही चुका करतो. जेव्हा आपण एक बोट दुसऱ्याकडे दाखवितो तेव्हा तीन बोटे
आपल्याकडे असतात. तसेच हे वर्ष पोप साहेबांनी ‘दयेचे’ किंवा ‘करुणेचे वर्ष’ प्रगट
केल आहे. आपल्याला संधी दिलेली आहे कि आपण दुसऱ्यावर दया व क्षमा करावी. ज्या
प्रमाणे परमेश्वर आपल्याला क्षमा करतो त्याचप्रमाणे दुसऱ्यावर क्षमा करण्यास
लागणारी कृपा, शक्ती या मिस्साबलीदानात मागुया व आपल्या जीवनाद्वारे दुसऱ्यांना दयेचा
व क्षमेचा संदेश देऊया.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो, आम्हांला तुझ्या दयेचे प्रतिक बनव.
१. आपले परमचार्य, पोप फ्रान्सिस, कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरू,
धर्मबंधू-भगिनी व सर्व प्रापंचिक यांच्या कार्याद्वारे, येशू ख्रिस्ताच्या दयेची
ओळख संपूर्ण जगाला मिळावी म्हणून प्रभूकडे आपण प्रार्थना करूया.
२. ज्या विश्वासू लोकांनी कॅथोलिक संस्कार स्वीकारून देवाच्या कराराशी अतूट नाते
जोडले आहे, अशांना आप-आपल्या कुटुंबात प्रेमाने व दयेने राहण्यास कृपा मिळावी
म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. नवीन विवाहबद्ध झालेल्या जोडप्यांनी एकमेकांना दिलेल्या वचनांचे पालन करून,
एक दुसऱ्यांना समजून घेऊन एक चांगले ख्रिस्ती जीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना
करूया.
४. आपल्या गावात, धर्मग्रामामध्ये व कुटुंबात जे लोक क्षमा करण्यास अशक्त आहेत,
अशांना व इतरांना क्षमा करण्यास प्रभूकडून प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना
करूया.
No comments:
Post a Comment