Sunday, 20 March 2016

Reflection for the Homily of Good Friday (25/03/2016) By: Br. Lavet Fernandes. 





        

  


                            उत्तम शुक्रवार






दिनांक: २५/०३/२०१६.
पहिले वाचन: यशया ५२:१३-५३;१२
दुसरे वाचन: इब्री ४:१४-१६, ५:७-९
शुभवर्तमान: योहान १८:१-१९:२


                        'बापा त्यांना क्षमा कर.'






प्रस्तावना:

आज उत्तम शुक्रवार! येशूच्या दुःखसहनाचा दिवस! आजच्या दिवशी येशू ख्रिस्ताने मानवाला पापमुक्त करण्यासाठी दुःखयातना व वेदना सोसून क्रुसावर आपले प्राणार्पण केले म्हणूनच आज शुभ शुक्रवार किंवा ‘गुड फ्रायडे’ हा महान आणि अतिपवित्र दिवस गणला जातो.
आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा येशु ख्रिस्ताच्या दुःखप्राय यातना व मरणाविषयी भाकीत करतो. आपल्या सर्वांची पापे त्याने अंगीकारुन, ख्रिस्त आपल्या अपराधामुळे रक्तपात व घायाळ झाला. आजच्या दुसऱ्या वाचनात लेखक आपल्याला सांगत आहे की, देवाचा पुत्र येशु ख्रिस्त हा थोर प्रमुख याजक आहे, कारण त्याने त्याच्या वेदनादायक व दुःखमय क्रूसावरील मृत्यूद्वारे पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीला अनंतकाळचे तारण व जीवन बहाल केले. शुभवर्तमानामध्ये संत योहानाने येशूचे दुःखसहन आणि वेदनादायक मरण याविषयी विशेष उल्लेख केला आहे.
येशू ख्रिस्ताचे मरण हे प्रेरणादायी होते. देवाचा पुत्र आपल्या पापासाठी मरण पावला. त्याने आम्हा सर्वांना त्याची बिनशर्त क्षमा बहाल केली, जेणेकरून आपण ही एकमेकांना क्षमा करावी. ह्या उपासनेमध्ये भाग घेत असताना येशू ख्रिस्ताच्या दुःखसहनावर व मरणावर विशेषरित्या मनन-चिंतन करुया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: यशया ५२:१३-५३;१२

यशया संदेष्टा हा येशूच्या शंभर वर्षाच्या अगोदर येऊन गेला होता. तरीसुद्धा तो येशूच्या दुःखाविषयी व मरणाविषयी आपल्याला भाकीत करीत आहे. हे ऐकताना असे वाटते जणू यशया संदेष्टा येशूच्या दुःखाच्या व मरणाच्यावेळी तेथे हजर होता. परंतू पवित्र आत्म्याद्वारे यशया संदेष्टा हे सर्व काही समजू शकला. संदेष्टा आपल्याला असे सांगत आहे की, ‘आपल्या पापावृत्तीमुळे येशू ख्रिस्ताला ह्या सर्व वेदना व दुःख भोगावे लागले’. तो पुढे म्हणतो कि, त्याच्या माणूसकीमुळे व आपल्यावरील प्रेमाखातर ख्रिस्ताने हे मरण पत्करले. “जसं कोकरू कत्तलखान्यामध्ये पाठवतात, अगदी तशाच प्रकारे येशु ख्रिस्ताला पाठवण्यात आले.” परंतू येशू  ख्रिस्ताचे दुःख आणि वेदना हे निव्वळ किंवा फुकट गेले नाहीत तर त्याच्या दुःखामुळे आपले  जीवनाचे समर्थन करण्यात आले. आपण देवाचे आभार मानले पाहिजेत कारण देव आपल्यावर प्रेम करतो. आपणही पापी लोकांसाठी प्रार्थना केली पाहिजे असे तो ह्या उताऱ्याद्वारे सूचीत करू इच्छितो.

दुसरे वाचन: इब्री ४:१४-१६, ५:७-९

प्रस्तुत उताऱ्यात लेखक आपल्याला असे सांगत आहे की, येशू ख्रिस्ताचे दुःख अगम्य होते. त्याचप्रमाणे येशु ख्रिस्ताइतक्या वेदना आजपर्यंत कोणाला झाल्या नसतील, कदाचित होणारही नाही. त्याच्या दुःखांची किंमत आजपर्यंत कोणी मोजू शकला नाही आणि मोजूही शकणार नाही.
आपल्याला जसा मोह होतो, तसा मोह येशु ख्रिस्तालाही झाला परंतू फरक एवढाच आहे की, आपण त्या मोहाला बळी पडतो व सैतान आपल्यावर वर्चस्व गाजवतो, परंतू येशू ख्रिस्त त्या मोहातून बाहेर आला व त्याने सैतानावर विजय मिळविला. जर ख्रिस्ताने आपल्यासाठी एवढे दुःख भोगले, तर कोणीही येशूकडे दया मागण्यासाठी लाजू नये, कारण येशू ख्रिस्त दयेचा, करुणेचा, क्षमेचा उगम आहे. येशू ख्रिस्त क्रुसावरून आम्हा प्रत्येकाला पापांची क्षमा मागण्यासाठी व करण्यासाठी आमंत्रण देत आहे.

शुभवर्तमान: योहान १८:१-१९:२

येशूचे दुखःसहन, मरण व यातना या घटनेचे चित्रण योहान शुभवर्तमानकाराने विशेषरीत्या केले आहे. योहानाचा वृत्तांत, समदर्शी (Synoptics) शुभवर्तमानकारांच्या वृत्तांतापेक्षा वेगळा आहे. येशूला क्रुसावर खिळलेले असताना त्याच्या हातापायातून आणि कुशीतून रक्त भळभळ वाहत होते. शेवटचे काही क्षण मोजत असताना सर्व शक्ती कवटाळून थकलेल्या आवाजात तो अंतिम शब्द उच्चारतो, त्याचे अंतिम शब्द प्रेमाने, दया-क्षमेने व तारणदायी भावनेने भरलेले होते. ख्रिस्ताने अंतिम शब्द उच्चारले, परंतू संपूर्ण सात शब्दाचा उल्लेख योहानाच्या वृत्तांतात आढळत नाही. ते समदर्शी शुभवर्तमानात वाचावयास मिळतो.
येशू ख्रिस्ताचे दुःख, यातना आणि मरण हे ख्रिस्ताच्या जीवनाचे एक महत्त्वपूर्ण घटक आहेत. त्याचे दुःख सर्व मानवी दुःखाच्या परिसीमा ओलांडणारे होते. सज्जन आणि तारणारा येशु, लोकांचे भले करीत असतानाही, त्याला अपमान सहन करावा लागला. परंतू येशू ख्रिस्ताने त्यांना शिव्याशाप देण्याऐवजी प्रेम दाखवले. दोषारोप व वाईट चिंतण्याऐवजी क्षमा करीत येशु म्हणाला: “हे पित्या त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात ते त्यांना समजत नाही.” येशूच्या मनात कोणाच्याही विषयी राग, मत्सर किंवा हेवा नव्हता. येशूने सर्वांना क्षमा केली. शुभवर्तमानामध्ये येशु ख्रिस्त सांगत आहे कि, ‘जशी मी इतरांना क्षमा दाखविली तशी तुम्ही इतरांना क्षमा दाखवा’.

बोधकथा:

एकदा संत एकनाथ महाराजांना एका भक्ताने प्रश्न केला, ‘नाथ, तुमचे जीवन किती सुंदर, किती प्रशांत आहे! परंतू आमच्या जीवनात सदैव ओढाताण, गोंधळ, गडबड, द्वेष, मत्सर आणि गदारोळ. आम्ही तुमच्यासारखे शांत, स्थिर, जीवन जगण्यासाठी कोणता उपाय करावा?’ संत म्हणाले, ‘ते सारे राहू दे; परंतू तुला मी एक गोष्ट सांगतो की, तुझे मरण जवळ आले आहे. आठ दिवसांत मरणार असे वाटते’. भक्त घाबरला, तसाच घरी आला. त्याला सारखे आपले मरण डोल्यासामोर दिसत होते. आपण पृथ्वीवर फक्त काही दिवसांचा सोबती आहे हे त्याला भासू लागले. तो आपल्या शेजाऱ्यांकडे गेला व त्याला म्हणाला, ‘बंधू मी तुम्हाला उगीच छळले, वाईट, अभद्र ते बोललो, पुष्कळदा दु:खविले. मला क्षमा करा’, त्याने आपल्या मुलांना छातिशी धरले. त्यो त्यांना म्हणाला, ‘तुम्हाला मी उगीच ओरडलो, कधी मारलेलेदेखील मला क्षमा कर’. गावातल्या एका मित्राकडे गेला आणि म्हणाला, ‘मित्रा झाले गेले विसरून जा, मी तुझी माफी मागतो’. अशाप्रकारे तो सर्वांशी नम्रपणे वागू लागला.
आठ दिवस झाले. संत एकनाथ त्या भक्ताच्या घरी आले. तो मनुष्य नाथांच्या पाया पडून काकुळतेने म्हणाला, ‘आली का वेळ?’ नाथ म्हणाले, ‘ते देवाला माहित, परंतू तुझे आठ दिवस कसे गेले? कित्येक जणांशी भांडलास? किती जणांचा अपमान केलास?, तो उत्तरला, ‘नाथ कोठले भांडण नी काय! सारखे मरण डोळ्यासमोर दिसत होते. सर्वांची क्षमा मागत फिरलो. झाले गेले विसरून जा, असे सांगत होतो. भांडायला वेळच नव्हता’. त्यावर नाथ म्हणाले, ‘आठ दिवस जी स्थिती डोळ्यांसमोर ठेऊन तू वागलास, अगदी तीच स्थिती सदैव डोळ्यांसमोर ठेऊन आम्ही वागत असतो म्हणून आमच्या जीवनाला अर्थ आला आहे तसेच तू सुद्धा करावे म्हणजे जीवन प्रफुल्लीत होईल’.
येशू ख्रिस्ताने आपल्याला क्षमेचा महामंत्र दिला आहे. ह्याच महामंत्राद्वारे आपण चांगले ख्रिस्ती जीवन जगू शकतो. देवाने आपल्याला क्षमा केल्यामुळे आपण सार्वकालिक जीवनाचे सभासद होण्यास लायक ठरलो आहोत. त्यामुळे आपणही इतरांना क्षमा केली पाहिजे. जसा येशू  पेत्राला सांगतो की, ‘क्षमेचे दान मोजायचे नसते; सात वेळा नव्हे, तर साताच्या सत्तर वेळा क्षमा केली पाहिजे’ (मत्तय १८:२१-२२).
स्वामी विवेकानंद म्हणतात की, “स्वार्थासाठी गंजून जाण्यापेक्षा, परमार्थासाठी झिंजून जा.”

मनन चिंतन:

परमेश्वराने जग निर्माण केले. आकाश व आकाशातील सर्व तारे, सूर्य, चंद्र निर्माण केले. पृथ्वीवर संचार करणारे प्राणी, जनावरे, पक्षी, समुद्रातील मासे, झाडे, फळे व फुले व शेवटी माणूस निर्माण केला. ‘मानवाला’ ‘सृष्टीचा केंद्रबिंदू’ बनवले. परंतु मानवाने देवाची आज्ञा मोडली व देवापासून तो दूर गेला. मनूष्य सैतानाच्या मोहाला बळी पडला; ‘जर तू ह्या झाडाचे फळ खाल्ले तर तू देवासारखा होशील’. त्या मोहामुळे पाप घडले व जगात पाप आले. सर्व मानवजात पापी बनली आणि देवापासून दूर गेली.
देव इतका प्रेमळ, कनवाळू व ममताळू आहे की, प्रत्येक क्षणाला त्याने मानवाला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतू ‘कडू कारले तूपात तळले, साखरेत घोळले तरी ते कडूच राहते’. लोकांनी खूप कुरकुर केली आणि आज्ञा मोडल्या. मनुष्यजात देवापासून खूप दूर गेली हा विरह देवाने नव्हे तर त्यांनीच घडवून आणला. आपल्याला आपल्या पापांपासून वाचविण्यासाठी देवाने त्याचा ‘एकुलता एक पुत्र’ ह्या पृथ्वीवर पाठवला, जेणेकरून तो आपल्याला पापांपासून वाचवू शकेल. येशू ख्रिस्ताने लोकांच्या जीवनात चमत्कारही केले.
योहानाच्या शुभवर्तमनामध्ये अध्याय १०:१० – “चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करावयास येतो. मी तर त्यांना जीवनप्राप्ती व्हावी व ती विपूलपणे व्हावी म्हणून आलो आहे”. परंतू लोकांनी हे देखील जाणले नाही आणि त्याचा परिणाम येशूला क्रूसावरील मरण स्वीकारावे लागले. संत पौल म्हणतो की, ‘येशू ख्रिस्ताने पापांची खंडणी भरली’. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले’(फिलीप्पैकरांस पत्र २:६), मनुष्याच्या प्रतीरुपाचा होऊन त्याने मरण स्वीकारले आणि तेही वधस्तंभावरचे मरण पत्करून त्याने स्वतःला लीन केले.
आता आपण येशूच्या दु:खसहनावर मनन चिंतन करूया.
1   .     गेथसेमनी बाग
2   .     येशूला रक्ताचा घाम
3   .     यहूदा इस्कार्यात, येशूचे चुंबन घेऊन येशूला पकडून देतो.
4   .     सर्वांची पळापळ
5   .     येशूला पिलाताचे न्यायालय चढावे लागते.
ह्या सर्व गोष्टीतून आपल्याला असे समजून येते कि, देवाचा लिलाव झाला होता. ज्या येशू  ख्रिस्ताने आपले जीवन लोकांसाठी वाहिले होते, त्याच लोकांनी येशूला पकडून दिले. निर्दोष, सौम्य, लीन, प्रेमळ, प्रितीशील, दयाळू, कनवाळू व ममताळू हि सात्विक वैशिष्टे धारण करून अहिंसेच्या मार्गावर चालणारा तो एक महान व्यक्ती झाला. ही वैशिष्टे अहिंसेच्या मार्गाने चालणाऱ्या माणसांची आहेत. अहिंसा म्हटलं की, गांधीजी व मार्टीन ल्युथर किंग हया प्रमुख व्यक्ती आपल्याला आठवतात. अहिंसेच्या वाटेवर आचार व प्रचार करत असता, लोकांना पुष्कळ अशा कठीण परिस्थितींना, समाजाला तोंड द्यावे लागते.
अहिंसा म्हणजे सौम्यता, नम्रता, संयम, सहनशीलता, क्षमाशीलता, बंधूत्व, प्रेमाचरण व आपले आचार-विचार दैनंदिन जीवनातून कृतीत उतरविणे. ह्या तत्वाचा प्रचार ख्रिस्ताने केला. १) अहिंसा म्हणजे सोशिकपणा (मत्तय ५:३८-४१). २) अहिंसा म्हणजे संयम-मनावर ताबा व रागावर नियंत्रण (मत्तय ५:२१-२२). अहिंसा म्हणजे शत्रूप्रेम (मत्तय ५:४३-४४). अहिंसा म्हणजे सौम्यता व लीनता (मत्तय ५:५). अहिंसा म्हणजे क्षमाशीलता (मत्तय ६:१४-१५). येशूने ह्या तत्वज्ञानाचा फक्त उपदेश केला नाही तर त्या पद्धतीने आचरण केले.
सैतानाने येशूला डोंगरावरून ढकलण्याचा प्रयत्न केला आणि ख्रिस्ताने पापी, ढोंगी, भूत व निर्भत्सना ह्यांना बाहेर फेकले. लोक ख्रिस्तावर थुंकले. कातडी फाटून रक्ताच्या चिळकांड्या उडेपर्यंत येशूला फटक्यांनी मारण्यात आले. येशु ख्रिस्त क्रुसाखाली पडला. तो अर्धमेला झालेला होता, तरीसुद्धा त्याला क्रूस वाहण्यास लावले. येशु खिस्ताचे हाल असह्य होते. तरीसुद्धा त्याने प्रतिकार केला नाही. येशु ख्रिस्ताला समोरचे काहीसे दिसेनाशे झाले होते. त्याचे ते हाल पाहून त्याचे साथीदार व त्यांची आई जोर-जोराने रडत होती. परंतु तिच्यावर कोणीही लक्ष दिले नाही. परंतू येशु ख्रिस्त पुढे चालतच राहिला. त्याच्या त्या दुःख व वेदनांमध्ये तो कालवरी डोंगर चढला; असे हे प्रेमाचे, अहिंसेचे, बंधू-प्रेमाचे व प्रीतीचे उदाहरण जगाला ‘उत्तम शुक्रवारी’ (गुडफ्रायडे) येशू  ख्रिस्ताने दिले.

येशू ख्रिस्ताने त्यांच्या मारेकऱ्यांस क्षमा केली. आपणही इतरांना क्षमा करावी व इतरांकडून क्षमा मागावी म्हणजे आपण येशूचे खरे अनुयायी बनू. क्षमा हा एकच मार्ग आहे जो आपणास शांती, प्रेम, आनंद आणि सुख देऊ शकतो. जोपर्यंत आपण इतरांना क्षमा करीत नाही तोपर्यंत आपण आपल्या वेदनेतून व जखमेतून कधीही बरे होऊ शकत नाही. क्षमादान आपल्यात नसेल तर आपल्या शरीरात आणि मनात विष आहे. ‘क्षमादान नसणे’ म्हणजे, एका ‘विषारी सापाने चावणे’ आणि ‘त्याला मारण्यास त्याचा पाठलाग करणे’ होय आणि त्या सापाला काही करण्याआधी ते विष शरीरात पसरून त्या व्यक्तीला संपवते. ख्रिस्ताचे करुणेचे, दयेचे प्रतिक ह्या जगात बनण्यास आजची उपासना तसेच ह्या ‘करुणा वर्षात’ पोप फ्रान्सिस ख्रिस्तसभेद्वारे पाचारीत आहे.

No comments:

Post a Comment