Reflection for the Feast of Holy Family (30/12/2016) By Camrello Dimekar.
पवित्र कुटुंबाचा सण
दिनांक: ३०-१२-२०१६
पहिले वाचन: बेनसिरा ३:२-६,१२-१४
दुसरे वाचन: कलस्सेकरांस पत्र ३:१२-२१
शुभवर्तमान: मत्तय २:१३-१५,१९-२३
“उठ, बालक व त्याची
आई ह्यांना घेऊन मिसर देशात जा”
प्रस्तावना:
ख्रिस्तसभा
आज मरिया, योसेफ व बाळ येशू ह्या पवित्र कुटुंबाचा सण साजरा करीत आहे. मरीयेच्या
जीवन वेलीवर ख्रिस्तबाळ हे देवाचे फुल आहे. योसेफ व मरिया यांनी त्याला चांगल्या
संस्कारात घडविले. सत्याचा व शांतीचा मार्ग दाखविणारा येशू ख्रिस्त गरीब कुटुंबाचा
केंद्रबिंदू बनला.
कुटुंब
ही संस्काराची आद्य शाळा आहे. ख्रिस्ती श्रद्धेची जोपासना कुटुंबातच होते. आपण
कौटुंबिक जीवन जगत असताना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. अशा वेळी पवित्र
कुटुंबात धार्मिक वातावरण निर्माण होण्यास, आदर्श कुटुंबाचे गुण आपण आचरणात आणावेत
व मरीयेच्या छत्राखाली आनंदाने जगण्यास कृपा मिळावी म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना
करूया.
सम्यक विवरण
पहिले वाचन: बेनसिरा
३:२-६,१२-१४
बेनसिराची
बोधवचने हा ग्रंथ ‘एक्लेझीयास्तस’ ह्या नावानेही ओळखला जातो. ह्या पुस्तकाचा लेखक
धार्मिक वृत्तीचा यहुदी व्यक्ती होता. त्याने यहुदी धर्मातील नियमावलींचा अभ्यास
केला होता. त्याने यहुदी धर्मातील तत्ववेत्त्यांना सांगण्यासाठी आणि त्याचे असलेले
देवावरील प्रेम दर्शविण्यासाठी हा ग्रंथ लिहिला होता. त्यामुळे इतर लोक सुद्धा
जीवनात आनंदी राहतील आणि त्यांच्यामध्ये देवाप्रित्यर्थ आदराची भावना निर्माण
होईल. ह्या उताऱ्यात परमेश्वर, आपला प्रेमळ पिता ह्या नात्याने त्याच्या मुलांना
नम्रपणे वागण्यास सल्ला देत आहे.
दुसरे वाचन: कलस्सेकरांस पत्र
३:१२-२१.
हे पत्र
लिहिण्यामागील संत पौलाचा हेतू असा आहे कि, जे लोक ख्रिस्ती धर्मामध्ये आले आहेत
त्यांना येशू ख्रिस्ताच्या विश्वासात वाढ व्हावी. त्यांना संत पौल दर्शवितो कि
येशुख्रिस्त हा ‘तारणारा’ आणि ‘ख्रिस्तसभेचा मुख्य’ आहे. पुन्हा संत पौल लोकांना
सांगतो कि, आपण आपले जीवन येशू ख्रिस्ताने दिलेल्या शिकवणुकीवर आधारले पाहिजे.
प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने नैतिक मुल्ये जोपासावीत त्यामुळे आपण समाजात
इतरांबरोबर सलोख्याने राहू शकू.
शुभवर्तमान: मत्तय
२:१३-१५,१९-२३.
दुसऱ्या
अध्यायाच्या उरलेल्या भागात बाळ ख्रिस्ताच्या स्थलांतराचे उल्लेख आहेत. प्रथम
त्याला बेथलेहेम येथील जन्म ठिकाणाहून इजिप्तला नेले, मग परत यहुदीयात परत आणले.
तेथून त्याला गालीलात नेले. मग ते नाझरेथ गावात जाऊन राहिले. यावरून त्याला
‘नाझरेथकर येशू’ म्हणून लागले. ख्रिस्त गालीलातून येणार किंवा नाझरेथहून येणार या
म्हणण्याला यहुदी लोकांनी जो उपदेश दिला त्यात याचे कारण दडले आहे.
शास्त्रलेखाच्या आधाराने स्थलांतर करून अखेर गालीलात स्थिरावला म्हणून त्याला नाझरेथकर
म्हणतील हे भाकीत पूर्ण झाले.
मनन चिंतन:
‘कुटुंब’
ही ईश-नियोजित अशी नैसर्गिक संघटना आहे कि, ज्याच्यादवारे राष्ट्राची आणि
ख्रिस्तसभेची पायाभरणी होत असते. याच पायावर राष्ट्र व ख्रिस्तसभा उभी आहे. तिथेच
प्रेमाचा आणि आशेचा कोंब विकसित होतो. याच पायावर जीवन खुलते. कुटुंब ही
समाजजातीची पाठशाळा आहे. याच शाळेत मानवी मनाची जडण घडण होते. आपल्या आयुष्यात आपल
कोणते पाचारण स्विकारावे या विचारावर पालवी फुटते. मानवी जीवनाची जडण-घडण करणारी
कुटुंब-व्यवस्था ही पहिली शाळा होय. याच विद्यालयात बाल्यावस्थेपासून
वृद्धावस्थेपर्यंत शिकत माणूस वरवर जातो. व विद्याविभूषित होत असतो. याच शाळेत
त्याला माहिती मिळते. त्याची जडणघडण होते व त्याचे मन-परिवर्तनही होते. वेगवेगळी
जीवनमुल्ये तो आपल्या कुटुंबातच आत्मसात करतो. बंधुत्व, निष्ठा आणि प्रिती ही
जीवनसत्ये याच वातावरणात प्राशन करतो. कुटुंब म्हणजे ‘संस्काराचे केंद्र’.
माणूस
एकटा राहू शकत नाही व त्याचा विकास होऊ शकत नाही. त्यामुळे कौटुंबिक गोतावळ्यातच
तो स्वता:चा विकास घडवून आणतो. ह्याच वातावरणात तो एकमेकांशी संवाद साधायला शिकतो
व यातून मिळणाऱ्या आनंदात व सुखात स्वतःचा आत्मविकास घडवून आणतो.
हे विश्वची
माझे घर. माझे कुटुंब आहे. हे जग पवित्र आहे. सर्व वस्तुमात्रामध्ये जीवजंतूमध्ये
आणि प्राणिमात्रामध्ये परमेश्वर वास करतो, ह्याची जाणीव होते. “प्रारंभी शब्द
होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता.... सर्व काही त्याच्या द्वारे झाले.
शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली अन् आम्ही त्याचे गौरव पाहिले.”
(योहान १:१-५,१४) योहानाच्या शुभवर्तमानातील ह्या शब्दाद्वारे आपल्याला जाणीव होते
कि, देवाने अगदी सखोल प्रेमाने ह्या जगाची व मानवाची निर्मिती केली, देवाचे
परिपूर्ण जीवन विपुल प्रमाणात ह्या जगात भरभरून ओतले. हे जग प्रकाशाने प्रकाशमान
झाले होते. जरी पापाच्या अंधकाराने ह्या प्रकाशाला ग्रासण्याचा प्रयत्न केला, तरी तो अयशस्वी ठरला. कारण प्रकाश
परिपूर्ण व सार्वकालिक होता. हा प्रकाश जगामध्ये देही झाला व आम्हामध्ये त्याने
वस्ती केली.
अशाप्रकारे
हे जग पवित्र आहे. देव “इम्मॅन्युएल” म्हणजेच ‘देव आपल्यासह आहे’, अशी जागृती करून
दिली. हे पावित्र्य जरी काही काळ अंधारात दडलेले होते; येशूच्या आगमनाने तसेच
त्याच्या दुःखसहन, मरण आणि पुनरुत्थानाद्वारे ह्या पावित्र्याला नाविण्य व पूर्णता
प्राप्त झाली आणि जगाचे तारण झाले. जग हे पवित्र आहे व त्यातील सर्व वस्तूमध्ये
प्रकाश आहे. कारण परमेश्वराने हे जग निर्मिले व येशुख्रिस्ताद्वारे त्याचे तारण
घडवून आणले. अशादवारे ह्या संपूर्ण सृष्टीला अर्थ प्राप्त झाला आहे.
आपली समाजव्यवस्था ही डोंगरासारखी आहे.
कुटुंब-व्यवस्था हा त्याचा पाया आहे. समाज सबळ असतात. डोंगर सबळ असतात. मग डोंगर
का कोसळतात? दरडी का कोसळतात? याची महत्वाची कारणे आहेत. माणसेच डोंगर पोखरतात.
त्यांचे पाये तेच उधवस्त करतात. भरणीसाठी डोंगर उताराचे लचके तोडले जातात.
नद्यांच्या पात्रातील वाळू उपसली जाते. धूप थांबवणाऱ्या कल्पवृक्षाची व आधारवडाची बेसुमार
वृक्षतोड केली जाते. हिरवळीचा बळी घेतला जातो. डोंगर-टेकड्यांचा मुळाधारच नष्ट
केला जातो. डोंगराच्या मुळावरच आज जशी कुऱ्हाड उगारली जाते. धीरोदात्त डोंगराच्या
मुळावरच आज जशी कुऱ्हाड उगारली जाते, तशीच ती परंपरागत धडधाकट कुटुंब-व्यवस्थेच्या
भरभक्कम डोंगरावरही उगारली जाते. म्हणूनच कुटुंबव्यवस्थेत ‘दरडी’ कोसळतात. डोंगर
ढासळतात. समाजात असे प्रताप जर होऊ द्यायचे नसतील तर डोंगराचा पाया जपला गेला
पाहिजे. राष्ट्राचा व चर्चचा पाया जपला गेला पाहिजे. कुटुंब जपले गेले पाहिजे.
कौटुंबिक वारसा जपला गेला पाहिजे.
पोप फ्रान्सीस ह्यांनी लिहिलेल्या
कुटुंबविषयक पत्रात ते प्रत्येक कुटुंबाला सांगू इच्छितात कि, ख्रिस्ताच्या
शिकवणुकीचा प्रसार करण्यासाठी कुटुंबाकडे अनेक आव्हाने आहेत. अर्थात आज चर्चपुढे
काही आव्हाने आहेत. ही आव्हाने कुटुंबाच्या माध्यमातून कशी पुरी करता येतील, हेच
एक मोठे आव्हान आहे. कुटुंबाची सहमती आणि सहकार्य अत्यंत मोलाचे दान
ख्रिस्तसभेसाठी असणार आहे.
पोप फ्रान्सीस पुन्हा एकदा कुटुंब सुरळीत
चालण्यासाठी तीन शब्द देतात. त्या शब्दामध्ये जणूकाही जादूच आहे. कुटुंब चालवणे
तसे सोपे नाही. कुटुंबातील प्रत्येक माणसाची मर्जी सांभाळणे, अत्यंत अवघड.
कुटुंबातील कोणती व्यक्ती कधी दुखावली जाईल, हे सांगता येत नाही. त्याकरीता कुटुंबातील
प्रत्येक माणसाला सावधगिरी बाळगायला हवी, काही पथ्ये पाळायला हवीत. या पथ्यात तीन
शब्दप्रयोग अत्यंत महत्वाचे आहेत. १. मी हे केलं तर चालेल का? २. धन्यवाद ३. मला माफ कर
हे शब्द
दिसायला तसे साधे, परंतु ते कृतीत उतरावयास कठीण आहेत. मात्र ते जर कृतीत उतरविले
गेले तर त्याचा परिणाम दीर्घकाळ पर्यंत होऊ शकतो. कुटुंब सुखी होऊ शकते. वरील तीन
शब्दप्रयोग आहेत लहान; पण त्यांचे कार्य आहे महान. ह्यांनी कुटुंब प्रसन्न व सुखी
असते.
मुले
जेव्हा लहानातून मोठी होतात तेव्हा त्यांना त्यांच्या आई वडिलांच्या
म्हातारपणासाठी आधाराची काठी संबोधले जाते. पण ही काठी आधारेवजी प्रहार ठरली तर
उतारवयात त्यासारखं दु:ख नाही. ज्या कुटुंबात वृद्धांचा सांभाळ केला जातो तेथे
देवाचा सहवास असतो. म्हातारपण हे दुसरे बालपण असते असे म्हणतात. मुलांना लहानाचे
मोठे केले तेव्हा आनंद झाला. मुलांसाठी कष्ट, त्याग, केला जेणेकरून मुले मोठी
व्हावीत, त्यांना चांगल शिक्षण द्यावं, नोकरीला लावावं, म्हातारपणी लाकडाच्या
काठीचा नसून लहान मुलांच्या नाजूक हाताचा आधार हे स्वप्न खरं व्हावे.
सुप्रसिद्ध
यहुदी अस्तित्ववादी विचारवंत मार्टिन बुबर म्हणतात, “मनुष्य प्रेमासाठीच जन्मलेला
आहे आणि प्रेम हे दोन व्यक्तीतील एक नाजूक नाते आहे.” जर व्यक्तीचे प्रेम मिळाले
नाही तर मनुष्य वस्तू अथवा विचारसरणी यांच्याशी संगनमत करण्याचा प्रयत्न करतो. “मी
आणि व्यक्ती यापेक्षा मी आणि वस्तू अशी तडजोड करतो. ह्या वस्तूमध्ये दारू, ड्रग्स,
लैगिंक स्वैराचार, जुगार, अधाशीपणा, अश्लीलता ह्यांचा समावेश होतो. क्वचित प्रसंगी
त्यात परमेश्वराचाही अंतर्भाव होतो. परमेश्वरविषयक आपली त्यात विचारसरणी इतरांच्या
माथी मारण्यासाठी किंवा त्यांच्या गळी उतरविण्यासाठी तो दुसऱ्याचा गळा घोटायलाही
मागेपुढे पाहत नाहीत. गरिबी म्हणजे खायला अन्न न मिळणे किंवा उपाशी मरण नव्हे तर
कुटुंबात प्रेमाचा अभाव असणे ही सर्वात मोठी गरिबी आहे.
विश्वासू
लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो, आमच्या कुटुंबाला आशीर्वादित कर.
1. आपले पोप, कार्डीनल्स, बिशप्स, फादर्स, सिस्टर्स
ह्यांच्यावर प्रभूचा आशीर्वाद असावा व त्यांच्या कार्यावर प्रभूचा सदैव वरदहस्त
असावा म्हणून आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया.
2. आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबात शांती, प्रेम,
ऐक्य सतत नांदावे, व सदासर्वदा सुखी कुटुंब असावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
3. जी कुटुंब उध्वस्त होत आहेत, जेथे भांडण-तंटे होत
आहेत, अशा कुटुंबांना पवित्र कुटुंबाचे मार्गदर्शन लाभून समजूतदारपणाचे, शांतीचे व
प्रेमाचे वरदान मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
4. आपल्या वृद्ध आई वडिलांसाठी, आपण प्रेमाचे,
मायेचे व करुणेचे छत्र होण्यास व त्यांना सदैव आनंदी ठेवण्यास परमेश्वराने आपणास
कृपा द्यावी म्हणून प्रार्थना करूया.
5. आता आपण थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक हेतूंसाठी
प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment