Monday, 26 December 2016

Reflections for the Homily on Mary the Mother of God  (01/01/2017) by  Lavet Fernandes.

देवमातेचा सोहळा

दिनांक – ०१/०१/२०१७
पहिले वाचन – गणना ६:२२-२७
दुसरे वाचन – गलतीकरांस पत्र ४:४-७
शुभवर्तमान – लूक २:१६-२१






“मरीयेने सर्व गोष्टीचे मनन करून त्या आपल्या अंतःकरणात ठेवल्या”






प्रस्तावना
आज आपण नवीन वर्षात पदार्पण करीत असताना वर्षाच्या पहिल्याच दिवशी ख्रिस्तसभा आपल्याला ‘मरिया देवाची माता’ हा सोहळा साजरा करण्यासाठी बोलावत आहे. मरिया जरी साधी व भोळी स्त्री असली तरी ख्रिस्तसभेत तिचे स्थान महत्वाचे आहे. मरीयेने सर्व गोष्टीचे मनन करून त्या आपल्या अंतःकरणात ठेवल्या, असे संत लुक आपल्याला सांगतो. तिचा आदर्श आपण आपल्या नजरेसमोर ठेवून नवीन वर्षात चांगले जीवन जगण्यासाठी ह्या पवित्र मिस्साबलीदानात देवमातेचे सहाय्य मागू या.

पहिले वाचन – गणना ६:२२-२७

आजच्या पहिल्या वाचनात परमेश्वराच्या सांगण्यावरून आशिर्वादाची प्रार्थना आहारोन व त्याचे पुत्र लोकांना देतात. कारण ते देवाने निवडलेले लोक होते; म्हणून देवाची पवित्र कृपा त्यांच्यावर होती.

दुसरे वाचन – गलतीकरांस पत्र ४:४-७

संत पौल स्पष्ट करतो कि, आपल्या सर्वांना नवजीवन मिळाले आहे. म्हणूनच आपण आतापासून गुलाम नाही, देवाचे नुसते पुत्र नाही तर देवाद्वारे वारस ही आहोत. कारण देवाला अब्बा, बापा अशी हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या आमच्या अंतःकरणात पाठविले आहे.

शुभवर्तमान – लूक २:१६-२१

आजच्या शुभवर्तमानात देवदुताने पवित्र मरीयेला कशाप्रकारे संदेश दिला व मेंढपाळांनी येशू ख्रिस्ताला कशी भेट दिली ह्याविषयी आपण ऐकतो. ह्या संपूर्ण अध्यायामध्ये आपण विश्वासाचे अनेक गुण पाहत आहोत, ज्यामध्ये पवित्र मरीयेच्या विश्वासाला उत्तम स्थान प्राप्त होते; म्हणूनच आज ख्रिस्तसभेमध्ये पवित्र मरीयेला उत्तम स्थान दिले आहे.
मरीयेने या सर्व गोष्टीचे मनन करून त्या आपल्या अंतःकरणात ठेवल्या (२:१९).
गब्रियल दूताने मरीयेला दिलेल्या संदेशानुसार आपल्या उदरी जन्मला येणारे बाळ येशू दाविदाच्या वंशात जन्मला येणारा मसीहा देवाचा पुत्र असेल हे तिला माहिती होते. त्यानंतर अलिशिबेने पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन ‘माझ्या प्रभूची माता’ म्हणून तिला संबोधले. आता मेंढपाळामार्फत देवदुताने सांगितल्याप्रमाणे हे बाळ ‘तारणारा ख्रिस्त व प्रभू आहे’ हे तिला कळले. या सर्व गोष्टी ऐकून मरीयेच्या मनात विचार आला असेल कि, आपल्या उदरी जन्मला आलेले हे बाळ सर्व जगाचा प्रभू असूनही त्याने इतक्या सामान्य व गरीब परिस्थितीत जन्मला यावे यामागे ईश्वरी योजना काय असावी? ह्या व इतर सर्व प्रश्नांचे उत्तर मरीयेच्या ‘तुझ्या शब्दाप्रमाणे होवो’ या श्रद्धापूर्ण होकारातच सामावलेले आहे.
मेंढपाळ गरीब, बुद्धीने मंद व समाजात त्यांना कमी दर्जा दिला जात असे. ते जरी गरीब व बुद्धीने मंद असले तरी विश्वासाने भक्कम होते. जेव्हा देवदुताने त्यांना संदेश दिला तेव्हा आपल्याला जो देवदूत दिसला तो भास असेल किंवा आपली कोणीतरी फसवणूक करीत असेल अशी ते चिकित्सा करीत बसले नाहीत. तर ते ताबडतोब येशू ख्रिस्ताच्या भेटीसाठी निघाले.
योहानाची सुंता झाली तेव्हा त्याच्या भविष्याविषयीचे भाकीत केले होते. येशूला मंदिरात नेले तेव्हा त्याच्या बाबतीतही अशे भाकीत करण्यात आले होते.

बोधकथा

बायको सतत आईवर आरोप करत होती आणि नवरा सतत तिला आपल्या मर्यादेत राहण्यास सांगत होता. पण बायको काही गप्प बसण्याचं नावच घेत नव्हती. ती जोरजोरात ओरडून सांगत होती, “मी अंगठी टेबलावरच ठेवली होती, आणि तुमच्या आईशिवाय खोलीत कुणीच आलेले नव्हतं. अंगठी ही आईनेच उचलली आहे. गोष्ट जेव्हा पतीच्या सहनशक्तीच्या बाहेर गेली तेव्हा त्याने बायकोच्या जोरदार कानाखाली ठेवून दिली.
तीन महिन्यापूर्वी लग्न झालेलं होतं. पत्नीला ती चपात सहन झाली नाही. ती तर घर सोडून चालली होती आणि जाता जाता पतीला एक प्रश्न विचारला कि, तुम्हाला तुमच्या आईवर इतका विश्वास का? तेव्हा पतीने जे उत्तर दिले, त्या उत्तरला ऐकून दरवाजामागे उभ्या असलेल्या आईचे मन भरून आले. पतीने पत्नीला सांगितले, “जेव्हा मी छोटा होतो, तेव्हा वडील वारले. आई आजूबाजूला परिसरात झाडू मारून थोडे पैसे आणायची ज्यात एक वेळचे पोट भरायचे.
आई एका ताटात भाकर वाढायची आणि रिकाम्या डब्याला झाकून ठेवायची आणि म्हणायची, माझ्या भाकरी या डब्यात आहेत. बाळा तू खा. मी पण नेहमी अर्धी भाकरी खाऊन म्हणायचो, आई माझे पोट भरले आहे. आईने माझी उष्टी अर्धी भाकर खाऊन माझं पालन पोषण केले आणि मोठे केले. आज मी तीच भाकर कमवायच्या लायकीचा झालो पण हे कसं विसरू कि आईने त्या वेळेस तिच्या भुकेला मारलं. ती आई या स्तिथीत अशा साठी भुकेलेली असेल हा मी विचार सुद्धा करू शकत नाही. तू तर तीन महिन्यापासून माझ्या सोबत आहे. मी तर आईच्या तपश्चर्येंला २५ वर्षापासून बघितलंय. हे ऐकून आईच्या डोळ्यात अश्रू आले. ती समझुच शकत नव्हती कि मुलगा तिच्या अर्ध्या भाकरीचे कर्ज फेडतोय कि, ती मुलाच्या अर्ध्या भाकरीचे कर्ज!!!

मनन चिंतन

प्रत्येकाच्या जीवनामध्ये आईला एक महत्वाचे स्थान असते. आईची माया व वात्सल्य वेगळ्या प्रकारची असते जी आपल्याला तिच्याकडे आकर्षित करते. दुसऱ्यांची आई कितीतरी प्रेमाळू व सुंदर असली तरी प्रत्येकाला आपलीच आई ही सर्व श्रेष्ठ वाटते. कारण प्रत्येकाने आपला आईचा अनुभव घेतलेला असतो. येशू ख्रिस्ताने सुद्धा आपल्या आईमध्ये तिची माया व वात्सल्य अनुभवले होते.
     देवपित्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राला ह्या विश्वात पाठविण्य्साठी एका कुमारिकेची नेमणूक विश्वाच्या सुरुवातीपासूनच करून ठेवली होती. तिच्या गर्भसंभावापासून देव पित्याने तिचा सांभाळ केला व तिला पवित्र ठेवले व जेव्हा तिची वेळ आली तेव्हा देवपित्याने तिच्या उदरी पुत्र वाढवला व तो तिच्याद्वारे ह्या भूतलावरती आला. म्हणूनच आज ख्रिस्त सभेमध्ये पवित्र मरीयेला देवाच्या आईच मान मिळाला आहे.  
          नम्रता व श्रद्धा या दोन गुणाची मनुष्याला सुखाच्या अनुभवासाठी अतिशय गरज आहे. मरीयेच्या जीवनात अपार दुखे होती. परंतु त्या दु:खात ती कधीच खचून गेली नाही. तर त्या दुखाचा तिने श्रद्धेने स्विकार केला. ‘ गर्विष्टांची भव्य आसने पाडी खालती तो पुरती’  असे मरीयेने आपल्या स्तोत्रात म्हटले आहे. मारिया नम्र होती. हे तिच्या स्तोत्रातून प्रगट होते (लुक १:४६-५५). देवदूताला उत्तर देताना ती म्हणाली,   ‘मी प्रभूची दासी आहे’ हीच खरी नम्रता. दुखाचा डोंगर कोसळला कि, मनुष्य खचून जातो. त्याचा विश्वास उडतो. मात्र मारीयेची देवावर अपार श्रद्धा होती.
     आपण पवित्र मरीयेच्या जीवनात आतापर्यंत ज्या गोष्टी घडल्या होत्या त्यांची तिला थोडी देखील कल्पना नव्हती. पवित्र आत्म्याच्या ओगाने तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल’ (लुक १:३१). हा देवदूताचा संदेश नावानिशी लिहून देण्यासाठी बेथेलेहमात जावे लागणे, तेथे त्यांना राहण्यास जागा न मिळणे, गोठ्यात बाळाचा जन्म होणे, मेंढपाळानी त्याला वंदन करण्यास येणे आणि ऐकलेल्या गोष्टी त्यांना सांगणे, ह्या सर्व गोष्टी तिच्या कल्पनेपलीकडच्या होत्या परंतु त्यामुळे ती भांबावून गेली नाही किंवा अवास्तव काळजी करीत बसली नाही. परंतु मरीयेने ह्या सर्व गोष्टीचे मनन करून त्या आपल्या अंतःकरणात साठविल्या.
     मरीयेने आईची एक चांगली भूमिका पार पडली. जरी तिच्या जीवनात दुख व संकटे आली तरी तिने त्यांना सामोरे जाणे पसंत केले. तिचा देवावरचा विश्वास फार दृढ व बळकट होता. ती कोणत्याच गोष्टीला घाबरली नाही. “श्रद्धा माझी अविचल प्रभूवर सकल सुखाचा तू दातार काय घडेल ते घडो दे शेवटी लाभ आणि त्रास देव जाणे.
     आनंदाने ती बहकून गेली, दुखाने ती खचून गेली नाही म्हणून तिला गौरवाचा, स्वर्गाचा व देवाच्या आईचा मान व सन्मान मिळाला. आज नववर्षदिन साजरा करत आहोत. ह्या शुभदिनी पवित्र मारिया आम्हांला आपल्या जीवनाद्वारे संदेश देत आहे. ह्या वर्षात तसेच सहस्त्रकात जे घडले ते शांतपणे कृतज्ञतापूर्वक स्वीकारण्याचा आणि परमेश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेवून त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे पवित्र देवामाते आम्हासाठी विनंती कर.

१. ख्रिस्त सभेचे पोप महाशय, सर्व बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करत आहेत त्यांची श्रद्धा बळकट व्हावी व इतरांची श्रद्धा त्यांनी बळकट करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. हे नवीन वर्ष २०१७ आपल्या सर्वांना सुखा-समाधानाचे, आनंदाचे, भरभराटीचे व चागल्या आरोग्याचे जावो म्हणून आपण मारिया मातेसह प्रभूकडे प्रार्थना करूया.
३. ह्या वर्षी आपल्या सर्वांना चांगले हवामान मिळावे व सर्व शेतीबागा पिकांनी व फळा-फुलांनी बहरून याव्यात म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. सर्व स्थानिक कार्यकर्त्यांनी शांतता व न्यायासाठी एकत्र यावे तसेच संपूर्ण जगात शांतता पसरविण्यासाठी प्रयत्न करावेत म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक गरजा प्रभूचरणी मांडूया.





No comments:

Post a Comment