Wednesday, 21 December 2016

Reflection for the Homily of Christmas Day (25/12/2016) By: Br. Brandon Noon.




ख्रिसमस (सकाळची मिस्सा)
दिनांक: २५-१२-१६.
पहिले वाचन: यशया : ५२:७-१०.
दुसरे वाचन: इब्री लोकांस पत्र : १:१-६.
शुभवर्तमान: योहान १:१-१८.





 शब्द मनुष्य झाला आणि आमच्यामध्ये राहिला



प्रस्तावना:

“गाईच्या गोठ्यात ख्रिस्त जन्मला,
पूर्वेच्या चांदण्यात तारा उगवला”
२५ डिसेंबर हा दिवस अजिंक्य सूर्याचा म्हणजेच ख्रिस्ताचा वाढदिवस. ख्रिस्त न्यायाचा सूर्य आणि जगाचा प्रकाश आहे. पापी जणांचे तारण करण्यासाठी गाईच्या गोठ्यात जन्म घेऊन पाप, अन्याय आणि अशांतीच्या अंधकाराचा नाश करून, दीन-दलितांचे जीवन तारणाच्या प्रकाशाने उजळून, जगाला प्रेम, दया आणि शांतीची सुवार्ता देणाऱ्या प्रभू ख्रिस्ताचा जन्म दिवस म्हणजेच ख्रिसमस.
माणसा-माणसामध्ये असलेली शत्रुत्वाची भावना व ताणतणाव कमी व्हावेत व त्याच्या मनामध्ये शांतीचे लक्ष-दीप उजळावेत म्हणून ख्रिस्त आपल्या हृदयरूपी गोठ्यात पून्हा पुन्हा जन्म घेतो. बाळ येशु आपल्या हृदय-मंदिरात जन्मास यावा व आपलं अंतःकरण त्याच्या सात्विक प्रेमाने व विपूल आशीर्वादाने सुगंधित करावे तसेच बाळ येशूची शांती, प्रीती व अखंड प्रेमाची ज्योत आपणा सर्वांच्या अंतःकरणात सतत पेटत रहावी म्हणून या मिस्साबलीदानात प्रार्थना करूया.


सम्यक विवरण
पहिले वाचन: यशया : ५२:७-१०

सियोनातील लोक राजांच्या गुलामगिरीमध्ये होते, तेथे त्यांचा खूप छळ चालला होता. तेव्हा यशया संदेष्टा त्यांच्यासाठी चांगली बातमी घेऊन येतो. तो त्यांना ह्या उताऱ्याद्वारे प्रोत्साहन देतो. जी व्यक्ती चांगल्या बातम्या आणते त्या व्यक्तीचे नेहमी स्वागत केले जाते. निवेदकाची चांगली बातमी हीच कि, ‘तारण जवळ आलेले आहे ते अगदी तुमच्या समोर आहे’. पिलातासमोर उभा असलेला तोच राजा येणार आहे परंतु त्याचे राज्य ह्या जगाचे नाही.

दुसरे वाचन: इब्री लोकांस पत्र : १:१-६

देव प्राचीन काळी त्याच्या निवडलेल्या संदेष्ट्याद्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला व काळाची पूर्तता झाल्यावर त्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राला ह्या भूतलावर पाठविले. देवाचा पुत्र देवदुतापेक्षा श्रेष्ठ गणला गेला व देवाने त्याला सर्व गोष्टीचे वारीस बनविले. तोच पुत्र ह्या सृष्टीची देखरेख देव-शब्दाच्या शक्तीद्वारे करतो.

शुभवर्तमान: योहान १:१-१८.

योहानाच्या शुभवर्तमानाची सुरवात हि ‘शब्दाने’ झालेली आहे. योहानाने ‘शब्दाला’ खूप महत्व दिलेले आहे. हाच ‘शब्द’ आपण उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये वाचतो. ह्याचा अर्थ असा कि ‘शब्द’ हा वेळेच्या अगोदर होता. ग्रीक भाषेमध्ये ‘शब्दाला’ ‘लोगोस’ असे म्हणतात. हा ‘शब्द’ दैवी होता. येशु हा देवाचा पुत्र आहे. तो युगानुयुगापासून आहे, हे सांगण्यासाठी योहान म्हणतो, ‘प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता’. तोच प्रारंभी देवासह होता. ख्रिस्त हा विश्वाच्या सुरवातीपासून आहे, हे योहानाला झालेले प्रगटीकरण आहे. ‘शब्द’ हा सृष्टीच्या अस्तित्वा अगोदर होता. सृष्टी देवाच्या शब्दाने निर्माण झाली. म्हणून शब्द हा जीवनाचा उगम व सुरवात आहे. शब्दामध्ये व देवामध्ये खूप जवळीक आहे त्यामुळे ‘शब्द’ अनंत काळचे देणारे जीवन आहे.

मनन चिंतन:

आज आपण नाताळचा म्हणजेच आनंदाचा व हौशेचा दिवस साजरा करीत आहोत. हवेत गारवा आहे, मात्र आमच्या अंतःकरणात खूप उब आहे. कारण शांतीचा व प्रेमाचा राजा जन्माला आला आहे. ‘परमेश्वराने आपल्यावर इतके प्रेम केले की, त्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्या तारणासाठी अर्पण केला. जसे मेंढपाळ व राजांना संदेश मिळाला व कुडकुडत्या थंडीत ते येशु बाळाला भेटायला गेले, त्याचप्रमाणे आपल्यालाही हाच संदेश मिळालेला आहे म्हणूनच आज आपण येशुबाळाचे दर्शन घेण्यासाठी आलो आहोत. मेंढपाळासारखे व राजासारखे आपल्यालाही देवदुताचा संदेश मिळाला आहे.
नाताळ म्हणजे नक्की काय? नाताळचा खरा अर्थ आपण विसरलो आहोत. नाताळ म्हणजे आपल्याला वाटते कि ख्रिसमस ट्री, नवीन कपडे, पकवाणे, गव्हाणी इत्यादी. परंतु खरा ख्रिसमस किंवा नाताळ म्हणजे “येशुबाळाचा जन्म”, जो शांतीचा, प्रेमाचा, क्षमेचा, आनंदाचा आणि मायेचा राजा आहे. आपण हे सर्व विसरून भलत्याच गोष्टींकडे लक्ष देत आहोत. आपण ह्या सर्व गोष्टींचा स्विकार करण्याअगोदर त्या देवापुत्राचा स्विकार करायला हवा आणि ह्या सर्व गोष्टी आपल्याला बहाल केल्या जातील.
एकदा एक श्रीमंत माणूस होता. त्याला एक मुलगा होता. त्या माणसाचे त्याच्या मुलावर खूप प्रेम होते. त्या मुलाला खुश ठेवण्यासाठी त्याने चित्रकलेचा छंद जोपासला. कालांतराने त्या मुलालाही तो छंद जडला. ते दोघेही त्यांच्या जीवनात खूप आनंदी होते परंतु अचानक त्या मुलाला लढाईसाठी सैन्यात भरती व्हावे लागले. जेव्हा तो मुलगा सीमारेषेवर सेवा करत असे तेव्हा तो रोज त्याच्या वडिलांना पत्र पाठवत असे. परंतु काही दिवसानंतर त्या वडिलांना फोन आला कि तुमचा मुलगा एका सैन्याला वाचवत असता मरण पावला.
मग एक दोन महिन्यानंतर दरवाजाची बेल वाजली व तेव्हा सैन्यातून एक सदगृहस्थ त्याच्या मुलाच्या काही वस्तू द्यावयास आला होता. त्या गृहस्थाने स्वतःचा परिचय करून दिला कि, ‘मीच तो सैनिक ज्याला तुमच्या मुलाने वाचवले व तो माझा चांगला मित्र होता. मी तुमच्या कलासंग्रहाविषयी खूप ऐकले होते व तुमचा मुलगा तुमच्यावर खूप प्रेम करत होता. म्हणून मी तुमच्यासाठी एक रेखाचित्र आणले आहे, हे मी स्वतः बनवले आहे. जेंव्हा ते वडील ते रेखाचित्र उघडतात तेव्हा त्या रेखाचीत्रावरील त्याच्या मुलाची हसती प्रतिमा पाहून त्याचे डोळे भरून येतात. ते चित्र त्याच्या कायम स्मरणात रहावे म्हणून ते घराच्या प्रवेश द्वाराशी ठेवतात. काही वर्षानंतर हे वडील मरतात व त्या चित्राचा लिलाव केला जातो. अनेकजण वेगवेगळी चित्रे घेतात परंतु फक्त एकच व्यक्ती ते त्याच्या मुलाचे हसतमुख असलेले रेखाचित्र घ्यायला धजतो. त्या चित्राचा लिलाव झाल्यानंतर वकिल त्या व्यक्तीच्या मृत्यूपत्रात लिहिल्याप्रमाणे त्या पित्याची सर्व धनदौलत त्या गृहस्थाला देतात. त्यावर त्या व्यक्तीला आश्चर्याचा धक्का बसतो.
     आज ह्या गोष्टीद्वारे आपल्याला एकच संदेश मिळतो कि, जो कोणी पित्याच्या पुत्राला (येशु ख्रिस्ताला) स्वीकारील त्याला इतर सर्व गोष्टी न मागता मिळतील. जेव्हा येशुख्रिस्त आपल्या जीवनात येईल तेव्हा आपण आनंदाने भरून जाऊ. आपल्या जीवनात शांती, प्रेम, द्या सदैव वसती करेल. जेव्हा आपण आपल्या गावात, मंदिरात, घरात किंवा कुटुंबात वावरू तेव्हा हेच प्रेम, शांती, द्या व आनंद इतरांना देऊ.
आज ह्या नाताळच्या सणाच्या दिवशी आत्मपरीक्षण करूया कि, मी ख्रिस्ताला माझ्या जीवनात स्थान देतो का? जर आपण ख्रिस्ताला जो प्रेमाचा, दयेचा, शांतीचा राजा आहे त्याला आपल्या जीवनात स्वीकारण्यास कमी पडलो असेल तर बाळयेशुजवळ प्रार्थना करूया आणि त्यास आपल्या हृदयी जन्मी घेण्यास विनंती करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद : हे बाळ येशु आमच्या हृदयात जन्म घे.

१.     आपले परमगुरु, बिशप, धर्मगुरू आणि ख्रिस्ती प्रजाजण यांना बाळ येशूचे मार्गदर्शन मिळावे व त्याद्वारे ख्रिस्तसभेची अधिकाधिक भरभराट व्हावी म्हणून प्रार्थना करूया.
२.     राज्याराज्यात व प्रांताप्रांतात सलोखा निर्माण व्हावा आणि सर्वत्र शांतीचे राज्य पसरावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
३.     आपल्या धर्मग्रामात मूलगामी समूहाद्वारे समाज-बांधणीस वेग मिळावा, प्रत्येक गावात असलेले दुरावे दूर होऊन आपण सर्वांनी एक कुटंब व्हावे म्हणून आपण प्रार्थाना करूया.
४.     आपल्या धर्मग्रामातील आजारी, दुःखी व पिडीत लोकांना येशु बाळाचा आशीर्वाद मिळावा व त्यांचा आजार व दुःख हलके व्हावीत म्हणून प्रार्थना करूया.
५.     आता आपण थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया.


No comments:

Post a Comment