Wednesday, 21 December 2016

Reflection for the Homily of Christmas Vigil Mass (25/12/2016) By Br. Glen Fernandes




नाताळ (मध्यरात्रीची मिस्सा)

दिनांक: २५//२०१६.
पहिले वाचन: यशया ९:१-७
दुसरे वाचन: तीतास पत्र  २: ११-१४
शुभवर्तमान: लूक २:१-१४



आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे.


प्रस्तावना:

आज आपण नाताळचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहोत. आजच्या तिन्ही वाचनात आपण एकतो कि, देव दीनाघरी धावून आला.
      आजच्या पहिल्या वाचनात आपण एकतो कि यशया संदेष्टा म्हणतो, “अंधारात व मृत्यूछायेत चालणाऱ्या लोकांनी दिव्य तारा पाहिला आहे. दुसऱ्या वाचनात संत पौल येशू ख्रिस्ताविषयी साक्ष लोकांना देत आहे. ख्रिस्तप्रेमाने झपाटलेला हा प्रेषित सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा प्रकट झाली आहे.” “पाहुणा आला हो, देव माझ्या दारीहे गीत गात असताना शुभवर्तमानात देवदूत मेंढपाळाप्रमाणे आपणासाठी सांगत आहेत कि, तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात, तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे.
आज ह्या मिस्साबलीदान सहभागी होत असताना बाळ येशूने आपल्याला आशिर्वादित करून आपल्या अंतकरणात जन्म घ्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. 

सम्यक विवरण:
पहिले वाचन: यशया ९:१-७.

अंधारात व मृत्यूछायेत चालणाऱ्या लोकांनी दिव्य तारा पाहिला आहे. आम्हासाठी पुत्र दिला आहे.येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या सातशे वर्षे अगोदर यशया संदेष्टाने हे भाकीत केले होते, “कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील.
यहुदी लोकांचा इतिहास हा लढाया, पराभव, अवहेलना, सुटका ह्यांनी पूर्ण समाविष्ट आहे. देवाची निवडलेली जनता असूनही दैवी शांतीचा अनुभव यहुदी जनतेला क्वचितच आला. अनेक युद्धात त्यांचा समाज, कुटुंब-धर्म देऊळ सर्व काही नष्ट झाला. परंतु देव त्यांच्या प्रार्थना ऐकत होता. देवाने संदेष्टे पाठविले. परंतु यहुदी लोकांच्या विश्वासाचे खच्चीकरण झाले होते. पराभवाने नैराश्य आले असताना त्यांनी देवाकडे धाव घेतली. आजारी, पिडीत, गरीब, दु:खी अशा सर्व लोकांना संदेष्टा धीर देवून म्हणतो कि, “तुमच्या दुबळ्या, धडधडत्या हृदयांना म्हणा, ‘हिंमत धारा, घाबरू नका. पहा तुमचा देव तुमचे शत्रू, आजार, दारिद्र्य, गरिबी सर्व काही नाश करून तुम्हांस प्रतिफळ देण्यास येत आहे.यशया संदेष्टाचे हे शब्द आपल्याला धीर देतात. अंधकारात व मृत्युच्या छायेतून चालणाऱ्या लोकांनी दिव्य प्रकाश पहिला आहे. आम्हास पुत्र देण्यात आला आहे व बंधनातून मुक्त करण्यासाठी देवपुत्र मानव झाला’.

दुसरे वाचन: तीताला पत्र  २: ११-१४.

संत पौल लिहिलेल्या पत्रात ख्रिस्तीसमूहाला शिष्याला साजेशे वर्तन करण्यासाठी मार्गदर्शन करीत आहे. ख्रिस्ताने स्वत:ला आपल्याकरिता दिले, ह्यासाठी की त्याने खंडणी भरून आपल्याला सर्व स्वैरापासून मुक्त करावे. आणि चांगल्या कामात तत्पर असे स्वत:चे लोक आपणासाठी शुद्ध करून ठेवावे. संत पौल तीताला ख्रिस्ती समूहातील आचारणाविषयी कोणते शिक्षण घ्यायला पाहिजे इत्यादी बाबतीत बोध करतो. देवाने सर्व माणसांना तारणाविषयी कृपा प्रकट केली आहे. त्या कृपेमध्ये आम्हाला आमचा देव व तारणारा येशु ख्रिस्त यांच्यामध्ये गौरवमय जीवन प्राप्त झाले आहे.

शुभवर्तमान: लूक २:१-१४.

      आजच्या शुभवर्तमानात संत लूक आपणास प्रभू येशु ख्रिस्ताच्या जन्माची सविस्तर माहिती देतो. लूकचे शुभवर्तमान हे सर्व मानवांसाठी आहे. त्याचा दृष्टीकोन अत्यंत विशाल, व्यापक असा आहे. येशु हा सर्वांसाठी आहे. कोणी यहुदी असो किंवा परराष्ट्रीय असो. पुरुष असो किंवा स्त्री असो, श्रीमंत असो किंवा गरीब, संत किंवा पापी, कोणीही असो; येशु हा प्रत्येक मानवाच्या तारणासाठी आलेला आहे.
      तसेच आपण शुभवर्तमानात ऐकतो की, मारियेला प्रथम पुत्र झाला. त्याला तिने गव्हाणीत ठेवले, कारण त्यांना उतारशाळेत जागा नव्हती व त्याच परिसरात मेंढपाळ रात्रीच्या वेळी आपले कळप राखीत होते. तेव्हा देवदुताने त्यांना संदेश दिला कि तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे’.
अनेक वर्षे लोक मसिहाची वाट पाहत होते. तारणाऱ्यासाठी अनेक वर्षे लोक टक लाऊन बसले होते, तरी त्याचे दर्शन फक्त जे लीन, निर्मळ होते त्यांनाच लाभले. मेंढपाळ शिकलेला व श्रीमंत नव्हते. त्यांना धर्म, रुढि, परंपरा ह्याविषयी काहीही माहित नव्हते तरी सुद्धा ते मनाने नम्र व निर्मळ होते त्यामुळे त्यांना परमेश्वराचे दर्शन घेण्याचं भाग्य लाभलं. शास्त्री, परुशी, धर्मपंडित हे लोक उपवास करत होते, प्रार्थना करत होते. डोळ्यात तेल घालून मासिहाच्या येण्याची वाट पाहत होते, परंतु त्यांना ते भाग्य लाभलं नाही.

बोधकथा:

संत फ्रान्सिस असिसिकर ह्याने १३ व्या शतकात पहिली गव्हाण केली. त्याने पहिला गाईचा गोठा का केला?
संत फ्रान्सिस जगातील मत्सर, राग, द्वेष ह्यांना वैतागला होता. त्याला फार दुःख होत असे कि जगाचा मालक जेव्हा ह्या जगात आला तेव्हा त्याला कुठेही जागा मिळाली नाही. तो ढसाढसा रडत असे. त्याला अतिशय वेदना होत असत कि, Love is not Loved. देव आपल्यावर प्रेम करतो, परंतु त्याच्यावर कोणीही प्रेम करत नाही. त्या दैवी प्रेमाचा अनुभव होण्यासाठी त्याने एका शेतकऱ्याकडून काही गाई आणल्या व एक गोठा तयार करून त्यामध्ये बकऱ्या गाढवं व चारा ह्यापासून त्याने एक गव्हाण तयार केली. गावातील सर्व लोक जमले. असं म्हणतात कि, त्या रात्री बारा वाजता नाताळची गीतं गात असताना येशूबाळ त्यांच्यामध्ये उपस्थित असण्याचा स्वर्गीय आनंद त्यांना झाला. त्या दिवसापासून गव्हाण तयार करण्यास सुरुवात झाली.

मनन चिंतन

आज् आपण नाताळचा सण साजरा करीत आहोत. ह्या दिवशी रोमी लोक सूर्याचा सण साजरा करीत, कारण या काळात सूर्याने अंधारावर विजय मिळविला असा त्यांचा समज होता.  पोप बेनेडिक्ट सोळावे ह्यांनी आपल्या २००१ सालच्या ख्रिस्तमस संदेशामध्ये म्हटलं कि, ‘माणूस आजही वेगवेगळ्याप्रकारे, वेगवेगळ्या ठिकाणी देवाची वाट पाहत आहे. डोळ्यात तेल ओतून तो देवाच्या येण्याची प्रतिक्षा करीत आहे. परंतु जेव्हा वेळ येते, घटका भरते, जेव्हा तारणाची पहाट उगवते व तारणारा ह्या जगात येतो तेव्हा त्याला सर्व दरवाजे बंद दिसतात. मनुष्याच्या हृदयात बाळासाठी जागा नसते म्हणून गाईला सरकून परमेश्वराला जागा द्यावी लागते’.
आज आपण नाताळचा सण साजरा करत आहोत. नाताळचा सण हा हौसेचा सण आहे, आनंदाचा सण आहे. आपल्या घरी जर पाहुणे येणार असतील तर आपण मोठ्या आशेने व हौसेने त्यांची वाट पाहत असतो. हि वाट पाहणे म्हणजे ओढ. जेव्हा व्यक्तीला ओढ लागते तेव्हा ती स्वप्नात रंगू लागते व तयारी करायला लागते. आपल्याला देऊळमाता चार आठवड्याचा आगमन काळात आपण गातो उठा प्रभूचे स्वागत करण्या मार्ग प्रभूचा सजवा’. आपण जर परमेश्वराच्या येण्याची तयारी केली असेल तर प्रभू आपल्या हृदयाच्या गव्हाणीत जन्म घेईल.
अशांत हृदयाला शांती देण्यासाठी प्रत्येक डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी सर्व मानवजातीला पापमुक्त करण्यासाठी मानवजातीचे हृदय प्रेमाने भरण्यासाठी देवाच्या पुत्राने जगात जन्म घेतला. लोकांच्या हृदयामध्ये दया, शांती आणि क्षमेचे बीज पेरले.
ख्रिसमस ह्या शब्दाचा अर्थ ख्रिस म्हणजे ख्रिस्तोस, देवाने अभिषिक्त केलेला, देवाने निवडलेला, तारणारा म्हणजेच देव. मास म्हणजे मनुष्य, मानव. थोडक्यात देव माणूस झाला व नुसताच मानव झाला नाही तर त्याने आम्हामध्ये वस्ती केली.
परंतु आज ख्रिसमस म्हणजे काय? एक लेखक म्हणतो, “कधीतरी एकदा होता ख्रिसमस. आता ख्रिसमस पार्टी, ख्रिसमस ट्री, ख्रिसमस शॉपिंग, ख्रिसमस कार्ड असे सगळे आहे. ख्रिसमसमध्ये परंतु बिचारा येशू ख्रिस्त दिसत नाही. तो हरवला आहे. म्हणून कवी जॉर्ज लोपीस म्हणतात, “तुझ्या जन्मातून होऊ दे, प्रत्येक निखारा दवाचा थेंब, प्रत्येक पिडीताच्या अश्रुतून जन्मू दे, तुला पाहण्याचा आसरा.”
त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी कि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. (योहान ३:१६)
प्रभूची शुभवार्ता पसरविण्यासाठी आपल्याला प्रभूचा आशिर्वाद मिळावा म्हणून आपण इतरांना नाताळचा आनंद द्यावा व आपला आनंद द्विगुणीत व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद : हे प्रभू तुझ्या प्रेमाने आम्हाला भरून टाक.

१.      बाळ येशूच्या शांतीचा, प्रीतीचा संदेश आपले पोप महाशय, कार्डीनल्स, बिशप, धर्मगुरू, ह्यांनी पूर्ण तन्मयने जगजाहीर करावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
२.      आज जे लोक दुःखी, कष्टी, आजारी व पिडीत आहेत त्यांना बाळ येशूची विशेष कृपा व आशीर्वाद मिळावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
३.  बाळ येशूच्या शांतीचा संदेश आपण अंगीकारून तोच संदेश इतरापर्यंत पोहचविण्यासाठी आपणास शक्ती व कृपा मिळावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
४.     जे लोक देवापासून दुरावले आहेत त्यांना बाळ येशूकडे येण्याचा मार्ग सापडावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
५.      आपण आपल्या वैयक्तिक गरजा प्रभू चरणाशी ठेऊ या.


No comments:

Post a Comment