Wednesday 7 December 2016

Reflection for the Homily of 3rd  Sunday of Advent (11-12-16) by Ashley D’Monte 



आगमनकाळातील तिसरा रविवार

दिनांक: ११/१२/१६.
पहिले वाचन: यशया ३५:१-६,१०.
दुसरे वाचन: याकोबाचे पत्र ५:७-१०.
शुभवर्तमान: मत्तय ११:२-११.



"जे तुम्ही ऐकता व पाहता ते योहानाला जाऊन सांगा"



प्रस्तावना:

आज आपण आगमन काळातील तिसरा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपणास तारणारा ‘मसीहा’ ह्याविषयी सुचीत करीत आहे. तारणारा कशाप्रकारे येईल व तो आल्यावर काय करील याची प्रचिती आपणास आजच्या वाचनांतून येते.
तारणारा हा शांतीचा दूत आहे; यशया संदेष्ट्याने सांगितल्याप्रमाणे ‘शांती’ हि एक त्याची आपणास देणगी आहे. संदेष्टा पुढे म्हणतो, तारणारा आपणास अजून एक देणगी घेऊन येणार आहे; ती म्हणजे आनंद. हा आनंद स्वीकारण्यास उतावीळ होऊ नका तर धीर बाळगा असे संत याकोब त्याच्या पत्रात सांगत आहे. शुभवर्तमानात बाप्तिस्मा करणारा योहान येशुच्या येण्याची खात्री करून घेताना आपण ऐकतो.
     खरा आनंद फक्त ख्रिस्तच आपणास देऊ शकतो. हा आनंद फक्त जे त्याचा पूर्ण अंतकरणाने स्विकार करतात त्यांनाच मिळतो. येशुचा आपल्या जीवनात स्विकार करून तो देत असलेला आनंद स्वीकारण्यास ह्या मिस्साबलीदानात प्रार्थना करूया.

सम्यक विवरण

पहिले वाचन: यशया ३५:१-६,१०

यशया संदेष्टा प्रभूच्या येण्याने सृष्टीत काय बदल होईल ह्याचे वर्णन करीत आहे. पलेस्टीन जमीन जरी अरण्य व रुक्ष असली तरीही ती फुला-फळाने भरून जाईल. यशया संदेष्टा करीत असलेल्या आनंददायी घोषणेसाठी तीन कारणे देत आहे.
1. इस्रायली जनता बंदिवानातून परत येणार आहेत.
2. तो दिवस जवळच आहे, जेव्हा अंधांचे नेत्र उघडतील, बहिऱ्यांचे कान खुलतील, आणि लंगडा चालू लागेल.
3. दुःख व यातना एके दिवशी पूर्णपणे नाहीशी होईल.
परमेश्वराने दिलेल्या वचनांची पूर्तता भूतकाळात झाली होती व पुढेही त्या वचनांची पूर्तता होत राहील.
“पहा तुमचा देव सूड घ्यावयास; अनुरूप असे प्रतिकूल द्यावयास येईल, तो येईल व तुमचा उद्धार करील.” यशया संदेष्टा तो घोषित करीत असलेला आनंदाचे कारण देत आहे. जेव्हा तारणारा येईल तेव्हा ह्या त्याच्या भविष्यवाणीची पूर्तता होईल. हा तारणारा प्रभू येशु होय, जो रक्षण करतो.

दुसरे वाचन: याकोबाचे पत्र ५:७-१०.

याकोब आपल्या पत्रात प्रभूच्या येण्यापर्यंत धीर बाळगण्यास सांगत आहे. प्रभूच्या येण्याने सर्व पृथ्वी आनंदून जाईल. याकोब शेतकऱ्याचे उदाहरण देत आहे. कारण शेती व्यवसाय हा सर्वांच्या माहीतीचा होता. शेतकऱ्याप्रमाणे आपण उत्सुकतेने व धीराने प्रभूच्या येण्याची वाट पहिली पाहिजे. तो नेहमी आपल्या पिकवाढीची व पिकासाठी आवश्यक असलेल्या पावसाची वाट पाहत असतो. त्याचा विश्वास धीट असतो.
याकोब पुढे प्रभूच्या येण्याची तयारी कशाप्रकारे करावी याविषयी सांगत आहे, “बंधुनो, तुम्ही दोषी ठरू नये म्हणून एकमेकांविषयी कुरकुर करु नका.” आपल्या मनाची स्थिती योग्य ठेवली पाहिजे. मानवी मन हे फार चलविचल आहे. ते सहज बहकून जाते. त्यामुळे प्रभूच्या येण्यास आपण तयार असले पाहिजे. याकोब पुढे जे संदेष्ट्यानी प्रभूच्या येण्याविषयी भाकीत केले होते त्याची आठवण करण्यास सांगत आहे.

शुभवर्तमान:  मत्तय ११:२-११.

आनंद व दुःख आपल्या जीवनात कशाप्रकारे भूमिका बजावते ह्याची प्रचीती आपणास शुभवर्तमानात येते. शुभवर्तमानात आपणास बाप्तिस्मा करणारा योहान ह्याचे उदाहरण देण्यात आले आहे. योहानाने ख्रिस्ताचा प्रचार विश्वासाने केला होता व लोकांना प्रभूकडे परत येताना पाहतानाचा आनंद अनुभव होता. आपणावर सोपवलेली जबाबदारी पार पाडल्यानंतर, योहान आपल्या विश्वासाचे प्रतिफळाची वाट पाहत होता. पण शेवटी तो तुरुंगात सापडला जातो. तुरुंगातील हालअपेष्टा व एकटेपणा त्याचा मनात शंकाकुशंकेचे घर करून जाते. त्याच्या मनात विचार आला असेल प्रभू येशू खरच आला आहे का? त्या विचारात तो आपल्या शिष्यांना प्रभू येशुची विचारपूस करण्यास पाठवितो. प्रभूच्या उत्तराने योहानाला आपण घोषित प्रभूची खात्री होते, “आंधळे पाहतात, पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात......” प्रभू येशू जणू योहानाला सांगत होता, ‘संकोच बाळगू नकोस जे यशया संदेष्ट्याने भाकीत केले होते त्याची पूर्तता झाली आहे; माझ्यावर विश्वास ठेवा, थोडा अजून धीर धरशील तर तुझा आनंद पूर्ण झालेला दिसेल’. पुढे प्रभू येशू योहानाची जीवनगाथा जनसमुदायाला सांगत आहे.

मनन चिंतन:

मनुष्य हा जीवनात आनंद शोधण्याचा सदैव प्रयत्न करीत असतो. हा आनंद तो चैनबाजीत शोधतो अथवा आपल्या अवती भवती असलेल्या वस्तूंमध्ये शोधतो. पण खरच का त्याला ह्या गोष्टीमधून आनंद मिळतो? खरे पाहता जरी त्याला वरील गोष्टीत आनंद मिळाला, तरीही तो क्षणभंगुर असतो. तर मग खरा आनंद आपणास कोण देईल? ह्या प्रश्नाचे उत्तर आपणास आजची उपासना देत आहे. हा चिरकाल टिकणारा आनंद केवळ प्रभू येशूच देऊ शकेल. आपण पाहतो, लोक सुखाच्या शोधात जग पालथे घालतात पण शेवटी प्रभूपाशीच सुखावतात.
आपण जेव्हा ख्रिस्ती जीवन जगण्यास सुरवात केली, तेव्हा आपणास अत्यानंद झाला असेल. आपला आनंद कधीच मिटणार नाही असे आपणास वाटले असेल. जसे आपण जीवनाचा अनुभव घेतला तसे तसे दुःख आले, आजारपण व छळ ह्यांनी जीवनाचा ताबा घेतला. हताश होऊन आपण पापात पडलो. आपल्या जीवनातील आनंदाचा आपणास विसर पडतो; आपण दुःखी होतो. अशा प्रसंगी आपण प्रार्थनेद्वारे प्रभूचा धावा करीत नाही. जर हा धावा आपण केला तर शांती व आनंद आपल्या जीवनात नक्कीच परतेल. आपल्या प्रार्थनेद्वारे आपले दुःख कायमचे नाहीसे होणार नाही, आपल्या गरजा काही थांबणार नाही; पण मनाला मिळणारी शांती व आनंद ह्यात भर होईल व त्याचा ऱ्हास कधीही होणार नाही.
ख्रिस्ती जीवन म्हणजे सुख-दुःखाची भुकेलेली एक माला; व त्याची पूर्तता ही पुढल्या आयुष्यात होते. जीवनात योग्य ती निवड करणे हे आपणांवर अवलंबून आहे. ख्रिस्ताद्वारे मिळणार चिरकाल आनंद स्वीकारावा कि जगाद्वारे मिळणारा क्षणभंगुर आनंद स्विकारावा? आपण निवड करीत असलेल्या गोष्टींची आपण नुतनीकरण केले पाहिजे.
आपण दैनंदिन जीवन जगत असताना परिपूर्ण आनंद अनुभवने फार मुश्कील आहे. हा आनंद फक्त आपण जर ख्रिस्ताशी संलग्न राहिलो तरच मिळू शकतो. तेव्हा आपल्या जीवनात कितीही दुःखे, संकटे आली तरीही आपण खचून न जाता त्यांचा सामना करू व त्यावर मात करून आपल्या आनंदात अजून भर पाडून घेऊ. जीवनात येणाऱ्या खऱ्या आनंदाचा उगम व शेवट हा ख्रिस्तामध्येच आहे. ज्यावेळी आपण त्याचा अनुभव घेऊ त्यावेळी यशया संदेष्ट्याची वाणी पूर्ण होईल: हे सर्व आपल्या प्रत्येकाच्या जीवनात पूर्णत्वास येईल.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.

1. आपले परमगुरुस्वामी, महागुरुस्वामी धर्मगुरू व व्रतस्थ ह्यांनी योहान बाप्तिस्माप्रमाणे ख्रिस्ताच्या येण्याचा आनंद अनुभवला त्याचप्रमाणे त्यांनीही आपल्या शुभवर्तमान प्रचारामध्ये प्रभूचा आनंद अनुभवावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
2. जे लोक देवापासून दूर गेले आहेत ज्यांना ख्रिस्ताची अजूनही ओळख नाही अशांना आपणाद्वारे ख्रिस्ती जीवनातील आनंदाचा व ख्रिस्ती श्रद्धेचा अनुभव यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
3. आपल्या हृदयातील शांततेचा व आनंदाचा नाश करणाऱ्या सर्व पाप मोहापासून आपण दूर राहावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
4. ज्या ख्रिस्ती बांधवांनी ख्रिस्ती जीवनातील आनंदाचा कधी अनुभव घेतला नाही किंवा तो आनंद ते हरपून बसले आहेत अशांना जाणीव व्हावी कि, केवळ ख्रिस्ताशी सलंग्न राहिल्याने त्यांना चिरकाल आनंद प्राप्त होईल म्हणून प्रार्थना करूया.
5. आता आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतू प्रभूचरणी मांडूया.

No comments:

Post a Comment