Wednesday, 14 December 2016

Reflection for the Homily of 4th Sunday of Advent (18-12-16) by Baritan Nigrel. 



आगमन काळातील चौथा रविवार

दिनांक: १८/१२/२०१६.
पहिले वाचन: यशया ७:१०-१४.
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र १:१-७.
शुभवर्तमान: मत्तय १:१८-२४.



“तिला जो पुत्र होईल तो जगाचा तारणारा होईल”



प्रस्तावना:

जो कोणी येशु ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन लाभेल, कारण प्रभू परमेश्वर आपला तारणारा आहे; हे आजची उपासना आपल्याला सांगत आहे.
पहिल्या वाचनात देव यशया संदेष्ट्याद्वारे इम्यॅनुएलचे चिन्ह भाकीत करून सांगतो की, ख्रिस्ताच्या जन्माने इस्रायलच्या सर्व दुःखाचा शेवट होईल व ख्रिस्त दाविदाच्या राज्यावर सर्वकाळ नीतीने राज्य करील. दुसऱ्या वाचनात संत पौल ख्रिस्त आपला तारणारा आहे व तोच खऱ्या देवाचा पुत्र आहे असा बोध करतो. तर शुभवर्तमानामध्ये देवाचा दूत योसेफला मरीयेचा स्वीकार करण्यास सांगतो कारण तिला जो पुत्र होईल तो जगाचा तारणारा होईल.
प्रभू येशु आपला तारणारा आहे व आपल्या सर्वांच्या जीवनाशी एकरूप होण्यास तो आपल्यामध्ये येत आहे. त्याने आम्हां प्रत्येकाच्या अंतःकरणात वसती करावी व आपल्याबरोबर सदैव रहावे म्हणून आजच्या ह्या मिस्साबलिदानात आपण विशेष प्रार्थना करुया.

पहिले वाचन: यशया ७:१०-१४

देव आपल्याबरोबर आहे, तो त्याच्या जनतेला कधीही एकटे सोडत नाही. आजच्या पहिल्या वाचनात देव इम्यॅनुएलचे चिन्ह देत आहे. म्हणून आजचे हे वाचन आपल्याला देवावर विश्वास ठेवण्यासाठी आमंत्रित करत आहे. देवाने आहाज राजाला धीर देण्यासाठी संदेष्ट्याला त्याच्याकडे पाठविले. अश्शूरचा राजा चढाई करून येईल हे यशयाने भाकीत केले; पण त्याचबरोबर ख्रिस्ताच्या जन्माने इस्रायलच्या सर्व दुःखाचा शेवट होईल व ख्रिस्त दाविदाच्या राज्यावर सर्वकाळ नीतीने राज्य करील हेही यशयाने भाकीत केले होते. यहुदाचा विनाश होणार नाही हे दाखवण्यासाठी देवाने आहाजला एक “चिन्ह” दिले – ‘इम्यॅनुएल’, कुमारीचा पुत्र (येशु ख्रिस्त जन्माला येणार) हा भविष्यसंदेश प्रस्तुत उताऱ्यात आपणास देण्यात आला आहे.

दुसरे वाचन: रोम १:१-७

या वाचनात ख्रिस्त येशूचा दास पौल, रोम येथील पवित्र जनांना उद्देशून तारणाऱ्याविषयी लिहित आहे. पौल स्वतःला ख्रिस्त येशूचा दास म्हणतो. ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यास त्याला लाज वाटत नाही. पौल लोकांना सांगतो, ख्रिस्त यहुदी लोकांत, दाविदाच्या घराण्यात जन्मास आला. तो मेला व तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. यामुळे पवित्र आत्म्याने ख्रिस्त हा खरोखर देवाचा पुत्र आहे असे प्रगट केले.

शुभवर्तमान: मत्तय १:१८-२४

योसेफ व मरीयेची मागणी झाली होती. विवाहापूर्वी मरिया पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने गर्भवती झाली हे जेव्हा योसेफला समजते, तेव्हा तो तिला गुपचूप ‘घटस्फोट’ देण्याचा निश्चय करतो. अशावेळी देवाचा देवदूत योसेफच्या स्वप्नात येतो आणि सांगतो, ‘मरिया पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने गर्भवती झाली आहे त्यात तिची काहीच चूक नाही म्हणून तू तिचा स्वीकार कर आणि तिला जो पुत्र होईल त्याचे नाव ‘येशु’ असे ठेव. कारण तोच सर्वांचे तारण करील.

बोधकथा:

एके दिवशी नवीन वधु-वर बोटीने नदीच्या पलीकडे आपल्या घरी जात होते. अचानक मध्येच वादळ सुरु झाले. पत्नी घाबरली. तिला वाटले की कदाचित आपल्या जीवनातील हा शेवटचा दिवस आहे. पती मात्र शांत आपल्या जागी बसूनच होता. त्याच्या चेहऱ्यावर कोणतेही भीतीचे चिन्ह दिसत नव्हते. पत्नीने त्याला विचारले – ‘काय हो, तुम्हाला कसलीच भिती वाटत नाही काय? जर बोट बुडून गेली तर आपण दोघेजण मरून जाणार’. तेवढयात त्याने आपल्या हातात असलेली तलवार आपल्या पत्नीच्या मानेवर ठेवली आणि सांगितले, ‘बोट बुडण्याअगोदर मी तुझा तलवारीने खूण करणार’. पत्नीने म्हटले, ‘माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही मला कधीच मारणार नाही. तुम्ही नेहमी माझा सांभाळ करणार’. पतीनेही तिला तेच सांगितले. माझाही देवावर असाच विश्वास आहे. तो आपल्या सर्वांचा सांभाळ करतो. आपल्याला कधीही तो एकटे सोडत नाही. कितीही मोठे संकट आले तर तो आपल्याबरोबर असतो. कारण आपले जीवन त्याच्या हातात आहे म्हणून मला मरणाची भिती वाटत नाही.
परमेश्वर प्रत्येक क्षणी आपल्याबरोबर असतो. आपल्या सुख दुःखात तो आपल्या पाठीशी असतो. आपले तारण व्हावे म्हणून तो आपल्यामध्ये जन्म घेतो व आपल्या जीवनात येतो. मात्र जी व्यक्ती त्याच्या वचनावर विश्वास ठेवते व त्याच्या योजनेप्रमाणे जीवन जगते, तीच व्यक्ती परमेश्वराला आपल्या जीवनात जन्म घेण्यास आमंत्रित करत असते. म्हणून परमेश्वरावरील आपला विश्वास अधिकाधिक दृढ व्हावा व त्याच्या योजनेप्रमाणे जीवन जगावे म्हणून त्याची कृपा शक्ती मागूया.

मनन चिंतन:

लवकरच आपण नाताळचा सण साजरा करणार आहोत. आगमन काळातील या शेवटच्या रविवारी, देऊळमाता आपणास अंतःकरणाची आध्यात्मिक तयारी करण्यास सांगत आहे. कारण आपला तारणारा ‘इम्यॅनुएल’ – ‘येशु ख्रिस्त’ आपल्यामध्ये जन्माला येणार आहे.
यशयाच्या पहिल्या वाचनात आपण ऐकले की, देव आहाज राजाला ‘इम्यॅनुएलचे’ चिन्ह देतो. मात्र हे चिन्ह देण्यामागे नेमका देवाचा काय उद्देश होता? ह्या चिन्हाद्वारे देवाला काय सूचित करायचे होते? आजच्या पहिल्या वाचनातून एक गोष्ट स्पष्ट होते की, विश्वास ठेवणे हे स्वतःच्या इच्छेवर अवलंबून असते (योहान ७:१७). देवावर विश्वास ठेवणे म्हणजे इम्यॅनुएल – येशु ख्रिस्ताला आपल्या जीवनी स्वीकारणे व देवावर विश्वास न ठेवणे म्हणजे येशु ख्रिस्ताला नाकारणे. यहुद्यांचा राजा आहाज ह्याने तर मन घट्ट केले होते. देवाने त्याला सांगितले – सर्वात बलाढय शत्रूशी मैत्री करु नकोस. मात्र त्याने देवाचे ऐकले नाही. त्याचा एक वेगळाच मनसुबा होता. म्हणून त्याने बलाढय शत्रूशी मैत्री करून आपल्या शत्रूवर मात करावी असा त्याने बेत रचला. अशावेळी देवाने यशया संदेष्ट्याला त्याच्याकडे पाठविले आणि ‘इम्यॅनुएलचे’ चिन्ह भाकीत केले. हे चिन्ह फक्त आहाज राजालाच नव्हे तर संपूर्ण ‘दाविदाच्या घराण्याला दिले.’
इस्रायल देशाला इतर बलाढय देशांनी पायाखाली ठेवले होते. म्हणून इस्रायल लोकांचा ‘याव्हेवरील’ (देवावरील) विश्वास डळमळत होता. त्यांना वाटले ‘याव्हेने’ त्यांना सोडून दिले आहे. अशावेळी देव ‘इम्यॅनुएलचे’ चिन्हाचे देऊन सांगतो – “ख्रिस्ताच्या जन्माने इस्रायलच्या सर्व दुःखाचा शेवट होईल व ख्रिस्त दाविदाच्या राज्यावर सर्वकाळ नीतीने राज्य करील व यहुद्यांचा कधीही विनाश होणार नाही”.
जुन्या करारात देवाने जे इस्रायल लोकांना ‘इम्यॅनुएलचे’ वचन दिले होते, ते वचन पूर्णत्वास नेण्यास देवाने मरीयेची व योसेफची निवड केली. देवाची योजना काय होती हे दोघांनाही समजले नाही परंतु त्यांनी देवावर विश्वास ठेवला आणि देवाचे स्वप्न पूर्ण करण्यास सहकार्य केले. म्हणून आजच्या शुभवर्तमानातदेखील आपल्याला हेच स्पष्ट होते की, ‘विश्वास ठेवणे हे स्वतःच्या इच्छेवर अवलंबून असते’. योसेफ हा साधा व प्रामाणिक होता. पण जेव्हा त्याला समजते की मरिया ही गर्भवती आहे तेव्हा तो तिला गुप्तपणे घटस्फोट देण्याचा विचार करतो. कारण विवाहापूर्वी कौमार्यभंगाला जुन्या करारात मरणदंडाची शिक्षा सांगितली होती. पण या काळात त्याऐवजी घटस्फोट ही शिक्षा मान्य झाली होती आणि साक्षीदारांसमक्ष खासगीरीत्या घटस्फोट देणे हा त्याला सौम्य, सहानुभूतीमय पर्याय होता. म्हणून अशा ह्या पेचप्रसंगात त्याला महत्त्वाचा निर्णय घ्यावयाचा होता आणि ह्या निर्णयामुळे त्याच्या सर्व भवितव्याला कलाटणी मिळणार होती. अशा क्षणी देव स्वतः त्याच्या स्वप्नात येऊन मरीयेला त्याची पत्नी म्हणून स्वीकार करण्यास सांगतो. योसेफ कुणावरही विसंबून राहत नाही. उलट देवावर विश्वास ठेवून, देवाच्या, तारणाच्या इतिहासाला होकार देतो व देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगतो.
ख्रिस्त जयंती साजरी करण्याअगोदर आजची उपासना आपल्याला देवावर विश्वास ठेवण्यास आव्हान करीत आहे. कारण ख्रिस्त आपले तारण करवयास आपल्यामध्ये जन्म घेणार आहे. आपल्याला भेटण्यास पहिले पाहुल देव स्वतः उचलतो. आपण देवाला शोधण्यापूर्वी देवानेच आपल्याला शोधून काढले आहे. कारण तो आपला देव आहे आणि आपल्याला पापांतून मुक्त करण्यासाठी, आपले तारण करण्यासाठी तो पुन्हा येत आहे.
‘तारण’ म्हणजे धोका, संकट, पाप व मरण यांपासून बचाव. कोणी महासागरात बुडत असेल तर त्याला बाहेर काढावे. आज आपल्यापैकी अनेकजण पापाच्या महासागरात बुडत आहेत. म्हणून त्यांचा बचाव करण्यासाठी ख्रिस्त मानवाच्या रुपात आपल्यामध्ये येणार आहे. मात्र देवावर विश्वास ठेवणे हे आपल्यावर अबलंबून आहे. कारण देव अजूनही आपल्याला ‘इम्यॅनुएलचे’ चिन्हाचे भाकीत करीत आहे. ‘इम्यॅनुएल – येशु ख्रिस्त’ आपल्या जीवनात येईल, तेव्हा आपल्या दुःखाचा शेवट होईल. म्हणून नाताळ खऱ्या अर्थाने साजरा करण्यासाठी आपण आपल्या मनाची व अंतःकरणाची आध्यात्मिक पूर्व तयारी करुया, जेणेकरून ख्रिस्त आपल्या हृदयात, कुटुंबात जन्म घेऊन युगानयुग आपल्या जीवनात राज्य करील. आमेन.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो तुझ्या तारणात आमचा समावेश कर.

१. आपले पोप फ्रान्सिस, सर्व कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरु आणि सर्व व्रतस्थ ह्यांना प्रभूचा विपुल आशीर्वाद मिळावा व त्यांनी देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगून जगाला ख्रिस्ताचा शुभसंदेश द्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. लवकरच आपण ख्रिस्त जयंती साजरा करणार आहोत. म्हणून आपण सर्वांनी योग्यरित्या मनाची व  अंतःकरणाची आध्यात्मिक तयारी करावी आणि ख्रिस्त आपला तारणारा ह्याला आपल्या जीवनात स्वीकारावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. नव-विवाहित दांपत्यांमध्ये घटस्फोट घेण्याचे प्रमाण फार वाढत आहे, अशा देवाविरोधक निर्णयाला परमेश्वराचा स्पर्श व्हावा व त्यांनी पुन्हा एकदा परमेश्वरामध्ये एक होऊन त्यांच्या जीवनाची नवीन सुरुवात करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. जे ख्रिस्ताची सुवार्ता पसरवीत आहेत, अशा सर्वांना प्रभूचा आशीर्वाद मिळावा व ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे असे जगाला प्रगट करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आपला सर्वांचा देवावरील विश्वास अधिकाधिक बळकट व्हावा व आपण सर्वांनी देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगून ख्रिस्त आपला तारणारा आहे ह्याची साक्ष आपण इतरांना दयावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. थोडा वेळ शांत राहून आपल्या कौटुंबिक व वैयक्तिक गरजा प्रभूचरणी मांडूया.




No comments:

Post a Comment