Thursday, 1 December 2016

Reflection for the Homily of 2nd Sunday of Advent (04-11-16) by Dominic Brahmane. 




आगमनकाळातील दुसरा रविवार

दिनांक: ४/१२/२०१६.
पहिले वाचन: यशया ११:१-१०.
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र १५:४-९.
शुभवर्तमान: मत्तय ३:१-१२.

"तो सर्वांसाठी शांतीचे राज्य प्रस्थापित करेल"



प्रस्तावना:

आज आगमनकाळातील दुसरा रविवार आपण साजरा करत आहोत. आजची उपासना स्वत:ची आत्मशुद्धी करून देवाच्या पुनरागमनासाठी सिद्ध असण्यास पाचारत आहे.
आजची तीनही वाचने परमेश्वराने दिलेल्या वचनांविषयी व ख्रिस्ताद्वारे त्याची होणारी पूर्ती यासबंधी बोध करतात. आजच्या शुभवर्तमानाचा मुख्य नायक योहान बाप्तिस्ता आम्हां प्रत्येकाला आपला आंतरिक पश्चाताप हा आपल्या बाह्यवर्तुनुकीतून दिसून यावा असा आग्रह धरत आहे.
प्रत्येक संताला त्याचा भूतकाळ आणि पाप्याला त्याचा भविष्यकाळ कारणीभूत असतो. म्हणून येशूच्या पुनरागमनासाठी आपली अंतकरणे शुद्ध करून आशेचा सूर्योदय आपल्या जीवनात व्हावा अशी प्रार्थना करूया.

सम्यक विवरण

पहिले वाचन: यशया ११:१-१०

ख्रिस्ताच्या आगमनाची पूर्वतयारी करण्यासाठी ख्रिस्तसभा आगमन काळातील चारही आठवड्यात यशया संदेष्ट्याने केलेल्या भाकितावर मनन चिंतन करण्यास पाचारण करीत आहे. देवाने निवडलेल्या लोकांत त्यांच्या पुढाऱ्यांच्या गैरवर्तणुकीने असंतोष पसरला होता. काहींनी तर परप्रत्येयन बुद्धीचा स्विकार केला होता. पुढाऱ्यांच्या गैरवर्तणुकीत सामील होऊन त्यांनी यहोवाविरुद्ध दुराचार केला. हे भाकीत यशयाने येशू जन्माच्या ७०० वर्षाअगोदर केले होते. हे भाकीत देवाने त्याच्या लोकांशी केलेल्या कराराची आणि वचनांची स्मरणिका होती. तसेच देव त्याने दिलेले वचन पूर्ण करतो ह्याची स्पष्टोक्ती होती.
यहोवा एके दिवशी न्यायाने वागणारा, देवाच्या आज्ञा पाळणारा राजा त्याच्या लोकांवर नेमिल, जो देवाच्या आत्म्याने परिपूर्ण असेल. असा जो राजा येणार होता तो सर्वांसाठी (फक्त निवडलेल्या लोकांसाठी नव्हे) शांतीचे राज्य प्रस्थापित करेल. ह्यात ज्यू अणि परराष्ट्रीय ह्यांचादेखील समावेश केला जाईल.
इशाया दावीद राजाचा पिता होय. त्याच्याच वंशातील राजांनी यहुदावर ५०० वर्ष राज्य केले. दावीद राजानंतर राज्य करणारे राजे देवाशी अविश्वासुपणे वागले व त्या कारणास्तव ह्या घराण्याचा ऱ्हास झाला. हा ऱ्हास एका झाडाच्या बुंध्याप्रमाणे होता आणि आता त्याचा बुंध्याला देवा म्हणतो धुमारा (नवीन कोंब) फुटेल. त्याच्या मुळातून फुटलेली शाखा म्हणजेच ‘मसीहा’ (तारणाऱ्या)ची वैशिष्टे वा लक्षणे आहेत. त्याच्या अंगी सुज्ञानाचा, समंजसपणाचा, सुसंकल्पाचा, सामर्थ्याचा व परमेश्वराच्या भयाचा आत्मा असेल म्हणजेच तो असाधारण कृपांनी मानव रुपात अवतरेल.
     त्याच्यावर असलेल्या ह्यासर्व असाधारण कृपा त्यास गरिबांवर झालेला अन्याय दूर करून त्यांस न्याय मिळवून देण्यास समर्थ करतील. त्याने प्रस्थापित केलेल्या साम्राज्यात परिपूर्ण शांतता असेल. ही शांतता, ऐक्य फक्त मानवांमध्ये नसेल तर पृथ्वीवर देवाने निर्माण केलेल्या सर्व पशु, पक्षी, प्राणी ह्यांमध्येही हे स्पष्ट दिसून येईल. प्राण्यातील ऐक्य लक्षात घेता हे एक काव्यात्मक वर्णन असून वास्तविकता फार दुर्मिळ आहे आणि वैचारिक वर्ग (मानव) लक्षात घेता ह्या नवयुगाची संकल्पना स्वर्गाची आहे, तेथे हे सर्व पूर्णत्वास येईल. येशू ख्रिस्ताला जे स्वीकारतात त्यांसाठी तो सार्वकालिक गौरवाचा उगम आहे त्याच्याठायी ज्यू आणि परराष्ट्रीय एकत्र येतील.

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र १५:४-९.

प्रस्तुत उताऱ्यात संत पौल नव-धर्मांतर केलेल्या रोमवासियांना बोध करत आहे; ह्यापैकी बरेच ज्यू-पंथीय होते. तो त्यांना सांगू इच्छितो कि, पवित्र शास्रात प्रोत्साहन आणि आशेच्या शिकवणुकीचा उगम होतो. ख्रिस्ताच्या आगमनाने अब्राहम आणि त्याच्या उत्तराधिकाऱ्याना (वंशजाना) दिलेले वचन पूर्णत्वास येते. येशुख्रिस्त हा निवडलेल्या लोकांचा गौरव आहे; त्यांनी प्रलंबित मसिहाच्या आगमनाच्या शतकोत्तर तयारीचे हे त्यांस मिळालेलं फळ होते. ख्रिस्ताने सर्वांवर (परराष्ट्रीय न वगळता) देवाच्या ज्ञानाचा आणि खऱ्या जिवंत देवाच्या आशीर्वादाचा वर्षाव केला. त्यामुळे ख्रिस्तात सर्व बंधूभगिनी एक असून कोणी ज्यू व परराष्ट्रीय असा नाही.
     नव-धर्मांतरितांमध्ये (ज्यू आणि परराष्ट्रीय) मतभेद निर्माण झाले होते. नव-धर्मांतरित ज्यू परराष्ट्रीयांची अवहेलना करत असे. कारण त्यांच्या दृष्टीने त्यांना देवाचे प्रकटीकरण झालेलं होते आणि हे त्यांच्या शास्रातही आढळते. परंतु संत पौल ह्याला वाचा फोडतो व ‘ख्रिस्तामध्ये कोणीही ज्यू वा परराष्ट्रीय नाही तर सर्व एक आहेत. ख्रिस्ताने ही दरी भरुन काढली आहे’ असे त्यांस सांगतो. सर्वांनी एकत्र येऊन देवपित्याची स्तुती, आराधना करावी कारण त्यानेच आपणा सर्वांना त्याच्या पुत्राद्वारे दत्तक घेतले आहे. येथे ‘देवाची खरी दैविकता’ व ‘ख्रिस्ताची खरी मानवता’ हे ख्रिस्ती धर्माचे सार आहे हे आपल्यास दर्शवून देण्यात आले आहे. आणि हाच आपल्या ख्रिस्ती धर्माचा मुळ पाया होय. उत्पत्ती १२:३ ‘तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुले आशीर्वादित होतील’. ह्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे आणि ख्रिस्ताने ज्यू लोकांत आब्राहमास वचन दिल्याप्रमाणे ‘मानवदेह’ धारण केला. परंतु त्याच्या प्रेमाचा, आत्मत्यागाचा अनुभव/प्रभाव फक्त आब्राहमच्या उत्तराधिकाऱ्यांसाठी नव्हता तर सर्वांसाठी खुला होता. ह्यास दुजोरा देण्यासाठी संत पौलाने स्तोत्र १८:५५ हा संदर्भ दिला आहे ज्यात ‘परराष्ट्रीयांमध्ये मी तुझे स्तवन करील व  तुझ्या नावाचे स्तोत्र गाईल’ असे म्हटले आहे. ह्याद्वारे देवाच्या तारणकार्यात परराष्ट्रीयांचा समावेश आहे हे साध्य होते.

शुभवर्तमान: मत्तय ३:१-१२.

आजच्या शुभवर्तमानात वर्णन केल्याप्रमाणे घडण्याअगोदर साधारणत: ३० वर्षांपूर्वी देवदुताने जखऱ्या नामक वेदिसेवकाला (धर्मगुरु) पुत्र प्राप्तीचे भाकीत केले होते. हा त्याच्या पुत्राला शतकोत्तर अपेक्षित असलेल्या मसीहाचा (तारणाऱ्या) पूर्वाधिकारी होण्यास व त्याच्या आगमनापूर्वीची तयारी करण्यास निवडले होते. देवदुताने “योहान” हे त्याचे नाव त्याच्या जन्मापूर्वीच निश्चित केले होते. त्याने वैराग्याचे जीवन स्वीकारून वाळवंटात वसती केली. सोपवलेल्या अत्युच्च कार्यासाठी तत्पर असताना जेंव्हा त्यास मासिहाच्या आगमनाचे प्रकटीकरण झाले तेंव्हा तो यार्देन नदीच्या काठावर येऊन लोकांना “पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे” अशी घोषणा करू लागला. ह्यायोगे तो लोकांना मसिहाच्या आगमनासाठी सिद्ध असण्यास सांगत होता. स्वर्गाचे राज्य येशूख्रिस्त पृथ्वीवर स्थापणार होता परंतु त्याची पूर्ती आणि परिपूर्णता ही स्वर्गात होणार आहे. यशया ४०:३ ‘परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, त्याच्या वाटा नीट करा हा संदर्भ ज्यू लोकांना उद्देशून केला होता. त्यांनी वाळवंटातून भविष्यात येणाऱ्या तारणाऱ्या राजासाठी मार्ग तयार करावा असे त्यांस आवाहन केले होते.
     योहानाच्या यार्देन नदीच्या काठावर झालेल्या आगमनाच्या सुवार्तेने सर्व लोक त्याच्याभोवती पापमुक्तीसाठी त्याने दिलेला बाप्तिस्मा हा ख्रिस्ताने स्थापन केलेल्या साक्रमेंताप्रमाणे नसून फक्त बाह्यशुद्धी असून पश्चातापाचे एक प्रतिक तसेच पापापासून दूर राहण्याचा निर्धार होता. परुशी व सदुकी हे त्या काळात अस्तित्वात असलेले धार्मिक संघ होते. परुशी हे मोशेने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करणारे होते परंतु त्याचं हे धार्मिक कार्य त्यांच्या गर्वामुळे धुळीस मिळाले होते (लुक १८:९-१४). सदुकींचा विशेष कल धार्मिकतेकडे नसून राजकारणाकडे होता. त्यांचा पुनरुत्थानावर तसेच इतर रूढी व परंपरा जे परुशी पाळत त्यावर विश्वास नव्हता.
बाप्तिस्मा करणारा योहान त्यांना सांगतो कि, आब्राहामाचे उत्तराधिकारी असल्याचा मान तसेच निवडलेल्या लोकांत त्यांचा असलेला नाममात्र समावेश त्यांचे तारण करू शकत तर त्यासाठी त्यांनाही पश्चाताप करून आत्मशुद्धी करावी  लागेल. देव नवीन निवडलेल्या लोकांचा समूह प्रस्थापित करील आणि ह्याची पूर्ती झाल्याची आपल्याला शुभवर्तमानात आढळून येते. योहान हे जाणून होता कि, तो फक्त ‘मसिहाचा’ एक पूर्वाधिकारी आहे आणि त्याने दिलेला बाप्तिस्मा ज्यांनी स्वीकारला तो त्यांच्या वैयक्तिक विश्वासावर अवलंबून होता. आणि त्यात दैवी प्रभाविकता नव्हती. परंतु त्याच्या नंतर येणारा जे त्याचा स्विकार करतील त्यांची खरोखर पापांपासून सुटका करून त्यांना देवाचा पवित्र आत्मा बहाल करील. योहानाची लीनता त्याला तो सामान्य, अपात्र असल्याची जाणीव करून देते. मसीहा योग्य तो न्याय करून चांगल्या मधून वाईट बाजूला करून त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांची स्वर्गराज्यासाठी निवड करील.

मननचिंतन:

योहान बाप्तीष्टाचा उदय हा ज्यू पंथीय लोकांसाठी देवाचा अचानक आलेला ध्वनीनाद होता कारण ४०० वर्षे त्यांनी कोणत्याही संदेष्ट्याचे आगमन वा वाणी  ऐकली नव्हती म्हणून त्यांनी गृहीत धरले होते कि प्रवक्त्यांची वाणी आता ऐकावयास मिळणार नाही. योहान बाप्तीष्टाची वाणी आणि त्याने सांगितलेला संदेश हा त्यांना अक्षरशः हादरून टाकणारा होता. म्हणून थोडक्यात योहान संदेष्टा आणि त्याने दिलेल्या संदेशावर मनन करूया.
१) त्याने धैर्याने असत्य आणि वाईट विचारांना आव्हान दिले.
(उदा. हेरोद राजाने त्याच्या भावाच्या विधुर पत्नीशी केलेला बेकायदेशीर विवाह) सदुकी आणि परुशी ज्याप्रमाणे जंगलात वनवा लागल्यावर सर्व प्राणीमात्र आपला जीव वाचवण्यासाठी जसे सुरक्षित स्थळी येतात. अगदी त्याच प्रकारे सदुकी आणि परुशी आले होते म्हणून त्यांना तो “सापाच्या पिल्लांनो” अशी उपमा देतो. कारण त्यांची अनिती योहानास ठाऊक होती. तो अंधारात लावलेल्या दिव्याप्रमाणे होता. तो परखडपणे बोलत असे. सत्य हे आंधळ्यास डोळस करतात हे त्यास ठाऊक होते. आज जगातील दुर्लक्षित, उत्पीडीत अशा लोकांची मुखवाणी होणे ही काळाची गरज आहे. आपल्या समाजात गरीब कमकुवत लोकांची अवहेलना केली जाते. आजची शोकांतिका हीच आहे कि, ‘आपला देश वाईट लोकांमुळे नाही तर चांगल्या लोकांच्या दुर्लक्षतेमुळे शोषित झाला आहे’ कारण ते अनितीविरुद्ध आवाज उठवत नाही. अन्यायाला सत्याने वाचा फोडणे हे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीचे कर्तव्य होय.
२) अनेकांना त्याने नितीमात्वासाठी पाचारण केले.
योहानाच्या संदेशात फक्त अवहेलना किंवा नकारात्मक वृत्ती नव्हती तर सकारात्मक दृष्टिकोनातून त्याला देवाच्या नैतिकतेचा शिखर गाठायचा होता. फक्त वाईट कृत्यांबद्दल त्यांना दोषी न ठरवता त्यांच्यामध्ये नैतिकतेची गोडी निर्माण  करण्याचा प्रयत्न त्याने केला. जे देवाच्या दृष्टीचे योग्य ते करावयास त्यांना भाग पाडले. त्याचे हे आव्हान लोकांनी स्वीकारले कारण तो स्वत: त्यांच्यासाठी एक नीतिमान आदर्श होता. ‘बोले तैसा चाले त्याची वंदावे पाऊले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा’. बऱ्याचदा आपल्या समाजातील नेते पुढारी तत्ववेत्ते आपण काय करू नये ह्याविषयी भाषणे देतात परंतु त्याऐवजी काय करावे ह्यावर जर भर दिला व नैतिकतेचा आदर्श डोळ्यांसमोर असेल तर प्रवचने करण्याची गरज पडणार नाही. संत फ्रान्सिस असिसिकर म्हणतात, ‘सदोदित उपदेश देत राहा आणि गरज पडेल तरच शब्दांचा वापर करा’. म्हणजे आपले जीवन हेच इतरांसाठी प्रवचन बनावे.
३) योहान देव-प्रेरित होता. तो अरण्यातून आला होता.
योहान देवाचा संदेशवाहक होता. हा संदेश आत्मसात करण्यासाठी त्याने अरण्यात बरीच वर्षे आंतरिक तयारी करण्यात घालवली होती. लोकांच्या पुढ्यात येण्यापूर्वी त्याने बराच काळ देवाच्या सानिध्यात घालवला. म्हणूनच त्याच्या संदेशात आत्मियता होती. अब्राहम लिंकन म्हणतात, ‘मला जर एखादे झाड कापावयास सहा तास दिले तर त्यातील पहिले चार तास मी कुऱ्हाडीला धार लावण्यात घालवेल: जेणेकरून मी ते झाड कमी वेळात व अल्पशा शक्तीत कापू शकेन’. अगदी त्याचप्रकारे प्रवचनातून व्यर्थ वाचाळता करून देव-भाव मांडण्याऐवजी जर आपण देव-प्रेरित असू तर ते अधिक प्रभावी ठरते.
योहान बाप्तीस्ता हा देवाचा निवडलेला अनन्यसाधारण व्यक्ती होता हे त्याने प्रत्यक्षात उतरविलेल्या संदेशावरून व वर थोडक्यात मांडलेल्या तीनही मुद्यावरून स्पष्ट होते. त्याने घडवून आणलेला बदल हा जनतेच्या भल्यासाठी होता व त्यात कोणताही ध्वंद्वं असा स्वार्थ नव्हता. तो सर्व ख्रिस्ती बंधुभगिनींसाठी आदर्श आहे. आपण ख्रिस्ती लोकांनी आज ख्रिस्त आपल्या जीवनाद्वारे प्रकट करणे आवश्यक आहे. दारिद्र्य, उत्पीडीत लोकांची वाणी बनणे आज काळजी गरज बनली आहे. आपल्यासमोर नेल्सन मंडेला, मार्टिन ल्युथर किंग ह्यांच्यासारख्या महात्म्यांचे सोदाहरण आहे तेच आपण अंगीकारूया. त्यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता अन्यायाविरुद्ध आवाज उठविला आणि समाजात बदल घडवून आणला. प्रत्येक जण बदल घडवून आणू शकतो हेच आपण आपल्या मनी आज बिंबवूया आणि प्रभू आगमनासाठी सिद्ध असूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभो तुझ्या पुनरागमनासाठी आम्हांस सिद्ध कर.
१. अखिल ख्रिस्ती विश्वाची धुरा वाहणारे आपले परमगुरु फ्रान्सीस व विविध पदांवर कार्यरत असलेले त्यांचे पदाधिकारी ह्यांनी अखिल मानवजातीला प्रभूच्या आगमनासाठी त्याच्या जीवनकार्याद्वारे सिद्ध करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपल्या भारत देशातील राजकीय पुढाऱ्यांनी जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करावी व स्वत:चा स्वार्थ बाजूला ठेवून जनतेची निस्वार्थपणे सेवा करावी आणि देशाला प्रगतीपथावर न्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आपल्या समाजात दीन-दलितांसाठी, उत्पिडीत व दारिद्र्यात जखडलेल्यांसाठी कार्यरत असलेल्या समाजसेवकांनी हालअपेष्टा सोसत असलेल्यांची मुखवाणी बनावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने योहान बाप्तीष्टाप्रमाणे देवाचा संदेश आत्मसात करून जगात घडत असलेल्या अत्याचाराला, अन्यायाला वाचा फोडावी व न्यायासाठी खोळंबलेल्यांना न्याय मिळवून द्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. वैयक्तिक व कौटुंबिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.


1 comment:

  1. good homilies brothers. Keep it up....thanks for emailing them to me....i do read and use them if have to preach....you are doing good job...My prayers and best wishes are always with you....drink the word of God to be shared with thirsty world....

    ReplyDelete