Thursday 21 December 2017

Reflection for the Homily of 4th Sunday of Advent (24-12-2017)  By Br. Godfrey Patil. 
              
आगमन काळातील चौथा रविवार


दिनांक: २४-१२-२०१७ 
पहिले वाचन:  २ शमुवेल ७:१-५८ब-१२,१४अ,१६.
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र १६:२५-२७.
शुभवर्तमान:  लुक १:२६-३८.






“पहा मी प्रभूची दासी आहे”.


प्रस्तावना:

 आज आपण आगमन काळातील चौथ्या आठवड्यात पदार्पण करीत आहोत. यापूर्वीच्या तीनही आठवड्यात ख्रिस्तसभेने आपणांस वेगवेगळ्या वाचनांद्वारे येशूच्या आगमनाची आंतरिक तयारी करावयास पाचारिले आहे; तसेच आजची उपासना सुद्धा आपणा सर्वास आपल्या हृदयात येशुसाठी योग्य जागा तयार करण्यासाठी बोलावीत आहे.
आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो की, दाविद राजाला परमेश्वरासाठी भव्य दिव्यमंदिर उभारायचे होते परंतु परमेश्वर ते त्याच्या पुत्राद्वारे करून घेईल. तो पुत्र दाविद वंशातील असेल व त्याचे राज्य अनंतकाळ टिकेल असे नाथन संदेष्ट्याद्वारे सांगतो. दुसऱ्या वाचनात संत पौल रोमवासियांना श्रद्धा बाळगण्यास व देवाच्या आज्ञेचे पालन करण्यास आवाहन करत आहे. तर शुभवर्तमानात मरिया ही कुमारिका, देवशब्दावर विश्वास ठेऊन व देवाची इच्छा स्वीकारून ईशपुत्राला स्वत:च्या उदरात मानवरूप देण्यास स्व:च्छेने होकार देते.
ज्याप्रमाणे मरीयेने तिचे उदर व सर्वस्व येशुजन्मासाठी समर्पित केले, त्याचप्रमाणे आपणही प्रभूस्वागतासाठी आपली हृदये शुद्ध करूया व ईश्वराची ईच्छा सर्वस्वी स्वीकारण्यास लागणारी कृपा या मिस्साबलीत मागुया.

पहिले वाचन: २ शमुवेल ७:१-५; ८ब,१२;१४अ,१६.

शमुवेलाला परमेश्वरासाठी अतिशय भव्य आणि दिव्य असे मंदिर, देवस्थान बांधावयाचे होते परंतु परमेश्वर त्यास नाथान संदेष्ट्याद्वारे संदेश पाठवतो; तो म्हणतो, तूला माझ्यासाठी मंदिर बांधण्याची गरज नाही, ते तुझ्या पुत्राद्वारे उभारले जाईल. त्याचे राज्य, राजासन अनंतकाळ टिकेल. तो माझा पुत्र व मी त्याचा पिता होईन.

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र: १६:२५-२७.

संत पौल रोमकरांना आत्तापर्यंत गुपित ठेवलेले रहस्य उलगडण्यात येईल व ते पूर्णत्वास नेले जाईल असे सांगत आहे. त्यासाठी विश्वासात्मक आज्ञाधारकपणा बाळगणे गरजेचे आहे.

शुभवर्तमान: लुक: १ :२६-३८.

एलिजाबेथ सहा महिन्यांची गर्भवती असतानाच गब्रिएल दूताने नाझरेथ या गावी राहणाऱ्या मरिया नावाच्या कुमारिकेला पुत्रप्राप्तीची घोषणा केली. दूताच्या ह्या संदेश कार्यात विभिन्नता दिसून येते: वृद्ध पुरुष, नवतारुण्यातील स्त्री, धर्मगुरू, व नाझरेथ इत्यादी.
 यहुदी प्रांतातील लोक, गालीली प्रांतात असलेल्या यहुद्यांना अतिशय हीन दर्जाची वागणूक देत असत. कारण ते गालीलीसारख्या परप्रांतीयांशी संबध ठेवत असत. ते विशेषतः नाझरेथवासीयांना तुच्छ मानत असत, परंतु परमेश्वराने त्याच नाझरेथ गावातील कुमारिकेला तारणाऱ्या मसिहाची आई होण्याचा मान दिला.

मरीयेचा परिचय:
मरिया यहुदी आणि दाविदाच्या घराण्यातील एक कुमारिका होती. योसेफ नावाच्या पुरुषाला वाग्दत्त होती. दोघांचेही राहणीमान अतिशय गरीब व कनिष्ट दर्जाचे होते (लुक.२:२४). यहुदी लोकांत वाग्दत्त हा विवाहाप्रमाणेच मानला जाई व त्यातून विभक्त होण्यासाठी काडीमोड हाच एक उपाय होता. यहुदी लोकांत मुलीचा लहान वयातच विवाह योजला जाई, आणि मरिया त्यासाठी अपवाद नव्हती.
गब्रीएल दूताच्या विस्मयबोधित उद्गारांनी ती गोंधळून गेली व तिच्या मनात भीतीही निर्माण झाली. हे कृपा पावलेले स्त्रिये! प्रभू तुजबरोबर आहे.अश्या उद्गाराने दुताने तिला का संबोधावे?  कोणत्या अनुषंगाने ती कृपा पावलेली स्त्री होती?  कोणत्या दृष्टीने देव तिच्या बरोबर होता? ह्याचे तिला आश्चर्य वाटले. मरीयेच्या प्रतिसादात आपल्याला तिच्या नम्रतेची व सभ्यतेची जाण होते. स्वर्गातील दूताने तिच्यासाठी विशेष अशी कृपाआणावी,  हे तिच्या कधी ध्यानी-मनी नव्हते. ईशज्ञान पदवीधारकांनी कल्पिल्याप्रमाणे जर ती एक खरोखर अनन्यसाधारण स्त्री असती तर ती अश्या प्रकारच्या उद्गारांनी गोंधळली नसती; परंतु तिला ही एक मोठी आश्चर्याची बाब होती.  त्यावरून ती एक साधारण कुमारिका होती हे स्पष्ट होते. दूताने तिला शुभवार्ता सांगितली: ती एका तारणा-याची आई होईल ज्याचे नाव येशू असे ठेवण्यात येईल (यहोवा- तारणारा). येथे गब्रीएल दूताने येशूचे दैवी तथा मानवी अशी दोन्ही रूपे घोषीत केलेली आहेत. दैवी म्हणजेच परमोच्च देवाचा पुत्र. व मानवी म्हणजेच मरीयेचा सुपुत्र. आम्हासाठी बाळ जन्माला आहे (मानवी रूप) आम्हास पुत्र (दैवी रूप) लाभला आहे. येशू या भूतलावर एक तारणारा व स्वर्गीय पित्याची योजना पूर्णत्वास नेण्यासाठी अवतरला तो स्वर्गातील राजासनावर बसलेला आहे.
मरियेला काय घडणार आहे हे सर्व ठाऊक होते परंतु ते कशाप्रकारे घडेल ह्याची जाणीव नव्हती. तिने विचारलेला प्रश्न हे कसे होईल?  हा तिचा अविश्वासुपणा नव्हता तर तो प्रश्न तिच्या विश्वासाला शब्दरूप देणारा होता, तिच्या विश्वासात तिला तो दृढ करणारा होता. मरीयेची ईशवचनावर दांडगी श्रद्धा होतीच परंतु ते कोणत्या प्रकारे पूर्णत्वास येणार याची कल्पना नव्हती.   
 प्रथमत: गब्रीएल दूताने सांगितल्याप्रमाणे हा पवित्र आत्म्याचाच एक अविष्कार होता. जरी येशू, योसेफ व मरिया यांच्या शारीरिक संबंधातून नव्हता, तरीही नैतिकदृष्ट्या तो योसेफ (ज्याच्याशी मरीया  वाग्दत्त  होती) याचा पुत्र म्हणून ओळखला जाणार होता. परंतु गब्रीएल दूताने तिला येशूच्या पावित्र्याची कल्पना अगोदरच दिली होती, त्यामुळे येशू मानवी पापापासून वंचित राहील हे तिला ठाऊक होते. येशूला पाप ठाऊक नव्हते त्याने पाप केले नाही तो पापापासून वंचितच होता.
मरीयेच्या विश्वासपुर्ण प्रतिसादातून ती देवाची आज्ञाधारक व नम्र दासी होती हे दिसून येते. त्यामुळेच तिला देवाची आई होण्याचे भाग्य लाभले. मरीयेने स्वत:ला दासीचीउपमा दिली. दासीला समाजामध्ये अतिशय कनिष्ठ दर्जाचे स्थान होते व आहे. यावरून तिने देवशब्दावरील दाखविलेल्या श्रद्धेची, विश्वासाची प्रचीती येते. अश्याप्रकारे तीने स्वत:ला देवकार्यासाठी सर्वस्वी अर्पण केले.

बोधकथा:

फ्रान्सीस नावाचा अतिशय श्रीमंत मुलगा होता. त्याला स्वत:ला आणि आईवडिलांना त्याचा गर्व वाटावा असे काहीतरी करायचे होते. यास्तव सेनाधीपती बनून समाजात प्रतिष्ठा मिळवायच्या उद्देशाने धर्मयुद्धात सामील झाला. धर्मयुद्धासाठी जात असतांना वाटेत त्याला देवाची हाक ऐकू आली,  ‘तुला धन्याची चाकरी करायची आहे की सेवकाची?’ त्यावर फ्रान्सीस उद्गारला, ‘धन्याची’. फ्रान्सीसने देवाची इच्छा जाणून घेण्यासाठी विचारले, ‘देवा मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?’ फ्रान्सीसचे संपूर्ण जीवन ह्याच एका वाक्यावर आधारलेले होते. तो ख्रिस्तासाठी दीन झाला व देवाच्या उदारतेवर विसंबून तो प्रतिख्रिस्त बनला. देवाची इच्छा स्वीकारून  संपूर्ण जीवन तो ख्रिस्तमय होऊन जगला. त्याचप्रकारे मरीयेनेही देवाची ‘इच्छा’ स्वीकारून देवाची आपल्यासाठी असलेली योजना पूर्णत्वास आणली.

मनन चिंतन:

पहा मी प्रभूची दासी आहे.लुक: १:२६-३८.

या भौतिक जगात स्व-इच्छा सोडून दुसरी कोणतीही गोष्ट आपल्या मालकीची नाही. तीच स्व-इच्छा मरीयेने परमेश्वराठायी अर्पिली. मरीयेचा होकार खरोखर मानव कल्याणासाठी एक साक्षात्कारच ठरला. मरिया एक देवभिरू व देववचनावर विश्वास ठेवणारी कुमारिका होती. आर्चबिशप फुल्टन शीन ह्यांच्या शब्दांत सांगायचे झाले तर, ‘मरीयेच्या स्व-इच्छेने व स्व:खुषीने देवशब्दाला दिलेला प्रतिसाद हा देवाने मानवाच्या तारणासाठी आखलेल्या योजनेचा सूर्योदय होता.’ ते पुढे म्हणतात, ‘परंतु परमेश्वराला मानव तारणास मानवीच पुत्र हवा होता. ह्यास्तव त्याने मनुष्याला दिलेले स्वातंत्र्य धीक्कारायचे नव्हते’. देवकार्य हे हुकुमशाही सारखे ‘हम करे सो कायदा’ असे नव्हे, तर आपणाबरोबर सहकार्याचे होय. कारण संत अगुस्तीन म्हणतात, ‘ज्या परमेश्वराने आम्हाला आपल्या परवानगीशिवाय निर्मिले तो परमेश्वर आपल्या सहकार्याशिवाय आपल्याला वाचवू शकत नाही किंवा आपले तारण करू शकत नाही’.
 मरीयेचा होकार हा ‘दैवी कृपा आणि मानवी सहकार्य’  या उक्तीप्रमाणे होता. येथे मसीहाला मरीयेच्या उदरी मानवरूप देऊन ईश्वराने नवीन कालखंडच सुरु केला. जुन्या करारात एदेन बागेत ‘एवा’ ही मानव उद्धाराची कलंक बनली तर नव्या करारातील ‘एवा’  ही एक मानव उद्धाराची निष्कलंक जननी बनली.
      आजची तिन्ही वाचने मरीयेच्या जीवनाशी अगदी समर्पक आहेत. पहिल्या वाचनात दावीद राजाला भव्यदिव्य मंदिर उभारायचे होते. आणि मरिया स्वत: परत्पाराच्या पुत्रास्तव एक देवस्थान बनली. तीचा उदर कराराचा कोश झाला. दुसऱ्या वाचनात संत पौल विश्वासात्मक आज्ञाधारकपणा विषयी बोलतो. मरीयेचा विश्वासात्मक आज्ञाधारकपणा तिच्या सकारात्मक कृतीतून,  प्रतिसादातून दिसून येतो. शुभवर्तमानात प्रथमत: मरीयेचा प्रश्न ‘हे माझ्या बाबतीत कसे घडेल?’ हा तिच्या मनातील संकोच दर्शवितो परंतु तो तिचा अविश्वासुपणा नसून एक स्वाभाविक शंका होती कारण ती एक कुमारिका होती. देवाने आखलेली मानवी तारणाची योजना पूर्णत्वास येईल हे तिला ठाऊक होते परंतु कश्याप्रकारे होईल हिचे तिला ज्ञान नव्हते. यहुदी समाजातील स्त्रीचे स्थान हे अतिशय कनिष्ठ व नीच दर्जाचे होते. अविवाहित आई होणे तर समाजाला, कुटुंबाला काळीमा फासण्यासारखे होते. तरीही कठोर व स्त्री-जातीविषयी निर्दयी असलेल्या समाजाला न जुमानता ती परमेश्वराची ईच्छा हेच प्रमाण मानून ती देवास ‘हो’ म्हणण्यास पुढे सरसावते.
मरिया स्वत:ला दासीची उपमा देते ‘पहा मी प्रभूची दासी आहे’. दासी म्हणजे समाजातील न गणलेली व्यक्ती. दासीला अतिशय हिनवाणी वागणूक दिली जाई. येथे ‘दासी’ ह्या प्रतिमेद्वारे मरीयेचा नम्रपणा व लीनता दिसून येते. कारण तीला ठाऊक होते, ‘जो स्वत:ला नमवितो तो उंचाविला जाईल’, म्हणूनच ती म्हणते, ‘या दासीच्या लीनत्वाला प्रभूने उंचाविले अती’.
      अश्याप्रकारे मरिया एक साधारण देवभिरू स्त्री देवासाठी अनन्यसाधारण माता बनली. मरीयेचा प्रतिसाद सर्व मानवजातीला आदर्श बनला आहे. देव त्याची ईच्छा पूर्ण करण्यास सदैव कृपाशक्ती देत असतो. परमेश्वर आम्हा प्रत्येकाला,  आपल्याला दिलेल्या स्वातंत्र्यात, त्याची ईच्छा पूर्ण करण्यास पाचारीत असतो. आम्ही कोणत्या प्रकारे देवाच्या हाकेला प्रतिसाद देतो? संत इरेनिअस म्हणतात, ‘देवाने या भूतलावर दोन हजार वर्षापूर्वी एकदाच गाईगोठी जन्म घेतला परंतु तोच देव आता आपल्या हृदयात वास करू इच्छितो.’ ज्याप्रमाणे मरीयेने आपले उदर व सर्वस्व प्रभूसाठी देवस्थान केले,  त्याचप्रमाणे आपणही आपली अंतकरणे प्रभूजन्मासाठी पापमुक्त करूया आणि आपले शरीर पवित्र आत्म्याचे मंदिर आहे हे सिद्ध करूया.
 असे म्हणतात, ‘टाकीचे घाव सोसाल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही’. जर दगडाने स्वत:वर छीनीचे घाव सोसावयास नकार दिला तर त्या मूर्तिकाराच्या मनात असलेली मूर्ती त्या दगडावर कधीच उमटू शकत नाही. दगड स्वत:ला त्या मूर्तिकाराच्या हातात पूर्णत: सोपवितो व त्याच्या मनातील त्या दगडाबाबत असलेल्या ईच्छेस होकार देतो, तेव्हाच आपण त्या दगडामधून सुंदर अशी कोरीव देवमूर्ती पाहू शकतो, थोडक्यात त्याला देवपण प्राप्त होते.
मरीयेनेही स्वत:ची ईच्छा मूर्तिकाराच्या (देवाच्या) हातात सोपवली,  त्यामुळेच देवाची मरीयेबाबत असलेली ईच्छा, योजना साकार होऊ शकली.
ज्योती तू अंधाराची प्रकाशमय झालीस जगताला
रजनी तू मायेची मातृत्वाची जान दिलीस ख्रिस्ताला.
रत्न सागरातून निघालेल्या नक्षत्रा पेक्षा हि सुंदर तू
दु:खाने भरलेली मातृत्वाने कोरलेली स्त्रीयामध्ये धन्य तू.

श्रद्धावंतांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभू आमची हृदये तुझ्या स्वागतासाठी शुद्ध कर.

१. आपले परमगुरूस्वामी, सर्व महागुरू, धर्मगुरू व व्रतस्थ बंधूभगिनी यांनी परमेश्वराची ईच्छा शिरोभागी ठेऊन त्यांच्यावर सोपविलेल्या जबाबदारीत एकनिष्ठ राहावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपल्या धर्मग्रामातील प्रत्येक कुटुंबाने व कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने या आगमनकाळात आपली हृदये प्रायश्चित संस्कार घेऊन शुद्ध करावीत व प्रभूस्वागतासाठी सज्ज असावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या सर्व व्यक्तींना प्रभूच्या दैवी स्पर्शाचा सात्विक अनुभव यावा आणि त्यांना त्यांच्या वेदना सहन करण्यास शक्ती व सामर्थ्य मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. ‘पिक भरपूर आहे परंतू कामकरी थोडेच आहेत’ म्हणून मरीयेचा आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन अनेक तरुण तरुणींनी ईश्वराच्या हाकेला प्रतिसाद देऊन प्रभूमळ्यात सेवा करण्यास स्व-ईच्छेने पुढे यावे,  म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आता थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक गरजा प्रभूचरणी मांडूया. 


No comments:

Post a Comment