Thursday, 28 December 2017

Reflections for the feast of Holy Family (31-12-2017) by Br Jackson Nato.



पवित्र कुटुंबाचा सण


दिनांक: ३१-१२-२०१८
पहिले वाचन : बेन्सिराची बोध वचने ३:२६;१२-१४
दुसरे वाचन : कलस्सैकरांस पत्र ३:१२–२१
शुभवर्तमान : लुक २:२२–४०








प्रस्तावना :

     आज आपण येशू, योसेफ आणि मरिया ह्यांच्या ‘पवित्र कुटुंबाचा’ सण साजरा करित आहोत. येशू, योसेफ आणि मरिया ह्यांचे जीवन हे सर्व कुटुंबांसाठी प्रेरणादायी कुटुंब आहे म्हणूनच देऊळमातेने आपणासमोर हे ‘पवित्र कुटुंब’ ठेवले आहे.
     आजचे पहिले वाचन बेन्सिराची बोध वचने ह्या पुस्तकातून घेतले आहे. मुलांनी आपल्या आई-वडिलांचा मान कसा राखावा ह्याबद्दल हे पुस्तक आपणास सांगते. कारण असे केल्याने आपण सर्व देवाच्या कृपेस पात्र ठरतो. कलस्सैकरांस लिहिलेल्या आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला अधर्मी मूल्यांपासून दूर राहून ख्रिस्ती मूल्यांचे अनुकरण करण्यास आव्हान करत आहे. तसेच आजच्या लुककृत शुभवर्तमानात आपण पाहतो की योसेफ व मरीयेने मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे येशूला मंदिरात समर्पण करून आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण केल्या.
प्रत्येक ख्रिस्ती कुटुंबाला ‘पवित्र कुटुंबाची’ फार गरज आहे. ज्याप्रमाणे येशू, योसेफ व मरिया ह्यांनी आपले कुटुंब प्रेरणादायी कुटुंब बनवले, त्याप्रमाणे आपण सुद्धा आपले कुटुंब प्रेम व शांतीने भरून ह्या ‘पवित्र कुटुंबास’ साक्ष द्यावी म्हणून परमेश्वराकडे याचना करूया.

सम्यक विवरण:  

पहिले वाचन : बेन्सिराची बोध वचने  ३:२६; १२-१४

ह्या वाचनात आपण पाहतो की ह्या पुस्तकाचा लेखक देवाच्या प्रेमाने भारावून गेला आहे. लेखक हेच प्रेम कुटुंबात प्रकट व्हावे म्हणून बोध करत आहे. लेखकाच्या मताप्रमाणे मानवजातीच्या उद्धारासाठी कुटुंब मुलभूत गोष्ट असून, पित्याला महत्वाचे स्थान दिले आहे कारण पिता कुटुंबाच्या मुलभूत गरजा भागविण्यात महत्वाची भूमिका बजावतो. म्हणून त्याचा आदर करणे हे कुटुंबाची नैतिक जबाबदारी आहे. तसेच आई सुद्धा पित्याच्या गैरहजेरीत महत्वाची भूमिका पार पाडत असते. मुलांचे आईबरोबर घट्ट एकदम जवळचे नाते असते व मुलांची संस्कारमय वातावरणात वाढ व्हावी ह्यास ती प्रथम प्राधान्य देते. ह्या वाचनात लेखक मुलांनी आई-वडिलांचा आदर करावा म्हणून उद्देश करतो. जेव्हा वडील वृद्ध होतात तेव्हाच त्यांना मुलांची खरी गरज भासते. अशावेळी मुलांनी त्यांस प्रेमाने वागवावे, त्यांचा आदर करणे, त्यांच्या वयोमानानुसार आलेल्या मानसिक व शारीरिक आजारात त्यांना सांभाळून घेणे हेच त्यांचे आद्य कर्तव्य आहे. अशी वर्तवणूक देवास खुश करील व देव सर्व प्रार्थनेचे उत्तर आपणास देईल. अशाप्रकारचा बोध लेखक आपल्याला करत आहे.

दुसरे वाचन : कलस्सैकरांस पत्र ३:१२–२१

एपाफास हा संत पौलचा शिष्य होता आणि कलस्सैमध्ये त्याने ख्रिस्ताच्या शिकवणूकीचा प्रचार केला. एक दिवस पौल कैदेत असताना एपाफास पौलला भेटण्यासाठी आला व त्याने तेथे असलेल्या लोकांना शिकवण दिली. कलस्सैमधील ख्रिस्ती लोकांची त्याने पौलकडे तक्रार केली. ह्या तक्रारीस उत्तर म्हणून पौलाने कलस्सैकरांस उद्देशून हे पत्र लिहिले आहे.
संत पौल म्हणतो की, ख्रिस्ताचा स्वीकार केल्याने आपण सर्व नवीन झालो आहोत; नवीन वस्त्र परिधान केले आहेत. ह्याचा अर्थ म्हणजे ख्रिस्ती बनून आपण सहनशिलता, क्षमा व नम्रता ह्या मुल्यांचा स्वीकार केला पाहिजे. ही सर्व मुल्ये प्रेमाने बांधली आहेत म्हणून आपल्या प्रत्येक कृत्यामध्ये ही मुल्ये उठून दिसली पाहिजेत. आपणास जर कोणी विनाकारण इजा पोहोचवत असेल तर त्यांस आपण क्षमा केली पाहिजे. कारण आपल्याला ख्रिस्ताने ह्याचे उदाहरण स्वत: दिले आहे. ख्रिस्ती म्हणून आपले सर्व कार्य हे ख्रिस्ताच्या नावाने करावे ह्याबद्दल संत पौल आपल्याला मार्गदर्शन करतो.

शुभवर्तमान : लुक २:२२–४०

 ह्या शुभवर्तमानात संत लूक मरिया आणि योसेफाने येशूला मंदिरात समर्पण केले व आपली जबाबदारी पूर्ण केली ह्याबद्दल सांगत आहे. यहुदी नियमानुसार प्राणी किंवा मनुष्याच्या उदरातून येणारे पहिले अर्पण देवाला समर्पण करावे लागत असे. पण मनुष्याच्या बाबतीत ह्या नियमातून सुटका करण्यासाठी ‘होमार्पण’ करावे लागे. म्हणून येशूच्या बाबतीत योसेफ व मरीयेने पारव्याचे अर्पण केले. पारवा हे आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या लोकांचे अर्पण होते. ह्यावरून आपल्याला असे दिसते की ते अतिशय गरीबीचे जीवन जगले. पण त्याबद्दल ते असंतुष्ट नव्हते उलट त्यांनी देवाचे आभार मानले. देवाने त्यांचे दु:ख व कष्ट कमी करण्यासाठी काही चमत्कारी कृत्ये केले नाही तर त्या परिस्थिती अनुभवण्यास भाग पाडले.

मनन चिंतन:

 “चार भिंती उभारल्या तर घर बनते, पण जेव्हा चार हात एकत्र येतात तेव्हा कुटुंब बनते आणि जेव्हा हे कुटुंब त्या चार भिंतीत वास्तव्य करते तेव्हा त्या घराला घरपण येते.” एकवेळ कुटुंब चार भिंतीबाहेर आपले अस्तिव टिकून ठेवू शकते पण चार भिंतीचे अस्तिव कुटुंबांशिवाय शून्य आहे. कारण, कुटुंब जीवंत व्यक्तीने बनलेले असते आणि त्या सजीव व्यक्तीचे कार्य अजीव भिंतीस नवजीवन प्राप्त करते. हे आहे कुटुंबाचे सामर्थ्य.
कुटुंबाचे महत्व प्रत्येक मनुष्याच्या जीवनात गरजेचे आहे. कुटुंब बनण्यासाठी तीन घटक अत्यंत गरजेचे असतात. ते म्हणजे आई, वडील आणि मुल. जसे माळेतील मणी एकत्र ठेवण्यासाठी धाग्याची गरज असते तसेच ह्या तीन व्यक्ती बांधण्यास प्रेमाची गरज असते. जर त्यांची हृदये प्रेमाच्या धाग्यांनी विणलेली असतील तर ते एक आदर्श कुटुंब बनते. तेथे एकमेकाप्रित्यर्थ आदर सन्मान असते. एकमेकाविषयी आपुलकी असते. एकमेकांचा स्वीकार करतात आणि अशा कुटुंबाकडे पाहिले तर जगाच्या उज्ज्वल भविष्याची आशा आपल्या हृदयात रुतून बसते. कारण माणसाची बहुतांश जडणघडण ही कुटुंबात होत असते आणि कुटुंबात जे काही शिकतो तेच तो बाह्यजगात प्रदर्शित करतो. म्हणून कुटुंबात चांगले संस्कार होणे गरजेचे आहे. चांगली मुल्ये आत्मसात करणे महत्वाचे असते. ह्या सर्वांची सुरुवात प्रेमाने होत असते. म्हणून जर कुटुंब संस्कारमय असेल तर, समाज संस्कारमय होतो. अशाप्रकारे जगाचे भवितव्य हे कुटुंबावर अवलंबून असते.
     आज आपण पवित्र कुटुंबाचा सण साजरा करीत आहोत. कुटुंब आणि ख्रिस्ती जीवन ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. कुटुंबाशिवाय ख्रिस्ती मुल्यांची जोपासना करणे फार अवघड आहे. देऊळमाता आपल्याला सांगते की, ‘कुटुंब हे एक छोट चर्च आहे’ आणि अशी अनेक कुटुंब एकत्र आली तर धर्मग्राम तयार होते. जर ह्या छोट्या चर्चला तडा गेली तर संपूर्ण देऊळमातेला तडा जाते. म्हणून हे छोटे चर्च मजबूत ठेवणे गरजेचे आहे. पोप फ्रान्सिस कुटुंबांविषयी म्हणतात, “कुटुंब हे आपले सर्वात जवळचे रुग्णालय आहे. जिथे आजाऱ्यांची काळजी घेतली जाते. आपली पहिली शाळा म्हणजे कुटुंब जिथे जीवनावश्यक गोष्टींचे शिक्षण दिले जाते. युवकांच्या प्रत्येक अडचणीचे स्थिर उत्तर मिळण्याचे ठिकाण म्हणजे कुटुंब. वृद्धांचे अतियोग्य घर”. हे वाक्य दैनंदिन जीवनासाठी पात्र ठरते. कारण प्रत्येक आजाऱ्याला कोणीतरी काळजी करणारा हवा असतो. प्रत्येकाला शिक्षणाची गरज असते. प्रत्येक युवकाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर पाहिजे असते. प्रत्येक वृद्धाला साथी हवा असतो आणि ह्या सर्व गरजा भागविण्यासाठी कुटुंबाशिवाय अतियोग्य व्यक्ती दुसरीकडे सापडणे कठीण आहे. आणि ह्या सर्व गोष्टींची जेव्हा कुटुंबात पूर्तता होते तेव्हा त्यांच्यामधील नाते मजबूत होते. अशाप्रकारे ते देऊळमातेच्या मजबुतीस कारणीभूत ठरते.
     कुटुंबाचा अजून एक महत्वाचा भाग म्हणजे ‘जबाबदारी’. कुटुंबातील व्यक्तीची काहीना काही तरी जबाबदारी असते. वडील कुटुंबात आर्थिक हातभार लावतात तर आई जेवण बनविण्यापासून सर्व घरकाम बघते. पण आई वडिलांची सर्वात महत्वाची जबाबदारी म्हणजे त्यांच्या पदरात जी देवाने सुंदर दापत्य दिली आहेत त्यांचे संगोपन करणे. कधी कधी काम आणि मुलांचे संगोपन ह्याचा ताळमेळ साधण्यात आई वडिलांची दमछाक होते आणि मुलांवर दुर्लक्ष होते. अशावेळी आपल्याकडे येणाऱ्या पिढीची जबाबदारी आहे आणि ती आपण कशी म्हणजे योग्यप्रकारे पार पाडली पाहिजे ह्याची स्वत:स आठवण करून दिली पाहिजे. जेव्हा मुले चुकतात, वाईट मार्गाला जातात तेव्हा त्यांची छडी ऐवजी प्रेमाने समजूत घातली पाहिजे. त्यांना जवळ घेऊन चांगले आणि वाईटातील फरक समजावला पाहिजे. असे केल्याने त्यांची काळजी करणारे ते एक चांगले व गुणसंपन्न आहेत, त्यांच्याकडे काहीतरी महान करण्याची क्षमता आहे. ह्यांना पाठींबा देणारे कोणीतरी त्यांचे स्वत:चे आहेत ह्याची त्यांना जाणीव होते व त्या दिशेने पावले उचलण्यास त्यांना दुजोरा मिळतो.
     आपल्या आजूबाजूला आपण खूप कुटुंब पाहतो जी वेगवेगळ्या अडचणीत आहेत. प्रत्येक कुटुंब हे विविध प्रकारच्या त्रासातून जात असते. आर्थिक समस्या, सामाजिक समस्या, आजारपण, वाद, ताणतणाव. अशावेळी आपण पवित्र कुटुंबाकडे पाहिले पाहिजे. येशू ख्रिस्त, मरिया आणि योसेफ हे गरिबीत वाढले. सुताराचे काम करून एक साधेपणाचे जीवन जगले पण अशा परिस्थितीत सुद्धा ते खचले नाहीत. हातावर मोजण्या इतक्या पगारात त्यांनी समाधान मानले व देवाच्या आज्ञेत राहिले. बाळ येशूवर ते चांगले संस्कार करण्यास ते कमी पडले नाहीत. कदाचित येशूला देण्यास त्यांच्याकडे संपत्ती नव्हती. पण त्यांनी त्याला योग्य ती शिकवण दिली. हा आदर्श घेऊन आहे त्या गोष्टीत समाधान मानले पाहिजे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन सर्व समस्येतून मार्ग काढण्यास तत्पर असलो पाहिजे.
     आज आपण पाहतो की आज बहुतांश कुटुंबे आर्थिकदृष्ट्या परिपूर्ण आहेत. मुलांना देण्यास त्यांच्याकडे सर्व आहे, पण वेळ नाही, संस्कार नाहीत आणि म्हणून ही पोकळी ते वेगवेगळ्या आधुनिक यंत्रांनी भरवतात. मुलांना मोबाईल, संगणक, विडीओ गेम्स पुरवता. पण ह्या गोष्टी मुलांना एकाकी बनवतात. त्यांना खऱ्या कुटुंबापासून वंचित करतात आणि ही मुले जेव्हा भविष्यात मोठी होतात तेव्हा कुटुंबात वावरणे त्यांना कठीण जाते. स्वत:चे कुटुंब सांभाळण्यास ते कमी पडतात आणि सरतेशेवटी ते मोडकळीस येतात. असे होऊ नये म्हणून आधीच दक्ष राहिले पाहिजे. संत पोप जोन पौल दुसरे म्हणतात, “जे कुटुंब एकत्र प्रार्थना करते ते एकत्र राहते”. ह्यावर विश्वास ठेवून प्रार्थनेस एकत्र बसलो पाहिजे जेणेकरून आपले कुटुंब एकत्र राहील. सुख, शांती व समाधान सदैव कुटुंबात नांदत राहतील.
ख्रिस्ती जीवनात कुटुंबाला महत्वाचे स्थान आहे. कारण ख्रिस्ती जीवन हे एकाकीपणाचे जीवन नसून एकमेकांबरोबर जगण्याचे जीवन आहे. एकमेकांवर प्रेम करण्याचे जीवन आहे. ह्यासाठी कुटुंब अतियोग्य जागा आहे. कधीकधी सामाजिक व वैयक्तिक घटकांमुळे कौटुंबिक जीवनास दगा पोहचतो. हे होऊ नये व कौटुंबिक जीवन अधिकाधिक मजबूत व्हावे व ख्रिस्ती मूल्यांनी समृद्ध बनावे म्हणून देऊळमाता आपल्या समोर ‘पवित्र कुटुंबाचा’ आदर्श आपल्यासमोर ठेवत आहे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभू आमच्या कुटुंबाचे संरक्षण कर.

१. आपली देऊळमाता विश्वभर ख्रिस्ताचे प्रेम पसरवत आहे. हे प्रेमाचे कार्य पुढे नेण्यास त्यांना परमेश्वराची कृपा मिळावी व अधिका-अधिक लोकांना ख्रिस्ताच्या प्रेमाचा अनुभव यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. कुटुंब हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्याचे महत्व जाणून कुटुंबाचे पालन पोषण करण्यास आपणास कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आपल्या प्रत्येकांच्या कुटुंबात शांती, प्रेम, ऐक्य सतत नांदावे व आपण त्यागमय जीवन जगून आपले कुटुंब सदासर्वदा सुखी रहावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. जी कुटुंबे उध्वस्त झाली आहेत, अशांना पवित्र कुटुंबाचे मार्गदर्शन लाभून त्यांना समजूतदारपणाचे, शांतीचे व प्रेमाचे वरदान लाभावे म्हणून प्रार्थना करूया.
५. आपल्या वृद्ध आईवडिलांना आपल्या प्रेमाचा, मायेचा व करुणेचा स्पर्श व्हावा व त्यांना आनंदी ठेवण्यास परमेश्वराने आपणास कृपा द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. आता थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया.  


       


No comments:

Post a Comment