Friday, 22 December 2017

Reflection for the Homily of Christmas Day (25-12-2017) By Br. Rahul Rodrigues.


ख्रिसमस (सकाळीची मिस्सा)


दिनांक: २५/१२/२०१७
पहिले वाचन: यशया ६२:११-१२
दुसरे वाचन: पौलाचे तीताला पत्र ३:४–७  
शुभवर्तमान: लूक २:१५-२०








 ‘देव मानव झाला धरतीवर आला, मानवात शिरला’.


प्रस्तावना:

“आनंद करा, उल्हास करा! अहो पृथ्वीच्या सर्व राष्ट्रांनो प्रीतीचे गीत गा.
कारण आज आपला तारणारा आपल्या तारणासाठी जन्मला आहे.”
ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपली वाट पाहण्याची वेळ संपली आहे. ख्रिस्त आम्हा मध्ये जन्मला आहे. तो आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे, दुःखातून सुखाकडे, आणि पापांतून पुण्याकडे नेण्यास आला आहे. ज्याप्रमाणे मेंढपाळ आपली मेंढरे सोडून बाळ येशूला पाहण्यास व त्याचा अनुभव घेण्यासाठी गेले, त्याचप्रमाणे आपण सुद्धा बाळ येशूचा अनुभव घेण्यासाठी इथे जमलो आहोत.
     आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा सांगत आहे की आपला तारणारा आला आहे व आपले तारण त्याच्या हाती आहे. दुसऱ्या वाचनामध्ये तीताला लिहिलेल्या पत्रात संत पौल म्हणतो की, आपल्या तरणाऱ्याचा जन्म आपल्या सत्कार्यामुळे झाला नसून तर देवाची आम्हावरील असलेल्या दयेमुळे व प्रीतीमुळे झाला आहे. लूकलिखित शुभवर्तमानामध्ये आपण पाहतो की, परमेश्वराची आम्हावरील द्या व प्रीती मेंढपाळानी त्या गाईच्या गोढ्यात जन्मलेल्या ख्रिस्तामध्ये पाहिली.
     ज्याप्रमाणे ख्रिस्त ह्या भूतलावर दिन-दुबळ्यांच्या तारणासाठी अवतरला, त्याचप्रमाणे आपण सुद्धा दीन व गरजवंताच्या हितासाठी झटावे म्हणून ह्या पवित्र मिस्साबलिदानात प्रार्थना करूया.

सम्यक विवरण

पहिले वाचन: यशया ६२:११-१२

      पहिल्या वाचनात यशया संदेष्टा आपणाला आनंद व हर्ष करण्यास सांगत आहे. कारण आपला तारणारा आला आहे. हा तारणारा आपले उद्धार करील. आपण सर्वजण देवाने निवडलेली लोक आहोत. जसे देवाने मोशेच्या मदतीने इब्री लोकांना फेरोच्या गुलामगिरीतून सोडविले होते, त्याचप्रमाणे हा तारणारा आपणास आपल्या पापांतून व गुलामगिरीतून मुक्त करेल, असा संदेश यशया संदेष्टा आपणास देत आहे.

दुसरे वाचन: पौलाचे तीताला पत्र ३:४–७  

     तीताला लिहिलेल्या पत्रात संत पौल ‘तारण म्हणजे काय’ ह्याचा अर्थ आपणास स्पष्ट करून सांगत आहे. देवाची दया महान आहे. ह्याच देवाच्या महान दयेमुळे आपले तारण झाले आहे. ख्रिस्ताच्या जन्माने आपल्या जीवनाचे नवीकरण झाले आहे. आपण अंधारात भरकटलेलो होतो, पापांच्या जाळ्यात गुरफटून अडकलेलो होतो; परंतु ख्रिस्ताने आपणास ह्या सर्वातून सोडविले आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे, ख्रिस्ताचे  आगमन व त्याचे नेमलेले कार्य ह्या दोन्हीवर परमेश्वर देवाच्या प्रीतीचा हात आहे. देवाचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये वस्ती करण्यासाठी आला व आपण देवाच्या कृपेने नीतिमान ठरलो आणि आपल्याला युगानुयुग टिकणारे जीवन मिळाले. या सर्व कृतींना ‘तारण’ म्हटलेले आहे. अशा सुंदर शब्दांनी संत पौलने ‘तारण’ ह्या शब्दाचे वर्णन केले आहे.

शुभवर्तमान: लूक २:१-२०

     ख्रिस्तजन्माचा पहिला संदेश हा गरीब धनगरांना दूताच्या मदतीने प्राप्त झाला.. दूत ह्या धनगरांना ख्रिस्तजन्माची कहाणी सांगतो व त्यांना तारणाची आशा दाखवतो. हा संदेश प्रथम धनगरांनाच का देण्यात आला? असा प्रश्न आपल्या मनात आला असेल. ह्याचे उत्तर असे की, गरीब धनगरांना समाजात स्थान नव्हते. समाजाने त्यांना तुच्छ लेखलेले होते. मंदिरात बली अर्पण करण्यासाठी लागणारे कोकरू हे मंदिर अधिकाऱ्याच्या कळपातून पुरविले जाई. धनगर हे ह्या कळपाची राखण करीत असत. धनगर जे मंदिरासाठी लागणाऱ्या कोकरांची काळजी घेत होते, त्यांनाच प्रथम जगाचे पाप-हरण करणारे देवाचे कोकरू पाहण्याचे भाग्य लाभले. धनगरांना दूताचा संदेश मिळाला तेव्हा त्यांनी विश्वास ठेवला व ते बेथलेहेमास गेले. त्यांनी देवाने केलेल्या कृत्याबद्दल देवाचे गुणगान-गायिले व ह्या सर्व गोष्टी नगरात जाऊन इतरांना कळवल्या.

बोधकथा :

एकदा एक माणूस आपल्या गर्भवती स्त्रीला दवाखान्यात घेऊन जातो कारण त्या स्त्रीची प्रसूतीची वेळ जवळ आली होती. बराच वेळ झाला परंतु डॉक्टर काही सांगत नव्हते. जस-जसा उशिरा झाला त्या व्यक्तीला चिंता वाटू लागली. थोड्याच वेळात डॉक्टर ऑपरेशन थेटर मधून बाहेर आले व त्या व्यक्तीला म्हणाले, “मला माफ करा, आम्ही तुमच्या बाळाला वाचवू शकलो नाही व बाळ जन्माला येताच मरण पावले.”  हे ऐकून तो माणूस स्वतःला आवरू शकला नाही व मोठ्याने रडू लागला व पूर्ण पणे खचून गेला.
     ज्या बाळासाठी त्याने नऊ महिने वाट पाहिली, तेच बाळ जन्माला येताच मरण पावले. त्या व्यक्तीने डॉक्टरांना विचारले की ह्या हॉस्पिटल मध्ये नेत्र दानाची गरज आहे असे मी ऐकले होते, तर माझ्या बाळाचे डोळे कुणा दुसऱ्याला दृष्टी देण्यास उपयोगी पडू शकतात का ? दुसऱ्या दिवशी त्या बाळाचे डोळे एका श्रीमंत व्यक्तीला व एका आईला देण्यात आले.

मनन चिंतन :

     दोन हजार वर्षा पूर्वी एक बाळ जन्माला आले व आपल्याला पापांच्या अंधकारमय जीवनातून आध्यात्मिक डोळे किवा दृष्टी दिली. ते सुद्धा फुकट, कुठलीही किंमत न मोजता दिली. आपण सार्वजण पापी आहोत. पापांच्या अंधकारातून आपली मुक्तता व्हावी म्हणून परमेश्वराने आपल्या पुत्राला ह्या धरतीवर पाठवले. यशया (यशया ९:२) म्हणतो “आता लोक अधोलोका सारख्या अंधकारात दिवस काढीत आहेत. पण ते तेजस्वी प्रकाश पाहतील. पातळासारख्या अंधकारमय प्रदेशात सध्या लोक राहत आहेत पण त्यांना ‘तेजस्वी प्रकाश’ दिसेल.” येशू हा तेजस्वी प्रकाश आहे जो आपले तारण करावयास ह्या भूतलावर उतरलेला आहे.
     आज आपण नाताळचा सण साजरा करीत असताना आपण परमेश्वराचे मानवावरील प्रेम हे ख्रिस्ताच्या येण्याने कसे परिपूर्ण झाले यावर विचार विनिमय करत आहोत. अखिल मानवजातीच्या तारणासाठी देव मानव झाला. कारण देवाला (ख्रिस्ताला) कोणी बाहेरचा म्हणून तारण करायचे नव्हते तर आपणा सारखे बनून आपले तारण करायचे होते. “देवाने आम्हावर इतकी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र आम्हामध्ये पाठवला” (योहान ३:१६). हे नाथन ह्या प्रवक्त्याने सुद्धा दाविद राजाला सांगितले होते: “राजसत्ता तुझ्याच वंशात चालू राहील याचा विश्वास बाळग. तुझे राज्य अबाधित राहील व तुझे सिंहासन टिकून राहील (२ शमुवेल ७:१६)
     ख्रिस्ताच्या जन्माने सर्वत्र तारणाची आशा निर्माण झाली. देव मानव झाला. ‘आमचे तारण’ हे त्याचे उद्दिष्ट होते. आपण पाहतो की, त्याच्या जन्माची सुवार्ता त्या गरीब धनगरांना तसेच व तीन राज्यांना सुद्धा मिळाली व येशूचे दर्शन घेऊन त्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल झाला. त्यांच्या जीवनाचे नूतनीकरण झाले.  
      आज आपणही ख्रिस्ताचे दर्शन, ख्रिस्ताचा अनुभव घेण्यासाठी आलो आहोत व तोच ख्रिस्ताचा अनुभव आपल्याला दुसऱ्यांना द्यायचा आहे. कारण ख्रिस्त केवळ आपल्या तारणासाठी नाही तर सर्वांच्या तारणासाठी आला आहे. म्हणूनच मेंढपाळांनी येशूच्या जन्माची सुवार्ता सर्वाना नगरीत जाऊन सांगितली.
     आज आपण पाहतो की आपल्या समाजात असे बरेच लोक आहेत जे ख्रिस्तापासून दुरावले आहे. ख्रिस्ताच्या प्रेमापासून ते वंचित झाले आहेत. ते ख्रिस्ताच्या प्रेमाबद्दल अज्ञात आहेत व अजूनही पापांच्या व मोहाच्या जाळ्यात गुरफटून पडलेले आहेत. अशा सर्वाना आपण प्रभूच्या प्रेमाची ओळख करून दिली पाहिजे. जे दिन, दुःखी आहेत, ज्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे अश्यांच्या मद्दतीस धावून जाऊया जेणेकरून त्यांचे तारण होऊ शकेल. आजही ख्रिस्त उघड्यावर, गरीबांमध्ये, तसेच, गाईच्या गोठ्यात जन्म घेत आहे. त्याला आपल्या मायेची, करूणेची उब हवी आहे व ती आपल्या हृदयातच मिळू शकते.
आज जो ख्रिस्त जन्माला आला आहे, त्याला आपल्या हृदयात घेऊया व दुसऱ्यांना देऊया व हीच खरी प्रभू जन्माची सुवार्ता ठरेल. 
सर्वाना नाताळच्या हार्दिक शुभेछा.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना :

आपला प्रतिसाद: प्रभू आमचे तारण कर.

१. आपल्या ख्रिस्त सभेची धुरा वाहणारे आपले परमगुरु, महागुरू, धर्मबंधू-भगिनी व सर्व व्रतस्थ यांनी ख्रिस्ताच्या प्रेमाचा संदेश सर्वाना द्यावा व त्याच्या तारणासाठी त्यांना प्रभूकडे आणावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. जे कोणी ख्रिस्तापासून दुर गेले आहेत, पापाच्या आहारी जाऊन वाईट जीवन जगत आहेत त्यांना ख्रिस्ताच्या प्रेमाचा व दयेचा अनुभव यावा व त्यांनी ख्रिस्ता जवळ यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. जे कोणी दुःखी, कष्टी आहेत व निरनिराळ्या कारणास्तव ख्रिस्त जयंती साजरी करू शकत नाहीत, त्यांनाही ख्रिस्ताचा प्रेमळ अनुभव यावा व ख्रिस्तजन्माने त्यांना  त्यांच्या दुःखातून बाहेर पडण्यास मद्दत मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आपले मिशनरी बंधू-भगिनी जे देशाच्या अनेक काना-कोपऱ्यात जाऊन प्रभूची सुवार्ता लोकांना देत आहेत, त्यांना बाळ येशूची कृपा व सामर्थ्य मिळावे व प्रभूची सुवार्ता सर्वाना अशीच त्यांनी द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आपल्या समाजात अशी बरीच विवाहित लोक आहेत ज्यांना त्यांच्या प्रेमाचे फळ प्राप्त झालेले नाही. बाळ येशूची कृपा-दृष्टी त्यांच्यावर पडावी व त्यांना त्यांच्या प्रेमाचे प्रतिक म्हणून बालकाचे दान मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक हेतूंसाठी प्रभू येशू कडे प्रार्थना करूया.    
     




No comments:

Post a Comment