Friday 8 December 2017

Reflection for the Homily of Second Sunday of Advent (10-12-2017) By Br. Amit D'Britto.





आगमन काळातील दुसरा रविवार



दिनांक : १०/१२/२०१७
पहिले वाचन : यशया ४०:१-५,९-११
दुसरे वाचन : २ पेत्र ३:८-१४
शुभवर्तमान : मार्क १:१-८








प्रस्तावना :

     आज देऊळमाता आगमनकाळातील दुसरा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपणास पश्चाताप करण्यास आवाहन करीन आहे. पश्चाताप करण्याच्या प्रक्रियेद्वारे आपण स्वतःचे शुद्धीकरण करतो व अशा प्रकारे आपण प्रभूच्या आगमनासाठी सज्ज होत असतो.
     आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा इस्रायली लोकांचे प्रभूच्या आगमनासाठी सज्ज होण्यास सांगत आहे. दुसऱ्या वाचनात पेत्र आपणास प्रभूच्या आगमनासाठी सज्ज राहण्यास सांगत आहे. तर शुभवर्तमानात बाप्तिस्मा करणारा योहान प्रभूच्या आगमनासाठी वाट तयार करत आहे असे आपल्या लक्षात येते.
     प्रभू येशूचे आगमन हे आता खूप जवळ आहे. आपण सुद्धा पश्चाताप करून त्याच्या आगमनासाठी आपल्या अंत:करणाची परिपूर्ण रीतीने तयारी करूया.

सम्यक विवरण

पहिले वाचन : यशया  ४०:१-५, ९-११

      ‘तारण’ हाच यशयाच्या पुस्तकातील प्रमुख विचार आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा आपला तारणकर्ता आहे. व त्याच्या आगमनाने आपल्या सर्वांचा तो उद्धार करणार आहे. या प्रभूच्या आगमनासाठी आपल्या अंत:करणाची तयारी करण्यासाठी आजच्या पहिल्या वाचनात आपणास आव्हान करण्यात येत आहे.
     यशया संदेष्टा आपणास अरण्यातील व रानातील मार्ग सरळ करण्यास सांगत आहे. म्हणजेच तो आपल्याला आपल्या प्रभूच्या स्वागतासाठी तयारी करण्यास सांगत आहे. यहुदी लोक अद्यापही आपल्या मसीहाची वाट पाहत होते त्यामुळेच यशया येथे येशू ख्रिस्त मसीहा ह्याच्या येण्याचे चित्रण केले आहे.

दुसरे वाचन : २ पेत्र ३:८-१४

     ख्रिस्ताच्या परत येण्यासाठी संत पेत्र आपल्याला आजच्या दुसऱ्या वाचनात सांगत आहे. ख्रिस्ताच्या पुर्न-आगमनाविषयी त्याकाळी लोकांना खुप प्रश्न पडत होते. लोकांचे या बाबतीत विचार स्पष्ट नव्हते. म्हणूनच पेत्रसुद्धा येशू प्रमाणे म्हणतो की, जसा चोर हा न सांगता येतो तसा प्रभू येशू ही येईल. देवाच्या दृष्टीत काळ-वेळ हे काहीच नाही. परंतु तो एकदिवस नक्कीच येणार आहे कारण त्याने सर्व अभिवचने पाळली आहेत. म्हणजेच तो हे अभिवचनही नक्कीच पाळेल.
     त्यामुळेच प्रभू येण्यापूर्वी आपण सर्वांनी पश्चाताप करावा व त्याच्या स्वागतास योग्य रीतीने तयार रहावे म्हणून संत पेत्र आपणास आमंत्रित करीत आहे. पेत्र म्हणतो की आपण आपले काम मन लावून करावे, नेहमी शांतीने राहण्यास झटावे; प्रभू येण्यास विलंब लावतो म्हणून निष्काळजी बनू नये कारण तो एक दिवस अचानक येईल.

शुभवर्तमान : मार्क १:१-८

     मार्ककृत शुभवर्तमानात येशूच्या जीवनातील पहिल्या तीस वर्षाचा काहींच उल्लेख नाही. आजच्या शुभवर्तमानात आरंभीलाच बाप्तिस्मा करणारा योहान मसिहाच्या आगमनासाठी तयारी करीत आहे असे दिसते. योहान हा परमेश्वराच्या आगमनासाठी मार्ग सिद्ध करण्यास व आपल्या देवासाठी रानात सरळ राजमार्ग करण्यास आवाहान करत आहे.
     प्रभू येशू हा देवाचा पुत्र आहे व तो शुभवार्ता सांगण्यास या जगात येणार आहे. त्यासाठीच बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने ‘पश्चाताप करा’ असे लोकांना आवर्जून सांगितले आहे. पश्चाताप केल्याने देव आपल्या पापांची क्षमा करील व तो आपल्या जीवनात व अंत:करणात नेहमी वस्ती करावयास येईल असा त्याचा संदर्भ होतो.

मनन चिंतन :

     आगमन काळ हा ख्रिस्तजयंतीच्या तयारीसाठी मिळालेला अवधी आहे. प्रभू येशूने हजारो वर्षापूर्वी या धरतीवर येऊन एका नवीन युगाची सुरुवात केली. प्रेमळ पित्याने आपल्या पुत्राला धरतीवर पाठवून लोकांबरोबर नवीन प्रेमाचे नातेसंबंध प्रस्थापित केले.
     बाळक येशुचे पृथ्वीवर आगमन करण्यासाठी बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने या पृथ्वीवर योग्य असा मार्ग तयार केला. त्याने प्रभू विषयी संदेश ह्या जगात पसरविला म्हणूनच बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला ह्या आगमन काळात खूप महत्वाचे स्थान आहे.

१)      बाप्तिस्मा करणारा योहानाने आपल्या संदेशाद्वारे प्रभू येशूचे स्वागत केले. योहान हा संदेष्टा होता कारण त्याने जुन्या करारातील अभिवचने जी येशूविषयी भाकीत केली होती, ही सर्व वचने तो येशूच्या जीवनात उतरवण्यास प्रयत्न करतो. त्याने लोकांना पश्चाताप करण्याचे आवाहन केले. प्रभू येशूच्या स्वागतासाठी त्याने लोकांना हृदयाचे परिवर्तन करण्यास सांगितले. आपणसुद्धा ह्या संदेष्ट्याप्रमाणे प्रभू येशूच्या स्वागतासाठी आपल्या स्वतःच्या व आपल्या कुटुंबाच्या आणि आपल्या मुलांच्या हृदयाचे परिवर्तन करण्यासाठी सहभाग घेतला पाहिजे. 
    आपणसुद्धा योहानाप्रमाणे संदेष्टे आहोत म्हणून या प्रभूच्या आगमनाची सुरुवात आपण स्वतःपासून केली पाहिजे.

२)   योहानाने आपल्या सत्य आणि साध्या राह्णीमानाने प्रभूचे स्वागत केले. योहानाचे जीवनमान हे अतिशय साधे व प्रेमळ होते. त्याने सर्व प्रभूगुण आपल्या कृतीत उतरवले. त्यामुळे अनेक लोक त्याच्या कडे प्रभू-शुभवार्ता ऐकण्यास जमत असे. तो इतका नम्र व लीन होता की त्याने आपल्या शिष्यांना व लोकांना प्रभू कडे जाण्यास मार्गदर्शन केले. त्याने आपल्या जीवनात स्वतःपेक्षा प्रभू येशूचा अधिक गौरव केला व त्याला अतिशय महान व्यक्ती म्हणून प्रकट केले.
     आपण सुद्धा ह्या आगमनकाळात आपला गर्व व आपले गर्विष्ठ राहणीमान सोडून प्रभूच्या स्वागतासाठी अतिशय नम्र व लीन बनूया.

३. योहानाचे व्यक्तीमत्व हे प्राथनेने व पवित्र्याने भरलेले होते. योहान हा अतिशय पवित्र व्यक्ती होता. त्याने आपले संपूर्ण जीवन हे प्रभूसेवेसाठी समर्पित केले. तो अतिशय शांतताप्रिय व्यक्ती होता. त्याने प्रभूसेवेसाठी आपले जीवन इतके वाहून घेतले की त्याने सत्यासाठी आपला स्वतःच्या जीवनाचा त्यागही केला.
आपण सुद्धा योहानाप्रमाणे प्रभूसेवेसाठी आपला वेळ दिला पाहिजे. प्रभू येशू हा थोड्यांच दिवसात आपणा मध्ये हजर होणार आहे. त्यानिमित्ताने आपण सुद्धा आपले जीवन प्रभूसाठी समर्पित करून त्याला उत्तम अशी भेट देऊया.

बोधकथा :

अमेरीकेतील एक अतिशय प्रसिद्ध अभिनेता आपले ऐहिक व संसारीक जीवन जगत असताना देवापासून व देऊळमातेपासून हळूहळू दूर गेला.
     परंतु एक दिवस असा येतो की, तो व्यक्ती अतिशय आजारी पडून आपल्या मरणाची वाट पाहत असतो. यावेळी तो आपल्या मित्राला म्हणतो की, मला प्रायश्चित संस्कार स्वीकारून देवाबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा आहे.
     प्रायश्चित हा संस्कार स्वीकारल्यानंतर त्याने त्याचा डायरीमध्ये असे लिहिले की, “माझ्या संपूर्ण आयुष्यातील आजचा दिवस हा आनंदाचा, सुखाचा व खूप महत्वाचा दिवस आहे”.   
     ह्या आगमनकाळात आपण सुद्धा त्या अभिनेत्याप्रमाणे प्रभूच्या स्वागतासाठी आपल्या सर्व पापांची आठवण करून पश्चाताप करूया. जेणेकरून प्रभू योग्य त्या दिवशी आपल्या जीवनात पदार्पण करील.

विश्वासू लोकांच्या प्रार्थाना :

प्रतिसाद: हे प्रभू आमची प्रार्थना स्वीकार.

१. आपले परमगुरु, महागुरू, धर्मगुरू आणि व्रतस्थ यांनी जगातील कानाकोपऱ्यात  प्रभूची सुवार्ता पसरावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
२. पीक फार आहे, परंतु कामकरी थोडे आहेत. पीकांची कापणी करण्यासाठी प्रभूने जास्तीत जास्त कामकरी पाठवावेत म्हणून आपण प्रार्थाना करूया.
३. आपल्या जीवनातील स्वार्थीपणा, गर्विष्ठता व अहंकार या सैतानी वृत्तीमुळे आपल्याला प्रभुशी एकनिष्ठ होता येत नाही. म्हणून आपल्याला ख्रिस्ताच्या प्रेमाची व दयेची जाणीव व्हावी व आम्ही प्रभूगुण स्वीकारावेत म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
४. या आगमन काळात आपण प्रभूच्या स्वागतासाठी आपल्या कुटुंबात आणि आपल्या स्वतःच्या जीवनात योग्य अशी जागा निर्माण करावी म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया.
५. आपल्या स्थानिक आणि वैयक्तिक गरजांसाठी प्रभूकडे प्रार्थना करूया.   




No comments:

Post a Comment