Friday 15 December 2017

 Reflection for the Homily of Third Sunday of Advent (17-12-2017) By Bro. Isidore Patil





आगमन काळातील तिसरा रविवार





दिनांक: १७-१२-२०१७
पहिले वाचन: यशया ६१:१-२; १०-११  
दुसरे वाचन: १ थेस्सलनीकाकरांस पत्र ५:१६–२४
शुभवर्तमान:  योहान १:६-८; १९-२८








प्रस्तावना :

     आज ख्रिस्तसभा आगमन काळातील तिसरा रविवार साजरा करीत आहे. आजच्या उपासनेद्वारे ख्रिस्तसभा आपल्यासाठी आशेचा किरण देऊन आशामय जीवन जगण्यासाठी बोलावीत आहे. येशू येणार आहे हीच आपली मोठी आशा आहे.   
     यशयाच्या पुस्तकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात आपण पाहतो की परमेश्वराने लोकांची बंदिवासातून सुटका केली म्हणून येरुशलेमचे लोक परमेश्वराची स्तुती व गौरव गातात. दुसऱ्या वाचनात संत पौल थेस्सलनीकाकरांस सांगतो की आपण नेहमी परमेश्वराच्या सानिध्यात राहिलो पाहिजेत व परमेश्वराची स्तुती गाऊन आनंदी राहिले पाहिजे. आजच्या योहानलिखित शुभवर्तमानात आपण पाहतो की परुशी लोक बाप्तीस्मा करणाऱ्या योहानाला ओळखू शकले नाहीत. संत योहान आपल्याला आशा देत आहे की, प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे आणि तो आपल्या सर्वांना आनंदाने भरून टाकणार आहे. 
     आजच्या पवित्र मिस्साबलीदानात सहभागी होत असताना आपण आपल्या पापांची आठवण करूया आणि ह्या आगमन काळातील तिसऱ्या रविवारी प्रभू येशू ख्रिस्ताने जो आशेचा व आनंदाचा संदेश दिला आहे तो जगात पसरविण्यासाठी आणि प्रभूचे स्वागत करण्यासाठी योग्य ती तयारी करावी म्हणून आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडे प्रार्थना करूया.    
सम्यक विवरण :

पहिले वाचन : यशया ६१: १-२; १०-११  

     यशया संदेष्टा आपल्या संदेश्याद्वारे सियोनेच्या उद्धाराविषयी सांगत आहे. तो  सांगतो की परमेश्वराचा आत्मा मजवर आला आहे. दीनांची सेवा करण्यास परमेश्वराने यशया संदेष्टयाचा अभिषेक केला आहे असे आपणास आढळून येते. परमेश्वराने कैद्यांची बंदिवासातून मुक्तता करून त्यांना नवीन राज्य दिले आहे. परमेश्वराने यशयाचे जीवन आनंदाने भरले आहे. ज्या प्रमाणे नवरा-नवरीला त्यांच्या लग्नाच्या दिवशी आनंद होतो तसाच आनंद आज सीयोनेला झाला आहे असे ह्या वाचनात नमूद करण्यात आले आहे.

दुसरे वाचन : १ थेस्सलनीकाकरांस पत्र  ५:१६–२४

     संत पौल थेस्सलनीकाकरांस सर्वदा आनंदी राहण्यास व निरंतर प्रार्थना करण्यास प्रेरित करत आहे. देवाची इच्छा अशी आहे की आपण सदोतीत देवाची उपकारस्तुति करायला पाहिजे असे तो आवर्जून सांगत आहे. आपले ख्रिस्ती जीवन हे पवित्र आत्म्यावर अवलंबून आहे म्हणून पवित्र आत्म्याला योग्य स्थान दिले पाहिजे असा संदेश पौल देत आहे. तसेच आपला येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनासाठी आपला आत्मा, जीव व शरीर ही निर्दोष असावी म्हनुंत संत पौल आपल्या पत्राद्वारे सागंत आहे.

शुभवर्तमान : योहान १:६-८; १९-२८

     ह्या शुभवर्तमानात आपल्याला बाप्तीस्मा करणाऱ्या योहानाविषयी ऐकावयास मिळते. योहान बाप्तिस्मा सांगतो की येशूख्रिस्ताने आपली सेवा सुरु करण्यापूर्वी काही महिने अगोदर देवाने योहानाला पाठविले. त्याची मुख्य सेवा म्हणजे येशू ख्रिस्ता विषयी साक्ष देणे. योहान येशू ख्रिस्ताला प्रकाशाची उपमा देतो. योहानाने आपले काम मनापासून, धैयाने व नम्रतेने केले. सर्व इस्रायल लोक मसिहाची वाट पाहत होते. कारण जुन्या करारा मध्ये हे सांगितले आहे की तुमचा तारणारा येईल. योहान मोठ्या धेर्याने ख्रिस्ताविषयी साक्ष देत होता म्हणून सर्व परुशी व धर्म-पंडितांना वाटले की हाच मसीहा असावा म्हणून त्यांनी आपल्या दासांना योहानाकडे पाठवून तू मसीहा आहे का अशी विचारपूस केली. योहानाने नम्रतेने सांगितले की मी तो नाही; परंतु तुमचा मसीहा येत आहे, त्याच्यासाठी मार्ग तयार करा.

मनन चिंतन :

     ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो आज आगमन काळातील तिसरा रविवार. आज बाळ येशूच्या येण्याची तिसरी चिठ्ठी आहे. आपण विचार करत असणार ही तिसरी चिठ्ठी म्हणजे काय? आपण सर्वजण ऐकले असेल की रविवारच्या मिस्सावर येणाऱ्या लग्नाची तयारी म्हणून चिठ्ठ्या वाचतात. तशाच प्रकारे आज बाळ येशूच्या येण्याची तिसरी चिठ्ठी आहे आणि आजच्या चिठ्ठीचा विषय आहे ‘आशा’.
     आज देऊळ माता आशेची किरणे आपल्याकडे पाठवत आहे. आपणाला आशा आहे की प्रभू येशू ख्रिस्त येईल आणि आपणा सर्वांना आनंदाने आणि प्रेमाने भरून टाकेल. आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याची वाट आगमन काळाच्या पहिल्या रविवार पासून पाहत आहोत आणि त्यानुसार योग्य ती तयारी करत आहोत. आगमनाच्या पहिल्या रविवार पासून सर्व ठिकाणी आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.    
पहिले वाचन आपल्याला सांगते की परमेश्वराने यशया संदेष्ट्याच्या काळात बंदीवासात असलेल्या कैद्याची सुटका करून सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण केले. यशया संदेष्टा सांगतो की ह्या आनंदाचे एक महत्वाचे कारण म्हणजे परमेश्वराने सर्व लोकांना नवीन राज्य दिले होते. आजच्या दुसऱ्या वाचनाद्वारे आपण पाहतो की संत पौल थेस्सलनीकाकरांस आनंद व उल्हास करण्यासाठी बोलावत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचे कार्य करण्यातच आपण आनंद केला पाहिजे तसेच आपण नेहमी प्रार्थनेत राहिले पाहिजे कारण बाळ येशू येणार आहे असे संत पौल आवर्जून सांगत आहे. म्हणून आपण सर्वांनी परमेश्वराचे नेहमी आभार मानले पाहिजेत. अशी देवाची इच्छा आहे. आजच्या शुभवर्तमानात आपण पाहतो की परमेश्वराने प्रभू येशूचा मार्ग तयार करण्यासाठी बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला पाठवले होते. योहान प्रभू येशू ख्रिस्ताविषयी मोठ्या धैर्याने साक्ष देतो. त्यामुळे परुश्यांना वाटते की हाच मसीहा आहे. कारण त्याच्या विषयी त्यांनी जुन्या करारात वाचले होते. त्यामुळे त्यांनी ते दासाला योहानाकडे पाठवतात आणि विचारतात की तू खरोखर मसीहा आहेस की नाही? परुशी योहानाला ओळखू शकले नाही.
     आपण जेव्हा आपल्या जुन्या मित्राला किंवा नातेवाईकाला भेटतो तेव्हा सहजा सहज आपला हाच प्रश्न असतो की, तुम्ही मला ओळखता का? हा प्रश्न आपल्याला नेहमी येत असतो. आपण जर बारकाईने आपल्या जीवनावर लक्ष दिले तर आपल्याला जाणून चुकेल की आपल्या जीवनात खुप अशा गोष्टी आहेत ज्याची आपल्याला ओळख नसते. उदा. कधी कधी आपण स्वतःला ओळखत नाही, आपल्याशी असलेल्या गुणांची आपल्याला पारख होत नाही, तसेच देवाने बहाल केलेल्या दानांची आपल्याला जाणीव होत नाही. योहानाने प्रभू येशूख्रिस्त येण्याअगोदर त्याला ओळखले होते. येशू महान आहे. म्हणून योहान म्हणतो, ‘मी त्याच्या पायतणाचा बंद देखील सोडवण्यास पात्र नाही’. ह्यावरून आपल्याला योहानाची नम्रता व येशूची त्याला झालेली ओळख दिसून येते. आपण प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या शेजाऱ्यामध्ये, नातेवाईका मध्ये आणि आपल्या शत्रू मध्ये सुद्धा ओळखले पाहिजे.
येशू येणार आहे ही आपली आशा आहे. आशेचे किरण घेऊन सदैव आपण येशूच्या आगमनासाठी तत्पर व्हायला पाहिजे. जेणेकरून येणारा नाताळचा हा सण सुखाचा व आनंदने भरून जाईल.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

आपला प्रतिसाद: हे प्रभो आमची प्रार्थना ऐक.

१. ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे आपले पोप फ्रान्सिस, बिशप्स, सर्व धर्मगुरु, धर्मबंधु-भगिनी व प्रापंचिक ह्यांनी जे प्रभू येशूची सुवार्ता पसरवण्याचे कार्य हाती घेतले आहे ते त्यांनी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने योग्य प्रकारे करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. ह्या आगमन काळात प्रभू येशूचे स्वागत करण्यास आम्ही आमच्या अंत:करणाची तयारी करावी व आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला इतरांमध्ये ओळखाव म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आमच्या सरकारी व राजकीय नेत्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव व्हावी व त्यांनी आपला देश चांगल्या प्रगतीच्या मार्गावर आणावा म्हणून आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडे प्रार्थना करूया.
३. सर्व पालकांनी आपल्या मुलांमध्ये चांगले गुणधर्म जोपासावेत, त्यांना देवराज्याविषयी शिकवण द्यावी, परमेश्वराच्या वचनाप्रमाणे व आज्ञेप्रमाणे वागून मुलांपुढे चांगला आदर्श ठेवावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. नोकरी व कामधंदा करणाऱ्या लोकांनी आपला व्यवसाय योग्यप्रकारे व प्रामाणिकपणे करावा. त्यांना आपल्या व्यवसायात भरपूर यश मिळावे, त्यांनी आपल्या कामकाजाद्वारे देवाच्या मुल्यांची साक्ष द्यावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आता आपण आपल्या सर्व गरजा शांतपणे प्रभूचरणाशी अर्पण करूया.    


No comments:

Post a Comment