Thursday, 21 December 2017

Reflection for the Homily of Christmas Vigil Mass (25-12-2017) By Br. Lipton Patil.

ख्रिसमस: मध्यरात्रीची मिस्सा


दिनांक: २५/१२/२०१७
पहिले वाचन: यशया ९:१-३, ५-६
दुसरे वाचन: पौलाचे तीताला पत्र २:११-१४
शुभवर्तमान: लूक २:१-१४








‘आज आम्हांसाठी प्रेमाचा उगम झाला व तो प्रभू येशू ख्रिस्त आहे’.


प्रस्तावना:

ख्रिस्त जयंती करूया साजरी आज या जगावरती;
पावन झालो आम्ही लेकरे या धरतीवरील.
देवदूत ही गातील गाणी आकाशातील;
मेंढपाळ व मेंढरे ही करतील जल्लोष रानातील.”

माझ्या ख्रिस्ती श्रद्धावंतांनो आज धरतीवरती व आपल्या प्रत्येकांच्या हृद्यात प्रेमाचा वर्षाव झाला आहे. आपण प्रत्येकांना प्रेमाचे उदाहरण देणारा बाळ येशू ह्या  क्षणाला गाई-गुरांच्या गोठ्यात जन्म घेऊन दुसऱ्यांवर प्रेम करायला प्रोत्साहन देत आहे.
     आजच्या पहिल्या वाचनात संदेष्टा यशया सांगतो की, आज अंधकार नष्ट होईल; अंधकारात व मृतुछायेत चालणाऱ्या लोकांना मोठा प्रकाश दिला जाईल कारण आज जगाचा प्रकाश जन्मलेला आहे, व तो बाळ येशू आहे. संत पौलने तीताला लिहिलेल्या पत्रात आपण ऐकणार आहोत की, सर्वांना तारण देणारी कृपा प्रगट झाली आहे आणि आज सर्वांसाठी तारणाचा दिवस उगवलेला आहे. तर लुककृत शुभवर्तमानात आपण पाहतो की प्रभूचा दूत, बाळ येशूची सुवार्ता घोषित करत आहे. ह्या सुवार्तेपासून सर्व लोकांना मोठा आनंद होणारा आहे, कारण आमच्याच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मलेला आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त आहे.   
     ह्या पवित्र मिस्साबलिदानात सहभागी होत असताना आपण सर्वांनी बाळ येशूच्या प्रेमाला समजून घेऊन अधिका-अधिक त्याच्याजवळ जाऊन प्रेमाचे व शांतीचे  प्रतिक बनावे म्हणून प्रभूचरणी प्रार्थना करूया.

सम्यक विवरण :

पहिले वाचन: यशया ९:१-३, ५-६

मोशे नंतरचे सर्वात प्रभावी व्यक्तिमत्व म्हणजे संदेष्टा यशया होय. वयाच्या पंचवीसाव्या वर्षी संदेश सांगण्यासाठी त्याला पाचारण करण्यात आले. यशयाने धर्माला लागलेल्या ग्लानी दूर केली. मूर्ती पूजेवर हाणाहाणी हल्ले केले, सामाजिक अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. ख्रिस्तपूर्व ५८७ मध्ये यहुद्यांना कैदी म्हणून बाबिलोनमध्ये नेण्यात आले तेव्हा त्यांच्यासाठी हा काळ अतिशय दु:खाचा होता. परंतु संदेष्टा यशयाने लोकांना तेथून मुक्त केले.

दुसरे वाचन: पौलाचे तीताला पत्र २:११-१४

     तीतस हा बिगर यहुदी सामाजातून झालेला ख्रिस्ती होता. तो पौलाबरोबर शेवटपर्यंत एकनिष्ठ राहिला. करिंथ नगरातील ख्रिस्ती समाजात संघर्षाचे वातारण निर्माण झाले, तेव्हा पौलाने आपला शांतीदूत म्हणून तीताला तिथे पाठवले. त्याने व्यवस्थितरित्या आणि धाडसीपणाने परिस्थिती हाताळली. क्रीट बेटाचा धर्माध्यक्ष म्हणून पौलने त्याची नियुक्ती केली.

शुभवर्तमान: लूक २:१-१४

     लूक व्यवसायाने वैदय होता. इ. स. ८० ते ८५ च्या दरम्यान त्याने आपले शुभवर्तमान लिहिले. समाजातील दुर्बल घटक म्हणजे गोरगरीब, वंचित, पिडीत, स्त्रिया, लहान मुले, विधवा यांचा मित्र अशी लुकची येशूची प्रतिमा रंगवली आहे. लुक स्त्री- पुरुष समानतेचा पुरस्कर्ता होता. देवासमोर स्त्री- पुरुष समान आहेत. दोघांनाही सारखीच वरदाने मिळवली असून मुक्तीच्या यात्रेत दोघेही सहप्रवासी आहेत. लूकच्या शुभवर्तमानाला ‘स्त्रियांचे शुभवर्तमान’ असेही म्हटले जाते. लूकने येशूला ‘मुक्तिदाता’ म्हणून संबोधले आहे. लुकलिखित शुभवर्तमानात आपण पाहतो की, मरीयेला दिवस पूर्ण झाले आणि तिला पुत्र झाला. त्याचवेळी रात्री रानात कळपांची राखण करत असलेल्या गरीब धनगरांना देवदूताने ख्रिस्तजन्माचा संदेश दिला: ‘आज दाविदाच्या गावांत तारणारा जन्मला आहे; तो ख्रिस्त आहे. बाळंत्याने गुंडाळले व गव्हाणीत ठेवलेले एक बाळक तुम्हास आढळेल अशी त्यांच्यासाठी देवदूत खुण किंवा निशाणी देतो.  संदेश  ख्रिस्त जन्माचा पहिला संदेश हा गरीब धनगरांना मिळतो. धनगरांनी दूतांच्या संदेश्यावर विश्वास ठेवला व ते बेथलेहेमास गेले. त्यांनी देवाचे आभार मानले व ह्या सर्व गोष्टी इतरांना सांगितल्या.

बोधकथा:

     बाळयेशूठायी, बाळयेशूमध्ये व बाळयेशूचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या श्रध्दावंतांनो गेल्यावर्षी मध्यरात्रीची नाताळची मिस्सा संपल्यावर एक धर्मगुरू सर्वाना चर्चच्या आवारात ख्रिसमसच्या शूभेच्छा देत होते. जेव्हा एका तरुणीला शूभेच्छा दिल्या तेव्हा त्या तरुणीच्या चेहऱ्यावर धर्मगुरूंना वेगळ्याच प्रकारच्या भावना दिसल्या. त्या तरुणीच्या चेहऱ्यावर हास्य नव्हते. तिच्या डोळ्यात दु:ख दटले होते व तिचे मन गोंधळलेले आहे असे त्याच्या निदर्शनास आले. तेव्हा धर्मगुरूंनी त्या तरुणीला विचारले की, तू खूप बेचेन, उदास व निराशी दिसत आहेत. ज्या प्रमाणे कोळी स्वतः विणलेल्या जाळ्यात अडकलेला असतो तशाप्रकारची तुझी अवस्था झाली आहे. धर्मगुरूंचे हे शब्द त्या तरुणीच्या कानावर पडताच तिच्या डोळ्यातून जणूकाही अश्रूचा पूरच आला व त्या क्षणाला तिने तिचे दुःख कथन करायला सुरुवात केली. ती तरुणी म्हणाली खरंच माझी अवस्था त्या कोळी प्रमाणेच झाली आहे. मी स्वतः विणलेल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकलेली आहे; मी भरकटलेली नाव आहे. भरकटलेल्या पावलांना दिशा देणारा, माझ्या या मनाला समजून व आधार देणारा माझ्यापासून दूर गेला आहे. माझे त्याच्यावर खूप प्रेम आहे; परंतु तो माझे प्रेम समजून घेत नाही. जेव्हा लहान बाळ आपल्या वडिलांकडे चद्रांला हात लावण्याचा घट्ट करतो तेव्हा त्या बाळाचे वडील एका प्लेटमध्ये पाणी घेऊन आकाशात असलेला चंद्र त्या प्लेटमध्ये दाखवून त्या लहान बाळाला चंद्राला हात लावून त्याचे समाधान करतात. परंतु माझ्या प्रेमात मी तसे काय करू शकत नाही. ज्याप्रमाणे चंद्राला जशी चादण्यांची साथ हवी असते, लाटांना किनाऱ्याची ओढ असते, तीच साथ व ओढ मला माझ्या प्रियकराची व त्याच्या प्रेमाची हवी आहे. जेव्हा धर्मगुरूंनी तिची ही कथा ऐकली तेव्हा तो स्व:ताच्या दुःखाला आवरू शकला नाही.
धर्मगुरु विचार करू लागले की, आज ख्रिस्तमस आहे. आज आम्हांसाठी प्रेमाचा उगम झाला आहे व तो उगम म्हणजे प्रभूयेशु ख्रिस्त. त्याच्या प्रेमाने आपल्यासाठी प्रेमाचे दरवाजे उघडले गेले व ते प्रेम हे आपणासाठी बाराही महिने फुलणाऱ्या सदाफुलीप्रमाणे झाले आहे. त्या तरुणीला धर्मगुरूंच्या शब्दांनी थोडा आधार मिळाला व तिचे प्रेम तिला पुन्हा भेटले या विश्वासाने ती तरुणी तिच्या घरी गेली.

मनन चिंतन :

     बाळ येशूच्या जन्माने आज जगात नवीन प्रेम आले आहे. आपण प्रत्येकजण बाळयेशूच्या प्रेमाचे साक्षीदार आहोत. आज बाळ येशूच्या प्रेमाने आपल्याला पापातून मुक्ती मिळून नवे जीवन जगण्याची आशा मिळाली आहे. जे लोक दु:खात, कष्टात आहेत ते सुद्धा आजच्या दिवशी बाळ येशूच्या प्रेमाने भरून आनंदी जीवन जगत आहेत. बाळ येशू ह प्रेमाचा राजा आहे. त्याचे प्रेम हे सत्य आहे व सदासर्वदा टिकून राहणार आहे. बाळ येशू राजांचा राजा असून त्याने गाईच्या गोठ्यात जन्म घेतला. ह्याद्वारे परमेश्वराचे प्रेम सिद्ध होते.
प्रेम दुसऱ्यावर करण्यासाठी आपण काहीही करून शकतो. बाळ येशूला प्रेमाचा संदेश या जगात द्यायचा होता म्हणून बाळ येशूने गाईच्या गोठ्यात जन्म घेतला व प्रेमाचे उदाहरण दिले. जे लोक असत्य, राग, भेदभाव, क्रूरता किंवा इतर वाईट मार्गावर चालत आहेत अशा लोकांना प्रेम, सत्य व शांतीच्या मार्गावर चालण्यासाठी परमेश्वराने आपल्या एकुलत्या एका पुत्राला ह्या भूतलावर पाठविले. येशू स्वत: प्रकाश आहे व तोच प्रकाश अंधकारात भटकणाऱ्यांना दिला जाईल. जेणेकरून येशू बरोबर राहून त्यांचे जीवन प्रकाशमय बनून जाईल.  
     संत पौल तीताला लिहिलेल्या पत्रात सांगतो की, तारणाऱ्याचा दिवस हा सर्वांसाठी प्रकट झाला आहे. हा तारणारा येशू ख्रिस्त आहे. बाळ येशू सर्वांवर सारखीच प्रिती करतो. सर्वांना समान लेखतो. आज तारणदायी प्रेमाची कृपा प्रत्येकांना मिळाली असून प्रत्येकजण बाळ येशूचे तारण घेऊन घरी जाणार आहेत. कारण प्रभूचा दूत सुवार्ता घोषित करताना म्हणतो की, सर्वांना मोठा आनंद झाला आहे.
आगमन काळामध्ये आपण येशूला स्वीकारण्यासाठी आपल्या हृदयाची व मनाची तयारी करीत होतो. ह्या तयारीचे उद्दिष्ट ‘बाळ येशूचे प्रेम अनुभवणे’ असे होते. आज येशू बाळच्या जन्माचे आपण ते प्रेम अनुभवलेले आहे. ज्यांना कुणाला प्रेम नाही त्यांना प्रेम करण्यास आज आपल्यामध्ये येशू बाळ आला आहे. जेव्हा मेंढपाळ रानात कळपांची राखण करत होते तेव्हा त्यांना देवदुताने येशूच्या जन्माची सुवार्ता सांगितली. यावरून असे समजते की बाळ येशू हा गरिबांसाठी सुद्धा त्याचे प्रेम घेऊन आला आहे. देवाच्या प्रेमाला सीमा नाही किंवा अंत नाही. आपल्याला समाजात असे पहावयास मिळते की, गरीब, दु:खी व ज्या लोकांना चांगली नोकरीची कमतरता आहे, अशा लोकांना कमी लेखले जाते. अशा लोकांना समाजात मान दिला जात नाही. ज्या लोकांकडे पैसा, नाव-लौकिक, चांगली नोकरी व संपत्ती आहेत अशा लोकांकडे जास्त लोकांची गर्दी असते. परमेश्वर कोणाचाही भेदभाव करत नाही. परमेश्वराच्या पुत्राला  म्हणजेच येशू बाळाला गरीब व श्रीमंत सारखेच आहेत. बाळ येशूच्या हृदयामध्ये सर्वांनाच जागा आहे. बाळ येशू गरीब, श्रीमंत ह्यामध्ये कोणताच भेदभाव करत नाही.
     प्रेम व्यक्त करण्यासाठी एखाद्या संधीची किंवा काही विचित्र घडण्याची आवशकता नसते. गरज असते ती फक्त शुद्ध अंत:करणाची. धन्यवादीत धर्मभगिनी राणी मरिया ह्यांना जेव्हा एका माणसाने सुरीने भोसकले तेव्हा तिने फक्त येशूच्या नावाने आक्रोश होत्या. येशू ख्रिस्ताचे नाव तिच्या तोंडून निघाले. येशूवर प्रेम करून तिने स्वत:चे बलिदान दिले. तसेच १९ नोव्हेंबर रोजी पोप फ्रान्सिस यांनी ‘जागतिक गरिब दिवस’ साजरा केला. फक्त साजरा केला नाही तर गरीब लोकांना भेटी दिल्या व त्यांच्याबरोबर सहभोजन केले. यालाच म्हणतात खरे गरिबांवर प्रेम.
धर्मभगिनी राणी मरिया व पोप फ्रान्सिस हयांनी येशूची शिकवण जीवनात आचरणात आणून जगाला खरा प्रेमाचा संदेश दिला. प्रेम हे सर्व सृष्टीला एकत्र बांधणारा धागा आहे हे आपण समजू शकलो तर आनंदाने आपली सर्व कृत्ये उजळून जातील. “एका दिव्याने लाखो दिवे प्रज्वलित करता येतात तरीही पहिल्या दिव्याचा  प्रकाश क्षीण होत नाही.” प्रेमाचेही असेच असते, जर प्रेम लाखो लोकांत वाटले तरीही ते तेवढेच राहते.”
बाळ येशू आम्हांमध्ये आला आहे. परमेश्वराने पाठविलेला तारणारा आम्हांमध्ये आज वस्ती करत आहे. परमेश्वराचे प्रेम आज प्रत्येक ख्रिस्ती बांधवात आले आहे. तेच प्रेम आपण एकमेकांना दिले पाहिजे जेणेकरून आपण सर्वजण शांतीने, प्रेमाने, एकजूटीने व सलोख्याने जीवन जगू. सर्वांना नाताळच्या हार्दिक शुभेछा.   

विश्वासू लोकांच्या प्रार्थना :

प्रतीसाद : हे बाळ येशु आमच्या हृदयात प्रेमाचा उगम होऊ दे.

१. बाळ येशूच्या प्रेमाची व शांतीची घोषणा जगात पसरविण्याची जबाबदारी आपले पोप फ्रान्सिस, कार्डिनल्स, धर्मगुरू, धर्मबंधु, धर्मभगिनी व प्रापंचिक करीत आहेत. ह्या मिशन कार्यात त्यांना प्रभूची कृपा मिळावी व त्यांचे कार्य सुरळीतपणे चालावे म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करूया.
२. ज्या कुटुंबात अशांती, मतभेद, राग व अडी-अडचणी आहेत, अशा सर्व कुटुंबांना बाळ येशुचे प्रेम लाभावे आणि त्यांचे जीवन शांती, प्रेम आणि एकोपा इत्यादीं मूल्यांनी भरावे म्हणून सर्व शक्तिमान परमेश्वराकडे प्रार्थना करूया.
३. लहान बालकांना जवळ बोलावून प्रेम करणाऱ्या येशूचा आशिर्वाद सर्व लहान बालकांवर येऊन गर्भपात, बाळ मजुरी, लैगिक शोषण व शिक्षणापासून वंचित यासारखे अन्याय व अत्याचार थांबावे व त्यांची समाजात प्रगती होऊन त्यांना मानाने जगता यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आज अनेक लग्न झालेल्या जोडप्यांना मुलंबाळ झालेले नाही. बाळ येशूने त्यांची याचना ऐकून त्यांच्या प्रेमवेलीवर प्रेमाचे पुष्प फुलवावे व त्यांच्या जीवनात नेहमी आनंद व सुख नांदावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. रोग्यांना आरोग्य देणारा, दुःखीतांचे दुःख कमी करणारा येशू धरतीवर अवतरला आहे. ह्या क्षणाला जे लोक मोठ्या आजारांना बळी पडून, हॉस्पीटलमध्ये, खाटेवर व एकटेच आहेत अशा सर्व पिढीत लोकांना बाळ येशूच्या प्रेमाचा आरोग्यदायी स्पर्श व्हावा व त्यांची आजारातून व दुःखातून मुक्ती व्हावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. नोकरी, व्यवसाय, योग्य जीवन साथीदार, व्यवस्थित घर, व जेवण इत्यादी गरजा  साध्य करण्यासाठी आजची तरुण-पिढी वाईट मार्गाचा अवलंब करून अंधकारात  जिवन जगत आहेत. अशा तरुणांना योग्य ते मार्गदर्शन व प्रेम मिळून चागले ते जीवनात करण्याची सुबुद्धी बाळ येशूने द्यावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.
७. आपण थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक गरजांसाठी तसेच ज्यांना आपल्या प्रार्थनेची गरज आहे त्यांच्यासाठी आपण विशेष प्रार्थना करूया.





No comments:

Post a Comment