Wednesday, 25 December 2019


Reflection for the Homily of Solemnity of Mary, Mother of God and of New Year (01/01/2020) By: Br. Brian V. Motheghar






देवमातेचा सोहळा


दिनांक: १/१/२०२०
पहिले वाचन:  गणना: ६: २२-२७
दुसरे वाचन: संत पैलाचे गलितीकरांस पत्र: ४:४-७
शुभवर्तमान: लूक: २:१६-२१




 प्रस्तावना:
देव माते मारिया माते, अमूची तू कैवारी.”
          आज आपण नवीन वर्ष २०२० ह्याला सुरुवात करत आहोत. आजच्या दिवशी संपूर्ण देऊळ माता आपल्या आईचा सोहळा साजरा करीत आहोत; म्हणजेच देव मातेचा सोहळा साजरा करत आहेत. त्याच देव मातेला आपण आपले येणारे नवीन वर्ष समर्पित करून वर्षांची सुरुवात करूया. जेणेकरून त्याच मातेचा वरदहस्त आपल्यावर सदैव असावा.
           आजची उपासना आपल्याला देवाने दिलेल्या आशीर्वादा विषयी सांगत आहे. आजच्या पहिल्या वाचनात परमेश्वर इस्राएली लोकांना म्हणजेच; निवडलेल्या प्रजेला त्याचा भव्य - दिव्य आशीर्वाद देतो. तसेच आजच्या दुसऱ्या वाचनात आपल्याला देवाला अब्बा, बाप या नावाने हाक मारायला हक्क प्रभू येशू द्वारे मिळाला आहे, ह्याविषयी सांगण्यात आले आहे. त्याच प्रमाणे आजच्या शुभवर्तमानात आपल्याला संत लूक प्रभु येशूचे पहिले साक्षीदार व सुवार्तिक; म्हणजेच 'पवित्र मरिया, संत योसेफ, व मेंढपाळ' ह्यांच्या सुवार्तिक कार्याविषयी सांगत आहे.
          आजच्या  मिसाबलिदान सहभागी होत असताना, आपण प्रभूकडे प्रार्थना करूया की, हे नवीन वर्ष त्याच्या मातेच्या मध्यस्थीने सुख - समाधानाचे, समृद्धीचे, आनंदाचे आणि एकमेकांवर परमेश्वराची दया, प्रेम,आणि स्नेह दाखविण्याचे जावो.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: गणना: ६: २२-२७

            प्रस्तुत उताऱ्यात देव मोशे मार्फत इस्राएली लोकांना त्यांच्याच कुळातील एका जातीच्या लोकांना म्हणजेच; देवाने आज्ञा केलेल्या आरोनचे वंशज त्यांना लेवी किंवा याजकपण बहाल करतो, व त्याप्रमाणे देवाच्या लोकांसाठी विपुल असा आशीर्वाद मिळावा म्हणून; देवाजवळ प्रार्थना करत आहेत असे सांगितले आहे. याजकांनी देवाच्या लोकांना कोणता आशीर्वाद द्यावा? याविषयी ही सांगण्यात आले आहे.
          आशीर्वाद हे देवाने केलेल्या कराराचे प्रतीक होते. त्याद्वारे लोक देवाबरोबर एकनिष्ठ राहणार याची शाश्वती ते देत होते. आब्राहमाद्वारे केलेल्या कराराची पूर्णता एक दिवस होणार. त्यावेळी या आशीर्वादाची ही पूर्णतः होणार, असे सांगण्यात आले आहे. ह्या आशिर्वादाद्वारे परमेश्वर सदैव त्यांच्या बरोबर असणार आहे, हा त्यांचा विश्वास होता. म्हणून अहरोन देवाच्यावतीने त्यांना आशीर्वाद देतो; तो असा की, अडीअडचणीच्या आणि दुःखाच्या वेळी देव त्यांचा सांभाळ करणार; त्याच्या मुख प्रकाशाने ते कृपावंत होणार. त्यांच्यावर परमेश्वर प्रसन्नतेने पाहणार व त्याद्वारे त्यांच्या जीवनात शांती प्रस्थापित होणार.  त्याद्वारे परमेश्वराचे नाव सदैव त्यांच्या ओठावर व त्यांच्यामध्ये रुतले जातील. अश्याप्रकारे परमेश्वर त्याच्या जनतेला आणि लेकरांना आशीर्वादीत करणार.

दुसरे वाचन: संत पैलाचे गलितीकरांस पत्र: ४:४-७

             परमेश्वराने अनेक रित्या मानवजातीच्या बरोबर राहण्याचा प्रयत्न केला. त्याने सृष्टीद्वारे व संदेष्ट्यांद्वारे त्यांना आशीर्वादित केले. जगात पाप वाढल्यामुळे आशीर्वादाची जागा शापाने भरली व मानवजात ही शापाने ग्रासली गेली. परंतु दयाळू देवाने मानवा बरोबरचा संबंध कधीही दुरावला नाही तर तो त्यांच्याबरोबर सदैव राहिला. काळाची पूर्तता होताच जुन्या करारात भाकीत केल्याप्रमाणे; त्याने आपला एकुलता एक पुत्र मानवाच्या कल्याणासाठी, मानवाच्या रुपाने, पवित्र मरियेच्या उदरी आशीर्वाद म्हणून पाठविला. येशू मानवी रुपाने मानवाच्या तारणासाठी आला. जेणेकरून मानवाचा मानवा बरोबरचा व देवा बरोबरचा संबंध दृढ व्हावा व एकजुटीने, एका आवाजात देवाला आब्बा, बापा या नावाने हाक मारण्यास शिकवले. देव बापाने पुत्राच्या सामर्थ्याने गुलामगीरीचे राज्य नष्ट करून, पुत्राचे राज्य अस्तित्वात आणले. अशाप्रकारे पवित्र मरीयेच्या उदरी जन्मलेला येशू लोकांसाठी आशीर्वाद म्हणून या भुतलावर उतरला.

शुभवर्तमान: लूक: २:१६-२१

            शुभवर्तमानकार संत लूक आपल्याला आजच्या शुभसंदेशात येशू जन्माची पुनरावृत्ती करत आहे. देवदूताने दिलेल्या संदेशाप्रमाणे मेंढपाळ, घाईघाईने गाईच्या गव्हाणीत गेले. त्यांना मार्गदर्शन केल्याप्रमाणे पवित्र मरिया, योसेफ व बाळ येशू त्यांच्या नजरेस पडले. येशूच्या दर्शनाने मेंढपाळ आशीर्वादित झाले व त्याचे गुणगान गाऊ लागले.
          देवाच्या तारणदायी कार्यात पवित्र मरिया ही अग्रस्थानी आहे; हे आपल्याला दिसून येते. कारण पवित्र मरीयेच्या एका होकाराने देवाचा जन्म ह्या भूतलावर संभव झाला. तिच्या जीवनात घडलेल्या अनेक  प्रसंगाविषयी व अनुभवाविषयी तिने ह्या सर्व गोष्टी आपल्या हृदयात साठवून ठेवल्या. तेच अनुभव व प्रसंग प्रभू मेलेल्यातून उठल्यावर त्याच्या शिष्यांना त्यांचे सांत्वन करण्यासाठी व एकजुटीने राहण्यासाठी  आशीर्वादाचे प्रतीक बनावे म्हणून ती ते त्यांना व्यक्त करत असे.
          सुंता करणे हे अब्राहमाद्वारे केलेल्या कराराचे बाह्यरूप होते (उत्पत्ती १७:१२; लेविय १२:३) त्याद्वारे  बाळाला नाव दिले जात असे. येशू हे नाव इब्री भाषेत यहोशुआ (Joshuah)  म्हणजेच 'सर्वसमर्थ देव रक्षण करतो' असे आहे. मत्तय १:२१ मध्ये ह्याचाच अर्थ योसेफाला स्वप्नात सांगितलेला आहे. ह्या सर्व गोष्टींची पूर्णता येशू जन्माने आपल्यामध्ये झालेली आहे.

बोधकथा:

            एकदा एक मनुष्य नौकाभंगामुळे एका बेटावर एकटा अडकलेला होता. त्याने त्याच्या परीने कितीतरी प्रयत्न केले, दुसऱ्यांना इशारा करून त्याच्याकडे बोलावण्याचा प्रयत्न केला. परंतु, कोणीही आले नाही. काही दिवस लोटल्यानंतर त्याने आपल्या उपजीविकेसाठी काही साधन व एक छोटीशी झोपडी बांधली व तो तिथे राहू लागला. उपजीविकेच्या अभावामुळे तो काही तरी शोधण्यास गेला असता; त्याला आढळले की त्याची झोपडी आगीने पेट घेत होती, ती जळून राख झाली होती. तो त्या रात्री देवावर क्रोधीत झाला होता. कारण त्याला वाटले की देवाने आपले वाईटच योजिले आहे. त्याच रागाने तो झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी जहाजाच्या आवाजाने तो मनुष्य उठला. आश्चर्याने त्याने ते जहाज आपल्या जवळ येताना पाहिले. आश्चर्यचकित झालेल्या मनुष्याने जहाजाच्या मालकाला विचारले की, "तुम्हाला कसे काय ठाऊक की मी इथे आहे?" तेव्हा जहाजाच्या मालकाने त्याला उत्तर दिले की, "आम्ही धुराच्या इशाऱ्याने इथे आलो आणि आम्हाला समजले के कोणी तरी संकटात आहे. म्हणून आम्ही आलो." तेव्हा त्या माणसाला कळून चुकले की, जे काही होते ते सर्व भल्यासाठी होते. तो देवाचे आभार मानू लागला, कारण देवाने त्याच्यावर कृपादृष्टीने पाहिले होते.

बोध:
             देवाची योजना ही मानवी योजना व विचारा पलीकडे आहे. कारण देव जे काही करतो ते मानवाच्या भल्यासाठी करतो व आपल्याला आशीर्वादाने भरून टाकतो.

मनन-चिंतन:

           आज आपण पवित्र मरिया देव माता किंवा देवाची माता हा सोहळा साजरा करीत आहोत. पवित्र मरिया ही देवाची माता हे शीर्षक इ.स. ४३१ येथे घडलेल्या एफेसूस म्हणजेच वर्तमान काळात तुर्कस्थान ह्या ठिकाणी भरलेल्या परिषदेत देण्यात आले होते. याचा अर्थ असा की, पवित्र मरिया ही प्रभू येशूची आई; जो जगाचा तारणारा झाला, जो  देवपुत्र होता, त्याची आई असे आहे. हा सन्मान मानवी योजने पलीकडे होता.  तो खुद्द देवाने तिला बहाल केला आहे. जे मानवाला शक्य नाही ते देवाला आहे, असे आपल्याला ह्यावरून आढळते. ज्याप्रमाणे मारियेने गायिलेल्या स्तोत्र गीतात ती म्हणते, "देव जो माझा तारणारा; त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे; कारण 'त्याने' आपल्या दासीच्या दैन्यावस्थेचे अवलोकन केले आहे." (लूक १:४७-४८) कारण देव तिला विसरला नाही; तर तिचा सन्मान केला आहे. जी आपल्या मधली साधीसुधी स्त्री होती तिला त्याने आशीर्वादित केले व महान केले आहे. कारण जुन्या करारात घडलेल्या सर्व गोष्टी म्हणजेच; देवाने निवडलेल्या प्रजेबरोबरचा संवाद, अब्राहमाला पाचारण, इजिप्त देशातून पलायन, याजकाची नेमणूक व त्यांचा भव्यदिव्य आशीर्वाद, हे सर्व देवाच्या अनंत आशीर्वादासाठीची जी योजना होती की प्रभु जन्माने पूर्णत्वास येणार होती. प्रभू येशूने मानवी रूप धारण केले की, त्याद्वारे तो आपल्याला आपल्या देव त्याच्याबरोबर एकनिष्ठ ठेवील. आपला देवा बरोबरचा संबंध अजून कनिष्ठ करणार. हे सर्व अस्तित्वात आणण्यासाठी देवाने एका साध्याभोळ्या मानवाची निवड केली. जेणेकरून जी परमेश्वराने भाकीत केलेली सर्व आश्वासने व आशीर्वाद मरियेद्वारे, ह्या भूतलावर पूर्णत्वास आली आहेत. मारियेच्या एका होकाराने हे शक्य झाले, "पहा मी प्रभूची दासी आहे; आपण सांगितल्या प्रमाणे माझ्या ठायी होवो." (लूक १:३८) त्याच क्षणी तिच्यामध्ये प्रभू येशूचा गर्भसंभव झाला. देवपुत्र तिच्या उदरी राहिला. ह्याचा पुरावा आपल्याला गाब्रियल देवदूताने केलेल्या अभिवादनात आढळते, "हे कृपा पावलेल्या स्त्रीये कल्याण असो; प्रभू तुझ्याबरोबर आहे." (लुक १:२८) ह्याचा अर्थ असा की, ती देवाच्या पूर्ण घनिष्ठ मैत्रीत होती. देवाचा आशीर्वाद व वरदहस्त तिच्यावर होता. त्याने त्याचे मुख तिच्यावर प्रकाशित केले होते.
              पुढे आलीशीबा मरीयेला "स्त्रियांमध्ये तू धन्य." (लूक १:४२) असा आशीर्वाद देते; म्हणजेच देव तिच्याबरोबर आनंदित होता. ह्याच कारणासाठी तिला निष्कलंक ठेवले होते. ती संपूर्ण मानवजातीतून निवडलेली होती. जेणेकरून ती संपूर्ण मानवजातीची माता व संपूर्ण सृष्टीची माता म्हणून गणली जावी. या दैवी प्रेमी कृपेद्वारे व अनुग्रहाद्वारे जगाचा तारणारा ह्या भूतलावर जन्माला आला. आज आपल्या मानवजातीला मारियेच्या ह्या उत्कृष्ट उदाहरणाद्वारे नवीन स्थान प्राप्त झाले आहे. तसेच अलौकिक स्तिथी ही आपल्याला देण्यात आली आहे; ते म्हणजे आपण देवाची मुले म्हणून संबोधले जाते. देवाची प्रजा ह्यावरून आपण देवाची मुले असे आपणाला देऊ केले आहे. कारण ख्रिस्त आपला बंधू व त्याच्या राज्याचे वारसदार म्हणून आपण ओळखले जाते.
          आजच्या ह्या आभार बलिदानात आपण देवाचे आभार मानूया की, मारिये द्वारे मिळालेल्या कृपादनांनी आम्हाला सुद्धा तीच कृपादाने मिळाली आहेत. देवाची माता होऊनही ती सुद्धा आमची ही माता आहे. तिच्याकडे मध्यस्थीची प्रार्थना करू या की, माते ह्या जगात तिच्या मध्यस्थीशिवाय आमच्या जीवनाचा मार्ग सिद्ध होत नाही. तिच्याकडे विनवणी करू या की, तिच्या प्रार्थनेने आम्हाला स्वर्गात जाण्याचे मार्ग मोकळे व्हावेत व तिच्या मायेच्या पंखाखाली सतत आमचे संरक्षण करावे म्हणून गाऊया: “तुझ्या मायेच्या पंखा खाली, आश्रय दे आम्हां आई, आश्रय दे आम्हां.”

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: 'हे देवा ह्या नवीन वर्षात आम्हाला आशीर्वादित कर.'

१. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, आमचे परमगुरु, महागुरु, धर्मगुरु, व व्रतस्थ यांना ख्रिस्तसभा योग्य मार्गाने चालविण्यासाठी आणि अखील जगात आशीर्वादाचे प्रतीक होण्यासाठी लागणारी कृपा व शक्ती त्यांना प्राप्त व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, तू जीवनाचा दाता व त्राता आहेस. ह्या नवीन वर्षात आम्हाला सर्वांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे व देवाने आम्हाला सर्वांना आशीर्वादित करावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. देव मातीच्या मध्यस्थीने आम्ही अनाथ, निराधार, परक्‍या, आणि पोरकयांसाठी आशीर्वाद मागतो. आमच्या दानशूर वृत्तीमुळे त्यांचे जीवन सदोदित आशीर्वादमय व्हावे म्हणून, आपण प्रार्थना करूया.
४. ह्या नवीन वर्षात नवीन जीवनाची सुरुवात करण्यास व नाविन्याने जीवन देव सेवेसाठी समर्पित करण्यास लागणारे कृपा-वरदान आम्हाला प्राप्त व्हावे म्हणून, आपण प्रार्थना करूया.
५. ज्या स्त्रिया मातृपदाची अपेक्षा आपल्या मनात बाळगून आहेत, अशांवर देवाचा आशीर्वाद यावा व त्यांना मातृपद प्राप्त व्हावे म्हणून, आपण प्रार्थना करूया.
६. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक, व सामाजिक गरजा प्रभू चरणी समर्पित करूया.



Sunday, 22 December 2019


Reflection for the Feast of Holy Family (29/12/2019) By Br. Suhas Fereira.

पवित्र कुटुंबाचा सोहळा




दिनांक: २९/१२/२०१९
पहिले वाचन: बेनसिरा ३:२-६,१२-१४
दुसरे वाचन: कलस्सैकरांस पत्र ३:१२-२१
शुभवर्तमान: मत्तय २:१३-१५,१९-२३


विषय: जे कुटुंब एकत्र प्रार्थना करते, ते कुटुंब एकत्र राहते.

प्रस्तावना:

आज देऊळमाता पवित्र कुटुंबाचा सोहळा साजरा करीत आहे. योसेफ आणि मरिया यांच्या जीवनवेलीवर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानेख्रिस्तहे फुल उमटलेले आहे. योसेफ आणि मरिया दोघांच्याही प्रेमामध्ये प्रभू येशू वाढत गेला. प्रभू येशूच्या जीवनाविषयी वाचल्यास आपणाला कळते की, प्रभू येशू हा फक्त योसेफ आणि मरियेच्या जीवनाचाच नव्हे; तर आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा, कुटुंबाचा केंद्रबिंदू बनला आहे.
आपले कुटुंब ही ख्रिस्त संस्काराची शाळा आहे. या शाळेत आपल्याला चांगल्या गुणांचे बाळकडू पाजले जाते. आपल्या सामाजिक जीवनाची जडण-घडण ही प्रथमतः कुटुंबातच होत असते. जसे आपण आपल्या कुटुंबांमध्ये घडविले जातो, तसेच पुढे जाऊन आपण समाजामध्ये वावरत असतो.
आज आपण या मंदिरामध्ये एकत्रित जमलो असताना, आपण सर्वांना देवाची भरपूर अशी कृपा लाभावी, तसेच एक पवित्र कुटुंब म्हणून सर्वांनी एकोप्याने नांदावे आणि ख्रिस्ताच्या प्रेमाचा संदेश इतरांना द्यावा म्हणून प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: बेनसिरा ३:२-६,१२-१४

आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपणास आपल्या आई-वडिलांविषयी आदर-सन्मानाने वागण्यासाठी सल्ला दिलेला आहे. जे आपल्या आई-वडिलांना मानाने वागवतात व ज्यांच्यावर आपल्या आई-वडिलांचा आशीर्वाद आहे, तेच खरे श्रीमंत मनुष्य होत.

दुसरे वाचन: कलस्सैकरांस पत्र ३:१२-२१

आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये संत पौल आपणा सर्वांना प्रेमाने, मायेने, करुणेने,सौम्यतेने वागण्यासाठी बोध करत आहे. कुटुंबामध्ये प्रत्येक व्यक्तीने इतरांना समजून घेऊन एकमेकांशी सलोख्याने वागले पाहिजे, तसे केल्यानेच आपण इतरांना ख्रिस्ती होण्याची शाश्वती देऊ शकतो.
शुभवर्तमान: मत्तय २:१३-१५,१९-२३

आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण वाचतो की, कशाप्रकारे देवाच्या दूताने योसेफाला स्वप्नामध्ये संदेश दिला आणि मरिया व बाळ येशू ह्यांना घेऊन इजिप्त देशामध्ये पलायन करण्यास सांगितले. त्यानंतर पुन्हा शास्त्रलेखात लिहिल्याप्रमाणे योसेफ येशूला घेऊन पुन्हा गालीलात स्थिरावला.

बोधकथा:
        एकदा एक धर्मगुरु एका घरामध्ये प्रार्थना करण्यासाठी गेले होते. सुंदर, भव्य-दिव्य असा बंगला बघून धर्मगुरूंना अतिशय आनंद झाला. घरामध्ये प्रार्थना करून धर्मगुरू लहान मुलांशी गप्पा-गोष्टी करू लागले. गप्पा-गोष्टी करता-करता धर्मगुरूंनी सहजच लहान मुलाला प्रश्न विचारला, “हे बाळा; तुला आई जास्त आवडते की बाबा?” त्यावर मुलगा म्हणाला, “दोघेही नाही. मला तर आजी-आजोबा जास्त आवडतात. परंतु मम्मी सांगते, आजी-आजोबाकडे जायचे नाही, ते दोघे वृद्धाश्रमामध्ये चांगले राहतील. घरचं जेवण त्यांना पचत नाही.त्यावरून धर्मगुरूंना घरातील तालमोल बरोबर नसल्याच समजलं आणि धर्मगुरूंनी मुलांच्या आई-वडिलांना मुलांच्या मनावर होणाऱ्या परिणामाचा धडा शिकविला. तसेच घरात मोठ्या माणसांची सावली किती महत्त्वाची असते, हे ही पटवून सांगितले. त्यावर दोघांनीही धर्मगुरूंची माफी मागितली आणि त्यांना त्यांची चूक समजली.

मनन चिंतन:

आई-वडिलांसारखं जीवापाड प्रेम करणारे या जगात दुसरे कोणीही नसतात. रात्रीचे दिवस करून आपल्या मुलाबाळांसाठी अतोनात कष्ट सहन करणाऱ्या ह्या आई-वडिलांच्या कौतुकाला बोल नाहीत. आई-वडिलांविषयी जितके बोलावे तितके कमीच आहे. आई-वडील हे देवाचे रूप असते. असे म्हणतात की, देव सर्वत्र हजर राहू शकत नाही, म्हणून त्याने आई आणि वडील ह्यांची निर्मिती केली.
परंतु आज ह्या दैवी प्रतिमेला फारसे महत्त्व उरले नाही. आज अनेक कुटुंबांमध्ये म्हाताऱ्या आई-वडिलांकडे मुलांचे दुर्लक्ष होत चालले आहे. मुलांना त्यांचे आई-वडील ओझे बनलेले आहेत. लग्न झालं की, बायकोच्या विचारांना होकार देत नवरा आपल्या जन्मदात्या आई-वडीलांना शिवीगाळ करत घराच्या बाहेर हाकलून देतो. कधी-कधी वृद्धाश्रमात एका कोपऱ्यात बसलेल्या त्या आईच्या डोळ्यातील अश्रू पाहून रडायला येते. आज कितीतरी तरुण-तरुणी आपल्या स्वार्थापायी, आपल्या स्वतःच्या आई-वडिलांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखविला आहे. महिन्यातून एकदा तर सोडाच परंतू वर्षातून एकदा भेटण्यासाठी ही आजच्या पिढीकडे वेळ नाही. पैसा, संपत्ती, जागतिक मोह ह्यामध्ये आजची पिढी ही फारच भरकटून गेली आहे.
आपल्या म्हातार्‍या आई-वडिलांची सेवा करणे, त्यांना मान-सन्मान देणे ह्या गोष्टीची आज अत्यंत गरज आहे. ज्याप्रमाणे बिनसिराच्या पुस्तकामध्ये म्हटली आहे, “संपूर्ण मनाने तुझ्या पित्याला मान दे, आणि आईने सोसलेल्या प्रसव वेदना विसरू नको, त्यांनी तुला जन्म दिला आहे त्यांची आठवण ठेव.” (बेनसिरा ७:२७) प्रत्येक कुटुंब हे एक मंदिर असते. त्या मंदिरामध्ये आपल्या वयस्कर व्यक्ती ह्या त्यात देवाचे रूप असतात. म्हणून त्यांचा मान राखणे, आदर, सन्मान करणे हे अतिशय महत्त्वाचे असते. ह्या मंदिरांमध्ये अहंकारापेक्षा नम्रतेला जास्त महत्व असते. आज सुखापेक्षा आत्मत्यागाला जास्त किंमत असते. म्हणून अशा कुटुंबाचे महत्त्व लक्षात घेऊन अशा कुटुंबांचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही आपणा सर्वांची आहे.जसे आपण पेरणार तसेच उगवणार.आज जर आपण आपल्या आई-वडिलांना घराबाहेर काढून टाकणार आहोत तर, उद्या आपली मुलं-बाळं सुद्धा आपल्याला घराबाहेर काढून टाकणार.
आपण पवित्र मरिया, जोसेफ व येशू ह्यांच्या पवित्र कुटुंबाकडे पाहिले तर आपल्याला भरपूर काही शिकावयाला मिळते. ह्या कुटुंबांमध्ये शांती, प्रेम, सलोखा होता; कारण त्यांनी देवाच्या इच्छेला प्रथम स्थान दिले होते. जेव्हा-जेव्हा त्यांच्यावर दुःख प्रसंग आले, तेव्हा-तेव्हा त्यांनी देवाकडे प्रार्थना केली. त्यामुळे त्यांच्यावर देवाची कृपा सदैव होती. फादर पेयटोन असे म्हणतात की, “जे कुटुंब एकत्र प्रार्थना करते, ते कुटुंब एकत्र राहते.आपणा सर्वांच्या कुटुंबामध्ये नित्यनियमाने प्रार्थना व्हावी; तसेच आपणा सर्वांचे कुटुंब देवाचे निवासस्थान बनावे, म्हणून आज आपण विशेष करून प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे प्रभू तुझ्या पवित्र कुटुंबाचा आदर्श आम्हाला लाभू दे.

१. आपले परम-गुरुस्वामी, महा-गुरूस्वामी, कार्डिनल्स, सर्वधर्मगुरू आणि व्रतस्थ; तसेच येशूची सुवार्ता जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविणारे सर्व प्रापंचिक या सर्वावर प्रभूचा आशीर्वाद राहावा व त्यांना त्यांचे काम व्यवस्थितरित्या पार पाडण्याकरिता देवाची कृपा नेहमीच लाभावी म्हणून प्रार्थना करूया.
२. इथे उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांच्या कुटुंबात शांती, प्रेम सतत नांदावे तसेच आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांवर देवाचा आशीर्वाद नेहमी राहावा म्हणून प्रार्थना करूया.
३. आपल्या घरात असलेल्या वृद्ध आई-वडिलांना चांगले आरोग्य लाभावे आणि त्यांच्या आजारपणात त्यांना परमेश्वराच्या कृपेने चांगेले स्वास्थ नेहमी लाभावे म्हणून प्रार्थना करूया.
४. जे तरुण-तरुणी योग्य साथीदाराच्या शोधामध्ये आहेत, त्यांना योग्य अशा साथीदाराची जोड मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आता आपण थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.




Reflection for the Homily of Christmas Vigil Mass (25/12/2019) By: Br. Roshan Rosario 



   ख्रिस्त जयंतीनाताळ  (मध्यरात्रीची मिस्सा)

   


दिनांक: २५/१२/२०१९
पहिले वाचन: यशया ९:१-६
दुसरे वाचन: तीताला पत्र २:११-१४
शुभवर्तमान: लुक २:१-१४


प्रस्तावना:

          ‘अंधकारात चालणाऱ्या लोकांनी एक मोठा प्रकाश पाहिला आहे.’ (यशया ९:२अ) डिसेंबर महिना हा वर्षाचा शेवटचा व सर्वात काळोखाचा महिना आहे. ह्या वेळेला आपल्याला प्रकाशाची किंमत कळते. ख्रिस्ती लोकांसाठी नाताळ म्हणजे; ह्या जगाच्या अंधकारमय वातावरणात देवाचे प्रकाशमय आगमन होय. जर ख्रिस्ताचा  प्रकाश या जगात आला नसता, तर या जगात अंधकार किती पसरला असला असता? ख्रिस्ताचा प्रकाश आपणाला आरोग्य, मुक्ती व जीवन घेऊन येत असतो. आपण देवाची लेकरे आहोत.
          आज आपण  देवाकडे असे विनवूया की, ज्या प्रकारे गव्हाणीत मेंढपाळांना आनंदाचा अनुभव आला होता व त्यांचे जीवन प्रकाशमय झाले होते त्याच देवाचे प्रकाशमय तेज आपल्या भोवती प्रकाशित व्हावे व नाताळाचा हाच आनंदमय अनुभव आपणास  मिळावा म्हणून आपण ह्या पवित्र मिस्साबलिदाना मध्ये मागुया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: यशया ९:१-६

          आजच्या पहिल्या वाचनात झबलून व नफताली हे प्रांत येथे विशेष महत्त्वाची आहेत. यशया संदेष्टा हा राजा आहाजला भेटल्यानंतर थोड्याच वेळात ती दोन्ही प्रांते आशरच्या हाती पडले. इस्रायली लोकांना प्रथमच गौरव पहावयास मिळणार होता. परंतु या लक्षणीय भाकीताकडे पुढे त्यांचे दुर्लक्ष झाले. पहिल्या वाचनामधून सुटकेचे आश्वासन आणि वाढता हर्ष दिसून येतो, कारण युद्धाची आणि विध्वसांची चिन्हे दूर झाली आहेत. मुक्ती देणाऱ्याला पाहावयास आम्ही उत्सुक आहोत. पुढच्या येणाऱ्या काळात गीदोना सारखा एखादा वीर नव्हे, तर बाळच आम्हाला दिसेल, आणि इम्मानुएल या नावाने तो ओळखला जाईल.

दुसरे वाचन: तीताला पत्र २:११-१४

          आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौलाने आपले लक्ष येशूच्या दुसऱ्या येण्याकडे केलेले आहे.  आपले वर्तन कसे असावे याचा उल्लेख यात केलेला आहे. येशूचे आगमन सार्वत्रिक महत्त्वाचे आहे व हे निर्विवाद सत्य आहे. देवाने आपल्या कृपेने तारणाची देणगी सर्वांना मिळने शक्य केलेले आहे. अभक्तीला आळा घालने हा देवाच्या कृपेचा एक मुख्य हेतू आहे. देवाच्या कृपेचा आधार नसेल तर संयमित आचरण ठेवणे शक्यच नाही असे संत पौल आपल्याला उद्देशून सांगत आहे.

शुभवर्तमान: लुक २:१-१४

 आजचे शुभवर्तमान आपल्याला मानवासाठी दिलेल्या सर्वात अमूल्य भेटीविषयी (प्रभू येशू ख्रिस्त) सांगत आहे.
1.      योसेफ हा मरिया हिला बरोबर घेऊन बेथलेहेम गावी नावानिशी लिहून देण्यासाठी जातो. नाझरेथ व बेथलेहेम या मधील अंतर हे ८० की.मी आहे. दूरवरून येणाऱ्या लोकांनी स्वतःसाठी जेवण व खाद्यपदार्थ आणले होते. बेथलेहेम हे शहर गर्दीने तुडुंब भरलेले होते. त्यामुळे गाईच्या गोठ्यात जेथे जनावरांना खाद्य दिले जाते अशी जागा त्यांना मिळाली. प्रभूयेशुला या भूतलावर असताना दोनच ठिकाणी  जागा मिळाली: गोठ्यात आणि क्रुसावर. (crib/ cross)
2.   तारणाऱ्याच्या जन्माची पहिली सुवार्ता मेंढपाळांना समजते. मेंढपाळ हे कोण होते?समाजात कमी समजले जाणारे लोक ज्यांना समाजात जास्त मान सन्मान नव्हता. ते साधे-सामान्य लोक होते. हे जे मेंढपाळ होते हे मंदिरात होमार्पणासाठी कोकरू अर्पण करीत असत. त्यांच्या कडून अर्पणासाठी कोकरू विकत घेतले जात असत. त्याच मेंढपाळांना जगात येणाऱ्या खऱ्या कोकराची ओळख किंवा शुभवार्ता देण्यात आली.

बोधकथा:

          एके दिवशी सेनेमध्ये भरतीसाठी उमेदवार सेनेच्या कार्यालयात जमले होते. ठरलेला वेळ निघून गेला होता. परंतु जनरलच्या कार्यालयातून कोणाला पण बोलावणे आले नव्हते. तसेच ऑफिसमधून सतत टाईपरायटरचा आवाज येत होता. थोडे उमेदवार एकमेकांशी गप्पा गोष्टी करून वेळ घालवत होते तर काहीजण वर्तमानपत्र वाचण्यात रमले होते. तेव्हा एक उमेदवार उठून थेट कार्यालयाचे दार उघडून आतमध्ये शिरला. कार्यालयातून एक चिटणीस (secretary) आली आणि अशी घोषणा केली की, कामासाठी उमेदवार निवडलेला आहे. त्या टाईपराईटरच्या माध्यमातून ह्या सर्व उमेदवारांना एक गुप्त संदेश देण्यात आला होता, की ज्यांना मुलाखत द्यायची आहे त्यांनी आत यावे. पण या आदेशाचे आकलन फक्त एका उमेदवारा शिवाय  कोणीहि केले नाही, आणि तोच उमेदवार योग्य उमेदवार म्हणून निवडलेला गेला आहे.
बोध: आपल्याला संदेष्ट्याद्वारे तारणाचा संदेश देण्यात आला आहे परंतु आपण तो स्वीकारला आहे का? व त्याला प्रतिसाद दिला आहे का?

मनन चिंतन:

          माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो आजच्या ह्या शुभ रात्री देवाने आपल्यावर प्रभू येशूच्या  जन्माद्वारे प्रेमाचा संदेश दिला आहे व त्यावर आपला प्रतिसाद कसा ह्या विषया वर मनन चिंतन करूया. गोष्टींमध्ये ऐकलेल्या उमेदवाराने जसा प्रतिसाद दिला त्याच प्रमाणे आपणही द्यायला हवा. इतिहासात असेच बरेच व्यक्ती आहेत की ज्यांनी ही देवाच्या हाकेला निःसंशय प्रतिसाद दिला.
          पहिल्या प्रथम आपल्यासमोर मरीयेचे उदाहरण आहे. मरीयेने दूताच्या वचनावर विश्वास ठेवून येशू ख्रिस्ताला आपल्या तारणासाठी जन्म देण्यास होकार दिला. इतकेच नव्हे तर मरीयाने  देवाच्या योजनेला निःसंशयास  सतत होकार दिला.
          दुसरा प्रतिसाद आहे तो म्हणजे जोसेफचा. मरीयेचे गर्भधारण जोसेफला स्वीकारण्यास अवघड व कठीण होते पण त्याने देवाच्या योजनेवर विश्वास ठेवून, त्यानेही देवाच्या इच्छेला  ऊस्फ़ुर्त प्रतिसाद दिला. जोसेफ ने आपली जबाबदारी निष्ठापूर्वक, कुरकुर न करता स्वीकारली व ती पार ही पाडली.
          तिसरा प्रतिसाद म्हणजे मेंढपाळांनी देवाच्या इच्छेला दिलेला होकार दिला. त्यांनी येशूच्या जन्माचा  संदेश स्वीकारला व त्याला शोधाण्याचे कष्ट घेतले. त्यांच्या प्रतिसादामुळे त्यांना जगाच्या तारणार्‍याचे दर्शन झाले. नंतर ते मेंढपाळ ह्या सर्व गोष्टी पाहून देवाचा गौरव व स्तुती करत परत गेले. जो कोणी देवाच्या इच्छेला प्रतिसाद देतो; देव आशीर्वादाने भरून टाकतो. देव त्याचा संदेश नेहमी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे देतो. कधी तो आपल्या बरोबर पवित्र पुस्तकाद्वारे किंवा मित्रमंडळीने दिलेल्या सल्ल्याद्वारे तर कधी आई-वडिलांनी, शिक्षकांनी दिलेल्या मार्गदर्शनाद्वारे आपल्याला संदेश देतो. जे अध्यात्मिक असतात ते देवाची इच्छा ओळखतात व त्याला योग्य प्रतिसाद देतात. देवाची इच्छा ओळखणे ही सोपी गोष्ट नाही. विशेष करून जेव्हा आपला प्रतिसाद आपल्या कडून मोठ्या त्यागाची अपेक्षा करतो. परंतु आपल्या ह्या  प्रतिसादातून देव नेहमीच आपणाला सुख व समृद्धीची खात्री देत नाही. आपल्यासमोर संत मदर तेरेजा सारखे उदाहरण आहे.  त्यांनी आपले कॉन्व्हेंटचे सुखी-सुरक्षित वातावरण सोडून देवाच्या हाकेला प्रतिसाद दिला व त्यांना सर्व प्रकारचे कष्ट व गरिबी सोसावे लागले. विशेष करून कलकत्त्याच्या रस्त्यावर आपले जीवण अनाथ निराधार लोका सोबत घालवताना त्यांना देवा शिवाय दुसरा कोणताही आधार नव्हता. पण देवाने त्यांच्या ह्या  प्रतिसादला व त्यागमय जीवन यामुळे त्यांना आनंदाने व ध्यैर्याने भरले.
          आपल्या समोर आजच्या समाजात अशे भरपूर उदाहरणे आहेत.  महात्मा गांधी, बाबा आमटे विशेष करून असिसिचे संत फ्रान्सिस व अन्य संत हयांनी जीवनात देवाला दिलेल्या होकाराला मुळे कष्ट व विरोध सहन केले. आज आपण आपल्या जीवनात पाहिले तर जे लोक आपले दैनंदिन जीवन देवाला निसंशयसप्त  पणे प्रतिसाद म्हणून देतात; देव त्यांना शांती व आनंदाने भरतो.  
          दुर्दैवाने आजच्या ह्या आधुनिक जगात देवाची हाक कोणी ओळखत नाही व त्याला प्रतिसाद देत नाही. उलट बहुसंख्य लोक आज क्षणिक सुख देणाऱ्या वस्तू कडे जास्त आकर्षित होतात. आपणही बऱ्याच वेळी अशाच क्षणिक सुखाच्या मागे जातो.  नवनवीन फॅशन व गोष्टीच्या मागे जातो. अधिका अधिक संपत्ती व यश प्राप्त कसे करायचे ह्या स्पर्धेत आहोत. तरीही आज बरेच लोक यश व संपत्ती प्राप्त करून निराश का आहेत? तर ह्याचे मुख्य कारण म्हणजे आपण आपली वाट भरकटलेले आहोत. देवाच्या योजनेला प्रतिसाद न देता आपण स्वतःचे  ऐकूण मनात येते तसे करतो.  देवाची वाट सोडल्या मुळे व आपल्या योजनेला प्राधान्य दिल्यामुळे आपण देवाच्या सुख-शांती, आनंद व प्रेमापासून वंचित झालो आहोत.
          आज हा नाताळाचा सण साजरा करताना आपणही दोन हजार वर्षापूर्वी जसे मरिया-जोसेफ व मेंढपाळानी देवाच्या हाकेला प्रतिसाद दिला त्याचप्रमाणे होकार देण्यासाठी आपल्या मनाची व ह्रदयाची तयारी करूया. बाळ येशूचे ज्यांनी दर्शन घेतले त्याची मन व हृदये आनंदाने भरले होते. आज पुन्हा एकदा बाळ येशू आपल्यासमोर त्याच्या प्रेमाचा व शांतीचा संदेश घेऊन आला आहे.  आपणही त्याच्या प्रेमाचा व शांतीचा अनुभव घेऊया व त्याच्या पाचारणाला व इच्छेला प्रतिसाद द्यायला तयार होउया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद : हे प्रभू तुझ्या प्रेमाने आम्हाला भरून टाक.

१. आज आपण पवित्र ख्रिस्त महासभेचे सर्व ख्रिस्ती बंधू-भगिनी साठी प्रार्थना करूया की जसे बाळ येशू आज शांती व प्रेमाचा  संदेश घेऊन जन्माला आला आहे  तसेच आपणही त्याच्या  प्रेमाचा व शांतीचा संदेश जगात पसरावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आज आपण विशेष करून सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थना करूया ज्या राष्ट्रांमध्ये युद्ध व अशांती आहे तेथील सर्व अधिकारी व पुढारी लोकांनी येशूच्या शांतीचा अनुभव घेऊन सतत शांती साठी झटावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आज आपण सर्व कुटुंबांसाठी प्रार्थना करू या विशेष करून,  जे कुटुंब काही कारणास्तव विभक्त झाले आहेत अशा कुटुंबानी पवित्र कुटुंबाचा आदर्श घेऊन घरात शांतीचे वातावरण निर्माण करावे म्हणून आपण  प्रार्थना करूया.
४. जे कोणी जीवनात निराश आहेत, अशांती व अंधकारात आहेत त्यांनाही  बाळ येशूच्या प्रेमाचा व शांतीचा अनुभव यावा व  त्यांचे जीवन आनंदाने भरावे तसेच त्यांच्या जीवनात बद्दल घडून यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आज आपल्या सर्वाना इथे जमले असताना बाळ येशूच्या प्रेमाचा व शांतीचा अनुभव यावा व आपले जीवन संपन्न व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.



Tuesday, 17 December 2019


Reflection for the Homily of Fourth Sunday of Advent (22-12-2019) By Br. David Godinho






आगमन काळातील चौथा रविवार


दिनांक: २२/१२/२०१९
पहिले वाचन: यशया ७:१०-१४
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र १:१-७
शुभवर्तमान: मत्तय १:१८-२४





विषय: इम्मानुएल’ देव आम्हां बरोबर.

प्रस्तावना:
          आज आपण आगमन काळातील शेवटचा; म्हणजेच चौथा रविवार साजरा करीत आहोत. येशू ख्रिस्ताच्या जन्मावर मनन चिंतन करण्यास देऊळमाता आपणास बोलावीत आहे. कारण दिवस समीप येत आहेत. आपण ख्रिस्तजयंती साजरी करणार आहोत.
          आजची तिन्ही वाचने ‘इम्मानुएल’ म्हणजे ‘आम्हां मध्ये देव’ ह्या सुवार्तेविषयी सांगत आहे. सुमारे ७५० (साडेसातशे) वर्षापूर्वी यशया संदेष्टयाने प्रभू ख्रिस्ताच्या जन्माविषयी भाकीत केले होते. तसेच संत पौल रोमकरांस लिहिलेल्या पत्रात सांगतो की, ज्या सुवार्तेविषयी शास्त्रात पूर्वीच सांगितलेले होते ती सुवार्ता प्रभू येशू ह्याच्याविषयी आहे. शुभवर्तमानात पुन्हा एकदा संत मत्तय येशू ख्रिस्ताच्या जन्माचे वर्णन करून सांगतो की, प्रभूने संदेष्टयांद्वारे केलेले ‘इम्मानुएल’ चे भाकीत ख्रिस्ताच्या येण्याने पूर्ण झाले आहे.
          आगमन काळातील ह्या शेवटच्या रविवारास ‘प्रेमाचा रविवार’ असे ही संबोधले जाते. कारण हा रविवार आपणास देवाच्या प्रेमाची आठवण किंवा जाणीव करून देतो. प्रभू येशूचा जन्म आपणास परमेश्‍वरी प्रेमाची आठवण करून देतो. ह्या प्रेमळ देवाची शुभवार्ता (सुवार्ता) आपल्या कृतीद्वारे इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी लागणारी कृपा परमेश्वराजवळ मागूया व सर्वांना देवप्रितीचा ओलावा देऊया.
 सम्यक विवरण:
पहिले वाचन: यशया ७:१०-१४
          राजा आहाजने इ.स.पूर्व. ७३५ पासून ते ७१६ मध्ये यरुशलेमवर राज्य केले. तो चांगला राजा नव्हता. परमेश्वराच्या दृष्टीने जे चांगले नव्हते ते केले (२ राजे. १६:२) आणि म्हणून देवाने त्यास अरामी लोकांच्या राजाच्या हाती दिले. त्यांनी त्यास जिंकून पुष्कळ लोक दिमिष्कास नेले (२ इति. २८:५) आणि मदतीसाठी परमेश्वराकडे न वळता राजा आहाज असीरिया कडे गेला. तेव्हा संदेष्टा यशया त्यास असिरियावर नव्हे, तर परमेश्वरावर विश्वास ठेवण्यास सांगितले.
          यशया प्रवक्त्याने एवढे सुद्धा राजाला सांगितले की, “जर राजाने परमेश्वराजवळ कोणतीही चिन्हे मागितले तरी परमेश्वर त्यास ती देईल” असे आश्वासन दिले. (यशया ७:१०) परंतु आहाज म्हणाला, “मी ते मागणार नाही, आणि परमेश्वराची परीक्षा पाहणार नाही. (यशया ७:१२) प्रत्यक्षात हा त्याचा प्रतिसाद म्हणजे; दैवी मदतीस दिलेला नकार होता. कारण त्याला असीरियाची मदत नाकारायची नव्हती. म्हणून दैवी योजना स्वीकारण्यास तो तयार नव्हता. म्हणून खुद्द परमेश्वर त्यास एक चिन्ह देतो. (यशया ७:१४) ही एक सर्वात विशेष असे जुन्या करारातील भविष्यवाणीपैकी एक भविष्यवाणी किंवा भाकीत होय.
दुसरे वाचन; रोमकरांस पत्र १:१-७
          संत पौल रोमकरांस लिहिलेल्या पत्रात तो स्वतःस सुवार्तेकरिता वेगळा केलेला, ख्रिस्त येशूचा दास म्हणून संबोधतो.(रोम. १:१) मी जी सुवार्ता घोषविणार आहे, ती प्रभू येशूच्या जन्माविषयीची आहे, ती म्हणजे देवाचा पुत्र मानवी देह धारण करून ह्या भूतलावर अवतरला. ह्या देव पुत्राला अनुसरण्यास आणि त्याचे सुवार्तिक होण्यास प्रत्येकाला पाचारण केलेले आहे. असे संत पौल त्याच्या पत्रातून आपणास बोध करत आहे.
शुभवर्तमान: मत्तय १:१८-२४
          मत्तयच्या शुभवर्तमानातून घेतलेल्या ह्या उताऱ्यात आपणास आढळते की, परमेश्वराचा दूत, लुकच्या शुभवर्तमानात सांगितल्याप्रमाणे मरीयेला संदेश देण्याऐवजी योसेफच्या स्वप्नात येऊन ख्रिस्ताच्या जन्माची सुवार्ता घोषवितो. कारण येशू हा दाविदाच्या कुळातील आहे, हे दाखविण्याचा ह्या मागचा मत्तयचा हेतू होता. ह्याचा अर्थ असा नव्हे की, मत्तय स्त्रियांना कमी महत्त्व देतो. कारण प्रभू येशूच्या वंशावळीत आपण पाच स्त्रियांची नावे वाचतो. ती म्हणजे तामार, राहाब, रुथ, बेथशेबा आणि मरिया. अशाप्रकारे योसेफला ख्रिस्ताच्या जन्माची घोषणा देऊन, पुन्हा एकदा मरियेला आपली पत्नी कशी घेऊन देवाच्या तारणाच्या योजनेत सहभागी केले.
मनन चिंतन:
          ‘आगमन काळ’ हा तयारीचा काळ म्हणून ओळखला जातो. ही तयारी ख्रिस्ताच्या येण्यासाठीची तयारी होय. ह्या आगमन काळाच्या शेवटच्या रविवारी आजची उपासना आपणा समोर परमेश्वराच्या येण्याविषयी, किंबहुना त्याची आपल्यामध्ये असलेल्या उपस्थिती विषयी सांगत आहे. हा परमेश्वर कोठे दूर आकाशात राहणारा परमेश्वर नाही; परंतु एका हाकेच्या अंतरावर असलेला देव आहे. कारण यिर्मया संदेष्ट्याच्या पुस्तकात आपण वाचतो की, परमेश्वर म्हणतो, “मला हाक मार; म्हणजे मी तुला उत्तर देईन.” (यिर्मया ३३:३) तसेच इस्रायल प्रजेचा हाच अनुभव होता, ते म्हणतात, “कारण आमचा देव परमेश्वर ह्याचा आम्ही धावा करतो, तेव्हा तो आमच्या जवळ असतो. त्याच्या सारखे, देव जवळ असणारे महान राष्ट्र दुसरे कोणते आहे?” (अनुवाद ४:७) शेवटी आजच्या वचनात सांगितल्याप्रमाणे हा परमेश्वर ‘इम्मानुएल’ म्हणजे आमच्या सानिध्य देव असा आहे. (यशया ७:१४, मत्तय१:२४)
ईश्वराचा शब्द झाला माणूस ||
जना मध्ये वास त्याने केला ||
          ह्या सुंदर अशा गीताच्या ओवी आजच्या उपासनेचा सारांश आपल्यासमोर ठेवतात. आजची तिन्ही वाचने आपणास ह्याच गोष्टीची आठवण करून देतात. तसेच आजची उपासना आपल्यासमोर तीन गोष्टी ठेवत आहेत.
१) परमेश्वर त्याच्या वेळेनुसार त्याचे वचन पूर्ण करतो.
           सुमारे इ.स.पूर्व. साडेसातशे वर्षांपूर्वी परमेश्वराने यशया संदेष्ट्याद्वारे एक अभिवचन दिले होते की, ‘एक कुमारी गर्भवती होऊन, पुत्र प्रसवेल.’ ते वचन देवाचं किंवा ती भविष्यवाणी साडेसातशे वर्षानंतर प्रभू येशूच्या येण्याने पूर्ण झाली आहे. तसेच जेव्हा लाजारस मरण पावला होता, तेव्हा प्रभू येशू त्याच्या थडग्याजवळ चार दिवसानंतर पोहोचतो, आणि लाजारस मेलेल्यातून उठवितो. (योहान ११:३९-४४) म्हणजेच मनुष्याच्या योजनेनुसार नव्हे, तर देव त्याच्या योजनेनुसार व वेळेनुसार सर्व गोष्टी पूर्ण करीत असतो. म्हणून देवाच्या योजनेस आपण सतत तयारीत राहणे फार गरजेचे आहे. विशेषतः जेव्हा आपली आशा-निराशा होते, तेव्हा देवावर विश्वास किंवा श्रद्धा ठेवणे फार महत्वाचे आहे. कारण असे म्हणतात,
 “भगवान के घर मे देर है, अंधेर नही|
२) परमेश्वर त्याची योजना पूर्ण करण्यास मानवाची निवड करत असतो.
          आपण आताच ऐकलं की, नाझरेथ गावातील मरियेची परमेश्वराने त्याच्या पुत्राची आई होण्यास निवड केली होती. अनेक अशा कुमारीका नाझरेत गावात राहत होत्या, परंतु परमेश्वराने मरियेची निवड केली व योसेफास सुद्धा मरियेचा पती व ख्रिस्ताचा पिता होण्यास निवडले होते. तसेच सुवर्तिक होण्यासाठी पौलाची निवड केली होती. अशा प्रकारे अनेक अशा व्यक्तींची परमेश्वराने त्याची योजना पूर्ण करण्यास निवड केली होती. काही व्यक्तींची यादी मी आपल्यासमोर ठेवू इच्छितो:
          रुथ विधवा होती, एस्थेर परदेशी स्त्री होती, पेत्र कोळी होता, थोमा संशयी होता, सारा असहनशील होती, मोशेने खुन केला होता, योना परमेश्वरापासून दूर पळाला होता, पौल खुणी होता, अब्राहम वयस्कर होता, आणि मरिया कुमारी होती. सर्वांजवळ काही ना काही निमित्त होते. आज परमेश्वर आपणा प्रत्येकास त्याची सुवार्ता पसरविण्यासाठी पाचारण करीत आहे, त्याच्या योजनेला होकार देण्यास आपण तयार आहोत का? असा प्रश्न आपण प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. कारण वर दिलेल्या उदाहरणाद्वारे आपल्या लक्षात येईल की, परमेश्वराच्या योजना आपल्या आकलना पलीकडे असतात. त्या आपल्याला बहुतेक वेळी समजत नाहीत. अशा वेळी, ह्या सर्व व्यक्तीप्रमाणे व विशेषतः मरिये व योसेफ प्रमाणे विश्वासाने देवाच्या योजनेस होकार देणे गरजेचे असते.
३) वैवाहिक जीवनात मरिया व योसेफचा आदर्श.
          तिसरी गोष्ट म्हणजे योसेफ व मरिया आपणासमोर वैवाहिक जीवनाचा आदर्श ठेवत आहेत. ज्याप्रमाणे मरिया व योसेफने परमेश्वराच्या इच्छेस त्यांच्या जीवनात प्राधान्य दिले. त्यांनी एकमेकाला मरेपर्यंत साथ दिली, व एक सुखी, शांततामय व प्रार्थनामय कुटुंब घडवून आणले. त्याचप्रमाणे देवाच्या आज्ञेत राहून प्रत्येक पती-पत्नीने एक आदर्श कुटुंब घडविण्याचा प्रयत्न करण्यास आजची उपासना आपणास पाचारण करत आहे. अनेक वेळा जेव्हा कुटुंबात संशयाचे, अशांततेचे, निराशेचे, प्रसंग उद्भवतात; तेव्हा परमेश्वराच्या योजनेस प्राधान्य देण्यास, त्याच्या योजनेची ओळख करण्यास, पवित्र कुटुंब आपणासमोर आदर्श ठेवत आहे.
          शेवटी देव हा प्रभू येशूच्या रूपाने आपल्यामध्ये हजर आहे. त्याने युगाच्या समाप्तीपर्यंत प्रत्येक दिवस आपल्या सोबत असण्याचे अभिवचन दिलेले आहे. (मत्तय २८:२०) तर त्या ख्रिस्तावरील आपली श्रद्धा दृढ होण्यासाठी आणि योग्य रीतीने त्या परमेश्वराच्या आगमनास आपण तयार असण्यासाठी परमेश्वराची कृपा मागूया.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभू तुझ्या स्वागतासाठी आमची हृदये तयार कर.

१. आपले पोप फ्रान्सिस, सर्व कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरु आणि सर्व व्रतस्थ ह्यांना प्रभूचा विपुल आशीर्वाद मिळावा व त्यांनी देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगून जगाला ख्रिस्ताचा शुभसंदेश द्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. लवकरच आपण ख्रिस्त जयंती साजरी करणार आहोत. म्हणून आपण सर्वांनी योग्यरित्या मनाची व अंतःकरणाची आध्यात्मिक तयारी करावी आणि ख्रिस्त आपला तारणारा ह्याला आपल्या जीवनात स्वीकारावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. नव-विवाहित दांपत्यांमध्ये घटस्फोट घेण्याचे प्रमाण फार वाढत आहे, अशा देवाविरोधक निर्णयाला परमेश्वराचा स्पर्श व्हावा व त्यांनी पुन्हा एकदा परमेश्वरामध्ये एक होऊन त्यांच्या जीवनाची नवीन सुरुवात करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. पिक भरपूर आहे परंतू कामकरी थोडेच आहेतम्हणून मरीयेचा आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन अनेक तरुण तरुणींनी ईश्वराच्या हाकेला प्रतिसाद देऊन प्रभूमळ्यात सेवा करण्यास स्व-ईच्छेने पुढे यावे, म्हणून आंपण प्रार्थना करूया.
५. आपला सर्वांचा देवावरील विश्वास अधिकाधिक बळकट व्हावा व आपण सर्वांनी देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगून ख्रिस्त आपला तारणारा आहे ह्याची साक्ष आपण इतरांना दयावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. थोडा वेळ शांत राहून आपल्या कौटुंबिक व वैयक्तिक गरजा प्रभूचरणी मांडूया.