Tuesday 21 December 2021

Reflection for the Feast of Holy Family (26/12/2021) By Fr. Suhas Pereira.   




पवित्र कुटुंबाचा सण

दिनांक: २६/१२/२०२१

पहिले वाचन: बेनसिरा ३:२-६, १२-१४

दुसरे वाचन: कलस्सेकरांस पत्र ३:१२-२१

शुभवर्तमान: लूक २:४१-५२

 


प्रस्तावना:

          आजच्या रविवारी नाताळच्या दुसऱ्या दिवशी आपण पवित्र कुटुंबाचा सण साजरा करीत आहोत. हा सण खास करून कुटूंब-जीवनाचं मूल्य, महत्व आणि त्याची प्रतिष्ठा यांकडे आपलं लक्ष वेधून घेत आहे. आजच्या पहिल्या वाचनात बेनसिरा मुलांबद्दलच्या आईवडिलांच्या कर्तव्याबद्दल आपल्याला सांगत आहे. हे वाचन आपल्याला सांगत आहे, कि, ज्याप्रमाणे देव आणि मानव ह्यांमध्ये जे अतूट नातं आहे तेच अतूट नातं आईवडील आणि त्यांच्या मुलांमध्ये असलं पाहिजे. मोठ्यांनी लहानांना चांगल्या जीवनाचा आदर्श आणि महामंत्र दिला पाहिजे आणि लहानांनी कुटुंबातल्या थोरांकडून त्यांच्या, जीवनाच्या अनुभवातून धडे घेतले पाहिजेत आणि आईवडिलांना सदैव मान आणि सन्मान दिला पाहिजे. कारण ज्या कुटुंबात आई-वडिलांना त्यांच्या उतारवयातसुद्धा मानाची आणि प्रेमाची वागणूक दिली जाईल, त्या कुटुंबावर परमेश्वराचा आशीर्वाद आणि त्याची कृपा सदैव राहील.

          आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौ आपल्या कुटुंबजीवनाची इमारत प्रेम, विश्वास, करुणा, दयाळूपणा, नम्रता, सौम्यता, धीर, क्षमाशीलता, शांती, प्रार्थना या मूल्यांच्या भक्कम पायावर उभारण्यास आवाहन करत आहे. आजच्या शुभवर्तमानात आपण वाचतो कि, मरीया, आणि योसेफ बारा वर्षाच्या येशूला घेऊन येरुशलेमच्या मंदिरात वल्हांडण सण साजरा करण्यास गेले होते. परंतु येरुशलेमहून परत येताना मरीयेला येशू आपल्याबरोबर नसल्याची जाणीव झाली. तिच्या काळजाचा तुकडा, तिचा लाडाचा पुत्र हरवला होता. म्हणून मरीया आणि योसेफ येशूच्या शोधात येरुशलेमला परत जातात. आणि तिथे प्रभू येशू मंदिरात गुरुजनांच्यामध्ये बसून त्यांच्याबरोबर चर्चा करत असताना त्यांनी पहिले.

          आजच्या या सणाच्या दिवशी पवित्र देऊळमाता नाझारेथच्या पवित्र कुटुंबाचा आदर्श आपल्याला आपल्या कुटुंबजीवनात घेण्यास आमंत्रण आणि पाचारण देत आहे. जेव्हा आपण पवित्र शुभवर्तमानच्या शिकवणीप्रमाणे आणि पवित्र कुटुंबाच्या आदर्शाप्रमाणे आपलं कुटुंब घडवण्याचा आणि आपलं कुटुंबजीवन जगण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्या कुटुंबाचे पवित्रीकरण होते आणि आपलं कुटुंब हे ख्रिस्ताची शिकवणूक आणि मूल्ये आपल्या जीवनात पाळणारी स्थानिक ख्रिस्तसभा बनते. आज आपण आपल्या कुटुंबासाठी आणि सर्व ख्रिस्ती कुटुंबांसाठी खास प्रार्थना करूया आणि सर्व कुटुंबे नाझरेथच्या पवित्र कुटुंबाप्रमाणे प्रेम, दया, क्षमा, शांती आणि प्रार्थना या मूल्यांची घरे नावीत म्हणून परमेश्वराची कृपा मागूया.

 


मनन-चिंतन:

          आपला समाज, आपलं जग आणि आपलं जीवन हे वेगाने बदलत आहे. आणि कुटुंब-जीवनसुद्धा या प्रचंड अशा बदलाला अपवाद नाही. बदलती जीवनपद्धती, व्यवसायामधील स्पर्धा आणि त्यामुळे वाढलेला कामाचा व्याप, अभ्यासाचा भार आणि त्याबरोबरच मोबाईल, संगणक, फेसबुक, व्हॉट्सऍप, इंस्टाग्राम, टिंडर, ट्विटर, यूट्यूबसारखी सोशल मिडिया किंव्हा सामाजिक माध्यमे अशा सर्व कारणीभूत घटकांमुळे कुटुंबाचे सदस्य हे वास्तवापेक्षा व्हर्च्युअल किंव्हा आभासी जगाशी जास्त जोडलेले असतात. त्यामुळे त्यांना कुटुंबात एकत्र येऊन प्रीतिभोजन करण्यास किंव्हा एकमेकांबरोबर मनमोकळेपणाने वार्तालाप करण्यास फारच कमी संधी आणि वेळ मिळत असतो. अशामुळे कौटुंबिक जीवनात प्रेम, जिव्हाळा आणि ऐक्य वाढीस लागण्याऐवजी तणाव, अनादर आणि दुरावा निर्माण होतो.

          आजच्या सणाच्या दिवशी पवित्र देऊळमाता आपल्याला पारंपारिक कुटुंबाहून फारच वेगळ्या आणि आधुनिक जीवनपद्धती अंगिकारणाऱ्या कुटुंबांचा निषेध किंव्हा अशा लोकांची निर्भत्सना करावयास सांगत नाही आणि अशा कुटुंबांचे दोष काढण्यास सांगत नाही. कारण ते आपलं या जगातील मिशनकार्य नाही आणि तसं करण्याचा आपल्याला अधिकारसुद्धा नाही (लूक  , ३७). त्याऐवजी इतरांप्रती प्रेम, मान-सन्मान आणि निस्वार्थी सेवेची भावना बाळगून त्याप्रमाणे जीवन जगण्यास आपल्याला या जगात पाठवण्यात आलेलं आहे.

          परंतु आजच्या सणाचा हेतू काय आहे? देऊळमातेला या सणाद्वारे आपल्याला काय सांगावयाचे आहे? आजच्या सणाद्वारे देऊळमातेला आपल्या मानवी समाजाच्या नूतनीकरणाच्या आणि पवित्रीकरणाच्या रहस्याचा उलगडा करावयाचा आहे. आजच्या शुभवर्तमानातील घटना पहिली तर आपल्याला दिसून येईल कि, येशू, योसेफ आणि मरियेचं कौटुंबीक जीवन, त्यांचं श्रद्धेचं जीवन हे काही भातुकलीचा खेळ नव्हता. परंतु सर्व परिस्थितींवर मात करून त्यांनी आपलं कुटुंब घडवलं. म्हणूनच त्यांच्या कुटुंजीवनात आपल्याला सर्वांसाठी एक उत्तम आदर्श दडलेला आहे. जर परमेश्वराने आपल्या कुटुंब जीवनाचा महत्वाचा सांधा, भाग बनून आपल्या सुख-दु:खा सहभागी व्हावं आणि आपल्या जीवनातील सर्व प्रतिकूल परिस्थितीचं रूपांतर अनुकूल आणि चांगल्या परिस्थितींमध्ये करावं असं आपल्याला वाटत असेल, तर योसेफ आणि मरियेप्रमाणे आपण आपलं जीवनाचरण ठेवलं पाहिजे:

          पवित्र मरिया परमेश्वराकडून आलेल्या संदेशावर पूर्णपणे श्रद्धा ठेवते. परमेश्वराचा दूत तिला परमेश्वराचा आशीर्वाद आणि कृपेचं अभिवाचन देतो आणि मरीयेला परमेश्वर तिच्या जीवनात करणार असणाऱ्या महत्कृत्यांवर श्रद्धा ठेवण्यास आमंत्रण देतो. मरीया हि सुरुवातीला त्या क्षणाला घडणाऱ्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवण्यास संकोचते, कचरते. परंतु तिची मावसबहीण अलिशिबा हिच्या जीवनात घडलेल्या चमत्काराचे वृत्त समजल्यानंतर मात्र तिला कळून चुकते कि, परमेश्वराचे विचार आणि त्याची कृत्ये हि मानवी आकलनक्षमतेच्या पलीकडे आहेत. आपण कल्पना सुद्धा करू शकणार नाहीत असे चमत्कार परमेश्वर आपल्या जीवनात घडवून आणू शकतो. यानंतर मरीया आपल्या भावी जीवनाबद्दलची चिंता आणि भीती यांवर मात करावयास शिकली.

          योसेफ मात्र मरीयेची ते दोघे एकत्र येण्याअगोदरच गर्भधारणा झाल्यामुळे गोंधळात पडला होता, पेचात पडला होता. निराश आणि हताश होऊन, थोड्याशा रागातच आणि त्याचबरोबर मरीयेची बदनामीसुद्धा होऊ नये म्हणून त्याने मरीयेला गुपचूप सोडचिट्ठी देण्याचा निर्णय घेतला. योसेफाचे हृदय, त्याचे अंतःकरण मात्र त्याच्या या बिकट परिस्थितीतसुद्धा परमेश्वरासाठी उघडे होते. म्हणूनच त्याने परमेश्वराची वाणी ऐकली: "मारियेचा पत्नी म्हणून स्वीकार कर आणि परमेश्वराच्या महानतेवर श्रद्धा ठेव"(मत्तय १:२०-२१). खरोखर किती मोठे आव्हान, किती बिकट परीक्षा. पण योसेफ आपला मीपणा, आपला अभिमान, आपला गर्व, सर्व बाजूला ठेवून देवाच्या शब्दावर श्रद्धा ठेवून त्याप्रमाणे पुढे जाण्याचा ठाम निश्चय करतो.

          मरिया आणि योसेफ बेथलेहेमच्या एका गायीच्या गोठ्यात प्रभू येशूच्या नावाने एकत्र आले, आणि येशू त्यांच्यामध्ये हजर होता ती महत्वपूर्ण घटना आपण कालच साजरी केली. जेव्हा-जेव्हा आणि जेथे-जेथे लोकं आपल्या अहंकारावर, मीपणावर आणि आपल्या मानवी दुर्बलतेवर श्रद्धेने आणि धैर्याने मात करून जीवनात इतरांबरोबर एकत्र पुढे जाण्याचा प्रयत्न करतात तेव्हा-तेव्हा आणि तेथे-तेथे परमेश्वर त्यांच्यामध्ये, त्यांच्या कुटुंबामध्ये हजर असतो, जन्म घेत असतो. परमेश्वर दोन हजार वर्षांपूर्वी या पृथ्वीवर मनुष्यरूपाने जन्माला येऊन त्याने तारणाच्या इतिहासाची सांगता केलेली नाहीय. तर, आजसुद्धा आपल्या कुटुंबांमध्ये जन्म घेण्याची देवाची उत्कट इच्छा आहे. जेव्हा आपण आपलं जीवन आणि आपलं हृदय परमेश्वरासाठी, त्याच्या वचनासाठी उघडे ठेवतो, तेव्हा आपणसुद्धा मरीया आणि योसेफाप्रमाणे दैवी वाणी ऐकू शकतो: "तुझ्यावर कृपा झालेली आहे. प्रभु तुझ्याबरोबर आहे. परमेश्वराने आपली प्रेमदृष्टी तुझ्याकडे वळवली आहे.

          एक सुखी, आनंदी आणि आदर्श कुटुंब घडवणे किंव्हा निर्माण करणे हे कुंभाराच्या कामाइतके सोपे नसते. कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देऊन घडवत असतो. परंतु कुटुंबामध्ये आईवडील रक्तामांसाच्या जिवंत गोळ्यावर चांगले संस्कार घडवून त्या जीवनाला आकार देत असतात. आणि हे सोपे नाही. ज्याप्रमाणे नाझरेथच्या पवित्र कुटुंबात कठीण परिस्थितींचा, संकटांचा अभाव नव्हता, त्याचप्रमाणे आपल्या जीवनातसुद्धा आपलं श्रद्धेचं जीवन जगताना अणे अडचणी आणि समस्या येऊ शकतात, किंबहुना येतात. अनेक वेळा असमंजसपणा, अहंकार, अक्षमाशीलता, संवादाचा अभाव अशा गोष्टींमुळे कुटुंबांमध्ये तणाव निर्माण होत असतो, कुटुंब जीवनाची इमारत मोडकळीस येते. अशा वेळेला आपण परमेश्वररूपी शिल्पकाराला आपल्या कुटूंबरूपी इमारतीच्या नूतनीकरणाचा ताबा दिला पाहिजे. तो आपल्या कुटुंजीवनाची त्याच्या पवित्र शब्दांद्वारे, त्याच्या कृपेद्वारे आणि त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे योग्य ती डागडुजी करून आपली इमारत पुन्हा राहण्यायोग्य आणि टिकावू करील. फक्त आपण त्याला मरीया आणि योसेफाप्रमाणे आपल्या कुटुंबजीवनात प्रवेश दिला पाहिजे आणि त्याच्या पवित्र शब्दातूनच आपण सुखी आणि यशस्वी कुटुंबजीवनाचे धडे घेतले पाहिजेत.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

धर्मगुरू: मरिया आणि योसेफ ह्यांच्या कुटुंबातील आपल्या परम पुत्राच्या मानवरूपी जन्माद्वारे परमेश्वराने कुटुंबसंस्थेचे रूपांतर देवभेटीच्या जागेत केलेलं आहे. त्याच परमेश्वराकडे आपण आपल्या विनंत्या आणि गरजा घेऊन जाऊया.

प्रतिसाद: हे प्रभो आमची प्रार्थना एक.

१)    हे परमेश्वरा सर्व ख्रिस्ती कुटुंबाना श्रद्धा, निस्वार्थी प्रेम आणि प्रार्थनेची घरे बनव. म्हणून आम्ही तुजकडे प्रार्थना करतो.

२)    सर्व कुटुंबांनी त्यांच्या समोर उभ्या असणाऱ्या सर्व आर्थिक आणि सामाजिक अडचणी आणि व्यापाचा धीराने सामना करून त्यांवर मात करावी आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना आपल्या कुटुंबामध्ये सुरक्षितता आणि आपलेपणाचा अनुभव यावा. म्हणून आपण प्रार्थना करू या.

३)    आम्ही जे आहोत ते आमच्या कुटुंबामुळेच आहोत. आम्हाला आमच्या आईवडिलांकडून जे विश्वासाचे दान मिळाले आणि जी चांगली मूल्ये मिळाली आहेत त्याबद्दल आमची मने आणि हृदये कृतज्ञतेने भर. म्हणून आम्ही प्रार्थना करतो.

४)    आमच्या कुटुंबातील सर्व आजारी व्यक्तींना तू तुझ्या कृपेच्या स्पर्शाने बरे कर आणि त्यांना निरोगी आणि निरामय आयुष्य दे. म्हणून आम्ही तुजकडे प्रार्थना करतो.

५)    आमच्या कुटुंबातील ज्या व्यक्ती मरण पावलेल्या आहेत. त्यांना तुझ्या स्वर्गीय नंदनवनात चिरंतन शांती दे. म्हणून आम्ही तुजकडे प्रार्थना करतो.

 धर्मगुरू: हे परमेश्वरा, तुझ्या पुत्राद्वारे तू कुटुंबसंस्था पवित्र केली आहेस आणि ती आम्हा सर्वांसाठी आनंदाचा स्रोत बनवली आहेस. आमच्या प्रार्थना एक आणि तुझी कृपादृष्टी आणि तुझा अमाप आशीर्वाद आमच्या कुटुंबावर राहू दे. हि प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन.

No comments:

Post a Comment