Tuesday 21 December 2021

Reflection for the Solemnity of the Nativity of the Lord (25/12/2021) By Fr. Benher Patil.



ख्रिस्त जयंती – नाताळ

(सकाळची मिस्सा)

दिनांक: २५/१२/२०२१.

पहिले वाचन: यशया ५२:७-१०.

दुसरे वाचन: इब्री. १:१-६.

शुभवर्तमान: योहान १:१-१८.




विषय: “आणि शब्द मनुष्य झाला”

प्रस्तावना:

आज अखिल विश्व आणि ख्रिस्तसभा नाताळ, म्हणजेच येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस साजरा करत आहे. आजची उपासना आपल्याला आनंदघोष, जल्लोस्तव करण्यास आमंत्रण देत आहे. कारण, देवाचा पुत्र येशू जगाचा तारणारा जगात अवतरला आहे. आजची तिन्ही वाचने ह्याची पुष्टी करताना आढळतात. शब्द मानव झाला आणि आम्हामध्ये राहिला, आणि राहत आहे.’ तो मानवाला पापांपासून सोडवण्यास व जगाच्या सर्व वाईट शक्तींपासून उद्धार करण्यास जन्माला आला आहे. आज देवाच्या आपल्यावर असलेल्या अपार प्रेमाबद्दल आभार मानूया. प्रभू येशूला माझा व माझ्या कुटुंबाचा तारणकर्ता म्हणून स्वीकारण्यास तसेच, त्याच्या जन्माने त्याने जो आनंद, हर्ष आपल्याला दिला आहे, तो इतरांना देण्यास देवाची विशेष कृपा आणि आशीर्वादासाठी प्रार्थना करूया.

 



मनन चिंतन:

ख्रिस्तजयंती साजरी करण्यासाठी जमलेल्या माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, प्रत्येक वर्षी २५ डिसेंबरला मोठ्या आनंदाने आणि थाटामाटाने आपण येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस साजरा करतो. ह्या सणानिमित्ताने आपण शुभेच्छापत्र पाठवतो, नाताळगीते गातो, केकसारख्या गोड-धोड पदार्थांचा आस्वाद घेतो. त्याचप्रमाणे एकमेकांना मोठ्या प्रेमाने आलिंगन देतो आणि नाताळ सुखाचा जावो अशा शुभेच्छा देतो. पण आपल्याला खरोखरच नाताळ म्हणजे काय हे समजलं आहे का?

एकदा रशियामध्ये मार्तिन नावाचा एक चांभार/मोची राहत असे. ईश्वराला प्रत्येक गोष्टीत संतुष्ट करण्यात तो दक्ष असे. रात्री शास्त्रपाठ करण्याचा त्याचा नित्यक्रम असे. सिमोन परुश्याच्या घरी येशूचा आदर-सत्कार झाला नाही हे वाचून त्याला अत्यंत खेद झाला. तो मनात म्हणाला, प्रभूचा अपमान झाला, त्याची मला भरपाई केली पाहिजे. हे प्रभू, माझ्या झोपडीत ये, मी यथाशक्ती भरपाई करीन.” त्याच रात्री त्याला झोपेत एक वाणी ऐकू आली “मार्तिन उद्या खिडकीबाहेर पाहत जा, मी येणार आहे.” तो स्वतःशी पुटपुटला हे स्वप्न तर नाही ना? तथापि तो दुसऱ्या दिवशी प्रभूची वाट बघत बसला. झोपडीबाहेर एक गरीब म्हातारा बर्फ झाडत होता. तो थंडीने कुडकुडत होता. मार्तिनने त्याला आत बोलावले, शेकोटीशी नेलं आणि गरमागरम चहा दिला. म्हातार्‍याला थोडी ऊब मिळाली. मग तो मार्तिनचे आभार मानून निघून गेला.

आता संध्याकाळ झाली होती. ख्रिस्त काही आला नव्हता. तरी तो नक्कीच येईल या आशेने तो त्याची वाट पाहत बसला होता. इतक्यात थंडीने कुडकुडत असलेली बाई त्याच्या दृष्टीस पडली. तिच्या हातात एक तान्हे बाळ रडत होते. मार्तिनला तिची फार दया आली आणि त्याने तिला आत बोलावले, शेकोटीजवळ नेले, एक पेलाभर गरम-गरम कोंबडीचा रस्सा दिला. मग बाळाला पांघरण्यासाठी एक जुनी लोकरीची शाल दिली. त्या बाईला फार आनंद झाला. ईश्वर तुझे कल्याण करो,” असे म्हणून ती निघून गेली.

आता रात्र पडली. मग मार्तिनने नेहमीप्रमाणे शास्त्र घेतले, आणि वाचायला सुरुवात केली. इतक्यात एका काळोख्या कोपऱ्यातून वाणी झाली, “मार्तिन, मार्तिन, तू मला ओळखळेस का?” मार्तिन म्हणाला, कोण तू?” ती वाणी म्हणाली, मी आहे!” आणि त्याच क्षणी बर्फ झाडणारा म्हातारा त्याच्या दृष्टीस पडला. पुन्हा एकदा तीच वाणी झाली. “मार्तिन, मार्तिन तू मला ओळखळेस का?” व त्याच क्षणी थंडीने कुडकुडणारी बाई व तिचे रडणारे बाळ त्याच्या दृष्टीस पडले. ते गोड स्मित करून अंतर्धान पावले. तेव्हा मार्तिनच्या डोक्यात प्रकाश पडला आणि त्याला समजलं की, त्याच्या घरी आलेला म्हातारा आणि बाई हे दुसरं तिसरं कोणीही नसून खुद्द प्रभूच होता. आणि तो उद्गारला, प्रभूने मला तर दोनदा भेट दिली पण, मी त्याला एकदाही ओळखू शकलो नाही!”

होय माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, देव मानव होणे, देवाने मानवी अवतार धारण करुन आम्हांबरोबर राहणे हाच नाताळचा खरा अर्थ होय. अमर्याद व सर्वव्यापी परमेश्वर गाईच्या गोठ्यात (गव्हाणीत) एका अजाण व असहाय्य बालकाच्या रूपात जन्मास आला. मानवानं देव व्हावं, म्हणून देव माणूस झाला. माणसाने दैवी बनावे म्हणून देवाने मानवरूप धारण केले. माणसाचे तारण व्हावे म्हणून देवाने पापाचे ओझे आपल्या अंगावर घेतले.

उत्पत्तीच्या पुस्तकात आपण वाचतो की, देवाने माणसाला स्वतःच्या प्रतिरूपात, प्रतिमेप्रमाणे निर्माण केले. पण, माणसाने देवाची अवाज्ञा केली आणि त्याच्या मैत्रीला मुकला. त्याने देवाविरुद्ध पाप केलं आणि पापाचा गुला झाला. त्याने आज्ञाभंगाने देवाची आज्ञा मोडून देवाच्या प्रतिमेला काळीमा फासळी. तरीसुद्धा देवाने माणसाला वाऱ्यावर सोडलं नाही. त्याला मृत्युदंड फर्मावला नाही. तर, पुन्हा आपल्यापाशी येण्याची त्याने माणसाला संधी दिली. देवाने वेळोवेळी माणसाशी करार केले. भविष्यवाद्यांतर्फे त्याने माणसाला तारणाची आशा दाखवली. देवाने माणसावर इतके प्रेम केले की, योग्य वेळ येताच त्याने प्रत्यक्ष आपला पुत्र, येशू ख्रिस्त, जगाचा तारणारा म्हणून पाठवला. आणि येशूने आपल्या दुःखसहन आणि पुनरुत्थानाद्वारे आपलं तारण केलं.

माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, दोन हजार वर्षांपूर्वी ज्या येशूने एका बाळाच्या रूपाने जगाला दर्शन दिलं. तोच येशू आज वेगवेगळ्या रूपात आपल्याला भेटत आहे. ज्या प्रभूने मार्तिनला म्हातारा आणि गरीब बाई ह्यांच्या रूपात दर्शन दिलं, तोच येशू आमच्या आजू-बाजूला बसलेल्या शेजाऱ्यांमध्ये आहे. तोच येशू आमच्या सभोवती गरीब, दीनदुबळे, पांगळे, तान्हेले, भुकेले, दु:खित आणि पिडीतांमध्ये निवास करत आहे. म्हणून ख्रिस्त म्हणतो, करशील जे गरिबांसाठी होईल ते माझ्यासाठी” (मत्तय २५:४०). देव ना देवूळात, दे ना राळात, देव आहे आपल्या अंत:करणात.”

परमात्मा तर आमच्या अगदी जवळ आहे. अगदी आपल्या शेजारी आहे. मात्र, आम्ही त्याच्या दर्शनासाठी स्वर्गाकडे दृष्टी लावून बसलो आहोत. त्याच्या दर्शनाची वाट पाहत चर्चमध्ये भजनं गात व प्रार्थना करत बसलो आहोत. असं म्हणतात, माणसाचा जन्म हा प्रत्येक घरा-घरात होतो. परंतु, माणुसकी ही ठराविक ठिकाणीच जन्म घेते, व माणुसकी जेथे जन्म घेते तेथे परमेश्वराचे वास्तव्य असते.” जोपर्यंत मानव माणसात माणूस पाहत नाही, तोपर्यंत अंधाराचे राज्य असेच चालू राहील. परंतु, जेव्हा आपण माणसात आपला भाऊ किंवा बहीण पाहू व त्यांच्यावर येशूसारखी प्रीती करू तरच, प्रकाशाचे राज्य या पृथ्वीवर अवतरेल.

स्वर्गीय मदर तेरेजाने दीन-दुबळ्यां देव पाहिला. उपेक्षितांवर तीने निखळ प्रेम केले. ते करताना तिने कोणत्याही प्रकारचा पोकळ आविभार्व आणला नाही, किंवा कोणत्याही प्रकारचा भेदभाव बाळगला नाही. प्रत्येक गरजवंत दिन-दुबळा हा आपला भाऊ किंवा बहीण आहे, असेच समजून तिने त्यांची सेवा केली व त्यांच्यावर प्रेम केले. ज जर खर्‍या अर्थाने नाताळ साजरा करायचा असेल तर, मानवरूप धारण करून, प्रत्येक मानवात वास्तव्य करणाऱ्या ख्रिस्ताची ओळख केली पाहिजे. त्यांच्याशी जवळीकता साधली पाहिजे. आणि कुठल्याही प्रकारचा अहंकार व स्वार्थ न बाळगता त्याचा आदर केला पाहिजे. त्याची सेवा करून आपलं नितांत प्रेम दाखवलं पाहिजे. कारण असं म्हटलं जातं की, जे का रंजले गांजले, त्यांशी म्हणे जो आपुले, साधु तेथेची ओळखावा, देव तेथेची जाणावा.”


विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: “प्रभू आम्हांमध्ये पुन्हा जन्मास ये.”

१.    आपल्या ख्रिस्त सभेची धुरा वाहणारे आपले परमगुरु, महागुरू, धर्मबंधू-भगिनी व सर्व व्रतस्थ यांनी ख्रिस्ताच्या प्रेमाचा संदेश सर्वाना द्यावा व त्याच्या तारणासाठी त्यांना प्रभूकडे आणावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

२.    जे कोणी ख्रिस्तापासून दुर गेले आहेत, पापाच्या आहारी जाऊन वाईट जीवन जगत आहेत त्यांना ख्रिस्ताच्या प्रेमाचा व दयेचा अनुभव यावा व त्यांनी ख्रिस्ता जवळ यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

३.    जे कोणी दुःखी, कष्टी आहेत व निरनिराळ्या कारणास्तव ख्रिस्त जयंती साजरी करू शकत नाहीत, त्यांनाही ख्रिस्ताचा प्रेमळ अनुभव यावा व ख्रिस्तजन्माने त्यांना त्यांच्या दुःखातून बाहेर पडण्यास मदत मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

४.    आपले मिशनरी बंधू-भगिनी जे जगाच्या अनेक काना-कोपऱ्यात जाऊन प्रभूची सुवार्ता लोकांना देत आहेत, त्यांना बाळ येशूची कृपा व सामर्थ्य मिळावे व प्रभूची सुवार्ता सर्वाना अशीच त्यांनी द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

५.    आपल्या समाजात अशी बरीच विवाहित लोक आहेत ज्यांना त्यांच्या प्रेमाचे फळ प्राप्त झालेले नाही. बाळ येशूची कृपा-दृष्टी त्यांच्यावर पडावी व त्यांना त्यांच्या प्रेमाचे प्रतिक म्हणून बालकाचे दान मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

६.    थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक हेतूंसाठी प्रभू येशू कडे प्रार्थना करूया.



||“ख्रिस्त जयंतीनाताळच्या आपणांस आणि आपल्या कुटुंबियांस हार्दिक शुभेच्छा”|| 

No comments:

Post a Comment