Monday 20 December 2021

Reflection for the Solemnity of the Nativity of the Lord (24/12/2021) By Br. Rockson Dinis.    



ख्रिस्त जयंतीनाताळ

(मध्यरात्रीची मिस्सा)

 दिनांक: २४/१२/२०२१.

पहिले वाचन: यशया ९:१-६.

दुसरे वाचन: तीताला पत्र २:११-१४.

शुभवर्तमान: लुक २:१-१४.

 


प्रस्तावना:

‘अंधकारात चालणाऱ्या लोकांनी एक मोठा प्रकाश पाहिला आहे.’ (यशया ९:२अ) डिसेंबर महिना हा वर्षाचा शेवटचा व सर्वात अंधाराचा महिना आहे. ह्या वेळेला आपल्याला प्रकाशाची किंमत कळते. ख्रिस्ती लोकांसाठी नाताळ म्हणजे; ह्या जगाच्या अंधकारमय वातावरणात देवाचे प्रकाशमय आगमन होय. जर ख्रिस्ताचा प्रकाश या जगात आला नसता, तर या जगात अंधकार किती पसरला असला असता? ख्रिस्ताचा प्रकाश आपणाला आरोग्य, मुक्ती व जीवन घेऊन येत असतो. आपण देवाची लेकरे आहोत.

आज आपण देवाकडे असे विनवूया की, ज्या प्रकारे गव्हाणीत मेंढपाळांना आनंदाचा अनुभव आला होता व त्यांचे जीवन प्रकाशमय झाले होते त्याच देवाचे प्रकाशमय तेज आपल्या भोवती प्रकाशित व्हावे व नाताळाचा हाच आनंदमय अनुभव आपणास मिळावा म्हणून आपण ह्या पवित्र मिस्साबलिदाना मध्ये प्रार्थना करूया.


मनन चिंतन:

‘आनंद करा, उल्हास करा, कारण आमचा मुक्तिदाता जगात जन्मला आहे. खरी शांती स्वर्गातून उतरली आहे.’ स्तोत्र: २:७ मध्ये आपण एकतो की, प्रभू म्हणाला, “तू माझा पुत्र आहेस आज मी तुला जन्म दिला आहे. आज देव शब्द झाला आणि पृथ्वी हि स्वर्गाला जोडली गेली.

ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो. आज संपूर्ण ख्रिस्तसभा येशू ख्रिस्ताच्या जन्माचा सोहळा साजरा करीत आहे. हाच तो दिवस देवाने निवडलेला, संदेष्ट्यांनी भाकीत केलेला. ज्यासाठी संपूर्ण जग आतुरतेने वाट पाहत होते, तो दिवस आला आहे. जगाचा तारणारा, शांतीचा राजपुत्र जन्मास आला आहे. त्याच्या जन्माने जगातील अंधकार नाहीसा झाला व वैभवाचा प्रकाश प्रसरला आहे.

आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा आपणाला प्रकाशाविषयी म्हणजेच त्या ख्रिस्ताविषयीचे दिव्यत्व सूचित करीत आहे. इस्राएल लोकं प्रकाश नाकारीत होते आणि त्यामुळे देवाचा आशीर्वाद ही गमावून बसले होते. परंतु, आता अंधकारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे. मृत्यूछायेच्या प्रदेशात बसणाऱ्यांवर प्रकाश पडला आहे. हा प्रकाश म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म आहे.

आजच्या दुसऱ्या वाचनात आपण देवाच्या कृपेविषयी ऐकत आहोत. देवाने आपल्या कृपेने तारणाची देणगी सर्वांना मिळवून दिली आहे. म्हणून संत पौल तीताला लिहिलेल्या पत्रात म्हणतो, “सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा प्रगट झाली आहे.” खरे पाहाता, देवाच्या कृपेचा आधार आपल्या जीवनात नसेल तर, स्वतःच्या प्रयत्नांनी जीवन जगणे अशक्यच आहे.

आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकतो की, संदेष्ट्यांनी जे सांगितले होते ते बाळ येशूच्या जन्माने सिद्ध झाले. “त्याचा जन्म बेथलेहेम येथे होणार!” असे मीखाने म्हटले होते (मिखा ५:२-५). आजच्या शुभवर्तमानात दोन महत्त्वाचे भाग आहेत. पहिला भाग (लुक २:१-७) हा प्रभू येशूच्या जन्माविषयी सांगत आहे. आणि दुसरा भाग (लुक २:८-२०) हा ख्रिस्ताच्या जन्माची सुवार्ता दूतांनी मेंढपाळांना कळविली ह्या विषयी सांगत आहे. योसेफ आणि मरिया आपली नावनिशी करण्यासाठी नाजरेथहून बेथलेहेम येथे गेले. त्यानुसार मिखा ह्या संदेष्ट्याने सांगितलेले वचन पूर्ण झाले. “त्याचा जन्म बेथलेहेम येथे होणार!” बेथलेहेम मध्ये असताना मरीयेचे प्रसुतीचे दिवस भरले व त्या ठिकाणी, उतार शाळेत कुठेच जागा न मिळाल्यामुळे एका गाईच्या गोठ्यात (गव्हाणीत) येशू बाळ, दिव्य बाळ, ख्रिस्तबाळ जन्मास आले. त्या भयानक अंधकारात आगळा-वेगळा आकाशी तारा चमकला, व त्याचा प्रकाश हा सर्वत्र पसरला. संपूर्ण वसुंधरा आनंदाने प्रभूची हर्षगीत गायला लागली, “पहाट झाली नव्या युगाची भूवरी...”

ख्रिस्ताच्या जन्माची सुवार्ता दूतांनी मेंढपाळांना कळविली, त्यावेळी दूरवर रानामध्ये काही मेंढपाळ आपली मेंढरे राखत होते. तेव्हा तो देवदूत त्यांच्या समोर उभा राहिला. त्याच्या तेजाने मेंढपाळ घाबरले. तेव्हा देवदुताने म्हंटले, “भिऊ नका! पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता सांगावयास मी आलो आहे.” त्याने त्यांना येशूच्या जन्माचे ठिकाण सांगितले तेवढ्यात आकाशातून देवतांचा समूह त्या मेंढपाळा भोवती प्रकट झाला. त्या सर्व देवदूतांनी प्रभूची स्तुती करत गीत गायले व ते परत स्वर्गात गेले. अशा प्रकारे येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी परमेश्‍वराची योजना होती ती पूर्ण झाली व सर्वत्र शांती, प्रेम, आनंद व प्रकाश पसरला.

काही वर्षांपूर्वी घडलेली सत्यघटना आहे; संत मदत तेरेसा तिच्या सिस्टर्स ह्यांना सेवा करण्यासाठी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न ह्या शहरात आमंत्रण केले होते. मदर तेरेसा व त्यांच्या सिस्टर्स त्याठिकाणी गेल्या व आपल्या कार्याला सुरुवात केली. सर्वप्रथम त्या घरांना भेट देत होत्या. एका ठिकाणी त्या भेट द्यायला गेल्या असताना एक घर आतून बंद होते. त्यांनी घराचा दरवाजा ठोठावला, अगोदर कोणीही तो उघडला नाही. मग, नंतर त्यांनी पुन्हा ठोठावला तेव्हा एका वृद्ध माणसाने दरवाजा उघडला. त्या घरात अंधार व भरपूर धूळ होती. मदर तेरेसा ह्यांनी त्या माणसाला विचारले की, “इतकी धुळ व अंधकार का आहे?” त्या माणसाने उत्तर दिले, “मला कोणचं भेटायला येत नाही. मग मी कोणासाठी दिवा लावून व घर साफ करू?” मदर तेरेसा व त्यांच्या सिस्टर्स ह्यांनी त्यांची परवानगी घेऊन ते घर साफ केले. त्यात त्यांना एक सुंदर दिवा सापडला. तेव्हा मदर तेरेसा यांनी त्यांना विचारले की, “ तुमच्याकडे हा सुंदर दिवा असतांना देखील तुम्ही हा दिवा का लावत नाहीत?” त्यावर व्यक्तीने त्यांना प्रतिउत्तर दिले की, “खरोखरचं सांगतो की, मला कोणचं भेटायला येत नाही, मग मी कोणासाठी हा दिवा लावू?” मदर तेरेसा ह्यांनी त्यांना विचारले की, “जर रोज माझ्या दोन सिस्टर्स तुम्हाला भेटायला आल्या तर तुम्ही हा दिवा लावाल का?” त्याच्यावर त्या व्यक्तीने सकारात्मक उत्तर दिल्यावर रोज दोन सिस्टर्स त्या व्यक्तीला भेट देऊ लागल्या. कालांतराने मदर तेरेसा भारतात आल्यानंतर त्यांना ऑस्ट्रेलियातील त्याच माणसाचं पत्र आलं व त्यात असा मजकूर लिहिला होता की, “आता मी रोज दिवा लावतो. तुमच्या सिस्टर्सनी मला आता भेट नाही दिली तरी चालेल. मला खरोखर तुमच्या कार्याद्वारे ख्रिस्ताचा प्रकाश मिळाला आहे.”

होय माझ्या प्रिय भाविकांनो, ‘अंधकारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे व मृत्यू छायेच्या प्रदेशात बसणाऱ्यांवर प्रचंड प्रकाश पडला आहे.’ हे यशया संदेष्ट्याने सांगितलेले वचन पूर्ण होत आहे. येशूचा जन्म म्हणजे पृथ्वीवरील अंधकार मिटून प्रकाश अवतरल्याचा हा उत्सव आहे. नवविचार निर्मितीचा उत्सव आहे. जगाची उलथापालथ करणाऱ्या मसिहाचा उत्सव आहे. प्रकाश निर्मात्याचा उत्सव आहे.

खरे पाहिले तर प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्माचा खरा आनंद हा अंत:करणाने साजरा केला पाहिजे; नाहीतर पिढ्यानपिढ्या, दशकानुदशके निघून जातील परंतु ख्रिस्त जन्मोत्सवातून आपल्या जीवनात काहीच अर्थ निघणार नाही. फक्त शक्ती, धन, पैसा हा उत्सवानिमित्त वाया होऊन निघून जाईल. पण खऱ्या अंत:करणातून, ख्रिस्त जन्मोत्सव साजरा केला तरच त्यात खराखुरा आत्मिक आनंद आहे. त्यामुळेच आपण आपल्या जीवनातील निराशेला झटकून, नवीन आशेचा संचार आपल्या जीवनात केला पाहिजे. आज ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करत असताना आपण घरासमोरील आकाशदीप पेटविण्या ऐवजी आपल्या हृदयातील दिवा पेटवूया. हृदयातच जर अंधकार असेल तर बाहेर पेटविलेल्या हजारो, लाखो आकाश दिपांचा काय उपयोग!


विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद :हे प्रभू तुझ्या प्रेमाने आम्हाला भरून टाक.

१.    आज आपण पवित्र ख्रिस्त महासभेचे सर्व ख्रिस्ती बंधू-भगिनींसाठी प्रार्थना करूया की जसे बाळ येशू आज शांती व प्रेमाचा संदेश घेऊन जन्माला आला आहे, तसेच आपणही त्याच्या प्रेमाचा व शांतीचा संदेश जगात पसरावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

२.    आज आपण विशेष करून सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थना करूया ज्या राष्ट्रांमध्ये युद्ध व अशांती आहे तेथील सर्व अधिकारी व पुढारी लोकांनी येशूच्या शांतीचा अनुभव घेऊन सतत शांतीसाठी झटावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

३.    आज आपण सर्व कुटुंबांसाठी प्रार्थना करूया विशेष करून, जे कुटुंब काही कारणास्तव विभक्त झाले आहेत अशा कुटुंबानी पवित्र कुटुंबाचा आदर्श घेऊन घरात शांतीचे वातावरण निर्माण करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

४.    जे कोणी जीवनात निराश आहेत, अशांती व अंधकारात आहेत त्यांनाही बाळ येशूच्या प्रेमाचा व शांतीचा अनुभव यावा व त्यांचे जीवन आनंदाने भरावे तसेच त्यांच्या जीवनात बद्दल घडून यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

५.    आज आपण सर्वजण इथे जमलेलो असताना आपल्याला बाळ येशूच्या प्रेमाचा व शांतीचा अनुभव यावा व आपले जीवन संपन्न व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

६.    थोडावेळ शांत राहून आपल्या वयक्तिक गरजा प्रभू चरणी अर्पण करूया.



||“ख्रिस्त जयंतीनाताळच्या आपणांस आणि आपल्या कुटुंबियांस हार्दिक शुभेच्छा”||

No comments:

Post a Comment