आगमन काळातील तिसरा रविवार
दिनांक: १२/१२/२०२१
पहिले वाचन: सफन्या ३:१४-१८
दुसरे वाचन: फिलीपौ. ४:४-७
शुभवर्तमान: लुक ३:१०-१८
प्रस्तावना:
हर्ष करा, जल्लोष करा, कारण आपले तारण जवळ आले आहे. आज आपण आगमन काळातील तिसरा
रविवार साजरा करीत आहोत. आजचा रविवार हा हर्षाचा रविवार किंवा आनंदाचा रविवार
म्हणून संबोधला जातो.
आजची उपासना आपल्याला हर्ष करण्यासाठी बोलावत आहे. आजची वाचने आपल्याला
आनंदाविषयी सांगत आहेत. आजच्या पहिल्या वाचनात सफन्या प्रवादी इस्रायलला जयजयकार व उल्हास करण्यासाठी सांगत आहे. कारण, परमेश्वराने आपले शत्रूपासुन निवारण करून
आपल्यासाठी तारणाचा मार्ग खुला केला आहे. दुसऱ्या वाचनात संत पौल सांगतो की,
परमेश्वराचे आगमन जवळ आले आहे; म्हणून आपण आपल्या हृदयाची तयारी
केली पाहिजे. तसेच आपल्याला दुसऱ्या कशाचीही चिंता करण्याची गरज नाही; कारण, आपल्या इच्छा व आकांक्षा ख्रिस्तामध्ये पूर्ण होणार आहेत. आजच्या लुकलिखीत
शुभवर्तमानामध्ये बाप्तिस्मा करणारा योहान स्पष्टपणे सांगतो की, ज्याच्याजवळ जास्त
आहे त्याने उदारतेने दुसऱ्याला द्यावे. अशाप्रकारे आपण ख्रिस्ताच्या येण्याची
तयारी करू शकतो. “मी तर तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो परंतु जो माझ्यामागून येत
आहे तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करील.
ह्या आगमन काळात
ख्रिस्ताला स्विकारण्यासाठी आपल्या मनाची व हृदयाची तयारी करण्यास लागणारी कृपा व
शक्ती आपल्याला मिळावी म्हणून आपण ह्या मिस्साबलीदानात परमेश्वरा चरणी मागुया.
मनन चितन:
जोपर्यंत आपल्याठायी ख्रिस्ताचा आत्मा वस्ती करीत नाही तोपर्यंत आपल्याला खरा
आनंद मिळू शकत नाही. ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो आपण सर्वजण परमेश्वराच्या
येण्याची आतुरतेने वाट पाहत आहोत. हीच आतुरता व उत्सुकता आपल्यामध्ये जिवंत ठेवणे
गरजेचे आहे. आज आपण गावदेते (GAUDETE) रविवार साजरा करीत आहोत कारण
देऊळमाता परमेश्वरामध्ये उल्हासित होण्यासाठी आमंत्रित करीत आहे.
आजच्या तिन्ही वाचनात येशूच्या
येण्याची पूर्वतयारी करण्यास आपल्याला पाचारण करण्यात आले आहे. पहिल्या वाचनात आपण
ऐकलेच आहे की, संदेष्टा सफन्या, येरुशलेमच्या लोकांना सांगतो, ‘तुम्ही उल्हास व आनंद करा, कारण तारणारा देव येत आहे; तो तुमच्या पापांची क्षमा करणार
आहे. म्हणून आनंद व उल्हास करा व उदास राहू नका’.
संत पौल फिलीप्पैकरास लिहिलेल्या पत्रात म्हणतोय, ‘प्रभूमध्ये सदैव आनंद करा, पुन्हा म्हणेन आनंद करा. तुमची
सहनशीलता सर्वांना कळून येवो. प्रभू समीप आहे.’
माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, एकदा एका मध्यरात्री भयानक पाऊस पडत होता ढगांचा गडगडाट आणि
विजेचा कडकडाट चालू होता. अशा परिस्थितीमध्ये एक वयस्कर जोडपं एका हॉटेलमध्ये
सकाळच्या एक वाजण्याच्या सुमारास पोहोचल आणि तेथे असलेल्या कारकूनकडे रूमविषयी
चौकशी करू लागले परंतु त्याच वेळेला शहरामध्ये कुठलातरी मोठा कार्यक्रम असल्यामुळे
कुठलीही रूम उपलब्ध नव्हती. रात्रीची ही असली भयानक परिस्थिती पाहता त्या
कारकुणाला राहावे नाही. त्याने म्हटले हॉटेलमध्ये कुठलीही रूम उपलब्ध नाही परंतु
माझी स्वतःची रूम आहे त्यामध्ये तुम्ही राहू शकता. तुमची इच्छा असल्यास आणि
त्यांनी त्या प्रकारे आग्रहदेखील केला. ते जोडपं त्या रूममध्ये राहिले आणि सकाळी
जाताना त्याने त्या कारकुनाला म्हटलं तुमच्यासारखा मनुष्य अमेरिकेमध्ये मोठ्या
हॉटेलचा मॅनेजर असायला हवा. त्यावरती तो कारकून स्मित हास्य करीत म्हणाला तिकडे अमेरिकेला
मला कोण अशी नोकरी देणार? काही कालावधीनंतर त्या कारकुनाला एक पत्र मिळत आणि
पत्राबरोबर त्याच्यामध्ये मजकूर लिहिला होता त्यांना अमेरिकेला बोलावण्याचा. तो
अमेरिकेला गेल्यानंतर त्याला प्रशस्त असं हॉटेल दाखवण्यात येते आणि सांगितलं जातं
की ह्या हॉटेलचा तू मॅनेजर आहेस तुला हे हॉटेल सांभाळायचं आहे. तेव्हा ती व्यक्ती
आश्चर्यचकित होऊन म्हणू लागली तुम्ही कोण? आणि मला एवढी मोठी जबाबदारी देणारे
तुम्ही कोण? तेव्हा त्या
वयस्क जोडप्याने अगोदरची सर्व कहाणी सांगितली. माझे नाव William Waldorf Astor. प्रिय बंधू भगिनींनो, जीवनामध्ये आपण जे काही इतरांसाठी
करतो त्याचा मोबदला आपणास ह्या जगामध्येच या जीवनामध्येच मिळत असतो याची प्रचीती
वरील गोष्टी द्वारे आपणास कळून चुकते.
आजच्या शुभवर्तमानामध्ये संदेष्टा योहान ह्यास लोकं येऊन विचारतात त्यांनी
त्यांच्या जीवनामध्ये काय करावं. वेगवेगळ्या प्रकारची लोक येऊन त्याला तोच प्रश्न
विचारतात आणि योहान बाप्तिस्ता आता सर्वांना एकच उत्तर देतो आमच्याकडे जे काही आहे, जेवण, साधनसामुग्री, पैसा, कपडे, जे काही असेल ते इतरांकरिता वाटून
द्या. सर्व काही इतरांना देऊन स्वतः रिक्त झालं तरच आपल्याला खरे प्रभू परमेश्वरा
करता आपल्या हृदयाच्या गाभार्यात प्रेमाची जागा तयार करू शकतो.
योहान बाप्तिस्ताच्या बाबतीत जर आपण बघितलं तर त्याच्याविषयी लोकं म्हणत होते
हा तर येणारा ख्रिस्त तारणारा तर नाही ना? परंतु योहान बाप्तिस्ता म्हणतो, “माझ्या
मागून येणारा तो माझ्या अगोदरचा आहे. मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करितो परंतु
माझ्या मागून येणारा जो प्रभू आहे तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व
अग्नीद्वारे करील. त्याच्या पायतानाचे बंद सोडावयास मी पात्र नाही.” अशा द्वारे
प्रभू परमेश्वर हा योहान बाप्तिस्मा पेक्षा मोठा आहे व त्याच्या अगोदरचा तो आहे हे
योहान बाप्तिस्ता आपल्याला सुचवितो. योहान बाप्तिस्ता येथे संधीच सोनं करू शकत
होता, परंतु तो
देवाचा मनुष्य होता, संदेष्टा
होता, म्हणूनच
येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य आहे हे त्यांनी साऱ्या जगतास कळविले.
आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेला अशी
संधी येत असतात, पण त्या
संधीचा फायदा करून घेऊन त्या संधीचं आपण सोनं करतो का? किंबहुना त्या संधीचं सोनं
करण्याऐवजी त्या संधीच माती करतो? आगमन काळ आपल्याला मिळालेली सोन्यासारखी संधी आहे. ह्या
काळामध्ये आपण आपल्या हृदयाची तयारी करीत असतो. प्रभूच्या येण्यासाठी बाहेरून जशी
तयारी करणे गरजेच आहे, त्याच
पद्धतीने आंतररुपी तयारी करणे गरजेच आहे. प्रभू परमेश्वर आपल्याला दैनंदिन जीवनात
वेगवेगळ्या संधी देत असतो. या संधीचा आपण इतरांच्या भलेपणाकरिता, त्यांच्या वरती प्रेम करण्याकरिता
व इतरांना मदत करण्याकरिता त्याचा आपण वापर करू शकतो. हे जीवन इतरांच्या सेवेकरिता
आहे, जी सेवा प्रभू ख्रिस्त ह्या जगात
मानव बनून इतरांची सेवा केली व सेवेचा महामंत्र आपणा सर्वांना दिला. तिच सेवा
आपल्या हातून घडावी व सर्व मानवजातीवर आपण प्रेम करत राहावं व त्याकरिता लागणारी
कृपा शक्ती आणि सामर्थ्य त्या प्रभू परमेश्वराकडून आपणास मिळावे म्हणून प्रार्थना
करूया.
विश्वासू लोकांच्या
प्रार्थना:
प्रतिसाद: “हे प्रभो आमची प्रार्थना ऐक.”
१. ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे आपले पोप फ्रान्सिस, बिशप्स, सर्व धर्मगुरु, धर्मबंधु-भगिनी व प्रापंचिक
ह्यांनी जे प्रभू येशूची सुवार्ता पसरवण्याचे कार्य हाती घेतले आहे ते त्यांनी
पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने योग्य प्रकारे करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. ह्या आगमन काळात प्रभू येशूचे स्वागत करण्यास आम्ही
आमच्या अंत:करणाची तयारी करावी व आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला इतरांमध्ये ओळखावं
म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आमच्या सरकारी व राजकीय नेत्यांना त्यांच्या
जबाबदारीची जाणीव व्हावी व त्यांनी आपला देश चांगल्या प्रगतीच्या मार्गावर आणावा
म्हणून आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडे प्रार्थना करूया.
४. सर्व पालकांनी आपल्या मुलांमध्ये चांगले गुणधर्म
जोपासावेत, त्यांना देवराज्याविषयी शिकवण द्यावी, परमेश्वराच्या वचनाप्रमाणे व आज्ञेप्रमाणे वागून मुलांपुढे चांगला आदर्श
ठेवावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आपल्या धर्मग्रामात जे लोक दु:खी, आजारी व बेरोजगार आहेत, अशा लोकांस मदतीचा हात देण्यास
तयार असण्यास आणि अशाप्रकारे परमेश्वराच्या येण्यासाठी तयारी करण्यास परमेश्वराचा
आधार मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. आता आपण आपल्या सर्व गरजा
शांतपणे प्रभूचरणाशी अर्पण करूया.
No comments:
Post a Comment