Reflection for the Fourth Sunday of Advent (19/12/2021) By Br. Justin Dhavade.
आगमन काळातील चौथा
रविवार
दिनांक: १९/१२/२०२१
पहिले वाचन: मिखा ५:१-४अ
दुसरे वाचन: इब्री लोकांस पत्र १०:५ - १०
शुभवर्तमान: लूक १:३९- ४५
प्रस्तावना:
आज
पासून आपण आगमन काळातील चौथ्या आणि शेवटच्या आठवड्यात पदार्पण केले आहे. आजच्या
पहिल्या वाचनात आपण पाहतो इ.स.पू. ७२५-७२१ दरम्यान असिरियाने जेव्हा इस्रायलची
राजधानी शोमरोन उद्धवस्त केली आणि जेरुसलेमेवर हल्ला करण्याची योजना आखली, तेव्हा
जेरुसलेमकरांनी असिरियाला बेथलेहेमवर हल्ला करण्याची सूचना केली. त्यामुळे
घाबरलेल्या लोकांना धीर देण्यासाठी देवाने मिखा नावाचा संदेष्टा उदयास आणला त्याने
केलेले भाकीत पुढे येशूच्या जन्माच्या वेळी पूर्ण झाले. तर दुसऱ्या वाचनात प्रभू
येशू म्हणतो, “हे देवा ग्रंथपटात माझ्या विषयी लिहून ठेवले आहे. तुझ्या
इच्छेप्रमाणे करावयास मी आलो आहे. तसेच शुभवर्तमानात दोन गर्भवती स्त्रियांची भेट होते.
येशूचा अग्रदूत आनंदाने आपल्या मातेच्या उदरात उडी मारतो व अलिशिबा देखील “स्त्रियांमध्ये
तू धन्य व तूझ्या पोटचे फळ धन्य” ह्या शब्दांमध्ये बाळ येशूचा व पवित्र मरीयेचा
सन्मान करते. आपण या जगामध्ये जीवन जगत असताना बाळयेशूचा व पवित्रमरियेचा सन्मान
करण्यास मागे पडलो असाल, तर परमेश्वराकडे क्षमा मागूया.
मनन-चिंतन:
आपण
ख्रिस्त जयंतीच्या सणाच्या अगदी जवळ येऊन पोहचलो आहोत. जुन्या करारामध्ये मलाखी
संदेष्टा म्हणतो,
“पहा मझंपुढे
मार्ग तयार करण्यासाठी मी आपला निरोप्या पाठवितो; ज्या प्रभूला तुम्ही शोधता तो एकाएकी
आपल्या मंदिरात येईल;
पाहा करार घेऊन येणाऱ्या निरोप्याची
तुम्ही अपेक्षा करीत आहा, तो
येत आहे,
असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
त्याच्या आगमनाच्या दिवशी कोण निभावेल? तो
प्रगट होईल तेव्हा कोण टिकेल? कारण
तो धातू गाळणाऱ्याच्या अग्निसारखा, पराटाच्या खारासारखा आहे” (मलाखी ०३:१-२).
होय
माझ्या प्रियांनो काही दिवसांमध्ये आपण ख्रिस्तजयंती किंवा नाताळचा सण साजरा करणार
आहोत आणि मलाखी संदेष्ट्याने म्हटल्याप्रमाणे नाताळच्या सणाच्या दिवशी बाळ येशू
एकाएकी आपल्या हृदयरुपी मंदिरामध्ये जन्म घेणार आहे. त्या ख्रिस्ताला आपल्या हृदयरूपी
मंदिरामध्ये जन्म देण्यासाठी, त्याच्या दर्शनासाठी आपन उत्सुक आहोत का? मत्तय २:७ - ११ मध्ये आपण तीन ज्ञानी
राजांविषयी वाचतो, जे बाळ येशूच्या दर्शनासाठी उत्सुक होते, त्याचा शोध करीत होते
आणि म्हणून बाळ येशूने बेथलेहेम शहरात गाईच्या गोठ्यात त्यांना दर्शन दिले.
संत
लूक आपल्याला म्हणतो, “डोंगर व राणावानां मध्ये राहणाऱ्या मेंढपाळांनी बाळ येशूचा
शोध केला आणि गव्हाणीत ठेवलेल्या बाळ येशूचं त्यांना दर्शन झालं” (लूक २:८ - १६).
“त्यांनी देवाचा शोध करावा म्हणजे चाचपडत-चाचपडत त्याला कसेतरी प्राप्त करून
द्यावे तो आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही” (प्रेषितांची कृत्ये १७:२७). आपण त्या
बाळ येशूच्या दर्शनासाठी आतुर आहोत का? आपण
त्या बाळ येशूला आपल्या हृदयात किंवा अंत:करण्यामध्ये जन्म देण्यासाठी आपल्या
मनाची तयारी केलेली आहे का?
दोन
हजार वर्षापूर्वी बाळ येशूचा जन्म झाला होता. आपणा प्रत्येकाच्या तारणासाठी तो
परमेश्वर स्वर्ग सोडून, मानवाच्या रूपामध्ये जन्म घेऊन, आपणामध्ये येऊन राहिला.
आपल्या प्रत्येकाच्या तारणासाठी नाताळच्या सणाच्या दिवशी जणूकाही बाळ येशू पुन्हा
एकदा आपल्या हृदयामध्ये जन्म घेणार आहे. आपण या जगामध्ये जीवन जगत असताना
परमेश्वराच्या वचनाच्या विरुद्ध जीवन जगत असाल, तर या आगमन कालाच्या शेवटच्या
दिवसांमध्ये आपण परमेश्वराकडे क्षमा मागूया आणि वाईट जीवण सोडून त्या बाळ येशूला
आपल्या हृदय, अंतःकरणामध्ये जन्म देण्यासाठी, त्याचं स्वागत करण्यासाठी
परमेश्वराकडे कृपा, शक्ती व सामर्थ्य मागूया.
विश्वासू लोकांच्या
प्रार्थना:
प्रतिसाद: “हे
प्रभू तुझ्या स्वागतासाठी आमची हृदये तयार कर.”
१. आपले पोप फ्रान्सिस, सर्व कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरु आणि सर्व व्रतस्थ ह्यांना प्रभूचा विपुल
आशीर्वाद मिळावा व त्यांनी देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगून जगाला ख्रिस्ताचा
शुभसंदेश द्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. लवकरच आपण
ख्रिस्त जयंती साजरी करणार आहोत. म्हणून आपण सर्वांनी योग्यरित्या मनाची व
अंतःकरणाची आध्यात्मिक तयारी करावी आणि ख्रिस्त आपला तारणारा ह्याला आपल्या जीवनात
स्वीकारावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. ‘पिक भरपूर आहे परंतू कामकरी
थोडेच आहेत’ म्हणून मरीयेचा आदर्श
डोळ्यांसमोर ठेऊन अनेक तरुण-तरुणींनी ईश्वराच्या हाकेला प्रतिसाद देऊन प्रभूमळ्यात
सेवा करण्यास स्व-ईच्छेने पुढे यावे, म्हणून आंपण प्रार्थना करूया.
४. आपला
सर्वांचा देवावरील विश्वास अधिकाधिक बळकट व्हावा व आपण सर्वांनी देवाच्या
वचनाप्रमाणे जीवन जगून ख्रिस्त आपला तारणारा आहे ह्याची साक्ष आपण इतरांना दयावी
म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. थोडा वेळ शांत राहून आपल्या कौटुंबिक व वैयक्तिक गरजा प्रभूचरणी मांडूया.
No comments:
Post a Comment