Thursday, 2 December 2021

  

Reflection for the Second Sunday of Advent (05/12/2021) By Br. Gilbert Fernandes.       


आगमन काळातील दुसरा रविवार

दिनांक: ०५/१२/२०२१

पहिले वाचन: बारूख ५:१-९

दुसरे वाचन: फिलीपै. १:४-६, ८-११

शुभवर्तमान: लुक ३:१-६

 


प्रस्तावना:

ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपण आगमन काळातील दुसरा रविवार साजरा करीत आहोत. आगमन काळ हा ख्रिस्ताच्या येण्याच्या तयारीचा काळ आहे. आजची उपासना आपल्याला पश्चाताप करून आपली हृदये ख्रिस्ताच्या जन्मासाठी तयार करण्यास बोलावीत आहे.

आजच्या पहिल्या वाचनात परमेश्वराने आपल्या सर्वांसाठी राखून ठेवलेल्या वैभवाची झलक पहावयास मिळते. रसातळाला गेलेल्या लोकांनी घाबरून जाऊ नये कारण परमेश्वर त्यांच्या आक्रोशाचे रूपांतर आनंदात व जल्लोषात करणार आहे. आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल फिलीपैकरांस लिहिलेल्या पत्रात परमेश्वराच्या प्रीतीत जसे ते सुरुवातीपासून जगत आलो आहोत त्याच प्रीतीत त्यांनी शेवटपर्यंत जीवन व्यतीत करावे आणि ख्रिस्ताला स्विकारण्यासाठी त्यांनी निर्मळ व निर्दोष रहावे म्हणून विनंती करत आहे. आजच्या शुभवर्तमानात योहान संदेष्टा परमेश्वरासाठी मार्ग तयार करा व त्याच्या वाटा नीट करण्याचा संदेश देत आहे. 

या पवित्र मिस्साबलीदानात आपण सहभागी होत असताना पश्चातापी अंतःकरणाने परमेश्वराची क्षमा मागुया आणि आपल्या हृदयात ख्रिस्ताला जागा तयार करण्यासाठी परमेश्वराची कृपा व शांती लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

 


मनन चिंतन:

प्रत्येक घटनेपूर्वी एक बातमी असते; पावसाची वाऱ्यात, वादळाची शांततेत, सूर्याच्या आगमनाची पक्ष्यांच्या किलबिलतेत पण ख्रिस्ताची मात्र योहानाच्या आवाजात आहे. आजच्या शुभवर्तमानात योहान बाप्तीस्ता आपल्याला पश्चाताप करून ख्रिस्ताठायी मार्ग तयार करण्यास आमंत्रण देत आहे. आज योहान आपल्याला ख्रिस्त आपणामध्ये येणार आहे त्यासाठी मार्ग म्हणजेच आपल्या हृदयाची तयारी करण्यास सांगत आहे. वाळवंटात योहानाचा आवाज येतो की, लोकांनी पश्चाताप करावा व स्नानसंस्कार घ्यावा, त्यांची हृदये उघडी ठेवावी; कारण काळाची पूर्तता होत आहे व अब्राहामाला व दाविदाला परमेश्वराने केलेली वचने आता पूर्णत्वास येणार आहेत. आदामाच्या पापाने शापित झालेली मानवजात आता तारण अनुभवणार आहे. दुःखाने, छळाने व्याकूळ झालेली इस्त्रायल जनता नवीन जीवन अनुभवणार आहे कारण परमेश्वराने आश्वासित केलेला मसीहा हा आपल्यामध्ये अवतरणार आहे. म्हणून त्याला स्विकारण्यास तयारी करावी हे योहान छाती ठोकून सांगत आहे.

मग ही तयारी कशी असावी? पूर्वीच्या काळी राजा जेव्हा पहाणी करण्यास जात, तेव्हा तिथले रस्ते, घरे, मैदाने सर्व स्वच्छ केले जात असे. आजसुद्धा आपण पाहतो की, एखादा मंत्री किंवा उच्च वर्गातील कोणी येत-जात असेल तर त्यांच्यासाठी कडक सुरक्षा असते. साफ सफाई, नवीन रस्ते तयार केले जातात व त्यांच्या भेटीला सर्व लोक योग्य प्रकारे तयारी करून येतात.

‘ख्रिस्ताला भेटण्यासाठी आपली तयारी अशीच असावी का?’ नाही. आपली तयारी त्याहूनही अधिकपटीने असावी. ही तयारी केवळ भौतिक गोष्टींची नसावी, परंतु आपल्या अंतःकरणाची असावी आणि ही तयारी करण्यासाठी आपण आपल्या अंतःकरणाची तपासणी करावी. दैनंदिन जीवनात आपण पापांस बळी पडलो आहोत का? जगाच्या मूल्यांना प्राधान्य दिलेले आहे का? ह्यासाठी पश्चाताप करून आपली आंतरिक तयारी करणे गरजेचे आहे.

योहान पुढे यशया संदेष्ट्याच्या शब्दात यशया ४०:३-७ मध्ये आपणांस सुनावतो की, “तुमचे मार्ग सरळ करा, प्रत्येक दरी भरून काढा, प्रत्येक पर्वत सपाट करा. वेडेवाकडे रस्ते सरळ करा, खडकाळ जमीन गुळगुळीत करा.” ह्या ओवीद्वारे योहान आपणांस सांगू इश्चितो की, आपल्या जीवनात दुःखाच्या दऱ्या आहेत. दुःखे आणि संकटांनी एक सखोल घाव आपल्या अंतःकरणात पाडला आहे. आपण पर्वतासारखे गर्वाने भरलेलो आहोत. आपले नैतिक जीवन वेडेवाकडे झाले आहे. म्हणून आपण त्याकडे लक्ष द्यायला हवे. प्रभू येशू ख्रिस्त जो आनंद आपणांस घेऊन येणार आहे त्यामानाने, आपल्या यातना खूप कमी आहे म्हणून आनंद करा. आपण आपला गर्व सोडून नम्र व्हावे नाहीतर, इतिहासातील सुवर्णक्षण म्हणजेच ख्रिस्त आपल्या मध्ये येऊन जाईल तरी आपणांस ओळखता येणार नाही. आपले नैतिक जीवन जे मलीन झाले आहे ते आपण स्वच्छ करावे. आपले शेजाऱ्याबरोबरील सबंध प्रीतीने व शांतीने भरून काढावेत.

आजच्या शुभवर्तमानात आपण वाचतो की, “जखऱ्याचा मुलगा योहान ह्याला रानात देवाचे वचन प्राप्त झाले. मग तो यार्देनजवळच्या सगळ्या प्रदेशात पापांच्या क्षमेसाठी पश्चाताप करून बाप्तिस्मा घ्यावा अशी घोषणा करीत फिरला” (लुक ३:२-३). या छोट्या मजकुरात आपल्याला एखाद्या व्यक्तीचा कमजोर विश्वास घट्ट/दृढ करण्यासाठी आवश्यक असलेल्या तीन पायऱ्या आढळतात. त्या तीन पायऱ्या पुढीलप्रमाणे: १. योहान रानात गेला २. देवाचा शब्द त्याच्याकडे आला आणि ३. योहान विश्वासाची घोषणा करीत फिरला. आपल्यालासुद्धा आपले जीवन विश्वासाने आणि आनंदाने जगण्यासाठी ह्या तीन पायऱ्या महत्त्वाच्या आहेत.

१.    ज्याप्रमाणे योहान रानात गेला त्याप्रमाणे आपणसुद्धा हृदयाच्या रानात किंवा वाळवंटात जाणे गरजेचे आहे. वाळवंटात किंवा रानात आपण देवासोबत एकटे असतो, तिथे आपण देवाला भेटतो. आपल्या व्यस्त दैनंदिन जीवनात थोडासा वेळ प्रार्थनेत, देवाचे वचन वाचण्यात किंवा देवासोबत राहण्यास घालवणे गरजेचे आहे. वाळवंटात/रानात जाण्यासाठी, देवापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा देवाचा शोध घेण्यासाठी आपण स्वतः पहिले पाऊल उचलले पाहिजे.

२.    ज्याप्रमाणे देवाचा शब्द योहानाकडे आला त्याप्रमाणे देवाचा शब्द आपल्याकडे सुध्दा येतो. जेव्हा आपण एकांती ठिकाणी किंवा रानात आपले हृदय देवासमोर उघडतो तेव्हा देव स्वतः येतो आणि आपल्याला भरतो. एका संताने म्हटले आहे की, जेव्हा आपण देवाकडे एक पाऊल टाकतो तेव्हा देव आपल्याकडे दोन पाऊले टाकतो. ह्या स्थितीत/टप्प्यात देव आपल्याकडे येण्यासाठी, आपल्याला भरण्यासाठी, आपले नूतनीकरण करण्यासाठी, आपले रुपांतर करण्यासाठी, आपल्याला देवाच्या प्रतिमेमध्ये पुनर्संचयीत करण्यासाठी पुढाकार घेतो. ह्या स्थितीत आपले नवीन जीवनात रुपांतर होते. जेव्हा हे सर्व आपल्यासोबत घडते तेव्हा आपण आपले संपूर्ण जीवन देवासोबत घालवण्यास इच्छितो. परंतु योहानाप्रमाणे आपण आपले जीवन जगले पाहिजे आणि कुटुंबातील आणि समाजातील आपली कर्तव्ये पार पाडली पाहिजेत.

३.    योहानाप्रमाणे आपण सुध्दा विश्वासाची घोषणा करत असतो. आपल्या स्वतःच्या जीवनात परमेश्वराच्या चांगुलपणाचा अनुभव घेतल्यानंतर, तो अनुभव स्वतःसाठी न ठेवता इतरांना देणे महत्त्वाचे आहे. इतरांना सुध्दा देवाला भेटण्याचा किंवा त्याचा अनुभव घेण्याचा मार्ग दाखवणे हे आपले कर्तव्य आहे. परमेश्वराचा अनुभव हा प्रेमाच्या अनुभवासारखा आहे. आपण त्याबद्दल इतरांना सांगू शकतो पण आपण काय बोलत आहोत हे त्यांना स्वतः अनुभवेपर्यंत समजणार नाही.

हे सर्व घडण्यासाठी, या ख्रिस्त येण्याच्या काळात, पहिले पाऊल उचलण्याचा, परमेश्वरासाठी जागा तयार करण्याचा, प्रार्थनेत आणि देवाचे वचन ऐकण्यासाठी वेळ काढण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थाना :

प्रतिसाद: “हे प्रभो, तुझी सुर्वाता पसरविण्यास आम्हांला सहाय्य कर.”

१.    वैश्विक ख्रिस्तसभेचा कारभार पाहणारे आपले परमगुरु फ्रान्सिसकार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरू, धर्मबंधू व धर्मभगिनी  यांना परमेश्वराचे सहाय्य लाभावे व देवाच्या प्रजेला आध्यात्मिक सक्षम व प्रबळ बनविण्यासाठी कृपा व सामर्थ्य मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

२.    जे लोक नाना प्रकारच्या आजारांनी बाधित झालेले आहेत, जे डॉक्टर्स व नर्सेस त्या आजांरावर मात करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशा सर्वांना परमेश्वराने धीर व आधार द्यावा व ह्या आजांरापासून मुक्तता व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

३.    आजांरामुळे जे लोक हताश आहेत, जे बेरोजगार आहेत अशा सर्वांना योग्य ती मदत मिळावी त्यांना व त्यांच्या कुटुंबात सुख व शांती पसरावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

४.    जे परदेशी आहेत व जे कामानिमित्त स्थलांतरित झालेले आहेत अशा सर्वांचे परमेश्वराने रक्षण करावे व त्यांना निरोगी स्वास्थ लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

५.    सर्व राजकीय नेत्यांनी संकट काळी लोकांना योग्य ती मदत करून व देशाला व राज्याला योग्य दिशेने नेण्यास योग्य ती पाऊले उचलण्यासाठी परमेश्वराचे सहकार्य लाभावे व ह्या परिस्थितीवर मात करण्यासाठी कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

६.    थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौंटुंबिक व सामुहिक हेतुंसाठी प्रार्थना करूया.

 

 

1 comment:

  1. How to play baccarat online - FEBCasino.com
    With our extensive catalog of baccarat options, you can win real 메리트카지노총판 money! Join FEBCasino now and start playing against millions of หารายได้เสริม players! 바카라 사이트

    ReplyDelete