Reflection for the Solemnity of Mary, Mother of God and of New Year (01/01/2022) By: Fr. Benjamin Alphonso.
देव मातेचा सण
(नवीन वर्ष २०२२)
दिनांक: ०१/०१/२०२२
पहिले वाचन: गणना
६:२२-२७.
दुसरे वाचन: गलतीकरांस
पत्र ४:४-७.
शुभवर्तमान: लुक २:१६-२१.
प्रस्तावना:
आज आपण नवीन वर्षाला सुरुवात करत आहोत. देऊळमाता वर्षाचा पहिलाच दिवस पवित्र मरीयेला समर्पित करून त्या
देवमातेचा सण साजरा करीत आहे. आजची तिन्ही वाचने देवाचा आशीर्वाद मिळवून
तोच आशीर्वाद एकमेकांना देण्यासाठी आमंत्रित करीत आहे. मरिया मातेने
आपल्या जीवनात देवाच्या इच्छेला प्राधान्य दिले. आपणही आपल्या जीवनात देवाला प्राधान्य देऊया. आजच्या मिस्साबलीदानात आपण विशेष करून हे वर्ष प्रत्येकाला सुखा-समाधानाचे, समृद्धीचे, आनंदाचे, आणि एकमेकांवर परमेश्वराचे प्रेम व दया दाखवण्याचे जावे म्हणून विशेष प्रार्थना करूया.
मनन-चिंतन:
||तू सन्मान, तू बहुमान
मारिया आमुचा तू अभिमान||
ख्रिस्ताठायी माझ्या
प्रिय बंधू-भगिनींनो, आज आपण सर्वजण आनंदी आहोत कारण, आपण सर्वजण भाग्यवान आहोत, व आपल्याला नवीन वर्ष २०२२ बघण्याचे भाग्य
लाभलेले आहे. आपल्यामधील कदाचित काही लोकं दुःखी, निराश असतील. कारण, काहीकांची स्वप्ने, कार्ये अपूर्ण
राहिलेली असतील. अशा वेळेला देऊळमाता आपल्यासर्वां समोर मरिया मातेचे उदाहरण ठेवत
आहे. काही
लोकांना प्रश्न पडत असेल की, आपल्या समोर मरिया मातेचं (देवमातेचचं) उदाहरण का ठेवले जाते? त्याचं कारण म्हणजे मरिया माता ही विश्वासाची माता होती. तसेच आपलं संपूर्ण आयुष्य
देवाच्या इच्छेप्रमाणे ती जगली. देऊळ मातेची इच्छा आहे की, आपण सुद्धा आपल्या जीवनात मरिया मातेच्या
मार्गाचा अवलंब करावा व देवाच्या अधिकाधिक जवळ जावे.
नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्याचं नाव आहे “जानेवारी.” ‘जानूस’ नावाची एक ग्रीक देवता आहे. त्या देवतेच्या नावाचा अर्थ असा आहे की, “भविष्याकडे आशेने बघणे.” (Looking Towards Future). म्हणून वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण विश्वासाने व आशेने
पाहत आहोत. तसेच आपलं भविष्य आपल्या सर्वांच्या
हातात व देवावरील विश्वासात आहे.
अशी एक गोष्ट आहे की, एकदा एके ठिकाणी एक ज्ञानी, पवित्र गुरू होते. अनेक लोक त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी आणि आशीर्वादासाठी जायचे. काही युवकांना गुरूचा हेवा वाटायचा आणि त्यांना गुरु हे चुकीचे किंवा ढोंगी आहेत असे
दाखवायचे होते. म्हणून, त्यांनी एक योजना आखली; ते त्या
ज्ञानी गुरुकडे हातात एक छोटा पक्षी घेऊन गेले. त्याचा विचार होता की, गुरूला विचारायचे की, ‘त्यांच्या हातात जो पक्षी आहे
तो जिवंत आहे की, मेलेला आहे?’ जर गुरूने त्यांना सांगितले की, ‘जिवंत आहे.’ तर, त्याला हातातच मारायचे. पण, जर गुरु म्हणाला ‘ते मेलेले आहे.’ तर, त्या पक्षाला सोडायचे. जेव्हा ते युवक गुरुकडे गेले व
गुरुला प्रश्न विचारला तेव्हा, गुरूंना त्यांची योजना अंतर्मनात समजली व ते त्या युवकांना
म्हटले की, “त्या पक्षाचे भविष्य तुमच्या हातात आहे.”
होय माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो आपले सगळ्यांचे आयुष्य
आपल्या हातातचं व देवाच्या दयेवर आहे. आपला योग्य निर्णय आपल्याला योग्य दिशेकडे नेईल. आजचे पहिले वाचन हे गणना ह्या पुस्तकातून
घेतलेले आहे. देव अहरोन ह्यांना लोकांना
पवित्र गुरूचा आशीर्वाद देण्यास आज्ञा करतो. जुन्या करारात “आशीर्वाद” हा शब्द ४०० वेळा
वापरण्यात आला आहे. त्याव्यतिरिक्त हा शब्द स्तोत्रसंहिता ह्या
पुस्तकात ८८ वेळा वापरण्यात आला आहे. आजचे दुसरे वाचन हे गलतीकरांच
पत्र ह्यामधून घेतलेले
आहे. ते आपल्याला
सांगत आहे की, देवाने आपला एकुलता एक पुत्र ह्या जगात पाठवला
व त्याद्वारे आपण सर्व देवाची मुले झालेली आहोत. तसेच स्वर्गीय पित्याने आपल्या
सर्वांना त्याच्या प्रिय पुत्राद्वारे आशीर्वादित केले आहे. हे आपल्या सगळ्यांचं मोठं भाग्य
आहे व नवीन वर्षाची सुंदर भेट आहे.
आजचे शुभवर्तमान हे सुंदर आहे. लुकलिखित शुभवर्तमानात आपण ऐकतो की, मेंढपाळ बाळ येशूला बघण्यासाठी
पळत जातात. त्यांना गव्हाणीत बाळ येशू, त्याची आई मरिया व योसेफ ह्यांचे दर्शन होते. ते आनंदी होतात. ते येशूबाळा विषयी
अनेक चांगल्या गोष्टी मरिया मातेला सांगतात. मरिया माता त्या सर्व गोष्टी आपल्या हृदयात ठेवते व त्याच्यावर चिंतन करते.
सन ४३१ साली ऐफेसुस ह्या परिषदेत मरिया मातेला देव पुत्राची आणि जगाची
माता म्हणून घोषित केले. ह्याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. त्या म्हणजे मरिया मातेचा
विश्वास व तिचा आज्ञाधारकपणा होय. मरिया मातेने आपलं संपूर्ण जीवन देवाच्या सेवेसाठी अर्पण केले. एकदा एक सुप्रसिद्ध ईशज्ञानी व
मरीया माते विषयी लिखाण केलेला गुरु होता. त्याला प्रश्न विचारण्यात आला
की, मरिया मातेविषयी, देवमाते विषयी तुमचं काय मत
आहे? ते म्हणाले, “जेव्हा तिला आपण ‘देवमाता’ संबोधीतो
त्याच्यामध्ये सर्व काही सामावलेलं आहे.
होय आजच्या ह्या नवीनवर्षी मरिया मातेचं उदाहरण आपल्यासमोर ठेवूया व प्रार्थना करूया की, येणारे नवीन वर्ष
सुखाचे, आनंदाचे, व भरभराटीचे जावो. तुम्हा सगळ्यांना नवीन
वर्षाचा आनंद मिळो.
देव तुम्हाला आशीर्वाद देवो व तुमचे संरक्षण करो
देव तुमचे मूख-प्रकाशित करो
देवाचे लक्ष तुम्हावर येवो व तुम्हाला
शांती देवो. आमेन
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: “हे देवा ह्या नवीन वर्षात आम्हाला आशीर्वादित कर.”
१. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, आमचे परमगुरु, महागुरु, धर्मगुरु, व व्रतस्थ यांना ख्रिस्तसभा योग्य मार्गाने चालविण्यासाठी आणि अखील जगात आशीर्वादाचे प्रतीक होण्यासाठी लागणारी कृपा व शक्ती त्यांना प्राप्त व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, तू जीवनाचा दाता व त्राता आहेस. ह्या नवीन वर्षात आम्हाला सर्वांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे व देवाने आम्हाला सर्वांना आशीर्वादित करावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. देव मातीच्या मध्यस्थीने आम्ही अनाथ, निराधार, परक्या, आणि पोरकयांसाठी आशीर्वाद मागतो. आमच्या दानशूर वृत्तीमुळे त्यांचे जीवन सदोदित आशीर्वादमय व्हावे म्हणून, आपण प्रार्थना करूया.
४. ह्या नवीन वर्षात नवीन जीवनाची सुरुवात करण्यास व नाविन्याने जीवन देव सेवेसाठी समर्पित करण्यास लागणारे कृपा-वरदान आम्हाला प्राप्त व्हावे म्हणून, आपण प्रार्थना करूया.
५. ज्या स्त्रिया मातृपदाची अपेक्षा आपल्या मनात बाळगून आहेत, अशांवर देवाचा आशीर्वाद यावा व त्यांना मातृपद प्राप्त व्हावे म्हणून, आपण प्रार्थना करूया.
६. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक, व सामाजिक गरजा प्रभू चरणी समर्पित करूया.
||"नूतन वर्ष आपणांस
सुख-समृद्धीचे आणि आनंदाचे जावो हीच प्रभू चरणी प्रार्थना."||
No comments:
Post a Comment