Tuesday, 29 September 2026

Reflections for the Homily of 27th Sunday in Ordinary Time (04-10-2026) By Fr. Reon Andrades

सामान्य काळातील सत्ताविसावा रविवार

दिनांक: ०४/१०/२०२६
पहिले वाचन: यशया ५:१-७
दुसरे वाचन: फिलीप्पैकरांस पत्र ४:६-९
शुभवर्तमान: मत्तय २१:३३-४३


प्रस्तावना:

प्रिय बंधूं आणि भगिनींनो, आज आपण सामान्य काळातील २७वा रविवार साजरा करीत आहोत. आजच्या शुभवर्तमानात येशू आपल्याला द्राक्षमळ्याच्या दाखल्यातून एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो: देवाने आपल्याला जे काही दिले आहे, त्याबद्दल आपण कृतज्ञ आहोत का? देवाने आपल्यावर विश्वास ठेवून जीवन, जबाबदाऱ्या, नाती आणि अनेक देणग्या आपल्या स्वाधीन केल्या आहेत. पण अनेकदा आपण देणाऱ्याला विसरून देणग्यांनाच आपले समजू लागतो. आजचे वचन आपल्याला कृतज्ञता, विश्वासू जीवन आणि देवाने दिलेल्या गोष्टींचा योग्य उपयोग करण्यासाठी आमंत्रित करते.

आजच्या दिवशी आपण असिसीचे संत फ्रान्सिस यांचा सणही साजरा करीत आहोत. संत फ्रान्सिस यांच्या जीवनातून आपणास या कृतज्ञतेचे सुंदर दर्शन घडते. त्यांनी सृष्टीकडे, गरीबांकडे, बंधुभगिनींकडे आणि स्वतःच्या जीवनाकडे देवाच्या देणगी म्हणून पाहिले. त्यांच्यासाठी जीवन म्हणजे स्वतःसाठी मिळवण्याची वस्तू नव्हती, तर देवाने प्रेमाने दिलेली देणगी होती. म्हणूनच त्यांनी साधेपणा, गरिबी, बंधुभाव आणि देवावरील पूर्ण विश्वासाचा मार्ग स्वीकारला.

आजच्या या पवित्र मिस्सामध्ये आपणही आपल्या जीवनातील देणग्यांसाठी देवाचे आभार मानूया आणि संत फ्रान्सिस यांच्या मध्यस्थीने अशी कृपा मागूया की, आपण मालक असल्यासारखे नव्हे, तर देवाच्या देणग्यांचे विश्वासू सेवक म्हणून जीवन जगू.

मनन चिंतन:

आजच्या शुभवर्तमानात येशू द्राक्षमळ्याची एक अतिशय अर्थपूर्ण आणि विचार करायला लावणारा दाखला सांगतो. एका मालकाने द्राक्षमळा लावला, त्याची चांगली काळजी घेतली आणि तो काही शेतकऱ्यांच्या स्वाधीन केला. मालक स्वतः दूर गेला. पीक येण्याची वेळ झाली तेव्हा त्याने आपला हिस्सा घेण्यासाठी सेवकांना पाठवले. पण त्या शेतकऱ्यांनी सेवकांशी वाईट वागणूक केली. काहींना मारले, काहींना ठार केले. शेवटी मालकाने आपल्या मुलालाच पाठवले. पण त्यांनी त्यालाही ठार केले.

आपण सहजपणे प्रश्न विचारतो, त्यांनी असे का केले? त्यांच्याकडे द्राक्षमळा होता, काम होते, उत्पन्न मिळत होते. मग मालकाच्या सेवकांशी आणि शेवटी त्याच्या मुलाशी इतके क्रूरपणे वागण्याची गरज काय होती? खरं पाहिलं तर त्यांच्या मनात एक गोष्ट हळूहळू वाढत गेली होती. त्यांना वाटू लागले की हा द्राक्षमळा आपलाच आहे. ज्याने आपल्यावर विश्वास ठेवून तो सोपवला, त्यालाच ते विसरले. विश्वास मिळाला/मिळवला होता, पण कृतज्ञता हरवली होती.

ही गोष्ट फक्त त्या शेतकऱ्यांची नाही. ती आपल्या जीवनाशीही जोडलेली आहे. अनेक वेळा आपणही आपल्या जीवनाकडे असे पाहू लागतो की, “हे सगळं मी माझ्या कष्टाने मिळवलं आहे.” माझं शिक्षण, माझं काम, माझं घर, माझी प्रतिष्ठा, माझं यश, माझी क्षमता. आपले प्रयत्न नक्कीच आहेत आणि त्यांचे महत्त्वही आहे. पण आपण एक क्षण थांबून विचार केला तर लक्षात येते की, आपल्या प्रयत्नांपेक्षा आधी अनेक गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत. जीवन कोणी दिले? बुद्धी, आरोग्य, कुटुंब, चांगली माणसं, संधी, विश्वास ठेवणारे लोक, आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे देवाची कृपा. आपण जे काही आहोत आणि जे काही आपल्याकडे आहे, त्यात आपला वाटा आहेच, पण त्यामागे देवाची कृपा आणि अनेक लोकांचे योगदानही आहे.

जेव्हा ही गोष्ट आपण विसरतो, तेव्हा मनात कृतज्ञतेच्या जागी हक्काची भावना निर्माण होते. मग आपण म्हणू लागतो, “मला हे मिळायलाच हवं. मला इतरांपेक्षा जास्त मिळायला हवं. माझं महत्त्व इतरांनी मान्य केलंच पाहिजे.” आणि इथूनच समस्या सुरू होते. कारण ज्याला सतत वाटतं की आपल्याला अजून काहीतरी मिळायला हवं, त्याला मिळालेल्या गोष्टींचा आनंद फार काळ टिकत नाही.

मग आपण दुसऱ्यांकडे पाहू लागतो. त्याच्याकडे माझ्यापेक्षा जास्त का? त्याला संधी पण मला का नाही? त्याचे कौतुक का झाले आणि माझे का नाही? दुसऱ्याचे यश आपल्याला आनंद देण्याऐवजी त्रास देऊ लागते. मनात असमाधान वाढते, तक्रारी वाढतात, गैरसमज वाढतात आणि हळूहळू मत्सर जन्माला येतो. मत्सर मनात ठेवला तर तो शांत बसत नाही. तो रागात बदलतो, राग शब्दांत येतो, शब्दांमधून भांडण होते आणि कधी कधी हीच गोष्ट पुढे हिंसेपर्यंत पोहोचते. म्हणून कृतघ्नता ही फक्त “धन्यवाद न म्हणणे” एवढी छोटी गोष्ट नाही. कृतघ्नता मनाची एक अशी अवस्था आहे जिथे माणूस मिळालेल्या चांगल्या गोष्टी पाहणे सोडतो आणि जे मिळाले नाही त्याचाच विचार करत राहतो.

आपण आपल्या घरातसुद्धा हे पाहतो. एखादी व्यक्ती आपल्यासाठी कितीतरी गोष्टी करते, पण एक गोष्ट तिच्याकडून राहून गेली की आपण लगेच नाराज होतो. अनेक वर्षे एखाद्याने आपल्याला साथ दिलेली असते, पण एखाद्या दिवशी त्याच्याकडून आपल्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही की आपण सगळे विसरून जातो. कधी कधी एका छोट्याशा “धन्यवाद”ची जागा एका मोठ्या तक्रारीने घेतलेली असते. पण कृतज्ञ मन वेगळं असतं. कृतज्ञ माणसाकडे अडचणी नसतील असे नाही. त्याच्या जीवनातही दुःख, अपयश, समस्या असतात. पण तो त्या सगळ्यांच्या मध्ये मिळालेल्या चांगल्या गोष्टी ओळखतो. तो म्हणतो, “सगळं माझ्या मनासारखं नाही, पण देवाने मला खूप काही दिलं आहे.” ही भावना माणसाला आतून शांत करते.

कधी कधी आपल्याला मोठ्या प्रार्थनेची गरज नसते. फक्त मनापासून म्हटलेले “धन्यवाद, प्रभू” पुरेसे असते. कधी कधी एखाद्या व्यक्तीला दिलेले एक साधे “तुम्ही माझ्यासाठी जे केलेत त्याबद्दल धन्यवाद” हे नात्यातील बराच ताण कमी करू शकते. कारण कृतज्ञता आपल्याला स्वतःभोवती फिरण्यापासून थांबवते आणि आपल्याला इतरांनी दिलेल्या प्रेमाची जाणीव करून देते.

आजच्या शुभवर्तमानातून आपण एवढं लक्षात ठेवूया की, आपण या जीवनाचे मालक नाही, आपण देवाने आपल्यावर विश्वास ठेवून सोपवलेल्या गोष्टींची काळजी घेण्यास सुपूर्त केला आहे. द्राक्षमळा आपल्याला दिला आहे, पण तो आपला नाही. जीवन आपल्याला दिले आहे, पण ते आपल्यामालकीचे नाही. आपल्या हातात असलेल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीमागे देवाची कृपा आहे.

म्हणून आज आपण स्वतःला एक साधा प्रश्न विचारूया: “मी देवाने आणि इतरांनी माझ्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टी अजूनही लक्षात ठेवतो का?” की मला फक्त काय मिळाले नाही, काय कमी आहे आणि दुसऱ्यांकडे काय जास्त आहे, याचाच विचार होत आहे? कदाचित आज आपल्याला कोणाकडे तरी जाऊन फक्त एक शब्द बोलण्याची गरज आहे: “धन्यवाद / आभारी.” कदाचित देवाला सांगण्याची गरज आहे: “प्रभू, माझ्या जीवनात जे काही आहे त्याबद्दल धन्यवाद.” कारण अनेक वेळा आपल्याला वाटतं की शांतता मिळवण्यासाठी मोठ्या गोष्टी बदलायला हव्यात. पण कधी कधी शांततेची सुरुवात एका छोट्याशा “धन्यवाद” पासून होते. आज आपण संत फ्रान्सीस ह्या महान संताचा सण साजरी करत असताना, तो जशी कृतज्ञतेची भावना उदरी घेऊन जगला, संपूर्ण जगाला आपले भाऊ-बहिण, आई मानले तशी भावना आपणास लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. तसेच आपण आज अशी देखील प्रार्थना करूया कि : “प्रभू, मला मिळालेल्या प्रत्येक देणगीबद्दल कृतज्ञ राहायला शिकव. जे माझ्याकडे नाही त्यासाठी सतत तक्रार करण्याऐवजी जे तू मला दिले आहेस ते ओळखण्याची दृष्टी दे. मत्सर, असमाधान आणि रागापासून माझे मन वाचव आणि माझ्या शब्दांनी आणि कृतींनी इतरांच्या जीवनात शांतता निर्माण होऊ दे.”

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे परमेश्वरा दया करून तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.

१) आपले पोप महाशय, कार्डिनल, बिशप्स, धर्मगुरू, व्रतस्थ बंधू भगिनी व प्रापंचिक यांना ख्रिस्त सभेची जबाबदारी पार पाडताना चांगले आरोग्य लाभावे व त्यांच्या ईश्वरी सेवा कार्यात त्यांना चांगली फळे उत्पन्न करण्यास प्रभू येशूने प्रेरणा दयावी  म्हणून प्रार्थना करूया.

२) सर्व राजकीय व सामाजिक पुढाऱ्यांनी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सतत झटावे व त्यांच्यामध्ये पवित्र आत्म्याचा स्पर्श होऊन त्यांना चांगले कार्य करण्यास कृपा मिळावी म्हणून प्रार्थना करूया.

३) प्रत्येक कुटुंबात देवाची शांती, प्रेम व दया प्रस्थापित व्हावी. तसेच एकमेकांना समजून घेऊन सहनशील अंतकरणाने कुटुंबात नितीचे आणि धार्मिकतेचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून प्रार्थना करूया.

४) येथे उपस्थित असलेल्या सर्व भाविकांच्या सामुदायिक व खाजगी गरजा देवाच्या आशीर्वादाने पूर्ण व्हाव्यात व प्रत्येकाला मनशांती व सुख - समाधान मिळावे म्हणून प्रभू चरणी प्रार्थना करूया.

 ५. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या इतर विविध गरजांसाठी परमेश्वराकडे प्रार्थना करूया.





No comments:

Post a Comment