Thursday, 23 March 2017

Reflection for the Homily of 4th Sunday of Lent (26-03-17) By Lavet Fernandes 



उपवास काळातील चौथा रविवार

दिनांक: २६/०३/२०१७.
पहिले वाचन: १शमुवेल १६:१,६-७,१०-१३.
दुसरे वाचन: इफिसकरांस पत्र ५:८-१४.
शुभवर्तमान: योहान ९:११-४१.



“त्याने डोळे धुतले आणि त्यास दृष्टी मिळाली”.


प्रस्तावना:

     आज आपण उपवास काळातील चौथा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपणांस प्रकाशाचे दूत होऊन ख्रिस्ताचा संदेश इतरांपर्यंत पोहचवण्यास पाचारण करत आहे.
आजच्या पहिल्या वाचनात ‘इस्रायलचा राजा’ म्हणून दाविदचा अभिषेक करण्यात आला आहे. दुसऱ्या वाचनामध्ये संत पौल इफिसकरांनी, सत्कृत्ये करून प्रकाशाचे शिष्य व्हावे असे आवाहन करत आहे. तर शुभवर्तमानात प्रभू येशु एका आंधळ्यास दृष्टी देतो.
आपण शारीरिकदृष्ट्या जरी बरे असलो तरी आपण अध्यात्मिकदृष्ट्या आंधळे  बनत चाललो आहोत. हा अंधकार दूर करण्यासाठी आपण प्रभू येशूकडे ह्या मिस्साबलीदानात विशेष कृपा मागूया आणि प्रकाशाचे साक्षीदार बनुयात.

पहिले वाचन: १ शमुवेल १६: १,६-७, १०-१३.

दाविदाला देवाने निवडले आणि शमुवेलाने त्याचा अभिषेक केला. दाविद हा महत्त्वाकांक्षी, सत्ता काबीज करण्याचा चंग बांधलेला असा मनुष्य नव्हता. तो घरी शेरडे, मेंढरे राखण्याचे काम करीत असे. पण स्वत: देवाने त्याची निवड केली होती. शमुवेलानेच हा अभिषेक करणे महत्वाचे होते. जुन्या नेत्याने नव्या नेत्याची निर्मिती करावी हे उचित होते. या कृतीमुळे इस्रायलमध्ये नेतृत्वाचे सातत्य राहिले.  
     दाविदाच्या आंतरिक गुणांमध्ये देवाने त्याच्या आत्म्याच्या सामर्थ्याची भर घातली. दाविदाला याव्हेकडून हे दान मिळाले. त्याच्या पूर्वी शाश्त्यांना व शौलाला तसेच दान मिळाले होते. देशाचे नेतृत्व करण्यास हे अगदी आवश्यकच होते.

दुसरे वाचन: इफिसकरांस पत्र ५:८-१४.

कायापालट घडवणारे दिव्य जीवन असे हे मुळात ख्रिस्ताकडून येते व प्रवाहित होते. हे जीवन सत्य व पवित्रता यांचे फळ देते. पण ह्या पक्षाने ज्यांचे परिवर्तन झाले आहे त्यांनाही प्रकाश म्हणता येईल. ज्यांचे परिवर्तन झाले नाही त्यांनी अंधकार व मरण यांचे क्षेत्र सोडून प्रकाशाच्या मार्गाकडे वळले पाहीजे कारण ख्रिस्ताचा प्रकाश आपणा सर्वांवर पडला आहे.

शुभवर्तमान:  योहान ९:११-४१.

येशूने येथे आपण स्वत: जगाचा प्रकाश असल्याचे जाहिर केले आहे. ज्यातून येशु प्रकाश असल्याचे स्पष्ट होते. एका जन्मांधळ्याला दृष्टी दिल्याचे एक नेमके उदाहरण योहानाने पुढे ठेवले आहे. हा माणूस जन्मतःच आंधळा होता; अशा अवस्थेत असताना प्रभु येशु त्याला दृष्टिदान देतो. ‘न पाहणे’ आणि ‘पाहणे’ व याहूनही आंधळे होणे अशा परस्पर विरोधी बाबी योहानकृत शुभवर्तमानाचे खास वैशिष्टे आहेत. त्या आंधळ्या माणसाला ‘शारिरीक’ तसेच ‘आध्यात्मिक’ दृष्टी मिळाली होती. परुशांना मुळातच स्वाभाविक दृष्टी होती. आपणाला आध्यात्मिक’ दृष्टी आहे असे ते समजत होते पण येशूविषयीची त्यांची प्रतिक्रिया पाहता ते खरोखर अंध असल्याचे दिसून आले.
आम्ही आंधळे आहो काय?
अविश्वास, विश्वास ठेवण्याची तयारी नसणे हे प्रकर्षाने पुढे येते. येशूच्या उत्तरातील ‘तुम्ही आंधळे असता तर’ या वाक्याचा अर्थ दोन प्रकारे समजून घेता येईल. ‘तुम्हाला आपल्या आंधळेपणाची खरोखर जाणीव असती तर’ म्हणजे याचा आध्यात्मिक अर्थ घेता येईल आणि त्यांना ही जाणीव असती तर त्यांनी प्रकाशाची इच्छा धरली असती पण हि इच्छा अजिबात दिसली नाही.

बोधकथा:

कार्डीनल जॉन हेनरी न्यूमन हे ऑक्सफर्ड ह्या नावाजलेल्या विश्वविद्यापीठामध्ये प्राध्यापक होते. त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांबरोबर विद्यापीठामध्ये ऑक्सफर्ड चळवळ सुरु केली होती. कार्डीनलचे ध्येय खूप वेगळे होते व त्यांना असं सिद्ध करायचे होते कि सत्याचा पाया फक्त अँग्लीकन चर्च मध्ये आहे आणि अँग्लीकन चर्च हे शिष्यांच्या व पूर्वजांच्या शिक्षणावर अवलंबून आहे.  
जेव्हा तो बत्तीस वर्षांचा होता तेव्हा तो अचानक आजारी पडला त्यामुळे त्याने जे लिखाण हाती घेतले होते ते लिखाण तो पूर्ण करु शकला नाही. त्यामुळे त्याने त्याचे लिखाण काही काळ थांबवले व उपचारासाठी युरोप ह्या ठिकाणी गेला. परंतु दुर्देवाने त्याला प्राणघातक ताप आला आणि त्याला इंग्लंडला परत यायचे होते. तेथे काहीच वाहतूक उपलब्ध नसल्यामुळे त्याला तिथेच खूप वेळ थांबावं लागले. ह्या कारणास्तव जॉनचे जीवन फार विस्कळीत, एकाकी आणि कंटाळवाणे झाले. तो शारिरीक व भावनात्मक दृष्टीने निराश झाला होता.
अशा गोंधळाच्या व दुःखाच्या जीवनात त्याने देवाकडे प्रार्थना केली कि हे देवा मला अंधारापासून प्रकाशाकडे ने, गोंधळातून निश्चतेकडे ने आणि आजारातून मला चांगले आरोग्य दे. अशी कळकळीची व विश्वाची प्रार्थना त्याने देवाकडे केली आणि काय आश्चर्य! देवाने त्याची प्रार्थना ऐकली व त्याला सुरक्षितपणे घरी आणले व सन १८४५ मध्ये जॉनचे धर्मांतर झाले व त्याने रोमन कॅथोलिक पंथ स्वीकारला.

मनन चिंतन:

आजच्या शुभवर्तमानात येशु ख्रिस्त सांगत आहे कि, मी जगाचा प्रकाश आहे व ख्रिस्त जन्मापासून आंधळा असलेल्या एका मनुष्याला दृष्टिदान देतो. येशु ख्रिस्त हा जीवनाचा प्रकाश आहे. हे प्रकटीकरण मोशेला जळत्या झुडपात झाले व इस्त्रायली लोकांना आग असलेल्या स्तंभावर झाले.
आंधळ्या माणसाला दृष्टी बरोबरच विश्वासाचा प्रकाश देखील मिळाला व त्याच्या जीवनात बदल झाला.
आंधळ्या मनुष्याने ख्रिस्ताला मनुष्य म्हणून हाक दिली.
आंधळ्या व्यक्तीने ख्रिस्ताचा उल्लेख मनुष्य असा केला आहे. तो म्हणाला कि, येशु नावाच्या मनुष्याने माझ्या डोळ्यास चिखल लावून मला धुण्यास सांगितले आणि मला दृष्टी आली. त्या अंध मनुष्याच्या जीवनात येशूने केलेला हा सर्वात मोठा चमत्कार होता म्हणून त्याची अशी समझुत झाली कि येशु ख्रिस्त हा पापी नव्हता तर तो देवाने पाठवलेला मनुष्य होता.
आंधळ्याने ख्रिस्ताला संदेष्टा म्हणून हाक दिली.
परुश्यांनी त्याला विचारले, तुझे डोळे उघडले त्याच्याविषयी तू काय म्हणतोस? त्याने म्हटले, “तो संदेष्टा आहे.” संदेष्टा आमोस सांगत आहे कि, “प्रभू परमेश्वर आपले रहस्य आपले सेवक संदेष्ट्यास कळविल्याशिवाय खरोखर काहीच करीत नाही.” (आमोस ३:७) शमरोनी स्त्री येशु ख्रिस्ताला म्हणाली, महाराज आपण संदेष्टे आहात हे आता मला समजले. (योहान ४:१९) येशु ख्रिस्त हा एकच व्यक्ती आहे कि, ज्याला आपले सर्व गुपित माहित आहेत व तो आपल्या सर्व गरजा पूर्ण करु शकतो. म्हणून त्यालाच आपण संदेष्टा असे बोलू शकतो.
शेवटी आंधळ्या मनुष्याने कबुल केले कि, येशु ख्रिस्त हा मनुष्याचा पुत्र आहे.
जेव्हा परुश्यांनी त्या आंधळ्या व्यक्तीला वाळीत टाकले तेव्हा तो येशूकडे आला. येशु त्याला म्हणाला, कि तू मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतो का? त्याने उत्तर दिले, “कोण आहे तो? मला सांगा म्हणजे मी त्याच्यावर विश्वास ठेवीन.” येशूने सांगितले, तुम्ही त्यास पाहिले आहे आणि तो तुमच्याबरोबर बोलत आहे. तेव्हा त्याने सांगितले, ‘मी विश्वास ठेवतों’ आणि त्याने देवाची आराधना केली. येशूचे जीवन हे रहस्यमय आहे. जितकं जास्त आपण त्यांच्यावर प्रेम करु ते कमीच आहे. जितकं आपण ख्रिस्ताच्या जवळ जाऊ, तितकंच आपण त्याच्याजवळ आकर्षित होत असतो. संत अगुस्तीन येशूचा महान प्रियकर होता. त्याने स्वता:चे धर्मांतर पुढे ढकलत ठेवले पण जेव्हा त्याच्यात परिवर्तन झाले तेव्हा त्याला वाईट वाटले. कारण त्याला प्रभू प्रेमाचा अनुभव खूप उशिरा आला म्हणूनच तो म्हणतो, “हे प्रभ मी तुझ्यावर खूप उशिरा प्रेम केले.”
आपण उपवासकाळात आत्मपरीक्षण करत असताना ख्रिस्ताकडे तीन गोष्टींसाठी प्रार्थना करुया.
१. हे प्रभू मला तुझी स्पष्टपणे ओळख होण्यासाठी मदत कर. २. हे प्रभू मला तुझ्यावर प्रेम करण्यासाठी कृपा दे. ३. हे प्रभू मला तुला जवळून अनुसरण्यास शक्ती व धैर्य दे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद : हे प्रभो आम्हांस नवदृष्टीदान दे.

१.      परमगुरु, महागुरू, धर्मगुरु आणि व्रतस्थ ह्यांनी पापांच्या अंधारातून कृपेच्या प्रकाशात येण्यासाठी भाविकांना मार्गदर्शन करावे म्हणून प्रभूकडे प्रार्थना करुया.
२.      देवाच्या दिव्य व पवित्र शब्दाने आपली मने प्रकाशित व्हावी व आपला आध्यत्मिक आंधळेपणा व दुहेरीपण नाहीसा व्हावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करुया.
३.      जे आंधळे व अपंग आहेत त्यांचा आदर करण्यासाठी व त्यांना सन्मानाने वागविण्यासाठी आम्हाला कृपादान मिळो आणि ज्या संघटना त्यांच्यासाठी कार्यरत आहेत त्यांनी त्यांच्या उद्धारसाठी योग्य असे प्रयत्न करावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करुया.
४.      जे लोक आजारी आहेत त्यांना प्रभूचा दैवी स्पर्श व्हावा व ते लवकरात लवकर बरे व्हावेत म्हणून आपण प्रार्थना करुया.
५.      जे युवक व युवती देवापासून दूर गेले आहेत व ज्यांच्या जीवनात काही ध्येय नाही अशा सर्वांना देवाच्या प्रेमाचा स्पर्श व्हावा व ते अधिकाधिक देवाच्या जवळ यावेत म्हणून आपण प्रार्थना करुया.

Thursday, 16 March 2017

Reflection for the Homily of 3rd Sunday of Lent (19-03-2017) By Br Camrello Dimekar



उपवास काळातील तिसरा रविवार

दिनांक: १९-०३-१७.
पहिले वाचन: निर्गम १७:३-७.
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ५:१-२,५-८.
शुभवर्तमान: योहान ४:५-४२.


“सार्वकालिक जीवनासाठी उकळत्या पाण्याचा झरा”


प्रस्तावना

आज ख्रिस्तसभा उपवास काळातील तिसरा रविवार साजरा करीत आहे. देवावर संपूर्ण मनाने आणि अंत:करणाने विश्वास ठेवल्यास आपण देवाने दिलेल्या दानांचे वाटेकरी होतो.    
पहिल्या वाचनात देव लोकांसोबत प्रत्यक्ष राहून व मोशेच्या मध्यस्थीने दगडातून पाणी काढून लोकांची तहान भागवतो. दुसऱ्या वाचनात संत पौल रोमकरांस सांगत आहे कि, ख्रिस्ताच्या मरणाद्वारे आपण नीतिमान झालो आहोत. तर शुभवर्तमानात शमरोनी स्री व येशू ह्यांच्यातील सार्वकालिक जीवनावश्यक संवाद ऐकावयास मिळतो.  
जेव्हा देवावरील आपला विश्वास वाढतो तेव्हा आपल्याला दैवी दानांची प्राप्ती होत असते. देवावरील विश्वास आणि श्रद्धा आपल्याला देवाचे मिशनरी किंवा प्रचारक बनवतात आणि अनेक लोकांना देवाच्या प्रेमाचे स्मरण करण्यास सहाय्यक ठरतात. आजच्या ख्रिस्तयागामध्ये आपणास दैवी दानांची देणगी मिळावी म्हणून प्रार्थना करूया.

सम्यक विवरण
पहिले वाचन – निर्गम १७:३-७

इस्त्रायली लोक जे देवाने निवडलेले होते, ते मिसर देशात दुःख सहन करत होते. देव मोशेच्या नेतृत्वाखाली त्यांना कनान देशात आणतो पण देवाने केलेल्या ह्या कृत्यांची त्यांना आठवण राहत नाही आणि ते देवाविरुद्ध कुरकुर करू लागतात कारण त्यांना प्रवासात पिण्याच्या पाण्याचा अभाव असतो. हि जनता जेव्हा मोशेकडे पाण्यासाठी तक्रार करते. तेव्हा मोशे देवाकडे विनवणी करून त्यांना खडकातून पाणी काढून देतो. ह्या ठिकाणाला ‘मस्सा आणि मरीबा’ हे नाव ठेवले गेले. कारण इस्त्रायली लोकांनी ‘देवाच्या उपस्थितीची’ परीक्षा घेतली. हि गोष्ट आपल्याला इस्त्रायली लोकांचा देवावर पोकळ विश्वास आहे असे दर्शवतो.

दुसरे वाचन – रोमकरांस पत्र ५:१-२,५-८

प्रस्तुत उताऱ्यात संत पौल लोकांना त्यांनी स्वीकारलेल्या ख्रिस्ती श्रद्धा आणि विश्वास ह्याकरीता धैर्य देतो. कारण त्यांना अनेक संकटाना सामोरे जावे लागणार आहे. देवाचे प्रेम त्यांच्यासाठी आशेचा पाया ठरणार आहे. जेव्हा आपण पापी होतो तेव्हा स्वर्गीय पित्याने ख्रिस्त आपल्यासाठी भूतलावर पाठवला व ख्रिस्ती जीवनाचा स्वीकार करून आपल्या पापांची क्षमा झालेली आहे असे संत पौल आपल्याला सांगत आहे.
आपण देवाचे प्रिय लेकरे झालेलो आहोत. देवाने येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला ख्रिस्ती जीवन प्राप्त करून दिले आहे. म्हणून आपण आनंद केला पाहिजे. आपल्याला अभिवचन दिले गेले आहे कि, आपण येशूसोबत सार्वकालिक जीवनात प्रवेश करू. अगदी योग्य वेळेला ख्रिस्त मनुष्य झाला म्हणून आपण ख्रिस्ताद्वारे उंचावले जाणार आहोत.  

शुभवर्तमान – योहान ४:५-४२.

यहुदियांमधून गालीलात जाण्यासाठी दोन वाटा होत्या. यार्देनच्या पूर्व बाजूने विदेशी यांच्या देशातून जाणारी वाट लांब पल्ल्याची होती. जवळची वाट शोमरोनातून होती. तरी ह्याच वाटेने लोकांची ये जा मोठ्या प्रमाणात चालू असे. सामाजिक रितीनुसार एखाद्या स्रीने विहरीवर एकटेच येणे जगावेगळे होते. कदाचित समाजात तिला नाकारले जात असावे. शोमरोनी व्यक्तीशी भाषण करणे व एखाद्या स्रीशी भाषण करणे हे यहुदी लोकांच्या दृष्टीने निषिद्ध होते. येशू आणि शोमरोनी स्री ह्यांच्यामध्ये चर्चासत्र सुरु होते.
शारीरिक तहान भागवण्यासाठी पाणी ह्या विचारातूनच संभाषण, साहजिकच देवाच्या दानाकडे वळले आणि त्यातून एक आध्यात्मिक मुद्दा पुढे आला. येशू हा चार चौघांसारखा एक यहुदी आहे असे त्या स्रीला वाटत होते. पण येशूने तिचा हा समज दूर केला. ‘जर देवाचे दान तुला कळले असते तर तु मला पाण्यासाठी मागणी केली नसती’. या शब्दांना दुहेरी अर्थ आहे १. झऱ्याचे वाहते पाणी. २. आत्म्याशी संबंधित असे आध्यात्मिक पाणी. रब्बीच्या (यहुदी धर्मगुरू) दृष्टीने तोटा (नियमशास्त्र) हेच जिवंत पाणी होते.

मनन चिंतन:

आजच्या पहिल्या वाचनात इस्त्रायली लोकांच्या सुटकेवेळी घडलेल्या एका महत्वपूर्ण घटनेचा संदर्भ दिला गेला आहे. आपल्या सुटकेच्या प्रवासामध्ये इस्रायली प्रजा तहानेने व्याकूळ होते. अशा कठीण वेळी मोशे दगडातून पाण्याचा झरा निर्माण करतो आणि त्यांची तहान भागवतो. देव नेहमी त्याच्या लोकांची काळजी वाहतो याची साक्ष हि घटना देते. मोशेने दगडातून निर्माण केलेले पाणी हे इस्रायली प्रजेसाठी जीवनाचे प्रतिक होते. आम्हां ख्रिस्ती बांधवासाठी हेच पाणी स्नानसंस्काराचे प्रतिक होय. ख्रिस्त हा जिवंत पाण्याचा झरा आहे व स्नानसंस्काराद्वारे आम्ही ह्या जिवंत पाण्याच्या झऱ्यामध्ये न्हाऊन शुद्ध व परिपूर्ण होत असतो.
आजच्या दुसऱ्या वाचनात आपण पाहतो कि, देवाचे आम्हावरील प्रेम हे ख्रिस्ताच्या मुक्तीकार्याद्वारे प्रकट झाले आहे. प्रभू येशूचे दुःखसहन, मरण व पुनरुत्थान ह्याद्वारे देवाने हे प्रेम सिद्ध केले आहे. हे प्रेम पवित्र आत्माच्या आशीर्वादाने कार्यरत आहे.  
आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू व शमरोनी स्त्री यांच्यामधील अर्थपूर्ण संवाद प्रस्तुत केला आहे. येथे प्रभू येशू ख्रिस्त हा आपला मुक्तिदाता आहे याचा अनुभव त्या शमरोनी स्त्रीबरोबरच आपल्या प्रत्येकाला येतो. ती शमरोनी स्त्री हि साऱ्या भ्रष्ट मानवतेची प्रतिक होती. ती चुकीच्या मार्गाने प्रेमाचा शोध करत होती. परंतु तिची तहान अतृप्तच राहते. या स्त्रीला  आपल्या बिनशर्त प्रेमाने जीवनदान देण्यासाठी येशू निर्मळ पाण्याचा झरा बनला. त्याच्यावर श्रद्धा ठेवल्याने त्या स्त्रीला शाश्वत प्रेमाचा अनुभव येतो. आपल्या प्रेमळ आणि सहिष्णू स्वभावाने येशू त्या स्त्रीच्या हृदयामध्ये परिवर्तनाचे बीज रोवतो. आपल्या जीवनातील ह्या आगळ्या-वेगळ्या प्रेमळ अनुभवाने ती इतकी भारावून जाते कि, ख्रिस्त प्रभू हे फक्त संदेष्टेच नव्हे तर साक्षात आपले मुक्तिदाते आहेत याची शुभवार्ता ती आपल्या समाजामध्ये घोषवते. यानंतर ती स्वतःला संपूर्णपणे देवाच्या स्वाधीन करते. आणि एक आदर्श व नैतिक जीवन जगते.
उपवासकाळातील ह्या तिसऱ्या रविवारी प्रभू येशू प्रत्येक श्रद्धावंतासाठी जिवंत व निर्मळ पाण्याचा झरा आहे हे स्पष्ट होते. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेऊन त्यांच्याशी एकनिष्ठ राहतो त्याला नक्कीच शमरोनी स्त्री प्रमाणे नवजीवन प्राप्त होते. आपल्या दैनंदिन जीवनातील अडी-अडचणींवर व मोहावर मात करण्याची शक्ती मिळते. त्या स्त्रीप्रमाणे आपणही प्रभूच्या शब्दावर विश्वास ठेवला पाहिजे. प्रभू येशू हा आमचा तारणकर्ता आहे, हे मान्य करून स्वतःला संपूर्णपणे त्याच्या स्वाधीन करावे. आपल्या जीवनातील सर्व प्रकारची तहानभूक भागवण्यात आपले सर्व सुख सामावलेले आहे आणि ते सुख आपल्याला फक्त येशू ख्रिस्तच देऊ शकतो.  
“स्वतःकडे पाहाल तर शंकित व्हाल, परिस्थितीकडे पाहाल तर निरुत्साही व्हाल, परंतु येशूकडे पहाल तर तुम्ही सर्वत्र सुरक्षित व समाधानी व्हाल.”

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभू आम्हांला तुझे नवजीवन दे.



१. पवित्र मिस्साबालीदान आपल्या प्रत्येकाच्या जीवनात आपल्या विश्वासाची वाढ  होण्यासाठी प्रेरणादाई ठरावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपण सर्वांनी पवित्र मिस्साबालीदान व प्रायश्चित संस्कार नम्रपणे स्विकारावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. जे एकांकी आहेत अशांच्या जीवनात परमेश्वराचा शब्द प्रेरणादायी व सांत्वनकारी ठरावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. ज्यांना स्नानसंकराच्या पवित्र आत्म्याच्या स्पर्श झाला अशा सर्वांना विनयतेचा आणि सहिष्णुतेचा स्पर्श व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. ज्यांचे अंत:करण आंतरिक वेदनेने व्याकूळ झाले आहे त्यांनी परमेश्वराच्या शब्दावर अधिक विश्वास ठेवावा व प्रेमपूर्वक असावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक गरजा प्रभूचरणी मांडूया


Thursday, 9 March 2017

Reflection for the Homily of 2nd Sunday of  Lent (12-03-17) By Brendon Noon



उपवास काळातील दुसरा रविवार

दिनांक १२-०३-१७.
पहिले वाचन उत्पत्ती १२:१-४.
दुसरे वाचन तिमथीला दुसरे पत्र १:८-१०.
शुभवर्तमान मत्तय १७-१-९.


"हा माझा प्रिय पुत्र आहे, याजविषयी मी संतुष्ट आहे."



प्रस्तावना:

आज आपण उपवास काळातील दुसरा रविवार साजर करीत आहोत. आजची उपासना येशूचा संदेश जगाच्या काना-कोपऱ्यात पसरविण्यासाठी आमंत्रित करीत आहे.
पहिल्या वाचनात आपण ऐकणार आहोत कि, अब्राहाम देवाच्या हाकेला प्रतिसाद देतो व देवाने सांगितल्याप्रमाणे वागतो. दुसऱ्या वाचनात संत पौल तिमथीला देवाची सुवार्ता पसरवण्याचे कार्य अखंड चालू ठेवण्यासाठी बोध करतो. तर प्रभू येशूचे रुपांतर व शिष्यांना प्रभू येशूचे गौरवमय प्रकाशाचे दर्शन ह्याबाबत आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकतो.
देवाचे पाचारण हे आपल्या स्वत:च्या गुणवत्तेवर अवलंबून नव्हे तर ते सर्वस्वी देवाच्या कृपेवर अवलंबून असते. अब्राहमाची देवावरील अढळ श्रद्धा व संत पौलाची सुवार्ता प्रसाराची जिद्द आपल्यात निर्माण व्हावी म्हणून या मिस्साबलीदानात प्रार्थना करूया.

सम्यक विवरण
पहिले वाचन उत्पत्ती १२:१-४.

सर्वसमर्थ परमेश्वर आब्राहामास सांगतो कि, तुझ्या पूर्वजांची जमीन व तुझा देश सोडून मी दाखविन त्या देशात जा. परमेश्वराने आब्राहामाला पटवून दिले होते कि, मी तुझा खरा देव आहे. म्हणून परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे आब्राहम सर्व काही सोडून विश्वासाने दुसऱ्या देशात निघून जातो. अब्राहाम आपल्या जीवन श्रद्धेद्वारे आपण कशाप्रकारे प्रभू येशूचे अनुकरण केले पाहिजे याची साक्ष देतो.

दुसरे वाचन तिमथीला दुसरे पत्र १:८-१०.

तिमथीला हे दुसरे पत्र लिहित असताना पौल रोम येथे तुरुंगात होता. यावेळी आपली सुटका होणार नाही व आपण लवकरच मरणार आहोत याची पौलाला खात्री होती म्हणुन हे पत्र लिहिले आहे. ह्या पत्रात पौलाने, प्रभूचे कार्य पुढे चालू ठेवण्यास तिमथिला उत्तेजन दिले आहे.
पौल तिमथीला आठवण करून देतो कि, या दानाचा उपयोग देवाची घोषणा करण्यासाठी कर व हे देवाचे पवित्र पाचारण तुला मोफत मिळाले आहे म्हणून देवाची सुवार्ता पसरविण्यासाठी मागे पडू नको. प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे देवाचा प्रकाश व सुवार्ता प्रकट झाली आणि ती पसरविण्यासाठी प्रभू येशू प्रत्येकाला पाचारण करीत आहे.

शुभवर्तमान मत्तय १७-१-९.

जुन्या करारात देवाने अब्राहामाबरोबर करार केला होता. तुझी संतती रेतीप्रमाणे वाढवीन, तुझ्याद्वारे सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील.मत्तय शुभवर्तमानात येशूची वंशावळ थेट अब्राहमापासून दाखवतो. म्हणजेच अब्राहामाला देवाने जे वचन दिले होते त्याची पूर्तता शुभवर्तमानात झाली आहे. आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू प्रार्थना करीत असताना त्याच्यात कायापालट होतो व त्याचा चेहरा प्रकाशित होतो. त्याचे कपडे पांढरे शुभ्र होतात. त्या ठिकाणी प्रभू येशू ‘देव’ आहे ह्याचे चिन्ह ह्या रुपांतराद्वारे स्पष्ट होते.

मनन चिंतन:

आजची तिन्ही वाचने आपणा सर्वांना येशुची सुवार्ता पसरविण्यासाठी व इतरांची विश्वासात वाढ करण्यास पाचारत आहे. आपणा सर्वांचा विश्वास बळकट व्हावा व आपल्या जीवनाद्वारे आपणही इतरांना खिस्ती विश्वासात वाढवण्यासाठी आमंत्रित केले पाहिजे. आपणा सर्वांचा विश्वास हा छोट्या झुडूपासारखा नव्हे तर मोठ्या वृक्षासारखा हवा जेणेकरून कितीही पाउस किंवा वादळं आली तर वृक्ष पडणार नाही कारण विश्वासात वाढत असताना आपल्याला भरपूर संकटाना तोंड द्यावे लागणार आहे.
आपण पहिल्या वाचनात ऐकले आहे की, देवाने आब्राहामाला पाचारण दिले. देव आब्राहामाला सांगतो कि, तू आपला देश आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. आब्राहम देवावर विश्वास ठेवतो व देवाच्या वचनावर विश्वास ठेवूनच देवाने सांगितल्याप्रमाणे वागतो.
आज आपण पाहतो कि, कितीतरी धर्मबंधू, धर्मभगिनी व धर्मगुरु प्रभूच्या मळ्यात काम करत आहेत. त्यांनीही देवाच्या पाचारणाला प्रतिसाद दिला आहे. त्यांनीही देवाची सुवार्ता पसरवण्यासाठी आपले घर, नातेवाईक व देश सोडले आहेत व आज जगाच्या कानाकोपऱ्यात देवाची सुवार्ता पसरवित आहेत. जेंव्हा त्यांना देवाचे पाचारण आले तेव्हा त्यांनाही वाटले असेल कि, आम्ही का घर व नातेवाईक सोडावे? परंतु देवाच्या वचनावर विश्वास ठेवला व आब्राहामासारखे सर्वकाही सोडून प्रभूच्या मळ्यात येशूची सुवार्ता पसरविण्याचे काम करत आहेत. घर नातेवाईक व देश सोडणे इतके सोपे नव्हते त्यांनीही खूप विचार केला असेल किंवा समस्यांना तोंड द्यावे लागले असेल परंतु ते विश्वासात आब्राहामासारखे मजबूत होते म्हणून त्यांनी देवाच्या पाचारणाला प्रतीसाद देऊन आब्राहामासारखे सर्व सोडून देवाने सांगितलेल्या वचनाचे पालन करीत आहेत.
आजच्या शुभवर्तमानात येशूच्या रुपांतराविषयी आपण ऐकलेच आहे. येशूने आपल्या बरोबर त्याचे जवळचे तीन शिष्य एकत्र घेऊन डोंगरावर गेला. कोण आहे हे तीन शिष्य ?  ते आहेत पेत्र, याकोब आणि त्यांचा भाऊ योहान. येशु जेंव्हा कोठेही गेला तेव्हा हे तिघे येशु बरोबर होते. जेंव्हा येशूने त्यांना डोंगरावर एकांती जागी नेले तेव्हा काय झाले हे आपल्याला ठाऊकच आहे.  त्याची वस्त्रे शुभ्र झाली, मुद्रा सूर्यासारखी तेजस्वी झाली व मोशे व एलिया त्याच्याशी संभाषण करीत असलेला त्याच्या दृष्टीस पडले व त्यांनी येशूला विनंती केली कि आपण येथे तीन मंडप बांधू व येथेच राहू.
      जेंव्हा आपल्याला देवाचा अनुभव येतो किंवा देवाचा साक्षात्कार होतो तेव्हा आपल्याला वाटते कि, आपण जिथे देवाच्या सहवासात आहोत तिथेच रहावे. आपल्याला वाटत नाही कि, हे वृत्त दुसऱ्यांनाही कळावे किंवा याची दुसऱ्यांनाही जाणीव व्हावी. परंतु येशु ख्रिस्त आपणा प्रत्येकाला सांगत आहे कि, जो अनुभव तुम्ही घेतला. त्या विश्वासात तुम्ही इतरांनाही घेऊन या व दुसऱ्यांनाही त्याचा अनुभव घेऊ दया.
      आपण सर्वांनी ऐकले असेलच कि, पूर्वी मठवासी मठामध्येच राहायचे; ते चार भींतींमधेच असायचे त्याचं ध्येय एकच होतं: “Ora Et Labora” (प्रार्थना आणि काम). ते लोकांमध्ये मिसळत नव्हते. परंतु १२ व्या शतकात असिसिकर संत फ्रान्सीसला देवाचे पाचारण मिळाले व जेंव्हा त्यांनी देवाचा अनुभव घेतला तेव्हा त्यांनी मठवास्यांसारखे जीवन न जगता, लोकांमध्ये रममाण झाले व देवाची सुवार्ता लोकांपर्यंत पोहोचवली.
आपणही आपल्याला दिलेल्या पाचारणाला प्रतिसाद दिलेला आहे व आपापल्या परीने आपण येशूची सुवार्ता पसरवित आहोत. परंतु या उपवासकाळात आजची उपासना पुन्हा एकदा आठवण करून देत आहे कि, जो विश्वास आपल्याला मिळाला आहे, जो देवाचा अनुभव आपल्याला मिळाला आहे, तो आपल्यापर्यंतच न ठेवता तो आपण दुसऱ्यांनाही द्यावा. व आपापल्या परीने देवाची सुवार्ता इतरांपर्यंत पोहचवावी म्हणून देव बोलावीत आहे. हे देवाचे कार्य पूर्ण करण्यासाठी लागणारी कृपा ह्या मिस्साबलीदानात मागुया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद : हे प्रभू दया कर आणि तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.

१. आपले परमगुरू पोप फ्रान्सिस, महागुरू, धर्मगुरू व व्रतस्थ ह्यांनी त्यांच्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात व लोकांना दैवी दयेचा अनुभव घेण्यास मदत करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपण सर्व पापी आहोत ह्याची जाणीव प्रत्येकाला व्हावी व ह्या प्रायश्चित काळात आपण सर्वांनी आपल्या पापांचा पश्चाताप करून प्रायश्चित संस्कार घेऊन देवाची दया व कृपा अनुभवावी म्हणून प्रार्थना करूया.
३.      आपण सर्वांनी ह्या जगातील ऐहिक सुखाच्या मागे न लागता, परमेश्वराच्या सानिध्यात थोडा वेळ घालवावा व येशुप्रमाणे आपलेही रुपांतर व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४.      येथे जमलेल्या भाविकांनी निःस्वार्थीपणे जीवन जगून आपल्या जीवनात प्रार्थनेला प्राधान्य द्यावे व उदार मनाने आपल्या शेजाऱ्याची सेवा करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
५.      आपल्या सामाजिक व वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया.


Friday, 3 March 2017


Reflection for the Homily of 1st Sunday of Lent 
(05-03-17) By Alfred Rodrigues



प्रायश्चित काळातील पहिला रविवार


दिनांक : ०५-०३-२०१७
पहिले वाचन : उत्पत्ती २:७-९,३:१-७
दुसरे वाचन : रोमकरांस पत्र ५:१२-१९
शुभवर्तमान : मत्तय ४:१-११


“मोहावर विजय मिळवणे”


प्रस्तावना

आज पवित्र ख्रिस्तसभा प्रायश्चित काळातील पहिला रविवार साजरा करीत आहे. आजही उपासना, पापांचा आरंभ व ख्रिस्ताने त्यावर मिळवलेला विजय ह्याविषयी सांगत आहे.
पहिला आदम म्हणजेच जुन्या करारातील आदाम हा पापाचा बळी ठरतो हे आपण आजच्या पहिल्या वाचनात ऐकतो. आजच्या शुभवर्तमानात नव्या करारातील आदाम म्हणजेच येशू ख्रिस्त हा पापाला बळी न पडता पापावर व मोहावर विजय मिळवतो. दुसऱ्या वाचनात संत पौल आदाम व येशू ख्रिस्त यांच्यामधील विरोधाभास दाखविण्यासाठी त्यांची तुलना करतो.
ज्याप्रमाणे येशू ख्रिस्ताने, सैतानाने दाखवलेल्या अमिषाला बळी न पडता मोहावर विजय मिळवला त्याचप्रमाणे आपणसुद्धा आपल्या जीवनात मोहावर विजय मिळवण्यास समर्थ ठरावेत म्हणून आपण ह्या मिस्साबलीदानात परमेश्वराकडून विशेष कृपा व शक्ती मागुया.

सम्यक विवरण
पहिले वाचन : उत्पत्ती २:७-९,३:१-७

“मग परमेश्वराने जमिनीतील मातीचा मनुष्य घडविला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकिला तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला(२:७). मूर्तिपूजक केनानी लोकांच्या लिंगपूजेत सापाचा वापर केला जात असे. त्यामुळे लेखकाने येथे येवेला मोहात पाडण्यासाठी सापाचे प्रतिक वापरले आहे.
     देवाने मानवाला ज्ञानवृक्ष सोडून सर्व झाडांची फळे खाण्याची मुभा दिली होती. सापाने मात्र येवेला विचारले, “देवाने तुम्हाला सर्व झाडांचे फळे खाण्यास बंडी केली आहे , हे खरे आहे काय?” तेव्हा येवा संभ्रमात पडली. संभ्रम हि पापांची पहिली पायरी असते. आणि तो संभ्रम हि निर्माण करण्यात साप यशस्वी ठरला. म्हणूनच परमेश्वराने दिलेल्या स्वातंत्र्याचा गैरउपयोग करून देवासमान होण्याचा क्षणिक मोहामुळे आदाम व येवेने देवाला दुखविले आणि देवाने दिलेल्या देणग्यापासून त्यांनी स्वताःला दूर सारले.

दुसरे वाचन : रोमकरांस पत्र ५:१२-१९

सर्व मानव जात पापाच्या प्रभावाखाली आहे म्हणून सर्वांना मुक्तीची गरज आहे, असे पौलाचे प्रमेय होते. ज्यू लोक स्वतःला सज्जन समझत होते. त्यांना निरुत्तर करण्यासाठी पौलाने त्यांच्याच धर्मशास्त्रातील सदर्भाचा उल्लेख करून ते कसे पापी आहेत हे दाखवून दिले.
केवळ धर्मशास्त्रातील नियमांच्या पालनामुळे माणसाची मुक्ती होऊ शकत नाही. त्याला ख्रिस्ताच्या कृपेची आवश्यकता असते असा युक्तिवाद पौलाने केलें आहे. देवाचे नितीमत्व असा शब्द पौलाने वापरला आहे. शेवटी तो म्हणतो, माणूस स्वतःच्या सामर्थ्याने नीतिमान होऊ शकत नाही, तर देव त्याला नीतिमान करतो.

शुभवर्तमान : मत्तय ४:१-११

एक मानव ह्या नात्याने येशूला सत्व परीक्षेला सामोरे जावे लागले, हि ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे. स्वार्थासाठी आत्मबलाचा वापर करणे आणि सत्ता व संपत्ती मिळवण्यासाठी तत्वाशी तडजोड करणे असे मोहाचे स्वरूप होते. धर्मशास्त्रातील चिरंतन मूल्याच्या आधारेच या मोहाबरोबर मुकाबला करावा लागतो असे येशूने दाखवून दिले आहे.
सैतानाने देवाच्या आणि येशूच्या कार्यातही अडथळे निर्माण केले. त्याला पराभूत करून येशूने दुष्टपणावर विजय मिळवला. येथे देवपुत्र असणे म्हणजे काय हा मुख्य प्रश्न आहे व ते सिद्ध केले आहे.
परीक्षा हि अरण्यात घेतली गेली आहे किंवा घडलेली घटना आहे. म्हणून पवित्र शास्त्रात अरण्याची तुलना मोहाशी केली आहे. आणि त्याच अरण्यात येशूची सुद्धा परीक्षा घेण्यात आली. परंतु येशू ख्रिस्ताने सैतानाच्या मोहाला बळी न पडता त्या परीक्षेवर विजय मिळवला आणि आपण देवपुत्र असल्याचे दाखवून दिले.

बोधकथा

एके दिवशी सुरज पतंग उडवत होता. पतंग उंच आकाशात भरारी घेत होता व त्या पतंगाची दोरी सूरजच्या हातात होती. जसजसा सुरज आपल्या हातातील दोरी सोडत तसतसा पतंग वाऱ्यासंगे बागडत वर जात होता. आपल्या संपर्कात येणाऱ्या सर्व पक्षी मित्रांना हाय-बाय करत होता. इतर पक्ष्यांप्रमाणे एक ध्रुत कावळा पतंगाच्या सभोवती हिंडत होता. पतंगाचे जीवन पाहून त्या कावळ्याला राहवले नाही म्हणून त्याने पतंगाला प्रश्न केला, “मित्रा, तू इतका खुश दिसतोस पण तुला स्वातंत्र्य नाही कारण त्या मुलाच्या हातातील दोऱ्याने ते हिरावून घेतले आहे. तुला जीवनात आनंदित रहायचे असेल तर तुला ह्या दोऱ्यापासून मुक्त व्हायला हवे. पतंग थोडा वेळ विचार करतो व म्हणतो, “पण मला ह्यातून मुक्त कोण करेल?” त्यावर कावळा उत्तर देतो, “मी माझ्या चोचीने दोर कापून तुला मुक्त करीन.” कावळ्याने क्षणाचाही विचार न करता पतंगाचा दोरा कापून पतंगाला मुक्त केले व व्हायचे ते झाले पतंग गटांगळ्या खात क्षणात खाली कोसळले.

मनन चिंतन

त्या पतंगाप्रमाणे आपणही आपल्या जीवनात अशा मोहाला बळी पडत असतो. आपल्या जीवनात अशा काही संभ्रम निर्माण करणाऱ्या घटना किंवा प्रसंग येतात ज्यावेळी आपल्याला परमेश्वराचे स्मरण होत नाही. आपल्या स्वतःवरील असलेला  विश्वास तुटून पडतो व आपण मोहाला बळी पडून सैतानाला अंगीकारतो.
प्रायश्चित काळ हा देवाजवळ येण्याचा काळ आहे. प्रायश्चित काळ हा आपल्याला पापापासून पळून देवाकडे वळण्याचा मंत्र देत आहे. संत पौल आपल्या इफिसकरास पत्रात ६:१० मध्ये म्हणतो, “प्रभूमध्ये व त्यांच्या सामर्थ्यामध्ये बळवंत होत जा. सैतानाच्या डावपेचात तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री धारण करा.”
आजच्या युगात जगताना सैतान त्याच्या शब्दाद्वारे व विचाराने आमिष दाखवून मोहाला बळी पाडतो. पण जर आपल्या जवळ देवाच्या वचनाची शस्त्रसामग्री धारण केलेली असेल तर सैतानाला प्रतिकार करण्यास आपणाला सामर्थ्य मिळते. देवाचे वचन पाळणारा मनुष्य कधीच विनाशाकडे जात नाही तर त्याचे तारण होत असते व त्याला सार्वकालिक जीवनाचा आनंद मिळत असतो.
उपवसाकाळात सैतानाने येशूची सुद्धा परीक्षा घेतली परंतु येशूने सैतानाचा प्रतिकार केला. अनेक वेळा आपण देवाचे वचन चांगल्या प्रकारे आत्मसात न केल्याने आपण सैतानाच्या मोहाला बळी पडतो. पदासाठी, पैशासाठी, संपत्तीसाठी किंवा नावासाठी देवाला नाकारून सैतानाच्या अधीन होतो व त्याचा मोबदला आपल्याला अशांती, असमाधान व दुःख अशा प्रकारच्या नकारात्मक प्रसंगांना बळी पडावे लागते.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: प्रभो, तुझ्या मार्गावर चालण्यास आम्हाला प्रेरणा दे.

१.      आपल्या परमगुरुनां देवराज्याची मुल्ये सर्वत्र पसरविता यावीत व त्यांना ह्या कार्यात इतर धार्मिक पुढाऱ्याचे सहकार्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२.      सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सामाजिक कल्याणाची कामे करत असताना विरोधास तोंड देऊन ख्रिस्ताप्रमाणे ठाम उभे राहावे व त्यांना पवित्र आत्म्याचे पाठबळ लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया
३.      ह्या प्रायश्चित काळात प्रभुने आपल्याला आपल्या पापाचा धिक्कार करून त्याच्याकडे येण्याच्या संधीचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा व त्याच्या शिकवणुकीनुसार चालावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४.      जे आजारी आहे अशांना प्रभूचा दैवी स्पर्श व्हावा व त्यांची आजारातून मुक्तता व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

५.      आपण आपल्या वैयक्तिक व सामाजिक गरजासाठी प्रभूकडे प्रार्थना करूया.