Thursday, 27 January 2022

Reflection for the Fourth Sunday in Ordinary Time (30/01/2022) By: Br. Brijal Lopes.


सामान्यकाळातील चौथा रविवार

 


दिनांक: ३०/०१/२०२२

पहिले वाचन: यिर्मया १:४-५,१७-१९.

दुसरे वाचन: १ करिंथ. १२:३१-१३:१३.

शुभवर्तमान: लुक ४:२१-३०.

 


प्रस्तावना:

आज ख्रिस्तसभा सामान्य काळातील चौथा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपणा सर्वांना परमेश्वराच्या हाकेला होकार देऊन, त्याद्वारे सुवार्तेची घोषणा प्रबळतेने व निर्भीडपणे करण्यासाठी पाचारण करीत आहे. प्रत्येक व्यक्तीला देवाने एक मिशन कार्य दिलेले आहे, व ते कार्य करण्यासाठी योग्य ते सामर्थ्य व शक्ती देव त्यांना पुरवतो. त्याच सोबत देव त्यांच्या बरोबर वस्ती करतो.

आजच्या पहिल्या वाचनात आपणास यिर्मयाला झालेले पाचारण व त्याची देवाने त्याच्या कार्याकरीता केलेली निवड ह्या विषयी सांगत आहे. एक निर्भीड व देवाच्या कार्यासाठी झटण्यासाठी व देवाच्या प्रजेला देवाकडे आणण्यासाठी व खऱ्या देवाची आराधना करण्यासाठी जी प्रसंगे त्याच्यासमोर येणार आहेत ह्याबद्दल आपणास सांगण्यात आले आहे.

आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपणास प्रीती विषयी सांगत आहे. आपल्या जीवनात प्रीती, आशा व विश्वास ह्यांना अनन्य साधारण महत्व आहे. पण ह्या सर्वापेक्षा प्रीती ह्या शब्दाला किती महत्त्व आहे व त्याचे मानवी जीवनात असलेले स्थान ह्याविषयी संत पौल आपणास बोध करीत आहे.

आजच्या शुभवर्तमानात येशू ख्रिस्त आपणासमोर संदेष्ट्याला होणाऱ्या छळाविषयी व लोकांनी केलेल्या मानहानी विषयी सांगत आहे. देवाच्या कार्यात संदेष्ट्यांची पार्श्वभूमी कशी असावी ह्याविषयी सांगण्यात आले आहे. तर मग त्याच देवाची घोषणा जगभर पसरविण्यासाठी आपणास परमेश्वराचे सामर्थ्य व शक्ती लाभावी म्हणून आपण ह्या मिस्साबलीदानात प्रार्थना करूया.

  


मनन चिंतन:

ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधु-भगिनींनो. आज आपण सामान्य काळातील चौथा रविवार साजरा करीत आहोत. आजच्या ह्या उपासनेत आपण ख्रिस्ताच्या कार्यामध्ये आलेले प्रसंग (चांगले किंवा वाईट), व त्या प्रसंगांना ख्रिस्ताने दिलेले आवाहन या विषयावर आपण मनन चिंतन करणार आहोत. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती ही देवाच्या विशिष्ट कार्यासाठी निवडलेली आहे. प्रत्येक क्षण, वेळ हा आपणास देवाने दिलेल्या कार्याविषयी व त्याच्या सुवार्ता प्रचाराकासाठी कसा उपयोग करावा ह्या संदर्भात आपणास आजची उपासना सांगता आहे.

जीवन एक आवाहन आहे. प्रत्येक व्यक्ती ही जीवनातील असलेल्या प्रत्येक संकटांना तोंड देत पुढे जात असते. असाच प्रसंग आपण ख्रिस्ताच्या जीवनात अनुभवत आहोत. ख्रिस्ताची शिकवणूक ही सभास्थानातील काही लोकांना आवडनारी नव्हती, काही लोकांना तर त्याच्या शिकवणीतून काहीतरी घेऊन आपल्या जीवनपरिवर्तनासाठी काहीतरी करावे यासाठी प्रयत्न न करता; “हा सुताराचा मुलगा ना? हा योसेफाचा मुलगा ना?” अशा गोष्टीवर विचार विनिमय करून योग्य ती (शिकण्याची व त्याद्वारे सुंदर जीवन जगण्याची) संधी गमावून बसले होते. ख्रिस्ताची शिकवण ही फक्त जे समाजात राहूनसुद्धा ज्यांना समाजात मान नव्हता व जे अस्वीकारणीय लोक होते अशांणाच ख्रिस्ताची शिकवण आवडली होती. त्या प्रमाणे ते देवशब्दाला मान देत होते.

प्रभू येशूचे मिशन कार्यात गरिबांना फार मोठे प्राधान्य होते. येशूच्या मिशन कार्याचा मुख्य मुद्दा म्हणजे गोरगरीब व सर्वसामान्य लोकांना देवशब्द घोषवून त्यांना स्वर्गराज्याची महती पटवून देण्याचा आहे. सर्व लोकांना सामावून घेऊन एकत्र वाटचाल करून स्वर्गराज्याची घोषणा करण्यासाठी येशूने सर्व प्रकारच्या लोकांना प्राधान्य दिले होते. यहुदी लोकांना ख्रिस्ताची शिकवण आवडली. त्याच्या कार्याविषयी आश्चर्य व्यक्त केले. पण, एक संदेष्टा व तारणारा म्हणून त्याचा त्यांनी स्वीकार केला नाही. यहुदी नसलेल्या लोकांना ख्रिस्ताने आपल्या कार्यात समाविष्ट करून घेतले. त्यामुळे यहुदी लोक ख्रिस्ताचे विरोधी बनले आणि ख्रिस्ताचा घात करण्यास पाहू लागले.

आपणही आपल्या जीवनात ख्रिस्ताच्या कार्याला होकार देऊन व त्याच्या मार्गावर चालून स्वर्गराज्याची घोषणा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या करत असतो का? की, ह्या कार्यात वाईट लोकं किंवा प्रसंगे आपल्या आड येतात म्हणून सोडून देतो का? देवाचे कार्य न रोखता सदोदित आपण पुढे जात राहावे यासाठी ख्रिस्त आपणास सांगत आहे, पाचारण करीत आहे. येशू आपणास सोबत देत असतो. तो आपला पाठीराखा आहे. आणि म्हणूनच त्याच्यासारखे धैर्यवान व प्रबळ इच्छा मनात बाळगून, ख्रिस्तासारखे कार्य करण्यास एक संदेष्टा होऊन, कार्य करण्याची इच्छा मनात असली पाहिजे.

परमेश्वराचे वचन हे आपणांस समाजामध्ये जागृतता निर्माण करण्यासाठी व त्याद्वारे येणाऱ्या प्रत्येक संकटाला तोंड देण्यासाठी, सज्ज राहण्यासाठी सांगत आहे. इतिहासाकडे आपण जर बघितले किंवा आजच्या वर्तमानकाळात जी लोक सत्याच्या बाजूने लढत आहेत, व जी लोकं सत्य पसरविण्यासाठी झटत आहेत, अशा सर्वांना अपमानास्पद व तिरस्काराच्या मार्गाने जावं लागतं. त्यांचा कोणीच स्विकार करीत नाहीत. पण अशी लोकं परमेश्वराच्या शब्दाला होकार, परमेश्वराच्या कार्याला आलिंगन देतात व कोणत्याही प्रकारच्या संघर्षाला तोंड देण्यास तयार असतात. कारण त्याची आशा व विश्वास हा परमेश्वरामध्ये आहे. ख्रिस्ताने आपल्याला प्रत्येक संकटाला व पंच प्रसंगाला धीराने तोंड दिले. आपल्याच लोकांनी केलेली अवहेलना त्यांनी मनात ठेवली नाही तर, सर्वांना देवाच्या प्रेमाने व दयेने बघितले व कार्याला न थांबता आपले कार्य त्याने सुरुचं ठेवले.

सामाजिक जीवनात कार्य करत असताना, आपल्या लोकांकडून आपली अवहेलना होत असते. आपल्या पदरी निराशा पडलेली असते. परंतू आपणा सर्वांना ख्रिस्ताने दिलेल्या ह्या उदाहरणाद्वारे व त्याच्या शिकवणीद्वारे द्वेषाची भिंत नष्ट करून, तिरस्काराची भाषा न करता क्षमेद्वारे व ख्रिस्ताच्या प्रेमाद्वारे एकमेकांना पाहून कार्य पुढे सुरू ठेवायचे आहे. या सर्व येणाऱ्या पेच प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी व देवाचे कार्य अबाधित ठेवण्यासाठी आपणा सर्वांचा परमेश्वराची कृपा मिळावी म्हणून ह्या पवित्र मिस्साबलिदानात प्रार्थना करूया.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: “हे परमेश्वरा दयाकर व तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.”

१.    आपले परमाचार्य पोप फ्रान्सिस, कार्डिनल्स, बिशप्स, व देऊलमातेच्या कार्यात नेतृत्व करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी आपल्याला दिलेल्या कार्याद्वारे व ख्रिस्ताचा आदर्श समोर ठेवून, देवाच्या प्रजेला योग्य मार्ग दाखवून, त्यांना ख्रिस्ताकडे आणण्यासाठी पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन मिळावे म्हणून प्रार्थना करूया.

२.    जे भाविक समाजिक, आर्थिक व शिक्षणाच्या बाबतीत परिवर्तन करण्यासाठी झटत आहेत. पर्यावरण व निसर्गाच्या सर्व हक्कासाठी जे प्रयत्नशील आहेत. अशा सर्वांना परमेश्वराचे सहकार्य लाभावे, शासनाकडून योग्य ती मदत मिळावी, सर्व लोकांमध्ये शांतता व एकात्मता निर्माण व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

३.    जगभर पसरत असलेल्या कोविड-१९ पासून आपणा सर्वांचं देवाने रक्षण करावं. डॉक्टर्स व नर्सेस ह्यांच्या प्रयत्नांना परमेश्वराने यश द्यावे. जे शास्त्रज्ञ योग्य त्या औषधाचे संशोधन करत आहेत त्यांना पवित्र आत्म्याने मार्गदर्शन करावे. मानवाच्या मूलभूत हक्कासाठी झटणारे सर्व सरकारी व खाजगी कर्मचाऱ्यांना कृपा व शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

४.     शिक्षक, सैनिक, शेतकरी व इतर सर्व सेवक नेत्यांना त्यांच्या कार्यात परमेश्वराने यश द्यावे त्याद्वारे देवाची, समाजाची योग्य ती प्रगती व्हावी. सर्व अडीअडचणींवर मात करण्यासाठी त्यांना पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

५.    सर्व राजकीय नेत्यांनी देशाचे हित पाहून लोकांच्या कार्यासाठी व त्यांच्या विकासासाठी झटावे, त्याचप्रमाणे देशात शांतता व सुव्यवस्था नांदावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.

६.    थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक, आणि सामाजिक गरजासाठी प्रार्थना करूया.


Thursday, 20 January 2022

Reflection for the Third Sunday in Ordinary Time (23/01/2022) By: Br. Brian Motheghar.



सामान्य काळातील तिसरा रविवार

दिनांक: २३/०१/२०२२

पहिले वाचन: नहेम्या ८:२-४अ, ५-६, ८-१०

दुसरे वाचन: १ कोरींथ १२:१२-३०

शुभवर्तमान: लुक १:१-४;४:१४-२१

 



प्रस्तावना:

ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपण सामान्य काळातील तिसरा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्याला ख्रिस्ताद्वारे तारणाची सुवार्ता प्राप्त झाली आहे ह्या विषयी सांगत आहे. हि सुवार्ता आपल्याला देवाची प्रिय लेकरे बनवून त्याच्या राज्यासाठी आपण एकत्र काम करण्यासाठी सक्षम बनवत असते.

आजच्या पहिल्या वाचनात आपण वाचतो की, कशाप्रकारे लोकांनी त्यांचे ध्येय्य आणि स्वातंत्र्य साध्य करण्यासाठी एकत्र काम केले आणि त्यानंतर नहेम्याने त्यांना एकत्र केले आणि त्यांना पवित्र शास्त्रपाठ वाचून दाखवला आणि लोकांनी आपल्या माना नम्र करून त्या देवाच्या शब्दाला मानवंदना दिली.

आजचे दुसरे वाचन हे संत पौलाचे करिंथकरांस लिहिलेले पत्र आहे. त्यात संत पौल करिंथकरांस एकजुटीने राहण्यासाठी आणि ख्रिस्ताचे एक शरीर म्हणून एकत्र काम करण्यासाठी प्रीत्साहित करीत आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती हा महत्वाचा आहे असे मानणे गरजेचे आहे. एकमेकांबद्दल सलोखा, समंजसपणा, प्रामाणिकपणा, आणि परस्पर आदर असणे आवश्यक आहे.

आजच्या शुभवर्तमानात संत लुक हा ख्रिस्ताविषयी घडलेल्या घटनांचा स्वतः शिक्कामोर्तब करतो आणि त्यने लिहिलेला अहवाल हा ठोस आणि व्यवस्थित आहे असे सांगतो. तसेच आजच्या शुभवर्तमानात ख्रिस्त आपल्या सुवर्तिक कार्याचे ध्येय्य प्रस्तापित करीत आहे हे आढळून येते. यशया संदेष्ट्याने भाकीत केलेल्या देव राज्याची पुनरावृत्ती आजच्या शुभवर्तमानात आपल्याला वाचावयास मिळते.

येशूची सुवार्ता आपल्याला अनेक अशा बंधनांतून मुक्त करत असते, म्हणून आजच्या ह्या उपासनाविधीत भाग घेत असता आपण कोणत्या बंधनात बांधलो गेलो आहोत त्याचा विचार करूया आणि त्या तारणदायी देव पुत्राकडे आपल्या नवीन जीवन जगण्यास प्रेरणा आणि सहाय्य मागूया.





मनन चितन:

ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो आजची उपासना आपल्याला अनेक अशा बंधनांतून मुक्त करून सक्षम बनवत आहे. आजचे पहिले वाचन हे आपल्याला सांगते की, त्या दिवशी एज्रा ह्या याजकाने शास्त्रपाठ घेऊन तो लोकांपुढे वाचून दाखवला आणि त्याचा लोकांनी नम्रतेने स्विकार केला. कारण, त्याने जे काही वाचले होते ते लोकांना समजले होते. त्यांना त्यांच्या जीवनात देवाच्या वचनांनी स्पर्श केला म्हणून ते रडू लागले होते. त्यांनी आपल्या पापांची कबुली केली. कारण, त्यांना समजले होते की, त्यांच्या पूर्वजांनी देवाशी केलेला करार मोडला होता आणि बेकायदेशीर बनले होते. आता त्यांनी एज्रा समक्ष त्या वचनांची पुनरावृत्ती केली आणि उत्स्फुतेने देवाच्या शब्दाला दंडवत दिली.

बरोबर ५०० वर्षा नंतर त्याच दिवशी म्हणजे शब्बाथ दिवशी जेव्हा यहुदी आपल्या सभास्थानात गेले असता प्रभू येशूने यशया संदेष्ट्याच्या पुस्तकातील ६१:१-२ हा भाग उघडला आणि वाचावयास सूरूवात केली. असे केले असता प्रभू येशूने त्यांना निशब्द केले आणि त्यांना सांगितले की, “हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असतांना पूर्ण झाला आहे”(लुक ४:२१). हे सर्व त्याच्या प्रेषितीय कार्याविषयीचे होते. आणि हेच मिशन कार्य किंवा प्रेषितीय कार्य देऊळमातेने ५ वेगवेगळ्या स्थरावर सुवर्तेच्याद्वारे प्रस्थापित केले आहे:

१.    दीनांस समुपदेशनाद्वारे (Counselling) सुवार्ता सांगणे- म्हणजेच मानसिकरित्या सक्षमीकरण किंवा सबळता देणे.

२.    बंधीवानांस आरोग्यदायी कार्याद्वारे सुटका – आध्यात्मिक सबळता.

३.    आंधळ्यांना शिक्षणाद्वारे दृष्टी- बैद्धिक सक्षमीकरण.

४.    जे ठेचले जातात त्यांना न्याय/ सुशासनाद्वारे मुक्त्तता देणे- राजकीय सशक्तीकरण.

५.    परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची याजकाच्या आशीर्वादाने घोषणा करणे (गणना ६:२२-२७)- आर्थिक सक्षमीकरण.

प्रत्येक याजकाने, प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने, प्रत्येक धर्मग्रमाने ह्या येशू ख्रिस्ताच्या ५ सुवर्तिक तत्वांना बिंबवून आपलेसे करून त्या प्रमाणे आपले जीवन प्रभू कार्यासाठी समर्पित केले पाहिजे.

इस्त्रायल लोकांच्या जीवनात दु:खाचा डोंगर तेव्हाच आला जेव्हा त्यांनी याजक, संदेष्टा आणि राजा ह्या तिहेरी अभिषेकाला हरवून बसले आणि आपल्या मर्जीप्रमाणे जीवन जगू लागले. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, मलकीसदेक (उत्पती १४:१८), मोशे (निर्गम ३), याहोशवा (याहोशवा १), शमुवेल (१ शमुवेल ३), इत्यादी, ख्रिस्ता प्रमाणे ह्या तिहेरी अभिषेकात त्यांनी संदेष्ट्याचे (शिक्षक आणि देवाचा दैवज्ञ) कार्य केले होते. उदा. एलिशा हा १ राजे १७ आणि १९ प्रमाणे याजक म्हणून अभिषिक्त केला होता; की त्याच्याद्वारे तो लोकांना आशिर्वाद देईल (गणना ६:२२-२७), आणि देवाला त्यांचे यज्ञ अर्पण करील (इब्री. ५:१-३), आणि १ शमुवेल १० नुसार राजा हा लोकांचा नेता/ प्रशासकीय प्रमुख म्हणून अभिषिक्त केला जात असे.

शमुवेलानंतर येणाऱ्या राजांनी हा तिहेरी अभेषेक गमावला. उदा. शौल, दावीद, शलमोन, आणि त्यानंतर इस्त्रायल राज्य विभागले गेले. त्यानंतर पुनर्स्थापनेची (यशया १:२६, ९:६) हि भाकिते आली, त्यात ख्रिस्ताच्या आगमना विषयी सांगण्यात आले. ख्रिस्त म्हणजे अभिषिक्त केलेला- कारण तो हर्षरुपी तेलाने अभिषिक्त केलेला होता आणि त्याच्याहून अधिक श्रेष्ठ असा कोणीही नाही (इब्री. १:९). आणि ‘प्रमुख याजक’ (इब्री. ३:१) म्हणून तो युगानुयुग राज्य करतो. आणि तो प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे (प्रकटीकरण १७:१४).

आपण सर्व ख्रिस्ती ह्या नात्याने देऊळमातेच्या ह्या संस्कारांमध्ये अर्थपूर्ण रित्या सहभागी होऊन ह्या तिहेरी अभिषेकात सहभागी होत असतो. उदा. स्नानसंस्कार, दृढीकरण, आणि प्रायश्चित्त संस्कार ह्या मुले आपण संघटीत केले जातो. परमेश्वराचे वचन आपणाला सांगते की, अभिषेकामुळे (त्याच्या वचनाद्वारे आणि संस्काराद्वारे) आपले ओझे आणि जू नष्ट होईल (मत्तय ११:२८-३०).

देवाचे वचन हे आपल्या जीवनात, आपल्या धर्मग्रामामध्ये, आपल्या घरात पूर्णपणे समर्थन केले पाहिजे, कारण आपण आजच्या पहिल्या वाचनात वाचतो की, ‘ते सकाळपासून ते दुपारपर्यंत शास्त्रलेख वाचत होते’. आणि प्रभू येशूने हि तसेच केले, ‘त्याने त्यांना बऱ्याच गोष्टींविषयी शिक्षण देऊ केले’ (मार्क ६:३४). आपण आपल्या धर्मग्रामाच्या सहाय्याने इतराना शिक्षण, राजकीय ज्ञान, आर्थिकरित्या सक्षम बनवले पाहिजे त्यानुसार देऊळमातेचे प्रेषितीय कार्य पूर्णत्वास येईल आणि त्या कार्यासाठी लागणारी मद्दत सुध्दा आपल्या द्वारे होत जाईल. देवाच्या वचनाच्या सहाय्याने आपण बरेच असे प्रकल्प सिद्धीस नेऊ शकतो.

आजच्या दुसऱ्या वाचनात आपल्याला पहावयास मिळते की, मंडळीत कित्येकांना वेगवेगळ्या स्थरावर नेमले आहे. प्रेषित, संदेष्टे, शिक्षक – हे देऊळमातेच्या कारभारासाठी आणि नेतृत्वासाठी वापरले जातात. उदा. महागुरूस्वामी आणि धर्मगुरु. अद्भुत कृत्ये करणारे, निरोगी करणारे – ह्या भेटवस्तू प्रामुख्याने आपल्याला व्रतस्थांमध्ये आणि सर्व सामान्य लोकांमध्ये पहावयास मिळतात. विचारपूस करणारे, व्यवस्था पाहणारे, विभिन्न भाषा बोलणारे, मध्यस्थी करणारे हे सर्व प्रार्थनेचे योध्ये आहेत. आणि ह्याद्वारे सर्व सामान्य लोकांचे सशक्तीकरण केले जाते.

सशक्तीकरण हे प्रभू येशूचे ह्या भूतळावरील मिशन होते. आणि ह्याचा आपल्याला कधीही विसर पडू नये. २ पेत्र १:३-९ ह्या विषयी सर्व काही सांगते. सक्षमतेचे आठ स्तर आहेत. १) विश्वास (आध्यात्मिक), २) सात्विकता (सामाजिक), ३) ज्ञान (बैद्धिक), ४) इंद्रियदमन (नैतिक), ५) धीर (मानसिक), ६) सुभ्क्ती (धार्मिक), ७) बंधूप्रेम (राजकीय), ८) प्रीती (मानसिक-आध्यात्मिक) सशक्तीकरण होत असलेले आपल्याला पहावयास मिळते. आणि ह्या गुणांमुळे आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या ओळखीविषयी निष्क्रिय व निष्फळ होणार नाहीत.

आजच्या शुभवर्तमानत “थियफील” हा एक ग्रीक भाषेतील शब्द वापरला गेला आहे आणि त्याचा अर्थ हा “देवाचा प्रियकर किंवा शोधक” असा आहे. ऐतिहासिक दृष्ट्या हा शब्द फक्त जे देवाचा शोध किंवा देवावर प्रेम करणाऱ्यांना वापरण्यात आला होता. त्यामुळे आपण जे देवावर नित्तांत प्रेम करतो आणि त्याचा शोध करतो त्यांच्यासाठी हि आनंदाची बातमी आहे. कारण देवाच्या वचनातील सामर्थ्य आपल्याला ख्रिस्ताच्या प्रतिमेशी जुळवून घेते आणि आपल्यातील देवाची प्रतिमा अधिक स्पष्ट आणि उज्वल बनवते. तर मग ह्या मंगळदिनी आपल्या तीन अभिषेकांची पुनरावृत्ती करूया आणि एक ख्रिस्ती ह्या नात्याने असक्षम आहेत त्यांना सक्षम बनवण्याचा प्रयत्न करूया.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: “हे प्रभो आमची प्रार्थना ऐक.”

१. आमचे परमगुरुस्वामी, महागुरुस्वामी व सर्व कार्यकर्त्यांना परमेश्वराचा स्पर्श व्हावा व प्रभूच्या प्रेमशांतीचा संदेश त्यांनी सर्वत्र पसरावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

२.   जे तरुण-तरुणी देवापासून दूर जाऊन अंधारात भरकटत आहे, त्यांना  प्रभूच्या प्रकाशात मार्गक्रमन करावे व जागतिक मोह सोडून प्रभूच्या प्रेमाकडे वळावे म्हणून प्रार्थना करूंया.

३.  जे लोक आजारी आहेत अशांना प्रभूचा प्रेमदायी स्पर्श व्हावा व त्यांना त्यांचा आजार सहन करण्यास सहनशीलता व शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

४.    आपल्या देशाच्या आर्थिक विकासासाठी कार्य करणारे आपले राजकीय पुढारी व नेत्यांनी नम्रता हा गुण अंगी बाळगून देशाच्या हितासाठी कार्यरत रहावे व जनतेच्या कल्याणासाठी निःस्वार्थीपणाने झटावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. थोडावेळ शांत राहून आपल्या सामाजिक, कौटुंबिक व वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया.