Wednesday, 16 March 2022

Reflection for the Third Sunday of Lent (20/03/2022) By: Fr. Suhas Pereira.



उपवासकाळातील तिसरा रविवार




दिनांक: २०/०३/२०२२

पहिले वाचन: निर्गम ३:१-८अ, १३-१५.

दुसरे वाचन: १ करिंथ. १०:१-६, १०-१२.

शुभवर्तमान: लुक १३:१-९.

 


प्रस्तावना:

आज आपण उपवासकाळातील तिसरा रविवार साजरा करत आहोत. आजची उपासना आपल्याला आपल्यात बदल, नाविन्य आणण्याचं आवाहन करीत आहे. आजच्या उपासनेची तिन्ही वाचने परमेश्वराच्या दयेबद्दल आणि करुणेबद्दल बोध देत आहेत. आपण पुन्हा-पुन्हा पापात पडतो परंतु परमेश्वर आपल्याला बदलण्याची नवीन संधी देत असतो. कारण तो आपला प्रेमळ पिता आहे. परंतु परमेश्वराचे माणसावरील प्रेम जरी अथांग आणि अमर्याद असले, तरीसुद्धा परमेश्वर आपल्या सहकार्याशिवाय आपलं तारण करू शकत नाही, आपल्याला वाचवू शकत नाही. म्हणूनच या उपासकाळात तो आपल्याला आपल्या पापांचा पश्चाताप करून, जीवनाचं नूतनीकरण करून आपल्या जीवनाद्वारे प्रेम, करुणा, क्षमा आणि सेवेची फळे देण्यास निमंत्रण देत आहे.

देवाने मोशेची इस्रायलचा पुढारी आणि मुक्तिदाता म्हणून निवड करून इस्रायली लोकांप्रती आपली दया आणि आपले प्रेम कसे दाखवले हे आपण आजच्या पहिल्या वाचनात ऐकतो. दुसऱ्या वाचनात संत पौल म्हणतो कि देव हा दयाळू आणि त्याचबरोबर शिस्तबद्ध आणि शिस्त लावणारा पिता आहे. म्हणूनच आपण पापी जीवनापासून दूर राहिलो पाहिजेत. त्याचप्रमाणे आजच्या शुभवर्तमानात आपण देव आपल्या प्रजेला शिस्त कशी लावतो, त्याच्या मार्गावर चालण्यास कसे शिकवितो, पश्चाताप करण्यास आमंत्रण देतो आणि जीवनाचा जीर्णोद्धार करून पवित्र आत्म्याची फळे आपल्या जीवनात देण्यास कशी प्रेरणा देतो याबद्दल ऐकतो.

आजची उपासना आपल्याला सांगत आहे, कि सुखी, समाधानी आणि आनंदी जीवन सर्वांसाठी शक्य आहे. परंतु त्यासाठी आपल्याला गरज आहे पश्चातापाची, परमेश्वराकडे वळण्याची. आणि हे चाळीस दिवस प्रभू येशूच्या पुनरुत्थानाच्या सणाची तयारी करत असताना आपण पश्चाताप करून देवाकडे, स्वर्गाकडे वळण्याचा प्रयत्न करत आहोत. परमेश्वर हाच आपल्यासाठी खऱ्या सुखाचा, आनंदाचा आणि खऱ्या जीवनाचा स्रोत आहे. त्या परमेश्वराकडे ह्या मिस्साबलीच्या सुरुवातीला आपण आपल्या हातून घडलेल्या सर्व अपराधांची क्षमा मागू या आणि पश्चात्तापी अंतःकरणाने देवाकडे वळूया.

 


मनन-चिंतन:

त्यावेळी तेथे काही लोक उपस्थित होते. त्यांनी येशूला गालीलातील त्या लोकांविषयी सांगितले, ज्यांचे रक्त पिलातानेआधीच असलेल्या यज्ञपशूंच्या रक्तात मिसळले होते. त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्हांला वाटते का की, ह्या गालीलकरांनी जे भोगले त्यावरुन ते इतर गालीलकरांपेक्षा जास्त पापी होते? नाही, मी तुम्हांस सांगतो, जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर ते जसे मेले तसे तुम्हीही मराल" (लूक १३, -). प्रभू येशूचे हे शब्द ऐकल्यावर आपल्याला कदाचित प्रश्न पडेल, कि ह्या रविवारचे शुभवर्तमान हे खरोखरच शुभ-वर्तमान किंव्हा शुभ-वार्ता आहे का? खरं पाहिलं तर आजच्या शुभवर्तमानचे शब्द हे स्पष्ट चेतावणी आणि इशारा देणारे शब्द आहेत: "जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर ते जसे मेले तसे तुम्हीही मराल". ह्या शब्दांद्वारे प्रभू येशू यहुदी अमजतील लोकांना चेतावणी देत होता. परंतु हि चेतावणी फक्त त्या काळासाठी आणि इतरांसाठीच नव्हती तर आजच्या काळासाठी आणि आपल्या सर्वांसाठी सुद्धा आहे. प्रभूच्या आजच्या शुभवर्तमानाला आपल्याला सर्वांना आपल्या निद्रावस्थेतून जागं करून सांगवायचं आहे, कि जीवनात थोडं गंभीर बना. आजचं शुभवर्तमान आपल्याला जीवनात निश्चयी आणि निर्धारी बनण्यास बोलावत आहे."जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर ते जसे मेले तसे तुम्हीही मराल". जर आपण आपल्या निद्रावस्थेतून उठून पश्चात्तापी बनलो आपल्या जीवनाचा कायापालट करून देवाच्या मार्गावर राहण्याचा आणि जगण्याचा प्रयत्न केला, तर आपले तारण होईल, नाश होणार नाही; आपल्याला आजच्या शुभवर्तमानात आपला न्याय करू पाहणाऱ्या न्यायाधीश देवाचे दर्शन होणार नाही तर आपल्यावर प्रेम करणाऱ्या, आपली सदैव काळजी वाहणाऱ्या आणि आपण पापात राहून आपला नाश होऊ नये म्हणून सदैव प्रयत्न करणाऱ्या आणि आपलं रक्षण करणाऱ्या प्रिय पित्याचे दर्शन होईल.

मग प्रेमळ स्वर्गीय पित्याचे दर्शन घडवणाऱ्या प्रभू येशूच्या या चेतावणीचा आपल्यासाठी काय अर्थ होऊ शकतो? आजच्या शुभवर्तमानचा अर्थ आपल्यासाठी असा होऊ शकतो: परमेश्वर पित्याच्या प्रेमाचा अनुभव घे, त्याच्या पवित्र आत्म्याला तुझे हृदय आणि जीवन उघड, त्याच्या पवित्र शब्दाला तुला स्पर्श करून नव्हे करावे म्हणून तू तुझे अंतःकरण उघड. वेळ आणि संधी आहे तोपर्यंत पश्चाताप कर आणि देवाकडे वळ. फळ नं देणाऱ्या आणि जमिनीला उगीच भार होणाऱ्या अंजिराच्या झाडाप्रमाणे होऊ नकोस. कारण असे झाड तोडून दिले जाईल. आणि ज्याप्रमाणे असे फळ देणारे झाड तोडून टाकले जाईल, त्याप्रमाणेच पापात राहणाऱ्या आणि पश्चाताप करणाऱ्या मनुष्याचा पापामुळे नाश होईल.

परंतु फळ देणाऱ्या अंजिराच्या झाडाच्या दाखल्याचा तसाच अंत होत नाही. तो दाखला पुढे सांगतो, कि अंजिराचे झाड फळ देत नसले आणि तोडून टाकायच्या लायकीचे असले तरी त्या झाडाचा माळी मात्र दयाळू आणि चांगला होता. त्या माळ्याने ते अंजिराचे झाड चांगल्या जमिनीत किंव्हा मातीमध्ये लावले होते. आणि आता तो माळी ते अंजिराचे झाड तोडून टाकता अजून थोडा वेळ तसेच राहू द्यावे अशी विनंती आपल्या मालकाला करतो. त्या झाडाने फळ द्यावे म्हणून सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचं वचन तो माळी आपल्या मालकाला देतो. या ठिकाणी आजची उपासना आपल्याला अजून एक महत्वाचा संदेश देत आहे: आजचं शुभवर्तमान आपलं पाप ओळखून पश्चाताप करण्यासाठी आपल्याला आवाहन करते. आजच्या शुभवर्तमानात पश्चातापाची गरज दाखवून देणारा आणि त्यासाठी आमंत्रण देणाऱ्या देवाचे दर्शन होते. त्याचप्रमाणे माळ्याच्या प्रतिमेत आपल्याला सदैव मदत करू इच्छिणाऱ्या आणि आपल्या प्रति सहनशील आणि संयमी असणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताचे देव आणि मानवमधील मध्यस्थ म्हणून दर्शन होते. ज्याप्रमाणे माळ्याला त्या अंजिराच्या झाडाला अजून एक संधी द्यावयाची होती, त्याप्रमाणे प्रभू येशू सुद्धा आपल्या बाजूने असतो, आपल्याला सहाय्य्य करतो. तो सदैव आमची काळजी घेतो आणि आम्हाला नवजीवन, सार्वकालिक जीवन लाभावे आणि आम्ही पुष्कळ, अमाप प्रमाणात फळं द्यावीत म्हणून तो आपल्यासाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदानसुद्धा करतो.

आपण काय केले पाहिजे? आपली जबाबदारी काय आहे? आपण आपल्या झोपेतून उठलो पाहिजेत, नव्या जीवनाची एक नवीन सुरुवात केली पाहिजे, आणि अंजिराच्या एका चांगल्या झाडाप्रमाणे चांगली फळे दिली पाहिजेत. इतकेच नव्हे, तर इतरांनी सुद्धा चांगले जीवन जगावे, चांगली आणि भरपूर फळं द्यावीत आणि त्यांचं जीवनसुद्धा प्रभूच्या मळ्यात फुलावे म्हणून ख्रिस्ताप्रमाणे आपल्यालासुद्धा माळी बनून इतरांच्या जीवनरूपी रोपट्याची काळजी घेण्याचं आवाहन आजचं शुभवर्तमान करीत आहे.

प्रभू येशू ख्रिस्त हा एक संय्यमी आणि काळजीवाहू माळी हा स्वर्गीय पित्याजवळ आपल्या सर्वांचा मध्यस्थी बनतो. त्याच्यावरील श्रद्धेत आपण पश्चातापाचा मार्ग धरू या आणि देवाकडे वळण्याचा प्रयत्न करू या. प्रभू येशूच्या मध्यस्थीद्वारे आपलं जीवन फुलावं आणि त्याच्या प्रेरणेने इतरांचं जीवन फुलवण्यासाठी आणि चांगलं बनवण्यासाठी आपण सदोदित कार्य करू या.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: “हे प्रभू दया कर आणि तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.”

१)    आमचे परमगुरु फ्रान्सिस आणि अखंड ख्रिस्तसभेची धुरा वाहणाऱ्या सर्वांनी ख्रिस्ताच्या शिकवणुकीचा आणि ख्रिस्ती मूल्यांच्या आधारावर ख्रिस्तसभा सदैव मजबूत ठेवण्यासाठी त्यांना कृपा आणि सदबुद्धी मिळावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

२)     रशिया आणि युक्रेन या राष्ट्रांतील युद्धाचा अंत व्हावा, तेथील सार्वजनिक जीवन पूर्ववत होऊन सुरळीत चालावे, जी लोकं बेघर झाली आहेत त्यांना योग्य अशी मदत मिळावी त्याचप्रमाणे या दोन्ही राष्ट्रांत शांती आणि सलोखा प्रस्थापित करण्यासाठी जागतिक नेत्यांनी कार्यरत राहावे म्हणून आपण प्रार्थना करू या.

३)     आपल्या धर्मग्रामात, सभोवताली आणि कुटुंबात जी लोकं आजारी आहेत, त्यांना तुझ्या दयेने आणि कृपेच्या स्पर्शाने बरेपण लाभावं आणि त्यांच्या जीवनात आनंद यावा म्हणून आपण प्रार्थना करू या.

४)     आपल्या कुटुंबातील आणि धर्मग्रामातील सर्व मृतजणांना परमेश्वराने दया दाखवावी आणि त्यांना प्रेमाचं आलिंगन देऊन स्वर्गराज्यात त्यांचा स्वीकार करावा आणि त्यांना चिरंतन शांती द्यावी, म्हणून आपण प्रार्थना करू या.

५)     आपल्या सर्व वयक्तिक गरजांसाठी थोडा वेळ शांत राहून आपण प्रार्थना करू या.

Thursday, 10 March 2022

Reflection for the Second Sunday of Lent (13/03/2022) By: Fr. Benher Patil. 



उपवास काळातील दुसरा रविवार



दिनांक:१३/०३/२०२२

पहिले वाचन: उत्पत्ती १५:५-१२, १७-१८.

दुसरे वाचन: फिलीपकरांस पत्र ३:१७-४:१.

शुभवर्तमान: लूक ९:२८-३६.



 

प्रस्तावना:

आज आपण उपवास काळातील दुसरा रविवार साजरा करीत आहोत. आजच्या उपासनेचा मुख्य विषय म्हणजे: परिवर्तन किवा रुपांतर. मनुष्य आध्यात्मिक जीवनात दुर्बळ आणि कमकुवत असतो. एक ख्रिस्ती व्यक्ती म्हणून जर आपल्याला खर आणि परिपूर्ण जीवन जगायची इच्छा असेल तर, आपण पाप, वाईट सवयी, दुर्गुण ह्याकडे पाठ फिरवणे नितांत गरजेचं आहे. आजची तिन्ही वाचने आपल्याला पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने आणि सामर्थ्याने आपल्या दैनंदिन जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी आमंत्रण देतात आणि प्रोत्साहित करतात. त्यासाठी लागणारी ईश्वरी कृपा आणि सामर्थ्य आपणास प्राप्त व्हावी म्हणून ह्या मिस्साबलीत परमेश्वर पित्याकडे याचना करूया.

 


मनन-चिंतन:

एक ग्रीक तत्वज्ञानी हेराक्लीटस म्हणतात कि, “ह्या जगात सर्व काही प्रवाही आहे, काहीही स्थिर नाही.” दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे, ह्या जगात अस्तित्वात असणारे सर्वकाही कालानुरूप बदलत असत. ह्याचंच एक साध आणि जिवंत उदाहरण म्हणजे वसंत ऋतू. वसंत ऋतूत आपल्याला संपूर्ण सृष्टीचा कायापालट झालेला आढळतो. एरवी सुकून गेलेली, निस्तेज झालेली अवघी वसुंधरा, ह्या ऋतूत हिरविगार व नानाविविध रंगाच्या फळा-फुलांनी सजलेली आणि नटलेली पाहायला मिळते. चराचरावर जादू करणारा आणि आसमंत गुंगून टाकणारा हा तिचा नविन अवतार डोळे दिपवणारा आणि मनाला प्रफुलीत व प्रसन्न करणारा नसेल तर नवलच म्हणव लागेल.

उपवासकाळ हा आपल्यासाठी एकप्रकारे आध्यात्मिक वसंत ऋतुच आहे. ह्या पवित्र काळात ख्रिस्तसभा आपणास मानवी जीवनाचा कायापालट करून अशाच प्रकारचा मन्मानाला आणि देवाला प्रसन्न करणारा वसंत ऋतू फुलविण्यासाठी आवाहान करत आहे. विशेषकरून आजची तिन्ही वाचने आपल्या विश्वासातील तीन नायक: अब्राहाम, पौल आणि अर्थातच येशूच्या अध्यात्मिक परिवर्तनाच्या अनुभवाचे वर्णन करतात. आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो कि, परमेश्वर, आपला आदिपिता अब्राम, जो एक मूर्तिपूजक होता त्याच नाव बदलून अब्राहाम, म्हणजे खऱ्याखुऱ्या देवाला मानणारा, आज्ञाधारक, अन विश्वास ठेवणारा असं करतो. तर दुसऱ्या वाचनात संत पौल असा युक्तिवाद करतात कि, जर एखाद्याला ख्रिस्ती व्हायचं असेल तर, जुने नियम, परंपरा आणि रूढी पाळायची काही आवश्यकता नाही. ते असा बोध करतात कि, आपलं दयनीय अवस्थेतील शरीर व आत्मा, खुद्द ख्रिस्त त्याच्या सामर्थ्याने रुपांतरीत करणार आहे.

आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशूच्या दैवी रूपांतराचे वर्णन आढळते. येशू ख्रिस्त फक्त एक साधासुधा मानव नव्हता तर, तो खुद्द देवाचा परमप्रिय पुत्र होता, तो मानवदेहात वस्ती करणारा खुद्द परमात्मा-परमेश्वर होता हे येशूच्या रूपांतराद्वारे सिद्ध होते. ख्रिस्ताच्या रूपांतराचा मुख्य उद्देश म्हणजे परमेश्वर पित्याशी सल्लामसलत करून, त्याची येशूच्या दु:ख, मरण आणि पुनरुत्थानासाठी असलेली तारणदायक योजना ह्याची खात्री करून घेणे हि होती. त्याचा दुसरा हेतू म्हणजे, येशूच्या निवडलेल्या शिष्यांना त्याच्या दैवी वैभवाची जाणीव करून देणे हा होता, जेणेकरून त्यांनी त्यांच्या ऐहिक महत्वाकांक्षा आणि राजकीय पराक्रमी मसिहाची स्वप्ने सोडून द्यावी आणि परीक्षेच्या आणि संकटांच्या वेळेला त्यांना बळ मिळावे. त्याचप्रमाणे येशूच परिवर्तन आपणा प्रत्येकास आपल्या वैयक्तिक जीवनाच परिवर्तन करण्यास चालना देते आणि आव्हान करते.

बाप्तिस्मा संस्काराद्वारे आपणसुद्धा देवाचे पुत्र आणि कन्या बनले आहोत. पण दुर्दैवाने त्यासाठी साजेसं असं जीवन आपण नेहमीच जगण्याचा प्रयत्न करत नाही. तर आपल्या पापी आणि भ्रष्ट जीवनाद्वारे आपण ख्रिस्ती जीवनाला काळिमा फासतो. आपल्या वाईट आचरण आणि सवयींद्वारे आपण देवाच्या प्रतिमेला म्हणजे स्वतःला कलंक लावतो. देव आपला पिता ह्याच्या आज्ञा न पाळता, त्याचे वचन न ऐकता आपण आपले परमेश्वर पित्याबरोबरचे संबंध तोडून अयोग्य जीवनाची वाट धरतो. अश्या प्रसंगी आजची वाचणे आपणास पुन्हा एकदा देवाकडे येण्यास साद घालतात.

अस म्हटलं जात कि, मानवाचं दानव होणं हे त्याच दुर्दैव आणि हार आहे. मानवाचा महा-मानव होणे हा त्याचा चमत्कार आहे आणि मानवाचं खऱ्या अर्थाने माणूस होणे हे त्याचे यश आहे. पण मी त्याच्याही पुढे जाऊन म्हणू इच्छितो कि, एका ख्रिस्ती माणसाचं ख्रिस्तासारख दैवी होणे किंवा त्याच्या वैभवात सामील होणे हा त्याचा मान आणि त्याच्या उत्पन्नकर्त्या परमेश्वराचा खरा सन्मान आहे. म्हणूनच सैतानी मोहांना, भूल-थापांना बळी न पडता, त्याउलट देवाच्या वचनावर विश्वास ठेवून आणि त्याप्रमाणे आपल्या जीवनाचं परिवर्तन करून, ते सुंदर आणि पवित्र, देवाला मान्य असं करण्यासाठी देवाची कृपा आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आपणास मिळावे म्हणून ह्या मिस्साबलीत प्रार्थना करूया.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: “हे परमेश्वरा, तुझ्या लेकरांची प्रार्थना ऐक.”

१.    आपले पोप फ्रान्सीस, महागुरू आणि चर्चच्या सर्व नेत्यांनी ख्रिस्त, आमचा उत्तम मेंढपाळ ह्याची वाणी ऐकून त्याच्या वचनाप्रमाणे चालण्यास त्याच्या कळपाला म्हणजेच ख्रिस्तसभेला प्रेमाने आणि करुणेने मार्गदर्शन करावे म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना करूया.

२.    समाजात जे वंचित, रोग, अत्याचार आणि अन्यायाने ग्रस्त आहेत, अश्या देवाच्या लोकांसाठी प्रार्थना करूया, त्यांना दयावंत आणि प्रेमळ परमेश्वराच्या उपस्थितीचा अनुभव यावा आणि सर्व अनिष्टापासून त्याचं देवाने सौरक्षण कराव म्हणून प्रार्थना करूया.

३.    जे पापी जीवन जगत आहेत, कुमार्गाला लागलेले आहेत आणि जीवनात भरकटलेले तसेच निराश आहेत, अशा सर्व व्यक्तीस देवाने संन्मार्गास लावावे, त्याचं परिवर्तन करावे, आणि त्यांना स्पर्श करून सुंदर आणि पवित्र जीवन जगण्यास सुबुद्धी द्यावी म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना करूया.

४.    आपल्या जगात जिथे युध्द, अशांती आणि अराजकता आहे तेथे परमेश्वराने शांती आणि न्याय प्रस्थापित करावा आणि सर्व राजकीय नेत्यांनी आपले स्वार्थी हेतू बाजूला सारून जगाच्या प्रगतीसाठी आणि कल्याणासाठी झटण्यास त्यांना बुद्धी आणि कृपा द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

५.    वैदकीय क्षेत्रात कार्यरत असलेले सर्व डॉक्टर्स, परिचारिका, प्यारामेडीक्स आणि संशोधक, ह्यांनि समाजातील आजारी आणि गरजू लोकांची करुणेने आणि समर्पित वृत्तीने सेवा करण्यास पवित्र आत्म्याने सक्ष्यम कराव म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना करूया.

६.    येथे हजर असलेल्या सर्वाना अध्यात्मिक जीवनात प्रगती करण्यास, देवाची खरी लेकरे बनण्यास, आणि ख्रिस्ताचे खरे अनुयायी होण्यास शक्ती आणि कृपा मिळावी म्हणून प्रार्थना करूया.

७.    थोडावेळ शांत राहून आपल्या वयक्तिक, कौटुंबिक, आणि सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.

Friday, 4 March 2022

Reflection for the First Sunday of Lent (06/03/2022) By: Br. Rockson Dinis.



उपवासकाळातील पहिला रविवार

 


दिनांक: ०६/०३/२०२२.

पहिले वाचन: अनुवाद २६:४-१०.

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र १०:८-१३.

शुभवर्तमान: लूक ४:१-१३.

 

विषय: विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल” (रोमकरांस पत्र 6:9)


 

प्रस्तावना:

आज आपण उपवास काळातील पहिला रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्याला येशूवरील विश्वासात वाढ करून आपणांस मोहांवर विजय मिळविण्यास पाचारण करीत आहे.

अनुवाद ह्या पुस्तकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात परमेश्वराने इस्रायली लोकांची आरोळी ऐकून त्यांना मिसऱ्यांच्या छळातून मुक्त करून दुधा-मधाचे पाट ज्या देशात वाहतात त्या देशांत सुखरूप आणिले असे ऐकतो. दुसऱ्या वाचनात संत पौल ‘जो अंत:करणात येशूवर विश्वास ठेवतो व तोच विश्वास त्याच्या मुखाने कबूल करतो त्याचे तारण होईल’ असे सांगत आहे. तर लूकलिखित शुभवर्तमानात अरण्यात सैतानाने घेतलेली येशूची परीक्षा व येशूने मोहांवर मिळविलेला विजय ह्याविषयी ऐकावयास मिळते.

येशूवर विश्वास ठेवणारा कधीही जीवनात नाराज होणार नाही. येशूमोहावर विजय मिळवल्यामुळे तो आपल्याला एक आदर्श बनला आहे. म्हणून त्याच्यावर असलेला आपला विश्वास अधिकाधिक दृढ व्हावा व दैनंदिन जीवनात जे मोह आपल्याला परमेश्वरापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतात त्या मोहांवर मात करण्यासाठी ह्या मिस्साबलीत विशेष प्रार्थना करूया.

 


मनन चिंतन:

ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधु आणि भगिनींनो आज संपूर्ण ख्रिस्त सभा प्रायश्चित काळातील पहिला रविवार साजरा करीत आहे. व आजची उपासना, आपल्याला विश्वास वाढविण्यासाठी आमंत्रण करीत आहे. कारण पवित्र शास्त्र म्हणते, “प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या लोकाची कधीच फजिती होणार नाही.” आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो, की इस्रायल लोकांना मिसर देशामध्ये निर्दयपणे वागविले, परंतु इस्राएल लोकांनी विश्वास ठेवून आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याचा धावा केला, तेव्हा इस्राएल लोकांची आरोळी देवानी ऐकली, व त्यांना मिसर देशातून बाहेर आणले. दुसऱ्या वाचनात आपल्याला, विश्वास ठेवणे म्हणजे काय, ह्या विषयी शिकवण देते. ख्रिस्त हा आपला प्रभू आहे. व त्याचा स्वीकार करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. कारण फक्त ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे आपले तारण होईल. आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकतो की, प्रभू येशू ख्रिस्त पूर्णपणे पवित्र आत्म्याच्या नियंत्रणाखाली होता.” म्हणून तो प्रत्येक परिस्थितीला व परीक्षेला तोंड देऊ शकला. त्यांने मोहावरती विजय मिळविला.

“जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्यांना प्रभुने देवू केलेला जीवनाचा मुकुट परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल.” (याकोबाचे पत्र १:१२) या जगात प्रत्येक मनुष्य मोहाचा सामना करतो. तसेच देवाच्या पुत्रालाही मोहाचा सामना करावा लागला. पवित्र शास्त्रामध्ये आपण वाचतो की, पवित्र आत्म्याने प्रभु येशूला सार्वजनिक जीवन सुरू करण्यापूर्वी वाळवंटात नेले. तेथे प्रभु येशूने अनेक प्रकारच्या मोहांवर मात केली. मोह ही अशी परिस्थिती आहे जेथे मनुष्य दोन विरुद्ध दिशेने दोन शक्तींमध्ये ओढला जातो, एक चांगली आणि दुसरी वाईट. अशा परीस्थीतीमध्ये, प्रत्येक मानवाने परीक्षेच्या वेळी देवाच्या बाजूने उभे राहण्याचे स्वतंत्रपणे ठरवावे अशी देवाची इच्छा आहे. परंतु जुन्या करारात आपण ऐकतो कि, अनेक वेळा इस्राएल लोक देवाच्या बाजूने उभे राहण्यास व अचूक असा निर्णय घेण्यात अयशस्वी ठरले व ते मोहास बळी पडले.

जुन्या करारात आपण वाचतो कि, जरी इस्राएल लोक हे मोहात पडले तरी सुद्धा परमेश्वराने त्यांच्यावर प्रीती केली. त्याने संदेष्टे पाठविले जेणेकरून मनुष्य देवाकडे आकर्षिला जावा. असे असूनही मनुष्याने देवाविरुद्ध जाण्याचे निवडले. सरते शेवटी देवाने आपला सर्वात प्रिय एकुलता एक पुत्र या जगात पाठवला. तो मोह आणि परीक्षांचा काळ संपवण्यासाठी नाही तर मोहाला कसे सामोरे जावे व परीक्षेच्या वेळी देवाच्या बाजूने कसे उभे राहावे हे शिकवण्यासाठी देवाने आपल्या पुत्राला पाठविले.

बायबलमध्ये प्रामुख्याने दोन प्रकारची माणसे आपल्याला आढळतात. एक अशा प्रकारची जी, जीवनातील मोहांवर मात करतात आणि दुसरी जी मोहांना बळी पडतात. अब्राहामाला विश्वासाचा पिता असे म्हटले जाते. कारण, त्याने आपला मुलगा इसहाक अर्पण करण्याच्या आज्ञेचे पालन केले. तसेच दुसरे म्हणजे, दावीद राजा हा शारीरिक वासनांच्या मोहात पडल्याचे वर्णन करते. नवीन करारात, जुडास इस्करिओतबद्दल लिहिले आहे, ज्याने तीस चांदीच्या नाण्यांच्या मोहात पडून प्रभु येशूचा विश्वासघात केला. पवित्र शास्त्रात आणि चर्चच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत, जेथे मानव हा मोहांना सामोरे न जाता तो बळी पडलेला आहे.

प्रभु येशूने अनेक प्रकारच्या मोहांवर मात केली, जे काही आदाम, करू शकला नाही. ते प्रभु येशूने, केले. दगडाचे भाकरीमध्ये रूपांतर करण्यास आणि, ते खाण्यास त्याने नकार दिला. अशा प्रकारे आदामाकडून हरवलेले एदेन बाग आपल्याला परत मिळवून दिली. तसेच देवाला इस्रायलद्वारे संपूर्ण जगाला वाचवायचे होते, परंतु ते वारंवार मोहात पडून राहिले, म्हणून इस्रायल लोक देवाची योजना पूर्ण करण्यास योग्य राहिले नाहीत. परंतु प्रभू येशूने वाळवंटातील परीक्षांवर मात करून पित्याने त्याच्यावर सोपवलेले कार्य पूर्ण केले. ही शक्ती प्रभु येशूला त्याच्या चाळीस दिवस आणि रात्रीच्या प्रार्थनेच्या परिणामी प्राप्त झाली. अशी परिस्थिती, प्रत्येक माणसाच्या श्रद्धेची परीक्षा घेत असते व अशा अनुभवातूनच माणूस परिपक्व होतो. या अनुभवात व परिस्थीतीत असताना आपल्याला अनेक प्रकारचे दुःख सहन करावे लागते, कारण तेथे आपली विश्वासाची परीक्षा होत असते. जशी सोन्याची परीक्षा आगीत जळून होत असते, तशाच प्रकारे आपल्या विश्वासाची परीक्षा होत असते. म्हणून प्रभू येशूच्या वाळवंटातील अनुभवातून जाण्यासाठी, आपन नेहमी तयार असलो पाहिजे. कारण आपल्याला शाश्वत जीवन मिळविण्यासाठी अडचणी आणि मोहांवर नेहमी मात करावी लागेल.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: “हे प्रभो, मोहांवर मात करण्यास आम्हाला सहाय्य कर.”

१.    आपले परमगुरु, महागुरू, धर्मगुरू व व्रतस्थ ह्यांना ख्रिस्ताशी व ख्रिस्तसभेशी विश्वासू राहण्याचा जो वारसाहक्क प्राप्त झाला आहे, तो त्यांनी इतरांसमोर त्यांच्या जीवनाद्वारे आदर्श म्हणून ठेवावा ह्यासाठी आपण प्रार्थना करूया.

२.    ‘पाहणे म्हणजे विश्वास ठेवणे’, ह्या आजच्या नवीन पिढीच्या धारणेमुळे अनेक लोकांचा देवावरील व येशूवरील विश्वास लयास जात आहे, अशांना नव्याने प्रभूने त्यांच्या सानिध्यात आणून त्यांचा विश्वास बळकट करावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

३.    ‘देव आपल्यापासून नव्हे, तर आपण देवापासून दूर जात असतो’. ह्याची जाणीव आंम्हा प्रत्येकाला व्हावी व ह्या प्रायश्चित काळात आम्ही सर्वांनी देवाच्या अधिकाधिक जवळ येण्याचा प्रयत्न करावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

४.    आपल्या समाजातील, धर्मग्रामातील जे लोक व्यसनाधीन झाले आहेत, त्या सर्व लोकांना प्रभूच्या आशेचा किरण दिसावा व देवाने सोपवलेली त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी त्यांनी व्यवस्थितपणे पार पाडावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

५.    आपल्या धर्मग्रामातील ज्या व्यक्ती आजारी, निराशा आणि बऱ्याच व्याधींनी पिडलेल्या आहेत ह्या सर्वांनी हताश किंवा हतबल न होता दैवीदयेवर विसंबून प्रभूच्या सानिध्यात रहावे व त्यांचे जीवन प्रभूप्रेमाने प्रफुल्लीत व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

६.    ‘पापांस बळी पडणे म्हणजे देवापासून विभक्त होणे’, म्हणून आपल्या मोहांवर विजय मिळवता यावा ह्यासाठी प्रभू येशूचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण ‘प्रार्थना’ व ‘बायबल वाचन’ ह्यामध्ये सातत्य राखावे म्हणून प्रार्थना करूया.

७.    थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.