Friday, 16 August 2024

 Reflection for the 20th Sunday in Ordinary Time (18/08/2024) By Br. Rackson Dinis

सामान्य काळातील विसावा रविवार

दिनांक : १८/०८/२०२४

पहिले वाचन – नितीसुत्रे ९:१-६

दुसरे वाचन – इफिसकरांस पत्र ५:१५-२०

शुभवर्तमान – योहान ६:५१-५८




प्रस्तावना

    ख्रिस्ता ठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भंगिनीनो आजची उपासना आपल्याला “दैवी ज्ञानाविषयी” सांगत आहे. जीवनामध्ये जसा आपण पैशाचा, मोत्याचा,व शुद्ध सोन्याचा शोध घेतो तसाच शोध आपण ज्ञानाचा घेतला पाहिजे. कारण ज्ञान हे पैशाहून, मोत्याहून आणि शुद्ध सोन्याहून अधिक मौल्यवान आहे. परमेश्वराने पृथ्वीचा पाया हा ज्ञानाने घातला आहे. त्याने बुद्धीने आकाश निर्माण केले, आणि त्याचा ज्ञानबलाने जलाशय बाहेर आणले आहे, कारण परमेश्वर ज्ञान आहे. म्हणून आजच्या पहिल्या वाचनात परमेश्वर म्हणतो “अहो भोंळ्यानो, तुमचे भोळेपण कोठवर आवडणार. जो कोणी भोळा आहे तो देवाकडे वळो व देवाच्या शब्दापासुन ज्ञान प्राप्त करून घेवो. कारण भोळ्याचे भलतीकडे वळणे त्याच्या नाशास कारण होईल. म्हणून प्रभू म्हणतो, माझ्या मुला, आपला कान देवाच्या ज्ञानाच्या वचनाकडे लाव. कारण, जेव्हा तू चालशील तेव्हा ज्ञान तुला मार्ग दाखवील, तू निजशील तेव्हा तुझे ज्ञान रक्षण करील, आणि जेव्हा तू जागा होशील, तेव्हा ज्ञान तुझ्याशी बोलेल, कारण ज्ञानाने दिलेली आज्ञा ही आपल्या जीवनासाठी दिवा, आणि पावूलाकरिता प्रकाश आहे. आणि जो कोणी देवाचे वचन पाळतो, म्हणजेच देवाचे ज्ञान ऐकतो, आणि त्या प्रमाणे वागतो, त्याला दीर्घ आयुष्य, वयोवृद्धी व कल्याण प्राप्त होइल. जो कोणी ज्ञानास धरून राहतोत्याचे जीवन हे एका वृक्ष रोपासारखे आहे. जीवनात चालत असताना त्याच्या पायास कधी ठोकर लागणार नाही, व तो सुरक्षित राहील, जो कोणी हे ज्ञान राखून ठेवतो, तो धन्य होय.

मनन चिंतन

आजचे पहिले वाचन “दैवी ज्ञान” घेण्यासाठी आमंत्रित करीत आहे. “ये माझी भाकर खा, आणि मी मिसळलेला द्राक्षरस पी” हे आमंत्रण म्हणजे, ज्ञान आणि समजूतपणा यात सहभागी होण्याचे आवाहन आहे.

तर आजचे शुभवर्तमानसुद्धा पहिल्या वाचनाप्रमाणे संदेश देत आहे. प्रभू म्हणतो, मी तुम्हाला खचित सांगतो, तुम्ही मनुष्याचा पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुम्हामध्ये जीवन नाही. याचा अर्थ म्हणजेच देवाचे वचन हे देवाचे ज्ञान आहे. जर का ह्या वचनाला किंवा प्रभूच्या शब्दाला आपल्या जीवनात प्रवेश दिला नाही तर आपल्यामध्ये जीवन नाही.

बायबलमध्ये अनेक अशा ज्ञानवत लोकाचा उलेल्ख केला गेला आहे ज्यांनी ज्ञानाचे आमंत्रण स्वीकारले किंवा नाकारले.

शलमोन राजा हा सर्वात प्रसिद्ध राजा होता, त्याने जीवनात शहाणपणाचा शोध घेतला. जेव्हा देवाने शलमोनाला स्वप्नात दर्शन दिले आणि त्याला जे काही हवे आहे ते देण्यास राजी झाला, तेव्हा शलमोनाने देवाच्या लोकांवर शासन करण्यासाठी बुद्धी मागितली (1 राजे 3:5-12). शलमोनच्या विनंतीवर देव खूश झाला आणि त्याने त्याला संपत्ती आणि सन्मानासह अतुलनीय बुद्धी दिली. शलमोनाची बुद्धी केवळ त्याच्यासाठीच नव्हे तर संपूर्ण इस्राएल राष्ट्रासाठी एक आशीर्वाद होता. तथापि, शलमोनाची नंतरची वर्षे बुद्धीपासून दूर जाण्याचे धोके दाखवतात. म्हणूनच शहाणपण ही एक-वेळची देणगी नाही परंतु आपण आयुष्यभर त्याचा शोध करणे व आपल्या जीवनात त्याचा वापर करणे आवश्यक आहे.

अनेकदा येशू लोकांना दाखल्यांचे उदाहरण देत असे  व म्हणत, ज्याला कान आहेत तो ऐको. तसेच आपण नितीसुत्राच्या पुस्तकातसुद्धा वाचतो, प्रभू म्हणतो माझ्या मुला, तू माझ्या वाणीने ज्ञान जपुन ठेव, माझ्या सुज्ञतेच्या बोधाकडे कान दे. असाच एक  दृष्टान्त शहाणा आणि मूर्ख बांधकाम करणाऱ्यांच्या बोधकथेत (मत्तय ७:२४-२७), सांगितला गेला आहे. अशाच एका ज्ञानी माणसानी आपले घर खडकावर बांधले. आयुष्याची वादळं आली तेव्हासुद्धा हे घर खंबीरपणे उभे राहिले. ही बोधकथा नीतिसूत्रे अध्याय ९:१ ऐकायला मिळते, ती म्हणजे, ज्ञानाने आपले घर भक्कम पायावर बांधिले आहे, त्याने आपले सात खांब तयार केले आहेत.

दुसरीकडे, आपल्याला पाहायला मिळते की, जे लोक त्याच्या शिकवणी ऐकतात पण ते लागू करत नाहीत, ते त्या मूर्ख माणसासारखे आहेत, ज्याने आपले घर वाळूवर बांधले. मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला,व त्या घरास लागला, तेव्हा ते घर पडले, अगदी कोसळून पडले. हे ज्ञानाचे  आमंत्रण नाकारणारे आणि मूर्खपणाचा मार्ग निवडण्याचे परिणाम स्पष्ट करते.

म्हणून आजच्या ह्या मिस्साबलिदानात भाग घेत असताना, आपण परमेश्वराकडे, दैवी ज्ञान प्राप्त करण्यासाठी व आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा वापर करण्यासाठी आशीर्वाद मागुया.

विश्वासू लोकांची प्रार्थना

आपला प्रतिसाद :-  हे प्रेमळ परमेश्वरा, आमची प्रार्थना एकून घे.

१) आमचे पोप महाशय, सर्व बिशप, धर्मगुरू, धर्म-बंधू-भगिनी यांनी त्यांच्या आचार-विचारातून लोकांसमोर चांगला आदर्श ठेवावा तसेच त्यांच्या सुवार्ताकार्यात प्रभूचा वरदस्त त्यांना सतत लाभावा व त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या ख्रिस्ती धर्माची प्रगती होत राहावी म्हणून आपण प्रभू कडे प्रार्थना करुया.

२) आजच्या उपासनेमध्ये सहभागी झालेल्या सर्व भाविकांनी त्यांची अंतकरणे उघडवून येशू स्वःता जीवनाची भाकर आहे, यावर खऱ्या श्रद्धेने व विश्वासाने येशूच्या शरीराचे व रक्ताचे सेवन करावे व त्याच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून आपण प्रार्थना करूया.

३) आपल्या देशातील राज्यकर्त्ये व विविध अधिकारी ह्यांनी देशाच्या व लोकांच्या प्रगतीसाठी योग्य ते श्रम करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

४) ज्या कुटुंबामध्ये विविध कारणांमुळे जी भांडणे व वाद चालू आहेत, अशा सर्व कुटुंबात शांती व प्रेम नांदावे व परमेश्वराचा आशीर्वाद राहावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

५) आता आपण आपल्या सामाजिक, कौटुंबिक व वैयक्तिक हेतुसाठी प्रार्थना करूया.







Friday, 9 August 2024

 Reflection for the 19th Sunday in Ordinary Time (11/08/2024) By Fr. Rakesh Ghavtya


सामान्य काळातील एकोणिसावा रविवार

दिनांक : ११/०८/२०२४

पहिले वाचन - १ राजे १९:४-८

दुसरे वाचन – इफिसकरांस पत्र ४:३०- ५:२

शुभवर्तमान – योहान ६:४१-५१


प्रस्तावना

आज ख्रिस्तसभा सामान्य काळातील एकोणिसावा रविवार साजरा करत आहे. तसेच आज ख्रिस्तसभा असिसीकर संत क्लेरचा सण साजरा करते. आजची उपासना आपल्याला प्रभू येशू हा जीवन देणारा व सार्वकालिक जीवनाचा मार्ग दाखवणारा असल्यामुळे त्याच्यावरील आपल्या विश्वास व श्रद्धा दृढ करण्यास पाचारण करते.

आजचे पहिले वाचन राजे या पहिल्या पुस्तकातून आपल्याला हाच बोध देते की परमेश्वर एलिया संदेष्ट्याला भाकर व पाणी उपलब्ध करून त्याला जीवन देतो व होरेब या आपल्या डोंगरावर पोहोचण्यास शक्ती देतो.

दुसऱ्या वाचनात संत पौल इफिसिकारास लिहिलेल्या पत्रात म्हणतात की, प्रभूयेशुने आम्हावर प्रीती केली. त्याने स्वतःला आपल्याकरिता अर्पण व यज्ञ म्हणून दिले त्यामुळे आपण सर्वांनी त्याच्या प्रीतीने चालावे.

        तसेच आजच्या शुभवर्तमनात प्रभूयेशू आपल्या वचनांद्वारे स्वतःला प्रकट करतो व त्याची ओळख करून देतो. येशूच्या सर्व वचनांतून आपल्याला त्याच्या दैवीपणाची व अधिकाराची शिकवण मिळते. प्रभू येशू हाच स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे. हे आम्ही सतत विश्वासाने मानूया व याच प्रभू येशूचे प्रत्येक मिसबलिदानात भाकरीच्या रूपाने सेवन करताना भक्तिभावाने आपली अंतकरणे तयार करूया व याच प्रभू येशूला म्हणूया. 

“मम अंतरी तूच वसावे

प्रभु श्वास तुझा मज दयावे

ओठी शब्द तुजेची असावे

माझे जीवन प्रभू फुल व्हावे

मम तरी तूच वसावे”

मनन चिंतन

साक्ष

बारा वर्षा अगोदर जेव्हा मी रोम या शहरामध्ये माझा उपासनेच्या (Liturgy) विषयावर अभ्यास करत होतो, तेव्हा घडलेली एक सत्य घटना तुम्हाला सांगू इच्छितो व या घटनेद्वारे माझ्या जीवनाच्या प्रवासात घडलेली व अनुभवलेली खरी साक्ष देतो.

सुट्टीचे दिवस होते व त्या दिवसात मी पादुआ या ठिकाणी एका धर्मग्रामात मदत करण्यासाठी गेलो होतो. एके दिवशी अचानक मला एका व्यक्तीचा फोन आला व फोनवरील व्यक्ती रडून असे म्हणत होती की, फादर माझी आजारी आई दवाखान्यात शेवटची घटका मोजत आहे, ती काहीच बोलत नाही, ती हळूहळू डोळे मिटत आहे, कृपया तुम्ही लवकरात लवकर बाजूच्या दवाखान्यात या आणि माझ्या आईसाठी प्रार्थना करा. तिचे हे शब्द ऐकून लगेच मी मागचा-पुढचा विचार न करता दवाखान्यात धाव घेतली. दवाखान्यात पोहोचल्यावर मी त्या आजारी बाईजवळ गेलो, तेव्हा ती शेवटचा श्वास घेत होती. तिची सर्व घरची मंडळी तिच्या आजूबाजूला जमा झालेली होती. जशी मी प्रार्थना सुरू केली तेव्हा माझ्या निदर्शनास आले की, ही आजारी बाई माझ्याकडे बघण्याचा प्रयत्न करत होती, तिचे डोळे जड झालेले व तिच्या मुखातून तिला स्पष्टपणे बोलता येत नव्हते. तेव्हा मी तिला विचारले बाई तुला काय पाहिजे? तुला काय हवं आहे? तेव्हा ती म्हणाली मला ख्रिस्त हवा आहे. मला ख्रिस्ताला सेवन करायचे आहे. हे ऐकताच माझ्याजवळ असलेले खिस्तशरीर मी तिला देण्यास जवळ गेलो. परंतु तिची बिकट अवस्था पाहून तिला फक्त ख्रिस्त शरीराचा छोटासा अंक्ष पाण्याद्वारे देऊ शकलो. जसे तिने ख्रिस्तशरीर सेवन केले इतक्यात तिच्या चेहऱ्यावर तेज पसरले. थोड्यावेळाने तिने डोळे उघडले व ती बोलू लागली. मग तिने खाटेवर बसून म्हटले, “माझ्या ख्रिस्ताने मला बरे केले. ख्रिस्ताचे नाव धन्य असो. मला माझ्या ख्रिस्ताने नवजीवन दिले. मला आरोग्याचे दान दिले. मी ख्रिस्ताचे आभार मानते.”

हे दृश्य पाहून आम्ही सर्वजण आश्चर्यचकित झालो, कारण हा आमच्या डोळ्यासमोर घडलेला चमत्कार होता. त्या क्षणी खरोखर आम्हाला वाटलं की, प्रभुने तिला तिच्या विश्वासाने बरे केले. तिला नवजीवन बहाल केले. प्रभूचा गौरव असो, प्रभुची स्तुती असो.

ही साक्ष सांगण्याचा व तुमच्या समोर देण्याचा माझा हेतू  हाच आहे की, ख्रिस्त खरोखर भाकरीच्या रुपात उपस्थित असतो. जो विश्वासाने ख्रिस्तशरीर सेवन करतो, त्याला प्रभू येशू स्पर्श करून आरोग्याचे दान देतो. कारण प्रत्येक पवित्र भाकरीत ख्रिस्त हजर असतो. म्हणून आपण विश्वासाने हे मानायला हवे की, ख्रिस्त हा जीवन देण्यास व सर्वकालिक जीवनाचा मार्ग दाखवण्यास आला आहे. त्यामुळे या ख्रिस्ताची आपण जवळून ओळख करणे गरजेचे आहे. त्याचा अनुभव घेणे अगत्याचे आहे.

आजच्या शुभवर्तमानावर आपण नजर टाकली तर आपल्याला असे दिसून येईल की, प्रभूयेशुने स्वतः विषयीची ओळख करून देताना तीन पवित्र वचनांद्वारे स्वतःला प्रकट केले.

(१) मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे.

(२)  मीच जीवनाची भाकर आहे.

(३)  स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. 

यावरून आपल्याला कळून येईल की, प्रभूयेशुला स्वतःविषयी पुरेपूर ओळख होती व ते स्पष्ट करताना प्रभू मधील दैवीपणाची व अधिकाराची आपल्याला जाणीव होते. प्रभू येशू हा जिवंत देवाचा पुत्र आहे व त्याला या भूतलावर सर्वांना जीवन देण्यासाठी, सर्वांचे तारण करण्यासाठी व सर्वांना सार्वकालीक जीवनाकडे नेण्यासाठी पित्याने पाठवले. म्हणूनच योहानलिखित अध्याय ३: १६-१७ मध्ये आपण ऐकतो, “देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सर्वकालिक जीवन प्राप्त व्हावे व जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले.”

आज खरी गरज आहे ती आपल्या प्रभूवरील विश्वास अढळ करण्याची, कारण आपल्याला जे वरदान हव आहे ते देणारा एक मात्र प्रभू येशू आहे. या संदर्भात खुद्द प्रभुने म्हटले आहे, “जो विश्वास ठेवतो त्याला सर्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे.” (योहान ६: ४७)

जे काही प्रभूयेशुने मानव जातीच्या कल्याणासाठी केले त्यामध्ये त्याने स्वर्गीय पित्याला श्रेय दिले. म्हणूनच प्रभूयेशूने म्हटले आहे, “मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठविले त्याचे इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे.” (योहान ६: ३८). प्रभूयेशुने आम्हाला त्याचा देह दिला की त्याच्या बलिदानाने आम्हा प्रत्येकाचे तारण व्हावे. खुद्द प्रभू आमच्यासाठी जिवंत भाकर झाला. प्रत्येक मिस्साबलीदानात प्रभू येशू, भाकरीचे रूपांतर त्याच्या पवित्र शरीरात व द्राक्षरसाचे रूपांतर त्याच्या पवित्र रक्तात करतो. हाच सर्वात मोठा चमत्कार घडवून, आमच्यासाठी स्वतःचे समर्पण करतो. आजही ख्रिस्ताची वाणी हरएक मिस्साबलिदानात आपण ऐकू शकतो.

घ्या नी खा देह माझा

छिन्नविछीन्न तुमच्यासाठी,

घ्या नि प्या रक्त माझे

घळघळ वाहे तुमच्यासाठी.

जर येशू आम्हासाठी एवढा मोठा त्याग करतो तर आम्हीही त्याच्यासाठी थोडा तरी त्याग करायला हवा. येशूची आपल्याकडून काहीच अपेक्षा नाही, तसेच त्याला कुठलाही मोबदला नको आहे पण आम्ही आपल्या परीने आपल्या ख्रिस्ती विश्वासात व श्रद्धेत वाढायला हवे. आजच्या उपासनेत भाग घेत असताना, आपण प्रभू येशूच्या दुःख, मरण व पुनरुस्थानाच्या रहस्यात सहभागी होऊन याच प्रभू येशूची ओळख जवळून करूया.

विश्वासू लोकांची प्रार्थना

धर्मगुरू: बंधू-भगिनींनो आपण प्रभू येशू ख्रिस्त हा स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे, हे सत्य मानून घेऊन त्याची ओळख करून घेऊया. कारण त्याच्या सेवनाने आपल्या सर्वकालिक जीवन लाभते. म्हणून स्वर्गीय पित्याकडे प्रभूयेशूच्याद्वारे आपल्या सर्व विनंत्या व गरजा विश्वासाने व श्रद्धेने ठेवूया.

आपला प्रतिसाद :- स्वर्गीय प्रभू, आमची प्रार्थना ऐक.

१) हे स्वर्गीय पित्या आमचे पोप महाशय फ्रान्सिस, कार्डिनल्स, बिशप, धर्मगुरू, सिस्टर, ब्रदर्स विश्वासू भावी यांना तुझ्या कृपाछायेखाली ठेव, त्यांना तुझ्या सेवेत अनेक आशीर्वादांचा अनुभव यावा व प्रत्येक घडामोडी तुझ्या उपस्थितीची त्यांना जाणीव व्हावी. म्हणून तुझ्याकडे प्रार्थना करतो.

२) हे दयाळू पित्या, आम्ही आमच्या सर्व सामाजिक व राजकीय पुढाऱ्यासाठी विशेष प्रार्थना करतो की, तू त्यांना समाजकार्य करताना तुझी प्रेरणा दे, म्हणजे ते लोकांच्या हितासाठी झटून माणुसकीचा आदर्श इतरांसमोर ठेवावेत. म्हणून तुझ्याकडे प्रार्थना करतो.

३) हे प्रेमळ पित्या तुझी नजर सर्व आजारी, वृद्ध, निराधार, दुबळे गरीब यांच्यावर असू दे की जेणेकरून या सर्वांना चांगले आरोग्य लाभावे, आसरा मिळावा व त्यांच्या गरजांमध्ये अनेकजण धावून यावेत. म्हणून प्रार्थना करूया.

४) ह्या पवित्र मिसाबलिदानामध्ये उपस्थित असलेल्या आम्हा सर्वांवर देवाचे आशीर्वाद यावेत व आम्ही सर्वांनी ख्रिस्ताला भाकरीच्या रूपाने सेवन करताना, भक्तिभावाने आमच्या अंतकरणाची तयारी करावी. म्हणून प्रार्थना करूया.

धर्मगुरू:  हे सर्व शक्तिमान पित्या, तुझी महिमा गौरव व स्तुती असो, कारण तू आमची प्रत्येक गरज पूर्ण करतोस व आम्हाला तुझ्या प्रेमाचा अनुभव देतोस. आज आम्ही सादर केलेल्या सर्व गरजा व विनंत्या तुझ्या चरणाजवळ श्रद्धापूर्वक अंतकरणाने ठेवले आहेत. त्यांचा स्वीकार कर व तुझ्या दयेने त्या पूर्ण कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन



Friday, 2 August 2024

Reflection for the 18th SUNDAY IN ORDINARY TIME (04/08/2024) By 

Fr. Benjamin Alphonso

सामान्य काळातील अठरावा रविवार

दिनांक – ०४-०८-२०२४

पहिले वाचन: निर्गम १६:२-४, १२-१५

दुसरे वाचन: इफिसकरांस ४: १७, २०-२४

योहान ६: २४-३५


प्रस्तावना

ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधू भांगिनिनो, आज आपण सामान्य काळातील अठरावा रविवार साजरा करीत आहोत. तसेच आज पवित्र देऊळमाता संत जॉन मेरी वियानीचा सण, (जे सर्व धर्मगुरूचे आश्रयदाता आहेत) त्याचा सण साजरा करीत आहेत. आजची उपासना आपणास येशू जीवनाची भाकर आहे ह्यावर विश्वास ठेवून आपली आध्यात्मिक तहान व भूक भागविण्यासाठी आमंत्रित करत आहे.ना आपणास येशू जीवनाची भाकर आहे. आजचे पहिले वाचन निर्गम या पुस्तकातून घेतलेले आहे पिता परमेश्वर इस्त्रायल लोकांची फारोच्या गुलामगिरीतून सुटका करतो. परंतु हीच देवाने निवडलेली प्रजा परमेश्वराने केलेल्या सर्व उपकाराची आठवण न ठेवता देवाविरुद्ध तक्रार करतात. इफिसिकरास पत्र ह्या दुसऱ्या वाचनात संत पौल येशूच्या शिकवणी प्रमाणे चालावे म्हणून सांगत आहे. योहानलिखित शुभवर्तमान आपणास सांगते की, येशू ख्रिस्त जीवनाची भाकर आहे आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सर्वकालिक जीवन प्राप्त होते. आजच्या या पवित्र मिस्साबलिदानात आपण सर्वांसाठी प्रार्थना करूया की, प्रभूयेशू हीच खरी जीवनाची भाकर आहे. यावर आपला विश्वास (दृढ) मजबूत व्हावा. तसेच आज विशेष करून जगातील सर्व धर्मगुरूंसाठी प्रार्थना करूया.

मनन चिंतन

काही वर्षांपूर्वीची, आपल्या देशात घडलेली सत्य घटना ज्यावेळी म्हणजे 1971 साली जेव्हा आदरणीय इंदिरा गांधी जेव्हा आपल्या भारत देशाच्या पंतप्रधान होत्या. सन्माननीय इंदिरा गांधी यांना मदर तेरेजाच कार्य आवडायचं म्हणून एकदा त्या कलकत्त्याला गेल्या होत्या. तेव्हा त्यांनी अचानक मदर तेरेजा यांच्या आश्रमाला भेट दिली. मदर तेरेजांना याविषयी कल्पना नव्हती. म्हणून त्या आपल्या कामात मग्न होत्या इंदिरा गांधी जेव्हा मदरच्या आश्रम मध्ये पोहोचल्या, तेव्हा मदर तेरेजा कुष्ठरोग्यांच्या घायांची मलमपट्टी करत होत्या व सर्वत्र वाईट दुर्गंधी पसरलेली होती. त्या दुर्गंधीमुळे तेथे थांबणे कठीण होते. परंतु इंदिरा गांधी त्या ठिकाणी थांबल्या. जेव्हा मदर तेरेजाच काम संपले तेव्हा इंदिरा गांधी मदर तेरेजांना भेटल्या. तेव्हा इंदिरा गांधी यांनी मदर तेरेसा यांना प्रश्न विचारला की, हे सर्व कार्य करण्यासाठी तुम्हाला शक्ती कुठून मिळते? तेव्हा मदर तेरेजा म्हणाल्या, ही शक्ती मला भाकरीतून मिळते. तेव्हा इंदिरा गांधी यांनी सांगितले मला ती कोणती भाकर आहे ती सांगा म्हणजे मी पाहिजे तर परदेशातून ती भाकर बनवण्यासाठी गहू आणीन म्हणजे मलाही तुमच्यासारखे कार्य करण्यास शक्ती मिळेल. तेव्हा मदर तेरेजा म्हणाल्या की ती भाकर साधी नाही, तर आमच्या प्रभू येशूचे शरीर आहे.

मानवी जीवनात शारीरिक गरजे व्यतिरिक्त, आध्यात्मिक गरजा पूर्ण करण्याची फार गरज आहे. शारीरिक गरजांच्या उपभोगनासाठी सर्वकाही आपल्याकडे आहे. पैशांच्या बळावर आपण सर्व काही साध्य करू शकतो. परंतु आध्यात्मिक गरजांच्या पूर्ततेसाठी आपल्याला पैशाची आवश्यकता नाही. बाजारात आपल्याला प्रेम, शांती, क्षमा व आशा मिळत नाही. या गोष्टी फक्त परमेश्वराच्या सानिध्यात राहूनच मिळू शकतात. आध्यात्मिक गरजांच्या पूर्ततेसाठी भाविक वेगवेगळ्या धार्मिक स्थळांना भेट देत असतात. बहुतेक वेळा आपण आध्यात्मिक गरजाऐवजी शारीरिक गरजाकडे लक्ष केंद्रित करत असतो. शारीरिक गरजांच्या आधारावर सर्व काही साध्य होते असा आपला समज असतो. आपण कधी कधी शारीरिक गरजांनी एवढे भारावून जातो की परमेश्वराची आठवण आपल्याला येत नाही. आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो की, प्रभू परमेश्वर पिता इस्त्रायलयलजा शारीरिक पण आध्यात्मिक गरजा  लोकांची फारोच्या गुलामगिरीतून सुटका करतो. परंतु इस्त्रायल प्रजा देवाने केलेला सर्वकाराची आठवण न करता देवा विरुद्ध तक्रार करतात. तरीही कृपाळू दयाळू देव त्यांना स्वर्गातून मान्ना देतो. त्यांची भूक आणि तहान भागवतो योहानलिखित शुभवर्तमानात आपण ऐकतो की, यहुदी लोक आपली शारीरिक भूक व तहान भागविण्यासाठी येशूच्या मागे येतात. येशू त्यांना सांगतो की, स्वर्गीय मान्ना मोशेने नव्हे तर माझ्या स्वर्गीय पित्याने दिला होता. हा स्वर्गीय मान्ना साधारण नसून, तो मीच आहे. येशू त्यांना समजावून सांगतो की, मीच जीवनाची भाकर आहे आणि जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो, त्याला सर्वकालिक जीवन प्राप्त होते. येशू म्हणतो मी मार्ग सत्य आणि जीवन आहे. (योहान १४:६) रोज पवित्र मिस्साबलिदानाच्या वेळेला भाकरीच्या रूपाने येशू आपल्यासमोर येत असतो.ह्यावर आपण पूर्णपणे विश्वास ठेवतो का? आपण पूर्ण मनाने व तनाने आणि पवित्र मिसबलिदानात सहभाग घेतो का? पवित्र मिस्साबलीदानात सहभाग घेणे, प्रायश्चित संस्कार घेणे, गरजू व्यक्तींना मदत करणे इत्यादी अध्यात्मिक गरजा आहेत ह्या आध्यात्मिक गरजा पूर्ण केल्या तर खरोखर देवाचे दर्शन आपल्याला होऊ शकते.

आज पवित्र देऊळ माता सर्व धर्मगुरूंचा आश्रयदाता संत जॉन मारी वीयाणी याचा सण साजरा करत आहे. त्याचा जन्म ६ मे ेयायश्चित, ातनां१७८६ साली फ्रान्स देशाच्या दारदिली येथे एका देवभिरु चांगल्या कुटुंबात झाला. धर्मगुरूचे शिक्षण घेत असताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. परंतु त्यांनी विश्वास आणि चिकाटी सोडली नाही. ते उत्तम धर्मगुरू झाले. तसेच फ्रान्सतील आर्क या ठिकाणी लोकांची सेवा केली. ते प्रार्थना व प्रायश्चितासाठी भरपूर वेळ द्यायचे. आज त्याच पवित्र शरीर र्क या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आज आपण सर्व धर्मगुरूंसाठी प्रार्थना करूया की त्यांनी आपल्या जीवना संत जॉन मारी वीयाणीचे उदाहरण पाळावे.

विश्वासू लोकांची प्रार्थना

आपला प्रतिसाद :- दयावंत प्रभू, आमची प्रार्थना ऐक.

१. सर्व समर्थ प्रेमळ पित्या आज आम्ही तुझ्याकडे आमचे परमगुरू पोप फ्रान्सिस, सर्व बिशप महागुरु धर्मगुरू, धर्मबंधु, व्रतस्थ बंधू भगिनी यांच्यासाठी खास प्रार्थना करतो. त्यांचा विश्वास मजबूत कर. तसेच त्यांनी आपल्या शिकवणीद्वारे लोकांना अध्यात्मिक जीवनाचे महत्त्व पटवून द्यावे म्हणून त्यांना सहाय्य कर म्हणून प्रार्थना करूया.

२. हे सर्व समर्थ दयाळू पित्या आम्ही तुझ्याकडे आज सर्व धर्मगुरूंसाठी विशेष करून आच्या प्रमुख धर्मगुरू व सहाय्यक यांच्यासाठी प्रार्थना करतो. त्यांना मार्गदर्शन व सहाय्य कर तसेच तुझे प्रेम सर्वत्र विशेष करून आमच्या धर्मगामात सर्वाना देवाच्या प्रेमाचा अनुभव त्यांच्याद्वारे येऊ दे म्हणून प्रार्थना करूया.

३. हे प्रिय देवा, आज आम्ही, वायनाड आपत्तीग्रस्त लोकांसाठी प्रार्थना करतो. त्यांच्या शारीरिक आणि मानसिक गरजा पूर्ण करण्यासाठी दयाळू लोकांना प्रेरित कर.  या कठीण काळात त्यांच्या बाजूने उभा रहा. त्यांना शक्ती आणि धीर दे. त्यांच्या जीवनात पुन्हा शांती आणि आनंद आणण्यासाठी मार्गदर्शन कर. म्हणून प्रार्थना करूया.

४. हे प्रिय देवा, आपल्या अपार करुणेने, आजारी आणि शारीरिक लोकांना तुझा आधार दे. त्यांच्या वेदना लवकरात लवकर कमी व्हाव्यात. त्यांच्या बाजूने उभे रहा आणि त्यांना तुझ्या प्रेमाची जाणीव करून दे. त्यांना बरे होण्याची आशा मिळूदे आणि त्यांची काळजी घेणाऱ्यांना शक्ती व सामर्थ्य दे. म्हणून प्रार्थना करूया.

५. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या सामाजिक व वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया.