Tuesday, 8 July 2014


Reflections By: Suresh Alphonso.






सामान्यकाळातील पंधरावा रविवार

दिनांक: १३/०७/२०१४.
यशया; ५५:१०-११.
रोमकरांस पत्र; ८:१८-२३.
मत्तय; १३: १-१३.











“स्वर्गराज्याचं गुपित समजण्याचं दान तुम्हाला मिळाले आहे.”

प्रस्तावनाः
 आज ख्रिस्तसभा सामान्यकाळातील पंधरावा रविवार साजरा करीत आहे. आजची वाचने आपल्याला देवाच्या वचनाचे महत्व पटवून देतात. देवाचे वचन आपल्या जीवनाची आध्यात्मिक भूक व तहान भागवते. देवाच्या वचनाचे रहस्य ज्याला कळते त्याच व्यक्तीचे तारण होते. ती व्यक्ती पूर्णता बदलून जाते व देवभक्त होते.
     आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा आपणांस देवाच्या वचनाविषयीचे महत्व सांगतो. तर दुस-या वाचनाद्वारे संत पौल आपणांस देवाचे प्रकट होणारे वैभव दाखवतो. शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त स्वर्ग राज्याविषयी व देवाच्या वचनाविषयी सांगताना पेरणा-याच्या दाखल्याद्वारे आपणांस देवाच्या वचनाचे स्पष्टीकरण देतो.
देवाचे वचन हे दिव्य दान आहे; ते दिव्य दान आपणांस प्राप्त व्हावे व त्या वचनांचा अर्थ आपणास कळावा आणि त्याच वचनांचे आपण सुर्वार्तीक व्हावे म्हणून परमेश्वराकडे विशेष प्रार्थना करू या.

पहिले वाचन (यशया; ५५:१०-११):
यशया हा देवाचा इस्त्राएलसाठी निवडलेला संदेष्टा होता. त्याच्याद्वारे खूप काही येशूविषयी भाकित सांगितली गेली होती. आजच्या वाचनात यशया संदेष्टाद्वारे देवाच्या वचनांचा अर्थ सांगण्यात आला आहे; जसे पाऊस व बर्फही आकाशातून पडतात आणि पृथ्वी भिजवून तिला सफळ व हिरवीगार करतात. तसेच देवाचे वचन आहे ते आपल्या आध्यात्मिक जीवनाला सफळ व हिरवीगार करतात. कारण देवाचे विचार हे आपल्या विचारांपेक्षा उच्च आहेत. तसेच अधिक दूरवर पोहचणारे, अधिक समृध्द व अर्थपूर्ण आहेत. म्हणूनच देवाच्या वचनांची तुलना पाऊस व बर्फ ह्यांच्याशी केली आहे. त्यातून संथपणे व मूकपणे चाललेले कार्य सूचित होते.

दुसरे वाचन (रोमकरांस पत्र ; ८:१८-२३):
दुस-या वाचनात संत पौल आपणांस देवाच्या गौरवाच्या आत्म्याविषयी व देवाचे प्रगट होणारे वैभव ह्या विषयी बोध करतो. “गौरवाचा आत्मा” ह्यामध्ये पौलाने दुःख सहन करणे व गौरव करणे ह्या दोघामधला फरक स्पष्ट करताना ख्रिस्ती श्रध्देच्या विश्वासाचा मुद्दा आणि ख्रिस्ती जीवनातील दुःखे व त्यानंतरचा गौरव स्पष्ट केला आहे. त्यासाठी संत पौल आपणांस सृष्टीचे उदाहरण देतो.

शुभवर्तमान (मत्तय; १३:१-२३):
“ज्याला कान आहेत तो ऐको”(मत्तय १३:९). शुभवर्तमानात प्रभू येशू देवराज्याविषयी सांगत आहे. स्वर्गराज्य समजीव होण्यासाठी प्रभू येशू पेरणा-याचा दाखला देतो व ते पेरल्या नंतर काय स्थिती होते व जे बी चांगल्या जमिनीत पडल्यावर कसे शंभरपट, साठपट व तीसपट पिक देते ते सांगितले आहे. देवाचे वचन हे असेच आहे; ज्याला ते ज्याप्रमाणे कळते तो त्याचप्रकारे शंभरपट, साठपट व तीसपट पिक देतो म्हणूनच येशूने शिष्यांना सांगितले की, ‘स्वर्गाच्या राज्याची रहस्ये जाणण्याचे दान तुम्हाला दिले आहे’.

सम्यक विवरणः
     स्वर्गाचे राज्य व देवाचे वचन खूप समजण्यास कठीण आहे, ह्याच कारणास्तव  जेव्हा देवराज्य समजण्यासाठी येशू ख्रिस्त शिष्यांना पेरणा-याच्या दाखल्याने समजावतो तेव्हा त्यांना ते कळत नाही कारण ते देवराज्याविषयी असते. पेरणा-याच्या दाखल्यामध्ये प्रभूने स्वर्गराज्याचे स्पष्टीकरण दिले आहे. पेरणा-याच्या दाखल्याद्वारे  येशूने स्वर्गराज्याची घोषणा केली व शिष्यांनी मोठ्या उत्साहाने व प्रेमाने प्रतिसाद दिला; पण सर्वांनाच त्याचा अर्थ कळला असा नाही. ह्या दाखल्यात पेरणारा पेरणी करावयास निघाला व ते बी कसे व कुठे पडले व त्याची वाढ कशी झाली ह्याचे स्पष्टीकरण करून त्याचे कुठे साठपट, कुठे शंभरपट व कुठे तीसपट कसे पिक आले ते सांगण्यात आले आहे(मत्तय १३:८).
     ह्या दाखल्यावरून प्रभूला समाजात वागणारी लोक कशी आहेत व त्याच्या मागे येणारे त्याचे शिष्य कसे आहेत ह्याचे स्पष्टीकरण करायचे होते. त्यासाठी पेरणा-याचे बी हे वाटेवर, खडकाळ व काटे-कुटे असलेल्या जागी पडते. म्हणजेच देवाचे वचन व स्वर्गराज्य समजण्यासाठी आपण तीन प्रकारात मोडतो जसे:
१) अजिबात न ऐकणारे,
२) वरवरचा उथळ प्रतिसाद देणारे व
३) इतर कामात रमून गेलेले,
ह्यामूळे आपणास देवाचे वचन व स्वर्गराज्य कळण्यास वेळ नसतो. चांगल्या जमिनीत पडणारे बी उत्पादक होते त्यामूळे विरोध आणि अपुरा प्रतिसाद असला तरीही पिक येईल असे आश्वासन येशूने आपल्या शिष्यांना दिले होते. म्हणूनच चांगल्या जमिनीत पडलेले पीक चांगले आले पण चांगल्या जमिनीत देखील उत्पादन क्षमता सर्वत्र सारखी नसते. जसे पेरणा-याचे चांगल्या जमिनीत पडून सुध्दा कुठे शंभर, साठ व तीसपट असे पिक आले.
     पेरणा-याच्या दाखल्यामध्ये “संदेश”(बीज) सर्वांसाठी एकच आहे. पण ऐकणा-याची ग्रहण शक्ती किती आहे त्यावर त्या संदेशाचा स्विकार करणे अवलंबून असते. म्हणून शिष्यांना तो दाखला कळला नाही त्यामूळे त्यांना स्वर्गराज्य व देवाचे वचन कळले नाही ह्यास्तव त्यांचा दाखल्याला प्रतिसाद वेगळा होता. त्यामूळे प्रभूला दाखल्याचे स्पष्टीकरण द्यावे लागले व त्यांच्यासाठी स्वर्गराज्याची रहस्ये उघडी करून द्यावी लागली.
     ज्यांना देवाच्या वचनांचे दान जाणण्याची शक्ती नाही त्यांच्याविषयी यशया संदेष्यांने स्पष्टपणे भाकित केले आहे; (यशया;६:९-१०) “ते देवाचा संदेश वरवर ऐकतात. यातून त्यांचे कोणतेच हित साधत नाही.” परंतू येशू हा शिष्यांसमवेत राहणे हा विशेष मान आहे कारण येशूच्या समवेत राहून देवाची वचने ऐकणे व स्वर्गराज्य समजवून घेणे फार भाग्याचे होते. कारण स्तोत्रकार १२:६-७ मध्ये म्हणतो, “प्रभूचे शब्द म्हणजे आगदी शुद्ध असे शब्द, भट्टीत सातवेळा तावून सुलाखून मातीच्या मुशीत ओतलेल्या रुप्यासारखे. आम्हाला सांभाळ, प्रभू! अश्या ह्या पिढीपासून नेहमी आमचे रक्षण कर.”

बोधकथा:
1. तेरेसा सुतारी ह्यांच्या पतीची नोकरी बंद पडली होती, तेव्हा त्यांनी दारूचा धंदा सुरु केला. ह्या धंद्यात प्रचंड पैसा त्यांना मिळाला. त्या पोलिसांना २६००० रुपये इतका हफ्ता देत असत. चैनबाजीत दिवस काढीत असतानाच त्यांच्या दोन्ही मुली व त्या स्वतः एकसारख्या आजारी पडू लागल्या. अगदी लाखावरी पैसा संपवून देखील काहीच उपयोग झाला नाही. त्यांच्या जीवनात त्यांना निराशा आली होती. काय करावे हे त्यांना सुचेना. अश्यावेळी एके दिवशी एका शेजा-याने तिला प्रार्थनेच्या सभेला जाण्याचा सल्ला दिला. त्या प्रार्थनेला जाऊ लागल्या व बायबल वाचन करू लागल्या. बायबल वाचत असताना त्यांना एक वचन आढळले की, ‘तुम्ही प्रार्थनेत विश्वासाने काही मागाल ते तुम्हाला मिळेल’ व तिने विश्वासाने मागितले व तिला वचनाचा अर्थ कळला. त्यांना देवाच्या वचनाचा स्पर्श झाला. त्यांनी दारूचा धंदा पूर्णपणे बंद केला आणि काय चमत्कार, त्यांच्या मागे पडलेली साडेसाती बंद झाली. परंतु उदहारनिर्वाहाचे दुसरे साधन नसल्यामुळे त्यांचे हाल चालू झाले. काही लोकांनी त्यांना दारूचा धंदा पुन्हा चालू करण्याचा सल्ला दिला पण त्या देवाच्या वचनापासून हटल्या नाहीत. त्यांनी प्रार्थनेवर व देवाच्या वचनावर विश्वास ठेवला आणि तसा धंदा पुन्हा करण्याचे नाकारले. त्यामुळे तिच्या घराचे तारण झाले. लवकरच तिच्या पतीला बाहेरगावी नोकरी मिळाली व त्यांनी स्वतः भाजीपाल्याचा व्यवसाय सुरु केला.

2.   संत अल्फॉन्सो लिगोरी ह्यांचा जन्म इटलीतील एका गावात झाला. लहानपणापासूनच ते खूप बुद्धिमान व धार्मिक होते. त्यांचे बालपण श्रीमंत व धार्मिक कुटुंबात गेले. सतराव्या वर्षी ते वकील बनले. ज्यावेळी ते कोर्टात गेले, त्याचवेळी इतर जेष्ठ वकिलांनी त्यांची चेष्ठा केली परंतु त्यांनी उत्कृष्टरीत्या मुद्दे मांडून केस जिंकली. मग त्यांना एक दिवस फसविण्यात आले. त्याचवेळी त्यांनी आपली नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. एकदा एका दवाखान्यासमोरून जात असताना त्यांनी तेथे लिहिलेले वचन वाचले, ‘ह्या जगाचा त्याग कर व माझ्या मागे ये’, जणू परमेश्वर त्यांच्याशी बोलला व त्यांचे मनपरिवर्तन झाले. त्यांनी धर्मगुरू होण्याचा निर्णय घेतला, ते धर्मगुरू झाले व पुढे त्यांना बिशप म्हणून नेमण्यात आले. त्यांनी जवळजवळ एकशेअकरा पुस्तके लिहिली. त्यांनी रिडॅम्टोरिस्ट संस्थेची स्थापना करून गरिबांना ख्रिस्ताच्या वचनाचा संदेश दिला.

मनन-चिंतनः
     मत्तयच्या शुभवर्तमानात पेरणा-याचा दाखला खूप काही महत्वाचा संदेश आपणास देत आहे. मत्तयने ह्या दाखल्यामध्ये देवाचे राज्य व देवाचे वचन ह्यांचा उत्कृष्ट समेट केला आहे. देवाचे वचन ऐकल्यावर आपली काय अवस्था होते व आपण कोणत्या प्रकारच्या लोकांत मोडतो हे ह्या दाखल्याद्वारे कळते. हाच दाखला मार्कच्या शुभवर्तमानात आपणांस आढळतो परंतू मार्कपेक्षा मत्तयने दाखला अगदी स्पष्टपणे व अर्थपूर्णपणे सांगितला आहे. जेव्हा हा दाखला येशूने शिष्यांना सांगितला तेव्हा त्यांना त्याचा अर्थ कळला नाही तेव्हा येशूने त्यांना सांगितले की, ‘देवाचे राज्य समजविण्याचे  दान तुम्हाला देण्यात आले आहे. जर तुम्हाला हा दाखला कळला नाही तर पुढील गोष्टी कशा कळतील.’
     कधी कधी आपली स्थिती त्या शिष्यांसारखी होते. आपणांससुध्दा त्या शिष्यांप्रमाणे देवाचे वचन समजण्याचे दान देण्यात आले आहे परंतू कधी कधी आपण शिष्यांप्रमाणे गोंधळून जातो म्हणूनच येशूला पेरणा-याचा दाखला शिष्यांना स्पष्ट करावा लागला. पेरणारा देवाचे वचन पेरतो पण ते वेगवेगळ्या स्थितीत पडते त्यामुळे आपणांस वेगवेगळ्या प्रकारचे लोक आढळतात.
  • वाटेवर वचन पेरले जाते ते लोक हे आहेत की त्यांनी ऐकल्याबरोबर सैतान येऊन त्यांच्यातले पेरलेले वचन हिरावून घेतो.
  •  खडकाळ जमिनीत पेरलेले लोक वचन आनंदाने ग्रहण करतात परंतु मूळ नसल्याकारणाने अल्पकाळ टिकतात, त्यामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे ते लागलेच अडखळतात.
  • काटेरी झुडपांमध्ये पेरलेले लोक वचन एकून घेतात, नंतर प्रपंचाची चिंता, द्रव्याचा मोह व इतर गोष्टींचा लोभ त्यामुळे त्यांच्या वचनाची वाढ खुंटते व ते निष्फळ होतात.
  • चांगल्या जमिनीत पेरलेले लोक वचन चांगल्या प्रकारे स्विकारुन कोणी तीसपट, कोणी साठपट तर कोणी शंभरपट पीक देतात.
ख्रिस्ताने देवाचे वचन ऐकणा-या लोकांची वेगवेगळी स्थिती किंवा वेगवेगळेपणा दाखवला आहे. आपण वचन ऐकल्यावर कोणत्या प्रकारात मोडतो हे ख-या अर्थाने पडताळून बघितले पाहिजे.
  • फ्रान्सिस झेविअर ह्याला देवाचे वचन प्राप्त झाले, ‘मनुष्याने सारे जग कमावले व स्वतःचा आत्मा गमावला तर त्याचा त्याला काय लाभ?’ त्यांचे परिवर्तन झाले व ते येशूसंघिय संस्थेत दाखल झाले.
  • ‘करशील जे गरिबांसाठी होईल ते माझ्यासाठी’ हे वचन प्राप्त झालेल्या मदर तेरेसाने आपले संपूर्ण जीवन गरिबांसाठी वाहिले.
  • असिसीच्या संत फ्रान्सिसने देवाचे वचन ऐकल्यावर मोडकळीस आलेल्या मानवी ख्रिस्तसभेची पुनर्बांधणी केली. अश्याप्रकारे खूप काही उदाहरणे आपल्या समोर आहेत.

सर्वांना देवाचे वचन प्राप्त होते परंतु आपण ते कसे स्वीकारतो हे आपणा प्रत्येकावर अवलंबून आहे. प्रभू येशू मत्तय ७:२४ मध्ये म्हणतो, ‘ह्यास्तव जो प्रत्येक जण ही माझी वचने एकून त्याप्रमाणे वागतो, तो कोण सूज्ञ मनुष्यासारखा होय. कारण त्याने घर खडकावर बांधले त्यामुळे त्याला काही झाले नाही परंतु जो कोणी माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही तो कोणा एका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर वाळूवर बांधले व कोसळून पडले.’

विश्वासू लोकांच्या प्रार्थनाः
प्रतिसादः हे प्रभो, आमची प्रार्थना ऐकून घे.
  1. ख्रिस्तसभेसाठीः- ख्रिस्तसभेत कार्य करणारे आपले पोप व इतर सर्वांना देवाच्या वचनाचा अर्थ कळावा व त्यांनी देवाच्या वचनांची सुवार्ता जगभर पसरावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
  2. ख्रिस्ती कुटुंबासाठीः- जे देवाच्या वचनापासून व ख्रिस्तसभेपासून दूर गेले आहेत त्यांना देवाच्या प्रेमाचा स्पर्श व्हावा; व बायबल वाचन रोज घरा-घरात व्हावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
  3. पाऊसासाठीः- हे प्रभो ह्या पावसाळी हंगामात आम्हास शेती-योग्य असा पाऊस लाभावा जेणेकरून आम्हांस चांगली शेती करता येईल व चांगले पीक घेता येईल, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
  4. आजारी लोकांसाठीः- हे प्रभो जे आजारी व दुःखी-कष्टी आहेत त्या सर्वांवर तुझा आर्शिवाद असू दे व त्यांना तुझ्या आरोग्यदायी स्पर्शाने चांगले स्वास्थ लाभावे, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
  5. थोड्या वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया.          

   

Tuesday, 1 July 2014

Fr. Wilson D'Souza is a Capuchin Priest. He belongs to the St. Bonaventure Capuchin Province, Maharashtra. He has done his doctorate in Biblical Theology and at Present he is rendering his service at La-Verna Capuchin Theologate,Pune.




सामान्य काळातील चौदावा रविवार

"मी जो मनाचा सौम्य व लीन आहे. मला अनुसरा 
व माझ्यापासून शिका."

दिनांक: ०६/०७/२०१४
पहिले वाचन : जख-या ९:९-१०
दुसरे वाचन : रोमकरांस पत्र ८:९,११,१३
शुभवर्तमान : मत्तय ११:२५-३०

प्रस्तावना:

प्रिय बंधू भगिनींनो; आज ख्रिस्तसभा आपल्याला सामान्य काळातील चौदाव्या रविवारच्या मिस्सामध्ये नम्रतेवर धडा देत आहे. लहान होऊन महान होण्यासाठी गर्वाने फुगून जावून स्वतःला मो़डण्यापेक्षा स्वतःला वाकवून महान होण्यास शिकवत आहे.
आजचे पहिले वाचन जख-याच्या पुस्तकातून घेतलेले आहे. संदेष्टा आपल्याला सियोनेच्या भावी राजाची कल्पना देतो. हा भावी राजा न्यायी व यशस्वी आहे कारण तो मनाचा, दिलाचा सौम्य व लीन आहे. संत पौल रोमकरांस लिहिलेल्या पत्रात पवित्र आत्म्याची कार्य आणि त्या आत्माने प्रेरीत होऊन आपण जीवनात कसे वागावे हे नमुद करतो.
आजच्या शुभवर्तमानात आपण पाहतो की, येशू आपल्या स्वर्गीय पित्याला धन्यवाद देत आहे आणि आपणा सर्वांस बालकासारखे होण्याचे आमंत्रण देत आहे. कारण मनुष्य जोपर्यत नम्र, लहान व अज्ञानी होत नाही तोपर्यत देवाच्या रहस्यांची त्याला जाण होवू शकत नाही.

सम्यक विवरणः
पहिले वाचन (जख-या ९:९-१०):

     आजच्या पहिल्या वाचनामध्ये सियोनेच्या भावी राज्याविषयी कल्पना मांडली आहे. भावी राजा कसा असावा आणि तो परप्रांतातील राज्यापेक्षा वेगळा कसा असेल ह्याचे वर्णन केले आहे. संदेष्टा जख-या, सियोन कन्येला आणि यरूशलेम कन्येला भावी राज्याच्या नम्रतेची जाण करून देत आहे. भावी राजा हा न्यायी व यशस्वी असेल. तो गाढवाच्या पिल्लावर म्हणजे शिंगरावर बसून येईल व आपली सौम्यता, लीनता प्रकट करेल. गाढव हा इतर प्राण्यामधील एक प्राणी जरी असला तरी त्याला तुच्छ मानले जाते. त्याला भरपूर ओझे वाहण्यासाठी लावले जाते आणि एखादा कधी का व्यवहारात चुकला तर त्याला आपण गाढवाची उपमा देतो असे असून सुध्दा गाढव सर्व काही नम्रतेने, लिनतेने आणि सौम्यतेने स्विकार करतो.
     आजच्या पहिल्या वाचनात संदेष्टा आणखी एक गोष्ट आपल्या निदर्शनात आणतो ती म्हणजे, “शांतीचा राजा.” हा राजा येरूशलेमातील घोडे व एफ्राईममधील सर्व रथ नष्ट करील. तो इंद्रधनुष्य तोडून टाकील व राष्ट्रांमध्ये शांती प्रस्थापित करील. तसे पाहिले तर रथ, घोडे आणि इंद्रधनुष्य हे युध्दासाठी वापरले जातात. ही सर्व गर्विष्टाची चिन्हे आहेत. युध्दाद्वारे युध्द जिंकून महान होण्यासाठी आणि मान-सन्मान मिळविण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. इंग्रजीमध्ये एक सुविचार आहे. तो असा, “Pride goes on horse back and comes back on foot begging.”

दुसरे वाचन ( रोमकरांस पत्र ८:९-११,१३):

     संत पौल रोमकरांस लिहलेल्या पत्रात पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन नम्रतेचे जीवन जगण्यासाठी आमत्रंण देत आहे. नम्रता हे पवित्र आत्म्याकडून मिळालेले एक वरदान आणि दान आहे. गलतीकरांस लिहिलेल्या पत्रात अध्याय ५ ओव्या २२-२३ मध्ये संत पौल म्हणतो, “आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारे फळ, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन, हे आहे व अश्यांविरुध्य नियमशास्त्र नाही.” ही सर्व पवित्र आत्म्याची दाने आहेत. आत्म्याने प्रेरित होऊन जीवन जगत असताना मनुष्य देहाच्या अधीन जात नसतो परंतु देहाच्या व आत्म्याच्या युद्धात गर्विष्टपणा देहाच्या स्वाधीन जातो आणि देहाचे कृत्ये करतो, देहाची वासना भागवतो व मरणास प्राप्त होतो. तर! पवित्र आत्म्याने भरलेला नम्र मनुष्य आत्म्याची कार्ये करतो व स्वर्गीय सुख आपल्या जीवनात अनुभवतो.

शुभवर्तमान (मत्तय; ११:२५-३०):

देवाच्या आत्म्याने प्रेरित झालेला प्रभू येशू ख्रिस्त देवाचा मन्र सेवक आजच्या शुभवर्तमानामध्ये त्याच्या प्रिय पित्याला धन्यवाद देऊन त्याचे स्तवन व मनन करत आहे. तो आपणाला बालकाची भूमिका घेण्यासाठी बजावत आहे. येशू आपल्या स्वर्गीय पित्याला ‘पिता’ ह्या नावाने संबोधितो तसेच तो स्वर्ग आणि पृथ्वी ह्यांचा निर्माणकरता प्रभू आहे असे दर्शवितो. तो आपल्या पित्याशी प्रार्थनेद्वारे, स्तवनाद्वारे संभाषण करतो. ह्या प्रार्थनेमध्ये तो देवाला धन्यवाद देतो. देवाने सर्वकाही ज्ञानी, सुशिक्षित, गर्विष्ठ आणि विचारवंत ह्यांच्यापासून गुप्त ठेवलेले आहे आणि देवाचे महान रहस्य त्यांनी बालकांना प्रकट केलेले आहे. म्हणून येशू म्हणतो, ‘जर तुम्हांला स्वर्गात जायचं असेल आणि स्वर्गराज्य मिळवायचं असेल तर बालकाप्रमाणे सौम्य, लीन, व सरळ बना.’
पुढे येशू आपल्याला त्यांच्या स्वतःच्या कामगिरीविषयी सांगतो. पिता आणि पुत्र ह्यांच्यामध्ये ऐक्य आहे. पित्याने सर्व काही पुत्राच्या अधीन सोपविले आहे. पिता-पुत्राच नात हे मजबूत आहे. आणि त्याचे ऐकमेव कारण म्हणजे येशू सौम्य, लीन अंतःकरणाचा, मनाचा, शरीराचा आहे. तो केवळ शब्दाने दुस-यांना नम्रतेने धडे देत नाही, तर स्वतः दुस-यांचे पाय धुऊन नम्रतेचा धडा देत आहे. तो स्वतःला इतका वाकवतो की शिष्यांच्या पायाचे तो चुंबन घेतो. आणि असे म्हणतो, “तुम्ही मला गुरू व प्रभू असे संबोधिता आणि ते ठिक बोलता; कारण मी तसा आहेच. म्हणून मी प्रभू व गुरू असूनही जर तुमचे पाय धुतले तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत.” कारण जसे मी तुम्हाला केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हांला कित्ता घालून दिला आहे. (योहान १३:१३-१५)  तो स्वतः गुरु आणि प्रभू असताना त्याने असे केले. येशू कष्टी व भाराक्रांत जणांना त्याच्याकडे येण्याचा आवाहन देत आहे. त्याने दुस-यांचे पाय धूतले ह्यास्तव आपण देखील तेच करावे असे तो आपल्याला शिकवितो. तो म्हणतो, “अहो, कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन.” (मत्तय ११:२८) मी जो मनाचा सौम्य व लीन आहे. मला अनुसरा व माझ्यापासून शिका.
ख्रिस्त हा नम्रतेचा नमुना म्हणून आपल्यासमोर प्रकट केला आहे. तो म्हणतो, “मनुष्याचा पुत्रहि सेवा करून घ्यावयास नाही तर सेवा करावयास व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडनीत म्हणून अर्पण करावयास आला आहे” (मार्क: १०:४५) आजच्या तिन्ही वाचनाद्वारे प्रभू आपल्याला त्याच्यापासून शिकण्यासाठी आमंत्रण देत आहे आणि त्याच्यासारखा सौम्य, लीन, सरळ व नम्र होण्यासाठी आवाहन देत आहे.
   
मनन-चिंतनः

     आजच्या समाजाकडे जर आपण नजर लावली तर आपल्याला सातत्याने अनेक लोक ताठ मानेन फुशारकी मानून गर्विष्टाचे जीवन जगताना दिसत आहेत. अश्या माणसांची उपमा केवळ शेतात असलेल्या सरळ उभ्या कणसाबरोबर करता येईल. जे लीन, सौम्य व लहान असतात ते कधीच दुस-यांना आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता दिखाऊपणाची भूमिका घेऊन दाखवण्याचा प्रत्यन करत नाहीत. ते सतत विनम्र, सहनशील, दुस-यांपेक्षा कमी आणि इतर सर्व माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत असेच समजतात. उदाहरण द्यायचे झाले तर महात्मा गांधी: ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अहिंसेचा मार्ग स्विकारून गर्विष्ट आणि सरळ मानेने चालणारे ब्रिटिश राजवटीला सळो की पळो केले.
     गेल्याच वर्षी स्वर्गवासी झालेले नेल्सन मंडेला हे देखील नम्रतेचे एक उदाहरण आहेत. सत्ताविस वर्षे तुरुंगवास भोगला आणि काळा- गोरा हा वर्णभेदाचा भेदभाव नष्ट करण्यासाठी त्यांनी प्रत्यनाची पराकष्ट केली. जेव्हा त्यांची तुरूगांतून सुटका झाली तेव्हा लोकांनी त्यांना राष्ट्राचा अध्यक्ष म्हणून निवडले. तसेच अजून एक महत्वाचे उदाहरण द्यायचे झाले तर, कोलकत्ताच्या मदर तेरेसा: ह्यांनी तर स्वत:ला नम्रते मध्ये वाकून घेतले होते: त्यांचे बोलणे, चालणे, वागणे, आणि करणे हे त्यांच्या नम्रतेचे प्रतिक होते. ह्या सर्वांनी येशू ख्रिस्ताच्या नम्रतेचा आदर्श गिरवला होता. जे खरोखर नम्र लहान असतात तेच परमेश्वराच्या दृष्टीकोनातून महान बनत असतात. नम्र होणे म्हणजे स्वःताला वाकून घेणे, दुसऱ्यांना आपल्यापेक्षा महान समजणे. ते घोड्यावर स्वार होत नसतात तर गाढवीच्या शिंगरावर बसत असतात.

बोध कथाः

       एक दिवस गुरु आपल्या शिष्यांना घेऊन एका गावातील शेती-वाडीतून प्रवास करत होते. तो सप्टेंबर महिना होता. शेतात लावलेले भाताचे कणसे आत्ताच कुठेतरी तयार होत होती. एका शिष्याची नजर शेतात पिकत असलेल्या भाताकडे गेली. त्याला कळून चुकले की भाताची काही कणसे ताठ मान करून सरळ उभी होती तर काही कणसे वाकलेली होती. ह्या शिष्याच्या मनात विचार आला की देवाने झुकलेल्या कणसावर अन्याय केले आहे. त्याने आपल्या गुरूला आपल्या शंकेचे निरसन करण्यासाठी प्रश्न केला. “काही कणसे ताठ मानेने डौलदारपणे वाऱ्याच्या झुळकीवर सरळ उभी आहेत. तर, दुसरी मात्र छोटयाश्या वाऱ्याच्या झुळकीने का वाकलेली आहेत?
गुरूने शिष्याला स्पष्टीकरण देताना म्हटले, “जे कणसे सरळ आहेत आणि जे वाकलेली आहेत ती दोन्ही कापून माझ्याकडे आण.” दोन्ही कणसातील भाताचे दाणे काढून त्या शिष्याला दाखवले की; एका कणसातील दाणा भाताविना होता तर दुसरा भाताने भरलेला होता. जे भाताने भरलेले होते त्यांची कणसे वाकलेली होती. तर, जे रिकामी होती त्यांची कणसे  ताठ मानेने सरळ डोलत होती. नम्रतेने वाकलेला मनुष्य सर्वठायी परिपूर्ण असतो.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसादः प्रभो, आमच्या प्रार्थना स्विकारून घे.
१.     येशू ख्रिस्ताच्या शिकवणुकीनुसार वागण्यास आपल्याला आपल्या धार्मिक नेत्यांनी योग्य ते मार्गदर्शन करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२.     येशू ख्रिस्ताची सौम्यतेची व लीनतेची शिकवण आपण आचरणात आणून एक चांगले ख्रिस्ती जीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३.     आपल्या सर्वांची पावसासाठी कळकळीची प्रार्थना आपल्या प्रभू येशूने ऐकून आपल्याला चांगल्या पाऊसाचे दान द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४.     आपल्या राजकीय नेत्यांनी सौम्यतेचा व नम्रतेचा मार्ग स्वीकारून जगात शांतता प्रस्तापित करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५.     आपण आपल्या वयक्तिक गरजांसाठी प्रभूयेशुकडे प्रार्थना करूया.




Tuesday, 24 June 2014

Reflections for the homily by: Malcolm Dinis.










संत पिटर व संत पौल


“आपण ख्रिस्त, जिवंत देवाचे पुत्र आहा”


दिनांक २९/०६/२०१४.
पहिले वाचन: प्रेषितांचे कृत्ये १२:१-११.
दुसरे वाचन: २ तिमथी ४:६-८, १७-१८.
शुभवर्तमान: मत्तय; १६:१३-१९.

प्रस्तावना:

आज ख्रिस्तसभा संत पेत्र आणि संत पौल या दोन महान संतांचा सण साजरा करीत आहे. संत पेत्र हा एक कोळी होता परंतु त्याने ख्रिस्ताला जिवंत देवाचा पुत्र म्हणून श्रद्धेने स्वीकारले. म्हणूनच अनुभवाने महान असलेल्या ह्या ज्येष्ठ शिष्यांवर प्रभू येशू ख्रिस्ताने संपूर्ण ख्रिस्तसभेची जबाबदारी सोपवली. संत पौल हा ख्रिस्तसभेतील एक महान आणि प्रतिभाशाली सुवार्ता प्रचारक होता. अनेक प्रकारचा छळ सोसून आणि विरोध सहन करूनही संत पौलाने आणि पेत्राने ख्रिस्ती धर्म पसरविला.
आजच्या पहिल्या वाचनात ख्रिस्ती मंडळीच्या एकाग्र प्रार्थनेमुळे संत पेत्राची तुरूंगातून कशी सुटका होते हे दर्शविले आहे. तसेच आजच्या दुस-या वाचनात संत पौल आपल्या आयुष्याचा जमाखर्च मांडताना म्हणतात, ‘जे समृध्द ते मी केले आहे. माझी धाव संपविली आहे व आता माझ्यासाठी नितिमत्वाचा मुकूट ठेविला आहे’.
आजच्या शुभवर्तमानात ‘येशू हा ख्रिस्त’ असल्याची कबूली पेत्र देत आहे. संत पौलासारखा सुवार्ता प्रसाराचा उत्साह आम्हा सर्वांना लाभावा म्हणून ह्या पवित्र मिस्साबळीमध्ये परमेश्वराकडून विशेष कृपा मागूया.

पहिले वाचन (प्रेषितांचे कृत्ये १२:१-११):

हेरोद राजा रोमी बादशाहाचा मित्र होता. यहुदी लोकांना खुष करण्यासाठी ख्रिस्ती मंडळीचा छळ करत पेत्राला मारण्याच्या उद्देशाने त्याने त्याला पकडून तुरूंगात टाकले. पेत्र तुरूंगातून निसटून जाण्याची शक्यताच नव्हती. त्याच्या हातात साखळ दंड होता व चार शिपाई सतत त्याची राखण करीत होते.
‘जे मनुष्याला अशक्य असते ते देवाला शक्य असते’ हे ख्रिस्ती मंडळीला माहित होते म्हणून ते अत्यंत कळकळीने व एक चित्तेने प्रार्थना करीत असता पेत्राची तुरूंगातून सुटका झाली.

दुसरे वाचन ( २ तिमथी ४:६-८, १७-१८):

संत पौल लवकरच प्रभूकडे जाणार होता हे त्याला कळून चुकले होते. आपल्या जीवनात तो ख्रिस्ताशी सतत एकनिष्ठ राहिला होता. सत्यासाठी तो स्थिर उभा राहिला. ख्रिस्ताच्या सुर्वातेचे सत्य राखण्यासाठी त्याने कितीतरी कष्ट घेतले होते. आपल्या सर्व संकटामध्ये, दुःखामध्ये, अडचणीमध्ये त्याने सतत प्रभूकडे लक्ष केंद्रित केले व आपला विश्वास शेवटपर्यंत बळकट ठेवला म्हणूनच पौल म्हणतो की, जे समृध्द ते मी केले आहे, माझी धाव संपविली आहे, विश्वास राखिला आहे.
शुभवर्तमान (मत्तय; १६:१३-१९):
‘येशू हा ख्रिस्त आहे’ अशी कबूली पेत्राने दिली. पेत्राला हे सत्य स्वतःच्या अक्कल हुषारीने समजले नव्हते, तर देवानेच त्याला ते प्रगट केले होते.
‘येशू हा ख्रिस्त आहे’ याच सत्यावर ख्रिस्त आपली मंडळी रचणार होता. स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या सोपविणे म्हणजे एक अधिकाराचे चिन्ह आहे. ख्रिस्ताने पेत्राला व प्रेषितांना सुर्वातेची घोषणा करून स्वर्गात जाण्याचा मार्ग खुला करण्याचा अधिकार दिला. या अधिकाराचा उपयोग त्यांनी पेन्टेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली केला.

सम्यक विवरणः

मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? (१३)
आपली खरी ओळख लोकांना झाली आहे की नाही हा येशू ख्रिस्तासमोर प्रश्न होता. येशू कोण आहे याविषयी लोकांत अनेक कल्पना होत्या. प्राचीन संदेष्ट्यातील कोणी एक जिवंत झाला आहे असे सुध्दा त्यांना वाटत होते. लोकांच्या अपेक्षा तसेच अंदाजही निरनिराळे होते. येशू ख्रिस्ताने आपल्या पित्याची शिकवण लोकांना दिली होती व आपल्या महान कृत्यांनी लोकांची मने परमेश्वराकडे वळवळी होती. आता संधी होती ती म्हणजे लोकांच्या विचारांची; येशूला खरोखर त्यांनी देवाचा पुत्र म्हणून ओळखले होते का? म्हणून येशूने आपल्या शिष्यांना त्याच्याविषयी लोकांचे मत काय आहे असे विचारले.

आपण ख्रिस्त, जिंवत देवाचे पुत्र (१६):
मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? ह्या प्रश्नावर शिष्यांनी वेगवेगळी उत्तरे दिली परंतु शिमोन पेत्राचा अंदाज अचूक होता तो म्हणाला, ‘आपण ख्रिस्त, जिंवत देवाचे पुत्र आहा.’ ही त्याची अंतःप्रेरणा होती. ह्या पेत्राच्या अंर्तज्ञानामुळे येशू त्याला विशेष अधिकार देतो.
इस्त्राएल लोक ज्या मसीहाची वाट पाहत होते व ज्याच्या येण्याविषयीचे भविष्य जुन्या करारात केले होते त्याच ‘मसिहाची’ किंवा ‘ख्रिस्ताची’ पेत्राने कबुली दिली होती. यहुदी लोकांनी ख्रिस्ताला तो चांगला आहे, तो थोर आहे असे म्हटले. पण तो सर्वात चांगला, सर्व मानव जातीत श्रेष्ठ, सर्वात मोठा संदेष्टा असे कधीच मानले नाही. परंतु जेव्हा ख्रिस्ताची खरी ओळख पेत्राच्या शब्दाने होते हे ऐकून ख्रिस्ताला किती समाधान वाटले असेल? पेत्राने येशू हाच ख्रिस्त आहे असे ओळखल्यावर तो त्यांना स्वतःचे दुःखसहन, मरण व पुनरूत्थान याविषयी शिक्षण देऊ लागला.

मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन (१९)
‘पेत्र’ ह्या नावाचा अर्थ ‘खडक’ असा होतो. ख्रिस्ताने पेत्राला स्वर्ग राज्याच्या किल्ल्या सोपविल्या म्हणजेच संपूर्ण ख्रिस्तसभेची काळजी त्याच्यावर सोपविली. किल्ली हे अधिकाराचे चिन्ह आहे. पेत्राला येशू ख्रिस्ताने जो अधिकार दिला आहे तो सत्ता गाजविण्यासाठी नव्हे तर हा अधिकार सेवा करण्यासाठी आहे. अधिकार नसला तर सेवा करणे कठीण जाते. म्हणून येशू ख्रिस्त पेत्राला अधिकारही देतो व जबाबदारीही देतो. हा अधिकार इतरांसाठी आहे, तो स्वतःसाठी नाही. ज्याला येशूचा खराखुरा अनुभव येतो तो स्वतःचा राहत नाही. तो स्वतःला काही प्रमाणात विसरून जातो. त्याला आंतरिक स्वातंत्र्य मिळते, त्या आंतरिक स्वातंत्र्यातून तो इतरांकडे वळतो. म्हणूनच ख्रिस्ताने पेत्राला व प्रेषितांना सुवार्तेची घोषणा करून स्वर्गात जाण्याचा मार्ग खुला करण्याचा अधिकार दिला.

बोध कथाः

१. एकदा एका प्रियसीने आपल्या प्रियकराच्या घराचा दरवाजा वाजवला. घरामधून आवाज आला, ‘कोण आहे?’ प्रियसीने उत्तर दिले, ‘मी आहे.’ घरामधून परत आवाज आला. ‘इथून परत जा, हे घर आपल्या दोघांना सामावून घेणार नाही.’ प्रियसी तेथून निघून गेली व आपल्या प्रियकराच्या शब्दांवर बराच विचार केला व परत येऊन प्रियकराच्याघराचा दरवाजा वाजवला. मधून आवाज आला, ‘कोण आहे?’ पण ह्या वेळेला प्रियसीचे उत्तर होते, ‘तूच आहेस.’ असे उत्तर देताच दरवाजा लगेच उघडला गेला.
(येशू ख्रिस्ताला माहित करून घ्यायचे होते की खरोखर आपल्या शिष्यांच्या हृदयात त्याच्यासाठी जागा आहे का? म्हणून तो त्याना प्रश्न करतो, लोक कोण म्हणून मला ओळखतात?)

२. धर्मगुरू झाल्यानंतर फा.थॉमस ह्यांची बदली एका शहरापासून दूर अश्या गरीब मागासलेल्या गावामध्ये झाली. शैक्षणिक व आध्यात्मिक दृष्ट्या ते गाव फारच मागासलेले होते. परंतू जेव्हा फा.थॉमसने ह्या गावात पाऊल टाकले तेव्हा सर्वप्रथम शिक्षणाची सोय केली, त्यासाठी त्यांना पैशांची गरज होती म्हणून त्यांनी शहराकडे जाऊन श्रीमंत-दानशूर माणसांकडून अक्षरशः भीक मागितली व स्वतःचे जे होते-नव्हते ते सर्व गावाच्या विकासासाठी विकून टाकले व गावाला नवीन दिशा दाखवली. आज त्या गरीब गावाचा विकास फा.थॉमसच्या परिश्रमामुळे झाला व त्यांच्या पुण्याईमुळेच आज त्या गावामध्ये शैक्षणिक, आध्यात्मिक व सर्वच बाबतीत प्रगती झालेली आहे. ह्याचे सर्व श्रेय फा.थॉमस ह्यांना जाते.
आजच्या दुस-या वाचनात संत पौलाच्या पत्रामध्ये म्हटल्याप्रमाणे फा.थॉमससाठी आपण इतकेच म्हणू शकतो, “मी माझी धाव संपविली आहे, आता माझ्यासाठी नितीमत्वाचा मुकूट ठेवला आहे.” (२ तिमथी; ४:६)  
 
मनन-चिंतनः

आज ख्रिस्तसभेकडे भरपूर अधिकार आहेत; भरपूर सत्ता आहेत. ही सत्ता व अधिकार केवळ ख्रिस्ती माणसांसाठी नाही, तर सर्व गरजूंसाठी आहे. यासाठी ख्रिस्तसभेच्या अधिकार वर्गाला आपल्या कोषातून बाहेर पडावे लागेल. आज ख्रिस्ती माणूसही आपल्या अधिकाराचा दुरूपयोग करतात. ह्याचे एक मुख्य कारण म्हणजे आम्हाला ख्रिस्ताच्या खराखुरा अनुभव आलेला नाही. आम्ही ख्रिस्ताची शिकवण जाणतो, ख्रिस्ताची आम्हाला तात्विक ओळख आहे. पण त्या ओळखीद्वारे आमचा अंहकार पुसला जात नाही. त्यामुळे आम्ही स्वतःला विसरत नाही, आम्हाला आंतरिक स्वातंत्र्य मिळत नाही, म्हणून अधिकाराचा, सत्तेचा फायदा आपण आपल्यासाठी करून घेत असतो.
आज आपण भौतिक ज्ञानाकडे अधिक लक्ष पुरवत आहोत. आजच्या स्पर्धात्मक जगात त्याची गरज आहे, पण आध्यात्मिक मूल्यांकडे लक्ष पुरवले नाही तर आपण पोकळ राहू, म्हणूनच ज्याला येशूचा खराखुरा अनुभव येतो तो स्वतःचा राहत नाही. येशू ख्रिस्त सर्वांसाठी आला होता. ‘अंत:ज्ञानाने’ झालेला येशूचा सेवक सर्वांचा सेवक बनतो. त्याला आंतरिक स्वातंत्र्य मिळते व त्या आंतरिक स्वातंत्र्यातून तो इतरांकडे वळतो.
येशू ख्रिस्ताने आपल्याला स्वर्ग-राज्याच्या किल्ल्या दिल्या आहेत म्हणजे भौतिक मूल्यांपलीकडे नेण्याचा अधिकार ख्रिस्ताने आम्हाला दिला आहे, ही जबाबदारी ख्रिस्ताने आम्हाला दिली आहे. ही जबाबदारी कठीण आहे पण ख्रिस्ताचा परमात्मा आपल्याबरोबर आहे असा विश्वास ठेवून आपल्या जीवनाला नवीन सुरूवात करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसादः हे प्रभो, आमच्या प्रार्थना स्विकारून घे.
१. आपले परमाचार्य पोप फ्रान्सिस, कार्डिनल्स, बिशप्स, धर्मगुरू, धर्मबंधू-भगिनी व सर्व प्रांपचिक त्यांच्या कार्याद्वारे आणि शुभसंदेशाने येशू ख्रिस्ताची खरी ओळख संपूर्ण जगाला मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आज आपण संत पिटर व संत पौल ह्यांचा सण साजरा करीत असताना, जे लोक मिशन भागात काम करीत आहेत त्यांची आपण विशेष आठवण करूया. त्यांना देवाची विशेष कृपा मिळावी व संत पिटर व पौल प्रमाणे त्यांची श्रध्दा बळकट होऊन त्यांनी इतरांचीही श्रध्दा बळकट करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करण्यासाठी आपल्या परिसरातील अनेक तरूण-तरूणींना पुढे येण्यास पवित्र आत्म्याची प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आपल्या धर्मग्रामात जे लोक असाध्य आजाराने पछाडलेले आहेत त्यांना परमेश्वरी कृपेचा अनुभव यावा आणि नवजीवनाची वाट त्यांना दिसावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आपण आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक गरजांसाठी प्रार्थना करूया.