Tuesday, 12 August 2014



Fr. Albert Pegado is a Capuchin Priest belonging to St. Bonaventure Province,Maharashtra. At present he is at Katta, serving as Assistant Novice Master.






सामान्य काळातील विसावा रविवार







दिनांक :१७/०८/२०१४.
पहिले वाचन: यशया ५६:६-७
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ११:१३-१५,२९-३२
शुभवर्तमान: मत्तय १५:२१-२८

प्रस्तावना:
आज देऊळमाता सामान्य काळातील विसावा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपणास देव-प्रेम व आपला विश्वास या विषयावर मनन-चिंतन करण्यास बोलावित आहे. पहिल्या वाचनात देव शब्बाथ दिवस पाळणा-यांना व त्याच्या आज्ञेत राहणा-यांना कसे देणग्यांनी भरत असतो ह्याविषयी सांगत आहे. दुस-या वाचनात संत पौल त्याच्या अधर्मी लोकांमधील मिशनकार्याविषयी सांगत आहे.
शुभवर्तमानात आपण एका कनानी बाईच्या विश्वासामुळे तिची इच्छापूर्ती कशी होते हे पाहतो. देवाच्या ठायी भेदभाव, जातीभेद व वर्णभेद नाही. ह्या पवित्र मिसाबलीदानामध्ये सह्भागी होत असताना आपण सुध्दा आपल्या जीवनात देवाचे प्रेम अनुभवावे व तेच प्रेम आपल्या शब्दाद्वारे व कृतीद्वारे सर्वत्र पसरावे म्हणून विशेष प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन:
देव सर्व देणग्यांचा दाता आहे. आपल्याला जे काही हवे आहे ते आपण मागण्याअगोदरच देव आपली गरज समजून त्या गोष्टी आपणाला पुरवीत असतो. तो आपला निर्माता आहे आणि आपण त्याची निर्मिती आहोत. निर्मितीच्या गरजा निर्मात्याला ठाऊक असतातच. हेच यशया संदेष्टा आपणाला सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे.

दुसरे वाचन:
जगात अजूनही प्रेम, शांती, जिव्हाळा वाढेल हेच प्रमुख ध्येय संत पौल आपल्या मिशन कार्यासाठी वापरीत आहे. प्रेम दिल्याने अजून प्रेम वाढते; दिल्याने मिळत असते. “केल्याने होत आहे आधी केलेची पाहिजे” हा महामंत्र आपण आपल्या मिशनकार्यात वापरला पाहिजे.

शुभवर्तमान:
१.    देवाने मानवाची निर्मिती त्याच्या प्रतिमेप्रमाणे केली. स्त्री आणि पुरुष अशी ती निर्माण केली. देवाने त्याच्या निर्मितीमध्ये कुठलाही भेदभाव किंवा वर्णभेद केला नाही. परंतु आज जर का आपणामध्ये वर्णभेद, जातीभेद किंवा लिंगभेद असेल तर तो केवळ आपल्या मनुष्यप्राण्यामुळेच आणि म्हणूनच त्या भेदभावाकरिता आपण देवाला कुठल्याही प्रकारे दोषी ठरवू नये.
देवाने त्याचे आपणा मानवावरील असलेले प्रेम दाखविण्यासाठी त्याने त्याचा एकुलता एक पुत्र आपल्या तारणासाठी क्रुसावर बळी अर्पण केला. परंतु आपण त्या देवपुत्राच्या त्यागाला विसरलो आहोत. त्याने क्रुसावर उच्चारलेल्या प्रेमाच्या आणि क्षमादानाच्या महामंत्राला आपण विसरलेलो आहोत.
देव प्रेम आहे परंतु प्रेम देव नाही. देवाठायी प्रेम आहे. परंतु ब-याचश्या वेळेला प्रेमाठायी देव असतोच असं नाही. म्हणून ब-याचश्या वेळेला प्रेम आणि देव ह्यांच्यामधील फरक न कळल्यामुळे आपण आपल्या जीवनात चूक करून बसत असतो. जर आपण खरोखर त्या जीवंत देवाची लेकरे असू तर त्याने शिकविलेल्या महामंत्राप्रमाणे आपण आपल्या जीवनात वागण्याचा प्रयत्न करू इतकेच नव्हे तर त्या प्रेमावर विसंबून आपल्या जीवनात त्याचे आचरण करू. जर तो आपला प्रेमळ परमेश्वर आहे आणि आपण त्याची निवडलेली प्रजा आहोत.
२.    शताधिपतीच्या चाकाराचा वृतांत आणि आजच्या शुभवर्तमानातील वृतांत यात अगदी निकटचे साम्य आहे (८:५-१३). हे दोन्ही वृतांत दूर अंतरावरून उच्चारलेल्या आरोग्य वचनाने विश्वासाप्रमाणे घडून आले आणि त्या विश्वासाची कसोटी पाहणारा वांशिक ताणतणात हे दोन्ही मुद्दे यात समान आहेत.
येशूजवळ आलेली स्त्री ही कनानी होती असे सांगून मत्तयने हा मुद्दा अधिक तीव्र केला आहे. जुन्या करारात कनानी लोक इस्र्यायलचे आरंभापासून शत्रू होते.
   ह्या वृतांतात येशूने तिला प्रथम उत्तर दिले नाही (मत्तय १५:२३), कारण आपले कार्य विशेषतः यहुद्यांसाठी आहे हे येशूने येथे स्पष्ट केले (मत्तय १५:२४). येशूच्या ह्या स्पष्टीकरणाद्वारे त्या स्त्रीच्या आशेला जागेला आशा उरली नव्हती, तरीसुद्धा त्या कनानी स्त्रीने चिकाटी सोडली नाही. तिने पुन्हा मदतीची याचना विश्वासाने केली. ह्या याचनेस्तवच तिला अधिक जिव्हारी लागणारे शब्द म्हणजेच पराराष्ट्रीयांची तुलना कुत्र्यांशी केलेली ऐकावी लागली. ही तिच्या विश्वासाची परिक्षा होती आणि तिचा विश्वास त्या कसोटीस पात्र ठरला. म्हणूनच वृतांताच्या शेवटी येशू ख्रिस्त म्हणतो, “बाई, तुमची श्रद्धा दांडगी आहे; तुमची इच्छा पुरी होवो!” (मत्तय १५:२८).

बोधकथा:
१. एकदा एक विमान, विमानतळावरून सुटले, काही ठराविक अंतरावर गेल्यावर त्या विमानाने वेग घेतला. काही काळाच्या प्रवासानंतर विमान आकाशात हेलकावे खाऊ लागले. काही वेळानंतर ते विमान आकाशात गटांगळ्या घालावयास लागले. वैमानिकाला इंजिनामधील बिघाड जाणवला व त्याने प्रवाश्यांना त्या विषयी कल्पना दिली. विमानाच्या इंजिनात बिघाड झाला आहे आणि ते विमान वैमानिकाच्या नियंत्रणा बाहेर गेले आहे. आता आपले विमान अपघाताने खाली कोसळणार तेव्हा आपले प्राण वाचावे म्हणून प्रत्येक व्यक्ती आप-आपल्या पद्धतीने प्रार्थना करू लागली. काही ख्रिस्ती व्यक्ती होत्या त्यांनी रोझरी करायला सुरवात केली.
अश्या परिस्थितीत असतानाच त्या सर्व लोकांनी पाहिले की, विमानातील छोटयाश्या मोकळ्या जागेत एक छोट बाळ खेळत होतं. विमान एवढे हेलकावे खात आहे तरी त्या मुलाला बिलकुल भय वाटत नव्हतं ह्याचं सर्वांना आश्चर्य आणि कुतुहूल वाटले. म्हणून एका व्यक्तीने त्या मुलाला जवळ बोलावून प्रश्न विचारला: विमान हालत आहे, विमान आता जमिनीवर पडणार आणि आपण मृत्युमुखी पडणार ह्याचे तुला भय वाटत नाही का? तेव्हा मुलगा उद्गारला: मला भिती मुळीच वाटत नाही. विमानाच्या इंजिनाला कितीही बिघाड झाला, तरी हे विमान खाली पडणारच नाही. कारण ह्या विमानाचे वैमानिक माझे वडील आहेत. ते मला कधीच इजा पोहचू देणार नाहीत. आपल्या वडिलांवर असलेल्या दांडग्या विश्वासामुळे तो विमानात आपतकालिन परिस्थितीत असताना देखील आनंदाने खेळत होता.

२. एकदा एक व्यक्ती आपल्या मुलीला घेऊन रस्त्याने जात होती. थोडा रस्ता पार केल्यावर रस्त्यामध्ये एक खडतर पुल लागला. तो पुल फार धोकादायक होता. पुल पार करणे म्हणजे जीवन मरणाशी झुंज परंतु तो पुल पार करणे त्यांना गरजेचेच होते. म्हणून वडील आपल्या मुलीला म्हणतात, बेटा, तू माझ्या हाताला घट्ट हात पकडून ठेव म्हणजे तू पडणार नाही. त्यावर मुलगी उद्गारली, माझ्यापेक्षा तुम्हीच माझा हात घट्ट पकडा.
वडिलांनी आश्चर्यचकित होऊन मुलीला विचारले, दोघांमधील फरक काय? मुलगी म्हणाली, ‘बाबा, मी जर तुमचा हात पकडला आणि संकट आले तर भिऊन मी तुमचा हात सोडून देईन. परंतु तुम्ही माझा जर हात पकडला तर कितीही संकटे आली तरी तुम्ही माझा पकडलेला हात सोडणार नाही ह्याची माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. हा माझा विश्वास आहे.’

मनन चिंतन:
विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा आणि न दिसणा-या गोष्टींबद्दलची खात्री आहे. मनुष्याला भक्तीचे आकर्षण अधिक आहे परंतु भक्तीचे जे दुसरे अंग आहे ‘कृती’ त्याचे आकर्षण मनुष्याला फार कमी आहे. याला प्रमुख कारण म्हणजे भक्तीमध्ये सुरक्षितता आहे तर कृतीमध्ये साहस व जोखीम आहे म्हणूनच बरीच माणसे कृतीपेक्षा भक्तीमध्ये आपलं मन रमवितात. भक्ती म्हणजे सुरक्षितता व कृती म्हणजे धोका. खर म्हणजे कृती करण्यासाठी साहस याव म्हणून आपण भक्ती करतो परंतु मनुष्याची उडी भक्तीकडून कृतीकडे पडत नाही ही वास्तुस्थिती नाकारता येत नाही.
विश्वास आपणास हेच शिकवित आहे. आपण विश्वास ठेवतो तो फक्त विश्वासू व्यक्तीवर ज्यांच्याकडून आपल्या गरजा पु-या होतील अशा व्यक्तींवर आणि जर त्या गरजा आपल्या पूर्ण झाल्या तर आपण त्या व्यक्तीला विश्वासू म्हणतो. आपला सर्वांचा विश्वासू व्यक्ती सर्वसमर्थ देव आहे कारण तो आपण मागण्याअगोदरच आपल्या गरजा पुरवित असतो. कारण तो आपला कर्ताकरविता देव आणि उत्पन्नकर्ता आहे परंतु त्याला आपण देखील विश्वासू असले पाहिजे. आपल्या जीवनात आपण जे काही मिळविले आहे, कमाविलेले आहे हे सर्व त्याच्यावरील विश्वासामुळेच. हाच दांडगा विश्वास त्या कनानी बाईमध्ये ख्रिस्ताने पाहिला आणि तिच्या विश्वासामुळेच तिची मुलगी बरी झाली. आपल्यामध्ये देवावरील असलेला विश्वास अधिकाधिक वाढवा व आपल्या विश्वासाद्वारे आपण दूर गेलेल्या लोकांना देवाच्या व ख्रिस्तसभेच्या अधिकाधिक जवळ आणावं व देवाच्या व ख्रिस्ताच्या प्रेमात आणि विश्वासात वाढण्यात मदत करावी म्हणून ह्या मिस्सामध्ये प्रार्थना करू या.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभू, आमचा विश्वास वाढव.
  1. ख्रिस्तसभेसाठी- हे प्रेमळ पित्या, आमचे पोप, कार्डीनल्स आणि बिशप्स, धर्मगुरू आणि धर्मभगिनी ह्यांना तुझ्या प्रेमात आणि विश्वासाने भर ज्याद्वारे त्यांच्या हातून अखिल ख्रिस्तसभेची सेवा चांगल्या प्रकारे होईल.
  2. प्रभू-परमेश्वरा, ज्या ख्रिस्ती कुटुंबामध्ये तुझ्यावरील विश्वास कमी होत चालला आहे. तू आमचा दाता आणि करविता आहे हे मानण्यास कमी पडत आहेत त्यांना तू आशीर्वादित कर आणि तुझ्या विश्वासात आणि प्रेमात दृढ कर.
  3. इराकमधील आपल्या ख्रिस्ती बांधवांवर अत्याचार होत आहेत व ते दडपणाखाली आहेत. त्यांना योग्य ते संरक्षण मिळावे व आपला धर्म त्यांना स्वतंत्रपणे पाळता यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
  4. सर्व आजारी लोक विशेष करून ज्या व्यक्तींना दुर्दम्य आजाराने पछाडलेले आहेत त्यांना तुझी आरोग्यदायी कृपा आणि सामर्थ्य लाभावे आणि त्यांच्या जीवनात प्रेम आणि आनंद पसरावा म्हणून प्रार्थना करूया.
  5. आपण आपल्या वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया.       











Tuesday, 5 August 2014

Reflections For Homily by: Botham Patil.






सामान्य काळातील एकोणीसावा रविवार (वियानी संडे)


दिनांक: १०/०८/२०१४
पहिले वाचन: १ राजे: १९:९, ११-१३
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र: ९:१-५
शुभवर्तमान: मत्तय: १४: २२-३३

“धीर धरा, मी आहे; भिऊ नका”
प्रस्तावना:
ख्रिस्ताठायी जमलेल्या प्रिय भाविकांनो, आज ख्रिस्तसभा सामान्य काळातील एकोणीसावा रविवार तसेच ‘वियानी संडे’ साजरा करीत आहे. ख्रिस्तसभा आपणाला आज आपली भिती नाहीशी करून आपला विश्वास बळकट करण्यासाठी व परमेश्वराच्या सामर्थ्यावर अवलंबून राहण्यासाठी आमंत्रण देत आहे.
आजचे पहिले वाचन राजे च्या पहिल्या पुस्तकातून घेतले आहे. येथे मानवी स्वभाव असलेला एलिया भितीमुळे कसा पळून जातो व देव त्यास दर्शन देऊन पुन्हा त्याच्या जबाबदारीची आठवण करून देऊन त्याला पुन्हा कसा कामगिरीवर पाठवतो ह्याचे वर्णन केले आहे. तर दुस-या वाचनात यहुदी लोकांनी येशूला देवाचा पुत्र म्हणून न स्विकारल्याबद्दल होणारे दु:ख संत पौलाने रोमकरांस पत्र ह्यामध्ये व्यक्त केले आहे. शुभवार्तामानामध्ये येशू कश्याप्रकारे पाण्यावरून चालतो व गरजेत असलेल्या आपल्या शिष्यांस सहाय्य करून त्यांचा विश्वास वाढवतो हे मत्तयने उत्तमरित्या आपल्या समोर मांडले आहे.
आजच्या ह्या मिस्साबलीत सहभागी होत असताना प्रार्थना करूया की हे परमेश्वरा आमची भिती नाहीशी कर व आमचा तुझ्यावरील विश्वास दृढ कर. तसेच आज सर्व धर्मगुरुंसाठी परमेश्वराकडे विनवणी करूया की हे परमेश्वरा त्यांना चांगले आरोग्य दे, येणा-या सर्व संकटांना सामोरे जाण्यास शक्ती व कृपा दे व हे समर्पित जीवन त्यांनी प्रभूची व लोकांची सेवा करण्यात घालवावे, ह्यासाठी त्यांच्यावर आशीर्वाद यावा म्हणून ह्या मिस्साबलीदानात विशेष प्रार्थना करूया.
    
सम्यक विवरण:
पहिले वाचन: १ राजे: १९:९, ११-१३
एलिया प्रवक्ता ईजबेलीच्या भितीमुळे पळून जातो व रानात जाऊन पोहचतो. तेथे प्रभूचा दूत त्याला भाकरीने व पाण्याने तृप्त करतो व चाळीस दिवस व चाळीस रात्रींचा प्रवास करावयास सांगतो. ह्या खडतर प्रवासानंतर एलिया परमेश्वराचा डोंगर होरेब येथे पोहचला. येथे पर्वतावर एलियाच्या परमेश्वराबरोबर झालेल्या भेटीमध्ये दोन समांतर कृती आपणासमोर येतात:
१.      परमेश्वराचा प्रश्न – एलियाची तक्रार
२.      परमेश्वराची आज्ञा – एलियाची संमती
परमेश्वर एलियाला येथे काय करतोस ह्याचा जाब विचारतो. हे सूचित करते की एलिया इथे नसून इसरायलमध्ये हजर असायला हवा होता. परंतु एलिया प्रभूच्या प्रश्नाला सरळ उत्तर न देता लोकांविषयी परमेश्वरासमोर तक्रार मांडतो. त्याची ही ग्वाही ‘आपण प्रवक्ता नसून एक सर्वसामान्य माणूस’ असल्याचे दर्शविते, परंतु परमेश्वर पुन्हा एकदा त्याची जबाबदारी त्याच्यावर सोपविण्यासाठी त्याला आपणासमोर (परमेश्वरासमोर) उभे राहण्यास सांगतो. तद्नंतर पारंपारिक घडणा-या गोष्टीनुसार (धरणीकंप, वारा, अग्नी) देवाचा साक्षात्कार होतो (निर्गम ३:२, १९:१६-१९), परंतु ह्यावेळी परमेश्वर त्यात नव्हता तर शांत आणि मंद वाणीमध्ये परमेश्वर एलीयाबरोबर बोलला आणि लागलेच एलियाने मोशेने झाकलेल्याप्रमाणे आपले तोंड झाकून घेतले (निर्गम ३३:१८-२३).
  
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र: ९:१-५
निवडलेल्या लोकांनी म्हणजेच इसरायली वंशाने येशूला न स्वीकारल्याने होणारे दु:ख संत पौल येथे व्यक्त करीत आहे. इसरायली लोकांना ख्रिस्ताकडे वळविण्यासाठी जरी त्याला परमेश्वराकडून हद्दपारी स्वीकारावी लागली, तरी तो ह्यासाठी तयार आहे. त्याचे हे दु:ख भावनात्मक किंवा कारुण्यपूर्ण आहे, कारण इसरायली जनता परमेश्वराने निवडलेली व विशेषाधिकार असलेली जनता आहे ह्याचे त्याला भान होते; त्याला झालेला मनस्ताप व्यक्त करताना तो मोशेने केल्याप्रमाणे प्रार्थना करीत आहे (निर्गम ३२:३२).
तुम्ही विशेष अशी निवडलेली देवाची मुले आहात ह्याची आठवण करून देतो (अनुवाद १४:१). देव तुमचा उत्पन्नकर्ता (अनुवाद ३२:६) व तुम्ही त्याची मुले (निर्गम ४:२२) व विशेष प्रकारचा करार केलेले नाते (उत्पत्ती १५:१८) असे असून तुम्ही परमेश्वराचा पुत्र ‘येशू ख्रिस्त’ ह्याला नाकारल्याचे व त्याला ख्रिस्त म्हणून न स्वीकारल्याचे दु:ख व्यक्त करत आहे.
    
शुभवर्तमान: मत्तय: १४: २२-३३
मत्तयमधील १४:२२-३३ हा येशूचा समुद्राच्या पाण्यावरून चालण्याचा उतारा मार्क ६:४५-५२ व योहान ६:१५-२१ मध्ये देखील सापडतो. मत्तयच्या शुभवर्तमानातील १४:२२ म्हणते, ‘येशूने लागलेच शिष्यांस लावून दिले’, हे वाचताना दृश्य काही विचित्रच वाटते, पण जर का योहानलिखीत शुभवर्तमानात दृष्टी टाकली, तर हे येशूने का म्हणून केले ह्याची जाण होते. जेव्हा येशूने पाच हजार लोकांना जेवणाने तृप्त केले तेव्हा लोक बळजबरीने येऊन येशूला आपला राजा करण्याच्या बेतात होते (योहान ६:१५), आणि अश्या ह्या गंभीर परिस्थितीत शिष्यांनी सर्व गोधळ करून लोकांच्या इच्छेला होकार दिला असता कारण ते देखील येशूच्या पृथ्वीतलावरील सत्तेची आतुरतेने वाट पाहत होते, म्हणून येशू त्यांस तारवांत बसून दुसरीकडे जाण्यास लावून देतो आणि ही परिस्थिती स्वतःच सांभाळून नंतर प्रार्थना करावयास डोंगरावर एकांती जातो. येशू ख्रिस्त जरी संपूर्ण दिवस देवाच्या राज्याची घोषणा करत व चमत्कार करत गावोगावी फिरत असला तरीदेखील तो रात्रीच्या वेळी किंवा भेटेल त्या वेळेस आपल्या पित्याबरोबर एकांतात बोलण्याची किंवा प्रार्थना करण्याची संधी घालवत नसे (मार्क १:३५; मत्तय १४:२३, २६:३६-५६; लूक ५:१६, ६:१२, २२:४१-४४).
एकीकडे संपूर्ण रात्रभर येशू आपल्या पित्याबरोबर प्रार्थनेत होता तर दुसरीकडे त्याचे शिष्य बोटीमध्ये समुद्रात उठाणा-या मोठमोठ्या लाटांनी हैराण झाले होते. अश्यावेळी येशू रात्रीच्या चौथ्या प्रहरी समुद्रावरून चालत त्यांच्याकडे येतो. प्राचीन काळात किंवा पुरातन काळात रात्र चार भागांमध्ये वाटली गेली होती: संध्याकाळचे ६ ते ९, ९ ते मध्यरात्रीचे १२, १२ ते सकाळचे ३ व ३ ते ६. येशू चौथ्या प्रहरी म्हणजेच सकाळचे ३ आणि ६ वाजल्यांच्या आत त्यांच्याजवळ येतो. शिष्य मरणाच्या भितीत असतानाच येशू त्यांच्याजवळ येतो परंतु ते येशूला न ओळखता ‘भूत’ आहे म्हणून अधिकच भयभीत होतात. भितीमुळे येशूने वादळ शांत केलेला चमत्कार (मत्तय ८:२३-२६) ह्याचादेखील त्यांना विसर पडतो परंतु येशू त्यांना सहारा देत म्हणतो, “धीर धरा, मी आहे, भिऊ नका” (मत्तय १४:२७) असे म्हणून येशू अप्रत्यक्षरित्या निर्गमच्या पुस्तकात ३:१४ मध्ये “मी आहे” असे परमेश्वराने मोशेला वापरलेल्या शब्दांची पुनरावृत्ती करतो, ह्याचा अर्थ असा की ‘परमेश्वर तुमच्या बरोबर आहे, तुम्ही भिऊ नका’.
येशूचे हे उद्गार संपता-न-संपताच पेत्राने लागलेच विचारले, ‘प्रभुजी, आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा’ (मत्तय ४:२८). हे बोलणे काही पेत्रासाठी नवीन नव्हते. शुभवर्तमानामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी उदाहरणार्थ मत्तय १६:१६, १७:२४-२७, २६:३३-३५, योहान ६:६८ आणि अनेक अश्या ठिकाणी पेत्र शिष्यांच्या वतीने येशूबरोबर किंवा इतरांबरोबर बोलत असे. येथेदेखील तेच कृत्य पेत्र पुन्हा एकदा करतो. येशू त्याला नाही म्हणत नाही तर ह्या अनैसर्गिक कृत्यात सामील होण्यास आवाहन किंवा पाचारण करतो परंतु थोडा वेळ चालल्यानंतर त्याच्या अविश्वासामुळे व भितीमुळे तो पाण्यात पडून बुडू लागला. येशूने त्याला पाण्यात बुडू दिले नाही तर आपला हात पुढे करून त्याला वाचविले आणि त्याचा व शिष्यांचा अल्पविश्वास दूर करून विश्वास दृढ केला व लागलेच शिष्य त्याच्या पाया पडून ‘आपण खरोखर देवाचे पुत्र आहात’ म्हणून त्याची आराधना करू लागले.   
       
बोधकथा:
१.    मॅक्सी नावाचा गृहस्त विक्रेता म्हणून एका पुस्तकाच्या कंपनीत कामाला लागला. त्याला आपल्या ह्या कामाची पुरेपूर जाणीव होती परंतु आटोकाट प्रयत्न करूनदेखील तो पुस्तकांचा जास्त खप करू शकत नव्हता. जसे दिवस सरकले, तसतसा पुस्तकांचा खप न झाल्यामुळे त्याची भीती वाढत गेली. एके दिवशी तर मॅनेजरने त्याला दम भरला की जर तू अपेक्षेइतकी पुस्तके विकली नाहीस तर तुला नोकरीवरून काढण्यात येईल. त्याची पत्नीदेखील त्याच्याकडे तक्रार करू लागली की ‘ती पैश्याअभावी कुटुंब चालवू शकत नाही व पदरी असलेल्या मुलांची काळजी घेऊ शकत नाही’.
एके दिवशी ह्याच विक्रीच्या कामासाठी मॅक्सी बाहेर गेला असताना त्याच्याकडे हॉटेलचे बिल भरण्यासाठी व घरी परतण्यासाठी काहीच पैसे नव्हते. अश्यावेळी हॉटेलच्या खोलीत संकटाच्या अंधारात गुरफटलेला असताना व कोणाचीच साथ नसल्यामुळे तो सरतेशेवटी प्रभूकडे फिरला. त्याने प्रार्थना करावयास सुरवात केली. प्रभूने त्याला समज, मार्गदर्शन व सहाय्य द्यावे म्हणून त्याने प्रार्थना केली. त्याच क्षणी खोलीच्या एका फळीवर असलेल्या पवित्र शास्त्रावर त्याची नजर पडली, त्याने ते उघडून परमेश्वराकडे कळकळीने प्रार्थना करावयास सुरवात केली. पवित्र शास्त्र वाचत असताना प्रभू येशूच्या मत्तयलिखीत शुभवर्तमानातील खालील शब्दांवर त्याची नजर पडली, “ह्यास्तव, काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणून चिंता करत बसू नका. कारण ही सर्व मिळवण्याची धडपड परराष्ट्रींय लोक करीत असतात. तुम्हांला ह्या सर्व गोष्टींची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्यास झटा म्हणजे त्याच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हांला मिळतील” (मत्तय ६:३१-३३).  
ह्या शब्दांवर त्याने सखोल मनन-चिंतन केले व कळकळीची प्रार्थना केली आणि काय चमत्कार!!! त्याच्या सर्व चिंता दूर झाल्या, त्याच्या मनावरचे दडपण कमी झाल्याचे त्याने अनुभवले, त्याची भीती नाहीशी होऊन त्याला हिंमत मिळाली कारण त्या क्षणी प्रभू आपल्याबरोबर आहे ह्यावर त्याने विश्वास ठेवला व त्याचा त्याने अनुभव घेतला. त्या रात्री त्याला कित्तेक दिवसानंतर निवांत झोप लागली. दुस-या दिवशी सकाळी लवकर उठून व चांगले कपडे करून तो पुस्तकांची विक्री करण्यास दारोदारी फिरला आणि काय आश्चर्य जी पुस्तके तो कित्येक आठवड्यात विकू शकला नव्हता ती त्याने काही दिवसात विकून टाकली.
२.    एकदा एक जोडपे आपल्या तीन महिन्यांच्या नवजात बाळाला घेऊन सणासाठी जात होते. तेथे पोहचण्यासाठी त्यांना तरीतून (बोटीतून) जावे लागे. सणाला जाण्यासाठी लोकांची अफाट गर्दी होती आणि ह्याच गर्दीत ह्या जोडप्यालादेखील बोटीच्या कडेला जागा मिळाली. बोट एकीकडून दुसरीकडे जात असताना गर्दीमुळे त्या बाळाच्या वडिलांना जोराचा धक्का बसला व आपल्या बाळाबरोबर तो पाण्यात पडला. हे बघून त्याच्या बायकोने जोरजोरात रडणे सुरु केले. तेवढ्यात बाजूच्या सर्व लोकांनी तिला धीर देत म्हटले, “भिऊ नकोस, परमेश्वर आपल्या बरोबर आहे, त्या दोघांना काहीच होणार नाही”, आणि लागलेच त्यांनी बोटीवरील दोर फेकून त्या दोघांना वर खेचले व दोघांचे प्राण वाचवले. (टीप: माझ्या स्वतःच्या जीवनात घडलेली ही सत्य घटना आहे). 
       
मनन चिंतन:
आपण शुभवर्तमानात वाचले की ‘येशूने शिष्यांना मचव्यात बसून सरोवरापलीकडे पुढे जायला लावून दिले’, हे करण्यामागे येशूचा काहीतरी हेतू होता. तो जाणून होता की त्याचे शिष्य मोठ्या संकटाला सामोरे जाणार आहेत आणि म्हणूनच ह्या संकटातून त्यांना मुक्त करण्यासाठी व त्यांची त्याच्यावरील श्रद्धा बळकट करण्यासाठी त्यांना पाठवून येशू एकांकी प्रार्थनेसाठी जातो आणि जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा तो त्यांच्याजवळ पाण्यावरून चालत येतो व त्याने बेत केल्याप्रमाणे दोन्ही गोष्टींची पूर्तता करतो; त्यांचे जीव घेणा-या लाटांपासून प्राण वाचवतो व त्यांचा अविश्वास घालवून देतो. म्हणूनच जे येशूला ‘भूत’ म्हणत होते तेच काही क्षणातच त्याला ‘देवाचा पुत्र’ म्हणून संबोधितात.
 आपल्या जीवनाच्या प्रवासातदेखील वादळी वारे सुटतात, त्यांना तोंड देणे आपले कर्तव्य असते कारण आपण त्या प्रसंगापासून पळ काढू शकत नाही. कधी-कधी आपण होतील ते प्रयत्न करतो परंतु परमेश्वराचा विचार करीत नाही. स्वतःच्या बळावर सर्व संकटे, दु:खे आपण दूर करण्याचा प्रयत्न करतो आणि जर का ते नाहीच झाले तर असह्य अवस्थेत सरतेशेवटी देवाकडे धाव घेतो. मग लागलेच देव म्हणतो, “धीर धरा, मी आहे, भिऊ नका”, हा देव आपल्या अंतकरणाच्या गाभ्यात आहे, देव आपल्यापासून दूर नाही तर आपण देवापासून दूर आहोत; परंतु तो आपल्याला कधीच नाकारत नाही. जेव्हा-जेव्हा आपण त्याला हाक देतो तेव्हा-तेव्हा तो आपल्या मदतीसाठी तयार असतो.
 एखादं छोट मुल आपण जेव्हा हवेत पुन्हा-पुन्हा उडवून त्याला पकडतो तेव्हा त्या बाळाच्या चेह-यावरील हावभाव काय असतात? ते आनंदी असतं कारण जो उडवतं आहे तो/ती आपणाला पुन्हा पकडेल व खाली पडू देणार नाही हा त्याचा विश्वास असतो परंतु ज्या मुलाच्या अंगी हा विश्वास नसतो तो लागलेच रडायला लागतो व त्या कृतीचा तो आनंद घेत नाही. सर्कसमध्ये आपण बघतो की जे एका दोरीवरून दुस-या दोरीवर उडी मारतात त्यांचा एकमेकांवर विश्वास असतो म्हणूनच ते हिमतीने व कुठलीही भिती अंगी न बाळगता एकीकडून दुसरीकडे उडी घेतात व लोकांच मनोरंजन करतात. ह्या दोन उदाहरणांमध्ये एकच गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे ‘श्रद्धा’ किंवा ‘विश्वास’. आपला विश्वास जेव्हा बळकट असतो तेव्हा आपल्या अंगी असलेली सर्व भिती नाहीशी होते कारण प्रभू आपल्याबरोबर असल्याची आपणाला जाण असते.
कधी-कधी आपल्या जीवनाच्या प्रवासात परमेश्वर आपणाला, पेत्राला विचारल्याप्रमाणे “पाण्यावरून चालून” त्याच्याकडे येण्यासाठी सांगत असतो. ही गोष्ट कठीण असल्याकारणाने आपण बुडण्याच्या भितीने डळमळतो. परंतु लागलेच मायेने भरलेला प्रभूचा हात आपणाला वाचवण्यासाठी आपणापर्यंत पोहचतो कारण ‘ज्या प्रभूने आपणाला पाण्यावरून चालण्यासाठी बोलावले आहे, तोच प्रभू आपणाला पाण्यात बुडू देईल का?’ तो माझ्यासाठी नेहमी थांबलेला असतो, तो दररोजच्या छोट्या-छोट्या प्रसंगामध्ये हजर असतो, त्याला फक्त ओळखण्यासाठी आपण कमी पडतो. ज्याप्रमाणे क्रिकेटर किंवा फुटबॉलपटू चेंडूवरून डोळे सरकवतो व त्याचा नाश होतो, त्याचप्रमाणे आपण देखील जर आपली दृष्टी त्याच्यावरून हटवली तर आपला नाश होणे अटल आहे. आजच्या ह्या दिवशी प्रभूकडे विशेष कृपा मागूया की हे प्रभो आमची भिती दूर कर व तू आमच्याबरोबर नेहमी आहेस हा आमचा विश्वास बळकट कर, आमेन.   
   
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: ‘प्रभो, आमच्या प्रार्थनेचा स्वीकार कर.
१. ह्या महिन्यातील जे काही पोप महाशयांचे हेतू आहेत ते पूर्ण व्हावेत तसेच धार्मिक कारभार पाहणा-या सर्व धार्मिक पुढा-यांना प्रभूचे बळ, त्यांच्यात असलेली सर्व भिती नष्ट व्हावी व त्यांचा विश्वास बळकट होऊन त्यांनी इतरांना देखील त्यांचा विश्वास वाढवण्यास मदत करावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
२. आज ख्रिस्तसभा वियानी संडे साजरा करीत आहे. धर्मगुरूंचा आश्रयदाता संत जॉन मारी वियानी ह्यांच्या मध्यस्थीद्वारे आज आपण सर्व धर्मगुरूंसाठी विशेष प्रार्थना करू या, हे परमेश्वरा त्यांना चांगले आरोग्य दे, सर्व संकटापासून त्यांचे संरक्षण कर व त्यांनी संत वियानीसारखे पावित्र्याचे जीवन जगून इतरांना देखील पवित्र्यात जगण्यास मार्गदर्शन करावे ह्यासाठी त्यांना तुझी कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३.  जे लोक निर्वासित आहेत, राजकीय वादांवरून होणा-या वाईट दुष्परिणामानमुळे ज्यांना शरणार्थी जावे लागत आहे, अश्या लोकांना दानशूर व्यक्तींनी होईल ती मदत करावी व जगण्यासाठी त्यांना सहारा द्यावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
४. जगात अशांतता पसरलेली आहे. युद्ध, मारामा-या, आतंकवाद दिवसेंदिवस वाढत आहे. हे शांतीच्या राजा आमच्या प्रत्येकाच्या जीवनात व कुटुंबात आम्हास शांतीचे दान दे व ह्याच दानाद्वारे आमच्या समाजात, देशात व संपूर्ण विश्वात शांती आणण्यास आम्हास मदत व तुझे बळ मिळावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
५. आपल्या वैयक्तिक व सामाजिक हेतूंसाठी आपण प्रार्थना करूया.


Wednesday, 30 July 2014











सामान्य काळातील अठरावा रविवार

पहिले वाचन: यशया ५५:१-३

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:३५, ३७-३९

शुभवर्तमान: मत्तय १४:१३-२१


“आमच्याजवळ केवळ पाच भाकरी आणि दोन मासे आहेत.”

प्रस्तावना:
प्रिय भाविकांनो आज आपण सामान्यकाळातील अठरावा रविवार साजरा करीत असताना आजची उपासना आपणास स्वर्गीय मेजवानीसाठी आमंत्रण देत आहे. आजच्या पहिल्या वाचनाद्वारे यशया संदेष्टा ह्याच मेजवानीचे आमंत्रण देत असताना म्हणतो की, ‘माझे लक्षपुर्वक ऐका आणि उत्तम ते खा, तुमचा जीव पौष्टिक पदार्थांचे सेवन करून संतुष्ट होवो’. तर आजच्या दुस-या वाचनात संत पौल, ह्या जगातील कोणतीही दृश्य वा अदृश्य शक्ती आपल्याला देवाच्या प्रेमापासून विभक्त करू शकत नाही असे आपणास सांगत आहे.
यशयाने केलेल्या घोषणेची पूर्तता येशूद्वारे आजच्या शुभवर्तमानामध्ये होताना आपण पाहतो. आजच्या पवित्र मिस्साबलीदानात सहभागी होत असताना आपण आपल्या सर्व इच्छा, आकांक्षा आणि गरजा सर्व सामर्थ्यशाली प्रभूकडे विश्वासाने समर्पित करूया व त्याने दिलेल्या आमंत्रणाला होकार देऊन त्याच्या सार्वकालिक मेजवानीत सहभागी होऊया.
 
सम्यक विवरण:

पहिले वाचन: यशया ५५:१-३
यशया संदेष्टा ह्या अध्यायात लोकांना भव्य पंचपक्वान्नांच्या मेजवानीसाठी आमंत्रण देत आहे, ह्या शब्दांनी यशया जे इस्रायली लोक बंदिवासात होते त्यांना दिलासा देत परमेश्वरामध्ये आनंदोस्तव करण्यासाठी बोलावत आहे कारण तोच त्यांच्या गरजा भागवून त्यांना त्यांच्या होणा-या दु:खातून व वेदनांतून सोडवू शकतो.
हे आमंत्रण गरीब आणि श्रीमंत ह्या सर्वांसाठी आहे. ‘या’, ‘घ्या’ आणि ‘खा’ हे परमेश्वराचे स्वर्गीय भोजनासाठी आमंत्रण करण्यासाठी वापरलेले शब्द आहेत. परमेश्वर त्यांना ‘अन्न’ आणि ‘पाणी’ ह्या मुलभूत गरजांचाच पुरवठा न करता ‘दूध’ आणि ‘द्राक्षरस’ ह्या पदार्थांचे देखील विनामुल्य आनंद घेण्यास बोलावत आहे.

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:३५, ३७-३९
वचन ३५-३९ ख्रिस्ताचे आमच्यावर असलेल्या प्रीतीचे वर्णन करतो. ह्या प्रितीपासून आम्हांला कोणीही वेगळे करू शकत नाही. पृथ्वीवरील कोणत्याही संकटाला अगर आपत्तीला हे करणे शक्य नाही, कारण ज्याने आपणावर प्रीती केली आहे त्याच्यायोगे ह्या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो. तसेच देवाच्या प्रितीपासून आम्हांला विभक्त करणे कोणत्याही आत्मिक शक्तीला शक्य नाही (देवदूत, अधिपती ८:३८).

शुभवर्तमान: मत्तय १४:१३-२१
येशूने एकांतात जाण्याचा प्रयत्न केला हे आपण तेराव्या ओवीत वाचतो परंतु येशू आतापर्यंत खूप लोकप्रिय झाला असल्यामुळे असे कोणाला न समजता एकांतात जाणे अशक्य होते. लोकांचे त्याच्या मागे येणे व येशूने पाच हजार हजारांना जेवू घालणे हे येशूच्या दैविपनाचे व त्याच्या आपल्यावर असलेल्या आपलुकीचे चिन्ह आहे.

काही अडचणीवर मात करण्यास देवाच्या मध्यस्तीची गरज असते.
येशूच्या शिष्यांना कल्पना होती की लोक भुकेले आहेत व लोकांची भूक भागवण्याची त्यांना चिंता होती परंतु लोकांची भूक कशी भागवायची ह्या अडचणीवर त्यांनी एकदम साधा मार्ग निवडला आणि तो म्हणजे लोकांना शेजारच्या गावात पाठवून स्वत:साठी अन्न विकत घेण्यास सांगणे. कधी कधी देव आपल्यासाठी काय करू शकतो ह्याची आपल्याला पूर्ण कल्पना नसते. त्या निर्जन जागेत पाच हजारांना जेवू घालणे तसे अशक्यच होते परंतु लोकांची भूक भागवण्यासाठी देवाने या अगोदर मोशे, एलिया व एलीशाचा वापर केला होताच.
     ज्या जागेत सर्व लोक जमले होते त्याचा शेजारी काही गावं होती परंतु ती खूप छोटी गावं होती. ह्या छोट्या गावांना एवढ्या मोठ्या जनसमुदायाची गरज भागवणे जवळ जवळ अशक्य होते. अश्या परिस्थितीत आपल्याला एलीशाच्या शिष्यांनी विचारलेला प्रश्न व त्यावर त्यांना मिळालेल्या उत्तराची आठवण येते.
“शंभर लोकांना हे कसे काय वाढायचे?...लोकांना वाढ तर खरं! प्रभू म्हणतो ते खाऊन देखील काही उरेल!” (२ राजे ४:४३).“एलीयाद्वारे प्रभूने दिलेल्या संदेशानुसार तेचे पीठाचे गाडगे रिकामे झाले नाही किंवा तेलाची बुधली रिकामी पडली नाही”(१राजे १७:१६). येशूचे व एलीयाच्या शिष्यांना आपपल्या गुरूंकडे किती दैवी शक्ती आहे व ते त्या दैवी शक्तीने काय करू शकतात ह्याची कल्पना होतीच व ह्यावेळी इस्रायेलचा देव ज्याने समुद्राचे पाणी दुभंगून त्यात कोरडी जमीन तयार केली(निर्गम १४:२१, २राजे २:८), स्वर्गातून खाण्यास मान्ना दिला (निर्गम १६:१४-१८) तोच देव परत एकदा आपल्या प्रजेसाठी चमत्कार करण्यास तयार झाला होता.

बहुतेकदा प्रभू आपल्याजवळ जे आहे त्यापासून सुरवात करतो.
प्रभू आपल्याजवळ जे आहे ते घेऊन अनेक पटीने वाढवतो हे आपण आजच्या शुभवर्तमानातील १६-१९ व्या ओवीत पाहतो तर जेव्हा देवाने मोशेला यहुदी प्रजेकडे पाठवायचे ठरवले तेव्हा मोशेने देवाकडून त्याच्या प्रजेला दाखवण्यासाठी चिन्ह मागितले अश्यावेळी त्या वेळेला जी काठी मोशेच्या हातात होती त्याच काठीचे रुपांतर देवाने त्याच्या चिन्हात केले हे आपण निर्गमच्या पुस्तकात चौथ्या अध्यायातील एक ते तीन ह्या ओव्यांमध्ये पाहतो. त्याच काठीचा वापर पुढे समुद्राच्या पाण्याचे दोन भाग करण्यास वापर करण्यात आला.(निर्गम१४:१६). जेव्हा एका विधवा बाईने एलीशाकडे मदत मागितली तेव्हा एलीशाने तिला विचारले की ‘तुझ्या घरात काय आहे?’ व तिने उत्तर दिले “फक्त एका भांड्यात तेल आहे’ तेव्हा एलीशाने तिला आपल्या शेजाऱ्यांकडून रिकामी भांडी उसनी म्हणून आणायला सांगितली आणि ते सर्व भांडी भरेपर्यंत तेलाची पटीने वाढ केली.(२राजे ४:१-७).
येशूने भाकरी व मासे पटीने वाढवण्यासाठी प्रार्थना केली नाही कारण त्याचा पूर्ण विश्वास होता की असलेले जेवण पटीने वाढवून जनसमुदायाची भूक भागवणे हीच पित्याची इच्छा आहे. त्याने त्या भाकरी व मासे घेऊन भोजनागोदर फक्त आपल्या पित्याचे आभार मानले कारण यहुदी लोकांत जेवणा अगोदर देवाचे आभार मानण्याची प्रथा होती.

बोध कथा
एका देवाभिरू ख्रिस्ती कुटुंबात दररोज संध्याकाळी प्रार्थना होत असे व त्यांच्या प्रथेनुसार प्रार्थनेच्या वेळेला कुटुंबातील एक व्यक्ती पवित्र बायबल मधील छोटासा उतारा वाचत व त्यावर थोडे मनन-चिंतन करून छोटासा उपदेश देत. त्या ठराविक दिवशी त्या कुटुंबातील जॉनी नावाच्या ८ वर्षाच्या छोट्या मुलाची बायबल मधील उतारा वाचून त्यावर उपदेश करण्याची पाळी होती. त्या दिवशी त्याने मत्तयच्या शुभवर्तमानातील १४वा अध्याय १३-२१ ‘येशूचे पाच हजारांना भोजन’ हा उतारा वाचला. तो उतारा हळुवारपणे वाचत असताना कुटुंबातील सर्वजण विचार करीत होते की येशूच्या ह्या चमत्काराविषयी हा छोटा जॉनीआमाला काय उपदेश देणार?
उतारा वाचून झाल्यानंतर थोडा वेळ शांत राहून जॉनीने उपदेशास सुरवात केली. “येशूकडे पोहोचेपर्यंत त्या पाच भाकरी व दोन मासे तसेच राहिले परंतु जेव्हा त्या भाकरी व मासे येशूकडे पोहचल्या तेव्हाच त्यांची अधिक पटीने वाढ होऊ लागली. त्याचप्रकारे आपल्याकडे जे काही आहे ते आपण देवाच्या हाती सोपविले पाहिजे. ते कितीही साधे अथवा छोटे असले तरी एकदा का ते देवाच्या हाती पोहचले की ते अनेक पटीने वाढण्यास सुरवात होते व इथेच खऱ्या चमत्काराला सुरवात होते.” त्या छोट्या जॉनीचा हा उपदेश ऐकून सर्वांना कुतूहल वाटले व त्यांनी ह्या उपदेशाबद्दल त्याचे अभिनंदन केले.

मनन चिंतन
शुभवर्तमानात आपण पाहतो की, येशूच्या शिष्यांना लोकांची काळजी आहे. प्रभू येशुलासुद्धा लोकांची काळजी आहे. लोकांनी आपआपली गरज भागवावी अशी शिष्यांची  इच्छा आहे. त्यांनी स्वतः आपले जेवण विकत घ्यावे असे शिष्यांना वाटते. त्यांच्यापुढे केवळ आकडेवारी आहे. पाच हजार लोकांना जेऊ कसे घालायचे? हा त्यांना भार करतो. पण येशू निराळ्या तऱ्हेने पाहतो. लोकांची मुलभूत गरज म्हणजे भूक भागवायची आहे. हे कर्तव्य ज्यांना भूक लागली आहे त्यांचेच नाही तर ज्यांची पोट भरली आहेत त्यांचेही आहे. म्हणून येशू त्यांना सांगतो तुम्हीच त्यांना खावयास दया.
येशू ख्रिस्त आपला देव आहे. तो आपल्याला हुसकावून लावणारा देव नाही तर आपल्या गरजात आपल्याबरोबर राहणारा देव आहे. आपण त्याच्या मागे गेलो तर तो आपल्याला टाकून देणार नाही. ही माणसे आपल्या पोटापाण्याचा विचार न करता येशुमागे गेली होती. त्यांना येशू वाऱ्यावर सोडणार नाही हीच श्रद्धा महत्वाची आहे. पण त्याआधी आपण काट्या-कुट्यातून, अडी-अडचणीतून, उन्हा-तान्हातून येशुमागे जाण्यास तयार असावे. येशू आपल्या मुलभूत गरजा भागविल आणि त्या विपुल प्रमाणात भागविल.
येशू या गरजा कसा भागवतो? या प्रसंगी तो पाच भाकरी व दोन मासे घेतो. आशीर्वाद देतो आणि पुन्हा शिष्याकडे वाटण्यासाठी देतो. सर्व पोटभर जेवतात आणि सर्वांना पुरून उरते. चमत्काराचा विचार करण्यापेक्षा ही जी प्रक्रिया आहे तिचा विचार व्हायला हवा. ह्या प्रक्रियेची जगाला विशेषतः विकसनशील देशांना गरज आहे.
आपल्याकडे जे थोडेफार आहे ते देवाच्या नावात देत राहावे. त्यामुळे इतरांनाही उदार होण्याची प्रेरणा मिळेल. या देवाण-घेवनीतून आपल्या गरजा भागत राहतील. असं देण्यासारखं आपल्याकडे काय आहे? माणसाच्या गरजा भागवण्यासारखे सगळेच आहे. काहीकडे पैसा आहे तर काहीकडे धान्य आहे. काहीकडे कपडे आहेत तर काहीकडे इतर गोष्टी आहेत. वेळ तर सर्वांकडे आहे. सहानभूती सर्वांठायी आहे. या गोष्टींचा आपण योग्य प्रकारे वाटप केला तर आपल्या अनेक गरजा भागवल्या जातील. आपण तृप्त होऊ. देवाण-घेवेची नवी वृत्ती यायला हवी. साठवण्याची लपवून ठेवण्याची वृत्ती जायला हवी. यासाठी आपण प्रत्यकाने आजच्या शुभवर्तमानात ऐकल्याप्रमाणे आपल्याकडे जे काही आहे ते देण्यास सदैव पुढे यावे म्हणून देवाकडे विशेष कृपा मागूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना :
प्रतिसाद: प्रभो आम्हाला तुझी भाकर दे.
  1. धर्मगुरू व प्रापंचिक हृदयाने जवळ यावेत, त्यांच्या एकात्मतेतून ख्रिस्तसभेची वाढ व्हावी व सर्वांमध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण व्हावा, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
  2. ख्रिस्ताबरोबरची आपली एकात्मता, आपल्या एकमेकांवरील प्रेमातून आपण जगाला दाखवून द्यावी व त्यातूनच ख्रिस्तसभेचे मानवी हक्काचे कार्य प्रकट व्हावे, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
  3. आपल्या कार्याचे दर्शन या बलिदानातून दिसावे व कार्याचा उगम कॅथोलिक ख्रिस्तसभेच्या मार्गावरून व्हावा, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
  4. या मिस्साबलिदानाद्वारे आपण केवळ पापापासून दूर न राहता, सकारात्मक विचार करून आपण कार्य करावे, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
  5. आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.