Friday, 26 December 2014

Reflections for Homily By: Fr. Godfrey Dinis







पवित्र कुटुंबाचा सण


दिनांक: २८/१२/२०१४.
पहिले वाचन: बेन सिरा ३ :२-६,१२-१४
दुसरे वाचन: कलस्सेकरांस पत्र ३:१२-२१
शुभवर्तमान: लूक २:२२-५०

             “खर प्रेम त्यागात आणि खरा त्याग प्रेमात असतो.”
प्रस्तावना:

     आज आपण पवित्र कुटुंबाचा सण साजरा करीत आहोत. कुटुंब हे मानवी जीवनाचं उगमस्थान आहे. पवित्र त्रैक्य हे येशूच्या स्वर्गीय कुटुंबाचे प्रतिक आहे आणि योसेफ व मरिया हे त्याच्या पृथ्वीवरील कुटुंबाचं प्रतिक आहे. कुटुंबाशिवाय मनुष्याची जडणघडण होऊ शकत नाही म्हणून कुटुंबाची सर्वांना गरज असते. जर देवपुत्राला मानवी कुटुंबाची गरज भासली तर आपल्याला त्या कुटुंबाची किती गरज आहे? त्यागाशिवाय कुटुंबाची उभारणी करता येत नाही. पवित्र कुटुंब त्यागमय जीवन जगल्यामुळे आदर्श कुटुंब म्हणून मानलं जात आहे.
     आजच्या उपासनेमध्ये ढासळती कुटुंब व्यवस्था उभारण्यासाठी आणि त्यागमय जीवन जगण्यासाठी लागणारे सामर्थ्य, धैर्य, शक्ती आणि कृपा पवित्र कुटुंबाद्वारे मागुया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: बेन सिरा ३ :२-६,१२-१४
     आजचे पहिले वाचन प्रवाशी मुलांचे आणि आई-वडिलांमध्ये असणारे सबंध कसे असावेत ह्या विषयी सांगत आहे. मुलांना जर उत्तम जीवन जगायचं असेल तर त्याने आपल्या आई-वडिलांचा योग्य मान-सन्मान करायला शिकायला पाहिजे कारण आई-वडिलांसाठी केलेले प्रत्येक चांगले कृत्य हे मुलाच्या पापांचे भार कमी करेल.

दुसरे वाचन : कलस्सेकरांस पत्र ३:१२-२१

संत पौल आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये ख्रिस्ती जीवनाची मुल्ये काय आहेत आणि ती जोपासल्याने प्रत्येक व्यक्ती एक आनंदी आणि सुखी कौटुंबिक जीवन कसे जगू शकतो  ह्याविषयी मार्गदर्शन करीत आहे. ह्या ख्रिस्ती मूल्याचं बीज प्रत्येक व्यक्तींच्या हृदयाच्या गाभाऱ्यात पेरायला हवं असं संत पौल म्हणतात.

शुभवर्तमान: लूक २:११-५०

     आजच्या शुभवर्तमानात येशूची सुंता कशी झाली व त्याला महत्वपूर्ण नाव कसे दिले (लूक १:३१) हे आपण येथे पाहतो. ही घटना योहानाच्या वृतांताला समांतर आहे. योहानाची सुंता झाली तेव्हा त्याच्या भवितव्याविषयी भाकीत केले होते. येशूला मंदिरात नेले तेव्हा त्याच्या बाबतीतही अशी भाकित करण्यात आले होते. येथे तीन लक्षणीय गोष्टींचा उल्लेख आहे तो आपण पाहूया.
(१)   शुध्दीकरण: यहुदी नियमशास्त्रानुसार पुरुष मुलाच्या जन्मानंतर माता सात दिवस ‘अशुद्ध’ मानली जाई आणि तिला आणखी तेहतीस दिवस घरीच राहावे लागे. त्यानंतर शुद्धीकरणाचे अर्पण समर्पित करणे आवश्यक असे (लेवीय १२:१-८) हे अर्पण फक्त येरुशलेममध्येच करायचे असल्याने त्यासाठी तिकडे जाणे अगत्याचे होते. लूकने ‘त्यांचे शुद्धीकरणाचे दिवस’ असा उल्लेख केला असला तरी मुलाला नव्हे तर फक्त मरीयेनेच शुद्ध होणे आवश्यक होते. मातेचे शुद्धीकरण आणि तिच्या मुलाला ‘सोडवून घेणे’ या दोन्ही वेगळ्या बाबींचा उल्लेख लूकने एकत्रच केला आहे.
(२)   सोडवून घेणे: नियमशास्त्रानुसार प्रथम जन्मलेल्या मुलाला ‘भरपाई देऊन’ सोडवून घेणे आवश्यक होते. प्रथम जन्मलेले सर्वच जीव देवाला समर्पित आहेत असे मानले जाई. यात प्रथम जन्मलेले पशूंचे होमार्पण करीत आणि पाच शेकेल द्रव्य भरून मुलांना सोडवून घेत. हा विधी ते बाळ एक महिन्याचे झाल्यावर करीत असत (निर्गम १३:१३; गणना १८:१५,१६) यासाठी मुलाला मंदिरात नेलेच पाहिजे असा नियम नव्हता.
(३)   देवाची सेवा: मरीयेने आपल्या मुलाला खास करून देवाच्या सेवेसाठी अर्पण केले म्हणून येशू त्यावेळी तेथे होता. हन्नानेही पूर्वी याच प्रकारे शमुवेलाला निवास मंडपात समर्पित केले होते (१ शमू १:११,२१-२८) याप्रकारे नियमशास्त्रानुसार आवश्यक अश्या सर्व बाबी पूर्ण झाल्या, (गलती ४:४) या वृत्तांतात पुढे मुलाला पाहिल्यावर शिमोन व हन्ना ह्यांनी काय केले ते सांगितले आहे.
शिमोन: हा एक भक्तिमान, सात्विक इस्त्राएली माणूस होता. देव आपल्या लोकांचे सांत्वन (म्हणजे सुटका किंवा मुक्तता; यशया ४०:१; ६१:२) करण्याच्या प्रतीक्षेत तो होता. मसीहा-ख्रिस्त येण्यापूर्वी तो मरणार नाही असे देवाने अभिवचन त्याला दिले होते. तो क्षण आता जवळ आला आहे ही जाणीव दिव्य प्रेरणेने त्याला झाल्याने तो मंदिरात गेला, त्याने मुलाला उचलून कवटाळले आणि देवाचे आभार मानून आपण मरण्यास तयार असल्याचे म्हटले. तसेच त्याने भाकीत केले की येशू फक्त यहुद्यांसाठीच नव्हे तर सर्व लोकांच्या तारणासाठी आला आहे.
हन्ना: तिच्या आगमनाने शिमोनाच्या या शब्दांना दुजोरा मिळाला. देव येशूच्याद्वारे यहुदी लोकांची सुटका करील असे भाकीत तिने केले. ह्याच घटनेपासून देवाच्या लोकांचे तारण होण्यास आरंभ होतो.

बोधकथा
६ ऑक्टोबर २०१४ रोजी झालेल्या बातमीनुसार केरळ ह्या राज्यांतील तिरूअंतपूरम या शहरात घडलेली ही एक सत्य घटना. सेमेनरीत शिकत असलेले २४ वर्षीय कँप्यूचिन ब्रदर गीजीन डेविडसन आपली सायकल चालवत जवळच्या चर्चमध्ये आपल्या कार्यासाठी जात होते. सायकलवरून पुढे जात असताना मागून येणाऱ्या भरधाव गाडीने त्याला उडवून दिले. डोक्याला झालेल्या गंभीर इजेमुळे त्यांचा हॉस्पीटलमध्ये मृत्यु झाला परंतु त्याचं आयुष्य तेथेच संपल नाही. ब्रदर गीजीनच्या आईवडिलांनी लगेच त्याच्या शरीराचे अवयव दान केले आणि त्यामुळे सहा जणांना नवजीवन प्राप्त झाले.

मनन चिंतन

“खर प्रेम त्यागात आणि खरा त्याग प्रेमात असतो.”
आज आपण योसेफ, मरिया आणि येशू ह्यांच्या कुटुंबाचा म्हणजेच पवित्र कुटुंबाचा सण साजरा करीत आहोत. पवित्र कुटुंब हे एक त्यागमय जीवन जगले तेव्हाच पवित्र ख्रिस्तसभा आज आपल्यापुढे त्यांचा आदर्श ठेवत आहे.
     प्रत्येक मनुष्याची जडण-घडण ही कुटुंबात होत असते, म्हणूनच कुटुंब ही संस्काराची आदर्शशाळा म्हणून ओळखली जाते. ख्रिस्ती श्रद्धेची जोपासना कुटुंबातच होते. देवाची ओळख आणि चांगली शिकवणूक आपल्याला कुटुंबातच लाभते. कुटुंब म्हटलं म्हणजे स्वप्न, इच्छा-आकांक्षा आल्याच, मग त्या कुटुंबाच्या असोत किंवा कुटुंबात राहणाऱ्या सभासदाच्या असोत. ह्याप्रमाणे योसेफ, मरिया आणि येशू ह्यांच्यासुधा काही इच्छा, स्वप्न असावीत. योसेफाला वाटलं असेल की एका चांगल्या तरुणीबरोबर लग्न करावं आणि आपलं स्वःताच कुटुंब उभारावं. तसेच मरीयेला सुद्धा वाटलं असेल की एका चांगल्या तरुणाबरोबर लग्न करून मुलाबाळांचा सांभाळ करावा. तसेच येशुख्रिस्त हा देव पुत्र असूनही त्याने त्याच्या स्वप्नाचा त्याग करून एक मानवी देह आपल्या तारणाकरिता धारण केला.
     प्रत्येक माणसाचे स्वप्ने असतात परंतु अनेकवेळा कुटुंबाच्या बरेपणासाठी, भलेपणासाठी, कुटुंब उभारण्यासाठी स्वःताच्या स्वप्नाचा त्याग करावा लागतो. पवित्र कुटुंबातील प्रत्येक सभासदांनी आपल्या स्वप्नांचा त्याग करून देवाच्या स्वप्नाला प्राधान्य दिले आणि म्हणूनच आपण नाताळ गीतांमध्ये म्हणतो, “स्वप्न देवाचे आज साकारले”. प्रत्येक कुटुंबाला देवाचे स्वप्न स्वीकारण्यासाठी, साकारण्यासाठी आणि ते स्वप्न जगण्यासाठी आज पवित्र कुटुंब आमंत्रित करीत आहे.
कँप्यूचिन ब्रदर गीजीन डेविडसन ह्याने स्वःताचे आयुष्य, स्वःताची स्वप्ने त्याग करून देवाच्या स्वप्नाला प्राधान्य दिले. त्याने त्याचे जीवन देवकार्यासाठी समर्पित केले होते. तसेच त्याला देवाला अर्पण करून त्यांच्या कुटुंबाने सुद्धा त्याग केला होता आणि त्या खऱ्या त्यागाचा अनुभव ब्रदर गीजीन ह्याने स्वःताच्या कुटुंबात घेतलेला होता. पवित्र कुटुंबाने अनुभवलेली त्यागाची झळ ब्रदर गीजीनच्या कुटुंबाने अनुभवलेली होती आणि म्हणूनच ब्रदरांच्या मृतुनंतर क्षणाचा विलंब न लावता त्याच्या आईवडिलांनी त्याच्या शरीराचे अवयव इतरांच्या कामी यावेत म्हणून दान केले आणि अनेकांना नवजीवन दिले. त्यागातून महात्याग काय आहे हे आपल्याला ह्या कुटुंबाद्वारे दिसत आहे. आज खरोखरच स्वर्गलोकात ब्रदर गीजीनच्या भोवती दुतगन “स्वप्न देवाचे आज हे साकारले” हे गीत गात असतील.
त्याचप्रमाणे आपण आजच्या शुभवर्तमानात पाहतो योसेफ आणि मरिया, येशूला मंदिरात देवाच्या सेवेसाठी समर्पित करतात. त्यांना देवाच्या योजना ठाऊक होत्या आणि म्हणूनच त्यांनी स्वःताच्या योजनेचा त्याग करून देवाच्या योजनेला प्राधान्य दिले: स्वःताच्या बाळाला (येशूख्रिस्ताला) जगाच्या तारणासाठी समर्पित केले आणि त्याद्वारे अनेकांना नवजीवन प्राप्त झाले आणि होत आहे.
आज इतरांसाठी विशेषकरून कुटुंबातील सभासदांसाठी त्याग करण्याची वृत्ती आधुनिक जगामध्ये आपल्याला आढळत नाही आणि त्यामुळे आजच्या कुटुंबात वेगवेगळ्या समस्या उभ्या आहेत उदा: घटस्पोट, एकच मातृ-पितृपद(single parenthood), लग्न संस्कार न स्वीकारता एकत्र राहणे इत्यादी. या समस्यांना वाचा फोडण्यासाठी पोप फ्रान्सिस ह्यांनी नुकताच बिशपांची सभा भरवली होती आणि या सभेमागचा उद्देश हाच आहे की, जर कुटुंबव्यवस्था योग्यपणे उभारली नाही तर जगापुढे यापेक्षाही भल्यामोठ्या कौटुंबिक समस्या या जगात उभ्या राहणार आहेत.
     आज आपण पवित्र कुटुंबाचा सण साजरा करीत असताना त्याचा आदर्श घेऊन आपल्या प्रत्येक कुटुंबाचा त्याला केंद्रबिंदू बनवूया. संकटाना सामोरे जात असताना पवित्र कुटुंबाचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन कुटुंबात धार्मिक वातावरण निर्माण होण्यास आदर्श कुटुंबाचे गुण आचरणात आणूया. तसेच प्रत्येक कुटुंबाने पवित्र कुटुंबाचा आदर्श घेऊन एक आपुलकीचं, सलोख्याच, त्यागाचं व प्रेमाचं जीवन जगावं म्हणून आपण विधात्याकडे विशेष प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: पवित्र कुटुंब आम्हासाठी मध्यस्थी करा.
  1. आपले परमगुरुस्वामी, कार्डीनल्स, सर्व महागुरू, धर्मगुरू, धर्मभगिनी ह्यांच्यावर प्रभूचा आशीर्वाद असावा, त्यांच्या कार्यावर प्रभूचा आशीर्वाद असावा व त्याच्या कार्याद्वारे लोकांना एक पवित्र कुटुंब उभारण्यात मदत व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
  2. आपल्या प्रत्येकांच्या कुटुंबात शांती, प्रेम, ऐक्य सतत नांदावे व आपण त्यागमय जीवन जगून आपले कुटुंब सदासर्वदा सुखी रहावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
  3. जी कुटुंबे उध्वस्त झाली आहेत, अशांना पवित्र कुटुंबाचे मार्गदर्शन लाभून त्यांना समजूतदारपणाचे, शांतीचे व प्रेमाचे वरदान लाभावे म्हणून प्रार्थना करूया.
  4. आपल्या वृद्ध आईवडिलांना आपल्या प्रेमाचे, मायेचे व करुणेचे छत्र लाभून त्यांना आनंदी ठेवण्यास परमेश्वराने आपणास कृपा द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
  5. आता थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया.  

Monday, 22 December 2014


Reflections for Homily By: Ashley D'Monte











नाताळचा सण
(सकाळची मिस्सा)

दिनांक: २५/१२/२०१४
पहिले वाचन: यशया ६२:११-१२
दुसरे वाचन: तीतास पत्र ३:४-७
शुभवर्तमान: लुक २:१५-२०

प्रस्तावना
आज संपूर्ण पृथ्वी आनंद व हर्ष करीत आहे कारण तिला तिचा तारणारा लाभलेला आहे. संदेष्ट्याने केलेल्या भविष्यवाणीची पुर्तता आज झाली आहे. देवाने आपल्या एकुलत्या एका पुत्रास मानवजातीच्या प्रीतीपोटी या भुतलावर पाठवून प्रितीचा कळस गाठला आहे.
पहिल्या वाचनात यशया संदेष्टा, तारणारा येणार असल्यामुळे हर्ष आनंद करण्यास सांगत आहे. हा आनंद साजरा करीत असताना संत पौल तिताला लिहिलेल्या पत्रात सांगतो की, आपणही एकेकाळी आज्ञाभंग करणारे, बहकलेले होतो परंतु आपल्या नीतीने नव्हे तर त्याच्या आपल्यावरील दयेखातर त्याने आपल्याला तारिले आहे. हिच परमेश्वरी दया उदारता आपणास गाच्या गोठ्यात जन्मलेल्या ख्रिस्ताद्वारे दिसत आहे.
ज्याप्रमाणे ख्रिस्त ह्या भुतलावर दी- दुबळ्यांच्या तारणासाठी अवतरला त्याचप्रमाणे आपणही दीन व गरजवंताच्या हितासाठी झटावे म्हणून ह्या पवित्र मिस्साबलिदानात प्रार्थना करूया.

सम्यक विवरण
पहिले वाचन: यशया ६२:११-१२

पहिल्या वाचनात यशया संदेष्टा दोन गोष्टीसाठी आनंद हर्ष करण्यास सांगत आहे.
प्रथमताः आपल्यामध्ये तारणारा येणार आहे. तो एकटा नसून त्याच्याबरोबर त्याने उद्धारलेले लोक सुद्धा घेऊन तो येत आहे. त्या सर्वांना तो नविन रुप देत आहे आणि हेच लोकं प्रभुचे उद्धारलेले पवित्र लोक म्हणुन त्यांना गणण्यात येईल.
दुसरे म्हणजे परमेश्वराने आपली अपार प्रिती दर्शविली आहे. हि प्रीती वधु-वरांतील प्रेमासारखी आहे. “तरुण जसा कुमारीशी विवाह करितो तशी तुझी मुले तुजशी विवाह करतील, नवरा जसा नवरी पाहून हर्षतो तसा तुझा देव तुला पाहून हर्षेल.(यशया ६२.५) यशया संदेष्ट्याने जो उपदेश इस्रायेली लोकांना दिला तो आजही आपणास उपयुक्त ठरत आहे. कारण आपला तारणारा आज जन्मला आहे आणि त्यामुळे आपण सर्वजण पापांच्या मोहजाळातून मुक्त होणार आहोत.

दुसरे वाचन: तीतास पत्र ३:४-७

दुस-या वाचनात संत पौल ख्रिस्त येण्यापुर्वी आपली स्थिती काय होती याची प्रचिती देतो. आपण देवाच्या प्रेमाविषयी अज्ञानी होतो. आपल्या पापामुळे आपण भटकलो होतो. देवाच्या आज्ञेविरुद्ध, ईच्छेविरुद्ध जा आपण आज्ञाभंग केला. पापाच्या जाळ्यात अडकल्याने आपण पापाचे गुलाम बनलो होतो. तिरस्कारामुळे आपण शेजा-यांचा हेवा केला. हे दृष्य ख्रिस्त येण्याने पुर्णपणे बदलले आहे. प्रायश्चित संस्काराद्वारे आपल्याला पुन्हा एकदा देवाची मुले बनण्याचा अधिकार मिळालेला आहे. पवित्र आत्म्याद्वारे आपण पवित्र झालो आहोत. हे पावित्र्य सदैव राखणे हा नाताळचा हेतु व संदेश आहे.

शुभवर्तमान: लुक २:१५-२०

लुकलिखीत शुभवर्तमानात आपण पाहतो कि, ख्रिस्तजन्माचा पहिला संदेश हा गरिब  धनगरांना मिळतो. दुत ह्या धनगरांना ख्रिस्तजन्माची कहाणी सांगतो त्यांना तारणाची आशा दाखवतो. हा संदेश प्रथम धनगरांनाच का? कारण त्यांना समाजात स्थान नव्हते. समाजाने त्यांना तुच्छ लेखलेलं होतं, त्यांचे जीवन अगदी कठीण व कष्टमय होतं. मंदिरात बळी देण्यास लागणारे कोकरु हे मंदिर अधिका-यांच्या कळपातून पुरविले जाई. धनगर ह्या कळपाची राखण करीत असत. धनगर जे मंदिरासाठी लागणा-या कोकरांची काळजी घेत त्यांनाच प्रथम जगाचे पाप हरण करणारे देवाचे कोकरु पाहण्याचे भाग्य लाभले. धनगरांना दुताचा संदेश मिळाला तेव्हा त्यांनी विश्वास ठेवला ते बेथलेहेमास गेले. त्यांनी देवाने केलेल्या कृत्याबद्द्ल गुणगान गायिले ह्या सर्व गोष्टी तरांना कळवल्या.

बोधकथा:
(काल्पनिक कथा)

येशु आपल्या दु:सहन पुनरुत्थानानंतर वैभवाने स्वर्गात चढला. तेव्हा एका दुताने त्याला विचारले, प्रभुजी आपण पृथ्वीवर खुप दु: सहन केलेत ना? होय येशुने उत्तर दिले. दुताने विचारले, तुम्ही लोकांसाठी जे केलेत त्याची जाणीव त्यांना आहे का? प्रभुने म्हटले, फक्त थोड्यांनाच ह्याची जाणीव आहे. दुताने म्हटले, मग तुम्ही असे काही केले आहे का ज्याद्वारे तुमच्या कार्याची प्रचिती सर्वांना येई? येशुने उत्तर दिले, मी माझे शिष्य पेत्र, योहान ,याकोब यांस त्यांच्या साथीदारांस माझ्याविषयी इतरांना कबुली देण्यास आज्ञीत केले आहे. ते थोड्यांना सांगती ते थोडे इतरांना ते पुढे अजुन काही जणांस अशाप्रकारे पृथ्वीच्या काना-कोप-यात ही सुवार्ता सांगितली जाईल. शंकित हो देवदुताने पुन्हा विचारले, होय, जर पेत्र आणि त्याचे साथिदार हे विसरले तर? इतरांना सांगण्यास जर त्यांनी निष्काळजीपणा केला तर? आपण दुसरे काही योजिले आहे का? ख्रिस्ताने उत्तर दिले, नाही, मी दुसरे काही योजिले नाही. माझा त्यांच्यावर विश्वा आहे.
ख्रिस्ताचा आपणावर विश्वास आहे. आपणांस ख्रिस्ती विश्वास हा प्रेषितांद्वारेच प्राप्त झाला आपण तो इतरांपर्यंत पोहचवला पाहिजे. ख्रिस्ताचे मानवजातीवरील प्रेम हे इतरांपर्यंत पोहचविण्याचे काम आता आपणा सर्वांचे आहे.

मनन चिंतन:

आज नाताळचा सण साजरा करीत असताना आपण परमेश्वराचे मानवजातीवरील प्रेम हे ख्रिस्ताच्या येण्याने कसे परिपुर्ण झाले यावर विचार विनिमय करत आहोत. परमेश्वराचे प्रेम दया ही विशेषकरुन गोर-गरिबांसाठी बहाल केलेली आहे हे ठळकपणे दिसून येते. ख्रिस्त ह्या भुतलावर येण्याचा मुख्य हेतू हाच की, पाप्यांचे, गोर- गरिबांचे तारण व्हावे. त्यामुळेच यशया संदेष्ट्याचे भाकित प्रभु येशू आपले कार्य चालू करण्यापुर्वी घोषीत करतो. “प्रभु परमेश्वराचा आत्मा मजवर आला आहे; कारण दीनांस शुभवृत्त सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे;भग्न हृदयी जनांस पट्टी बांधावी, धरून नेलेल्यांस मुक्तता व बंदिवानांस बंधमोचन विदित करावा.”(यशया ६१.१)
ख्रिस्तामध्ये आपणास परमेश्वराचे प्रेम करुणा याची प्रचिती येते. प्रभुच्या येण्याने तारण शक्य झाले आहे. मी तर त्यांना जीवनप्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. (योहान 10:10) संत अगुस्तीन म्हणतात, “देव मनुष्य झाला जेणेकरुन मनुष्य दैवी हो शकेल.” जेव्हा आपल्या कुटुंबात एखादे बाळ जन्मास येते तेव्हा सर्वांना कुतूहल हेच असते की बाळ कोणासारखे दिसते! या गाच्या गोठ्यात जन्मलेल्या बाळाकडे पाहताच एक गोष्ट ठामपणे दिसुन येते ती म्हणजे देवाचे प्रेम, त्याचा चांगुलपणा. आपल्या एकुलत्या एका पुत्रास त्याने जगाच्या कल्याणासाठी सर्मपित केले. ख्रिस्ताने आपणास गरिबांशी एकरूप कसे व्हायचे हे त्याच्या जीवनाद्वारे दाखवून दिले आहे. ख्रिस्ताने त्या गरिब धनगरांची हाक ऐकली त्यांच्या मदतीस तो धावून आला जेणेकरून त्यांचे तारण व्हावे. पोप फ्रान्सिस म्हणतात, चर्च हे गरिबांचे आणि गरिबांसाठी आहे. आज अनेक से गरीब, गरजू लोक दु:खात, आजारात गुरफटलेले आहेत. अशा लोकांचा आवाज कण्यास व ज्याप्रमाणे धनगर ख्रिस्ताची सुवार्ता इतरांपर्यत पोहचवण्यास पुढे सरसावले त्याचप्रमाणे आपणही ख्रिस्ताच्या येण्याची सुवार्ता व त्याचा शांतिचा प्रेमाचा संदेश इतरांपर्यंत पोहचविण्यास ख्रिस्तसभा आपणास पाचारीत आहे.

विश्वासु लोकांच्या प्रार्थना :
प्रतिसाद : हे बाळयेशू माझ्या हृदयात ये.
1. आपले परमगुरुस्वामी, महागुरुस्वामी, धर्मगुरु यानी ख्रिस्ताप्रमाणे आपल्या शब्दाने कृतीने परमेश्वराची दया दाखवून अनेकाना परमेश्वराकडे आणावे म्हणून आपण प्रार्थना करुया.
2. ज्याप्रमाणे ख्रिस्ताने आपण पापी असुनही आपणावर प्रेम केले तसेच आपणही आपल्या शेजाऱ्यांकडे सदा प्रेमळ क्षमाशील दृष्टीने पहावे म्हणून आपण प्रार्थना करुया.
3. जे दीन व गरजवंत आहेत अशा लोकांत आपण ख्रिस्त पाहून त्यांचसाठी मदतीचा हात पुढे करण्यास आपल्याला परमेश्वरी कृपा लाभावी म्हणून आपण प्रार्थना करुया.
4. जे लोक दु:खी, कष्टी भाराक्रांत आहेत अशांनी आपला विश्वास ढळू देता परमेश्वराच्या प्रेमात त्यांची वाढ व्हावी म्हणून आपण प्रार्थना करुया.

5.थोड्यावेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक गरजांसाठी प्रार्थना करूया.