Monday, 10 April 2017


Reflection for the Homily of Maundy Thursday  (13/04/2017) By: Br. Jameson Munis



आज्ञा गुरुवार

दिनांक – १३-०४-२०१७
पहिले वाचन – निर्गम १२:१-८,११-१४
दुसरे वाचन – १करिन्थकरांस ११:२३-२६
शुभवर्तमान – योहान १३:१-१५





 मी सेवा करून घेण्यासाठी नव्हेतर सेवा करण्यासाठी आलो आहे


प्रस्तावना
आज आपण आज्ञा गुरुवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्याला येशू ख्रिस्ताचे शेवटचे भोजन, त्याचे बंधिस्तान आणि त्याचे क्रुसावरचे मरण या विषयी उद्देशून सांगत आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा गुरु असूनसुद्धा, एक साधा दास झाला आणि आपल्या शिष्याचे पाय धुतले. त्याला त्याच्या जाण्याची वेळ माहिती होती तरी सुद्धा त्याने सर्वावर प्रिती केली. ज्या लोकांसाठी त्याने आपल्या जीवनाचा त्याग केला तीच माणसे त्याच्याविरुद्ध होणार याची प्रभूला खात्री होती.
आजचे पहिले वाचन हे निर्गम ह्या पुस्तकातून घेतले आहे. या वाचनात आपण वल्हांडणाच्या नियमाविषयी ऐकणार आहोत. करिन्थकरांस पहिल्या पत्रातून घेतलेल्या पहिल्या वाचनात संत पौल भाकर आणि प्याला ह्या विषयी सांगत अहि कि. जितक्यांदा आपण हि भाकर व हा प्याला पितो तितक्यांदा आपण प्रभूच्या मरणाची घोषणा करतो. आजच्या शुभवर्तमानात आपण येशूच्या सेवा व प्रेमा विषयी ऐकणार आहोत. आजच्या मिस्साबलीदानात भाग घेत असताना आपण आपली मने शुद्ध करून आपल्या शेजाऱ्यावर व वैऱ्यावर प्रिती करण्यासाठी आणि चांगले जीवन जगण्यासाठी प्रभूकडे प्रार्थना करूया.
तसेच आज येशू ख्रिस्ताने मिस्साबलीदानाची व धर्मगुरुपदाची स्थापना केली. म्हणून आज धर्मगुरुचा दिवस साजरा करीत असतांना आपण विशेषकरून सर्व धर्मगुरुसाठी प्रार्थना करूया.

सम्यक विवरण
पहिले वाचन – निर्गम १२:१-८,११-१४

आजच्या पहिल्या वाचनात आपण वल्हांडणाच्या नियमाविषयी ऐकतो. वल्हांडण म्हणजे, जेव्हा इस्त्राएल लोक फारोच्या गुलामगिरीत होते तेव्हा इस्त्राएल लोकांतील प्रथम जन्मलेले मरण ओलांडून गेले, या घटनेला वल्हांडण म्हणतात. हि घटना इस्त्राएल लोक तीन प्रकारे साजरा करतात. प्रथम म्हणजे, ते दरवर्षी सात दिवस बेखमीर भाकरीचा सण साजरा करीत होते. दुसरे म्हणजे, बेखमीर भाकरीचा सण साजरा करताना ते एक वर्षाचे कोकरू सेवन करून वल्हांडणाचे स्मरण करीत होते. तिसरे म्हणजे, इस्त्राएल लोकांचे सर्व जेष्ठ पुत्र वाचले म्हणून त्यांचे स्मरण ठेवण्यासाठी गुरे-ढोरे व शेळ्यामध्ये जन्मलेले पहिले नर देवाला अर्पण करीत असत.

दुसरे वाचन – १करिन्थकरांस ११:२३-२६

आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौलाने प्रभू भोजनाचे महत्व सांगितले आहे. वल्हांडणाचे भोजन चालू असताना, प्रभूने मेजावरील बेखमीर भाकर घेतली व ती मोडून देवाचे आभार मानले आणि आपल्या शिष्यांना दिली. ख्रिस्ताने स्वतः भाकर होऊन आपल्या तारणासाठी स्वतःचे अर्पण केले. तद्नंतर त्याने द्राक्षरसाचा प्याला घेऊन शिष्यास दिला. हा द्राक्षरसाचा प्याला म्हणजे ख्रिस्ताचे रक्त व त्याद्वारे ख्रिस्ताने पापक्षमेचा नवा करार केला आहे. व त्यामुळे आपण देवाच्या सानिध्यात येण्यास पात्र झालो आहोत. हेच ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त आपण रोज मिस्साबलीदानात साजरे करतो.

शुभवर्तमान – योहान १३:१-१५

आजच्या योहानलिखित शुभवर्तमानात आपण पाहतो कि, येशू शेवटच्या भोजनापूर्वी उठून आपल्या शिष्याचे पाय धुतले. ह्या कृतीवरून प्रभूचे आपल्यावरील प्रेम प्रत्ययास येते. येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरील मरणाची जाणीव होती तरी त्याने देवाचे कार्य सोडून दिले नाही. ज्या वेदनाच्या दरीतून स्वतःला जायचे होते त्याचा विचार न करता प्रभूने सर्वावर प्रिती केली. यहुदा इस्कर्योत येशूला दगा देणार होता याची जाणीव असून प्रभू हताश झाला नाही; त्याची प्रिती कधीच कमी झाली नाही.

बोधकथा

गुणसंपन्न व अगदी हुशार असा एक मुलगा होता. त्याने खूप यश मिळवले होते. व तो सर्वावर प्रेम करून त्यांना मदत करीत होता. परंतु तो शाररीकदृष्ट्या लंगडा होता. पण तो खूप आनंदी होता व सर्वाना त्याचा अभिमान होता. केवळ त्याचा एक मित्र त्याच्या विरुद्ध होता व त्याचे नाव खराब करण्याचा प्रयत्न करीत असे. ह्या अपंग मुलाला ह्याची जाणीव असून सुद्धा त्याने आपल्या मित्राचा कधीच तिरस्कार न करता त्याच्यावर प्रिती केली. त्यामुळे त्या मित्राला आपल्या स्वकृत्याचा तिरस्कार वाटला व त्याने आपल्या अपंग मित्राला विचारले कि, “तू दुसऱ्याना मदत व प्रेम कसे करतो?” त्यावर तो उत्तरला कि, “माझ्या आजाराने माझ्या मनाला व डोक्याला स्पर्श केला नाही म्हणून मी दुसऱ्यावर प्रेम करतो.”

मनन चिंतन

प्रीतीच्या जीवनाला कधीच शेवटची रेषा नाही. प्रेम करण्यास कुठल्याही कारणाची गरज भासत नाही. जी माणसे प्रेमाचे जीवन जगतात ते आनंदी असतात. त्यांच्या पाठीशी देवाची छाया असते. जे प्रेमाला स्वीकारतात ते ख्रिस्ताला व देवापित्याला स्वीकारतात. खरी प्रिती आपल्याला दुसऱ्याकडे वाहून घेते. बोधकथेतील अपंग मुलगा दुसऱ्यावर प्रेम करतो व चांगले जीवन जगतो. येशू ख्रिस्ताच्या जीवनात सुद्धा आपल्याला खरी प्रिती आढळते. त्याची प्रिती हि एका वाहणाऱ्या महानदी सारखी आहे. प्रिती म्हणजेच दुसऱ्यांची सेवा ह्याची जाणीव येशूला होती म्हणून त्याने दास होऊन शिष्याचे पाय धुतले.
येशू ख्रिस्ताच्या विचारात व कृतीत नम्रता व प्रेम होते. ह्याच प्रेमाने त्याने दुसऱ्याची सेवा केली; आजाऱ्याना बरे केले; आंधळ्यास दृष्टी दिली; भुकेल्यास खावयास दिले म्हणूनच असे म्हणतात कि, खरी प्रिती व सेवा करण्यात खूप आनंद मिळतो.
देवाने जगावर एवढी प्रीति केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. देवाने आपला पुत्र यासाठी दिला की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला अनतंकाळचे जीवन मिळावे (योहान ३:१६)
येशू ख्रिस्त आपल्या तारणासाठी आला व आपल्याला चांगले कार्य आणि प्रेम करण्यास मार्गदर्शन केले. आपण प्रभूप्रमाणे आपल्या शेजाऱ्यावर व शत्रूवर प्रेम व सेवा करण्यास सुरवात केली पाहिजे. आपण चांगले कृत्य करण्यास कमी पडता कामा नये. कारण प्रभूने आपल्यावर शेवटपर्यंत प्रिती करून वधस्तंभावर मरण स्वीकारले आहे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद : हे प्रीतीच्या राजा आमची प्रार्थना ऐक.

१)     आपले जीवन देवाच्या कार्यासाठी समर्पित केलेले आपले पोप, बिशप व सर्व धर्मगुरु व धर्मभगिनींना चांगले आरोग्य लाभावे व त्यांच्या कामात प्रभूचा आशीर्वाद लाभावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
२)     जी माणसे त्यांच्या आयुष्यात निराशून गेली आहेत अश्या लोकांना देवाची प्रिती व धैर्य लाभावे म्हणून प्रार्थना करूया.
३)     जे लोक आजारी आहेत अश्या सर्वांना देवाचा स्पर्श व्हावा व ते त्यांच्या आजारातून मुक्त व्हावेत म्हणून आपण प्रार्थना करूया.
४)     जी कुटुंबे विविध कारणासाठी दुरावलेली आहेत अश्या सर्व कुटुंबांवर परमेश्वराचा आशीर्वाद यावा व त्यंची सर्व संकटे दूर व्हावीत व ते पुन्हा एकत्र यावेत म्हणून आपण प्रार्थना करूया.
५)     जे लोक गरीब आहेत व ज्यांना पुरेसे अन्न मिळत नाही अश्या सर्व लोकांच्या शाररीक व आत्मिक गरजा पूर्ण व्हाव्यात तसेच त्यांची सर्व दुःखे दूर व्हावीत म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

६)     थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूसाठी प्रार्थना करूया.

Thursday, 6 April 2017

Reflection for the Homily of Palm Sunday (09-04-2017) By Br Sadrick Dapki



झावळ्यांचा रविवार

दिनांक – ०९-०४-२०१७
पहिले वाचन – यशया ५०:४-७
दुसरे वाचन – फिलीपकरांस पत्र २:६-११
शुभवर्तमान – मत्तय २६:१४-२७:६६






 "माझी वेळ जवळ आली आहे."




प्रस्तावना

आज ख्रिस्तसभा झावळ्यांचा रविवार साजरा करीत आहे. हा आठवडा येशूच्या दुःखसहनाचा किंवा पवित्र आठवडा असा मानला जातो. ह्या दिवशी सर्व ख्रिस्तसभा राज्यांचा राजा, आपला प्रभू येशू ह्याच्या नावाने मिरवणूक काढून मोठ्या जल्लोषाने त्याचे गुणगान गाते.
आजची तिन्ही वाचणे आपणास दुःख सहनाबाबत सांगत आहेत. पहिल्या वाचनात यशया प्रवक्ता आपल्या दुःखद्वारे ख्रिस्ताच्या दुःखसहनाची शेकडो वर्षा आधी पूर्वतयारी करतो आणि स्वतःच यातनामय ख्रिस्ताचा आवाज होतो. दुसऱ्या वाचनात संत पौल आपणाला आपले ख्रिस्ती जीवन कशा प्रकारे जगावे ह्याविषयी मौलिक मार्गदर्शन करतो. शुभवर्तमानात येशू ख्रिस्त वल्हांडण भोजन करून आपल्या दुःख सहनाची तयारी करतो. म्हणून आजची ख्रिस्तसभा आपणास ह्या पवित्र आठवड्यात ख्रिस्ताच्या दुःखसहन, मरण व पुनरुस्थानात सहभागी होण्यासाठी बोलावत आहे.   

सम्यक विवरण
पहिले वाचन – यशया ५०:४-७

यशयाचे हे तिसरे गीत म्हणून मानले जाते. ह्या गीतामध्ये यशया दुःखित व शोषित सेवकाचे वर्णन करीत आहे. परंतू हा सेवक कशाचीच भीती न बाळगता आपले सर्वस्व देवासाठी अर्पण करतो व त्याचा देवावरील विश्वास अधिक बळकट करतो.

दुसरे वाचन – फिलीपकरांस पत्र २:६-११

पौलाने हे पत्र तुरुंगात असतांना लिहिले आहे. संत पौल ह्या पत्राद्वारे फिलीपकरांचे आभार मानतो. ख्रिस्ती जीवन जगणे म्हणजे काय याचा अर्थ पौल स्वतःच्या जीवनावरून देतो. ख्रिस्ती जीवन कसे जगावे याचे उत्कृष्ठ वर्णन या पत्रात आढळते.

शुभवर्तमान – मत्तय २६:१४-२७:६६

वल्हांडणाचा सण जवळ आला होता म्हणून येशू ख्रिस्त वल्हांडण भोजनाची तयारी करतो. येशू ख्रिस्ताला त्याच्या दुःखसहनाची व मरणाची पूर्ण माहिती होती म्हणून तो त्या तयारीनेच आला होता. येशूचे दुःखसहन हे येरुशलेम नगरीत शिरताच सुरु झाले. येशूने सर्वप्रथम वल्हांडण भोजन केले व मिस्साबलीदानाची स्थापना केली. म्हणूनच आपण रोज मिस्साबलिदान साजरे करतो व ख्रिस्ताला आपल्या जीवनात सहभागी करतो.
आजचा दिनविशेष म्हणजेच आज प्रभू येशूची मिरवणूक काढून त्याचे सर्व लोकांनी हातात झावळ्या घेऊन येरुशलेम नगरीत स्वागत केले. आज हि येरुशलेम नगरी दुसरे व तिसरे काहीही नसून आपण स्वतःच आहोत. आपले हृदय हे येरुशलेम आहे आणि तिथे आपण येशू ख्रिस्ताचे स्वच्छ मनाने स्वागत करतो.

बोधकथा

“जगतो जीवन नव्हे मी माझे, ख्रिस्त जगत असे मम जीवनी” संत पौलाचे हे बोल पुढील सत्य घटनेस अनुरूप आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये एका मुलाला देशाची सेवा करायची होती यासाठी तो सैन्यामध्ये भरती होतो. त्या मुलाचे प्रशिक्षण चालू असताना एक दिवस त्याचा अपघात होऊन तो मेंदूमृत होतो. हि घटना त्या मुलाच्या वडिलांना कळते तेव्हा तो त्याच्या मुलाचा स्वीकार करतो. व सरते शेवटी त्या मुलाचे अवयव दुसऱ्या व्यक्तींना दान करतो. अश्याप्रकारे त्या मुलाने चार जणांना जीवनदान दिले.

मनन चिंतन

आपल्या स्वर्गीय पित्याने आपल्यावरील प्रेम दर्शविण्यास आपल्या एकुलत्या एक पुत्रास या धरतीवर पाठवले. व त्याची नियती ठरवली कि त्याने आपल्या प्रेमाखातीर ख्रुसावर मरण पत्करावे आणि आपणास पापापासून सर्वकाळ मुक्त करावे. येशू ख्रिस्ताने आपल्या पित्यास होकार देऊन स्वतःचा प्राण देऊन आपणास पापांपासून केले.
येशूचा येरुशलेमेत प्रवेश
वल्हांडण सणाआधी येशू ख्रिस्त येरुशलेम नगरीत गाढवावर बसून प्रवेश करतो. येशू ख्रिस्ताचे गाढवावर बसणे महत्वाचे होते, कारण तो शांतीचा राजा आहे. येशू ख्रिस्त नगरी मध्ये प्रवेश करताना लोकांनी आपली वस्त्रे रस्त्यावर पसरवली आणि झाडांच्या डहाळ्या हातात घेऊन येशूचे स्वागत करून म्हटले, होसान्ना, दाविदाच्या पुत्राला प्रभुच्या नावाने येणारा धन्यवादित असो, स्वर्गीय देवाला होसान्ना! (मत्तय २१:९) होसान्ना या शब्दाचा अर्थ ‘आमचे तारण कर’ असा होतो.
वल्हांडणाचा सण व प्रभू येशू
वल्हांडणाचा सण हा पूर्वी साजरा केला जात असे आणि त्याचा उल्लेख आपल्याला निर्गम ह्या पुस्तकात पहावयास मिळतो. इजिप्त देशातून इस्रायल लोकांची सुटका आणि मरणापासून त्यांचे रक्षण व्हावे म्हणून हा वल्हांडणाचा सण साजरा केला जात असे आणि ह्या सणात कोकरू अर्पण केले जात असे (निर्गम १२:१-३०). येशूचे वल्हांडणाचे भोजन हे ऐतिहासिक बनले. येशू स्वतः कोकरू बनला व स्वताःस अर्पण केले, आणि आज सुद्धा आपण ते प्रभू भोजन मिस्सावेळीस करीत असतो. हे भोजन ख्रिस्ती उपासनेतील प्रमुख भाग बनले आहे. वल्हांडणाच्या भोजनातील भाकर व द्राक्षरस हे त्याच्या शरीर व रक्ताचे प्रतिक बनले आहे. येशू ख्रिस्त म्हणतो, “हे तुम्ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आणि रक्त आहे” (मत्तय २६:२६-२७). तसेच त्याने शिष्यास म्हटले कि, “असे माझ्या आठवणीत रोज करावे, जोपर्यंत मी माझ्या गौरवामध्ये परत येईन.”
येशू ख्रिस्ताचा विश्वासघात करणारे, त्याला विकणारे, त्याची मारहाण व निंदा करणारे सुद्धा आपल्या पैकीच होते. परंतु तिथे असे सुद्धा लोक होते जी येशुसाठी सर्व काही करण्यास तत्पर असत. पवित्र मरिया जी येशुपासून कधीच दूर गेली नाही; सिरेनिकर सिमोन ज्याने आपल्या पापांचा भार वाहण्यास येशूची मदत केली; वेरोनिका जिने आपली पापे येशूच्या चेहऱ्यावरून पुसली; आणि दुसरे काही लोक ज्यांनी येशूचा जयजयकार करत येरुशलेम नगरीत स्वागत केले.
ह्या पवित्र आठवड्यात येशूच्या दुःख सहनात सहभागी होत असतांना आपण खऱ्या मनाने स्वतःला पडताळून पाहूया कि, आपण कोणत्या लोकांप्रमाणे वागतो. ज्या लोकांनी येशूचा विश्वासघात केला कि ज्यांनी येशूला सहकार्य केले. आपण खरे ख्रिस्ती जीवन जगतो का? येशूचा भार आपण हलका करतो का? ह्याचा विचार करून खऱ्या अंतःकरणाने प्रभूच्या दुःख सहनात सहभागी होऊन प्रभूच्या पुनरुत्थानाची तयारी करूया.  

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद : हे दयावंत पिता आमची प्रार्थना ऐकून घे.

१.     ख्रिस्त सभेची धुरा वाहणारे, पोप महाशय, बिशप्स, कार्डीनल्स, सर्व धर्मगुरु व व्रतस्त जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्यरत आहेत, ह्या सर्वाना परमेश्वराचा आशीर्वाद लाभावा व त्यांनी देवाचे कार्य अखंडित चालू ठेऊन एक उत्तम जीवनाचा धडा लोकांपर्यंत पोहचवावा म्हणून आपण प्रार्थना करुया.    
२.     जे लोक देऊळ मातेपासून दुरावलेले आहेत त्यांनी जगाची पापे दूर करणाऱ्या देवाच्या कोकराला ओळखावे व ख्रिस्ताच्या प्रकाशात त्यांचे मनपरिवर्तन व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३.     हा पवित्र आठवडा चांगल्या रीतीने व्यतीत करावा व येशूच्या दुःखसहनात सहभागी होऊन दुसऱ्यांना येश्याच्या जवळ बोलावून घ्यावे म्हणून प्रार्थना करूया.
४.     जे लोक दुःखी, कष्टी व आजारी आहेत त्यांना प्रभूच्या स्पर्शाने चांगले आरोग्य लाभावे व त्यांचे जीवन सुखी व समाधानी बनावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

५.     आपण आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक गरजांसाठी प्रार्थना करूया.

Wednesday, 29 March 2017




Reflection for the Homily of 5th Sunday of Lent (02-04-2017) by Minin Wadkar.









उपवास काळातील पाचवा रविवार



दिनांक: ०२/०४/२०१७.
पहिले वाचन: यहेज्केल ३७:१२-१४.
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:८-११.
शुभवर्तमान : योहान ११:१:४५.






'मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो  

तो मेला असेल तरी जगेल.' 






प्रस्तावना:

       आज आपण उपवास काळातील पाचवा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्याला येशूच्या पुनरुत्थानावर मनन चिंतन करण्यासाठी बोलावीत आहे.
   पहिल्या वाचनात आपण ऐकतो कि, इस्रायल लोकांची पापे व वाईट जीवन बाजूला सारून परमेश्वर देवाने त्यांची पाठराखण केली व चांगले जीवन जगण्यासाठी त्यांना प्रेरित केले. संत पौल सांगतो कि बाप्तीस्म्यामुळे आपण सारे ख्रिस्ती भाविक ख्रिस्तामध्ये जीवन जगत आहोत. हे ख्रिस्ती जीवन आपल्याला नवीन जीवन देते. तर शुभवर्तमानात येशूने लाजरसला मरणातून उठवून त्याला पुनरुत्थित जीवन प्राप्त करून दिले ह्याचा वृतांत ऐकतो.
    लाजरसला मरणातून उठूवून येशू ख्रिस्त स्वत:च्या पुनरुत्थानाबद्दलचे भाकीत करत आहे. जर आपण येशूमध्ये राहिलो, येशू सारखे जीवन जगलो तर आपले जीवन फलदृपी होऊ शकते. ह्यासाठी लागणारी कृपा व सामर्थ्य ह्या पवित्र मिसाबलीदानात सहभागी होत असताना परमेश्वराकडे मागुया. 

सम्यक विवरण

पहिले वाचन: यहेज्केल ३७:१२-१४

   जेव्हा यहेज्केलने राजा जोकिम बरोबर बाबीलोनला हद्दपार केले तेव्हा यहेज्केल येरुशलेम मंदिराचा याजक होता. बाबिलोनमध्ये असताना त्याने लोकांची पापे, वाईट कृत्ये नजरेसमोर आणली व त्यांच्या जीवनात सुदैवाचे सावट येईल असे भाकीत करतो. येरुशलेम व तिचे मंदिर बाबिलोनच्या हाती नष्ट होणार व शिल्लक राहिलेले सर्व काही साहित्य, मालमत्ता ते त्यांच्या ताब्यात नेतील. याचे कारण म्हणजे, इस्रायल लोकांनी देवाला नाकारले होते. असे असूनही, यहेज्केल यिर्मया संदेष्टाप्रमाणे लोकांना स्फूर्ती देतो. परमेश्वर देव त्यांचा पुन्हा एकदा स्विकार करणार व त्यांच्यामध्ये वास्तव्य करणार असे तो सांगतो (३६:२५).
     यहेज्केलच्या पुस्तकातून घेतलेले हे वाचन किंवा ओव्या प्रोस्ताहन व आशेने भरलेले आहे. यहेज्केल संदेष्ट देवाचे शब्द बोलतो. देवाचे वर्णन करीत असताना तो म्हणतो इस्रायल लोकांना पुनरुत्थित करून नवीन जीवन देणार आहे. इस्रायल लोक नैराश्याने जीवन जगत होते. परंतु परमेश्वर देव म्हणतो कि, मी तुम्हांला नवीन जीवन देईन. सर्व गुलामगिरीचे जीवन नष्ट करीन. जरी इस्रायल लोकांनी देवाला नाकारले तरीदेखील ते देवाने निवडलेली लोक होती. परमेश्वराचा आत्मा त्यांच्यामध्ये वस्ती करील आणि त्यांच्या जीवनाला नवीन दिशा प्राप्त होईल. बंदिवासातील जीवन नष्ट होऊन त्यांना परमेश्वर देव त्यांची भूमी त्यांना परत मिळवून देणार आहे. शेवटी लोकांना जाणीव होणार कि देवाने आम्हासाठी महत्कृत्ये केलेली आहेत. 

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:८-११.

     संत पौल सातत्याने मानवी देहाचा उल्लेख करतो. जे देहस्वभावाचे आहेत त्यांना देवाला प्रसन्न करता येत नाही. कारण हे देहस्वभावी लोक पापांत गुरफटून जातात. त्यांना धार्मिक जीवनाचा किंवा देवाचा विसर पडत असतो. अशावेळी ते देवाचा अपमान करतात.
     ख्रिस्ती लोकांना उद्देशून पौल सांगतो कि तुम्ही ख्रिस्तामध्ये स्नानसंस्काराद्वारे तुमच्या पापाला मेलेले आहात. पौल सांगतो (रोम ६:३-४) कि, “तुम्हांला माहित नाही कि, ज्या आपण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतला आहे त्याच्या मरणातही आपला समावेश करण्यात आला आहे. म्हणून आपण त्याच्या मरणातील बाप्तीस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो यासाठी कि, पित्याच्या गौरवाने ख्रिस्त जसा मेलेल्यांतून उठविला गेला तसे आम्हीही जीवनाच्या नवीनपणात चालावे.
     बाप्तीस्माद्वारे आपल्याला पवित्र आत्म्याचे दान मिळाले आहे. म्हणूनच देवाचा आत्मा आम्हांमध्ये वास्तव्य करतो व आम्ही देहाचे नसून आत्म्याचे होतो. परंतु जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा नसेल तर तो ख्रिस्ताचा होऊ शकत नाही. संत पौल येथे ‘देवाचा आत्मा’, ‘आत्मा’, ख्रिस्ताचा आत्मा’, आणि ‘ख्रिस्त’ अशी वेगवेगळी परिभाषा (शब्द) वापरतो. या सर्वांचा अर्थ म्हणजे बाप्तिस्मा स्वीकारलेल्या लोकांमध्ये देवाचे अस्तिव. पाप, अप्रामाणिकपणा व इतर दुष्कर्मे इत्यादी मुळे आपण देवापासून दूर जात असतो. तरी देखील आपल्याला येशू ख्रिस्त स्वत:मध्ये स्वीकारून आपलं जीवन फलद्रूपी करत असतो. कारण देवपित्याने येशूला मरणातून उठवून ख्रिस्ती लोकांना पुनरुत्थित ख्रिस्ती जीवन जगण्याचे आश्वासन देतो. आपल्याला नवीन जीवन मिळेल.

शुभवर्तमान: योहान ११:१:४५

     संत योहान येथे येशूचे शेवटचे व सर्वात महान कृत्य दर्शवितो. ह्याला दोन कारणे आहेत. एक म्हणजे येशू हा ‘मसीहा’ असून तो ‘देवाचा पुत्र’ आहे आणि दुसरे म्हणजे मुख्य याजक आणि परुशी ह्यांना त्यांच्या जबाबदारीची आठवण करून देणे. हे येशूचे महान कृत्य येरुशलेमपासून थोड्याच अंतरावर घडून आले. ह्यामुळे ह्याची चाहूल परुशी ह्यांना लागली होती (११:४६). त्यांनी आपली बैठक घेऊन येशूला कसे जीवेशी मारायचे ते ठरवले. येशूला व्हलांडन सणाच्यावेळी मारले जावे अशी देवपित्याची इच्छा होती. येशूने पित्याच्या इच्छेप्रमाणे सर्वकाही केले होते. येशूने प्रामाणिकपणे देवपित्याचे कार्य केले होते.

देवाच्या गौरवासाठी आजार
या अध्यायात येशू ख्रिस्ताचे देवत्व’ दाखविणारे एक अति महत्वाचे चिन्ह आहे. लाजरसया नावाचा अर्थ ‘देव मदत करतो.’ येशूची लाजरसच्या कुटुंबावर प्रीती होती. येशू सर्वसमर्थ आहे हे ह्या घराण्यातील सर्वांना ठाऊक होते म्हणूनच येशू ख्रिस्ताचे अधिक गौरव या कुटूंबात प्रकट झाले. लाजरस जेव्हा आजारी पडला तेव्हा लाजरसाच्या बहिणींनी येशु ख्रिस्ताकडे निरोप पाठविला, “प्रभुजी ज्याच्यावर तुमचे प्रेम आहे तो आजारी आहे. त्याच्या आजाराविषयी ऐकताच येशु ख्रिस्ताने आश्चर्यचकीत विधान केले: या आजाराचा शेवट मरण नसून देवाच्या पुत्राचा गौरव व्हावे ह्यासाठी आहे”.

मी पुनरूस्थान आहे
येशू ख्रिस्त आला तेव्हा लाजरसला मरून चार दिवस झाले होते व यहुदी लोक शोक करीत होते. असे कोणालाच वाटत नव्हते कि येशु लाजरसला मरणातून पुन्हा उठवेल. ख्रिस्ताला फक्त माहित होते. म्हणूनच येशु मार्थाला उद्देशून म्हणतो, “तुझा भाऊ पुन्हा उठेल. मार्थाला खात्री होती कि जर येशु ख्रिस्त तेथे असता तर तिचा आजारी भाऊ मेला नसता. प्रभू त्या समयी तेथे नव्हता याचे तिला अतोनात दु:ख झाले होते. तिचा भाऊ पुनरुत्थान दिवशी नक्की उठेल याची तिला खात्री होती कारण ‘पुनरुत्थानाचा प्रभू’ प्रत्यक्ष तिच्या समोरच उभा होता.  

येशू रडला
     मार्था येशूला भेटली. व येशु येताच मरियासुद्धा धावत येऊन येशूच्या पाया पडली. या भावाच्या आजारात त्या दोघींनी येशूची खूप वाट बघितली होती. तिचे रडणे पाहून इतरही रडू लागले. येशु सुद्धा त्यांच्याबरोबर रडला. हे येशूचे रडणे हे त्याचे प्रेम होते. येशु ख्रिस्ताने जे प्रेम वधस्तंभावर प्रकट केले ते सर्व जगावर असलेले प्रेम दिसून आले. त्या प्रेमाने येशूने पापाची व मरणाची सत्ता मोडली.

विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील  
या प्रभूच्या शब्दांनी मार्था व मारियाच्या मनाची तयारी झाली. येशु ख्रिस्ताने धोंड काढलेल्या गुहेसमोर प्रार्थना केली; देवपित्याने येशूची प्रार्थना ऐकली त्याबद्दल येशूने पित्याचे आभार मानले. तेही जमलेल्या लोकांनी विश्वास धरावा ह्यासाठी येशूने हे अदभूत कार्य केले. ‘लाजरस बाहेर ये’ हे ऐकताच त्या मेलेल्या माणसाने त्याची हाक ऐकली व तो जिवंत होऊन बाहेर आला. त्याला पूर्वीचे शरीर होते.

मनन चिंतन:

     मेलेल्यांतून पुन्हा जिवंत व्हावे असे साहजिकच प्रत्येकाला वाटत असते. जेव्हा एखादी आवडती, प्रिय किंवा घरातील व्यक्ती मरण पावते, तेव्हा आपल्याला फार दु:ख होते. ‘देवा तू त्याला वाचवले असते तर खूप बरे झाले असते’ असे आपण खऱ्या अंतकरणाने देवाकडे विनवणी करत असतो.
     येशुचे मार्था, मारिया आणि लाजरसवर अपार प्रेम होते. लाजरसच्या मरणावर  मार्था व मारिया ह्यांनी खूप शोक केला. ह्या कारणामुळे त्यांना खूप वाईट वाटले होते. येशू जर तेथे असता तर लाजरस मेला नसता असा त्यांचा विश्वास होता. परंतु लाजरसच्या मरणाला चार दिवस झाले होते. येशू चार दिवसानंतर मार्थाच्या घरी आला होता. लोकांनी लाजरस मेला आहे असे गृहीत धरले होते. लाजरसच्या शरिराला वास येत होता. देवाचे वाचन आपल्याला सांगते, ‘देवाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही’ (लुक १:३७). ‘पुनरुत्थान व जीवन मीच आहे, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला तरी जगेल’ (योहान ११:२५). हे शब्द जेव्हा मार्था व मारियाने ऐकले तेव्हा त्यांचा विश्वास वाढला. व येशूने लाजरसला नवीन जीवन म्हणजेच पुनरुत्थान दिले. ‘लाजरस बाहेर ये’ असे जेव्हा येशूने मोठ्याने म्हटले तेव्हा मरण पावलेला लाजरस खडग्यातून बाहेर आला व त्याला नवीन पुनरूत्थानाचे जीवन प्राप्त झाले. मार्था, मारिया व इतर लोकांचा येशुवरील विश्वास वाढला व त्यांनी देवाचे गौरव गायले.
     ख्रिस्तीधर्मात पुनरुत्थानाला फार महत्व आहे. येशू म्हणतो, “पुनरुत्थान व जीवन मीच आहे, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला तरी जगेल” (योहान ११:२५). याचा अर्थ असा कि आमच्या मरणानंतर आमचे पुनरुत्थान हे येशूच्या सानिध्यात आम्हांला प्राप्त होईल. मरण हि अशी बाब आहे कि तिला कोणीही पाठ फिरवू शकत नाही. मरण हे सर्वांना येणार आहे. परंतु मरणानंतर काय? असा प्रश्न जेव्हा व्यक्तीला पडतो तेव्हा ती व्यक्ती देवाकडे विनवणी करते कि हे देवा मला स्वर्गात ने. माझ्या विश्वासाला तुझ्या स्वर्गाचे दार उघडे कर जेणेकरून मला सदैव तुझ्या संगतीत राहावयास मिळेल.
     संत अगुस्तीन म्हणतात, ‘ज्या परमेश्वर देवाने मला निर्माण केले आहे तो देव माझ्या सहकार्याशिवाय माझे तारण करू शकणार नाही’. याचा अर्थ असा कि मी स्वत: काहीतरी केले पाहिजे. ‘तर पहिल्यांदा तुम्ही देवाचे राज्य व त्याचे नितीमत्व मिळविण्याचा प्रयत्न करा म्हणजे त्या बरोबर या सर्व गोष्टीही तुम्हांला मिळतील (मत्तय ६:३३).’ जेव्हा आम्ही देवाच्या आज्ञेप्रमाणे चालतो तेव्हा आमचे पुनरुत्थान होत असते. म्हणजेच आपल्याला देवाचा खरा अनुभव येत असतो.
     इस्रायल लोक त्यांच्या वाईट कृत्यामुळे देवापासून दूर जात होते. यह्ज्केल संदेष्ट त्यांना प्रभूचे वचन देतो. ‘माझ्या माणसांनो, मी कबरी उघडून तुम्हांला त्यातून बाहेर काढल्यावर त्यांना कळेल कि मीच परमेश्वर आहे. मी तुमच्यात माझा आत्मा ओतीन म्हणजे तुम्ही पुन्हा जिवंत व्हाल’ (यहेज्केल ३७:१२-१४). पुन्हा जिवंत होणे म्हणजे प्रभूचा मार्ग स्वीकारणे होय. संत पौल सांगतो कि, “तुम्हाला माहित नाही का कि ज्या आपण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतला होतात त्या आपल्या त्याच्या मरणातही बाप्तिस्मा झाला. म्हणून आपण त्याच्या मरणातील बाप्तीस्म्याने त्याच्या बरोबर पुरले गेलो यासाठी कि, पित्याच्या गौरवाने ख्रिस्त जसा मेलेल्यांतून उठविला गेला तसे आम्हीही जीवनाच्या नवीनपणात चालावे (रोम ६:३-४).
     येशूचे ‘लाजरसला मरणातून उठवणे’ हे त्याचे मोठे कार्य त्याच्या स्वत:च्या पुनरुत्थानाबद्दल सुद्धा आपल्याला सांगते. येशू सुद्धा मरणार व तिसऱ्या दिवशी मरणातून उठणार असे देवाचे वचन आपल्याला सांगते. आपले पुनरुत्थान हे देवाच्या हाती आहे. देवाच्या सानिध्यात राहण्यासाठी प्रत्येक ख्रिस्ती भाविकाला देवावर विश्वास ठेवण्याची अत्यंत गरज आहे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक.

१. आपले परमगुरु, महागुरू, सर्व धर्मगुरू व व्रतस्थांनी आपल्या श्रद्धेत दृढ होऊन आपल्याला प्रभूच्या राज्यात प्रवेश करण्यास मार्गदर्शन करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपण सर्व पापी आहोत ह्याची जाणीव आपणा प्रत्येकाला व्हावी व या प्रायश्चित काळात आपण सर्वांनी आपल्या पापांना मरून प्रभूठायी पुनरुत्थित जीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. जे तरुण-तरुणी नोकरीच्या शोधात आहेत त्यांना योग्य अशी नोकरी मिळावी व आपल्या प्रत्येकाच्या कामधंदयावर परमेश्वराचा आशीर्वाद असावा म्हणून आपण प्रार्थना करू या.
४. ज्या व्यक्ती आजारीनिराशीत आणि दु:खी कष्टी आहेत अशा सर्वांना प्रभू-प्रेमाचा स्पर्श व्हावा व त्यांचे जीवन प्रभू प्रेमाने प्रफुल्लीत व्हावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
६. थोडा वेळ शांत राहून  आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.