Thursday, 5 July 2018


Reflections for the homily of 14th Sunday in Ordinary time 
(08-07-2018) by: Fr Malcolm Dinis





सामान्य काळातील चौदावा रविवार

दिनांक -  ८-७-२०१८
पहिले वाचन – यहेज्केल २:२-५
दुसरे वाचन – २ करिंथ १२:७-१०
शुभवर्तमान -  मार्क ६:१-६


“जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे.”



प्रस्तावना

     आज संपूर्ण ख्रिस्तसभा सामान्य काळातील चौदावा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपल्याला परमेश्वराच्या पाचारणाकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी आमंत्रित करीत आहे.
     आजच्या पहिल्या वाचनात परमेश्वर संदेष्टा यहेज्केलला इस्रायलचा उद्धार करण्यासाठी पाचारण करीत आहे. तसेच आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्या मिशन कार्यामध्ये परमेश्वराच्या कृपेचे वरदान मागत आहे. आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त ‘संदेष्ट्याचा सन्मान त्याच्या देशात होत नसतो’ असे विधान मांडून आपल्या शिष्यांना आपल्या कार्यामध्ये स्थिर राहण्यासाठी ताकीद देत आहे.
     परमेश्वराने आपल्या सर्वांना त्याचे कार्य पुढे नेण्यासाठी पाचरण केले आहे. परमेश्वराच्या मळ्यात कार्य करीत असताना स्तुतीबरोबर निंदा, टीका आपल्या वाट्याला येणार आहेत. परंतु आपल्या ह्या कार्यामध्ये न डगमगता सतत पुढे जाण्यास आपल्याला परमेश्वराची विशेष कृपाशक्ती मिळावी म्हणून ह्या पवित्र मिस्साबलिदानात प्रार्थना करूया.

पहिले वाचन – यहेज्केल २:२-५

     इस्त्रायलच्या इतिहासात अत्यंत महत्वाचा काळ हा संदेष्ट्याचा काळ होता. समुद्राच्या लाटांनी किनारा धुऊन काढावा तसे हे संदेष्टे समाज धुऊन काढीत. म्हणूनच परमेश्वराने संदेष्टा यहेज्केल ह्याची निवड केली.
परमेश्वर आपल्या निवडलेल्या लोकांसाठी आपली अभिवचने निश्चित पूर्ण करील म्हणून संदेष्टा यहेज्केलची निवड झाली. आपल्या लोकांना इशारा देण्यासाठी आणि त्यांच्यावर एवढी संकटे का आली ते त्यांना समजावून सांगण्यासाठी परमेश्वराने यहेज्केलची निवड केली होती. परमेश्वराची योजना व कार्य काय आहे, हे निराश झालेल्या व कैदेत पडलेल्या लोकांना त्याने बावीस वर्ष बोध करून सांगितले.

दुसरे वाचन - २ करिंथ १२:७-१०

संत पौलाला ख्रिस्ताच्या कार्यामध्ये आपण जरी अशक्त व दुर्बल असलो तरी ख्रिस्त माझ्या अशक्तेत प्रगट होत असतो, हे त्याला दाखवायचे आहे. तो स्वताःचे वर्णन ‘ख्रिस्ताच्या ठायी असलेला एक मनुष्य’ या शब्दात करतो. हे किती स्थिर व गौरवी स्थान होते व तो किती नम्र भूमिका घेतो हे दिसून येते. खोट्या प्रेषितांनी पौलाविरुद्ध आरोप उठविले होते. कारण त्यांना खात्री होती कि, ह्या स्थितीमध्ये संत पौल दुर्बल व कमजोर होणार, परंतु जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे असे सांगून आपले मिशनकार्य त्याने बळकट व सबळ बनविले.

शुभवर्तमान - मार्क ६:१-६

प्रत्येक ख्रिस्ताच्या शिष्याने सोशिक सेवकाचे व्रत घेऊन आपले शिष्यत्व स्विकारावे आणि देवराज्याचा अनुभव घ्यावा, असा इशारा संत मार्क आपल्या शुभवर्तमानातून वाचकांना देत आहे. ख्रिस्ताचा शिष्य जगाच्या लोभात गुंतू नये. त्याने सेवाभावी जीवन जगावे, प्रतिष्ठा, मानसन्मान, पद ह्या गोष्टीसाठी झटू नये तर सतत आपल्या गुरूच्या सेवेचा मंत्र आपल्या जीवनात गिरवावा अशी तो अपेक्षा करतो.
     प्रेषित कार्यामध्ये आपला सतत सन्मानच होणार असे नाही तर निंदा, भेदभाव, टीका, छळ अश्या संकटांना सामोरे जावे लागले असे ठाम मत संत मार्क आजच्या आपल्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशूचा आपल्या लोकांकडून होणाऱ्या धिक्कारातून सांगत आहे.
     ख्रिस्त सभेचे जागतिक मिशन संकटामध्ये चालू ठेवण्यासाठी व मन ,प्रतिष्ठा, अधिकार ह्याची मुळीच आशा न ठेवता ख्रिस्ताला प्रगट करण्यासाठी संत मार्क आपल्या वाचकांना इशारा देत आहे.

बोधकथा

     थॅ।मस नावाचा एक गृहस्थ होता. पत्नी व दोन मुले असा सुखाने संसार करीत होते. आपली पत्नी व तो स्वतः चांगल्या पदावर कामावर असल्या कारणाने त्याला आपल्या कुटुंबाचा गर्व वाटत होता. फक्त रविवारी देवळात मिस्साला जाणे इतकेच कर्तव्य तो करीत होता. बाकी गोष्टीशी त्याला काहीच देण-घेण वाटत नसे.
     एका ‘प्रापंचिक रविवारी’ धर्मगुरूच्या प्रवचनाने त्याच्या मनावर चांगलाच परिणाम झाला व त्या दिवसापासून तो चांगले कार्य करू लागला. इतरांना त्यांच्या अडी-अडचणीत मदत करू लागला. गावातील व धर्मग्रामातील कार्यात तो सक्रीय झाला. त्याचा हा स्वभाव पाहून त्याची मूलगामी ख्रिस्ती समाजाचा प्रमुख नेता म्हणून नेमणूक झाली. मात्र काही गावकऱ्यांना त्याचा हेवा वाटू लागला. त्याच्या पहिल्या वाईट स्वभावाची ते निंदा करू लागले. त्यामुळे कधी कधी त्याला टीकेलाही सामोरे जावे लागले. परंतु प्रेषितकार्याद्वारे आलेल्या ख्रिस्ताच्या अनुभवातून त्याला सहनशक्ती मिळाली होती. त्यामुळे त्याचे कार्य तो पुढे चालवतच राहिला. त्याच्या कार्याबद्दल तो आनंदी व समाधानी होता.

मनन चिंतन
“मी वेचिले फुलांना
काटे ख्रिस्ता मिळाले.”
     प्रत्येक ख्रिस्ती माणूस हा प्रेषित आहे. बाप्तिस्मा घेऊन ख्रिस्ती झाल्यामुळे अनेक अधिकार आपणांस प्राप्त झालेले आहेत, त्याचप्रमाणे काही कर्तव्य देखील आपल्याला पार पडावी लागतात. आपण नावाने केवळ ख्रिस्ती असाल व आपले कार्य शून्य असेल तर आपण ख्रिस्ती असणे केवळ ढोंगीपणाचे लक्षण ठरेल. ख्रिस्ताच्या मळ्यात प्रेषितीय कार्य करत असताना स्तुती बरोबर, निंदा, टीका, छळ आपल्या वाट्याला येणार आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये न डगमगता, येशुख्रिस्ताच्या दुःखसहनाचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आपण आपले मिशन कार्य पुढे चालू ठेवणार आहोत का?
     आजची तिन्ही वाचने आपल्याला आपल्या संकटात, अडी-अडचणीत व निदेंत ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यास व आपली श्रद्धा बळकट करण्यास प्रचारण करीत आहे. प्रिय बंधू-भगिनींनो आपली श्रद्धा हा एक रंगमंच आहे. तो मजबूत असेल तरच त्यावर जीवननृत्य यशस्वी पणे सादर करता येईल.
     आपल्यापैकी बऱ्याच लोकांना वाटते कि, श्रद्धा म्हणजे भक्ती करणे, तीर्थयात्रेला जाणे, नोव्हेना व प्रार्थनेत सहभागी होणे. भक्ती हा श्रद्धेचा भाग असला तरी भक्ती म्हणजे श्रद्धा नव्हे. तसेच एखादी व्यक्ती भक्तिमान असली, बायबल पंडित असली म्हणून ती श्रद्धेमध्ये किंवा विश्वासामध्ये मुळावलेली असेलच असे नाही.
     श्रद्धा म्हणजे परमेश्वर पित्याला शरण जाणे. आपले सर्वस्व, चांगले आणि वाईट त्याच्या हातात सोपविणे. आपल्या रोजच्या जीवनात जे घडते ते सर्व परमेश्वराच्या योजनेनुसार घडते असे समजून ते आनंदाने स्विकारणे. त्याशिवाय येशुख्रिस्ताप्रमाणे निंदेची व टिकेची पर्वा न करता देव राज्य उभारणीसाठी धडपड करीत राहावे. हेच नेमके आजच्या वाचनामध्ये आपण ऐकत आहोत.
     इस्त्रायल किंवा यहुदी, शास्त्री-पुरूशी लोक ज्यांना परमेश्वराने निवडलेले होते तेच लोक परमेश्वराच्या शरण जात नाहीत. जरी त्यांना भक्ती माहित असली तरी ते खऱ्या श्रद्धेपासून दूर होते ह्याचा परिणाम आपण आजच्या शुभवर्तमानामध्ये बघत आहोत की, कशाप्रकारे त्यांनी प्रभू ख्रिस्ताला धिक्कारले. प्रभू ख्रिस्त ह्या आव्हानाला, प्रसंगाला व विवंचनेला धैर्याने सामोरे जातो व म्हणतो ‘संदेष्ट्याचा सन्मान  मात्र त्याच्या देशात होत नसतो’ व आपल्या शिष्यांनासुद्धा भावी जीवनामध्ये आपल्या कार्या मध्ये स्थिर व सबळ राहण्याचा इशारा देतो.
     जी व्यक्ती अश्या प्रसंगांना, संकटांना धैर्याने सामोरे जाते व प्रसन्नतेने परीस्थितीचा स्वीकार करते तीच खरी श्रद्धावान व्यक्ती मानली जाते आणि अश्या खऱ्या श्रद्धेची उदाहरणे आपल्याला पवित्र बायबलमध्ये आढळून येतात. आब्राहम, याकोब, मोशे, येशूचे शिष्य, संत पौल तसेच अनेक साधू-संत संत फ्रान्सिस असिसीकर, संत जॉन मारी वियानी इत्यादी. नव्या करारात श्रद्धेसाठी अनेक महान रक्तसाक्षी होऊन गेले. संत स्टिफनला दगड-धोंड्यांने ठार मारले. तरीही त्याने आपला विश्वास ढळू दिला नाही. पेत्राला उलटे टांगवले. पौलाला अतोनात हालअपेष्टा झाल्या. परंतु, तो मागे हटला नाही. तसेच काही स्त्रियाही श्रद्धेचे नमुने आहेत.
     परंतु आज ख्रिस्तसभेमध्ये अश्याही व्यक्ती आहेत की केवळ आपल्या स्वःताच्या फायद्यासाठी ख्रिस्त सभेचा वापर करतात. मी ख्रिस्तसभेसाठी काय करतो ह्यापेक्षा ख्रिस्तसभा माझ्यासाठी काय करते? हा प्रश्न त्यांना महत्वाचा वाटतो. काही वेळा मिस्साला येणे, दानधर्म करणे, कायद्याचे पालन करणे एवढीच त्याची भूमिका  असते.
     आज प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या वचनाद्वारे आपणा  सर्वानां पाचारण करत आहे, त्याचा प्रेषित होण्यास मी तयार आहे का? माझा वेळ मी त्याच्यासाठी देऊ शकेल का? केवळ, मान, प्रतिष्ठा न मिळवता, कुठलीही अपेक्षा न करता, नि:स्वार्थीपणे देवाचे  कार्य करण्यास  मी तयार आहे का? आजच्या शुभवर्तमाना द्वारे कार्य करीत असताना, येणाऱ्या अडचणींना, निंदेला व टीकेला सामोरे जाण्यास आपणा सर्वांना ख्रिस्ताकडून विशेष कृपाशक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करूया. आमेन.
विश्वासू लोकांची प्रार्थना
प्रतिसाद:- नम्र होऊनी प्रभू तुज करितो प्रार्थना.
1.  ख्रिस्ताचे प्रेषित म्हणून, त्याचे कार्य जगभर पसरविणारे पोप फ्रान्सिस, बिशप्स, धर्मगुरू, धर्मभगिनी ह्या सर्वाना चांगले आरोग्य लाभावे व त्यांच्या कार्यावर प्रभूचा आशिर्वाद असावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
2.  आपल्या जीवनात ख्रिस्ताला अधिक महत्व देऊन त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन गावागावात होणाऱ्या कार्यक्रमात सहभाग घेऊन समेट घडवून आणावा व एकीचा समाज निर्माण व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
3.  आपण प्रेषित कार्य करीत असताना कौतुकाबरोबरच येणाऱ्या टिकेला, अडचणींना सामोरे जाता यावे व अश्या प्रसंगाकडे आशावादी दृष्टीकोनातून पाहता यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
4.  आमच्या धर्मग्रामात जे लोक आजारी आहेत त्यांना तुझा स्पर्श लाभू दे. तसेच जे लोक तुझ्या पासून दूर जात आहे त्यांना तुझ्या प्रेमाची हाक ऐकू यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.    
5.  आता आपल्या स्वतःच्या कौटुंबिक हेतूसाठी तसेच वैयक्तिक गरजांसाठी थोडा वेळ शांत राहून प्रार्थना करूया.





Friday, 29 June 2018


Reflections for the homily of 13th Sunday in Ordinary time 
(01-08-2018) by: Br Robby Fernandez






सामान्य काळातील तेरावा रविवार



मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे



दिनांक – १-८-२०१८
पहिले वाचन – ज्ञानग्रंथ :- १:१३-१५; २:२३-२४
दुसरे वाचन - कारीथकरांस दुसरे पत्र :- ८:७.९.१३-१५
शुभवर्तमान - मार्क :- ५:२१-४३


प्रस्तावना

      आज आपण सामान्य काळातील तेरावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आम्हांस मरण, स्पर्श, आणि विश्वासाची जाणीव करून देत आहे. आजच्या वाचनामधून आपल्याला समजते कि, देव हा सर्वश्रेष्ठ आहे. जेव्हा-जेव्हा मानव परमेश्वरापासून दूर गेला, तेव्हा-तेव्हा देवाने मानवाला पुन्हा त्याच्या जवळ आणले आहे. अनेक प्रकारच्या संकटातून, अडीअडचणीतून देवाने मानवाचा बचाव केला. त्याला आपल्या करुणेचा व मायेचा स्पर्श केला. आजच्या मार्क लिखित शुभवर्तमानात आम्हास दोन दाखले दिलेले आहेत. दोन्ही दाखल्यामध्ये विश्वासाला प्रथम प्राधान्य दिले आहे, म्हणूनच आपल्याला शुभवर्तमानामध्ये असे दिसून येते कि, ह्याच विश्वासामुळे त्या दोन्ही व्यक्ती बऱ्या होतात.
      आपल्या ही जीवनात विश्वासाची नितांत गरज आहे. व तो विश्वास टिकवून ठेवण्यासाठी प्रभूच्या स्पर्शाची गरज आहे. ह्या मिस्साबलीत सहभागी होत असताना, आपण प्रभूकडे विश्वासाची याचना करूया आणि त्याच्या कृपेचा वर्षाव आम्हावर व्हावा म्हणून प्रार्थना करूया.

सम्यक विवरण
पहिले वाचन - न्यानग्रंथ :-१:१३-१५; २:२३-२४

      आजचे पहिले वाचन आपल्याला मरणाकडे नव्या दृष्टीकोनातून पाहायला बोलावत आहे. मरण हे परमेश्वराने निर्माण केले नाही, तर ते माणसाच्या वाईट कर्मा मुळे या जगामध्ये आले. परमेश्वराने माणसाला त्याच्या प्रती रुपा  प्रमाणे बनविले, पण माणूस हा स्वःताच्या स्वार्थापायी त्याने स्वःताचे स्वतंत्र गमावले. आणि त्या मुळे सर्वांना मरणाचा अनुभव घ्यावा लागला.

दुसरे वाचन - करीथकरांस दुसरे पत्र :- ८:७.९.१३-१५

      संत पौल आपणा सर्वांना वाचनातून दानशूर होण्यास पाचारण करत आहे. कारण ज्या परमेश्वराने सर्व काही निर्माण केले व तो धनवान असूनही आम्हासाठी गरीब झाला, अशा हेतूने कि आम्ही सर्व धनवान होऊ.

शुभवर्तमान - मार्क :- ५:२१-४३

      आजच्या  शुभवर्तमानातून मार्क दोन व्यक्तीची प्रतिमा आपल्या समोर मांडत  आहे. एक म्हणजे ‘याईर अधिकारी’ व दुसरी म्हणजे ‘रक्तत्स्रावी स्त्री’. ह्या दोन व्यक्तीच्या विश्वासाची प्रचिती दिसून येते. ह्या विश्वासामुळे त्यांना जे हव होतं ते परमेश्वराने बहाल केले. याईरची मुलगी मरण पावली तेव्हा येशू त्याला म्हणाला, “भिऊ नकोस, विश्वास धर”. त्याच विश्वासापायी त्याच्या मुलीला नवजीवन मिळाले, तसेच त्या स्त्रीचा विश्वास सुद्धा खूप प्रबळ व सखोल असा होता, जेव्हा तिने येशूच्या कपड्यांना स्पर्श केला, लागलीच ती बरी झाली आणि सगळ्यानां तिने येशू विषयी साक्ष दिली. या दोन्ही व्यक्ती आपणा सर्वांना एक नवीन आशेचा किरण दाखवतात, आपल्या जीवनामध्ये कितीही अडी-अडचणी आल्या तरी आपला विश्वास दृढ असायला पाहिजे.

बोधकथा

     हि एक सत्य घटना आहे. जी मुंबई मध्ये घडलेली होती. एका तरुण मुलगा असतो. त्याचे नाव दिनेश असते. तो त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा असतो. अभ्यासामध्ये खूप हुशार. तसेच तो ख्रिस्ती कुटुंबामध्ये वाढलेला असतो. पण त्याचा परमेश्वरावर अजिबात विश्वास नसतो. त्याचे आईवडील त्याला चर्च मध्ये जायला सांगायचे पण तो काही त्यांचे ऐकत नव्हता. एकदा कॉलेज मध्ये असताना तो जमिनीवर कोसळला. शिक्षकांनी त्याला हॉस्पिटल मध्ये हलवले, व त्याच्या आईवडिलांना कळवले. त्याचे आईवडील खूप चिंतेत होते. पण ह्या सर्वांचा परिणाम त्या मुलावर काहीही झाला नाही.
     आईवडिलांनी जेव्हा डॉक्टरकडे विचारले तेव्हा त्यांनी त्यांना सांगितले कि, दिनेशला ब्रेन ट्युमर असल्याने त्याला असे होत आहे. तर लवकरच त्याचे ऑपरेशन नाही केले तर मुलगा दगावू शकतो. दिनेशच्या आईवडीलांच्या  हृदयावर दुखाचा डोंगरच कोसळला. त्यांनी काय करावे ते त्यांना समजत नव्हते. ऑपरेशनसाठी पैसे गोळा केले. ऑपरेशन होऊन सुद्धा तो ट्युमर तसाच होता. त्यांनी मुंबई येथील ताबोर या ठिकाणी जायचे ठरवले. आणि दुसऱ्या दिवशी ते ताबोरला प्रार्थना सेंटरवर गेले व त्या ठिकाणी दोन तीन दिवस राहिले. जेव्हा प्रार्थना चालू होती तेव्हा फादरांनी सागितले कि, परमेश्वर एका तरुणाचा ब्रेन ट्युमर बरा करत आहे, पण त्यासाठी त्याने त्याचा विश्वास दृढ करायला हवा. जेव्हा दिनेश व त्याचे आईवडील ताबोर वरून आले तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा डॉक्टरांजवळ जाऊन चौकशी केली पण त्याचा काहीही उयोग झाला नाही तो ट्युमर तसाच होता. तेव्हा त्याच्या आईला त्या फादारांचे शब्द आठवतात, तेव्हा ती आई तिच्या मुलाकडे जाऊन सांगते कि, जर तू परमेश्वरावर विश्वास दृढ नाही केला तर तुझा हा ट्युमर बरा होऊ शकत नाही. तेव्हा त्या दिनेशला त्याच्या कृतीचा खूप पश्चाताप झाला. व त्याने त्याच्या आईला जोराने मिठी मारून रडू लागला. व तो बोलला होय मी विश्वास ठेवितो. थोड्या वेळा नंतर त्याला ऑपरेशन साठी पुन्हा ऑपरेशन थेटर मध्ये नेले तेव्हा काय चमत्कार झाला, त्या मुलाला असलेला तो ट्युमर त्या ठिकाणी नव्हताच. हे सर्व पाहून डॉक्टराना विश्वास बसत नव्हता. हे सर्व घडले कारण त्याच्या विश्वासामुळे आणि याच विश्वासाने त्याला मरणाच्या दारातून ओढून आणून नवीन जीवन दान दिले.

मनन चिंतन

      “नीतिमान जगे विश्वासाने स्वर्ग त्या मिळे. म्हणून जोपर्यंत आपला श्वास आहे तोपर्यंत आपला विश्वास असायला हवा.”
आजच्या ह्या आधुनिक युगात आपण एवढे गुरफटून गेले आहोत की, आपल्याला दुसऱ्याचा नव्हेच, पण स्वतःचा विचार देखील करायला वेळ नाही. अशा वेळी आपण सर्वजण एकच विचार करतो की, कमी वेळात जास्त कसे मिळवावे किंवा सर्वकाही आपल्याला जलद कसे मिळेल यावर आपला केंद्र बिंदू असतो. जेव्हा परमेश्वरावर श्रद्धा ठेवण्याची वेळ येते तेव्हा सुद्धा आपणाला सर्वकाही जलद हवे असते. जो पर्यंत परमेश्वर चमत्कार करत नाही तोपर्यंत आपण विश्वास ठेवत नाही. गावात अशी म्हणायची प्रथा आहे कि, “जोपर्यंत चमत्कार होत नाही तोपर्यंत आपण नमस्कार करत नाही.’ परमेश्वराला आपण ATM प्रमाणे मानले असते. आपण आपल्या स्वार्थासाठी त्याचा पुरेपूर उपयोग करत असतो. आपण सर्वजण दुःखाचा, कष्टाचा, पापांचा व मरणाचा अनुभव ह्या दैनंदिन जीवनात घेत असतो. आपणा सर्वांना ठाऊक आहे की, परमेश्वर हा दयाळू व कृपाळू आहे. जरी आपण त्याला अन्य दृष्टीकोनातून पाहीले, तरी तो आपल्याला त्याच्या बालकाप्रमाणे पाहत असतो. ह्या जीवनात दुःख, कष्ट व मरण ह्याच अनुभव येतो कारण माणूस परमेश्वरा विरुद्ध गेला, त्यामुळे मरणाने प्रवेश केला. शलमोनाचा ज्ञानग्रंथ २:२३-२४ मध्ये असे नमूद केले आहे की,
“देवाने मानवाला अविनाशी असे निर्माण केले आणि त्याला शाश्वत प्रतीरुपाप्रमाणे बनवले; पण सैतानाच्या द्वेषामुळे मरणाने जगात प्रवेश केला आणि त्याच्या पक्षाच्या असणाऱ्या साऱ्यांना मरणाचा अनुभव येतो.”
 या मरणावर विजय मिळवण्यासाठी येशूने स्वतःचे बलिदान दिले व सैतानाच्या मोहातून सुटका करून दिली व आम्हाला सर्वांना नवजीवन प्राप्त करून दिले.

आजचे वाचन हे मार्क ह्या शुभवर्तमानातील असून याला “ मार्कन सेंडविच” म्हणून हा उतारा प्रसिद्ध आहे. आता हे “मार्कन सेंडविच” म्हणजे काय? बायबलच्या उताऱ्यामध्ये दुसरी घटना, पहिल्या घटनेला व्यत्यय आणते व त्यानंतर पहिल्या घटनेचा किंवा गोष्टीचा अंत होतो, यालाच म्हणतात “मार्कन सेंडविच”. शुभवर्तमनामध्ये येशू चमत्कार करताना दिसत आहे; त्यामुळे त्याच्या अवती-भवती गर्दी जमलेली दिसते. हे लोक त्याला पाहण्यासाठीच नव्हे, तर त्याच्या चमत्काराचा अनुभव घेण्यासाठी आले होते. कारण तो त्यांना एका अदभूत माणसासारखा दिसत होता. त्यामुळे लोकं त्याच्या जवळ आकर्षिली किंवा खेचली जायची, त्यामळे येशू ख्रिस्त खूप लोकप्रिय झाला होता. जर आपण त्याच्या जीवनावर दृष्टीकोन टाकला तर  त्याच्या जीवना मध्ये तीन P’S आढळतात. १) preaching (प्रचार) 2)power (शक्ती) 3)parables(दृष्टांत) ह्या तीन गोष्टीमुळे लोकांचा झुंडी त्याच्या मागे जायच्या. त्याच्या ह्या मधुर वाणीमुळे लोकांना त्याची आस वाटायची. त्याच्या त्या अधिकारयुक्त शब्दापुढे सैतानी शक्ती सुद्धा नतमस्तक व्हायची. तो लोकांना बरे करायचा, त्याने सागितलेल्या सर्व दृष्टातामुळे लोक भारावून जायचे.
आजच्या वाचनामध्ये सुद्धा त्याच प्रकारचे वातावरण पाहायला मिळते. येशू ख्रिस्त दोन व्यक्तींना बरे करतो. पहिली म्हणजे याईराची कन्या आणि दुसरी म्हणजे  रक्तस्त्राव झालेली स्त्री. जर ह्या दोन्ही व्यक्तीची तुलना एकमेकाशी केली तर असे दिसून येते कि, याईर हा नामवंत अधिकारी होता पण त्या स्त्रीचा काहीही दर्जा समाजामध्ये नव्हता. एक बाजूला तो खूप श्रीमंत होता तर दुसरीकडे हि स्त्री आर्थिक दृष्ट्या दुर्बलझाली होती. तसेच यहुदी धर्माच्या परंपरे प्रमाणे ती एक अशुद्ध स्त्री होती. जर तिने कोणाला शिवले तर ते अशुद्ध होत असे. याईर हा मोठा अधिकारी असला तरी त्याने येशू पुढे स्वतःच्या कन्येसाठी भिक मागितली, व त्याच्या पाया पडून त्याने विनंती केली. जेव्हा हि स्त्री तिच्या रोगातून बरी झाली तेव्हा तिने सुद्धा येशूच्या पाया पडून त्याला व जमलेल्या सर्व लोकांना त्या ठिकाणी घडलेली घटना सांगितली. अशा प्रकारे आपल्याला दिसून येते कि, येशू ख्रिस्त हा देव आहे. त्याचे सामर्थ्य रोगावरच नव्हे, तर मरणावर सुद्धा आहे; म्हणून तो याईरच्या मुलीला मरणाच्या दाढेतून उठवतो, व नवजीवन बहाल करतो. असे म्हणतात  कि, ‘निद्रा हे तात्पुरते मरण आहे व मरण हे कायमस्वरुपाची झोप आहे.’ ह्याच कायमस्वरूपी निद्रावर, त्याने कायमस्वरूपी विजय मिळवून आम्हाला अजिंक्याचे दिवस पाहण्यास भाग्य दिले आहे.
परमेश्वर त्याच्या चमत्कारी स्पर्शाने आपल्याला नविन रूप देतो. हे नविन रूप त्याने याईराच्या कन्येला व स्त्रीला बहाल केले. ह्या ठिकाणी दोन चमत्कारी स्पर्श आढळतो. दैवी स्पर्श व मानवी स्पर्श. दैवी स्पर्श- या ठिकाणी खुद्ध परमेश्वर आपणाला भेटायला येतो, उदाहरणार्थ- ‘याईराची कन्या’ व मानवी स्पर्श- या ठिकाणी आपण परमेश्वरा जवळ जातो, उदाहरण म्हणजे-‘रक्तस्त्राव स्त्री’. विश्वास हा आपल्या ख्रिस्ती जीवनाचा पाया असला पाहिजे, आपण फक्त चमत्कारावर न अवलंबून राहता, आपला विश्वास दृढ करणे फार गरजेचे आहे. तर देऊळमाता आपल्याला आवर्जून सांगत आहे कि, चमत्कार पाहून नमस्कार करण्यापेक्षा विश्वास वाढवून चमत्कार अनुभवूया! म्हणून जेव्हा आम्ही परमेश्वरावर खरा विश्वास ठेवतो तेव्हा आम्हाला त्याच्या प्रेमाची, दयेची अनुभूती येते.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे सामर्थ्यशाली प्रभू आमचा विश्वास मजबूत कर.
1.      आपले परमगुरु फ्रान्सीस, महागुरू, सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी यांना  देवाचे काम करण्यासाठी विपुल असा आशीर्वाद मिळवा. ते जे निस्वार्थी काम करतात त्यांच्या त्या  कामामध्ये परमेश्वराचे सहाय्य लाभावे व त्यांनी त्याच्या कार्य द्वारे सर्व ख्रिस्ती लोकांना देवाकडे आणावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
2.      आपल्या सर्व राजकीय नेत्यांनी आपला राजकीय धूर्तपणा सोडून निस्वार्थीपणे लोकांची व देशाची सेवा करावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.
3.      जे आजारी आहेत अश्या सर्वांना सदृढ, शारीरिक व मानसिक आरोग्य लाभावे व त्यांचे सांत्वन व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
4.      जे कोणी देवापासून दूर गेले आहेत त्याच्यासाठी प्रार्थना करूया, जेणेकरून त्यांनी मागे वळून परत एकदा सामर्थ्यशाली येशूला आपला देव म्हणून स्वीकारावे व आपले संपूर्ण जीवन प्रभूची सुवार्ता पसरविण्यासाठी समर्पित करावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
5.      आपण आपल्या वैयक्तिक गरजांसाठी शांतपणे प्रार्थना करूया.


Thursday, 21 June 2018


Reflections for the homily of Solemnity of John the Baptist 
(24-06-2018) by: Br Jackson Nato.




कारण प्रभू त्याच्याबरोबर होता







योहान बाप्तिस्तचा जन्मदिन

दिनांक : २४-०६-२०१८
पहिले वाचन : यशया:- ४९:१-६
दुसरे वाचन : प्रेषिताची कृत्ये:- १३:२३-२६
शुभवर्तमान : लुक:- १:५७-६६,८०

प्रस्तावना

     ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपण योहान बाप्तीस्ता ह्याचा जन्म दिन साजरा करत आहोत. योहान हा बायबल मधील शेवटचा संदेष्टा. त्याने आपले संपूर्ण जीवन देवराज्याच्या तयारीसाठी समर्पित केले. साधेपणा, नम्रता व सत्याशी एकनिष्ठता, ह्या गुणाद्वारे तो देवाशी विश्वासू राहिला.
     आजची तिन्ही वाचने आपल्याला योहानाची विशेष ओळख करून देतात. पहिल्या वाचनात यशया संदेष्टा योहानाचा जन्म व त्याचे कार्य ह्याबद्दल भाकीत करतो. दुसरे वाचन आपल्याला परमेश्वराने योहानाद्वारे पाठविलेल्या तारणाबदल माहिती करून देते. तसेच शुभवर्तमान योहानाच्या रहस्यमय जन्माबद्दल आपल्याला सागत आहे.
     योहान हा देवभिरू होता. देवासाठी जगणे हे त्याचे आद्य ध्येय होते आणि त्यासाठी तो प्राणास मुकला. ह्या मिस्साबलिदानात भाग घेत असताना आपण देवाशी अधिकाधिक विश्वासू होण्यासाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

सम्यक विवरण
पहिले वाचन : यशया:- ४९:१-६

     हा उतारा आपल्याला देवाचा सेवक कोण असेल व त्याचे कार्य काय असेल ह्याविषयी स्पष्टपणे सांगत आहे. इतिहासात जर आपण पहिले तर इस्त्राईल जनता परकीय राष्ट्राच्या छळाला बळी पडली. त्यांच्या जीवनाचा केंद्र बिंदू म्हणजे “मंदिर” पडले गेले. त्यांना बाबिलोन देशात गुलाम म्हणून नेले. अशा परिस्थितीत आपला समूळ नायनाट होईल काय, ह्या विचाराने इस्त्राईल जनता ग्रासली आहे. अशावेळी यशया संदेष्टा त्यांना त्याच्या आशेचा किरण दाखवतो. त्यांचे दुख यातना, गुलामिगिरी हा फक्त मर्यादित आहे, कारण परमेश्वर त्यांच्यामध्ये एक संदेष्टा पाठवील. त्याची ओळख म्हणजे त्याचे मंदिर तो पुन्हा उभारिल, त्यांनी हरवलेली प्रतिष्ठा तो पुनस्थापित करील, आणि हे तारण फक्त इस्त्राईल पुरतेच नव्हे तर दिगंतापर्यंत पसरविल. म्हणजेच परमेश्वराच्या तारणात संपूर्ण जगाचा समावेश असेल.

दुसरे वाचन : प्रेषिताची कृत्ये:- १३:२३-२६

     ह्या उताऱ्यात संत पौल, देवाचे भय बाळगणाऱ्यांना उदेशून सांगतो कि, आपल्याला तारणाची वार्ता पाठवलेली आहे. तो ह्या उताऱ्यात योहानाविषयी सांगतो कि, योहानाने स्वताः त्याची साक्ष दिली. योहान हा एक प्रतीचीत संदेष्टा लोकनी जवळून पहिला होता. त्याने लोकांना बाप्तिस्मा दिला. त्याकाळात बाप्तिस्मा घेणे म्हणजे, यहुदी धर्म व त्याद्वारे “याहावे” हाच देव आहे, असे मत अंगीकारने. पण योहानाने हो घोषणा इस्त्राईल लोकांमध्येसुधा केली म्हणजे जरी ते निवडलेल्या लोकांचे वंशज असले तरीसुद्धा त्यांनी परिवर्तन करून स्वतःला निवडलेले असे पुनर्घोषित करावे. इथे संत पौल एकाच गोष्टीचे तुणतुणे वाजवतो ती म्हणजे “येशू” हा ख्रिस्त आहे आणि त्याची साक्ष योहानाने दिली आहे. आणि जर योहानास आपण खऱ्या देवाचा संदेष्टा मानत असू तर त्याच्या मुखातून येणारे शब्द सुद्धा खरे मानण्यास आपण संकोचू नये.    

शुभवर्तमान : लुक:- १:५७-६६,८०

     ह्या उताऱ्यात लुक आपणास योहानाचा जन्म कथित करत आहे, पण ह्या उताऱ्याचा प्रमुख मुद्दा असा कि देव तारण कार्यास स्वताः सुरुवात करणार आहे आणि ती सुद्धा आपणामध्ये उपस्थित राहून करणार आहे. आणि ह्या तारणात आपणास सहभागी व्हायचे असेल तर आपण पश्चाताप करायला हवा. योहानाचा जन्म रहस्यमयरीत्या झाला. त्याच्या जन्माद्वारे त्याच्या आईवडिलांना आनंद प्राप्त झाला. मग त्याच्या कार्याने तो परमेश्वराच्या आगमनाच्या तयारीची भूमिका बजावणार होता.

मनन चिंतन

     “मजकडून होणारे तारण तू दिगंतापर्यंत न्यावे, म्हणून मी तुला प्रकाश असे नेमितो.”(यशया:४९:६)
     परमेश्वराने ह्या सृष्टीची निमिती केली आणि सर्व वस्तूवर व जीवांवर मनुष्याचे वर्चस्व प्रस्थापित केले. आदाम व हव्वा ह्या दोन व्यक्तीस त्याने सर्व सजीव व अजीव गोष्टीवर अधिकार दिला. कारण ते देवास प्रिय होते. देव त्याच्याबरोबर, त्याच्यामध्ये होता. सर्व काही सुरळीत होते. पण ह्या सुखाचे दिवस काही कालावधीपुरतेच उरले; कारण परमेश्वराने निषिद्ध केलेल्या झाडाचे फळ त्यांनी खाल्ले. देवाच्या आज्ञेचा भंग केला व जगात पाप अवतरले. देव आणि मानवामध्ये दुरावा निर्माण झाला. परमेश्वराने मानवास जवळ आणण्यासाठी वेगवेगळी युक्त्या चालविल्या पण मनुष्य मात्र पापाच्या जाळ्यात अधिकाधिक अडकला गेला. परंतु संपूर्ण जगाचे तारण व्हावे म्हणून परमपित्याने एक योजना आखली व काळाच्या पूर्ततेनंतर येणाऱ्या प्रत्येक पिढीने तारणाचे फळ चोखावे यासाठी योहान बाप्तीस्त्यास बोलाविले.
     आज आपण योहानाचा जन्म दिन साजरा करत आहोत. ख्रिस्ताच्या जन्माने नवीन पर्वाला सुरुवात झाली. पण ह्या पर्वाची पूर्व तयारी करण्यासाठी परमेश्वराने योहानाला निवडिले. योहान हा ख्रिस्ताचा सुकून होता. ख्रिस्त देवराज्य घोषित करणार आहे, त्या अगोदर लोकांना त्याबद्दल जाणीव व्हावी, हे गरजेचे होते. ख्रिस्त ज्यासाठी ते अनेक वर्षे थांबले होते, त्यास स्वीकारण्यास इस्रायेल जनता पात्र असावी म्हणून योहान बाप्तीस्मा देत सर्व ठिकाणी फिरला. “पश्चाताप करा आणि देवाकडे वळा” हा संदेश त्याने गळा फोडून लोकांपर्यंत पोहोचविण्याचा पर्यंत केला.     
     योहानाच्या जीवनावर जर आपण प्रकाश टाकला तर देव किती दयाळू व कनवाळू आहे हे आपल्याला कळून चुकते. खुद्ध “योहान” ह्या नावाचा अर्थ म्हणजे कृपा किंवा द्या. योहानाच्या नावातच परमेश्वराची द्या आपल्याला पाहण्यास मिळते. त्याच्या जन्माने परमेश्वराने त्यांच्या आईवडिलांवर नव्हे तर संपूर्ण जगावर दया केली. आजच्या शुभवर्तमानावर जर आपण नजर फिरविली तर आपल्यला समजतें कि, योहान हा त्याच्या आईवडिलांना त्यांच्या उतारवयात झालेला मुलगा. योहानाची आई अलिशिबा हिला समाजाने वांझ म्हणून ओळखले. यहुदी समाजात वांझपण हे फक्त शारीरिक दोष नव्हे तर पूर्वजाच्या किंवा स्वतःच्या पापामुळे मिळालेला एक शाप. आणि त्यामुळे तिला लोकांपासून होणाऱ्या निंदेला सामोरे जावे लागले. पण त्या टीकेची परमेश्वराने जाणीव घेतली. व उतारवयात आई होण्याचे भाग्य तिच्या पदरात पडले. समाजाने लावलेला शापित ठसा पुसून काढला. लुक १:४८ “परमेश्वराने आपल्या दासीच्या दैन्यावस्तेचे अवलोकन केले.” हे वचन तिच्या जीवनात पूर्णत्वास आणले. योहान ह्या नावामुळे त्याचा पिता जखाऱ्या ह्याची मुखी वाचा उघडली.
     परमेश्वराची दया फक्त योहानाच्या कुटुंबांपुरती मर्यादित नव्हती. तर येणाऱ्या प्रत्येकाला संपूर्ण जगासाठी दयेची दारे उघडी होणार होती. आदम व हव्वाच्या पापामुळे परमेश्वर मनुष्यापासून दूर गेला. तेव्हापासून मनुष्य पापाच्या कचाट्यात सापडला होता. हे दुरावलेले नाते पुन्हा एकदा जुळावे म्हणून परमेश्वराने खुद्ध आपला पुत्र ह्या जगात पाठविण्याचे ठरविले. परमेश्वर आपल्या जवळ येणार आपल्या मध्ये राहणार त्यासाठी पापाची घाण साफ करावी. कारण देव आपल्या घरी येणार आहे. त्याला स्विकारण्यास आपली हृदये तयार असावी म्हणून योहान लोकांना बाप्तिस्मा देत जागोजागी फिरला.
     योहानाच्या जीवनातील महत्वाचा पैलू म्हणजे तुरुंगात असताना त्याच्या मनात संशयाने प्रवेश केला. जो बाहेर देवाच्या नावाने चमत्कार, सत्कृते करत आहे तो नक्कीच मसीहा आहे ना? आपण ज्याला बाप्तिस्मा दिला तो ख्रिस्तच आहे ना? ह्या संशायाशी दोन हात करत असताना तो आपला विश्वास गमावून बसला नाही उलट शिष्यांना पाठवून तो खरोखरच ख्रिस्त आहे अशी चौकशी करून तो अधिक दृढ केला.
     आपले दैनंदिन जीवनावर जर आपण मनन चिंतन केले तर ते योहानापेक्षा काही आगळेवेगळे नाही. अलीशिबेप्रमाणे आपण सुद्धा समाजाच्या निंदेला विनाकारण बळी पडतो. आदम आणि हव्वाप्रमाणे पापासमोर गुडघे टेकतो. योहानाप्रमाणे ख्रिस्तावरील संशय आपल्यामनात घर करून बसतो. अशा वेळी परमेश्वराने आपले तारण केले आहे. आपल्या दैन्यावस्थेतचे परमेश्वर नक्कीच अवलोकन करील. ह्या आशेने पुढे पाऊल टाकून जगलो पाहिजे. योहानाने दिगंतापर्यंत प्रकाश पोहोचवला. ख्रिस्ताची ओळख करून देण्यास शेवटपर्यंत झटला, त्याचप्रमाणे आपण सुद्धा ख्रिस्त दुसऱ्यांना द्यावा, परमेश्वराच्या तारणकार्यात सहभागी व्हावे, म्हणून आपण प्रार्थना करूया. आमेन.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद : हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.

1.       हे परमेश्वरा तुझ्या सेवेत बोलाविलेले आमचे पोप फ्रान्सिस, कार्डीनल्स, बिशप, फादर्स व सर्व व्रतस्त बंधूभगिनी, ह्यांना तुझे कार्य करण्यास शारीरिक व मानसिक आरोग्य मिळावे. तुझ्याशी एकनिष्ठ राहून जगाला तुझी ओळख द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
2.       जे लोक देवापासून दूर गेले आहेत. त्या सर्वाना दैवी दयेचा स्पर्श व्हावा व त्यांनी देवाकडे वळून एक नवीन, विश्वासू जीवन जगावे म्हणून प्रार्थना करूया.
3.       जी कुटुंबे दैनिक वाद-विवादाला बळी पडून मोडकळीस आली आहेत, त्या कुटुंबात शांती नांदावी व प्रेमाला भर यावी म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया.
4.       जी दांपत्ये, असून बाळाच्या देणगीसाठी वाट पाहत आहेत, त्याची प्रार्थना परमेश्वराने ऐकावी व बाळाच्या देणगीने त्याचे जीवन आनंदमय व्हावे म्हणून प्रार्थाना करूया.
5.       ह्या पावसाळी हंगामात चांगला पाऊस पडावा व सर्व प्राणी, पक्षी व शेतीची वाढ चांगल्या प्रकारे व्हावी म्हणून प्रार्थना करूया.  
6. थोड्या वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक हेतूसाठी प्रार्थना करूया.