Tuesday, 16 April 2019


Reflections for the homily for Maundy Thursday (18-04-2019) by Br. Robby Fernandes






आज्ञा रविवार

दिनांक: १८/०४/२०१९
पहिले वाचन: निर्गम १२:१-८, ११-१४
दुसरे वाचन: करिंथकरांस पहिले पत्र ११:२३-२६
शुभवर्तमान: योहान १३:१-१५





‘मी सेवा करून घेण्यासाठी नव्हे, तर सेवा करण्यासाठी आलो आहे’

प्रस्तावना:
          प्रिय बंधू भगिनींनो, आज देऊळमाता ‘आज्ञा गुरुवार’ साजरा करीत आहे. ह्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने तीन गोष्टींची स्थापना केली. पहिली पवित्र मिस्साबालीदान, दुसरी याजक पद किंवा धर्मगुरूंची स्थापना आणि तिसरी म्हणजे त्याने आपणा प्रत्येकासमोर एक सेवेचे, प्रेमाचे आणि नम्रतेचे उदाहरण ठेवले आहे. आजच्या तिन्ही वाचनात ह्या तीन गोष्टींविषयी नमूद केले आहे.
          आजच्या पहिल्या वाचनात आपण यहुदी लोकांनी आपल्या सुटकेच्या स्मरणार्थ साजरा केलेल्या वल्हांडण सणाविषयीचे वर्णन ऐकतो. दुसऱ्या वाचनात संत पौल, पवित्र मिस्सा बलिदानाबद्दल आपले विचार मांडतो. तसेच शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्ताने शिष्यांबरोबर केलेले अखेरचे भोजन, धर्मगुरूपदाची आणि पवित्र मिस्साबलिदानाची स्थापना ह्या दोन अतिशय महत्वपूर्ण घटनांचा संदर्भ येतो.
          अखेरचे भोजन घेत असताना येशूने आपल्या शिष्यांचे पाय धुतले आणि त्यांना सेवेची आज्ञा दिली. ही ख्रिस्ताची आज्ञा आपण सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनात सातत्याने आचरणात आणावी म्हणून आपण ह्या पवित्र प्रभू भोजनात विशेष प्रार्थना करूया. आज सर्व धर्मगुरूंसाठी विशेष प्रार्थना करूया की, प्रभूने त्यांना त्यांच्या कार्यात त्यांना सतत साथ द्यावा.

 सम्यक विवरण:
पहिले वाचन: निर्गम १२:१-८, ११-१४
          निर्गम ह्या पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात आपल्याला व्हलांडण सणाविषयी सांगितलेले आहे. व्हलांडण सणासाठी आपण कशा प्रकारे तयारी करायला हवी ह्याविषयी आपणास ऐकावयास मिळते. तसेच परमेश्वर कशाप्रकारे इस्राएल लोकांबरोबर आहे ह्या विषयीसुध्दा आपणास ऐकावयास मिळते.

दुसरे वाचन: करिंथकरांस पहिले पत्र ११:२३-२६
          संत पौलाचे करिंथकरांस पहिले पत्र ह्यातून आजचे दुसरे वाचन घेतलेले आहे. ह्या वाचनात आपल्याला प्रभू भोजनाविषयी ऐकावयास मिळते. “जेव्हा जेव्हा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो परत येईपर्यंत घोषणा करता.” असे संत पौल आपणास सांगत आहे.

शुभवर्तमान: योहान १३:१-१५
          योहानकृत शुभवर्तमानात आपल्याला येशूने दिलेल्या प्रेमाच्या, नम्रतेच्या आणि सेवेच्या शिकवणुकीविषयी सांगण्यात आले आहे. येशूने स्वतःहून शिष्यांचे पाय धुतले. आणि आपल्या प्रत्येकासाठी तो एक प्रेमाचा, नम्रतेचा आणि सेवेचा आदर्श बनला. जसे मी केले, तसे तुम्ही करा अशी आज्ञा त्याने आपणास दिलेली आहे. कारण तो एक आगळावेगळा गुरु होता.

मनन चिंतन:
          ह्या आधुनिक जगात माणसाचे जीवन हे एवढे गतिमान झालेले आहे की, त्याला दुसऱ्या माणसाची पर्वा नाही. ह्यामुळे तो खऱ्या मानवी जीवनाचा अर्थ हरवून बसला आहे आणि म्हणून  माणुसकी ही कुठेतरी दूर निघून गेल्याचा आभास आपल्याला होत असतो. माणसाने स्वतः ला आधुनिक गोष्टीमध्ये गुंतून ठेवलेले आहे. परमेश्वरापासून तो अधिकाधिक दूर गेलेला आहे.
          आज देऊळमाता आपणा सर्वांना आमंत्रण करत आहे. जे कोणी त्यांच्याच जीवनात गुंतलेले आहेत, व्यस्त झालेले आहेत त्यांना सेवाभावी व प्रेम भावनेने जीवन जगण्यास आजची उपासना बोलावत आहे. आज आपण आज्ञा गुरुवार साजरा करीत आहोत. इंग्रजी मध्ये आज्ञा गुरुवार ला Maundy  Thursday असे म्हटले जाते. Maundy हा शब्द लॅटीन भाषेतून घेतलेला आहे. याचा अर्थ command म्हणजे ‘आज्ञा’ असा होतो. कारण ह्या दिवशी प्रभू येशूने येशूला आज्ञा केली. ही आज्ञा इतरांची सेवा व इतरांवर प्रेम करण्यासाठी होती. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे जीवन हे एक उत्तम असे ह्या दोन मुल्यांचे उदाहरण आहे. प्रभू येशूने शिष्यांचे पाय धुवून झाल्यानंतर त्याने शिष्यांना म्हटले, “कारण जसे मी केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हांला उदाहरण घालून दिले.” योहान १३:१५.
          आजची तिन्ही वाचने आपल्याला ‘सेवा’ व ‘प्रेम’ ह्या दोन गोष्टींविषयी सांगत आहेत. कशा प्रकारे आपण सेवा केली पाहिजे किंवा प्रेम केले पाहिजे हे ख्रिस्ताने स्वतः आपणासमोर एक उदाहरण ठेवले आहे. तो देव असूनही त्याने मनुष्याचे पाय धुतले. ज्या देवाने आपली निर्मिती केली तो परमेश्वर आपल्या प्रेमाखातर मनुष्य होऊन आपला सेवक झाला. आणि योहान १३:१४ मध्ये येशू म्हणतो, “म्हणून मी जो प्रभु आणि गुरु असूनही मी तुमचे पाय धुतले तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुवावे.” याचा अर्थ आपण येशूने दिलेला सेवेचा, प्रेमाचा व नम्रतेचा कित्ता आपल्या जीवनात गिरवला पाहिजे. जरी आपण ह्या जगात जगत असलो, तरी जगाच्या शिकवणुकीनुसार न जगता आपण ख्रिस्ताने शिकविलेल्या मार्गावर चालले पाहिजे.
          आजचे शुभवर्तमान आपल्याला तीन गोष्टींची आठवण करून देत आहे.
१. ख्रिस्ताने मिस्सा बलिदानाची स्थापना केली:
          लूक २२:१९-२० येथे आपण वाचतो की, ख्रिस्ताने स्वतःचे शरीर आणि रक्त आपणा सर्वांच्या तारणासाठी दिले व सांगितले की,माझ्या स्मरणार्थ हे करा. तेव्हा मिस्साबलिदानाची स्थापना झाली. प्रत्येक मिस्सा बलिदानामध्ये आपण येशू ख्रिस्ताचे कष्ट व मरण यांचे स्मरण करतो. मिस्सा बलिदानाच्या स्थापनेमध्ये येशूने याजकपणाची सुध्दा स्थापना केली. त्याद्वारे आपणसुद्धा परमेश्वराच्या तारणकार्यांमध्ये सहभागी झालो.  २. ख्रिस्ताने शिष्यांना प्रेम करण्यास दिलेली नवीन आज्ञा:
          येशूने प्रीतीचा किंवा प्रेमाचा महामंत्र शिष्यांना दिला. जरी ख्रिस्ताला सर्व ठाऊक होते, कोण त्याचा घात घेणार, कोण त्याला नाकारणार, सर्व शिष्य त्याला सोडून पळून जाणार तरी सुध्दा येशूने त्यांच्यावर प्रीती केली. योहान च्या शुभवर्तमान १३:३४ मध्ये आपण वाचतो की, “मी तुम्हांला नवी आज्ञा देतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीति करा. जशी मी तुम्हांवर प्रीति केली आहे, तशीच तुम्हीही एकमेकांवर प्रीति करा.” 
३. ख्रिस्ताने शिष्यांचे पाय धुवून नम्रतेचा आणि शिकवलेला प्रेमाचा धडा:
          अतिशय महत्त्वाचे म्हणजे आपण जे बोलतो ते कृतीत आणणे. सर्व लोक आपल्याला प्रेमाबद्दल सांगू शकतात, बोलू शकतात. पण ते कृतीत दाखविणे फार कठीण असते. येशूने फक्त बोलून नव्हे, तर आपल्या संपूर्ण जीवनाद्वारे कशाप्रकारे इतरांवर प्रीती आपण केली पाहिजे किंवा कशाप्रकारे नम्रतेचे किंवा सेवेचे जीवन जगले पाहिजे हे दाखविले आहे. तो नम्र होऊन त्याच्याच शिष्यांचे पाय धुतो. आणि उत्तम असा नम्रतेचा आणि सेवेचा धडा आपणास शिकवितो. ज्या प्रमाणे ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांचे पाय धुतले त्याप्रमाणे आपणही एकमेकांची सेवा करण्यासाठी तयार असलो पाहिजे.
          ह्या आज्ञा गुरुवारी ख्रिस्तसभा आपल्याला प्रेम करण्यास, सेवा करण्यास आणि नम्रतेने येशू सारखे जीवन जगण्यास बोलावत आहे.

बोधकथा:
          एका गावामध्ये एक मठ होता. त्या मठात फक्त वृध्द मठवाशी राहत होते. मठाचे प्रमुख किंवा मठाधिपती सुध्दा खूप वायोस्कर होते. एकदा हे मठाधिपती त्याच्या मित्राला भेटण्यासाठी जातात. ते बोलत असता त्यांचा मित्र त्यांना म्हणतो, फादर आज तुम्ही फार दुःखी दिसता? काय कारण आहे? तेव्हा त्या मठाधिपतीणे त्यांची सर्व दूरदशा त्यांना सांगितली. ते म्हणाले, आमच्या मठात सर्व मठवाशी हे वायोस्कर झालेले आहेत व गेली कित्येक वर्षे कोणीही तरुण आमच्या मठात मठवाशी, होण्यासाठी आलेला नाही. काही वर्षानंतर अशी सुध्दा वेळ येईल की, आमचा मठ रिकामी होईल व कोणीही मठवाशी मठात दिसणार नाही. 
          ही सर्व कथा ऐकून झाल्यानंतर त्या मित्राने सांगितले की, फादर मी तर एक संसारी माणूस आहे. मला तुमच्या जीवनाबद्दल फारस काही समजत नाही. पण मला माहीत आहे की तुमच्या पैकी एक जन ख्रिस्त आहे. मग त्या मठाधिपती म्हणाला, तो ख्रिस्त कोण आहे ते मला सांग. मग तो मित्र म्हणाला, “तो ख्रिस्त कोण आहे ते मला ठाऊक नाही. पण तो तुमच्या मधला एक आहे हे मात्र नक्की.”  थोड्यावेळ बोलून झाल्यानंतर मठाधिपती मठात आले व सर्व गोष्ट त्याने त्या मठवाश्यांना सांगितली. सर्व मठवाशी अगदी आश्चर्यचकित झाले. सर्वाना वाटलं की माझा हा मठवाशी बंधूच ख्रिस्त असेल. म्हणून प्रत्येकजण एकमेकाचा आदर करू लागले, सर्वांना प्रेमाने व आदराने वागवू लागले.
          थोड्या दिवसानंतर त्यांच्या जीवनात भरपूर असा बदल घडून आला होता. तेथे प्रेमाचे, प्रार्थनेचे आणि देवाच्या वात्सल्याचे वातावरण निर्माण झाले होते. ही गोष्ट हळूहळू सगळीकडे पसरली आणि अनेक तरुणांनी मठात भरती केली. कारण प्रत्येक मठवाशी हा प्रेमाने व आदराने जीवन जगात होता. ह्या प्रेमाच्या मार्गामुळे त्या मठाला नवीन रूप मिळाल होत.       

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभू आमची प्रार्थना ऐक व तुझी सेवा करण्यास प्रेरणा दे.
१. आपले परमगुरु, महागुरू, धर्मगुरू, आणि व्रतस्थ ह्यांनी लोकांना दुःख, यातना व मृत्यू यांना सकारात्मक वृत्तीने सामोरे जाण्यास शिकवावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. ह्या उपवास काळातील शेवटच्या दिवसात आपण पूर्ण अंतःकरणाने परमेश्वराकडे येऊन आपल्या जीवनाद्वारे प्रेम व सेवा ही ख्रिस्ताची तत्त्वे समाजामध्ये पसरावीत म्हणून आपण प्रार्थाना करूया.
३. येशूने शिष्यांचे पाय धुवून नम्रतेचा, प्रेमाचा व सेवेचा कित्ता आपल्यासमोर मांडला आहे. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने आपल्या जीवनात हा संदेश कृतीत उतरावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आपल्या सर्व भारत देश वासियांनी ख्रिस्ता प्रमाणे बंधू प्रेमाची भावना जोपासून आपापसात असलेले गैरसमज, वाद विसरून चांगले जीवन जगण्यास परमेश्वराची कृपा लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या सामाजिक व वैयक्तिक गरजा परमेश्वराजवळ मांडूया.    

Thursday, 11 April 2019


Reflections for the homily for Palm Sunday (14-04-2019) by Br. Jackson Nato

 झावळ्यांचा रविवार

दिनांक: १४/०४/२०१९
पहिले वाचन: यशया ५०:४-७
दुसरे वाचन: फिलीपैकरांस पत्र २:६-११
शुभवर्तमान: लूक २२:१४-२३:५६






‘प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो!’

प्रस्तावना:

          ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, आज देऊळमाता झावळ्यांचा रविवार साजरा करीत आहे. आज आपण येशूचे यरुशलेमेत जल्लोषात झालेल्या स्वागताची आठवण करतो. येशू हा दावीदपुत्र परमेश्वराच्या नावाने आला आहे. म्हणून त्याच्या स्वागतास सर्व यरुशलेमवासीय वाटेवर आले. झावळ्या उंचावून, वाटेवर कपडे टाकून व फुले उडवून येशूला गाढवावर बसवून होस्साना गात जल्लोष करीत ते शहरात आले. परमेश्वराच्या नावाने येणारा ख्रिस्त किंवा मसीहा आज आपल्यामध्ये आला आहे, म्हणून ते त्याला शरण गेले.
          आजच्या पहिल्या वाचनात प्रवक्ता यशया आपल्याला सांगत आहे की, परमेश्वराचा सेवक परमेश्वराशी एकनिष्ठ राहील व त्याने दिलेले कार्य पूर्णत्वास नेईल. दुसऱ्या वाचनात संत पौल फिलीप्पैकरांस लिहिलेल्या पत्रात आपणास ख्रिस्ताच्या नम्रपणाविषयी सांगत आहे. त्याने स्वतःचे दैवीपण सोडून, स्वतःला रिक्त करून सेवक झाला व क्रुसावर मरेपर्यंत तो आज्ञेत राहिला. आजचे शुभवर्तमान आपल्याला येशूच्या दुःखसहनात सहभागी होण्यास आमंत्रण देत आहे.
          जल्लोषात प्रवेश केलेल्या येशूला लोकांच्या तिरस्काराला सामोरे जावे लागले. तो क्रुसाच्या भाराखाली चिरडला गेला. कारण तो परमेश्वराच्या योजनेस विश्वासू राहिला. येशू परमेश्वराच्या नावाने आपणास पापमुक्त करण्यास आला. त्याचे आपल्या जीवनात स्वागत करण्यासाठी व त्याला पूर्णता शरण जाण्यासाठी कृपा मिळावी म्हणून ह्या मिसाबलिदानात आपण विशेष प्रार्थना करूया.   

सम्यक विवरण:
पहिले वाचन: यशया ५०:४-७
          आजच्या पहिल्या वाचनात आपण पाहतो की, परमेश्वराचा सेवक परमेश्वराशी एकनिष्ठ राहिल व दुःखात तसेच क्लेशात परमेश्वराने सोपविले कार्य पूर्णतेस नेईल. परमेश्वराने त्याच्या सेवकास कार्य नेमुन दिले आहे आणि ते म्हणजे परमेश्वराची ओळख, तसेच त्याच्या दयेची ओळख लोकांना करून द्यावी. त्यासाठी त्याने त्यास प्रशिक्षित केले आहे. त्याच्या जिभेला कौशलीत केले आहे. पण हे कार्य काही सोपे नव्हे, परमेश्वराचा सेवक म्हणतो की, त्याच्या शब्दांची कदर मात्र सज्जन करतात, पण त्यावेळी दृष्टसुद्धा त्याच प्रमाणात त्याला विरोध करतात. त्याची चेष्टा करून त्याचा उत्साह कमी करतात पण परमेश्वराच्या सेवकाला ह्या गोष्टी थांबवू शकत नाहीत. कारण त्याच्याबरोबर परमेश्वर आहे आणि परमेश्वराचे कार्य हे विरोधकांच्या निंदेपेक्षा मोठे असल्यामुळे ह्या सर्वांचा त्याच्यावर काही परिणाम होणार नाही, तर तो आपली भिस्त परमेश्वरावर ठेवील व परमेश्वर आपणास सहाय्य करेल ह्या आशेने तो आपल्या कार्यास पुढे सरसावत राहील.

दुसरे वाचन: फिलीपैकरांस पत्र २:६-११
          आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपणांस उद्देशून सांगतो की, येशू ख्रिस्त हा देव असूनही त्याने आपली समानता देवाबरोबर मानण्यास लाभ मानला नाही, तर तो नम्र होऊन पृथ्वीवर आला व सेवक झाला. स्वतःच्या वैभवास झिडकारले व एक साधारण मनुष्य म्हणून ह्या पृथ्वीवर जगला. जरी त्याने मानवरूप धारण केले, तरीसुद्धा मानवाच्या पापांत तो सहभागी झाला नाही. ह्याचा प्रत्यय  ‘तो मरणापर्यंत आज्ञेत राहिला’ ह्या ओवीत पहावयास मिळतो. ज्या कार्यासाठी तो ह्या भूतलावर आला होता, त्या कार्यात त्याने स्वतःला झोकून दिले अगदी क्रूसावरील मरणापर्यंत, म्हणून परमेश्वराने त्याला सर्वोश्रेष्ठ नाव बहाल केले. सर्वोच्च पद बहाल केले, ते म्हणजे आपल्या उजवीकडे बसविले. ह्या सर्वांचा हेतू हाच की, भूतलावरील प्रत्येक प्राणीमात्र मनुष्य सजीव व निर्जीव त्याच्या समोर गुडघे टेकतील व येशू ख्रिस्त हाच प्रभू आहे हे जाहीर करतील.

शुभवर्तमान: लूक २२:१४-२३:५६
          आजच्या शुभवर्तमानात आपण येशूच्या दुःखसहनाचा अनुभव घेतो. ह्या दुःख सहनात येशूचा यहुदा इस्कारयोत ह्याने केलेला विश्वासघात, पेत्राचे येशूला नाकारणे, व्हल्हांडणाचे भोजन, येशूला अटक, येशूने कालवरी पर्वतावर वाहिलेला वजनी क्रूस, त्याला क्रुसावर खिळणे व त्याचे मरण ह्या सर्व गोष्टी पाहण्यास मिळतात. हे सर्व प्रसंग येशूला असहाय्य करतात. त्याला एकटे पडतात व ह्या सर्व क्रूर प्रसंगातून जाण्यास भाग पडतात. ह्या सर्व गोष्टींमागचा हेतू म्हणजे येशू हा देव आहे. ज्याने मानवरूप धारण केले. जेणेकरून पापांत अडकलेल्या मानवजातीची सुटका होईल व त्यासाठी त्याला आपल्या मरणाने किंमत मोजावी लागली. ह्या सर्व प्रसंगाना सामोरे जाण्यासाठी येशूने यरुशलेम शहरात प्रवेश केला तेव्हा सर्व लोकांनी त्याला ‘राजा’ म्हणून घोषित केले पण येशूने आपले राज्य हे ह्या जगाचे नव्हे, तर स्वर्गाचे आहे हे लोकांना आपल्या मरणातून येशूने पटवून दिले.           

मनन चिंतन:
          आज आपण झावळ्यांचा रविवार किंवा प्रभू येशूच्या दुःख सहनाचा रविवार  साजरा करत आहोत. आजच्या दिवसाचे महत्त्व म्हणजे आज आपण पवित्र आठवड्यात पदार्पण करत आहोत पण त्याहून अधिक महत्त्वाचे म्हणजे जल्लोषमय वातावरणात यरूशलेमेत झालेले येशूचे पदार्पण आणि त्याच तीव्रतेने त्याचा झालेला धिक्कार ह्या दोन गोष्टींच्या विरोधाभासावर मनन चिंतन करतो.
          आज आपण झावळ्या उंचावून येशू हा दावीदपुत्र आहे आणि प्रभूच्या नावाने जो येणार होता तोच ख्रिस्त आहे ह्याची घोषणा करतो. हे आपले बोल नव्हेत, तर येशूने जेव्हा यरुशलेमेत प्रवेश केला, तेव्हा  यहुद्यांनी उद्गारलेले हे जल्लोषमय बोल आहेत आणि त्याच शब्दांचा आपण पुनरुच्चार करतो. ह्या प्रसंगावर जर आपण प्रकाश टाकाला, तर आपल्या लक्षात येते की, येशूला यरुशलेमेतून जेव्हा हाकलण्यात आले होते, तदनंतर पहिल्यांदाच येशूने यरुशलेमेत पाऊल टाकले आणि हा त्याचा अखेरचा प्रवेश होता. आपण पाहतो की, येशूने पूर्वेकडील प्रवेशद्वाराने यरूशलेमेत प्रवेश केला. पूर्व दिशा ही महत्त्वाची आहे, कारण यहेजकेल संदेष्ट्याच्या भविष्यवाणीनुसार मसीहा हा पूर्वीकडून येणार आहे आणि ह्याच आशेने सर्व यहुदी यरूशलेमेच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराशी मसिहाच्या स्वागतासाठी उभे होते.    
          ‘येशू हा मसीहा आहे’ हे यहुद्यांनी कसे ओळखले? जर आपण शुभवर्तमानाचा सखोल अभ्यास केला, तर आपल्या लक्षात येते की, जेव्हा येशूने यरुशलेमेत प्रवेश केला, तेव्हा त्याने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला होता. कनान प्रदेशातील सर्व भागात येशूची ख्याती पसरली होती. कारण त्याने अनेक अपंग, आजारी ह्यांना बरे केले होते. अनेकांना त्याने मरणातून उठविले होते. अनेकांच्या जीवनात त्याने बदल घडवून आणले होते. ह्या सर्व गोष्टी ऐकून व पाहून यरुशलेमवासीय थक्क झाले होते म्हणून येशू हाच मसीहा आहे व रोमी लोकांच्या गुलामगिरीतून आपणांस सोडवून, इस्राएलात राजकीय स्थगिती आणेल ह्या भ्रमाने ते येशूच्या स्वागतास आले होते. त्यासाठी त्यांनी येशूला एका गाढवावर बसविले. हातातील झावळ्या उंचावून ‘होस्साना’, ‘प्रभूच्या नावाने येणारा दावीदपुत्र धन्यवादीत असो’ ह्या घोषवाक्यांनी जल्लोष केला. लोकांनी आपल्या कंबरेचे कपडे काढून वाटेवर पसरविले. ह्या सर्वांचा अर्थ असा की, येशू हा राजा आहे आणि आम्ही त्याला शरण जातो. १ राजे १:४३ ह्या अध्यायात आपण पाहतो की, शलमोनचा जेव्हा राज्याभिषेक झाला, तेव्हा शलमोन सुद्धा गाढवावर बसून आला, लोकांनी त्याचा झावळ्या उंचावून स्वीकार केला; तसेच आपण पुढे पाहतो की, शलमोनाने इस्राएल व शेजारील राष्ट्रांमध्ये शांतता पसरविली. येशूचे सुध्दा ह्याचप्रकारे स्वागत करण्यात आले होते आणि येशूचे मिशन हे शांती प्रस्थापित करण्याचे होते. जखऱ्या अध्याय ९ व पुढे आपणांस मसिहाचे राज्य कसे असेल, ह्याचे स्पष्टीकरण मिळते. ह्या सर्व गोष्टीत आपणास एकच संदेश मिळतो, प्रभूच्या नावाने येणारा दावीदपुत्र हा युद्ध करण्यासाठी नव्हे, राजकीय उलथापालथ किंवा जगाच्या मुल्यानुसार राज्य प्रस्थापित करण्यासाठी नव्हे, तर लोकांना पापांच्या गुलामगिरीतून सोडवून देवाचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी आला होता. यहुदी लोक दैवी मसिहाला नव्हे, तर राजकीय उलथापालथ करणाऱ्या मसिहाला शरण गेले आणि म्हणूनच त्यांनी त्याला आठवड्याभरात कृसाच्या भाराखाली आणले आणि त्या दुःखसहनास बळी पाडले म्हणूनच आपण ह्या दिवसाला ‘झावळ्याचा रविवार’ जिथे येशूला जागतिक राजाचा दर्जा दिला, व ‘येशूच्या दुःखसहनाचा रविवार’ जिथे येशूने कृसाचे दुःखसहन पत्करले ह्या दोन प्रसंगाचा विरोधाभास पहायला मिळतो.
          यहुदी लोकांचे येशूला शरण जाणे, हा जरी देखावा असला, तरी गाढवाने मात्र मसीहाला ओळखले व आपल्या पाठीवर त्या ख्रिस्ताला वाहून तो शरण गेला. झावळ्या मात्र लोकांनी उंचावल्या असल्या, तरी दैवी व खऱ्या राजाच्या स्वागतास त्यांनी जल्लोष केला. कपडे जरी लोकांचे असले, तरी ख्रिस्तासमोर त्यांनी लोटांगण घातले. यरुशलेमेने सुध्दा तारणाऱ्याला स्वीकारण्यास वाट दिली. आज आपणसुद्धा ह्या द्विधा परिस्थितीसमोर उभे आहोत आणि समोर असलेला प्रश्न म्हणजे, ‘मी खरोखर ख्रिस्ताला शरण जातो का?’ कारण ख्रिस्ताला शरण जाणारा त्यावर उलटा फिरणार नाही. त्याचे राज्य हे शांतीचे आहे, हे जाणून ते प्रस्थापित करण्यासाठी झटले पाहिजे ह्यात काही शंका नाही.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक.
१) आपले जीवन देवाच्या कार्यासाठी समर्पित केलेले आपले पोप, बिशप व सर्व धर्मगुरु व धर्मभगिनींना चांगले आरोग्य लाभावे व त्यांच्या कामात प्रभूचा आशीर्वाद लाभावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

२) सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सामाजिक कल्याणाची कामे करत असताना विरोधास तोंड देऊन ख्रिस्ताप्रमाणे ठाम उभे राहावे व त्यांना पवित्र आत्म्याचे पाठबळ लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

३) हा पवित्र आठवडा चांगल्या रीतीने व्यतीत करावा व येशूच्या दुःखसहनात सहभागी होऊन दुसऱ्यांना येशुच्या जवळ बोलावून घ्यावे म्हणून प्रार्थना करूया.

४) जे तरूण-तरूणी देवापासून दूर गेली आहेतजे नोकरीच्या शोधात आहेत व ज्यांना जीवन नकोस झालंय ह्या सर्वांवर देवाचा आर्शिवाद असावाम्हणून आपण प्रार्थना करू या.

५) आता आपण थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक गरजांसाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.  
               

Thursday, 4 April 2019

Reflections for the homily of 5th Sunday of Lent (07-04-2019) by Br. Rahul Rodrigues






उपवास काळातील पाचवा रविवार
दिनांक: ०७/०४/२०१९
पहिले वाचन: यशया ४३:१६-२१
दुसरे वाचन: फिलीप्पैकरांस पत्र ३:८-१४
शुभवर्तमान: योहान ८:१-११




मग मीही तुझा न्याय करीत नाही. आता तू जाऊ शकतेसपण परत पाप करु नकोस.

प्रस्तावना:
          आज उपवास काळातील पाचव्या आठवड्यात आपण पदार्पण करीत आहोत. आजची उपासना पुन्हा एकदा आपल्याला देवाच्या दयेची व क्षमेची जाणीव करून देत आहे. मागच्या रविवारी आपण उधळ्या पुत्राचा दाखला यावर मनन चिंतन केले. आज आपण पुन्हा एकदा दैवी दयेवर व प्रेमावर मनन चिंतन करणार आहोत.
          आजच्या पहिल्या वाचनात प्रवक्ता यशया म्हणतो की, “देव आपल्या लोकांसाठी काहीतरी नवीन करणार आहे. ज्यामुळे त्याचे जीवन अधिक चांगले व सुंदर बनले. तर दुसऱ्या वाचनात संत पौल फिलीप्पैकरांस लिहिलेल्या पत्रात म्हणतो की, येशूला मिळवणे हे एकमेव ध्येय त्याच्या जीवनात आहे व बाकी सर्वकाही त्याच्यासाठी व्यर्थ आहे. पुढे योहानलिखित शुभवर्तमानात आपण पाहतो की, पापविरहित देवाने एका पापी स्त्रीला शिक्षा देण्यास नकार दिला, परंतु पापी लोकांनी त्या स्त्रीला शिक्षा देण्याचे ठरवले होते.
आपला देव हा दयाळू व प्रेमळ आहे. तो सतत आपल्याला आपले जीवन सुधारून त्याच्या मार्गावर चालण्यास पुनःपुन्हा संधी देत असतो आणि उपवासकाळ ही अजून एक संधी आहे, जिथे आपण आपल्या पापांबद्दल प्रायश्चित करतो व देवाच्या जवळ जातो. तर ह्या पवित्र मिस्साबलीदानात देवाच्याजवळ जाण्यास व पापी जीवन सुधारण्यास लागणारी कृपा व शक्ती परमेश्वराजवळ मागुया.

पहिले वाचन: यशया ४३:१६-२१
          यशया हा संदेष्टा बाबीलोनच्या हद्दपारीतील लोकांचे सांत्वन करतो  व सांगतो की, “जो समुद्रात मार्ग, प्रचंड प्रवाहात वाट करितो व ज्याने रथ व घोडे, सैन्य व वीर ह्यांस बाहेर काढले तोच परमेश्वर म्हणतो की, पूर्वीच्या गोष्टीची आठवण करू नका, जुन्या गोष्टी मनात आणू नका. कारण मी एक नवीन गोष्ट करणार आहे. मी तुम्हा सर्वांना एकत्र करणार आहे. तसेच परमेश्वर सांगत आहे की, ‘तुम्ही तुमच्या जुन्या गोष्टीवर विचार करत बसू नका, तर पुढे काय करणार त्यावर विचार करा. कारण मी तुमचा परमेश्वर अरण्यात सडक करील व मरुभूमीत नद्या वाहविन. जर परमेश्वराला ह्या सर्व गोष्टी शक्य असतील, तर परमेश्वर आपल्याला वाईट मार्गावरून चांगल्या मार्गावर जाण्यासाठी नक्कीच मदत करील.

दुसरे वाचन: फिलीप्पैकरांस पत्र ३:८-१४
          आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल सांगतो की, तो स्वतः यहुदी पंडित असल्यामुळे त्याला समाजात मोठ्या मानाचे व आदराचे स्थान होते. परंतु ख्रिस्तासमोर त्याला त्या सर्व गोष्टी केरकचरा वाटू लागल्या. कारण त्या सर्व गोष्टी ख्रिस्ताविषयीचे ज्ञान मिळविण्याच्या आड येत होत्या. ज्यांना ख्रिस्ताचा लाभ झाला. ते ख्रिस्ताठायी आढळले. ‘ख्रिस्त विश्वासणाऱ्यात राहतो व विश्वासणारे ख्रिस्तात’ हे सत्य आपल्या जीवनात प्रगट व्हावे, अशी पौलाची इच्छा होती. नियमशास्त्र पाळून नीतिमान ठरणाऱ्याच्या मागे तो आता लागला नव्हता. ख्रिस्तावरील विश्वासाने देवापासून मिळालेल्या नितीमत्त्वाने तो पूर्ण समाधानी होता. ख्रिस्ताची ओळख अधिकाधिक होत जावी, ही पौलाची उत्कट इच्छा होती. पौलाने अजूनही त्याचे ध्येय गाठले नव्हते. आपण ख्रिस्ताप्रमाणे म्हणजेच ख्रिस्ताचा स्वभाव धारण करावा ह्या ध्येयाच्या मागे पौल, लागला होता. यासाठी ख्रिस्ताने त्याला स्वतःचे केले होते. तो मोठ्या निश्चयाने हे महान ध्येय गाठण्यासाठी धावत होता. त्याच्या जीवनातील मागील गोष्टीकडे त्याने मुद्दामच दुर्लक्ष केले होते. त्याने जे सर्व मिळवले होते किंवा ख्रिस्ती जीवनात जी वाटचाल केली होती, तिच्या विषयीही तो विचार करीत बसला नाही तर, ख्रिस्ताने त्याला ज्या उद्देशाने बोलावले होते किंवा निवडिले होते, तो पूर्ण व्हावा ह्यासाठी धावण्याच्या शर्यतीत पहिले स्थान मिळविण्याच्या इच्छेने धावावे, तसे तो त्या ध्येयामागे लागला होता. ख्रिस्तासारखे होण्याची इच्छा सर्वांनी बाळगावी असे संत पौल कळकळीने लिहितो. ख्रिस्तासारखे होत जाण्याची व ख्रिस्ताबरोबर सतत वाटचाल करण्याची व वाढत जाणारी इच्छा म्हणजे ख्रिस्ती प्रौढतेचे लक्षण आहे.

शुभवर्तमान: योहान ८:१-११
          येशू ख्रिस्ताला स्वतःचे असे ठिकाण नव्हते. असे असूनही त्याने आळसात दिवस काढले नाहीत. पित्याच्या इच्छेप्रमाणे तो दरोरज आपले जीवन जगला. विरोधामुळे त्याने त्याचे कार्य बंद ठेवले नाही. पहाटेस तो मंदिरात गेला व तेथे जमलेल्या लोकांना शिकवू लागला. परमेश्वर पित्याने त्याला दिलेले काम तो तत्परतेने व विश्वासुपणे करत राहिला. हे काम करीत असता त्याला कुठच्या तरी गुन्ह्यामध्ये पकडण्याचा परुशी लोकांचा बेत चालूच होता. म्हणूनच धर्मपुढारी एका व्याभिचारी बाईला मंदिरात घेऊन आले. ती व्यभिचार करताना तिला पकडण्यात आले होते, परंतु व्यभिचार करणाऱ्या पुरुषाला मात्र त्यांनी सोडून दिले होते. त्यांना न्याय दानाची आस्था नव्हती. येशूला दोषी ठरविण्याचा हा त्यांचा फक्त एकमेव डाव होता. जर येशूने दगडमार करा असे म्हटले असते, तर तो रोमी कायद्याविरुद्ध चेतावणी देतो असा आरोप त्यांनी ठेवला असता व जर दगडमार करू नका असे म्हटले असते, तर हा मोशेचे नियमशास्त्र पाळू नका असे शिकवितो असा प्रचार त्यांनी केला असता. येशू उठून उभा राहिला व त्या धर्मपुढाऱ्याना म्हणाला, ‘तुम्हामध्ये जो निष्पाप आहे, त्याने प्रथम दगड टाकावा.’ प्रभू येशूला त्या प्रत्येकाचे जीवनचरित्र ठाऊक होते. ख्रिस्ताच्या पावित्र्यासमोर त्यांना स्वतःच्या पापाची इतकी बोचणी लागली की, ते सर्व तेथून निघून गेले. येशू ख्रिस्ताने त्या स्त्रीला पापक्षमा दिली व पुन्हा पाप न करण्याची आज्ञा दिली.

बोधकथा:
          एक गावात एक चांगला मनुष्य राहत होता. तो फार चांगले जीवन जगत होता. त्याला समाजात चांगले मानाचे व सन्मानाचे स्थान होते. परंतु तो त्याच्या स्वतःच्या जीवनाबद्दल खुश नव्हता; कारण तो एक विशिष्ट पाप खूप वर्षापासून पुन्हा पुन्हा करत होता. प्रत्येक वेळी तो सुधारण्याचा प्रयत्न करी, परंतु तो त्याच पापाच्या आहारी जात असे. मग त्याने निश्चय केला की, जर मी हे पाप पुन्हा केले तर, मी माझ्या डोक्यावरचे दहा केस उपटणार व अखेरीस आत्महत्या करणार.
          एका महिन्यानंतर त्या माणसाच्या डोक्यावर फार कमी केस राहिले होते, अर्थात तो त्या पापाच्या जाळ्यातून सुटू शकत नव्हता. अखेरीस त्या मनुष्याच्या डोक्यावर एकही केस राहिला नाही. मग त्याने विचार केला की, मी ह्या पापापासून वंचित राहू शकत नाही व बंदूक घेऊन स्वतःला गोळी घालणार एवढ्यात एक देवदूत त्याच्यासमोर येतो व त्यास थांबवितो. परंतु तो मनुष्य म्हणतो, मला मरू दे कारण मी निश्चय केला आहे व मी सुधारू शकत नाही. मग देवदूत त्याला म्हणाला थांब. ‘देव तुला काही तरी देऊ इच्छितो व तो एक बॉक्स त्यास देतो. मनुष्य तो बॉक्स उघडतो व पाहतो तर त्या मध्ये एक केसाचा टोप (wig) होता.

मनन चिंतन:
आजच्या शुभवर्तमानात आपल्याला तीन प्रकारची व्यक्तिमत्व पहावयास मिळत आहेत. ते म्हणजे शास्त्री-परुशी, व्यभिचारी स्त्री व येशू.
१. शास्त्री व परुशी:
          शास्त्री व परुशी हे लोक स्वतःला फार उंच व सज्जन मानत असत. व्यावहारिकरित्या पाहिल्यास परुशी हे धर्म पंडिताचे काम करत असत, तर शास्त्री हे कारभारी होते. काही शास्त्री व परुशी लोक येशूच्या विरुद्ध होते. कारण येशूचे वागणे त्यांना त्रासदायक व हानिकारक होते व त्यामुळे ते येशूचा काटा काढण्यासाठी सतत प्रयत्न करीत होते.
          जेव्हा ते त्या व्यभिचारी स्त्रीला घेऊन येतात तेव्हा त्यांना येशूला फसवायचे असते. त्या स्त्रीच्या अब्रूची त्यांना काही पर्वा नसते. त्यांना फक्त त्यांचे उद्दिष्ट महत्वाचे होते व त्यासाठी ते त्या व्यभिचारी स्त्रीला एक साधन म्हणून वापरतात.
          जेव्हा ते येशूला त्या स्त्रीला काय शिक्षा द्यावी असे विचारतात तेव्हा ते येशूला त्याच्या स्वतःच्या शब्दामध्ये पकडण्याचा प्रयत्न करीत होते. कारण मोशेच्या नियमानुसार एखादी व्यक्ती जर का व्याभिचारात पकडल्यास त्यास मरणदंडाची शिक्षा होत असे. जर येशूने तसे करण्यास सांगितले तर ते येशूच्या शिकवणुकी विरुद्ध होईल कारण येशू सतत प्रेम, दया, शांती ह्याविषयी शिकवण देत असे. तसेच रोमी अधिकाऱ्याशिवाय मरणदंडाची शिक्षा कोणी देऊ शकत नव्हते व जर येशूने तसे केले तर त्याला रोमी अधिकाऱ्यानाही उत्तर द्यावे लागेल. तसेच जर का येशूने त्या स्त्रीला तसेच सोडून दिले, तर येशू मोशेने दिलेल्या नियमाचे उल्लंघन करील. परंतु येसू असे काही करत नाही व त्यांनी पसरवलेल्या जाळ्यात त्यानांच पकडतो.
२. व्यभिचारी स्त्री:
          ही स्त्री अतिशय दुर्बल अवस्थेत दिसत आहे. जिची अब्रू त्या परुशी आणि शास्त्री लोकांनी चवाट्यावर काढली होती. तिच्या पापापेक्षा अधिक त्यांनी तिचा छळ केला. ती पूर्णपणे हताश व कमजोर झाली होती. तिच्यामध्ये स्वतःची बाजू मांडण्याची किंवा स्वतःची सुटका करण्याची देखील शक्ती उरली नव्हती.
          येशू तिच्या मदतीस धावून आला कारण तो पाप्यास तारावयास आला आहे. येशू निराश व हताश लोकांचे सांत्वन करून त्यांना बरे करण्यास आला आहे. जेव्हा शास्त्री व परुशी निघून गेले तेव्हा येशूने तिला माफ केले व नव्याने जीवन जगण्यास सांगितले.
३. येशू:
          ह्या दाखल्याद्वारे येशूची करूणा व दया आपणास पहावयास मिळते. शेवटी फक्त दोन व्यक्ती राहीले होते: येशू आणि स्त्री. संत अगस्तीनच्या शब्दात म्हणायचे म्हणजे, “तेथे फक्त दुर्बळपणा (स्त्री) आणि अनंत करुणा (येशू) राहिले होते.” येशू हा पाप-विरहित होता त्यामुळे त्या पापी स्त्रीला शिक्षा देणे येशूच्या हातात होते परंतु, येशू तिला क्षमा करतो. येशू आपल्याला आपल्या पापातून मुक्त करून तारावयास आला आहे.
          आजच्या शुभवर्तमानातून आपणास समजून येते की, आपण आपल्या पापासाठी जबाबदार असतो. आपल्या पापामुळे आपण देवाच्या कृपेपासून वंचित राहिलो आहोत. परंतु आपण आपले पापी जीवन सोडून नेहमी देवाकडे जाऊ शकतो. देव दयाळू आहे व तो सतत आपल्या परत येण्याची वाट पाहत असतो. ज्याप्रमाणे येशू एका पापी स्त्री मध्ये संत बनण्याची क्षमता पाहतो त्याचप्रमाणे ती क्षमता आपल्यामध्ये सुद्धा आहे.
          देव आपल्या पापाकडे पाहत नाही, तर आपल्या परिवर्तनाची वाट पाहत असतो. देवाला आपल्या भूतकाळापेक्षा भविष्यकाळाची चिंता असते. त्यामुळे तो आजच्या पहिल्या वाचनात सांगत आहे की, “तुम्ही आरंभी घडलेल्या गोष्टी आठवू नका, फार पूर्वी घडलेल्या गोष्टींचा विचार करू नका.” “जा आणि पुन्हा पाप करू नको” हे काही निर्णय करणारे विधान नाही, तर प्रोस्ताहित करणारे विधान आहे. देव आपल्याला सतत आपले पापी जीवन सुधारून पवित्र जीवन जगण्यास प्रेरणा व कृपाशक्ती देत असतो.
          एखादी शर्यत जिंकण्यासाठी मागे न पाहता पुढे पाहून धावणे गरजेचे असते. मागे पहिले, तर आपण नक्कीच अडखळून पडू. त्यामुळे संत पौल दुसऱ्या वाचनात सांगत आहे की, “भूतकाळ विसरा व भविष्यकाळाकडे नव्याने वाटचाल करा.” हा उपवासकाळ आपल्याला पुन्हा एकदा आपले पापी जीवन बदलून पवित्र जीवन जगण्यास नव्याने संधी देत आहे. आपले हे पापी जीवन सुधारण्यास लागणारी कृपा शक्ती आपण ह्या मिस्साबलिदानात मागुया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:   
प्रतिसाद: हे प्रभू, आम्हाला पवित्र कर.
१. ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे पोप फ्रान्सिस, महागुरू, धर्मगुरू व सर्व व्रतस्थ ह्यांनी त्यांच्या कार्याद्वारे येशू ख्रिस्ताची ओळख इतरांना पटवून द्यावी व देवाच्या दयेचे व प्रेमाचे अनुभव इतरांना द्यावेत म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. आज जे लोक ख्रिस्तापासून दूरावलेले आहेत, पापाच्या मोहात अडकलेले आहेत त्यांना ख्रिस्ताच्या प्रेमाचा व दयेचा अनुभव यावा व त्यांनी आपले पापी जीवन सोडून ख्रिस्ताच्या मार्गावर चालावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. जे कोणी नोकरीच्या शोधात आहेत, जीवनात हताश झाले आहेत त्यांना प्रभूचा स्पर्श व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. ह्या पवित्र मंदिरामध्ये जमलेल्या आपल्या सर्वांना प्रभूने चांगले आरोग्य द्यावे व ख्रिस्ताप्रमाणे दयाळू बनण्यास शक्ती द्यावी म्हणून आपण प्रार्थना करुया.

५. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक गरजा प्रभूचरणी अर्पण करूया.

Saturday, 30 March 2019

Reflection for the Homily of 4th SUNDAY OF LENT (31-03-19) By Br. Lipton Patil  







उपवास काळातील चौथा रविवार

पहिले वाचन: यहोशवा ५:९अ-१२
दुसरे वाचन: करिंथकरांस दुसरे पत्र ५:१७-२१
शुभवर्तमान: लूक १५:१-३, ११-३२
दिनांक:३१/०३/२०१९ 





विषय: अंधारातून प्रकाशाकडे, सैतानाकडून ख्रिस्ताकडे व ख्रिस्तामध्ये...

प्रस्तावना:
आज आपण प्रायश्चित काळातील चौथ्या रविवारात पदार्पण करीत आहोत. आपण देवाच्या क्षमेचा, दयेचा व अस्सिम प्रेमाचा प्रत्यक्षात अनुभव घेण्यासाठी आजची उपासना आपल्याला निमंत्रण देत आहे.
यहोशवाच्या पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात आपणाला कळून येते की, इस्रायली लोकांनी जुनी जीवनपद्धती सोडून नवीन जीवनाला प्रारंभ केला. दुसऱ्या वाचनात संत पौल करिंथकरांस लिहिलेल्या दुसऱ्या पत्रात सांगतो की, परमेश्वराने ख्रिस्ताद्वारे आपला स्वतःबरोबर समेट केला. जर कोणी ख्रिस्ता ठायी असेल, तर तो नवीन उत्पत्ती आहे. तसेच आजच्या लुकलिखित शुभवर्तमानात उधळ्या पुत्राच्या दाखल्याबद्दल आपण ऐकणार आहोत. आपण सुध्दा आपले जीवन उधळ्या पुत्राप्रमाणे जगून देवाच्या प्रेमापासून दूर गेलो आहोत, परंतु आज देवाच्या प्रेमाचा स्वीकार करण्याची ती वेळ आली आहे. उधळ्यापुत्राप्रमाणे जेव्हा आपण पश्चातापी अंतःकराणाने परमेश्वराकडे धाव घेतो, तेव्हा तो दयाळू बाप आपला स्वीकार करण्यास सतत तयार असतो.
म्हणून पश्चातापी अंतःकराणासाठी आजच्या पवित्र मिसा बलिदानात भक्तीने सहभागी होताना प्रार्थना करुया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: यहोशवा ५:९अ-१२
          इस्रायली लोक जेव्हा इजिप्त देशातून मुक्त होवून एलीस व सिनाय ह्यांच्यातील सीन नावाच्या वाळवंटात आले, तेव्हा त्यांनी देवाविरुद्ध कुरकुर केली. लोक मोशेला म्हणाले की, येथे आम्ही उपाशी मरावे म्हणून तू आम्हाला ह्या वाळवंटात आणले आहेस का? तेव्हा देवाने इस्राएली लोकांना मान्ना दिला. अन्नाचे नाव मान्ना ठेवले, कारण ते तांदळासारखे पांढरे शुभ्र दिसत होते व चवीला मधासारखे होते. काही काळानंतर म्हणजे मोशेच्या मृत्युनंतर यहोशवाने इस्रायली लोकांना कानन देशात आणून व तो प्रदेश ताब्यात घेतला ज्यात दुधामधाच्या नद्या वाहत होत्या. इस्रायली लोकांनी गीलगालात तळ दिल्यावर व्हलांडणाचा सण साजरा केला. व्हलांडण सणाच्या दुसऱ्या दिवशी त्या देशात उत्त्पन्न झालेल्या धान्याची भाकर व हुरडा त्यांनी खाल्ला. त्या दिवसापासून ते देवावर व देवाने पाठविलेल्या अन्नावर अवलंबून राहिले. देवाने दिलेले अन्न इस्रायली लोकांनी खाल्ले व मान्ना बंद झाला व पुन्हा इस्रायली लोकांना मान्ना मिळाला नाही. मग तद्नंतर, इस्रायली लोक वतनभूमीत आले व तेथे त्यांनी नवीन जीवन जगण्यास सुरुवात केली, जुने ते सोडून दिले.

दुसरे वाचन: करिंथकरांस दुसरे पत्र ५:१७-२१
          संत पौल व करिंथकरांतील लोकांमध्ये तणावाचे संबंध झाले होते. काही लोकांनी संत पौलावर हल्ला करून, तो खोटा प्रेषित असल्याचा दावा केला होता. संत पौलवर खूप अन्याय झाला होता, परंतु अशा परिस्थितीत तो लोकांना जवळ बोलवून घेतो असे ह्या पत्रात दिसून येते. तो लोकांना श्रध्देचे जीवन जगण्यास आमंत्रण करतो व म्हणतो, आपली देवाशी मैत्री ही ख्रिस्तामुळे झाली आहे. परमेश्वराने ख्रिस्ताबरोबर समेट केला आहे. तो नवी निर्मिती आहे. आपल्या पापांसाठी देवाने त्याला पापी असे गणले. प्रभू मध्ये नीतिमान जीवन जगून ख्रिस्ताच्या एकीत राहावे अशे संत पौल नव्याने ख्रिस्तामध्ये जीवन जगण्यास सुरुवात करायला सांगत आहे. जुने ते गेले, आता नव्याची सुरुवात झाली आहे.

शुभवर्तमान: लूक १५:१-३, ११-३२
          प्रभू येशूच्या काळात जकातदार, शास्त्री व परुशी हे भ्रष्टाचाराचे जीवन जगत होते. स्वतःला पवित्र व महान समजत व दुसऱ्यांकडून मान व सन्मानांची अपेक्षा करीत असत. जकातदार, शास्त्री व परुशी ख्रिस्ताबद्दल नेहमी कुरकुर करत असत की, ख्रिस्त पापी लोकांचा मित्र व साथीदार आहे. त्यांच्याबरोबर जेवायला बसतो व सामील होतो. असे काही बोलत असताना येशू त्यांना काही दाखले देतो: हरवलेले मेंढरू, नाणे व मुलगा जेणेकरून दैवीकरुणेचा अनुभव जकातदार लोकांना येणार. देव दयाळू व ममताळू आहे. जकातदार म्हणत की. चांगले केल्यास आशीर्वाद व वाईट केल्यास शिक्षा भोगावी लागते. परंतु येशू सांगतो की, पश्चाताप करा व देवाकडे वळा, देव अत्यंत मायाळू व कनवाळू आहे. 

बोधकथा:
एका गावात एका जोडप्याला दोन मुली होत्या. ह्या दोन्ही मुली फार गुणी होत्या. त्या आई-वडीलांच्या आज्ञेत राहत असत. एके दिवशी छोटी मुलगी तिच्या आई-वडिलांना सांगते की, मी आसिक नावाच्या मुलावर प्रेम करते. मला त्याच्या बरोबर लग्न करायचं आहे. आई-वडीलानी खूप विरोध केला परंतु, छोट्या मुलीने ऐकले नाही. तिने पैसा संपत्ती घेऊन असिक नावाच्या मुलाबरोबर ती पळून गेली. काही दिवसांनतर आसिक तिला खूप त्रास द्यायला लागला. तिची मारहाण करू लागला व जे काही तिने पैसा व संपत्ती आणली होती ती सर्वकाही तिच्याकडून घेऊन तिला एकटी सोडून तो निघून गेला. अशा परिस्थितीत ती एकटीच राहत होती. तिला व्यवस्थित जेवायला जेवण मिळत नव्हते. तिला कुणाचा आधार नव्हता. अशावेळी तिला तिच्या आई-वडिलांची आठवण  येते व केलेल्या चुकीबद्दल तिला पश्चाताप होतो. दुःखी व निराग्रस्त मन घेऊन ती तिच्या आई-वडिलांकडे जाते व क्षमा मागते. त्यावेळी तिचे आई-वडील तिला प्रेमाने आलिंगन घालतात व सर्व काही विसरून तिला पुन्हा घरात किंवा त्यांच्या कुटुंबात प्रवेश देतात.

मनन चिंतन:
अस म्हटल जात की, “लोक नवीन तंत्रज्ञान शोधतात, परंतु देव नवीन हृदयाला शोधतो; लोक चांगल्या पद्धतीच्या शोधात आहेत, तर देव चांगल्या लोकांच्या शोधात आहे.”
पाप व वाईट कृत्ये आपल्याला देवापासून दूर घेऊन जात असतात. परंतु तोच देव आपल्याला पुन्हा त्याच्याजवळ बोलावत असतो. माणसावर ईश्वराच्या करुणेचा वर्षाव होऊन जे लोक देव पित्याच्या प्रीतीपासून, करुणेपासून व क्षमेपासून दूर गेले आहेत. अशा लोकांना पुन्हा दैवी करुणेचा, प्रीतीचा व क्षमेचा अनुभव यावा व तो अनुभव उधळ्या पुत्राच्या दाखल्याद्वारेआपल्या समोर ठेवण्यात आलेला आहे. या दाख्ल्यातून समजते की, प्रत्येकाला दैवी करुणेच्या स्पर्शाची गरज आहे. आपल्या प्रत्येकाचे जीवन उधळ्या पुत्रासारखे आहे.आपल्या वाईट वागणुकीमुळे, कृत्यामुळे व इतरांबरोबर चांगले संबंध नसल्यामुळे आपण दूर गेलो आहोत. पण जेव्हा आपण हा दाखला वाचतो तेव्हा हा दाखला आपल्या समोर एक आव्हान ठेवत असतो, ते आहे मन परिवर्तन करण्याचे आव्हान. हा दाखला आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे आणतो, सैतानाकडून ख्रिस्ताकडे आणतो, इतकेच नव्हे तर, चांगला पश्चाताप करावयास शिकवतो. खरा पश्चाताप करून आपण देवाकडे व शेजाऱ्याजवळ येतो. ह्या दाखल्यातून आपल्याला एक धडा शिकायला मिळतो की, ख्रिस्त हा प्रेमळ, दयाळू व क्षमाशील आहे. त्याचे प्रेम व त्याची माया ही अपार आहे.
छोट्या भावाने संपत्ती घेऊन ऐश आरामाचे जीवन तो जगाला व जेव्हा सर्व संपत्ती संपून त्याच्याकडे काहीच राहिले नाही तेव्हा त्याला त्याच्या वडिलांची आठवण आली. म्हणजेच त्याला त्याची चूक समजली. आपण अंधारात जीवन जगात असल्याची त्याला जाणीव झाली. सैतानाच्यासानिध्यात मी वास करीत आहे हे त्याला समजले. अशावेळी तो उठून वडिलांकडे गेला व त्याने केलेल्या चुकी बददल दयेची क्षमेची याचना केली. वडिलांनी त्याच्या अंगात उत्तम झगा घालून, हातात अंगठी  व पायात व्हाणाचे जोड घालून तसेच पुष्ठ वासराची मेजवानी करून आपल्या हरवलेल्या मुलाचा पुन्हा एकदा आपल्या घरात स्वीकार केला.यावरून आपल्याला देवाच्या क्षमाशील व दयाळू स्वभावाची जाणीव होते. या दाखल्यात पित्याच्या प्रेमाविषयी वर्णिले आहे. देवाची माया कधीही उणी पुरात नाही. आपल्या पापांसाठी देवाचा एकुलता पुत्र आम्हा तारावयास क्रुसावर मरण पावला. आपल्याला आपल्या पापांची क्षमा करून क्षमेचा धडा गिरवण्यास शिकवला. आपण ह्या जगात ख्रिस्ताचे प्रेम द्यावयास आलो आहोत म्हणूनच आपणामध्ये शास्त्री व परुशी लोकांची वृत्ती आपल्यामध्ये दिसायला नको.
मोठ्या भावाचे व्यक्तिमत्वार आपण थोड मनन चिंतन करूया. त्याचे व्यक्तिमत्त्व हे फार गुंतागुंतीचे आहे. त्याला वाईट वाटते कारण त्याचा भाऊ परत आला आहे. आपण सुध्दा असेच करत असतो. जेव्हा एकाद्याचे चांगले होते ते आपल्याला बघवत नाही. दुसर्यांच्या आनंदात सहभागी होण्यास आपण नकार देत  असतो. येशू पाप्यांच्या बरोबर जेवतो हे शास्त्री- परुशी ह्यांना आवडत नसे. मोठा भाऊ वडिलांच्या बरोबर राहून सुध्दा नंतर रागावतो, कारण त्याने पित्याच्या प्रेमाचा अनुभव घेतला नव्हता एका गुलामा प्रमाणे तो त्याचे जीवन जगत होता. म्हणूनच तो आपल्या धाकट्या भावाला ‘तुमचा मुलगा’ म्हणून संबोधितो. यावरून तो आपल्या कुटुंबा पासून किंवा आपल्या पित्यापासून किती दूर गेला आहे ह्याची जाणीव होते. छोट्या भावाने पश्चाताप करून त्याची चूक काबुल केली व तो आपल्या पित्याकडे परतला. त्याने आपल्या पित्या बरोबर समेट केला. द्या भक्तीवर असलेली साय असते. दयाळू माणूस दयाळू माणूस दुसऱ्यांना आपल्या वेंगेत घेतो.
आपण स्वर्गाच्या दिशेने वाटचाल करुया. बापाला म्हणूया, हे पित्या मी तुजकडे धावत येतो माझा स्वीकार कर.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे देवा दया कर व आमची प्रार्थना कर.
१) दैवीकरुणेचा संदेश अखिल जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे आपले परमगुरुस्वामी फ्रान्सिस, कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरू-धर्मभगिनी व मिशनरी या सर्वावर ख्रिस्ताचा आशीर्वाद सैदव असावा व आपल्या शब्दाद्वारे व कृती द्वारे ख्रिस्ताच्या दयेचा संदेश इतरांपर्यंत त्यांनी पोहचवावा म्हणून प्रभू चरणी प्रार्थना करूया.

२) आज कितीतरी लोक देवाच्या प्रीतीपासून दूर जाऊन नैराश्याचे जीवन जगात आहेत. अशा लोकांना दैवी करुणेचा स्पर्श होऊन देवाच्या प्रेमाचा अनुभव त्यांना यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

३) आज जगात संपत्ती, धन- दौलत यांच्यामुळे भांडणे होऊन, वाईट व चांगले यातील फरक विसरून एकमेकाबद्दल मनात सूड घेण्याची भावना निर्माण झाली आहे. अशा ह्या सर्व लोकांवर परमेश्वराच्या कृपेचा आशीर्वाद येऊन, इतरांशी समेट घडवून आणण्यास त्यांना कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

४) आपल्या गावात, शेजोळ्यात व कुटुंबात जे कोणी आजारी आहेत, अशा सर्वांना परमेश्वारचा आरोग्यदायी स्पर्श होऊन त्यांची आजारातून सुटका व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

५) थोडा वेळ शांत राहून आपल्या खाजगी, कौटुंबिक व सामाजिक गरजा परभू समोर मांडूया.