Wednesday, 9 February 2022

                                                   

           Reflection for 6th Sunday in Ordinary Time (13/02/2022)  By Bro. Pravin Bandya
सामान्य काळातील सहावा रविवार 

 

पहिले वाचन - यिर्मया १७: ५ - ८

दूसरे वाचन - १ करिथ १५: १२, १६ - २०

शुभवर्तमान - लूक ६: १७, २० – २६

 

“कारण मेलेले उठविले जात नसतील तर ख्रिस्तहि उठविला गेला नाहीं”.



प्रस्तावना

आज आपण सामान्य काळातील सहावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्याला परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवण्यास पाचारण करीत आहे. आजच्या पहिल्या वाचनामध्ये  यिर्मया संदेष्टा आपल्याला म्हणतो की, ज्या व्यक्तीचे अंतःकरण परमेश्वरापासून दूर आहे तो व्यक्ती शापित आहे. तो वैराणातल्या जूडपा सारखा आहे. तर दुसऱ्या वाचनात संत पौल म्हणतो की, आता ख्रिस्त मेलेल्यांतून ऊठविला गेला आहे, तर मेलेल्यांचे पूनरूत्थान नाही असे तुमच्यापैकी प्रत्येक जण म्हणतात हे कसे? जर ख्रिस्त उठविला गेला आहे, तर आपले देखील पूनरूत्थान आहे. शुभवर्तमानात प्रभू येशू म्हणतो, “अहो दिनांनो, तुम्ही धन्य कारण स्वर्गाचे राज्य तुमचे आहे. तुम्ही आता भुकेले आहात ते धन्य कारण तुम्ही तृप्त व्हाल; तुम्ही आता रडता ते धन्य कारण तूम्ही हसाल. परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवणं म्हणजे त्याच्या आज्ञेप्रमाणे पवित्र जीवन जगणे. संत पौलने करिंथकरांस पाठवलेल्या पहिल्या पत्रात म्हटल्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताच्या पूनरूत्थानावर पूर्ण विश्वास ठेवण्यास परमेश्वरानं आपल्याला कृपेने भरावं, म्हणून प्रार्थना करूया. 

मनन चिंतन

आज आपण सामान्य काळातील सहावा रविवार साजरा करीत असताना, आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये आपण पाहिलं की संत पौल म्हणतो, “आता ख्रिस्त मेलेल्यांतुन उठविला गेला आहे, अशी त्याच्याविषयी घोषणा होत आहे, तर मेलेल्यांचे पूनरूत्थान नाही असे तुमच्यापैकी कित्येक जण म्हणतात, हे कसे? जर मेलेल्यांचे पूनरूत्थान नाही तर ख्रिस्त ही उठविला गेला नाही. संत पौलला सांगायचं आहे की, आपणा प्रत्येकाच मेल्यानंतर पूनरूत्थान आहे. पण ते पूनरूत्थान प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला पवित्र व त्यागमय जीवन जगणं गरजेच आहे. कारण प्रभू येशू मत्तय २२: १४ मध्ये म्हणतो, “बोलावलेले भरपूर आहेत, परंतु निवडलेले थोडके आहेत”आज आपल्याला त्यागमय जीवन जगण्यासाठी देऊळमाता पाचारण करीत आहे.

तुमच्या पैकी कित्येक जणांनी ‘चीछोरे’ हा चित्रपट पाहिला आहे? त्या चित्रपटामध्ये  सुशांत सिंघ हा अभिनेता म्हणजे हिरोचा किरदार निभावत आहे. जे आपल्यामध्ये आता नाहीत; परमेश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती देवो.

ह्या चित्रपटामध्ये सुशांत सिंघ  हा विध्यार्थी म्हणून महाविध्यालयामध्ये शिकत होता. ह्या चित्रपटात आपण दोन वर्ग पाहतो. पहिल्या वर्गामध्ये सर्व श्रीमंत घराण्यातील मुलं आहेत; तर दुसऱ्या वर्गामध्ये गरीब घराण्यातील मुलं आहेत. ह्या महाविध्यालयात आपण पाहतो कि,  अभ्यासेतर उपक्रम म्हणजे extracurricular activities होत असत. त्या खेळांमध्ये दुसऱ्या वर्गातील म्हणजे गरीब घराण्यातील मुलं कधीच जिंकत नव्हती कारण त्यांना योग्य ते प्रशिक्षण नव्हते, तसेच ते वाईट जीवनाला बळी पडले होते, आणि म्हणून त्या गरीब  मुलांना अजून कमी लेखलं जात असे. सुशांत हा देखील दुसऱ्या वर्गातील मुलगा होता. ते कधीच पहिल्या वर्गाबरोबर जिंकले नव्हते आणि ह्याचं कारण म्हणजे, ह्या वर्गातील सर्व मुलांना काही न काही प्रकारच्या वाईट सवयी लागल्या होत्या. एक दिवस सुशांतने सर्वांची बैठक घेऊन त्यांना त्या सर्व गोष्टीचा त्याग करायला सांगितले. सुशांत हा दररोज त्याच्या प्रेयसीला भेटत असे, व प्रेमाच्या गोष्टी करीत असे त्याचा त्याने त्याग केला. दुसऱ्या मित्राला नशेचे वाईट व्यसन लागले होते, त्याचा त्याने त्याग केला. तिसरा मित्र जो शिव्या- गाळ व भानगडी करणारा होता, त्याने ती सोडून दिली. अशाप्रकारे दुसऱ्या गटांमध्ये असलेल्या प्रत्येकांनी वाईट जीवन सोडण्याचा प्रयत्न केला आणि त्या सर्वांनी त्याग केला आणि आपलं लक्ष एकच गोष्टीकडे लावलं की आम्हाला जिंकायच आहे. त्यांनी घेतलेला निर्णय काटोकार पणे पाळला; त्या सर्वांनी प्रयत्न केला आणि शेवटी खरोखरच ९९% त्यांच्या वर्गाचा विजय झाला.  

माझ्या प्रिय जनांनो, ते सर्व विध्यार्थी पूर्वी जगत असलेल्या वाईट जीवनामध्ये अडखळले होते त्यामुळे आपल्या धेय्याकडे त्यांचं लक्ष नव्हतं म्हणून ते नेहमी हरत होते. परंतु जेव्हा त्यांनी वाईट गोष्टी सोडण्याचा निर्णय घेतला, वाईट जीवनामधून बाहेर आले व आपले लक्ष  ध्येयाकडे लावलं तेव्हा ते ९९% आपल्या गटाला विजयाकडे नेऊ शकले. आपल्याला देखील ख्रिस्ताच्या पूनरूत्थानामध्ये सहभागी व्हायचं असेल तर तेच करायचं आहे. प्रत्येक वाईट गोष्टीचा त्याग करून आपलं लक्ष पूनरूत्थीत ख्रिस्ताकडे लावायला पाहिजे.

संत पौल कलस्सैकरास पत्र ३:१ आणि २ मध्ये म्हणतो, “तुम्ही ख्रिस्ता बरोबर उठविले गेला आहा, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथील वरील गोष्टी मिळविण्याचा यत्न करा. वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका”. कारण पृथ्वीवरील काही गोष्टी मानवजातीला नाशाकडे घेऊन जाणाऱ्या गोष्टी आहेत, ख्रिस्ताच्या पुनरूत्थाना पासून दूर घेऊन जाणाऱ्या गोष्टी आहेत. त्या सोडण्याचा आपण प्रयत्न करूया आणि ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामध्ये सहभागी होण्यासाठी आपण त्यागमय जीवन जगण्याचा प्रयत्न करूया. आणि वाईट जिवण सोडून त्यागमय जीवन जगण्यासाठी पूनरूत्थीत प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला कृपा, शक्ती व सामर्थ्य द्यावं, म्हणून प्रार्थना करूया

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे परमेश्वरा, तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.

१) आपले पोप फ्रान्सिस, सर्व बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ ह्यांना देवाच्या वचनानुसार जीवन जगण्यास व प्रापंचिकांना मार्गदर्शन करण्यास परमेश्वराने विवेकबुध्दी द्यावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.

२) प्रत्येक ख्रिस्ती कुटुंबात शांती नांदावी, घरातील वातावरण खेळीमेळीचे राहून, प्रार्थनेला अधिक महत्त्व द्यावे, जेणेकरून ख्रिस्त हाच आपल्या कुटुंबाचा केंद्रबिंदू होईल, ह्यासाठी आपण प्रभू चरणी प्रार्थना करूया.

३) मादक पेये व मद्य यांच्या आहारी गेलेल्या तरुण पिढीने व कुटुंबाच्या प्रमुखाने केवळ क्षणिक सुखाचा विचार करू नये, तर आपल्या जीवनाला नवे वळण लावण्याचा विचार करावा, म्हणून आपण प्रार्थना  करूया.

४) सुखी जीवनाचा महामंत्र परमेश्वराने आपणा सर्वांना आज दिला आहे. त्याने दिलेल्या वचनांवर आपले जीवन विसंबून ठेवावे आणि जीवनांत आनंद उपभोगावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.

५) आपल्या धर्मग्रामातील जे कोणी शारीरिक व मानसिक आजाराने त्रस्त झाले आहेत, त्यांनी प्रार्थनेबरोबर औषधोपचार व मानसोपचारही करावेत, म्हणून आपण प्रार्थना करूया.

६) आता आपल्या वैयक्तिक व सामुहिक गरजांसाठी शांतपणे प्रार्थना करूया.


Friday, 4 February 2022

Reflection for the Fifth Sunday in Ordinary Time (06/02/2022) By: Br. Aaron Lobo


सामान्य काळातील पाचवा रविवार

 


पहिले वाचन:  यशया ६: १-२, ३-८.

दुसरे वाचन:  १ करिंथ १५: १-११.

शुभवर्तमान:  लुक ५: १-११.

“माझ्यापासून दूर जा कारण मी पापी मनुष्य आहे.”

प्रस्तावना:

          आज संपूर्ण ख्रिस्तसभा सामान्य काळातील पाचवा रविवार साजरा करीत आहे. जेव्हा एखादी व्यक्ती प्रभू येशूच्या संर्पकात येते तेव्हा ती व्यक्ती सामान्य व्यक्ती राहत नाही तर त्या व्यक्तीचे परिवर्तन होते. आजच्या उपासनेत आपण अशाच प्रकारच्या व्येक्तींचे उदाहरणे ऐकणार आहोत. आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्ट्याचे परमेश्वराबरोबर झालेल्या संभाषणाविषयी आपण वाचतो. ज्यावेळेस त्याला देवाचा अनुभव येतो त्यावेळेस त्याला देवाच्या महिमेची व स्वतःच्या अयोग्यतेची जाणीव होते. त्याचप्रमाणे दुसऱ्या वाचनातही संत पौल आपणास प्रभू येशूची भेट झाल्यानंतर आपल्या जीवनात घडलेल्या परिवर्तनाचे वर्णन करतो व येशू ख्रिस्ताची महानता व स्वतःच्या अयोग्यते विषयीचे वर्णन करतो. तसेच आजच्या शुभवर्तमानात जेव्हा पेत्र प्रभू येशूने केलेला चमत्कार पाहतो, तेव्हा तो सुद्धा प्रभू येशूची महानता व स्वतःची अयोग्यता समजतो.

          देवाचा अशाप्रकारे अनुभव आल्याने जर आपण त्याच्यावर व त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवला तर आपल्या जीवनाचा कायापालट होईल. जर आपण आपल्या विश्वासात दृढ राहिलो तर यशया संदेष्टा, संत पौल आणि पेत्राप्रमाणे आपण सुद्धा ख्रिस्ताच्या कार्यात सहभागी होण्यास पात्र बनतो. विश्वास हा शब्द, जरी ऐकायला लहान किंवा सामान्य असला तरी  त्याच्यात फार सामर्थ्य आहे. विश्वासाविना आपण काहीही करू शकत नाही. आपल्या जीवनात व आपल्या कार्यात देवाचा शब्द, देवाचा अनुभव व विश्वास हे फार महत्वाचे आहेत. आजच्या ह्या पवित्र मिस्साबलीदानात सहभागी होत असतांना आपण सुद्धा देवाचा शब्द विश्वासाने ऐकावा, त्याने दाखवलेल्या मार्गावर चालावे व त्याचा अनुभव घ्यावा, म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया.

 


मनन चिंतन: 

गेल्या रविवारी, येशूला त्याच्या स्वतःच्या गावी, नाझरेथमध्ये कसे नाकारण्यात आले ह्याविषयी आपण ऐकले. लोकांना येशू ख्रिस्ताच्या दैवीपणावर व त्याच्या पावित्रातेवर संशय होता. ज्या कारणाने ते येशूचा बहिष्कार करतात. त्यांच्या अविश्वासुपणाच्या विपरीत आपण आजच्या शुभवर्तमानात पेत्रामध्ये विश्वासाचे उदाहरण पाहतो.

शुभवर्तमानाच्या सुरवातीस आपण वाचतो कि, रात्रभर कष्ट करून सुद्धा पेत्र व त्याच्या साथीदारांना एकही मासळी सापडली नव्हती. म्हणून ते हताश होऊन आपली जाळी धूत होते. अशावेळेला प्रभू येशू तिथे येतो व लोकांना शिकवण्यासाठी पेत्राच्या रिकाम्या बोटीत प्रवेश करतो व लोकांना शिकवण्यास सुरवात करतो. एखाद्या अयशस्वी व्यक्तीच्या जीवनात जर आपण पाहिले तर ती व्यक्ती जे त्या व्यक्तीने गमाविले आहे त्याच्यावरच विचार करीत असते. इतर गोष्टींवर किंवा देव-धर्मात सुद्धा त्याला रुची नसते. तरी पण पेत्र आपल्या तोट्यावर जास्त लक्ष न देता, येशू ख्रिस्ताचा आपल्या मचव्यात स्वीकार करतो व त्याने शिकवलेले शब्द ही ऐकतो.  ह्या क्षणापासून त्याच्या जीवनाच्या परिवर्तनाची सुरवात होते. आपल्या जीवनातही आपण अनेक वेळा निराषित, हताश किंवा अयशस्वी ठरतो. तेव्हा आपणास जीवनात कसल्याच गोष्टीला अर्थ सापडत नाही आणि जीवन नकोनकोसे वाटते. पण अशा परिस्थितीत येशू आपल्या जीवनाच्या मचव्यावर प्रवेश करतो व आपल्या जीवनाचा कायापालट करतो. देवाचे शब्द ऐकणे व त्याचे स्वीकार करण्याचा अर्थ म्हणजे येशूला आपल्या जीवनाच्या मचव्यात स्वीकार करणे होय.

त्या नंतर येशू पेत्राला आपली मचवा खोल पाण्यात घेण्यास व तिथे आपली जाळी टाकण्यास सांगतो. पेत्र हा अनुभवी कोळी होता. रात्रभर परिश्रम करून सुद्धा काही सापडले नव्हते. त्याला त्याच्या अनुभवातून माहित होते कि, तिथे मासे सापडणार नाही कारण ती जागा व ती वेळ प्रतिकूल होती. प्रभू येशू, एक सुतार एका अनुभवी कोळी माणसाला मासळी कशी धरावी हे सांगतो ह्याचे पेत्राला नकीच नवल व आश्चर्य वाटले असेल. परंतु पेत्र आपल्या अनुभवावर, ज्ञानावर व आपल्या कौशल्यावर अवलंबून राहत नाही. यांचा गर्व न करता, नम्रतेने तो येशूने सांगितलेल्या शब्दांचा मान ठेवतो व त्याच्या इतर सहकाऱ्यांबरोबर जाळी टाकतो. त्याच्या ह्याच विश्वासामुळे त्याची रिकामी जाळी आणि मचवा आता मासाळीने भरून जाते. ज्यावेळेस आपण सुद्धा देवाने दाखवलेल्या मार्गावर चालतो तेव्हा आपल्या जीवनातही असेच चमत्कार घडतात. परमेश्वराने दाखवलेले मार्ग अनेक वेळा आपल्याला पटत नाही किंवा समजतही नाही तरी सुद्धा आपण येशुवरच्या आपल्या विश्वासात दृढ राहून त्याने दाखवलेल्या मार्गावर चालले पाहिजे.

येशूने केलेले चमत्कार पाहून पेत्र त्याच्यातच गुंतून न जाता त्या चमत्काराद्वारे येशू ख्रिस्ताच्या दैविपणा ओळखून घेतली. आपली अयोग्यता व पापवृत्ती स्वीकारून तो येशूला, “माझ्यापासून दूर जा कारण मी पापी मनुष्य आहे” असे म्हणतो. परंतु हे जरी त्याच्या ओठावरील शब्द असले तरी त्याच्या हृदयात, “येशू, मला कधीच सोडून जाऊ नकोस” ही प्रार्थना होती. त्याची ही नम्रता व परिवर्तन पाहून येशू ख्रिस्त त्याला आपला शिष्य म्हणून निवडतो व मासे धरणाऱ्याला माणसे धरणारा बनवतो. संत पेत्राप्रमाणेच पहिल्या वाचनात यशया संदेष्ट्याने सुद्धा आपली अयोग्यता स्वीकारल्या नंतर देवदुताने नखऱ्याचा स्पर्श त्याने त्याच्या तोंडी करून त्याच्या पापी जीवनाला पवित्र केले व देवाचा संदेष्टा होण्यात त्याला पत्र बनविले. संत पौल जो ख्रिस्ती लोकांचा छळ करत होता तो सुद्धा येशूचा अनुभव घेतल्यानंतर आपले पापी जीवनावर पश्चाताप करतो व येशू त्याचे आपला श्रेष्ठ शिष्य म्हणून निवड करतो.

अनेक वेळा आपण आपल्या जीवनात आलेल्या समस्यांत गुंतून जातो व आपल्या सोबत असलेल्या प्रभू येशूला विसरून जातो. आपल्या जीवनात आपण सुद्धा कधी-कधी चामत्कारांत मग्न राहतो पण चमत्कार करणाऱ्या देवाला विसरतो. ज्यावेळेस आपण जीवनात घडलेल्या वाईट परिस्थितीमध्ये विश्वासाने देवाचे वचन ऐकतो, परमेश्वराचा आपल्या रिकाम्या मचव्यात स्वीकार करतो, त्याने दाखवलेल्या मार्गावर चालतो व त्यालाच आपल्या जीवनाचा प्रभू म्हणून स्वीकारतो त्यावेळेस परिस्थिती कितीही गंभीर असली तरीही आपण यशस्वी ठरतो. देवाचे खरे शिष्य होण्याचा अर्थ हाच आहे कि आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्यावर आपला विश्वास दृढ ठेवावा व तो आपल्या रिकाम्या मचव्याला काठोकाट भरावे. आपलाही संत पेत्राप्रमाणे विश्वास वाढावा म्हणून प्रार्थना करूया.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: “हे प्रभो, तुझी सुवार्ता प्रकट करण्यास आम्हाला कृपा दे.”

१.    ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे पोप फ्रान्सीस, कार्डीनल्स, महागुरू, धर्मगुरू व सर्व व्रतस्थ या सर्वांनी त्यांच्या कार्याद्वारे व शुभसंदेशाद्वारे येशु ख्रिस्ताची ओळख इतरांना पटवून द्यावी व देवाची सुवार्ता इतरांपर्यंत पोहचवण्यास त्यांना शक्ती-सामर्थ्य मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

२.    ‘पिक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत’ म्हणून अनेक तरुण तरुणींनी प्रभूच्या मळ्यात कार्य करण्यासाठी स्वखुशीने पुढे यावे, तसेच ज्या तरुण तरुणींनी देवाच्या पाचारणाला होकार दिला आहे अशा सर्वांना ऐहिक मोहांपासून परमेश्वराने अलिप्त ठेवावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

३.    जे युवक युवती देवापासून दूर गेलेले आहेत, त्यांना प्रभूचा स्पर्श व्हावा व त्यांचे मनपरिवर्तन होऊन त्यांनी नैतिक मार्गावर चालावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

४.    ह्या पवित्र मंदिरामध्ये जमलेल्या आपल्या सर्वांना प्रभूने चांगले आरोग्य द्यावे व ख्रिस्ताचे शिष्य खरे सेवक बनून देवाच्या इच्छेला प्राधान्य द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

५.    थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.

 

 

 

Thursday, 27 January 2022

Reflection for the Fourth Sunday in Ordinary Time (30/01/2022) By: Br. Brijal Lopes.


सामान्यकाळातील चौथा रविवार

 


दिनांक: ३०/०१/२०२२

पहिले वाचन: यिर्मया १:४-५,१७-१९.

दुसरे वाचन: १ करिंथ. १२:३१-१३:१३.

शुभवर्तमान: लुक ४:२१-३०.

 


प्रस्तावना:

आज ख्रिस्तसभा सामान्य काळातील चौथा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपणा सर्वांना परमेश्वराच्या हाकेला होकार देऊन, त्याद्वारे सुवार्तेची घोषणा प्रबळतेने व निर्भीडपणे करण्यासाठी पाचारण करीत आहे. प्रत्येक व्यक्तीला देवाने एक मिशन कार्य दिलेले आहे, व ते कार्य करण्यासाठी योग्य ते सामर्थ्य व शक्ती दे त्यांना पुरवतो. त्याच सोबत देव त्यांच्या बरोबर वस्ती करतो.

आजच्या पहिल्या वाचनात आपणास यिर्मयाला झालेले पाचारण व त्याची देवाने त्याच्या कार्याकरीता केलेली निवड ह्या विषयी सांगत आहे. एक निर्भीड व देवाच्या कार्यासाठी झटण्यासाठी व देवाच्या प्रजेला देवाकडे आणण्यासाठी व खऱ्या देवाची आराधना करण्यासाठी जी प्रसंगे त्याच्यासमोर येणार आहेत ह्याबद्दल आपणास सांगण्यात आले आहे.

आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपणास प्रीती विषयी सांगत आहे. आपल्या जीवनात प्रीती, आशा व विश्वास ह्यांना अनन्य साधारण महत्व आहे. पण ह्या सर्वापेक्षा प्रीती ह्या शब्दाला किती महत्त्व आहे व त्याचे मानवी जीवनात असलेले स्थान ह्याविषयी संत पौल आपणास बोध करीत आहे.

आजच्या शुभवर्तमानात येशू ख्रिस्त आपणासमोर संदेष्ट्याला होणाऱ्या छळाविषयी व लोकांनी केलेल्या मानहानी विषयी सांगत आहे. देवाच्या कार्यात संदेष्ट्यांची पार्श्वभूमी कशी असावी ह्याविषयी सांगण्यात आले आहे. तर मग त्याच देवाची घोषणा जगभर पसरविण्यासाठी आपणास परमेश्वराचे सामर्थ्य व शक्ती लाभावी म्हणून आपण ह्या मिस्साबलीदानात प्रार्थना करूया.

  


मनन चिंतन:

ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधु-भगिनींनो. आज आपण सामान्य काळातील चौथा रविवार साजरा करीत आहोत. आजच्या ह्या उपासनेत आपण ख्रिस्ताच्या कार्यामध्ये आलेले प्रसंग (चांगले किंवा वाईट), व त्या प्रसंगांना ख्रिस्ताने दिलेले आवाहन या विषयावर आपण मनन चिंतन करणार आहोत. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती ही देवाच्या विशिष्ट कार्यासाठी निवडलेली आहे. प्रत्येक क्षण, वेळ हा आपणास देवाने दिलेल्या कार्याविषयी व त्याच्या सुवार्ता प्रचाराकासाठी कसा उपयोग करावा ह्या संदर्भात आपणास आजची उपासना सांगता हे.

जीवन एक आवाहन आहे. प्रत्येक व्यक्ती ही जीवनातील असलेल्या प्रत्येक संकटांना तोंड देत पुढे जात असते. असाच प्रसंग आपण ख्रिस्ताच्या जीवनात अनुभवत आहोत. ख्रिस्ताची शिकवणूक ही सभास्थानातील काही लोकांना आवडनारी नव्हती, काही लोकांना तर त्याच्या शिकवणीतून काहीतरी घेऊन आपल्या जीवनपरिवर्तनासाठी काहीतरी करावे यासाठी प्रयत्न न करता; हा सुताराचा मुलगा ना? हा योसेफाचा मुलगा ना?” अशा गोष्टीवर विचार विनिमय करून योग्य ती (शिकण्याची व त्याद्वारे सुंदर जीवन जगण्याची) संधी गमावून बसले होते. ख्रिस्ताची शिकवण ही फक्त जे समाजात राहूनसुद्धा ज्यांना समाजात मान नव्हता व जे अस्वीकारणीय लोक होते अशांणाच ख्रिस्ताची शिकवण आवडली होती. त्या प्रमाणे ते देवशब्दाला मान देत होते.

प्रभू येशूचे मिशन कार्यात गरिबांना फार मोठे प्राधान्य होते. येशूच्या मिशन कार्याचा मुख्य मुद्दा म्हणजे गोरगरीब व सर्वसामान्य लोकांना देवशब्द घोषवून त्यांना स्वर्गराज्याची महती पटवून देण्याचा आहे. सर्व लोकांना सामावून घेऊन एकत्र वाटचाल करून स्वर्गराज्याची घोषणा करण्यासाठी येशूने सर्व प्रकारच्या लोकांना प्राधान्य दिले होते. यहुदी लोकांना ख्रिस्ताची शिकवण आवडली. त्याच्या कार्याविषयी आश्चर्य व्यक्त केले. पण, एक संदेष्टा व तारणारा म्हणून त्याचा त्यांनी स्वीकार केला नाही. यहुदी नसलेल्या लोकांना ख्रिस्ताने आपल्या कार्यात समाविष्ट करून घेतले. त्यामुळे यहुदी लोक ख्रिस्ताचे विरोधी बनले आणि ख्रिस्ताचा घात करण्यास पाहू लागले.

आपणही आपल्या जीवनात ख्रिस्ताच्या कार्याला होकार देऊन व त्याच्या मार्गावर चालून स्वर्गराज्याची घोषणा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या करत असतो का? की, ह्या कार्यात वाईट लोकं किंवा प्रसंगे आपल्या आड येतात म्हणून सोडून देतो का? देवाचे कार्य न रोखता सदोदित आपण पुढे जात राहावे यासाठी ख्रिस्त आपणास सांगत आहे, पाचारण करीत आहे. येशू आपणास सोबत देत असतो. तो आपला पाठीराखा आहे. आणि म्हणूनच त्याच्यासारखे धैर्यवान व प्रबळ इच्छा मनात बाळगून, ख्रिस्तासारखे कार्य करण्यास एक संदेष्टा होऊन, कार्य करण्याची इच्छा मनात असली पाहिजे.

परमेश्वराचे वचन हे आपणांस समाजामध्ये जागृतता निर्माण करण्यासाठी व त्याद्वारे येणाऱ्या प्रत्येक संकटाला तोंड देण्यासाठी, सज्ज राहण्यासाठी सांगत आहे. इतिहासाकडे आपण जर बघितले किंवा आजच्या वर्तमानकाळात जी लोक सत्याच्या बाजूने लढत आहेत, व जी लोकं सत्य पसरविण्यासाठी झटत आहेत, अशा सर्वांना अपमानास्पद व तिरस्काराच्या मार्गाने जावं लागतं. त्यांचा कोणीच स्विकार करीत नाहीत. पण अशी लोकं परमेश्वराच्या शब्दाला होकार, परमेश्वराच्या कार्याला आलिंगन देतात व कोणत्याही प्रकारच्या संघर्षाला तोंड देण्यास तयार असतात. कारण त्याची आशा व विश्वास हा परमेश्वरामध्ये आहे. ख्रिस्ताने आपल्याला प्रत्येक संकटाला व पंच प्रसंगाला धीराने तोंड दिले. आपल्याच लोकांनी केलेली अवहेलना त्यांनी मनात ठेवली नाही तर, सर्वांना देवाच्या प्रेमाने व दयेने बघितले व कार्याला न थांबता आपले कार्य त्याने सुरुचं ठेवले.

सामाजिक जीवनात कार्य करत असताना, आपल्या लोकांकडून आपली अवहेलना होत असते. आपल्या पदरी निराशा पडलेली असते. परंतू आपणा सर्वांना ख्रिस्ताने दिलेल्या ह्या उदाहरणाद्वारे व त्याच्या शिकवणीद्वारे द्वेषाची भिंत नष्ट करून, तिरस्काराची भाषा न करता क्षमेद्वारे व ख्रिस्ताच्या प्रेमाद्वारे एकमेकांना पाहून कार्य पुढे सुरू ठेवायचे आहे. या सर्व येणाऱ्या पे प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी व देवाचे कार्य अबाधित ठेवण्यासाठी आपणा सर्वांचा परमेश्वराची कृपा मिळावी म्हणून ह्या पवित्र मिस्साबलिदानात प्रार्थना करूया.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद:हे परमेश्वरा दयाकर व तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.”

१.    आपले परमाचार्य पोप फ्रान्सिस, कार्डिनल्स, बिशप्स, व देऊलमातेच्या कार्यात नेतृत्व करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी आपल्याला दिलेल्या कार्याद्वारे व ख्रिस्ताचा आदर्श समोर ठेवून, देवाच्या प्रजेला योग्य मार्ग दाखवून, त्यांना ख्रिस्ताकडे आणण्यासाठी पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन मिळावे म्हणून प्रार्थना करूया.

२.    जे भाविक समाजिक, आर्थिक व शिक्षणाच्या बाबतीत परिवर्तन करण्यासाठी झटत आहेत. पर्यावरण व निसर्गाच्या सर्व हक्कासाठी जे प्रयत्नशील आहेत. अशा सर्वांना परमेश्वराचे सहकार्य लाभावे, शासनाकडून योग्य ती मदत मिळावी, सर्व लोकांमध्ये शांतता व एकात्मता निर्माण व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

३.    जगभर पसरत असलेल्या कोविड-१९ पासून आपणा सर्वांचं देवाने रक्षण करावं. डॉक्टर्स नर्सेस ह्यांच्या प्रयत्नांना परमेश्वराने यश द्यावे. जे शास्त्रज्ञ योग्य त्या औषधाचे संशोधन करत आहेत त्यांना पवित्र आत्म्याने मार्गदर्शन करावे. मानवाच्या मूलभूत हक्कासाठी झटणारे सर्व सरकारी व खाजगी कर्मचाऱ्यांना कृपा व शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

४.     शिक्षक, सैनिक, शेतकरी व इतर सर्व सेवक नेत्यांना त्यांच्या कार्यात परमेश्वराने यश द्यावे त्याद्वारे देवाची, समाजाची योग्य ती प्रगती व्हावी. सर्व अडीअडचणींवर मात करण्यासाठी त्यांना पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

५.    सर्व राजकीय नेत्यांनी देशाचे हित पाहून लोकांच्या कार्यासाठी व त्यांच्या विकासासाठी झटावे, त्याचप्रमाणे देशात शांतता व सुव्यवस्था नांदावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.

६.    थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक, आणि सामाजिक गरजासाठी प्रार्थना करूया.