Friday, 9 September 2022



Reflection for the Homily of 24th SUNDAY IN ORDINARY TIME (11/09/2022) By Bro. Reon Andrades. 

सामान्यकाळातील चोविसावा रविवार


दिनांक: १५/०९/२०१९

पहिले वाचन: निर्गम ३२: ७-१११३-१४.                                

दुसरे वाचन:  १तिमथी १: १२-१७.

शुभवर्तमान: लूक १५: १-३२.      





प्रस्तावना:

आपण जागतिक जीवन जगत असताना अनेक वेळेस जागतिक मोहाला बळी पडत असतो. परमेश्वराच्या आज्ञेत राहणं आपल्याला अवघड वाटत असतं. अनेक वेळेस आपली नजर त्या परमेश्वराकडून हटते आणि आपण मोहास बळी पडतो व पाप करतो. पापांमुळे आपण परमेश्वरापासून दूर जातो. तरीही आपला परमेश्वर आपल्याला टाकत नाही तर आपल्या शोधात येत असतो. तो आपणास दयेने व कृपेने आपल्याजवळ बोलावत असतो. जर का आपण पापात पडून त्या परमेश्वरापासून दूर गेले असू तर ईश्वरी दया, प्रेम आणि कृपेचा अनुभव घेऊन त्या परमेश्वराकडे पडतुया.

 

मनन चिंतन:

माझ्या प्रिय बंधू आणि भगीनींनो, आजची उपासना आपणास दयेच्या दरवाजाकडे घेऊन जात आहे. संत पैलला ह्या दयेचा कसा अनुभव आला व त्या दयेचा त्याच्या जीवनावरचा कायापलट कसा झाला ह्याची साक्ष खुद्द पौल आपणास सांगत आहे. जर का आपण आजच शुभवर्तमानावर गंभीरपणे विचार विनिमय केला तर आपणास कळून चुकेल की तिन्ही दाखले आपल्याला देवाची दया करुणा ह्याचे आपणाला दर्शन घडून आणते. आजच्या वाचनात तीन मुद्दे ठळकपणे आपल्यासमोर येत आहेत ते म्हणजे

१) पाप व विलगीकरण/ विभक्त: परमेश्वराने प्रत्येकाला स्वतंत्र दिले आहे. ह्याच स्वातंत्र्याचा मान परमेश्वर राखत असतो. परमेश्वर कोणावर बळजबरी करीत नाही. त्याच्याबरोबर राहणे अथवा न राहणे प्रत्येक माणसावर अवलंबून असते. आपण पाहतो परमेश्वर इस्रायली लोकांवर बळजबरी करीत नाही. तर दाखल्यामध्ये नाणं कोण जाणून - बुजून लपवत नाही. तर मेंढपाळ स्वतः पाठवत नाही व धाकटा पुत्रास त्याचा बाप पाठवत नाही. तर ते आपणाहुन अथवा स्वइच्छेने तसे वागत असतात. अशा ह्या वागण्याचा निकर्ष म्हणजे विलगीकरण विभक्त होणे. ऐश्वर्य आलिंगन देणे म्हणजे पापात पडणे व देवापासून दूर जाणे. हे सर्व आपल्या जीवनात घडत कारण आपली नजर त्या मेंढपाळावरून हटलेली असते व त्याच प्रती उत्तर म्हणजे विलगीकरण.

२) शोध - दया: जरी आपण भटकलेले असलो आपण त्या परमेश्वराकडून दूर गेलो असू तरीसुद्धा परमेश्वर आपल्याला टाकत नाही. ज्याप्रकारे म्हातारीमेंढपाळ शोधामध्ये जातात त्याच प्रकारे पिता आपल्या पुत्राच्या परतीसाठी वाटेत डोळे घालून राहतो त्या प्रकारे आपला देव आपणास शोधत असतो आपली वाट पाहत असतो . तो आपल्या परतीसाठी शक्यतो प्रयत्न करत असतो. ज्या प्रकारे एक छोटसं नाण, एक इवलस मेंढरू व धाकटा पुत्र अति मोलाचे आहेत ह्याची खात्री आपणास शुभवर्तमानातल्या उताऱ्यामध्ये ऐकायला मिळते, त्याच प्रकारे आपणही देवासाठी अति मोलाचे आहोत. देव आपल्यामध्ये भेदभाव करत नाही तर ह्या दुभावाची जाणीव आपणामध्ये असते . परमेश्वर आपल्यावर फक्त प्रेम करत असतो (त्या बापा प्रमाणे). ह्याच प्रेमापोटी तो आपल्या चुका लक्षात ठेवत नाही तर आपल्यावर ह्या प्रेमापोटी दया दाखवत असतो. त्याच प्रेम व दया आपणास दाखवण्यासाठी दर्शविण्यासाठी तो दिवस रात्र आपला शोध घेत असतो. आपल्या परतण्याची वाट पाहत असतो कारण त्याला ठाऊक आहे की आपण त्याची मालमत्ता आहोत.

३) सापडणे व उत्साह: ज्याप्रकारे ती महिला म्हातारी दिवा लावून शोध घेते त्या प्रकारे मेंढपाल मेंढरांना सोडून एकाच्या मागे जातो आणि ते मिळाल्यावर त्याला आनंद होतो त्याच प्रकारे एक पापी मनुष्य परतल्यावर देवाला आनंद होतो. हा आनंद प्रचंड प्रमाणात असतो कारण त्यांनी आपली सर्व शक्ती मन ऊर्जा त्याच्या शोधात खर्च केलेली असते. त्या शक्तीचा, ऊर्जेचा सहनशक्तीचा त्यागाचा सकारात्मक मोबदला म्हणजेच सापडणे. ह्या अवस्थेला उत्तर म्हणजे उत्साह अथवा साजरा करणे. उधळ्या पुत्राच्या दाखल्यामध्ये आपण उत्साह आणि दुभाव पाहतो. नोकर चाकर उत्साहामध्ये सकारात्मक रित्या भाग घेतात मात्र थोरला पुत्र कुरकुर करतो. जर आपण पाहिलं तर शुभवर्तमानाच्या सुरुवातीला शास्त्री परुशी येशू पापियांबरोबर जेवतो हयाची कुरकुर करत होते. त्यांनाही ह्या उत्सवात आमंत्रण होते पण त्यांचे उत्तर नकारात्मक होते. आपण पाहतो जेव्हा एक पापी माणसाचे परिवर्तन होते तेव्हा अनेक जण उत्साह करण्याऐवजी त्याची भूतकाळाची कुरकुर करत असतात. व देवासह हर्ष करण्यास मागे सरसावतो. जर देव आपला व इतरांची पापे स्मृतित ठेवत नाहीत तर आपण इतरांची पापे लक्षात ठेवणारे कोण? देवाचे उत्सवाचे आमंत्रण सर्वांसाठी खुले आहे. निर्णय आपला आहे की त्यामध्ये सहभागी व्हावे अथवा नाही.

 

देवाची दैविक दया आपल्याबरोबर नेहमीच असते मात्र जेव्हा आपण त्याच्यापासून दूर जातो आपला मार्ग भटकतो तेव्हा आपल्याला हया दयेची खरीखुरी जाणीव होत असते. हया दयेमुळेच तो आपल्या शोधात येत असतो सापडल्यावर आपणास खांद्यावर बसवून आणत असतो व सापडल्यावर उत्साह करतो. जॉन न्यूटन एक अँगलिकन धर्मगुरू १७७३ मध्ये एक सुंदर गाणं लिहीत आहेत त्या गाण्याचे नाव Amazing Grace त्यामध्ये ते लिहितात मी हरवलेलो होतो एका काळी पण आता मी सापडलेलो आहे हे सर्व शक्य झालं कारण ते दयेमुळेच.

आपणही ती दैविक दया अनुभवूया आणि जरी आपण पापी असलो तरी परमेश्वराला न भिता त्याच्याकडे येऊया व इतरांनाही परमेश्वराकडे घेऊन येऊया व सर्वांबरोबर व देवाबरोबर उत्साह करूया.

  

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

आपला प्रतिसाद : हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.

 १) हे प्रभू परमेश्वरा आमच्या उत्तम मेंढपाला आम्ही तुझ्या चरणी आमचे महाशय बिशप सर्वधर्मगुरु व सर्वधर्म भगिनी ह्यास समर्पितो. जेणेकरून त्यांनी तुझ्या मेंढरांची काळजी तुझ्या इच्छेप्रमाणे घ्यावी व तुझ्या मेंढरांना एक कळप व एक मेंढपाळ असे बनवण्यास त्यांना कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया

२) हे परमेश्वरा जागतिक मोहास बली पडलेल्या अनेक लोकांचे मन परिवर्तन व्हावे व त्यांना तुझ्या प्रेमाची दयेची व  शमेची जाणीव व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

३) आपल्या राष्ट्रातील नेत्यांना पवित्र आत्म्याचे दान लाभावे व त्यांना सेवेचा खरा अर्थ समजून समाजाची निस्वार्थपणे सेवा करण्यास शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

४) आपल्या धर्मग्रामातील गावातील शेजोळांतील प्रत्येक व्यक्तीने एकमेकांवर प्रेम करावे व एकोप्याचे वातावरण आपणामध्ये वाढीस लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

५) आपण जे आजारी वयोवृद्ध खाटेला खीळलेले अनेक लोकांसाठी प्रार्थना करूया की प्रभू परमेश्वराने आपला आरोग्यदायी प्रेमल हात त्याच्यावर पसरावा व सर्वांना आरोग्य सांत्वन लाभावे म्हणून प्रार्थना करूया.

६) जे जीवनामध्ये निराश आहेत ज्यांच्या मनात आशेचा दिवा विजला आहे अशा लोकांना परमेश्वरी प्रेमाचा व आशेचा अनुभव यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

Friday, 2 September 2022


Reflection for the Homily of Twenty Third Sunday in Ordinary Time (4/9/2022) by Trimbak Pardhi
सामान्यकाळातील तेविसावा रविवार


दिनांक: ०४/०९/२०२२.

पहिले वाचन: शलमोनाचा ज्ञानग्रंथ ९: १३-१८.

दुसरे वाचन: फिलेमोन ९-१०; १२-१७.

शुभवर्तमान: लुक १४: २५-३३.




“जो कोणी स्वतःचा क्रूस घेऊन माझ्या मागे येत नाही त्याला माझा शिष्य होता येणार नाही”.





 प्रस्तावना:

“जो कोणी स्वतःचा क्रूस घेऊन माझ्या मागे येत नाही त्याला माझा शिष्य होता येणार नाही”. आज देऊळ माता सामान्य काळातील तेविसावा रविवार साजरा करत आहे. आजची उपासना आपणास शिष्यत्व म्हणजे काय हे शिकवत आहे.पहिल्या वाचनात आपण पाहतो की देवाचे हेतू, देवाची इच्छा आपण जाणू शकत नाही कारण आपली बुद्धी अल्प आहे. आपण कितीही ज्ञान मिळवले तरी ते ज्ञान देवाच्या ज्ञानापुढे अगदीच अल्प असते. आपण फक्त जगाच्या दृष्टीने विचार करतो. आपण आपल्या जागतिक सुखाच्या शोधात असतो व त्यासाठी प्रयत्न व कष्ट करीत असतो. जगाचे ज्ञान मिळविण्यासाठी आपण आपलं पूर्ण आयुष्य घालवित असतो. परंतु देवाचे ज्ञान मिळविण्यास आपणास खूप कठीण जात असते. देवाचे ज्ञान मिळविण्याचा आपण प्रयत्न करीत नाही. देवाचे दान आपणास पवित्र आत्म्याकडून मिळत असते. त्यासाठी देवाचे प्रेम ओळखून घेणे खूप गरजेचे आहे. देवाचे प्रेम ओळखणे हीच खरी ज्ञानाची खाण आहे. दुसऱ्या वाचनात आपणास फिलेमोन बरोबर आणि अनेसिम ह्याचा पैलाने घालून दिलेल्या  समेटाबद्दल ऐकतो.

आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त आपणास सदैव आज्ञनेत राहावयास सांगत आहे. सर्व काही त्याग करून देवाच्या मागे जाण्यास सांगत आहे. देवासमोर स्वतःचे घरदार कुटुंब याचा विचार नेहमी दुय्यम ठेवण्यास सांगत आहे. आपला स्वतःचा वधस्तंभ उचलून देवाच्या मागे येण्यास सांगत आहे.

 

मनन चिंतन

प्रिय भाविकांनो, ख्रिस्ताच्या मागे मोठमोठे लोक समुदाय चाललेले होते. ते त्यांचे कौतुक करणारे होते, पण त्यातील अगदी थोडेच त्याचे खरे शिष्य होते. म्हणून आज प्रभू येशू ख्रिस्त आपणास सांगत आहे की "जो कोणी स्वतःचा वधस्तंभ उचलून माझ्यामागे येत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही". वधस्तंभ म्हणजेच आत्मत्याग आणि समर्पण. आपल्या जीवनासाठी देवाची जी इच्छा आहे ती स्वीकारणे म्हणजे स्वतःचा वधस्तंभ वाहने. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात वधस्तंभ असतात. आजार, अपयश, निराशा, अडचणी, शाळेचा किंवा कॉलेजचा अभ्यास इत्यादी प्रकारचे वधस्तंभ उचलून चालावे लागते. आपण जर कोणत्याही व्यक्तीला विचारले की तुला तुझ्या जीवनात काय पाहिजे? प्रत्येक व्यक्ती म्हणेल आम्हाला चांगलं आरोग्य, आनंदी जीवन, चांगलं घर किंवा आरामाचे जीवन पाहिजे. कोणत्याही व्यक्तीला दुःख किंवा कष्टाचे जीवन नको हवं आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती सुखाच्या मार्गाने धाव घेत आहे.ह्याच सुखाच्या मार्गाने जाण्यास आज प्रभू येशू ख्रिस्त आपणाला स्वतःच्या वधस्तंभाला मिठी मारायला सांगत आहे. ज्याप्रमाणे प्रभू येशू ने वधस्तंभाला मिठी मारली, त्याचप्रमाणे आपण सुद्धा आपल्या जीवनातील सर्व अडचणी, आपले काम, दुःख, त्रास हालअपेष्टा, आपली कर्तव्य प्रेमाने स्वीकारायला हवीत.झोपाळा जेवढा मागे जातो तेवढाच पूढे सूद्धा येतो. झोपाळा ज्या वेगाने मागे जातो त्याच वेगाने पूढे सूद्धा येतो. त्याचप्रमाणे आपल्या जीवनात जेवढी दु:ख संकट येतील तेवढच सुख सुद्धा येईल. मात्र ज्यावेळी दुःख येतील, त्यावेळी प्रभूच्या क्रूसाकडे पाहणे व देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणे आणि देवाचे खरे शिष्य बनणे खूप गरजेचे आहे.

प्रत्येक लोक काही दिवसापुरतेच शिष्य असतात, तर काही महिन्यासाठी, तर काही वर्षासाठी शिष्य असतात. कारण ख्रिस्ताचा शिष्य बनल्यावर आपल्या संपूर्ण आयुष्यावर त्याचा कोणता परिणाम होणार किंवा आपल्याला काय सोडावे लागेल व ख्रिस्तासाठी कसे जगावे लागेल याचा आपण विचार करत असतो.

देवाचे खरे शिष्य बनण्यासाठी आपल्यांला कोणत्याही प्रकारच्या अभ्यासाची गरज नसते. येशूच्या शिष्यांनी कोणत्याही प्रकारचा अभ्यास केला नव्हता. येशू ने साध्या अशिक्षित मच्छीमारांची निवड केली होती, आणि त्याच अडाणी अशिक्षित लोकांनी येशूची सुवार्ता जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचविण्याचे महान कार्य केले होते.आज आपण सर्व काही सोडून देवाचे खरे शिष्य बनण्यास देवाला होकार दिला पाहिजे. म्हणून आज आपण प्रत्येक गोष्टीत देवाची इच्छा जाणून घेऊन स्वतःला देवाच्या अधिकारात ठेऊया. सर्वांचा निर्माता जो परमेश्वर त्याला प्रथम स्थान देऊया.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

 

आपला प्रतिसाद : हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.

 

१. अखिल ख्रिस्ती विश्वाची काळजी वाहणारे आपले पोप व त्यांचे विविध पदांवर ख्रिस्तसेवेत असणारे प्रतिनिधी ह्यांनी अखिल मानवजातीला ख्रिस्तसेवक बनण्यास त्यांच्या ख्रिस्तमय वागणुकीने पाचारण करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. आजच्या ह्या स्पर्धात्मक व चंगळवादाच्या युगात मानव देवापासून दूर जाऊ लागला आहे. फक्त अडचणीत देवाचा धावा करावा हा त्यांचा युक्तिवाद नष्ट व्हावा व देवाने केलेल्या उपकारांची त्यांना जाणीव व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. अनेक तरुण तरुणी उच्च पदवीधर असूनही नोकरीसाठी इतरत्र भटकंती करत आहे त्यांना त्यांच्या शिक्षणायोग्य नोकरी मिळावी व त्यांच्या कुटुंबासाठी ते भक्कम आधारस्तंभ बनावेत म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. गरजवंत कुटुंबाना हवी असलेली मदत मिळावी तसेच मुलांचा आरोग्य व शांततेत सर्वांगीण विकास व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. ज्या स्थानिक लोकांचे अस्तित्व व ओळख धोक्यात आहे त्यांना योग्य तो सन्मान मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

६. आता आपण शांतपणे आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक गरजा प्रभूचरणी मांडूया.

Friday, 26 August 2022

           Reflection for
22nd Sunday in Ordinary Time (27/8/2022) By Bro. Rockson Dinis 

सामान्य काळातील बाविसावा रविवार

दिनांक: २८ /०८ /२०२२

पहिले वाचन: बेनसिरा ३: १९२१३०३१

दुसरे वाचन: इब्री लोकांस पत्र १२: १८१९२२२८

शुभवर्तमान: लूक १४ : १,१४.



प्रस्तावना:

 आज देऊळ माता सामान्य काळातील बाविसावा रविवार साजरा करत आहे. आजची उपासना आपल्याला नम्रतेचा उत्तम असा धडा शिकवत आहे. नम्रता म्हणजे काय, व ती आपण आपल्या जीवनात कशा प्रकारे आचरणात आणावी, नम्र कसे बनावे व त्याचे होणारे फायदे याबद्दल आज आपल्याला आजच्या उपासनेतून ऐकावयास मिळत आहे.

बेनसिराच्या पुस्तकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात सांगण्यात येत आहे कि या धरतीवरती पुष्कळ असे नामांकित लोक आहेत, जे जगामध्ये खूप प्रसिद्ध आहेत परंतु अशा लोकांना प्रभू येशूचे रहस्य प्रकट होत नाही. तर ती रहस्ये विनयशील व नम्र जनांस प्रकट होतात. दुसरे वाचन हे इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले आहे. हे वाचन आपल्याला जीवनात येणारे दुःख आणि छळ ह्यांना ख्रिस्ताच्या शिकवणुकीप्रमाणे फायद्याच्या प्रकाशात कसे पाहिले पाहिजे हे स्पष्ट करते. लुककृत शुभवर्तमानात प्रभू येशू आपल्याला  नम्रता ह्या गुणाचे होणारे फायदे ह्या विषयी सांगत आहे. अशीच नम्रता आपण आपल्या जीवनात अनुसरून ख्रिस्ताची शिकवण जगभरात पसरावी म्हणून ह्या मिस्साबलिदानात प्रार्थना करूया.

 

मनन चिंतन :

जो ऐकतो व ते आचरणात आणतो त्याचे जीवन किती आनंदी आहे. कारण आपले ऐकणे हे बीज पेरणे आहे, आणि आपली कृती हे त्या बीजाचे फळ आहे”. (संत ऑगस्टीन)

            ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय भाविकांनो, आज आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त नम्रतेचा धडा शिकवत आहे. येशू म्हणतो “जो कोणी स्व:ताला उंच करतो, तो नमवला जाईल आणि जो कोणी स्व:ताला  नमवतो तो उंच केला जाईल”. ह्याचे स्पष्ट उदाहरण म्हणजेच पौलाचे  फिलीप्पेकरांस पत्र २;६-७: तो  देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे  त्याने मानले नाही, तर त्याने स्व:ताला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतीरूपाचे होऊन  दासाचे स्वरूप धारण केले”. आपन नवीन करारात पहिले तर आपल्याला कळून चुकेल कि परुशी नियमशास्त्रात चांगले हुशार होते व देवाचे योग्य असे त्यांना ज्ञान होते. आजचे शुभवर्तमान वाचल्यानंतर आपल्याला कळणार कि परुशी जे येशूचा विरोध करत होते त्यांनीच  येशूला भोजनासाठी आमंत्रण दिले होते. परंतु प्रभू येशूने परुशाचे आमंत्रण नाकारले नाही. कारण तो सर्वांसाठी तारण आणण्यासाठी या धरतीवर आला होता. परुशाच्या भोजनाच्या वेळी पाहुण्यांना वयोमानानुसार नव्हे तर त्यांच्या मानाने व दर्जानुसार बसवण्याची प्रथा त्या काळी होती. येशूने पाहिले की सर्व पाहुण्यांनी प्रथम स्थान घेण्याचा कसा प्रयत्न केला. विशेष करून परुशी, कारण त्यांना खात्री होती की त्यांचा प्रथम स्थानांवर अधिकार आहे  व त्यांच्या  मानानुसार  व दर्जानुसार देवाच्या राज्यात प्रवेश होणे हे  खात्रीचे आहे. एक प्राचीन म्हण आहे. “महत्त्वाच्या व्यक्तींसाठी ठेवलेली राखीव जागा केव्हा घेऊ नका”. अशीच शिकवण आपण नितीसुत्रे पुस्तकात वाचतो. (नितीसुत्रे २५:७) “तुला खालच्या जागी बसविण्यात यावे, त्यापेक्षा वर येवून बैस असे तुला म्हणावे हे बरे”.

            आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला संदेश देत आहे कि गर्व आपल्याला स्वार्थी बनवतो. कोण कोणापेक्षा  महान, हुशार, अशी आपण एकमेकाबरोबर तुलना करायला लागतो. आपण नैसर्गिकरित्या इतरांकडून ओळख आणि सन्मान मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि याचा परिणाम म्हणून आपण आपल्या जीवनात अपयशआणतो. परंतु येशू म्हणतो की जे स्वत:ची प्रशंसा शोधतात त्यांना नम्र केले जाईल, तर जे इतरांना प्रथम स्थान देतात ते उच्च केले जातात. ख्रिस्त धर्माची सर्वोच्च शिकवण किंवा आवाहन म्हणजे प्रथम इतरांना, स्वतःहून अधिक महत्त्व देणे, व लोकांना त्यांच्या जीवनात प्रोत्साहित करणे. म्हणूनच शास्त्र म्हणते, (याकोबाचे पत्र ४:६) देव गर्विष्टांना विरोध करितो, आणि लीनांवर कृपा करितो. आजचे शुभवर्तमान आपल्याला सांगते, देवाच्या शक्तिशाली हाथाखाली स्वतःला नम्र करा, जेणेकरून तो तुम्हाला योग्य वेळी उंच करेल. करुणा, दयाळूपणा, नम्रता, सौम्यता आणि संयम धारण करा. कारण जेव्हा जीवनात गर्विष्ठपणा येतो तेव्हा त्याच्याबरोबर बदनामी सुद्धा येते. प्रभू येशूच्या शिकवणुकीत प्रेम आणि नम्रपणा ह्यांना सर्वात उच्च स्थान आहे. म्हणून आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला नम्र होण्यासाठी बोलावत आहे. नम्र माणूस कधीही उतावीळ, किंवा अस्वस्थ नसतो, परंतु नेहमी शांत असतो. नम्र मनुष्य नेहमी निश्चिंत असतो कारण असे काहीही नाही जे त्याचे मन हलवू शकेल.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद:  ‘हे परमेश्वरा, आमची प्रार्थना ऐक’

 

१)    आपले पोप फ्रान्सीस, सर्व बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ बंधुभगिनी यांना त्यांच्या प्रेषितीय कार्य करण्यासाठी तुझी कृपा दे त्याच प्रमाणे त्यांना नम्र हृद्य दे.

२)    आपल्या समाज्यात, कुटुंबात व धर्मग्रामात प्रत्येक व्यक्तीला समानतेची व सन्मानाची वागणूक मिळावी म्हणून प्रार्थना करूया.

३)    समाजात वावरत असताना, आपण ख्रिस्ती म्हणून इतरापर्यंत नम्रतेची शिकवण आपल्या वागन्याद्वारे द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

४)    आपल्या धर्मग्रामात जे कोणी आजारी असतील, त्यांना परमेश्वराने स्पर्श करावा, त्यांना चांगले आरोग्य द्यावे म्हणून प्रार्थना करूया.

५)    अति पावसामुळे कितेकांची  घरे उद्वस्त झाली आहेत, परमेश्वराने त्याच्या सांभाळ करावा आणि त्याच्या गरजा पुरवाव्यात म्हणून आपण प्रार्थना करूया.

६)      थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.



Thursday, 18 August 2022

 Reflections for the homily of 21st Sunday in Ordinary Time (21-08-2022) by Br. Justin Dhavade.


सामान्य काळातील एकविसावा रविवार






 दिनांक: २१/८/२०२२

पहिले वाचन: यशया ६६:१८-२१

दुसरे वाचन: ईब्री लोकांस पत्र १२:०५-१३

शुभवर्तमान: लूक १३:२२-३०


प्रस्तावना

            आज देऊमाता सामान्य काळातील एकविसावा रविवार साजरा करीत आहे. आज आपण न्याय रविवार सुद्धा साजरा करीत आहोत. आजच्या पहिल्या वाचनामध्ये परमेश्वर म्हणतो कि सर्व राष्ट्रांनी आणि भिन्नभिन्न भाषा बोलणाऱ्यांनी माझे वैभव पहावे म्हणून मी त्यांस एकत्र करीन अशी वेळ आली आहे. तर दुसऱ्या वाचनामध्ये आपण वाचतो कि परमेश्वर ज्याच्यावर प्रीती करतो त्याला तो शिक्षा करतो आणि ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकाना फटके मारतो. कारण कोणतीही शिक्षा खेदाची वाटते पण तिच्याद्वारेच प्रत्येक मानवाला आध्यात्मिक जीवन जगण्याचे वळण लागते. शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, अरुंद दरवाजाने आत जाण्याचा नेटाने प्रयत्न करा कारण मी तुम्हास सांगतो पुष्कळ लोक आत जाण्यास पाहतील परंतु त्यांना जाता येणार नाही”.

आपल्या प्रत्येकाच्या मरणानंतर न्याय होणार आहे, आणि त्या न्यायाद्वारे आपण स्वर्गात जावे अशी प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे म्हणूनच ख्रिस्त आजच्या वाचनामध्ये आपल्या प्रत्येकाला अरुंद दरवाजाने आज जाण्यास सांगत आहे तो अरुंद दरवाजा म्हणजे नीतीचा आणि पवित्रतेचा मार्ग आहे. तो मार्ग स्वीकारण्यास आणि त्याद्वारे वाटचाल करण्यास प्रभू येशूने आपणाला कृपाशक्ती व सामर्थ्य द्यावं म्हणून ह्या पवित्र मिस्साबलिदानामध्ये आपण प्रार्थना करूया.

 

मनन चिंतन

येशूचे अनुरण करणे सोपे नाही. परंतु त्याच्या कार्यासाठी मजबूत होण्यासाठी आपण स्वतःला प्रशिक्षित केले पाहिजे. जर आपण येशूच्या काळात त्याचे अनुसरण करणाऱ्या लोकांकडे पाहिले तर आपणास कळून चुकेल कि, त्याच्या प्रेमाच्या संदेशाकडे आकर्षित झालेल्या अनेक लोकांना त्याने बरे केले आणि एका नवीन जीवनाची आशा त्यांच्यामध्ये निर्माण केली. परंतु जेव्हा त्यांनी येशू ख्रिस्ताची कठीण शिकवण ऐकली, विशेष करून स्वतःचा क्रूस उचलून त्याला अनुसरणे, तेव्हा अनेकजणांनी त्याच्या शिक्षणाला सकारात्मक उत्तर दिले नाही तर त्याच्या पासून दूर गेले. कारण खऱ्या शिष्यत्वाची शिकवण कठीण आहे असे त्यांना वाटले. जे त्याला खरोखर ओळखतात आणि प्रेम करतात तेच त्याच्या आजूबाजूला राहिले.

          जे लोक येशूला सोडून गेले किंवा विरोध करून गेले, त्यांना खरोखर त्याचे शिष्य व्हायचे नव्हते. येशूने पित्याची इच्छा पूर्ण करणे हे त्याचे ध्येय आणि त्याच्या शिष्यांचे कार्य म्हणून प्रचार केला. परंतु काहीजणांच्या स्वतःच्या इच्छा आकांशा होत्या. अनेकजण येशूच्या मागे फक्त काहीतरी मिळवण्याच्या इच्छेने आले होते, तर काहीजण त्यांच्या वाईट परिस्थितीतून सुटका मिळावी म्हणून.

          आजच्या लुकलिखित शुभवर्तमानात १३ व्या अध्यायातील तीन बोधकथांपैकी तिसरी बोधकथा म्हणजे अरुंद मार्ग. जी देवाच्या राज्याद्वारे आणलेल्या अनपेक्षित बदलांच्या विषयाशी संबंधित आहे. इतर दोन बोधकथा मोठ्या झाडात वाढणारया मोहरीच्या छोट्याश्या दाण्याबद्दल आणि थोड्या प्रमाणात  पीठ वाढवणाऱ्या खमिराबद्दल आहेत. ह्या तिन्ही बोधकथा देवाच्या राज्याबद्दल आहेत.

आजच्या शुभवर्तमानातील कथेद्वारे आपणाला कळून चुकते की येशू जेरुसलेमला जात असताना लोकांना शिकवत आहे. आणि तिथेच जमावाच्या एका प्रश्नामुळे येशूला भविष्यसूचक विधान करण्याची संधी मिळते. संत लुक आपल्या शुभवर्तमानात या प्रश्नाचे साधन अनेक वेळा वापरतो. उदाहरणार्थ, एक व्यक्ती जी येशूला विचारते, “सार्वकालिक जीवनाचा वारसा मिळण्यासाठी मी काय केले पाहिजे?” तेव्हा त्याला येशू चांगल्या  शमरोनीची कथा सांगतो आणि म्हणतो कि, जाऊन तुही तसेच कर.

प्रभू येशूला आपणास एवढेच सांगायचे आहे की, अरुंद दरवाजातून आत जाण्यासाठी उरलेल्या वेळेत प्रयत्न करणे आवश्यक आहे कारण बरेच लोक आत जाण्याचा प्रयत्न करतील. परंतु ते पुरेसे मजबूत नसतील. त्यानंतर तो दुसर्‍या दरवाजाबद्दलच्या दृष्टांताविषयी सांगतो कि, एकदा घर मालकाने घरात प्रवेश करून जर आतून दार लावले की इतरांना आत जाण्याचा कोणताही मार्ग राहणार नाही आणि जर तुम्ही दार ठोठावले तरी तो आतून म्हणेल की , “मी तुम्हांला ओळखत नाही.

पोप फ्रान्सिस यांनी एका मुलाच्या संमतीने त्याचा प्रश्न प्रेक्षकांसोबत मांडला, “मुलगा म्हणाला, ‘थोड्या वेळापूर्वी माझे वडील मरण पावले. माझे वडील अविश्वासू होते. परंतु त्यांनी चारही मुलांचा बाप्तिस्मा करून घेतला. ते चांगले होते. तर माझे वडील स्वर्गात आहेत का?’’ पोप साहेबांनी त्या मुलाला उत्तर दिले कि, जो स्वर्गात जातो तो देव आहे. पोप साहेब पुढे मुलांना म्हणाला, “देव कसा आहे याचा विचार करा. विशेषतः देवाचे हृदय कोणत्या प्रकारचे आहे: तुम्हाला काय वाटते? देवाला वडिलाचे हृदय आहे का? आणि तुमचा पिता जो विश्वास ठेवणारा नव्हता, परंतु त्याने आपल्या मुलांचा बाप्तिस्मा केला आणि एक चांगला माणूस बनला. देव त्याला स्वतःपासून दूर सोडू शकेल, असे तुम्हाला वाटते का? आपली मुले चांगली असताना देव सोडून देतो का?” तेव्हा सर्व मुले ओरडली, “नाही”. तेव्हा पोपने मुलाला सांगितले, ‘तेथे, इमॅन्युएल, हेच उत्तर आहे,’ म्हणजे आम्हा बारोबर देव. देवाला तुमच्या वडिलांचा नक्कीच अभिमान होता आणि तुम्हालाही असायला पाहिजे, कारण तो एक चांगला माणूस होता ज्याने आपल्या मुलांसाठी काय चांगले हवे होते ते केले.’

पोप फ्रान्सिस आपल्याला आठवण करून देतात की, स्वर्गात कोण जाणार हा प्रश्न आपण देवावर सोडला पाहिजे. हा आमच्यासाठी उत्तर देण्याचा प्रश्न नाही. देवाला आपल्याकडून काय हवे आहे याची आपल्याला काळजी वाटली पाहिजे. तो आपल्यासमोर कोणता प्रवेशद्वार ठेवत आहे हे आपल्याला जाणून घेतले पाहिजे.

आपण स्वतःस प्रश्न विचारू या: मी माझ्या विश्वासाच्या जीवनात जाणीवपूर्वक प्रयत्न कसे करत आहे? येशूचे अनुसरण करताना मला कोणत्या अडचणी आल्या? माझ्या आयुष्यात असे कोणी आहे की ज्याला त्याच्या विश्वासाच्या प्रवासात काही प्रोत्साहनाची गरज आहे?  

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.

१. हे प्रभू ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप महाशय, बिशप्स व सर्व धर्मगुरू ह्यांना तुझ्या पवित्र हृदयी सुरक्षित ठेव. आध्यात्मिक व शारीरिक अशा सर्व आपत्तीपासून तू त्यांचे संरक्षण कर व सर्वांशी प्रेमाने, नम्रतेने व आपुलकीने वागण्यासाठी तू त्यांना आध्यात्मिक शक्ती दे.

२. हे दयावंत परमेश्वरा, तुझा चांगुलपणा अमर्याद आहे, आज आम्ही जे लोक आजारी, दुखी कष्टी, निराशी व संकटग्रस्त आहेत अशा सर्व लोकांना परमेश्वरी कृपेचा अनुभव यावा त्यांचे जीवन पुन्हा एकदा प्रभू प्रेमाने बहरावे म्हणून प्रार्थना करतो.

३. हे येशू तू कामगारांचा मित्र व सोबती आहेस म्हणून जे सर्व प्रकारच्या शारीरिक व बौद्धिक कामात गुंतलेले आहेत त्यांच्या सर्व गरजा व योजना पूर्णत्वास नेण्यास त्यांना मदत कर, व जे लोक वैफल्य, नैराश्य आणि संघर्ष ह्यांनी ग्रस्त झालेले आहेत त्यांना तुझ्या सार्वकालिक शांतीचे वरदान दे.

४. हे प्रभू स्वर्गाकडे जाणारा अरुंद मार्ग जरी कठीण असला तरी त्यावर चालण्यास आम्हां सर्वाना तुझी कृपाशक्ती आणि सामर्थ्य दे जेणेकरून आम्हाला तारणप्राप्ती  होईल.

५.आता आपण थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूंसाठी ईश्वरचरणी प्रार्थना करूया.