Thursday, 16 November 2023

 


Reflection for the 33rd Sunday in Ordinary Time (19/11/2023) by Br. Roshan Nato



सामान्य काळातील तेहतिसावा रविवार

दिनांक: १९/११/२०२३

पहिले वाचन: नीतिसूत्रे: ३१:१०-१३१९-२०३०-३१

दुसरे वाचन: थेस्सलनीकाकरांस पहिले पत्र: ५:१-६

शुभवर्तमान: मत्तय: २५:१४-३०




प्रस्तावना:

ख्रिस्तामध्ये माझ्या सर्व भाविकांनो, आज देऊळमाता सामान्य काळातील तेहतिसावा रविवार साजरा करत आहे. आजची उपासना आपणा सर्वांना लहानातल्या लहान गोष्टीत विश्वासू राहून, श्रम करून, जागृत राहण्यास आमंत्रण करत आहे.

आजचे पहिले वाचन नीतिसूत्रे या पुस्तकातून घेतलेले असून, त्यामध्ये आपल्याला सदगुणी स्त्रीच्या हितकारक वर्तनाबद्दल स्तुती करते. त्याचप्रमाणे आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल, हे आपल्या पहिल्या पत्रामार्फत थेसोलोनिकरांस काळ आणि समय याविषयी सांगत असता, आपल्याला प्रभूच्या दिवसाने चोरासारखे गाठू नये म्हणून जागृत आणि सावध राहण्यास सांगत आहे.

त्याचप्रमाणे आजचे शुभवर्तमान आपल्याला लहानातल्या लहान गोष्टीत विश्वासू राहून स्वर्गीय सुखात सहभागी होण्यास पाचारण करत आहे. म्हणून परमेश्वराने केलेल्या या पाचरणास आपण सर्व सज्ज व्हावे म्हणून प्रार्थना करूया.

मनन चिंतन

आज देऊळमाता सामान्य काळातील तेहतिसावा रविवार साजरा करत आहे, आणि आजच्या दिवसाची उपासना आपणा प्रत्येकाला परमेश्वराकडून मिळालेल्या कृपादानांचे, तसेच गुण कौशल्याचे चीज करून, आपल्याला बहाल केलेल्या सर्व गोष्टींमध्ये विश्वासू राहून, आपल्या दैनंदिन जीवनात स्वस्त व आळशी न बनता कुठल्याही कामात परिश्रम करण्यास आपल्याला पाचारण करीत आहे.

आजचे शुभ वर्तमान आपल्या सर्वांना आवर्जून लहानातल्या लहान गोष्टींमध्ये विश्वासू राहण्यास सांगत आहे. येशू ख्रिस्त ह्या दृष्टांतातून आपल्याला आज खूप काही शिकवत आहे. या दृष्टांतात सांगितल्याप्रमाणे कोणा एका सावकाराने आपण परदेशी चाललो असता आपली काही रक्कम आपल्या तीन दासांमध्ये ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे वाटून दिली आणि तो आपल्या कामास निघून गेला, लागलीच ह्या दासांनी आपल्याला मिळालेल्या रक्कमेची गुंतवणूक करून त्याच्याहून अधिक रक्कम बनवली. परंतु एकाने आपल्याला मिळालेल्या रक्कमेचे मोल न जाणता ती रक्कम जमिनीत धूळ खात लपवून ठेवली आणि स्वस्थ राहिला. परंतु सावकार आल्यावर आपल्या तिन्ही दासांकडून आपला हिशोब घेतला तेव्हा पहिल्याने पाचशेचे दहा हजार केलेले पाहून तो आनंदित झाला, तसेच दुसऱ्याने दोनाचे चार हजार केलेले पाहून त्या दोघांना शाब्बासकी देत सांगितले की, माझ्या भल्या आणि विश्वासू दासांनो तुम्ही लहानशा गोष्टीत विश्वासू राहिलात मी तुमची नेमणूक पुष्कळांवर करीन. परंतु जेव्हा शेवटचा दास सावकाराजवळ येऊन आपल्याला मिळालेली पुंजी जशीच्या तशी ना कमी ना जास्त देत असता सावकाराला त्याचा राग अनावर झाला नाही आणि त्याची ह्या दासाला शिक्षा म्हणून एका काळकोठडीत टाकण्यात सांगितले.

जेव्हा आपण या दाखल्याची फोड करून पाहतो वा सावकाराच्या जागी परमेश्वर आणि दासांच्या जागी आपण सर्व मनुष्यांना ठेवतो तेव्हा आपल्याला कळून चुकते की, परमेश्वराने आपणा प्रत्येकाला आपल्या कुवतीप्रमाणे अगदी भरभरून काही ना काही विशेष दिलेले आहे. आपल्यातले काहीजण आपल्याला मिळालेल्या कृपादानांचा सांगितलेल्या दृष्टांतातील दोन दासाप्रमाणे आपल्याला देवाकडून मिळालेल्या गुण कौशल्यांना आपल्या श्रमाची जोड देऊन ते आपल्या जीवनात पुष्कळ गोष्टींवर आपले प्रभुत्व गाजवत आहेत. याच वास्तूस्थितीला अनुरूप असे आजच्या पहिल्या वाचनात नीतिसूत्रे या पुस्तकातील सद्गुणी स्त्रीच्या प्रशंसेबद्दल आपल्याला कळते की जी स्त्री आपल्या सौंदर्याला भुलून न जाता देवाचे भय धरून आपल्या हातांनी काम करते त्या स्त्रीला आपल्या श्रमाचे फळ मिळते आणि तिची भर वेशित प्रशंसा होते.

त्याचप्रमाणे आपण जेव्हा तिसरा दास म्हणजे जो आपल्या सावकाराची रक्कम जशीच्या तशी परत करतो, त्या दासासारखे आपल्यातही काही व्यक्ती आहेत की, जे आपल्याला देवाकडून उदारतेने जे काही भेटलेले आहे ते त्याची मोल न जाणता आपल्या आळशी, दुराचारी बुद्धीने आणि निश्रमाने आपल्या गुण कौशल्यांना तिलांजली देऊन एक रिकामटेकडे जीवन जगत आहेत. परंतु या असल्या व्यक्तींना उद्देशून आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल सांगत आहे की, बंधू जन हो प्रभुचा दिवस येत आहे. तो दिवस कसा व केव्हा अगदी चोरासारखा येईल ते कोणास ठाऊक नाही म्हणून स्वस्त, आळशी, रिकामटेकडे राहून झोपी जाऊ नका तर जागी आणि सावध राहा. कारण आपण सर्व प्रकाशाची तसेच दिवसाची प्रजा आहोत, रात्रीची वा अंधाराची नव्हे.

माझ्या प्रिय भाविकांनो, परमेश्वराकडून आपणा सर्वांना खूप काही गोष्टी, म्हणजे काम करण्याची क्षमता, नोकरी, व्यवसाय आणि अनेक अशा चांगल्या संधी आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे परमेश्वराने आपल्या जीवनात खूप अशी चांगली माणसं म्हणजे, आपले आई वडील, बंधू-भगिनी आपले नातेवाईक, शेजारी व मित्रमंडळी दिली आहेत. त्याचप्रमाणे आजच्या आधुनिक जगात प्रसिद्ध असलेले प्रसार माध्यमांची वेगवेगळी साधन उपलब्ध करून आपले जीवन अगदी सुखमय आणि सोयीस्कर करून ठेवले आहे. परंतु आज परमेश्वर आपल्याला या सर्व देणग्यांचा चांगला वापर करून आपल्यातील श्रम करण्याची क्षमता जाणून घेऊन या आपल्या ला बहाल केलेल्या देणग्यांची गुंतवणूक करून परमेश्वराचे वचन सर्व जगभर पसरवण्यास आणि परमेश्वराने दिलेल्या देणग्यांबद्दल विश्वासू राहण्यास पाचारण करत आहे. म्हणून त्याच पाचरणाला होकार देऊन विश्वासू जीवन जगण्यास आपल्याला कृपा व सामर्थ्य लाभावे म्हणून प्रार्थना करूया.


विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभो तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.

१) पोप फ्रान्सिस, बिशप, धर्मगुरू व व्रतस्थ बंधू-भगिनी यांनीं देऊळमातेच्या उन्नतीसाठी दिलेली आपली जबाबदारी ओळखून प्रामाणिकपणे पार पाडावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

२) आपल्या ख्रिस्ती बंधुभगिनीना बाप्तिस्मा संस्काराद्वारे दिलेल्या आपल्या ख्रिस्ती जबाबदारीकडे दुर्लक्ष न करता ती विश्वासाने पार पाडण्यास त्यांना देवाची कृपा मिळावी म्हणून आपण परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया.

३) हे दयावंत परमेश्वरा आम्ही विशेषकरून दीर्घकाळ आजारांनी  ग्रस्त आहेत अश्या लोकांसाठी प्रार्थना करतो. त्यांना त्यांचा आजार सहन करण्यास दैवी शक्ती व कृपा लाभावी व ईश्वरी स्पर्श्याने ते निरोगी बनावेत म्हणून तुझ्याकडे याचना करतो.

४) आपण आपल्या धर्मग्रामासाठी प्रार्थना करूया की, येशूच्या शिकवणीप्रमाणे चालून परमेश्वराचा आमच्या कामाद्वारे गौरव होण्यास आपणास कृपा लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

५) थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया. 



Thursday, 9 November 2023

 




Reflection for the 32nd Sunday in Ordinary Time (12/11/2023) by Br. Trimbak Pardhi




सामान्य काळातील बत्तीसावा रविवार

दिनांक: १२/११/२०२३

पहिले वाचन: शलमोनाचा ज्ञानग्रंथ ६:१२-१६         

दुसरे वाचन: थेस्सलनीकाकरांस पहिले पत्र ४:१३-१८

शुभवर्तमान: मत्तय २५:१-१३



प्रस्तावना:-

आज आपण सामान्य काळातील बत्तीसावा रविवार साजरा करीत आहोत. आज प्रभू येशू ख्रिस्त आपणास जागृत राहण्यास अथवा सज्ज राहण्यास व पूर्ण तयारीत राहण्याचे आमंत्रण देत आहे.

आजचे पहिले वाचन आपणास सांगते कि, ज्ञान हे परमेश्वरामध्ये आहे आणि त्याच ज्ञानाची ओळख करून घेण्यासाठी आपल्याला देवाच्या सानिध्यात राहणे गरजेचे आहे. परमेश्वराचे ज्ञान हे पुस्तकात नव्हे तर अनुभवाद्वारे मिळत असते.

आजच्या दुसर्या वाचनामध्ये आपण ऐकतो कि, ख्रिस्ती लोक येशूच्या पुनरागमनाची आशेने वाट पाहत असता त्यामधील अनेक लोक मरण पावले होते

शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला दहा कुमारींचा दृष्टान्त देत आहे. पाच  कुमारीकांना वराचे दर्शन झाले व त्या त्याच्यासोबत मेजवानीस गेल्या कारण त्या तयारीत होत्या. परंतु इतर पाच कुमारीकांना प्रभूचे दर्शन झाले नाही. कारण त्यांनी पूर्णपणे तयारी केली नव्हती. आज प्रभू येशू ख्रिस्त आपणास जागृत राहून, पूर्ण तयारीत राहण्यास सांगत आहे. मानवपुत्र कधी येईल हे आपणास ठाऊक नाही. म्हणून आपण नेहमीच सावध असून मनाची पूर्ण तयारी करू या. आपले चारित्र्य शुद्ध ठेऊया. प्रभूला अनुरूप असे जीवन जगूया.

बोध कथा:

राज्याच्या दरबारामध्ये काही विदुषक असतात. त्यांचे काम म्हणजे, आपल्या गमतीदार बोलण्याद्वारे आणि विचित्र गोष्टींद्वारे लोकांना हसवणे आणि त्यांची करमणूक करणे. राजाच्या दरबारी असलेला एक विदुषक गंमतीस पात्र आणि मूर्खसुद्धा मानला जात असे. एकदा सभागृहामध्ये बसलेल्या राजाने त्याला सांगितले कि, ह्या किल्ल्या घे आणि माझी खोली उघड व तिथे मी आहे का थे पाहून ये. तो लगेच त्या दरवाज्याच्या किल्ल्या गेहेऊन पळत राज्याच्या खोलीत गेला. काही क्षणात पळत-पळत परत येऊन म्हणाला कि, ‘महाराज तुम्ही तिथे नाही. त्यावर राजा हसत त्याला म्हणाला, ‘तुझ्याइतका मूर्ख व्यक्ती मी कुठेच पाहिला नाही. आता एक काम कर तुला जर तुझ्यापेक्षा जास्त मूर्ख माणूस कधी कुठे भेटला तर मला येऊन सांग.

काही वर्षांनी राजा म्हातारा झाला.  र्ष्यांनीााय नेक लोक मरण पावले. त्याला म्हातारपणात गंभीर आजाराने ग्रासले. अनेक वैद्यांनी राजावर उपचार केले, परंतु त्याच्या प्रकृतीत फारसा फरक दिसेना.  आजार वाढतच चालला होता. राजा आपली प्रकृति बरी होण्यासाठी काहीही करायला तयार होता. परंतु मरणाला सामोरे जाण्यास तयार नव्हता. मरणाच्या विचाराने तो अगदी घाबरून जात असे. ह्याचेच औचित्य साधून तो विदुषक राजाकडे येऊन त्याला म्हणाला, महाराज मला माझ्यापेक्षा जास्त मूर्ख असा एक मनुष्य सापडला आहे. राजा म्हणाला कोठे आहे तो? त्याला येथे घेऊन ये. तेव्हा विदूषक म्हणाला, ‘तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून तुम्ही आहात.’ त्याने पुढे ह्याचे स्पष्टीकरण दिले कि, ‘एखादा मनुष्य म्हातारपणात मरणाच्या प्रवासाची तयारी करत असतो. परंतु तुम्ही तुमचा जीव वाचवण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करता. ह्याउलट मरणा नंतरची तयारी तुम्ही केलीच नाही. तुमची तयारी शून्य आहे. म्हणून मला वाटते कीं माझ्यापेक्षा जास्त मूर्ख मनुष्य तुम्ही आहात.राजाला आपली चूक ताबडतोब लक्षात आली. त्यांने विदूषकाचे आभार मानले व मरणाची तयारी करायला सुरुवात केली.

मनन चिंतन:

देउळमाता आपणास देव्शब्दाद्वारे आवाहन करत आहे कि, आपण सतत जागृत असावे. ह्याचे कारण म्हणजे, तो दिवस, ती घटका कधी येईल हे कोणास ठाऊक नाही. हेच शब्द आपल्याला आठवण करून देतात कि, आपण या जगाचे रहिवासी नसून फक्त प्रवासी आहोत. एक दिवस आपल्या प्रत्येकाला या जगाचा निरोप घ्यायचा आहे. परंतु केव्हा, कुठे व कसा हे आपल्याला ठाऊक नाही. याचा अर्थ असा नाही की, आपण सतत मरणाची भीती बाळगावी. याचा अर्थ असाही नाही की, आपण आपले लक्ष सर्वदा मृत्युकडे केंद्रित करावे आणि आपण आपल्या मरणाविषयीं चिंतीत असावे. सांगण्याचे तात्पर्य हे कि, आपण मरणाची फक्त आठवण ठेवावी व त्याद्वारे सर्वकालिक जीवनावर श्रद्धा ठेऊन आपले दैनिक जीवन जगावे. हे दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या जीवनावर कधी संकट येईल, आपण कधी आजारी पडू, किंवा आपल्यावर मरणाचं संकट कधी येईल हे आपल्याला ठाऊक नसणार, म्हणून पूर्ण तयारीने राहणे अगत्याचे आहे

बोधकथेत सांगितल्याप्रमाणे, मूर्ख राजा आपल्या मरणाची तयारी करण्यास अपयशी ठरला. तो आपले भौतिक जीवन वाढविण्यात असफल झाला. स्वर्ग राज्यात जाण्याच्या तयारीत अग्रेसर ठरला नाही. ह्या उलट आपले जीवन कसे अधिक वाढवावे म्हणून तो काहीही करायला तयार होता. म्हणून विदुषकाने राजा मूर्ख आहे सिद्ध करून दाखवले, व राजाला आपल्या मरणाची तयारी करण्यास आठवण करून दिली.

आजच्या पहिल्या वाचनात शलमोनच्या ज्ञानग्रंथात आपल्याला ज्ञानाबद्दल सांगितले आहे. ज्ञान हे देवाने दिलेली देणगी आहे. जो कोणी त्याची आ धरतो त्याला ते लाभते. त्याचा शोध घेणाऱ्यांना ते सापडते. जो खऱ्या अंतकरणाने ज्ञानाचा शोध घेतो, त्याच्यापासून ज्ञान हे, कधीच दूर ठेवले जात नाही. देवाचे ज्ञान हे आपल्याला एकमेकांवर प्रेम करण्यास मदत करत असते, म्हणून हे ज्ञान मिळविण्यासाठी आपणाला देवाच्या सानिध्यात राहणे खूप गरजेचे आहे.

तसेच आजच्या दुसऱ्या वाचनात आपण वाचतो कि, ख्रिस्ती लोकांच्या मनामध्ये ख्रिस्ताचे पुनरागमन अगदी लवकरच होणार हि भावना बाळगून बसले होते. हे जीवन जगत असताना मरण पावलेल्या विश्वासू लोकांचे काय होणार ही चिंता त्यांना सतावित होती. म्हणून संत पौल सांगत आहे कि, जे ख्रिस्तामध्ये मरण पावले आहेत ते एक दिवस सर्व ख्रिस्ता बरोबर उठविले जातील व देवाच्या सानिध्यात असतील.

आपला विश्वास हा येशू ख्रिस्त व त्याच्या पुनरागमनावर आधारित आहे. आपल्या मरणाने नवीन जीवनाला सुरुवात होते. देवपित्याबरोबर, येशू ख्रिस्ता बरोबर आणि पवित्र आत्म्या बरोबर सार्वकालिक जीवन अनुभवण्यास आपणास पाचारण होत असते.

आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला दहा कुमारींचा दृष्टांत देत आहे. त्यातील पाच शहाण्या व पाच मूर्ख होत्या. त्या वर येण्याची वाट पाहत होत्या. जेव्हा वर आला तेव्हा फक्त शहाण्या कुमारीका वराला भेटू शकल्या, कारण त्यांच्याकडे पुरेसे तेल होते, त्या तयारीत आल्या होत्या. परंतु मूर्ख कुमारीका भेटू शकल्या नाहीत, कारण त्यांच्याकडे तेल नव्हते, त्यांनी त्या राजाच्या/वरच्या स्वागतासाठी पुरेशी तयारी केली नव्हती.

आपल्याला कोणतीही गोष्ट करायची असेल किंवा कोणतेही कार्य करायचे असेल तर आपल्याला पूर्ण तयारी करावी लागते. जेव्हा पाहुणे आपल्या घरी येत असतात, तेव्हा आपण खूप तयारी करत असतो. खासकरून थंडपेय, फराळ आणि भोजनाची सोय आपण करत असतो.

आपल्याला शिवाजी आणि अफजलखानाची गोष्ट माहितच आहे. अफजलखानाने एकदा शिवाजीला भोजनाला बोलाविले. शिवाजीराजे हुशार होते. आपल्या शत्रूने आपल्याला भोजना बोलावले आहे म्हणजेच ह्यात त्याचा काहीतरी डाव असणार हे शिवाजीराजे जाणून होते. म्हणून ते तयारीत मेजवानीस गेले. धिप्पाड अफझलखानाने शिवाजीला मिठी मारण्याचे नाटक करताच शिवाजीने आपल्या वाघ नखांनी अफजलखानाची आतडी बाहेर काढली. हे महाराजांना शक्य झाले कारण शिवाजीराजे पूर्ण तयारीने गेले होते.

दुसरे उदाहरण द्यायचे झाले म्हणजे, जुन्या करारात आपण वाचतो की, नोहाने देवाच्या आदेशाप्रमाणे लोकांना सावध व पूर्ण तयारीने राहण्यास सांगितले होते. परंतु त्यांनी त्याचे ऐकले नाही त्यामुळे महापूर आल्यावर सर्व काही बुडून गेले. परंतु नोहाने आपले कुटुंब वाचवले कारण, देवाच्या आज्ञेनुसार तो चालला व त्यांनी पूर्ण तयारी केली होती.

आज प्रभु आपणास जागृत व पूर्ण तयारीत राहण्यास सांगत आहे. त्यामुळे जेव्हा आपण मिस्साबालीदानात भाग घेण्यासाठी येत असतो, तेव्हा आपण पाच किंवा दहा मिनिटे अगोदर येऊन ख्रिस्ताचे अतिपवित्र रक्त आणि शरीर सेवन करण्यासाठी मनाची तयारी केली पाहिजे. मनाची तयारी केल्याशिवाय देवाला स्वीकारण्यास आपण पात्र नसतो. आता आपण थोडावेळ शांत राहून स्वतःला  विचारूया की मी जागृत आहे का? मी प्रभूला भेटण्यासाठी पुरेशी तयारी केली आहे का?

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभो आमची प्रार्थना ऐक.

१. आपले परमगुरु फ्रान्सिसबिशप्सधर्मगुरू व व्रतस्थ ह्यांना आपले प्रेषितकार्य करताना सातत्याने परमेश्वराचा अनुभव यावा व हा अनुभव त्यांनी आपल्या दैनंदिन जीवनातून इतरांना द्यावयास प्रयत्नशील राहण्यास त्यांस परमेश्वराची कृपा लाभावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

२. आपण सर्वांनी आपल्या जीवनात सतत जागृत राहून म्हणजेच प्रभू येशूची शिकवण आपल्या कृतीत उतरवून प्रभू येशूच्या येण्याची आतुरतेने वाट पाहण्यास आपणास कृपा लाभावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

३. आपल्या धर्मग्रामात जे लोक दु:खीआजारी व बेरोजगार आहेतविशेषतः जे गंभीर व दीर्घकाळ आजाराने पिडीत आहेत अशा लोकांस आपण मदतीचा हात देण्यास तयार असण्यास आणि अशाप्रकारे परमेश्वराच्या येण्यासाठी तयारी करण्यास परमेश्वराचा आधार मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. जे लोक नोकरी धंद्याच्या शोधात आहेत, त्यांना योग्य तो रोजगार मिळावा व त्याच्या योग्दनामुळे त्यांच्या कुटुंबाचा व समाजाचा विकास व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. आता आपण थोडावेळ शांत राहून वैयक्तिक व सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.