Friday, 10 October 2025

 Reflection for 28th Sunday in Ordinary Time (12/10/2025) By Dn. Jostin Pereira

सामान्य काळातील अठ्ठावीसावा रविवार

दिनांक १२-१०-२०२५

पहिले वाचन: २ राजे ५:१४-१७

दुसरे वाचन: २ तीमथी २:८-१३

शुभवर्तमान: लूक १७:११-१९


प्रस्तावना

        आजची उपासना आपल्याला देवाचे आभार व उपकार स्तुती करण्यास आमंत्रण देत आहे. देवाने आपल्यावर अनेक गोष्टींमध्ये सुखात-दुःखात, अडी-अडचणीत व समस्यांना सामोरे जात असताना सांभाळले आहे.
आजच्या पहिल्या वाचनात, देव संदेष्टा अलिशाद्वारे नामान नावाच्या परराष्ट्रीयाला कुष्ठरोगातून मुक्त करतो. दुसऱ्या वाचनात संत पौल अडी-अडचणी व समस्यांच्या वेळी हिमंतीने जीवन जगण्याचे आव्हान देत आहे. तर आजच्या लूकलिखित शुभवर्तमानात ख्रिस्ताने शोमरोन गावात आपले प्रेषितीय कार्य करत असताना दहा कुष्ठरोग्यांना बरे केले आणि त्या दहा जणांपैकी फक्त एकानेच येऊन ख्रिस्ताचे आभार मानले ह्याचे विवेचन केले आहे.

        देवाच्या कृपेचा व आशीर्वादाचा अनुभव आपल्याला आलेला असूनसुद्धा अनेक वेळेला आपण देवाचे ऋण फेडले नाही, त्याचे आभार मानले नाहीत. थोडा वेळ शांत राहून देवाने केलेल्या महत्कृत्याची आठवण करूया आणि ह्या मिस्साबलीदानात त्याला योग्य तो धन्यवाद देवू या.

मनन चिंतन

        आजच्या शुभवर्तमानात आपल्याला दहा कुष्ठरोग्यांचा दृष्टांत सांगण्यात आला आहे. हा दृष्टांत आपल्याला कृतज्ञता, विश्वास आणि देवाच्या दयेबद्दल मौल्यवान धडा शिकवते.

त्या दहा कुष्ठरोग्यांना एका विनाशकारी त्वचेच्या आजाराने ग्रासले होते, ज्यामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबांपासून आणि समुदायांपासून वेगळे राहावे लागत होते. यहूदी आणि शोमरोनी दोन्ही वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे असूनही ते त्यांच्या दुःखात एकत्र राहिले. जेव्हा त्यांनी येशूला येताना पाहिले, तेव्हा त्यांनी दुरून हाक मारली,
"अहो येशू, गुरुजी, आमच्यावर दया करा!"

त्या काळात, कृष्टरोग्यांना लोकांना खूप वाईट वागणूक दिली जात असे. ते त्यांच्या कुटुंबांसोबत राहू शकत नव्हते, मंदिरात जाऊ शकत नव्हते आणि त्यांच्या प्रियजनांपासून पूर्णपणे दूर होते. येशूने त्यांचे ऐकले. येशूला फक्त त्यांच्याबद्दल दया आली नाही तर त्याने त्यांना याजकांना स्वतःला दाखवायला सांगितले आणि त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि चालायला सुरुवात केली. काहीतरी आश्चर्यकारक घडले चालत असताना ते पूर्णपणे बरे झाले!

त्यांना किती अद्भुत वाटले असेल याची तुम्ही कल्पना करू शकता का? वर्षानुवर्षे आजारी आणि एकटे असलेले हे लोक अचानक बरे झाले. ते त्यांच्या कुटुंबाकडे, त्यांच्या कामाकडे, त्यांच्या आयुष्यात परत जाता आले. परंतु त्या दहा कुष्ठरोग्यांपैकी फक्त एकच आभार मानण्यासाठी परत आला. तो एक परका, एक शोमरोनी होता ज्याला बहुतेक लोक तुच्छ मानत असत. पण तो परत आला, येशूच्या पाया पडला आणि मनापासून देवाची स्तुती केली. येशूने त्याला सांगितले, "जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे."

तीन महत्त्वाचे धडे:

१. "धन्यवाद"

ज्या नऊ कुष्ठरोग्यांनी परत येऊन देवाचे आभार मानले नाहीत, ते वाईट नव्हते. कदाचित ते आपल्या आयुष्यात परत जाण्याच्या आनंदात होते. पण त्या घाईत त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट गमावली: कृतज्ञता ही केवळ सभ्यतेची खूण नाही, तर ती आपले हृदय एका मोठ्या कृपेच्या अनुभवासाठी उघडते.

२. देवाचे प्रेम

तो शोमरोनी मनुष्य बाहेरचा होता, ज्याकडे बरेच लोक दुर्लक्ष करतात. पण त्यालाच आपल्या आयुष्यात घडलेल्या चमत्काराचा खरा अर्थ समजला. आपण कोण आहात किंवा कुठून आलात, याला काहीही महत्त्व नाही: देवाचे प्रेम सर्वांसाठी आहे.

३. खरी आरोग्यप्राप्ती

त्या नऊ जणांना शाररीक आरोग्य मिळाले, पण जो परत आला त्याला त्याहून श्रेष्ठ अशी गोष्ट मिळाली: देवाशी खरी जवळीक आणि नातं म्हणजे अध्यात्मिक आरोग्य प्राप्तझाले.

बोधकथा: “कृतज्ञतेचा चमत्कार”

एका गरीब शेतकऱ्याला नदीकिनारी एक सोन्याचे भांडे सापडले. त्याला खूप आनंद झाला आणि त्याने देवाचे आभार मानले. दुसऱ्या दिवशी त्याने ते भांडे आपल्या गावातील सर्वात गरीब विधवेला दिले आणि म्हणाला, “देवाने मला दिले, म्हणून मी तुला देतो.” काही दिवसांनी त्या शेतकऱ्याच्या शेतात दुहेरी पीक आले.  गावातील लोक विचारू लागले, “तू एवढा भाग्यवान कसा झालास?” तो हसत म्हणाला, मी देवाचे आभार मानले आणि ते आभार दुसऱ्याशी वाटले.” कृतज्ञता केवळ देवाला नाही तर माणसालाही समृद्ध करते. हीच त्या शेतकऱ्याची खरी संपत्ती होती.

आपण किती वेळा मिळालेल्या आशीर्वादाबद्दल देवाला धन्यवाद दिले आहेत? देवाचे खरे अनुयायी होणे म्हणजे आपल्याला हवे असलेले मिळवणे नाही, तर कृतज्ञ अंतःकरणाने देवाला प्रतिसाद देणे आहे. मोठ्या गोष्टींमध्ये नव्हे, तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा देवाचे आभार मानले पाहिजे आणि विश्वासू राहिले पाहिजे.

प्रिय भाविकांनो, हे दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या आजूबाजूला पाहा — ज्यांनी तुमच्यासाठी खूप काही केले आहे, त्यांचे आभार माना. काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे याची चिंता करत बसू नका. असा प्रभू परमेश्वर आपल्याला सांगत आहे, कारण जो परमेश्वर आज आपली काळजी घेत आहे, तोच परमेश्वर उद्याही आपली काळजी घेईल. एकतर तो हे सर्व दुःख आपल्यापासून काढून घेईल किंवा या सर्व अडीअडचणींवर मात करण्यासाठी आपल्याला अधिक कृपा आणि शक्ती देईल.

कृतज्ञता सर्वकाही बदलते, जे आपल्याकडे आहे ते पुरेसे बनवते.

प्रिय भाविकांनो, आजपासून चांगल्या शोमरोनी प्रमाणे जीवन जगण्यासाठी, कृतज्ञतेने आणि चमत्कारिक गोष्टींचे दार उघडण्यासाठी सज्ज असूया व दुसऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करायला व देवाला धन्यवाद देण्यास पुढे सरसुया.

श्रद्धावंतांच्या प्रार्थना

प्रतिसाद – हे प्रभू, आम्हाला कृतज्ञ व्हायला शिकव.

१. देवाने निवडलेले सर्व धार्मिक पुढारी: आपले परमगुरु पोप लियो, सर्व महागुरू, धर्मगुरू आणि धर्म-भगिनींनी, देवाने त्यांना दिलेल्या सर्व देणग्यांचा, कृपादानांचा वापर त्यांनी  उदारपणे व प्रेमाने, देवाच्या गौरवासाठी आणि मानवी समाजाच्या उन्नतीसाठी आणि कल्याणासाठी करण्यास ईश्वरी मदत मिळावी म्हणून प्रार्थना करूया.

२. देवाने आपल्याला प्रेमळ आई-वडील, बहिण-भाऊ, नातेवाहिक आणि मित्र-परिवार दिलेले आहेत. त्यांच्या देणगीबद्दल आणि त्यांच्याद्वार आपल्यावर केलेल्या उपकाराबद्दल देवाचे आभार मानूया. त्यांच्या बरोबर शांतीने, सौख्याने, प्रेमाने जगण्यास आपणास कृपा मिळावी म्हणून प्रार्थना करूया.

३. देवाने उत्पन्न केलेली सुंदर सृष्टी हे देवाचे महान वरदान आहे. त्याद्वारे देव आपल्या जीवनासाठी आवश्यक ते आपल्याला पुरवतो आणि आपल्या सर्व गरजा भागवत असतो. तिच्या अमूल्य देणगीबद्दल देवाची स्तुती करूया आणि त्या धरती मातेची सर्व प्रदूषणापासून मुक्ती करून, तिची चांगली निगा राखून, ती अधिक सुंदर आणि लाभदायक करण्यास सर्वांनी झटावे म्हणून प्रार्थना करूया.

४. ह्या जगात सर्व सेवाभावी आणि मिशनरी संस्था, निस्वार्थीपणे, समर्पितपणे आणि तन्मयतेने समाजातील गरजू, आजारी, अनाथ, अपंग आणि गरीब लोकांची सेवा करतात, त्यांना परमेश्वराने चांगलं स्वास्थ्य द्याव, ईश्वरी सहाय्य त्यांना मिळावं तसेच उदार लोकांनी  त्याचं हे पवित्र कार्य पुढे नेण्यास हातभार लावावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. ह्या उपासनेत सहभागी झालेल्या सर्व बंधू-भगिनींना, भाकररूपी ख्रिस्ताने अभिषिक्त करून, त्यांना पवित्र आत्म्याने भरून, आपलं दैनंदिन जीवन, ख्रीस्ताप्रमाणे प्रेमाने, उदारतेने, उत्साहाने, आणि कृतज्ञतेच्या भावनेने जगण्यास, त्यांना सुबुद्धी आणि कृपा मिळावी म्हणून प्रार्थना करूया.




Thursday, 2 October 2025

 Reflection for 27th Sunday in Ordinary Time (05/10/2025) By Br. Vinon Souz


सामान्य काळातील सत्ताविसावा रविवार

दिनांक – ०५/१०/२०२५

पहिले वाचन: हबक्कूक:१:२-३, २:२-४.

दुसरे वाचन: २ तीमथ्यी:१:६-८, १३-१४.

 शुभवर्तमान: लूक:१७:५-१०.


प्रस्तावना

प्रिय बंधू आणि भगिनींनो आज आपण सामान्य काळातील सत्ताविसावा रविवार साजरा करीत आहोत. आज देऊळमाता आपल्याला विश्वास आणि निःस्वार्थ सेवा’ या विषयावर मनन करण्यास बोलावत आहे.

आजच्या पहिल्या वाचनात, हबक्कूक संदेष्टा देवाला प्रश्न विचारतो, दु:ख, अन्याय आणि हिंसाचार किती काळ सहन करायचा? पण देव उत्तर देतो,  ज्याचे मन सरळ आहे, तो विश्वासाने जगेल. आजच्या दुसऱ्या वाचनात पौल त्याचा शिष्य तीमथीला धैर्याने विश्वास टिकवून ठेवण्यासाठी प्रोत्साहन देतो , "देवाने आपल्याला भीतीचा नाही तर सामर्थ्य, प्रेम व शहाणपणाचा आत्मा दिला आहे."

शेवटी, येशू आपल्या शिष्यांना सांगतो की, “जर तुमच्याकडे मोहरीच्या दाण्याइतकाही विश्वास असेल, तरी तुम्ही अशक्य गोष्टी करू शकता.” पण येशू एक महत्त्वाचा धडा देतो,  जेव्हा आपण सेवा करतो, तेव्हा गर्व न करता, विनम्रतेने म्हणावे की, “आम्ही आमचे कर्तव्यच पूर्ण केले.”  

आजच्या ह्या उपासनेत भाग घेत असताना,आपण या विचारांवर मनन चिंतन करूया की, आपली श्रद्धा कितीहि छोटी असली तरी ती महान कार्ये करू शकते आणि आपण देवाच्या राज्यात जे काही करतो, ते केवळ आपले कर्तव्य समजून, कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता, निःस्वार्थ सेवा करूया.

मनन चिंतन

        एका दुमजली अपार्टमेंटच्या एका भागात एक वृद्ध महिला राहत होती. ती खूप गरीब होती, पण एक चांगली बाई होती. ती खूप प्रार्थना करत असे. त्याच अपार्टमेंटच्या दुसऱ्या भागात मालक राहत होता, ज्याचा देवावर, प्रार्थनेवर किंवा धर्मावर अजिबात विश्वास नव्हता. तो त्या वृद्ध महिलेच्या देवावरील श्रद्धेची नेहमी थट्टा करायचा. एक दिवस ती महिला खूप मोठ्या आवाजात प्रार्थना करत होती आणि देवाला सांगत होती की माझ्या घरात खायला काहीच नाही. त्या घरमालकाने ते ऐकले आणि त्याने ठरवले की, तिची गंमत करावी. त्याने एक भाकर घेतली, तिच्या दाराजवळ ठेवली, बेल वाजवली आणि तिचे आनंदाचे शब्द ऐकण्यासाठी घाईघाईने आपल्या अपार्टमेंटमध्ये परत गेला. त्याने ऐकले: “धन्यवाद प्रभू! तुझे खूप खूप आभार! मला माहित होतं, तू माझी प्रार्थना ऐकशील!” तेव्हा घरमालक हसत बाहेर आला आणि म्हणाला: “अगं मूर्ख म्हातारे! तुला वाटते की देवाने तुझ्या प्रार्थनेला उत्तर दिले? ती भाकर मी आणली आहे!” तरीही ती वृद्ध महिला डगमगली नाही आणि म्हणाली: “प्रभूची स्तुती असो! तो नेहमी माझ्या गरजा पूर्ण करतो, आणि गरज पडली तर तू सैतानालासुद्धा उपयोगात आणतोस!”

        प्रिय बंधू-भगिनींनो, त्या वृद्ध महिलेचा विश्वास आपल्याला शिकवतो की, मदत कोणीही करो, ती देवाचीच देणगी असते. तिच्यासाठी नास्तिक शेजारीसुद्धा देवाने वापरलेला एक सेवक ठरला. आपला विश्वास इतका मजबूत असावा की, परिस्थिती कोणतीही असो, देवाच्या कृपेवर आपले लक्ष केंद्रित राहायला हवे.

        आजच्या शुभवर्तमानात प्रेषितांनी येशूला विचारले, "प्रभु, आमचा विश्वास वाढवा." ही एक खूप सुंदर आणि खरी मागणी आहे. आपल्यालाही अनेक वेळा वाटतं की आपला विश्वास कमी आहे, किंवा कठीण प्रसंगी आपल्याला देवावर पूर्णपणे विश्वास ठेवता येत नाही. पण येशू यावर उत्तर देतो की, "जर तुमच्याकडे मोहरीच्या दाण्याएवढाही विश्वास असेल, तर तुम्ही झाडालाही सांगू शकता की उखडून समुद्रात लावून घे, आणि ते होईल." याचा अर्थ असा की विश्वासाचा आकार महत्त्वाचा नाही, तर तो विश्वास किती खरा आहे हे महत्त्वाचं आहे.

        मोहरीचा दाणा फार छोटा असतो, पण त्यात मोठं झाड होण्याची क्षमता असते. तसंच आपल्या छोट्याशा विश्वासानेसुद्धा मोठमोठ्या गोष्टी घडवण्याची ताकद असते, जर तो विश्वास देवावर पूर्ण आधारलेला असेल. विश्वास म्हणजे सर्व काही समजून घेणं नाही, तर देवाच्या शब्दावर आणि त्याच्या प्रेमावर पूर्ण विश्वास ठेवणं. विश्वास म्हणजे, परिस्थिती जरी कठीण असली, तरी देव आपल्या सोबत आहे याची खात्री असणं.

        आपण अनेकदा परिणाम किंवा चमत्कार पाहूनच विश्वास ठेवतो, पण येशू आपल्याला सांगतो की प्रथम विश्वास ठेवा. विश्वास म्हणजे वाट पाहणं, श्रद्धा ठेवणं, आणि न दिसणाऱ्या गोष्टीवरही चालत राहणं. येशू सांगतो की विश्वास हा देवाशी जोडलेले नाते आहे, जे आपण दररोज प्रार्थनेत, देवाच्या वचनात, आणि साध्या-साध्या गोष्टीत अनुभवू शकतो.

        पुढे, येशू ख्रिस्त गुलाम आणि मालक यांचा दृष्टांत  सांगतो, आपण शेतात काम करून किंवा गुरे चारून आल्यावर, मालक लगेच सेवकाला बसायला सांगत नाही, तर तो त्याला आधी आपले काम करण्यास सांगतो. आणि जेव्हा सेवक आपले काम पूर्ण करतो, तेव्हा मालक त्याचे आभार मानतो का? नाही. त्याप्रमाणे, जेव्हा तुम्ही सर्व आज्ञा पूर्ण करता, तेव्हा म्हणा की, “आम्ही तुझी सेवा करणारे साधे नोकर आहोत." जे करायचे होते, तेवढेच आम्ही केले आहे!”

        या दृष्टांताचा अर्थ असा आहे की, देवासाठी सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे. आपल्या विश्वासातून केलेल्या कार्यासाठी आपण देवाकडून कोणत्याही बक्षिसाची अपेक्षा ठेवू नये, किंवा केलेल्या सेवेचा अभिमान बाळगू नये. देवासाठी केलेली कोणतीही चांगली कृती, लोकांना क्षमा करणे असो किंवा मोठ्या कार्याचे यश  असो, ती आपली जबाबदारी आहे आणि त्यासाठी आपल्याला कोणतेही विशेष धन्यवाद मिळण्याची गरज नाही, कारण ते देवाच्या कृपेने आणि त्याच्या सामर्थ्याने घडले आहे. आपला विश्वास आपल्याला नम्रता शिकवतो, जिथे आपण देवाच्या इच्छेचे पालन करणे हेच आपले भाग्य मानतो. म्हणून, आपल्या 'मोहरीच्या दाण्याएवढ्या' विश्वासाला कृतीत उतरवा आणि त्याचे फळ मिळाल्यावर नम्रपणे देवाचा गौरव करा, कारण देवाची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे, त्यात कोणताही स्वार्थ किंवा बक्षिसाची अपेक्षा नसावी.

ज्याप्रमाणे संदेष्टा हबक्कूक व शिष्यांचा विश्वास दृढ झाला त्याप्रमाणे आपणही आपला विश्वास बळकट व्हावा व ख्रिस्ताला जीवनात प्रथम स्थान देऊन हा ख्रिस्त अनुभव दुसऱ्यापर्यंत पोहचवावा म्हणून आपण देवाकडे कृपा मागुया.

श्रद्धावंतांच्या प्रार्थना

प्रतिसाद – हे प्रभू आमचा विश्वास वाढव.

१. ख्रिस्तसभेचे धुरा वाहणारे पोप महाशयसर्व बिशप्सधर्मगुरू व व्रतस्थ बंधू व भगिनी जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करतात त्यांचा विश्वास बळकट व्हावा व त्यांनी इतरांचा विश्वास बळकट करावा म्हणून प्रार्थना करूया.

२. कुटुंब हे विश्वासाचे जडण घडण करणारे ठीकाण आहे. प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीने विश्वास वाढवण्याची जबाबदारी पार पाडावी म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया.

३. आपल्या धर्माग्रामातील जी कुटुंबे विश्वासात डळमळले आहेत व चर्चला येत नाही अशा कुटुंबावर परमेश्वराचा पवित्र आत्मा यावा व त्यांच्या विश्वासात वाढ व्हावी म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया.

४. आपल्या ध्रामाग्रामातील जे लोक आजारीदुःखी व कष्टी आहेत त्यांना प्रभूचा गुणकारी स्पर्श मिळावा म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया.

५. आपण शांतपणे आपल्या सामाजिक व व्यैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया.


Friday, 26 September 2025

          Reflections for the homily of 26th Sunday in Ordinary Time (28-09-2025) by 

                                                            Fr. Brijal Lopes

सामान्य काळातील सव्विसावा रविवार

दिनांक: २८/०९/२०२५

पहिले वाचन:  अमोस: ६:१,४-७

दुसरे वाचन: १तीमथि: ६:११-१६

शुभवर्तमान: लूक: १६:१९-३१


प्रस्तावना:

आज ख्रिस्तसभा सामान्य काळातील सव्वीसावा रविवार साजरा करीत आहे. ही उपासना सामाजिक जबाबदारी आणि शाश्वत जीवन या विषयावर मनन-चिंतन करण्यास आमंत्रित करते. काळजी घेणे म्हणजे घाबरणे नाही; ह्याद्वारे गरजूंना मदत करणे हा आमच्यासमोर असलेला आव्हान आहे. भविष्यातील वैभवावर लक्ष केंद्रीत न करता गरजू लोकांच्या गरजा आणि त्यांच्या उदारतेविषयी लक्ष देण्याचे महत्त्व या उपासनेत स्पष्ट केले आहे.

पहिल्या वाचनात आमोसचा संदेश आत्मसंतुष्टता व उदासीनतेविरुद्ध एक कडक इशारा देतो; विशेषतः सियोनमधील श्रीमंत लोकांनी गरिबांच्या दुःखाकडे दुर्लक्ष करून, त्यांच्या दाखविलेल्या स्वार्थी वृत्तीबद्दल त्यांचा तिरस्कार व्यक्त केला गेला आहे.

दुसऱ्या वाचनात विश्वास असणाऱ्यांना नीतिमत्ता, श्रद्धा, विश्वास प्रेम, सहनशीलता आणि सौम्यता याचा पाठलाग करण्यास सांगितले जाते आणि त्यांना शाश्वत जीवन धारण करण्यास प्रोत्साहित करण्यात आले आहे.

आजच्या शुभवर्तमानात येशू श्रीमंत व लाजरसचा दाखला सांगतो. देवाच्या राज्यात असलेले लोक देवावर अवलंबून असलेल्या श्रीमंत आणि गरीबबावर कसे संकट ओढवतात हे दाखवून देते, ही बोधकथा एक शक्तिशाली आठवण करून देते की आपण संपत्तीला धरून न राहता देवावर पूर्ण विश्वास ठेवणे हेच खऱ्या आध्यात्मिक प्रकाशाचे चिन्ह आहे. आपली संपत्ती इतरांच्या सेवेत वापरली तरच ती आशीर्वादित ठरते. आत्मसंतुष्टतेऐवजी करुणा आणि नम्रता स्वीकारूया. देवाच्या राज्याकडे वाटचाल करण्यासाठी हेच खरे आमंत्रण आहे. ह्याची कृपा या मिस्साबलीदानात मांगुया.

मनन चिंतन

गेल्या रविवारच्या उपासनेत दिलेले इशारे दर्शवतात की संपत्ती कशी माणसावर दबाव आणते आणि संपत्ती हाताळताना कोणते धोके उद्भवू शकतात. आमोसच्या वाचनात संपत्ती व सामाजिक न्याय हे केंद्रस्थ विषय आहेत. देवाने आमोसला इस्रायलमधील श्रीमंत लोकांना इशारा करण्यासाठी बोलावले, हे लोक अनेकदा गरिबांच्या खर्चावर श्रीमंत झाले होते. आमोस सांगतो की संपत्ती समप्रमाणाने वाटली नाही तर समाजाला नाश होऊ शकतो.

श्रीमंतांना त्यांच्या कृत्यांचे परिणाम समजावून सांगितले गेले; तरीही अनेकांनी आपले वर्तन बदलले नाही. शहरातील लोक महागडी अन्नधान्य आणि द्राक्षारस इत्यादींचा वापर करून आनंद साजरा करत होते; ते देव आणि गरिबांकडे पाहत नव्हते. परंतु ही उधळपट्टी किंवा उद्योजने दीर्घकाळ टिकली नाहीत.

पहिले वाचन दैवी न्याय आणि सामाजिक जबाबदारी या मध्यवर्ती विषयांवर प्रकाश टाकते. ज्यांनी देवावर अवलंबून न राहता भौतिक संपत्तीवर अवलंबून राहून देव (यहोवा) आणि आपल्या समुदायातील गरिबांचा तिरस्कार केला, त्यांना भयानक परिणाम भोगावे लागले. दैवी इच्छा आणि सामाजिक न्यायाकडे दुर्लक्ष केल्यामुळे दुःखद परिणाम घडले.

पौलाने तिमोथ्तीला पाठवलेल्या पत्रात, संपत्तीत रमून न जाता संपत्तीबद्दल ख्रिश्चन दृष्टिकोन विकसित करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. पौलचे शब्द श्रीमंत आणि गरिबांसाठी मार्गदर्शक आहेत; संपत्तीबद्दल संयमी आणि जबाबदार दृष्टिकोन ठेवावा, असे ते सूचित करतात.

आजच्या शुभवचनातून ख्रिस्तसभा खालील गोष्टींवर चिंतन करण्यास सांगते: लाजरस आणि श्रीमंत माणसाच्या दृष्टांताद्वारे गरिबांविषयी काळजी न घेण्यामुळे होणाऱ्या परिणामांबद्दल स्पष्ट धडा दिला जातो. श्रीमंत व्यक्तीच्या एखाद्या विशिष्ट गुन्हापेक्षा गरिबांविषयी काळजी न घेतल्यामुळे त्याला स्वर्गात प्रवेश नव्हता. लाजरस स्वर्गात फक्त दरिद्री असल्यामुळे गेला नाही; तर दुःखाच्या वेळेस त्याने देवावर ठेवलेला विश्वास हे त्याचे कारण होते.

संपत्ती आणि गरिबी: संपत्ती व स्वार्थ आणि स्वावलंबीकडे नेऊ शकते, त्याची तुलना केली आहे. ते धीर ठेवून गरिबी/दरिद्री सहन केल्याने देवावर विश्वास ठेवण्यास प्रोस्ताहन मिळते.

डोंगरावरील प्रवचनात (Sermon on the Mount) येश्रीमंत माणसाची बोधकथा डोंगरावरील प्रवचनात येशूला शिकवणीला म्हणून सादर केली. गरीबांना आणि परित्यक्तांना आशिर्वाद दिले. विशेषतः “गरीब लोकांनी तुम्ही किती धन्य आहात, स्वर्गाचे राज्य तुमचे आहे.” (लुक ६:२०)

आध्यात्मिक संपत्ती: ख्रिस्ती व्यक्तीने प्राथमिक लक्ष ख्रिस्ताने दिलेल्या आध्यात्मिक संपत्तीवर ठेवले पाहिजे. संपत्ती धोकादायक म्हणून सादर केली जाते; ती अभिमान, स्वार्थ आणि इतरांच्या गरजांबद्दल असंवेदनशीलता वाढवू शकते, ज्यामुळे ख्रिस्ती जीवनाला हानी पोहोचू शकते. देवाच्या राज्यात प्रवेश मिळविण्यासाठी दोन मुख्य अटी आवश्यक आहेत: नम्रता आणि गरिबांविषयी खरी काळजी.

संपत्तीचा योग्य वापर आणि गरिबांविषयी खरी करुणा हेच ख्रिस्ती जीवनाचे खरे मोल आहे. नम्रता आणि देवावर विश्वास ठेवून आपण शाश्वत जीवनाकडे वाटचाल करूया. आध्यात्मिक संपत्तीचे आपल्याला खऱ्या आनंदाचे वरदान देते.
देवाच्या राज्यासाठी आपले अंत:करण उघडून प्रेमाने सेवा करण्याचे आव्हान आपण स्वीकारूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभूतुझ्या लेकरांची प्रार्थना ऐक.’

 

१. आपले परमगुरुमहागुरूसर्व धर्मगुरू व व्रतस्थ यांच्यातऐकीची भावना निर्माण होऊनती इतरांना देता यावी व इतरांना त्याप्रमाणे मार्गदर्शन करता यावेम्हणून आपण प्रार्थना करूया.

२. सर्व राजकीय नेत्यांनी प्रभू  येशू ख्रिस्ताचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवूनत्यांचे जीवन लोकांच्या सेवेसाठी समर्पित करावेम्हणून आपण प्रार्थना.

३. "त्यांनी सर्वांनी एक व्हावे" अशी ही प्रभू येशूची भावना आपल्यामध्ये निर्माण व्हावी व आपल्यामधील असलेला भेदभाव नष्ट व्हावाम्हणून आपण प्रार्थना करू या.

४. जे कोणी देवापासून दुरावलेले आहेतत्यांनी मागे वळून परत येशूला आपला राजा म्हणुन स्विकारावे व आपले जीवन प्रभूची सुवार्ता पसरविण्यासाठी समर्पित करावेम्हणून आपण प्रार्थना करूया.

५. आपण ख्रिस्ताला स्विकारावे व त्याच्या मुंल्यावर आपले जीवन जगूनतोच ख्रिस्त इतरांच्या जीवनात आणण्याचा सदैव प्रयत्न करावाम्हणून आपण प्रार्थना करूया.

६. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिककौटुंबिकसामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.

 

Thursday, 18 September 2025

 Reflection for the 25th Sunday in Ordinary Time (21/09/2025) By Fr. Rackson Dinis

सामान्य काळातील पंचवीसावा रविवार

दिनांक: २१/०९/२०२५

पहिले वाचन:  आमोस ८:४-७

दुसरे वाचन: तीमथ्यीला दुसरे पत्र २: १-८

शुभवर्तमान: लुक १६: १-१३

प्रस्तावना

   प्रिय बंधू आणि भगिनींनो आज आपण सामान्य काळातील पंचवीसावा रविवार साजरा करीत आहोत व आजची उपासना आपल्यालाआपल्या जीवनातील खरा देव “पैसा की परमेश्वर” आहे, या विषयावर मनन चिंतन करावयास बोलावत आहे.

आजच्या पहिल्या वाचनात आमोस संदेष्टा, अन्यायी लोकांना, गरिबांना त्रास देणाऱ्यांना, गरीब लोकांची धान्याच्या मोजमापात फसवणूक करणाऱ्यांनालोभी व्यापाऱ्यांना, कठोर शिक्षा होईल ह्या विषयीचा संदेश देत आहे.

दुसऱ्या वाचनात संत पॉल आपल्याला प्रार्थनेच्या शक्तीचे महत्त्व सांगत आहे. प्रार्थना ही फक्त आपल्यासाठीच नव्हे तर आपल्या वैऱ्यांसाठी, सत्ता अधिकाऱ्यांसाठी, तसेच इतरांसाठी  केली पाहिजे. प्रार्थना ही सार्वत्रिक असावी ती फक्त स्वतःसाठी नसावी. हा संदेश संत पॉल आपल्याला देत आहे.

आजच्या शुभवर्तमानात येशू ख्रिस्त आपल्याला अन्यायी चाकराची गोष्ट सांगतो. जो माणूस छोट्या गोष्टींमध्ये प्रामाणिक नसतो तो मोठ्या गोष्टींमध्ये प्रामाणिक राहू शकत नाही. तसेच येशू सांगतो आपण एकाच वेळी देवाची व पैशाची सेवा करू शकत नाही त्यामुळे आपण फक्त देवाचीच निवड करावी कारण तोच आपला तारणारा व निर्माण करणारा आहे.

आजच्या ह्या उपासनेत भाग घेत असताना, देव आपल्याला सांगतो की, आपण प्रामाणिक राहावे, न्यायाने वागावे, प्रार्थनेत सतत राहावे आणि पैशाऐवजी देवाची निवड करावी. कारण जो देवाशी एकनिष्ठ राहतो त्यालाच खरा शांतीचा व तारणाचा अनुभव मिळतो.

मनन चिंतन

      माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, एकदा एका गावात एक श्रीमंत व्यापारी राहत होता. तो फार हुशार आणि कष्टाळू होता. त्याच्याकडे दोन खास खिसे असलेला जाकीट होते. उजव्या खिशात तो रोज आपले पैसे, नाणी आणि नफा ठेवायचा तर डाव्या खिशात तो एक छोटासा क्रूस ठेवायचा. एके दिवशी बाजारातून परतताना तो खूप आनंदी होता कारण त्याला मोठा नफा झाला होता. घरी येऊन त्याने खिशातील पैसे मोजले, पण त्याचा हात एकदाही डाव्या खिशात गेला नाही. त्या रात्री त्याला  झोपेत स्वप्न पडले. त्याला स्वप्नात देव दिसला आणि देवाने विचारले: “तू रोज उजव्या खिशात हात घालतोस, पैसा मोजतोस, पण डाव्या खिशात असलेला माझा क्रूस विसरतोस. जर उद्या तुझा उजवा खिसा रिकामा झाला तर तू काय करशील?” व्यापारी घाबरून जागा झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने ठरवले “आता पासून दिवसाची सुरुवात मी डाव्या खिशातून करेन, क्रूस हातात घेईन, देवाचे आभार मानीन आणि माझ्या प्रत्येक व्यवहारात प्रामाणिक राहीन. पैसा मिलो किवा नको परंतु देव मात्र गमावणार नाही” त्या दिवसानंतर तो फक्त श्रीमंत व्यापारीच राहिला नाही, तर लोकांसाठी आदर्श व्यापारी झाला. 

माझ्या प्रिय मित्रानो, आपल्या जीवनातही दोन खिसे असतात, एक खिसा ज्यामध्ये, पैसा, नफा, स्वार्थ, असते. दुसरा खिसा, ज्यामध्ये  देवासाठी, प्रार्थनेसाठी, तळमळ असते. प्रश्न हा आहे की आपण दिवसाची सुरुवात कोणत्या खिशातून करतो? जर आपण देवाच्या खिशातून सुरुवात केली तर आपले निर्णय योग्य होतील, आपला व्यवहार प्रामाणिक असेल, आणि आपल्याला खरी शांती व आनंद मिळेल. पण जर आपण पैशाच्या खिशातून सुरुवात केली, तर आपले मन स्वार्थी होईल, लोभ वाढेल, आणि शेवटी पैसा आपला देव बनेल, पण आनंद गमावून बसेल.

होय माझ्या प्रिय मित्रानो, अस म्हणतात पैशाने घर विकत घेता येते पण घरातील शांती फक्त देव देतो. पैशाने औषध विकत घेता येते पण आरोग्य फक्त देव देतो. पैशाने मोबाईल विकत घेता येतो पण नाती फक्त प्रेमाने जपता येतात. म्हणून आपण पैशाला योग्य ठिकाणी ठेवूया व देवाला जीवनात प्रथम स्थान देवूया.

माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजच्या पहिल्या वाचनात आमोस संदेष्टा अन्यायी व्यापाऱ्यांना इशारा देतो, जे गरीबांचे शोषण करतात, धान्याच्या मोजमापात फसवणूक करतात आणि लोभाने नफा कमावतात, त्यांना देवाच्या न्यायाचा सामना करावा लागेल. कथेमध्ये आपण ऐकले, व्यापाऱ्याने देवाची आठवण ठेवून आपला व्यवहार प्रामाणिकपणे केला, म्हणून तो यशस्वी झाला. पण जे देवाला विसरतात ते लोभात अडकतात आणि स्वतःचा नाश करून घेतात.

दुसऱ्या वाचनात संत पॉल आपल्याला सांगतो की प्रार्थना फक्त स्वतःसाठी नव्हे, तर सर्वांसाठी असावी. हाच तो “डाव्या खिशाचा” जीवनमार्ग आहे. दिवसाची सुरुवात देवापासून करणे, प्रार्थना करणे आणि आपल्या प्रत्येक निर्णयात देवाला प्रथम स्थान देणे असा होय. आणि आजच्या शुभवर्तमानात येशू स्पष्ट सांगतो की आपण एकाच वेळी देव आणि पैशाची सेवा करू शकत नाही. आपल्याला ठरवावे लागते,आपण कोणत्या खिशातून सुरुवात करणार.  देवाच्या खिशातून की पैशाच्या खिशातून? जर आपण देवाच्या खिशातून सुरुवात केली, तर आपले हृदय शांत राहील, निर्णय योग्य होतील, व्यवहार प्रामाणिक होतील, आणि आपल्याला  खऱ्या आनंदाचा अनुभव येईल देव आपल्या जीवनातील केंद्र बनेल. पण जर आपण पैशाच्या खिशातून सुरुवात केली, तर आपले मन लोभी होईल, स्वार्थ वाढेल, न्याय विसरला जाईल, आणि शेवटी पैसा आपला देव बनेल. अशावेळी आपण पैसा मिळवू, पण शांती, प्रेम आणि देवाचा आशीर्वाद गमावून बसू.

माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजच्या जगात आपण बघतो की पैसा हा अनेक लोकांसाठी “देव” झाला आहे. आज लोक सकाळी उठल्यावर सर्वात आधी मोबाईल उचलतात, प्रार्थनेपेक्षा नोटिफिकेशन्स, मेसेजेस आणि शेअर मार्केट पाहतात. आज लोक पैशासाठी दिवस-रात्र काम करतात, पण प्रार्थनेसाठी वेळ काढत नाहीत. आज नाती तुटत आहेत कारण स्वार्थ आणि अहंकार वाढला आहे. आज आपल्याला बघायला मिळते, काहीजण पैशासाठी खोटे बोलतात, फसवणूक करतात. काही तरुण फक्त करिअर, पगार, स्टेटस याच्याच मागे धावत आहेत, पण देवाला आणि प्रार्थनेला वेळ देत नाहीत. आणि याचा परिणाम म्हणजे, लोकांकडे भरपूर पैसा असेल, पण त्यांना शांत झोप लागणार नाही. मोठे घर असेल, पण घरातील प्रेम मिळणार नाही. सोशल मीडियावर खूप मित्र असतील, पण मनात एकटेपणा असेल. म्हणून, येशू आज आपल्याला सांगत आहे  “तू कोणत्या खिशातून सुरुवात करतोस? देवाच्या की पैशाच्या?” जर आपण देवाची निवड केली तर देव, आपला पैसा योग्य ठिकाणी वापरण्यास शिकवेल, आपल्याला न्यायाने जगायला शिकवेल, आणि आपल्याला जीवनात खरा आनंद व सुख भेटेल.

विश्वासू लोकांची प्रार्थना

आपला प्रतिसाद :-  हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.

(१)  आपले पोप लियोसर्व बिशप्सधर्मगुरूधर्मबंधूधर्मभगिनी तसेच ख्रिस्ती धर्माची धुरा वाहणारे सर्व मिशनरी कार्यकर्त्यावर प्रभूचा आशिर्वाद नेहमी राहावातसेच त्यांना त्याच्या कामामध्ये नेहमी प्रभूचे सामर्थ व शक्ती लाभावी म्हणून प्रार्थना करूया.

(२) आपल्या धर्म ग्रामातील युवक-युवती जे देऊळमाते पासून दूर गेलेले आहेतते देवाच्या जवळ यावेदेवाच्या दैवी कृपेचा अनुभव त्यांना यावा व त्यांनी त्यांचे जीवन देऊळमातेच्या नियमाप्रमाणे जगावे आणि इतरांना आदर्श दयावा म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया.

(३) आपल्या कुटुंबातील आजारी व्यक्तींना प्रभूच्या आत्म्याद्वारे चांगले आरोग्य लाभावे व त्यांचा आजार बरा व्हावातसेच त्यांच्या आजारामध्ये त्यांनी नेहमी परमेश्वाचा धावा करून परमेश्वराच्या अधिक जवळ यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

(४) आज विशेषता प्रार्थना करूया आशा लोकांसाठी ज्यांना पावसाच्या पाण्यामुळे अतिशय हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या आहेत. पुरामध्ये अनेक लोकांची विविध प्रकारची हानी झाली आहे. या सर्व लोकांना योग्य ते सहकार्य लाभावे व इतर सर्व प्रकारच्या आपत्ती पासून त्यांचे रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

(५) आज ज्या ज्या लोकांचे वाढदिवस आहेत त्या त्या लोकांना परमेश्वराचा विशेष असा आशिर्वाद मिळावा व अशा प्रकारचा दिवस त्यांच्या जीवनामध्ये नेहमी यावा म्हणून प्रार्थना करूया.

(६) थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया.