Wednesday 25 December 2013

Reflections for homily By:- Malcom Patil







पवित्र कुटुंबाचा सण 
२९ /१२/१३
वर्ष-
पहिले वाचन - (बेनसिराक ३:२-६,१२-१४)    
दुसरे वाचन – (कालासिकरांस पत्र ३:१२-२१)  
शुभवर्तमान - (मत्तय २:१३-१५,१९-२३)

प्रस्तावना:
आज आपण येशू, मरिया आणि योसेफ ह्या पवित्र कुटूंबाचा सण साजरा करीत आहोत. आजच्या पहिल्या वाचनात मुलांची आई-वडिलासंबंधीची कर्तव्य आपल्याला स्पष्ट करून सांगितलेली आहेत. आई-वडिलांचा राखलेला सन्मान त्याच्या वृध्दापकाळी केलेली सेवा, त्याच्या आजारपणात केलेली सुश्रषा हे सर्व मुलांना आर्शिवाद मिळवून देत असते. दुस-या वाचनात संत पौल म्हणतो, ''तुम्ही देवाचे पवित्र प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करूणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा'', ख्रिस्ती कुटूंबातील आपले परस्पर संबंध कसे असावेत ह्याचे उत्तम मार्गदर्शन संत पौलाने आपल्याला केले आहे. आजच्या शुभवर्तमानात आपण पाहतो की, जेव्हा योसेफ, मरिया ह्यांना समजते कि येशू त्यांच्यासमवेत नाही तेव्हा त्याला शोधण्यास ते पुन्हा येरूशलेमला जातात, तसेच त्यांनी येशूचे आध्यात्मिक नैतिक मुल्याची जोपासना करून आपल्यापुढे एक पवित्र कुटुंबाचा आदर्श ठेवला आहे.

सम्यक विवरण:
दुस-या अध्यायाच्या उरलेल्या भागात बाळ ख्रिस्ताच्या स्थांनातराचे उल्लेख आहेत. प्रथम त्याला बेथलेहेम येथील जन्म ठिकाणाहून इजिप्तला नेले गेले तदनंतर ते नाझरेथ गावात जाऊन राहिले त्यामुळे येशूला नाझरेथकर येशू म्हणतात. या भागात मत्तयची सुत्र अवतरणे वारवांर आली आहेत.''मी आपल्या पुत्राला मिसर देशातून बोलाविले आहे हे जे प्रभूने संदेष्टाच्याद्वारे सांगितले ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले.''(मत्तय २:१५). ''यिर्मया संदेष्टाद्वारे सांगितले होते ते ह्या समयी पूर्ण झाले.''(१८), तसेच यात योसेफला वरचेवर पडलेल्या स्वप्नाचाही उल्लेख आहे. ''प्रभूचा दुत योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, ऊठ, बाळ त्याची आई ह्यांना घेऊन मिसर देशात पळून जा.''(मत्तय २:१३), ''प्रभूचा दूत मिसर देशात योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, ऊठ, बालक त्याची आईस घेऊन इस्त्राएलाच्या देशात जा.''(मत्तय २:१९), ''आणि स्वप्नात सूचना झाल्यामूळे तो गालील प्रांतात निघून गेला.''(मत्तय २:२२).
केव्हा आणि कोठे जायचे ते त्याला स्वप्नातून कळवले होते. हे स्थलांतर आपल्या मनाला वाटले तसे योसेफाने केले नाही तर देवाने त्याला तशी प्रेरणा दिली त्याची पूर्वछाया शास्त्रलेखामध्ये आहे हे दाखवण्याचा मत्तयचा प्राथमिक उदेद् या दोन्ही वैशिष्टातून स्पष्ट आहे. पण याचे कारण काय? ख्रिस्त गालीलातून येणार (योहान; :४१) अगर नाझरेथहून येणार (योहान; :४१) ह्या म्हणण्याला यहूदी लोकांनी जो उपेक्षेचा प्रतिसाद दिला त्यात याचे कारण दडले आहे. यहुदियातील बेथलेहेम या गावातून ख्रिस्त येणार हे प्रत्येकाला माहित होते तर मग या नाझरेथकर येशूचा गंभीरपणे विचार कसा करायचा? या अभिपाला मत्तय मधून उत्तर दिले आहे. शास्त्रलेखात सांगितल्याप्रमाणे येशू बेथलेहेम येथे जन्मला खरा पण दिव्य मार्गदर्शनाने शास्त्रलेखाच्या आधाराने स्थंलातर करून अखेर गालीलात स्थिरावला म्हणून त्याला नाझरेथकर म्हणतील हे भाकीत पूर्ण झाले.  राजकीय धोका असणा-या यहुदयाचे इजिप्त देश हे पांरपारिक आश्रयस्थान होते. होशेय;११:, मध्ये देवाचा पुत्र इस्त्राएल इजिप्तमधून निर्गमन झाल्याचा उल्लेख आहे. स्वत: येशू हा खरे इस्त्राएल आहे या आपल्या खातरीच्या आधारे मत्तयने हा संदर्भ घेतला आहे. दृष्टाईने भरलेला हेरोद राजा हा अदोमी होता त्याने यहुदी घराचा स्विकार केला होता. त्याने रोमी सरकारला मदत केली म्हणून त्याला प्रथम पॅलेस्टाईन देशाचा अधिकारी नंतर राजा म्हणून नेमण्यात आले. तो अंत्यत महत्वकांक्षी होता. त्याच्या सत्तेला विरोध करणा-या शक्तीला तो कडाडून विरोध करी. धर्मशास्त्राप्रमाणे यहुदयाचा राजा जन्मला आहे हे कळताच त्याने त्याची कत्तल करण्याचा निश्चय केला.

बोधकथा:
एका माणसाच्या नवीन गृह प्रवेशाच्या त्या २९ डिंसेबरच्या सुमंगल दिवशी त्याच्या घरी उत्साहाला उधाण आले होते. सगळीकडे रोषणाई, पताका, पाहुण्याचा गजबजाट यामुळे त्या वास्तूला जगावेगळेच रूप प्राप्त झाले होते. नाताळ निमित्ते तयार केलेल्या गोठ्यात योसेफ, मरिया येशू बाळ ह्यांची केलेली मांडणी एक आदर्श कुटूंबाची झलक देत होती. धर्मगुरू त्या गृहस्ताकडे अभिनंदनासाठी आलेले असताना सर्व पाहून त्यांना खूप बरे वाटले. पण एक गोष्ट त्यांच्या सहजपणे लक्षात आली. दररोज चुकता देवळात मिस्साला येणारी त्या गृहस्ताची आई कोठे दिसत नव्हती? धर्मगुरूने त्या गृहस्ताला सहजपणे विचारले, ''तुझी आई घरात दिसत नाही.'' तेव्हा तो म्हणाला, माझ्या आईचे व पत्नीचे पटत नाही म्हणून आम्ही जूने घर सोडून नवीन घरात राहायला आलो.'' धर्मगुरू समजायचे ते समजले. नवीन घरात खूप काही होते, पण एक गोष्ट नव्हती. ती म्हणजे ''आई-वडील''. जरी घर छान होते तरी आई वडिलाविना कुटुंब अपूर्णच होते.

मनन चिंतन:

जगी आई-वडिल्यांसारखे कोण आहे.
ज्यांचे जन्मांतरीचे ऋण आहे
असे ऋण ज्यास व्याज नाही त्या ऋणाविन जीवनास साज नाही.
ज्यांच्यासारखे कौतुके बोल नाहीत
ज्यांच्या यातनाना जगी तोड नाही
आई-वडिलाएवढे कशालाच मोल नाही.
आज अनेक कुटूंबात म्हाता-या आई-वडिलांकडे मुलांचे दुर्लक्ष होत आहे. आपल्या आई-वडिलांची म्हातारपणी चांगली सेवा करणे गरजेचे आहे. बेनसिराच्या पुस्तकात म्हटले आहे, ''संपूर्ण मनाने तुझ्या पित्याला मान दे आणि आईने सोसलेल्या प्रसव वेदना विसरू नको, त्यांनी तुला जन्म दिला आहे याची आठवण ठेव. त्यांनी सोसलेल्या कष्टाची फेड तू कशी करशील''(बेनसिरा; :२७).
दिवगंत पोप दुसरे जॉन पॉल म्हणतात, ''कुटूंब ही छोटीशी ख्रिस्तसभा आहे.'' प्रत्येक कुटूंब ही परमेश्वराची शान आहे. जेव्हा आपल्या कुटूंबामध्ये आपल्यावर प्रेम, माया, आणि सहानुभुती ह्याला वर्षाव होत असतो तेव्हा कुटूंबातील परस्पर संबंध अधिका-अधिक दृढ केले जातात.
होय, ''कुटूंब'' हे एक मंदिर आहे. या मंदिरात अंहकारापेक्षा नम्रतेला अधिक महत्त्व असते, आत्मसुखापेक्षा आत्मत्यागाला अधिक स्थान असते. आई- वडिलामध्ये दैवीपणाची जाणीव करून देणारे हे मंदिर आहे. माणसाच्या संवेदना बर्फासारख्या गोठून जाता लोण्यासारख्या मऊ करण्याची जागा म्हणजे आई-वडिलांचे मंदिर. आई-वडिलांचा आदर्श दुबळा असू शकत नाही. लेकरू कितीही वाईट असले, तरी एक दिवस ते चांगल्यारीतीने वागेल अशी आशा आईला वाटत असते. या अमर आशेमुळेच संत अगस्तीनच्या आईने १७ वर्षे त्याच्यासाठी अहोरात्र प्रार्थना केली, आणि अगस्तीनचे मन परिवर्तन झाले. सैतानाच्या मोहपाशातून अगस्तीनला संताच्या मार्गावर आणणारी शक्ती ही त्याची आई होती. लेकरू संत झाले म्हणून आईही संत झाली नव्हे तर आई संत होती म्हणून लेकरू ही संत झालं.आई-वडिल कुटूंबाची लाज कधीही उघडी पडू देत नाहीत, स्वत: उपाशी राहून आपल्या मुला-बाळांना खाऊ घालतात. स्वत: दु: सोसुन इतरांना सुख देण्याचा प्रयत्न करतात.
जर आपण पवित्र मरिया योसेफ येशू ह्यांच्या पवित्र कुटूंबाकडे पाहिले तर त्यांच्याकडून आपणा-सर्वांना भरपूर काही शिकण्यास मिळेल. ह्या कुटूंबात पैसा-धनसंपत्ती नसून प्रेम, दया, क्षमा, शांती होती म्हणूनच त्यांनी देवाच्या इच्छेला प्रमाण मानले नेहमी, प्रत्येक क्षणाला ते देवाबरोबर चालले, सुखात त्यानी देवाचा गौरव केला, दु:खात त्यांनी देवाचे आभार मानले म्हणूनच आज आपण मोठ्या आंनदाने ह्या पवित्र कुटूंबाचा सण साजरा करीत आहोत. असे म्हलले जाते की, ''जे कुटूंब एकत्र प्रार्थना करते ते कुटूंब एकत्र राहते.'' ज्याप्रमाणे पवित्र मरिया आणि योसेफ ह्यांच्या जीवनाला एक नवीन आशा मिळाली त्याप्रमाणे आपले कुटूंब सुध्दा एक पवित्र कुटूंब बनावे,  देवाचे वस्तीस्थान बनावे म्हणून आज आपण विशेष प्रार्थना करू या.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभो आमची प्रार्थना ऐकून घे.
. आपले परमगुरूस्वामी, महागुरूस्वामी सर्व कार्यकर्त्यांना बाळ येशूचा स्पर्श व्हावा प्रभूच्या प्रेमाचा संदेश त्यांनी सर्वत्र पसरावा म्हणून आपण प्रार्थना करू या.
. कुटूंबातील नाते-संबंध सुधरावे, आध्यात्मिक नैतिक मुल्याची जोपासना कुटूंबात व्हावी आपले कुटूंब सुध्दा एक आदर्श पवित्र कुटूंब बनावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
. मुलांनी आई-वडिलाचा मान राखावा, पति-पत्नीमधील सबंध प्रेमाचे व्हावे, आजा-यांना मदतीचा हात लाभावा, करूणायुक्त हृदय, ममता, सौम्यता,सहनशीलता ही मुल्ये प्रत्येक कुटुंबाने अंगीकारावी म्हणून आपण प्रार्थना करू या.
. जे अपत्यहीन आहेत त्यांना माता पिता होण्याचे भाग्य लाभावे व त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून आपण प्रार्थना करू या.
. पवित्र मरिया योसेफाप्रमाणे आपण सुध्दा देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी पुढे यावे, अडी-अडचणीवर मात करावी देवाची योजना पूर्णत्वास नेण्यासाठी आपणास धैर्य मिळावे म्हणून आपण प्रार्थना करू या.





No comments:

Post a Comment