Tuesday 4 March 2014

Reflections By: Wickie Bavighar.






उपवास काळातील पहिला रविवार



दिनांक: ९/३/२०१४.
पहिले वाचन: उत्पत्ती २:७-९३:१-७.
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ५:१२-१९.
शुभवर्तमान: मत्तय ४:१-११.

''परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नको.''


प्रस्तावना:

आज आपण उपवास काळातील पहिला रविवार साजरा करीत आहोत. देवावर प्रीति करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत कारण आज्ञा पाळणे म्हणजेच देवाच्या इच्छेला प्राधान्य देणे, त्याच्या मार्गाने जाणे व त्याचे नियम पाळणे, हेच प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानात आपल्याला सांगत आहे. आजचे पहिले वाचन हे मनुष्याच्या उत्पत्तीवर आणि मनुष्य पाप करून कशा प्रकारे आपल्या निर्मात्यापासून दूर गेला यावर प्रकाश टाकते. तसेच आजच्या दुस-या वाचनामध्ये संत पौल आदाम आणि प्रभू येशू ख्रिस्त यांच्यामधील विरोधाभास स्पष्टपणे दाखविण्यासाठी त्यांची तुलना करतो.
ज्याप्रमाणे येशू ख्रिस्ताने खडतर अश्या परीक्षेला समर्थपणे तोंड दिले व सैतानाने दाखविलेल्या मुलभूत अश्या तीन मोहांवर विजय मिळविला त्याचप्रमाणे आपणसुद्धा ह्या प्रायश्चित काळात मोहांना बळी न पडता देवाच्या वचनांवर विश्वास ठेवावा म्हणून ह्या पवित्र मिस्साबलिदानात विशेष प्रार्थना करूया.

पहिले वाचन: उत्पत्ती:२:७-९; ३:१-७:

मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडविला व त्याच्या नाकपुड्यांत जीवनाचा श्वास फुंकिला, तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला(उत्पती२:७), परंतू परमेश्वराने दिलेल्या स्वातंत्र्याचा गैरउपयोग करून देवासमान होण्याचा क्षणिक मोहामुळे आदाम व एवेने देवाला दु:खविले आणि देवाने दिलेल्या सर्व देणग्यापासून त्यांनी स्वत:ला दूर सारले.

दुसरे वाचन(रोमकरांस पत्र; ५:१२-१९):

''आदामाकडून मृत्यु, ख्रिस्ताकडून जीवन'' (कृपा व जीवन ह्याची अधिसत्ता) आदामाने केलेले आज्ञाभंगाचे कृत्य निरस्त करण्यासाठी ख्रिस्ताच्या आज्ञापालनाचे सामर्थ्य हाच या परिच्छेदातील विशेष मुद्‌दा आहे. पौलाने आदाम आणि ख्रिस्त ह्यांना 'प्रतिनिधिक' व्यक्ती म्हणून पुढे केले आहे. पौल आपणाला ह्या वाचनात हेच शिकवतो की, ख्रिस्ताने वधस्तंभावर स्वत:चे प्राण अर्पण केले आणि त्यातून एक अधिसत्ता प्रस्थापित झाली पण ही अधिसत्ता मरणाची नसून जीवनाची आहे(१५,१७,२१). न्याय दंडाची/शिक्षेची नव्हे तर कृपेची अधिसत्ता आहे. कारण ख्रिस्ताबरोबरच्या आमच्या नात्यामुळे आम्ही जीवनात राज्य करू, अशी हमी मिळाली आहे (१७). आदाम आणि ख्रिस्त ह्याच्यांतील समांतरेचा आपला महत्वाचा मुद्‌दा मांडण्यास पौलने १२ व्या वचनाद्वारे आंरभ केला. एका मनुष्याच्या पापाचे विश्वव्यापी परिणाम झाल्याचे म्हटले आहे. यामुळे आदामाचे पाप देवाने त्याच वेळी सर्व लोकांचे पाप असे गणिले आहे आणि या पापाच्या कारणाने सर्व लोक मरण पावतात. हे कसेही असले तरी पौलच्या दृष्टीने महत्वाचा मुद्‌दा हाच आहे की, सर्वच लोक आदामाशी असलेल्या त्याच्या नात्यामुळे पापी आणि मरण दडांस पात्र आहे पण देवाची कृपा ख्रिस्ताच्याद्वारे कार्य करीत आहे.

शुभवर्तमान (मत्तय ४:१-११):

सैतानाकडून येशूची परिक्षा व्हावी म्हणून पवित्र आत्म्याने त्याला अरण्यात नेले. मग येशूने चाळीस दिवस व चाळीस रात्र उपास केला (मत्तय ४:१-२). त्यानंतर सैतानाने येशूवर विजय मिळविण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा केली परंतू येशूने काल्पनिक गोष्टी किंवा काल्पनिक उदाहरणे न देता देवाचे वचन, देवाचा शब्द ह्याद्वारे सैतानाचा पाडाव केला.

सम्यक विवरण:

परिक्षा व पूर्व तयारी:
मत्तय ४:१-११ अरण्यात येशूची परिक्षा झाली (लूक ४:१-१३; मार्क १:१२,१३). 'मोह' या शब्दाने सर्वस्वी नकारात्मक अनुभव सूचित होतो. पण ही येशूच्या कार्यध्येयाच्या पूर्तीसाठी दिव्य उद्देशाने योजिलेली 'मोहपरिक्षा' होती. मूळ शब्दाचा सर्वसाधारण अर्थ कसोटी, सत्त्व पाहणे असा आहे. पवित्र शास्त्रात ‘परीक्षा’ हा शब्द यथार्थ आहे.
येशूला नुकताच जाहीरपणे देवाचा पुत्र हा दर्जा दिला आहे (मत्तय ३:१७; ४:३-६). त्याच्या पित्याशी असलेले नाते व हा दर्जा या संबंधात त्यातून काय व्यक्त होते ही येथे महत्वाची बाब आहे. या तीन कसोट्यांतून त्या नात्याने तीन पैलू तपासून पारखले आहेत, त्या बरोबर त्या दर्जाचा गैर उपयोग केल्यास येशूचे सेवाकार्य बिघडून कसे विफल होईल त्याचीही पारख केली आहे. देवाने त्याला देवाने त्याला सोपवून दिलेले कार्य पूर्ण करण्यास त्याने आपली प्रतिष्ठा बाजूस ठेवून तहान भूक, ‘अडचणी सोसण्यास’ तयार असले पाहिजे. आपला पिता सर्वस्वी काळजी घेईल असा ठाम भरवसा धरला पाहिजे आणि तसे खरेच होईल का ते पाहण्यास देवाची परीक्षा घेऊ नये; आपल्या  कार्यध्येयाच्या परिपूर्तीसाठी त्याने कोणतेही ‘झटपट मार्ग’ धरू नये, तसे केल्यास कार्यसिद्धी होईल पण त्यासाठी देवावरील त्याच्या निष्ठेला तडा जाईल.
पुढे आलेली प्रत्येक सूचना, प्रत्येक मोह शास्त्रवचनाच्या आधारे धुडकावून लावली आहे. ही सर्व आधारवचने अनुवाद. ६-४ मधील आहेत. रानामध्ये इस्त्राएलची परिक्षा झाली. त्या अनुभवाचा संदर्भ या शास्त्रभागात आहे. त्या अनुभवातून इस्त्राएलने कोणते धडे शिकणे आवश्यक होते ते येथे सांगितलेल्या वचनातून स्पष्ट होते. आता देवाच्या एका नव्या पूत्राला त्याच्या भूमिकेसाठी तयार केले जात आहे. आणि इस्त्राएलने जी अर्धवटपणे शिकून घेतली ती आज्ञांपालनाची तत्वे येशूच्या सेवाकार्याचा नव्या इस्त्राएलचा आधार असली पाहिजेत.
परिपूर्ण मनुष्याची परिक्षा (मत्तय ४:१-११):
येशूची परिपूर्णता देवाने जाहीर केली होती(मत्तय ३:१७). या बिकट परिक्षेत प्रभू प्रत्येक क्षणी सैतानाचा पराजय करतो. ४० दिवसाच्या उपवासाने प्रभू शरीराने अशक्त झाला होता. या अवस्थेत सैतानाकडून त्याची परिक्षा झाली. देव पित्याच्या आज्ञांना सर्वोच्च स्थान देणारा येशू देवाचा पुत्र असल्यामुळे तो त्या धोंड्याच्या भाकरी करू शकत होता. देव पित्याने त्याला ४० दिवस जगविले होते व त्यानंतरही तो जगविण्यास समर्थ होता(मत्तय ३:४). येशू देव पित्याच्या आज्ञा पाळत जगत होता म्हणून त्याने सैतानाची आज्ञा धुडकावून लावली.
देव पित्याच्या इच्छेला सर्वोच्च प्राधान्य देणारा येशू:
 एखादा चमत्कार करून आपण तारण करणारे आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न यापूर्वी अनेकांनी केला होता. ‘तुझ्या सेवेचा आरंभ करताना तू कोण आहेस ते दाखवून दे. देवाच्या वचनाप्रमाणे तू सुरक्षित राहशील’ ही सैतानाची कपटी सूचना म्हणजे देवाचे वचन अर्धवट सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न होता. पण येशूचे सेवा व जीवन कार्य प्रत्येक समयी देव पित्याच्या इच्छेप्रमाणे करणे हेच असणार होते. सैतानाची सूचना हि देव पित्याची इच्छा नव्हती तर देवपित्याची परिक्षा पाहण्याचा पाप मोह होता म्हणून येशूने सैतानास म्हटले; आणखी असा शास्त्रलेख आहे की, परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नको (मत्तय ४:७).
आज्ञाधारकपणामुळे मिळणारे आर्शिवाद:
तुझा देव परमेश्वर ह्यांची वाणी तू समक्षपूर्णक ऐकशील आणि ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजी पूर्वक पाळशील तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा तुला उच्च करील(अनुवाद २८:१).
* तू आपला देव परमेश्वर ह्यांच्या आज्ञा पाळून त्याच्या मार्गांनी चालशील तर तो आपल्या शपथेला जागून तुला आपली पवित्र प्रजा करून स्थिर ठेवील(अनुवाद २८:९).
* तुझा देव परमेश्वर ह्याच्या ज्या ह्या आज्ञा मी आज तुला देत आहे त्या ऐकून तू काळजीपूर्वक पाळशील तर परमेश्वर तुला पुच्छ नव्हे तर मस्तक करील. तू खाली नव्हे तर वर राहशील(अनुवाद २८:१३).
* ज्या गोष्टी विषयी मी तुला आज आज्ञा करीत आहे. त्यापासून उजवी-डावीकडे वळून अन्य देवाच्या नादी लागणार नाहीस तर त्याची से वा करणार नाहीस तर असे घडेल(अनुवाद २८:१४).
देव पित्याच्या मार्गानेच राज्य मिळविणारा येशू:
      सैतानाची येशूला सूचना, ‘वधस्तंभाच्यामार्गे न जाता तू स्वत: राज्य व वैभव मिळव’ ही होती. परंतू ख्रिस्ताने त्याची योजना धुडकावून लावली व सैतानाला चालता हो असे म्हटले (मत्तय ४:१०). वधस्तंभाच्या मार्गे जाऊन ख्रिस्ताने सैतानाचा पूर्ण पराजय केला. (उत्पत्ती; ३:१५, कलस्से; २:४-१५, इब्री; २:१४-१५).
सैतान:
हा एक साधन होता. येशूने आपल्या पदाचा गैरवापर करावा म्हणून त्याने त्याला मोहात पाडले. पण त्याचा हा कुटि हेतू देवाने आपल्या पुत्राची परिक्षा पाहण्यास कारणी लावला. येशूने उपवास केला, त्याला भूक लागली(मत्तय :) यावरून देवाचा पुत्र -या मानवी क्लेशापासून अलिप्त नव्हता हे दिसते. पुरातन सर्प, अजगर, दियाबल, ही एकाच सैतानाची विविध नावे आणि रूपे आहेत(प्रकटी २०:२). प्रभू येशूने त्याचे वर्णन प्रारंभापासूनचा खुनी,  लबाड, आणि असत्याचा जनक अशा शब्दांत केले आहे(योहान ८:४४). कारण असत्य आणि लबाडी ह्यांचा वापर करून सैतानाने आदाम आणि ऐवा ह्यांना पाप करायला प्रवृत्त केले. त्याने ऐवेच्या मनात संशय उत्पन्न केला. जे फळ खाऊ नये असे देवाने सांगितले होते ते खाल्ले तर काही होणार नाही, हे त्याने तिला पटवून दिले(उत्पत्ती ३).
सैतानाला ह्या जगाचा अधिपती म्हटले गेले आहे. (योहान १२:३१, १४:३०, १६:११) त्याच्या हाती सत्ता आहे. तो शक्तिमान आहे. तरी पण पवित्र शास्त्रात अनेकदा आपल्याला सांगितले गेले आहे की, सैतानाच्या सत्तेला आणि शक्तीला मर्यादा आहेत. देवाचे सामर्थ्य सैतानापेक्षा अधिक आहे( योहान :). सैतान देवासारखा सार्वभौम नाही. सैतानाची सत्ता अपरिमित नाही. तो तर त्याच्या सत्तेची देवाणघेवाण करायलासुद्धा तयार आहे. येशूने सैतानाला नमन केले असते तर त्याची सत्ता येशूला देऊन टाकायला तो तयार होता(मत्तय :).
संत पौल आपल्याला सावध करतो की, आपण रक्तामांसाशी लढत नाही, पण सत्तांशी शक्तींशी, ह्या युगाच्या अंधकाराच्या जगत्पतींशी आणि अंतराळातील दुर्वृत्तीच्या आत्मिक सैन्यांशी लढत आहोत(इफिस :१२). सैतान देवासारखा सर्वव्यापी नाही. तो एका वेळी एकाच ठिकाणी असू शकतो. सैतानाने येशूची परीक्षा पूर्ण केल्यावर तो त्याला सोडून गेला (मत्तय :११, लूक :१३). याकोब म्हणतो, “देवाच्या अधीन रहा; सैतानाविरुद्ध उभे रहा, म्हणजे तो तुमच्यापासून दूर पळेल” (याकोब :). संत पेत्र असाच बोध करतो की, “सावध रहा, जागृत रहा, कारण तुमचा शत्रू सैतान हा गुरगुरणाऱ्या सिंहाप्रमाणे, कोणाला खावे म्हणून शोधीत फिरत आहे. तुम्ही विश्वासात स्थिर राहून त्याच्याविरुद्ध उभे रहा” ( पेत्र :-).

बोध कथा:

१.    जॉन बॉस्को लहान असताना त्याची विधवा आई दररोज शेतमजुरीला जायची व संध्याकाळी घरी यायची. जॉन बॉस्को शाळेतून घरी आल्यावर लाकडी कपाट उघडून त्यात काही खायला आहे का हे शोधायचा. लिटरभर रॉकेलची बाटली कपाटाच्या वर ठेवली जात असे. एक दिवस घरी आल्यावर जॉन कपाट उघडून खाऊ शोधत असताना त्याच्याहातून बाटली खाली पडून फुटली व रॉकेल वाया गेले. आई परत आल्यावर आपल्याला मारणार ह्या हेतूने जॉनला एक वाईट कल्पना सुचली,ती म्हणजे, ‘मी घरात शिरलो तेव्हा एक मांजर घरात कपाटावरून उडी मारून पळून गेली आणि रॉकेलची बाटली खाली पडून फुटली’असे मी आईला सांगणार. परंतू आईने त्याच्यात ख्रिस्ताचे विचार, ख्रिस्ताच्या आज्ञा, ख्रिस्ताचे मन रूजवले होते, ते मन त्याला म्हणू लागले जॉन आईला खरा प्रकार सांगायचा. कदाचित आई समजून घेईल आणि माफी करील. माफी न केल्यास अपराधाबद्दल शिक्षा सहन करायची. आईला येताना बघून जॉनने एक छडी हातात घेतली. आईला म्हणाला, आई मला शिक्षा कर. खाऊसाठी कपाट उघडताना वरची बाटली खाली पडून फुटली आणि रॉकेल वाया गेले. आईने लागलीच त्याला मिठी मारून कवेत घेतले व म्हणाली, माझ्या बाळा, तू खरे बोलत असताना मी तुला शिक्षा कशी करेन? ईश्वराला सत्य वचनी लोक आवडतात आणि तू देवाच्या आज्ञा पाळल्या आहेत. आज तू सैतानावरती विजय मिळविला आहे.

मनन- चिंतन:

१.   उपवास काळ हा देवाजवळ येण्याचा काळ आहे. देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल. इफिसकरास पत्र ६:१० मध्ये संत पौल म्हणतो, प्रभूमध्ये व त्याच्या सामर्थ्यामध्ये बलवंत होत जा. सैतानाच्या डावपेचापुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री धारण करा. आजच्या जगात जगताना सैतान त्याच्या शब्दाद्वारे, विचाराने, चुकीच्या मार्गाने, अनेक आमिष दाखवून मोहात पाडतो व आपल्याला देवापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो. परंतु जर आपल्याजवळ देवाच्या वचनाची शस्त्रसामग्री धारण केलेली असेल तर सैतानाचा प्रतिकार करण्यास बल व सामर्थ्य मिळते. उपवासकाळात सैतानाने येशूची सुध्दा परीक्षा घेतली होती. येशूने पवित्र शास्त्राच्या वचनाने सैतानाचा प्रतिकार केला(मत्तय ४:१-१२). देवाच्या वचनाची माहिती नसल्यामुळे ख्रिस्ताचे सेवक क्षणो क्षणी सैतानाच्या मोहाला बळी पडतात किंबहुना पदासाठी, पैशासाठी, संपत्तीसाठी, किंवा नावासाठी देवाला नाकारून सैतानाच्या पाया पडतात. त्याच्या मोबदल्यात त्यांना अशांती, असमाधान, दु:ख व अनेक प्रकारच्या आजाराचे बक्षीस मिळते.  
स्तोत्रकार ११९:१०५ मध्ये म्हणतो,तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. येशूच्या वचनामध्ये चमत्कार करण्याची व आजार बरे करण्याची शक्ती आहे. मत्तय ८:८ मध्ये शताधिपती येशूला म्हणतो, प्रभुजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही; पण एक शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. कारण शताधिपतीला दृढ विश्वास होता की केवळ येशूच्या एका वचनामध्ये आजार बरे करण्याची शक्ती आहे. मत्तय ८:१० मध्ये येशू म्हणतो, एवढा विश्वास मला इस्त्राएलात आढळला नाही. येशू मत्तय २२:२९ मध्ये म्हणतो, तुम्ही शास्त्र व देवाचे सामर्थ्य जाणत नसल्यामुळे चूका करता. देवाच्या वचनाद्वारे आपलं जीवन पवित्र होतं. आपल्याला पवित्र आत्म्याची कृपादान व देवाचं सामर्थ्य याचं वरदान मिळत. इब्रीलोकांस पत्र ४:१२ म्हणते, कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. देवाचे वचन सैतानाच्या डावपेचाचा प्रतिकार करण्यास सुबुद्धी व शक्ती देते.   
      येशू योहान ३:३ मध्ये आपल्याला म्हणतो, ''नव्याने जन्मल्या शिवाय कोणीही देवाचे राज्य पाहू शकणार नाही.'' ह्याचा अर्थ असा की, नव्याने जन्म घेणे म्हणजे सैतानी वृत्ती बाहेर टाकणे- पश्चाताप करणे व पवित्र आत्म्यामध्ये नव्याने जन्मणे. सैतानी वृत्ती, नकारात्मक गोष्टी , ज्या परमेश्वराच्या आज्ञापासून आपल्याला अडथळत आहे त्या पूर्णपणे सोडून देणे व परमेश्वराला नम्र अंत:करणाने शरण जाऊन श्रध्देने, देव शब्दानुसार आचरण केल्याने आपल्या भावी जीवनाला नवीन पालवी येऊन सकारात्मक परिवर्तनाद्वारे आपण या प्रायश्चित काळामध्ये देवाच्या समीप येऊ शकतो.

२.    परमेश्वराने मानवास स्वत:च्या प्रतिरूपाने व पूर्णप्रेमाने भरून टाकले. सर्व सुखसोयी आर्शिवादाने संपन्न करून आर्शिवाद दिला. परंतू सैतानाने मानवास देवाच्या प्रेमापासून दूर नेले व आपण पापात पडलो, परंतू परमेश्वराने आपल्यावर एवढं प्रेम केले की आपला नाश होऊ नये म्हणून एकुलता एक पुत्राला या जगात सैतानावर विजय मिळविण्यासाठी पाठवले(योहान३:१६). ह्याच पुत्राच्या आज्ञाधारकपणामुळे पुष्कळजण नीतिमान ठरतील कारण जसे त्या एकाच मनुष्याच्या आज्ञाभगांने (आदामाचा आज्ञाभंग) पुष्कळ जण पापी ठरले होते तसेच ह्या एकाच मनुष्याच्या आज्ञापालनाने (येशूच्या आज्ञापालन) पुष्कळ जण नीतिमान ठरतील. तो पुत्र असूनही त्याने जे दु:ख सोसले जेणेकरून तो आज्ञाधारकपणा शिकला आणि परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणा-या सर्वांचा युगानुयुगीच्या तारणाचा कर्ता झाला आणि त्याला मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे प्रमुख याजक असे देवाकडून संबोधण्यात आले (इब्री ५:८-१०).

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे दयाळू पित्या, आम्हाला शक्ती व धैर्य दे.
१. आपल्या परमगुरूंना देवराज्याची मुल्ये सर्वत्र पसरविता यावी, व त्यांना ह्या कार्यात इतर धर्माधिकारी व राज्यकर्ते ह्यांचे सहकार्य लाभावे, म्हणून आपण प्रार्थना करू या.
२. सामाजिक क्षेत्रात काम करणा-या कार्यकर्त्यांनी सामाजिक कल्याणाची कामे करत असताना तोंड दयावे लागणा-या विरोधा व छळा येशू प्रमाणे ठाम राहावे, पवित्र आत्म्याचे पाठबळ त्यांना मिळावे, म्हणून आपण प्रार्थना करू या.
३. ख्रिस्तमंडळीने महिलांना आपल्या कारभारात योग्य ते स्थान द्यावे, त्यांच्या प्रतिष्ठेसाठी व उन्नतीसाठी जागतिक पातळीवर प्रयत्नशील राहावे, म्हणून आपण प्रार्थना करू या. 
४. भारतीय ख्रिस्त मंडळीत व्रतस्थ महिलांना स्वतंत्र स्थान मिळावे. त्यांना स्वतंत्रपणे कार्य करता यावे, म्हणून आपण प्रार्थना करू या. 
५. बालिकांना जगण्याची व आरोग्य अन शिक्षण यांची समान संधी मिळावी, म्हणून आपण प्रार्थना करू या.
६. आता आपण आपल्या वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करू या.


3 comments: