Tuesday 8 July 2014


Reflections By: Suresh Alphonso.






सामान्यकाळातील पंधरावा रविवार

दिनांक: १३/०७/२०१४.
यशया; ५५:१०-११.
रोमकरांस पत्र; ८:१८-२३.
मत्तय; १३: १-१३.











“स्वर्गराज्याचं गुपित समजण्याचं दान तुम्हाला मिळाले आहे.”

प्रस्तावनाः
 आज ख्रिस्तसभा सामान्यकाळातील पंधरावा रविवार साजरा करीत आहे. आजची वाचने आपल्याला देवाच्या वचनाचे महत्व पटवून देतात. देवाचे वचन आपल्या जीवनाची आध्यात्मिक भूक व तहान भागवते. देवाच्या वचनाचे रहस्य ज्याला कळते त्याच व्यक्तीचे तारण होते. ती व्यक्ती पूर्णता बदलून जाते व देवभक्त होते.
     आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा आपणांस देवाच्या वचनाविषयीचे महत्व सांगतो. तर दुस-या वाचनाद्वारे संत पौल आपणांस देवाचे प्रकट होणारे वैभव दाखवतो. शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त स्वर्ग राज्याविषयी व देवाच्या वचनाविषयी सांगताना पेरणा-याच्या दाखल्याद्वारे आपणांस देवाच्या वचनाचे स्पष्टीकरण देतो.
देवाचे वचन हे दिव्य दान आहे; ते दिव्य दान आपणांस प्राप्त व्हावे व त्या वचनांचा अर्थ आपणास कळावा आणि त्याच वचनांचे आपण सुर्वार्तीक व्हावे म्हणून परमेश्वराकडे विशेष प्रार्थना करू या.

पहिले वाचन (यशया; ५५:१०-११):
यशया हा देवाचा इस्त्राएलसाठी निवडलेला संदेष्टा होता. त्याच्याद्वारे खूप काही येशूविषयी भाकित सांगितली गेली होती. आजच्या वाचनात यशया संदेष्टाद्वारे देवाच्या वचनांचा अर्थ सांगण्यात आला आहे; जसे पाऊस व बर्फही आकाशातून पडतात आणि पृथ्वी भिजवून तिला सफळ व हिरवीगार करतात. तसेच देवाचे वचन आहे ते आपल्या आध्यात्मिक जीवनाला सफळ व हिरवीगार करतात. कारण देवाचे विचार हे आपल्या विचारांपेक्षा उच्च आहेत. तसेच अधिक दूरवर पोहचणारे, अधिक समृध्द व अर्थपूर्ण आहेत. म्हणूनच देवाच्या वचनांची तुलना पाऊस व बर्फ ह्यांच्याशी केली आहे. त्यातून संथपणे व मूकपणे चाललेले कार्य सूचित होते.

दुसरे वाचन (रोमकरांस पत्र ; ८:१८-२३):
दुस-या वाचनात संत पौल आपणांस देवाच्या गौरवाच्या आत्म्याविषयी व देवाचे प्रगट होणारे वैभव ह्या विषयी बोध करतो. “गौरवाचा आत्मा” ह्यामध्ये पौलाने दुःख सहन करणे व गौरव करणे ह्या दोघामधला फरक स्पष्ट करताना ख्रिस्ती श्रध्देच्या विश्वासाचा मुद्दा आणि ख्रिस्ती जीवनातील दुःखे व त्यानंतरचा गौरव स्पष्ट केला आहे. त्यासाठी संत पौल आपणांस सृष्टीचे उदाहरण देतो.

शुभवर्तमान (मत्तय; १३:१-२३):
“ज्याला कान आहेत तो ऐको”(मत्तय १३:९). शुभवर्तमानात प्रभू येशू देवराज्याविषयी सांगत आहे. स्वर्गराज्य समजीव होण्यासाठी प्रभू येशू पेरणा-याचा दाखला देतो व ते पेरल्या नंतर काय स्थिती होते व जे बी चांगल्या जमिनीत पडल्यावर कसे शंभरपट, साठपट व तीसपट पिक देते ते सांगितले आहे. देवाचे वचन हे असेच आहे; ज्याला ते ज्याप्रमाणे कळते तो त्याचप्रकारे शंभरपट, साठपट व तीसपट पिक देतो म्हणूनच येशूने शिष्यांना सांगितले की, ‘स्वर्गाच्या राज्याची रहस्ये जाणण्याचे दान तुम्हाला दिले आहे’.

सम्यक विवरणः
     स्वर्गाचे राज्य व देवाचे वचन खूप समजण्यास कठीण आहे, ह्याच कारणास्तव  जेव्हा देवराज्य समजण्यासाठी येशू ख्रिस्त शिष्यांना पेरणा-याच्या दाखल्याने समजावतो तेव्हा त्यांना ते कळत नाही कारण ते देवराज्याविषयी असते. पेरणा-याच्या दाखल्यामध्ये प्रभूने स्वर्गराज्याचे स्पष्टीकरण दिले आहे. पेरणा-याच्या दाखल्याद्वारे  येशूने स्वर्गराज्याची घोषणा केली व शिष्यांनी मोठ्या उत्साहाने व प्रेमाने प्रतिसाद दिला; पण सर्वांनाच त्याचा अर्थ कळला असा नाही. ह्या दाखल्यात पेरणारा पेरणी करावयास निघाला व ते बी कसे व कुठे पडले व त्याची वाढ कशी झाली ह्याचे स्पष्टीकरण करून त्याचे कुठे साठपट, कुठे शंभरपट व कुठे तीसपट कसे पिक आले ते सांगण्यात आले आहे(मत्तय १३:८).
     ह्या दाखल्यावरून प्रभूला समाजात वागणारी लोक कशी आहेत व त्याच्या मागे येणारे त्याचे शिष्य कसे आहेत ह्याचे स्पष्टीकरण करायचे होते. त्यासाठी पेरणा-याचे बी हे वाटेवर, खडकाळ व काटे-कुटे असलेल्या जागी पडते. म्हणजेच देवाचे वचन व स्वर्गराज्य समजण्यासाठी आपण तीन प्रकारात मोडतो जसे:
१) अजिबात न ऐकणारे,
२) वरवरचा उथळ प्रतिसाद देणारे व
३) इतर कामात रमून गेलेले,
ह्यामूळे आपणास देवाचे वचन व स्वर्गराज्य कळण्यास वेळ नसतो. चांगल्या जमिनीत पडणारे बी उत्पादक होते त्यामूळे विरोध आणि अपुरा प्रतिसाद असला तरीही पिक येईल असे आश्वासन येशूने आपल्या शिष्यांना दिले होते. म्हणूनच चांगल्या जमिनीत पडलेले पीक चांगले आले पण चांगल्या जमिनीत देखील उत्पादन क्षमता सर्वत्र सारखी नसते. जसे पेरणा-याचे चांगल्या जमिनीत पडून सुध्दा कुठे शंभर, साठ व तीसपट असे पिक आले.
     पेरणा-याच्या दाखल्यामध्ये “संदेश”(बीज) सर्वांसाठी एकच आहे. पण ऐकणा-याची ग्रहण शक्ती किती आहे त्यावर त्या संदेशाचा स्विकार करणे अवलंबून असते. म्हणून शिष्यांना तो दाखला कळला नाही त्यामूळे त्यांना स्वर्गराज्य व देवाचे वचन कळले नाही ह्यास्तव त्यांचा दाखल्याला प्रतिसाद वेगळा होता. त्यामूळे प्रभूला दाखल्याचे स्पष्टीकरण द्यावे लागले व त्यांच्यासाठी स्वर्गराज्याची रहस्ये उघडी करून द्यावी लागली.
     ज्यांना देवाच्या वचनांचे दान जाणण्याची शक्ती नाही त्यांच्याविषयी यशया संदेष्यांने स्पष्टपणे भाकित केले आहे; (यशया;६:९-१०) “ते देवाचा संदेश वरवर ऐकतात. यातून त्यांचे कोणतेच हित साधत नाही.” परंतू येशू हा शिष्यांसमवेत राहणे हा विशेष मान आहे कारण येशूच्या समवेत राहून देवाची वचने ऐकणे व स्वर्गराज्य समजवून घेणे फार भाग्याचे होते. कारण स्तोत्रकार १२:६-७ मध्ये म्हणतो, “प्रभूचे शब्द म्हणजे आगदी शुद्ध असे शब्द, भट्टीत सातवेळा तावून सुलाखून मातीच्या मुशीत ओतलेल्या रुप्यासारखे. आम्हाला सांभाळ, प्रभू! अश्या ह्या पिढीपासून नेहमी आमचे रक्षण कर.”

बोधकथा:
1तेरेसा सुतारी ह्यांच्या पतीची नोकरी बंद पडली होती, तेव्हा त्यांनी दारूचा धंदा सुरु केला. ह्या धंद्यात प्रचंड पैसा त्यांना मिळाला. त्या पोलिसांना २६००० रुपये इतका हफ्ता देत असत. चैनबाजीत दिवस काढीत असतानाच त्यांच्या दोन्ही मुली व त्या स्वतः एकसारख्या आजारी पडू लागल्या. अगदी लाखावरी पैसा संपवून देखील काहीच उपयोग झाला नाही. त्यांच्या जीवनात त्यांना निराशा आली होती. काय करावे हे त्यांना सुचेना. अश्यावेळी एके दिवशी एका शेजा-याने तिला प्रार्थनेच्या सभेला जाण्याचा सल्ला दिला. त्या प्रार्थनेला जाऊ लागल्या व बायबल वाचन करू लागल्या. बायबल वाचत असताना त्यांना एक वचन आढळले की, तुम्ही प्रार्थनेत विश्वासाने काही मागाल ते तुम्हाला मिळेल’ व तिने विश्वासाने मागितले व तिला वचनाचा अर्थ कळला. त्यांना देवाच्या वचनाचा स्पर्श झाला. त्यांनी दारूचा धंदा पूर्णपणे बंद केला आणि काय चमत्कार, त्यांच्या मागे पडलेली साडेसाती बंद झाली. परंतु उदहारनिर्वाहाचे दुसरे साधन नसल्यामुळे त्यांचे हाल चालू झाले. काही लोकांनी त्यांना दारूचा धंदा पुन्हा चालू करण्याचा सल्ला दिला पण त्या देवाच्या वचनापासून हटल्या नाहीत. त्यांनी प्रार्थनेवर व देवाच्या वचनावर विश्वास ठेवला आणि तसा धंदा पुन्हा करण्याचे नाकारले. त्यामुळे तिच्या घराचे तारण झाले. लवकरच तिच्या पतीला बाहेरगावी नोकरी मिळाली व त्यांनी स्वतः भाजीपाल्याचा व्यवसाय सुरु केला.

2.   संत अल्फॉन्सो लिगोरी ह्यांचा जन्म इटलीतील एका गावात झाला. लहानपणापासूनच ते खूप बुद्धिमान व धार्मिक होते. त्यांचे बालपण श्रीमंत व धार्मिक कुटुंबात गेले. सतराव्या वर्षी ते वकील बनले. ज्यावेळी ते कोर्टात गेले, त्याचवेळी इतर जेष्ठ वकिलांनी त्यांची चेष्ठा केली परंतु त्यांनी उत्कृष्टरीत्या मुद्दे मांडून केस जिंकली. मग त्यांना एक दिवस फसविण्यात आले. त्याचवेळी त्यांनी आपली नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. एकदा एका दवाखान्यासमोरून जात असताना त्यांनी तेथे लिहिलेले वचन वाचले, ‘ह्या जगाचा त्याग कर व माझ्या मागे ये’, जणू परमेश्वर त्यांच्याशी बोलला व त्यांचे मनपरिवर्तन झाले. त्यांनी धर्मगुरू होण्याचा निर्णय घेतला, ते धर्मगुरू झाले व पुढे त्यांना बिशप म्हणून नेमण्यात आले. त्यांनी जवळजवळ एकशेअकरा पुस्तके लिहिली. त्यांनी रिडॅम्टोरिस्ट संस्थेची स्थापना करून गरिबांना ख्रिस्ताच्या वचनाचा संदेश दिला.

मनन-चिंतनः
     मत्तयच्या शुभवर्तमानात पेरणा-याचा दाखला खूप काही महत्वाचा संदेश आपणास देत आहे. मत्तयने ह्या दाखल्यामध्ये देवाचे राज्य व देवाचे वचन ह्यांचा उत्कृष्ट समेट केला आहे. देवाचे वचन ऐकल्यावर आपली काय अवस्था होते व आपण कोणत्या प्रकारच्या लोकांत मोडतो हे ह्या दाखल्याद्वारे कळते. हाच दाखला मार्कच्या शुभवर्तमानात आपणांस आढळतो परंतू मार्कपेक्षा मत्तयने दाखला अगदी स्पष्टपणे व अर्थपूर्णपणे सांगितला आहे. जेव्हा हा दाखला येशूने शिष्यांना सांगितला तेव्हा त्यांना त्याचा अर्थ कळला नाही तेव्हा येशूने त्यांना सांगितले की, ‘देवाचे राज्य समजविण्याचे  दान तुम्हाला देण्यात आले आहे. जर तुम्हाला हा दाखला कळला नाही तर पुढील गोष्टी कशा कळतील.’
     कधी कधी आपली स्थिती त्या शिष्यांसारखी होते. आपणांससुध्दा त्या शिष्यांप्रमाणे देवाचे वचन समजण्याचे दान देण्यात आले आहे परंतू कधी कधी आपण शिष्यांप्रमाणे गोंधळून जातो म्हणूनच येशूला पेरणा-याचा दाखला शिष्यांना स्पष्ट करावा लागला. पेरणारा देवाचे वचन पेरतो पण ते वेगवेगळ्या स्थितीत पडते त्यामुळे आपणांस वेगवेगळ्या प्रकारचे लोक आढळतात.
  • वाटेवर वचन पेरले जाते ते लोक हे आहेत की त्यांनी ऐकल्याबरोबर सैतान येऊन त्यांच्यातले पेरलेले वचन हिरावून घेतो.
  •  खडकाळ जमिनीत पेरलेले लोक वचन आनंदाने ग्रहण करतात परंतु मूळ नसल्याकारणाने अल्पकाळ टिकतात, त्यामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे ते लागलेच अडखळतात.
  • काटेरी झुडपांमध्ये पेरलेले लोक वचन एकून घेतात, नंतर प्रपंचाची चिंता, द्रव्याचा मोह व इतर गोष्टींचा लोभ त्यामुळे त्यांच्या वचनाची वाढ खुंटते व ते निष्फळ होतात.
  • चांगल्या जमिनीत पेरलेले लोक वचन चांगल्या प्रकारे स्विकारुन कोणी तीसपट, कोणी साठपट तर कोणी शंभरपट पीक देतात.
ख्रिस्ताने देवाचे वचन ऐकणा-या लोकांची वेगवेगळी स्थिती किंवा वेगवेगळेपणा दाखवला आहे. आपण वचन ऐकल्यावर कोणत्या प्रकारात मोडतो हे ख-या अर्थाने पडताळून बघितले पाहिजे.
  • फ्रान्सिस झेविअर ह्याला देवाचे वचन प्राप्त झाले, ‘मनुष्याने सारे जग कमावले व स्वतःचा आत्मा गमावला तर त्याचा त्याला काय लाभ?’ त्यांचे परिवर्तन झाले व ते येशूसंघिय संस्थेत दाखल झाले.
  • ‘करशील जे गरिबांसाठी होईल ते माझ्यासाठी’ हे वचन प्राप्त झालेल्या मदर तेरेसाने आपले संपूर्ण जीवन गरिबांसाठी वाहिले.
  • असिसीच्या संत फ्रान्सिसने देवाचे वचन ऐकल्यावर मोडकळीस आलेल्या मानवी ख्रिस्तसभेची पुनर्बांधणी केली. अश्याप्रकारे खूप काही उदाहरणे आपल्या समोर आहेत.

सर्वांना देवाचे वचन प्राप्त होते परंतु आपण ते कसे स्वीकारतो हे आपणा प्रत्येकावर अवलंबून आहे. प्रभू येशू मत्तय ७:२४ मध्ये म्हणतो, ‘ह्यास्तव जो प्रत्येक जण ही माझी वचने एकून त्याप्रमाणे वागतो, तो कोण सूज्ञ मनुष्यासारखा होय. कारण त्याने घर खडकावर बांधले त्यामुळे त्याला काही झाले नाही परंतु जो कोणी माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही तो कोणा एका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर वाळूवर बांधले व कोसळून पडले.’

विश्वासू लोकांच्या प्रार्थनाः
प्रतिसादः हे प्रभो, आमची प्रार्थना ऐकून घे.
  1. ख्रिस्तसभेसाठीः- ख्रिस्तसभेत कार्य करणारे आपले पोप व इतर सर्वांना देवाच्या वचनाचा अर्थ कळावा व त्यांनी देवाच्या वचनांची सुवार्ता जगभर पसरावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
  2. ख्रिस्ती कुटुंबासाठीः- जे देवाच्या वचनापासून व ख्रिस्तसभेपासून दूर गेले आहेत त्यांना देवाच्या प्रेमाचा स्पर्श व्हावा; व बायबल वाचन रोज घरा-घरात व्हावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
  3. पाऊसासाठीः- हे प्रभो ह्या पावसाळी हंगामात आम्हास शेती-योग्य असा पाऊस लाभावा जेणेकरून आम्हांस चांगली शेती करता येईल व चांगले पीक घेता येईल, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
  4. आजारी लोकांसाठीः- हे प्रभो जे आजारी व दुःखी-कष्टी आहेत त्या सर्वांवर तुझा आर्शिवाद असू दे व त्यांना तुझ्या आरोग्यदायी स्पर्शाने चांगले स्वास्थ लाभावे, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
  5. थोड्या वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया.          

   

No comments:

Post a Comment