Tuesday 22 July 2014



Reflections for homily by: Cajeten Pereira



सामान्य काळातील सतरावा रविवार
पहिले वाचन  :१ राजे ३:५,७-१२   
दुसरे वाचन : रोमकरांस पत्र ८: २८-३०
शुभवर्तमान : मत्तय १३: ४४-५२
दिनांक : २७/०७/२०१४








“स्वर्गाचे राज्य एखाद्या शेतात पुरलेल्या गुप्त खजिन्यासारखे आहे.”

प्रस्तावना :
 देवाचे राज्य भौतिक सुखापेक्षा आणि प्रतिष्ठेपेक्षा महान आहे. आजची उपासना आपणाला स्वर्गाची श्रेष्ठता आणि तारणाचे मोल ह्याविषयी चिंतन करण्यास प्राचारित आहे. आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो की, शलमोन राजा देवाकडे स्वतःच्या भल्यासाठी वर न मागता लोकांचा योग्य न्याय करता यावा व राज्याची कार्यव्यवस्था प्रामाणिकपणे करता यावी म्हणून विवेकबुद्धी मागतो.
आजच्या दुस-या वाचनात संत पौल आपणास सांगतो की, आपल्या मृत्युनंतर स्वर्गप्राप्तीसाठी देव अहोरात कार्यशील आहे. तथापि जोपर्यंत आपण सहकार्य करीत नाही तोपर्यंत स्वर्ग आपला होणार नाही. आजच्या शुभवर्तमानात स्वर्गराज्याचे महत्व आणि तारणाचे मोल स्पष्ट करून देण्यासाठी येशूने तीन विविध दाखल्यांचा वापर केलेला आहे. तर चौथ्या दाखल्याद्वारे देवाचे राज्य स्विकारलेल्या मनुष्याचे कार्य काय आहे हे समजावून सांगतो.
सर्वप्रकारच्या भौतिक संपत्तीपेक्षा आणि अतिमौल्यवान मोतीपेक्षा स्वर्गराज्य श्रेष्ठ आहे, व ते मिळविण्यासाठी आपण सर्वांनी देवाच्या वचनानुसार नीतिमान जीवन जगावे म्हणून ह्या पवित्र मिसाबलीदानामध्ये प्रार्थना करू या. 
         
पहिले वाचन :
स्वर्गीय नंदनवन प्राप्त करण्यासाठी, २०० वर्ष चैनीचे व ऐष आरामाच्या जीवनाची नव्हे तर दोन दिवस देवासाठी व इतरांसाठी जगण्याची गरज आहे. शलमोनाचा दावीद आपल्या पित्याच्या जागी राज्याभिषेक करण्यात आला. आपल्या पित्याच्या खुर्चीवर बसून राज्यकारभार हाताळण्यास आपण लायक नाही असे शलमोनाला वाटले. म्हणून त्याने देवाकडे मध्यस्थीची प्रार्थना केली. देवाने त्याला स्वप्नात दर्शन देऊन पाहिजे तो वर मागण्यास सांगितले. शलमोन राजाने स्वतःसाठी काहीही न मागता आपल्या प्रजेचा योग्य न्याय करता यावा म्हणून विवेकबुद्धी मागितली.
   
दुसरे वाचन :
 आजच्या दुस-या वाचनात संत पौल रोमकरांस ख्रिस्ती जीवनाचे महत्व व सामर्थ्य स्पष्ट करून देतो. ख्रिस्ताच्या आगमनाने व त्याच्या अस्तित्वापुढे अंधकार व सावली विकोपास पावली आहे. मोशेचा नियमशास्त्र सार्वकालिक जीवन देऊ शकला नाही व देणारही नाही; केवळ ख्रिस्ताचे मरण आणि पुनरुत्थान देऊ शकते. त्यामुळे ख्रिस्ती भाविकांना सार्वकालिक जीवनाची खात्री आहे, जर ते ख्रिस्ताशी एकनिष्ठ राहिले. 

सम्यक विवरण:
शुभवर्तमान :
आजच्या शुभवर्तमानातील तीन दाखल्यांद्वारे असे स्पष्ट होते की, ज्यांनी ख्रिस्ताचा आपला तारणारा म्हणून स्वीकार केला व त्याची वचने आपल्या दैनंदिन जीवनात आचारण्याचा प्रयत्न केला, त्याचा स्वर्गराज्यात समावेश होतो. “देवाने जगावर एवढी प्रीति केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे” (योहान ३:१६). ख्रिस्त स्वर्गाचे वैभव सोडून तारणाची योजना पूर्ण करण्यासाठी या जगात आला व त्याने तारणाची योजना पूर्ण केली. यासाठी त्याला आपल्या प्राणाची किंमत भरावी लागली. जे ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, ते मोठी किंमत भरून विकत घेतलेले आहेत (१ पेत्र १:१९-१९). म्हणजेच जे ख्रिस्ताचा स्वीकार करतात त्यांना मोलवान ठेवीसारखे, तसेच मोलवान मोत्याप्रमाणे किंमतीचे सार्वकालिक जीवन मिळते (मत्तय १३:४४-४६).
  • जमिनीत लपविलेली संपत्ती:

जरी हा दाखला आपणाला अपरिचित वाटला, तरी येशूच्या काळातील पॅलेस्टाईन लोकांसाठी स्वाभाविक होता. पूर्वीच्या काळी असलेल्या बँकांचा उपयोग सामान्य मनुष्य करू शकत नसे, त्यामुळे सामान्य लोक आपली धन-दौलत राखून ठेवण्यासाठी जमिनीचा उपयोग करीत असे. रुपयांच्या दृष्टांतात आळसी दास पैसे हरवू नयेत म्हणून जमिनीत लपवून ठेवतो (मत्तय २५:२५).
तसेच पॅलेस्टाईन बहुतेककरून जगातील सर्वात जास्त लढाईचा देश होता. जेथे माणसाचे शेत केव्हाही रणांगण बनत असे. जेव्हा युद्धाची लाट लोकांना थमकावत, तेव्हा पळण्याअगोदर आपली संपत्ती ते जमिनीत ठेवीत असत. 
काळात संपत्तीचा मालक किंवा त्याचे संपूर्ण कुटुंब मारले जात अथवा पलायनामुळे कधीही परत येत नसत. ह्या कारणास्तव लपविलेल्या संपत्तीची कुणालाही कल्पना नसे, म्हणून अशी संपत्ती कधी कुणाला नशिबाने मिळत असे. आजच्या दाखल्यातदेखील मनुष्य आनंदाने आपले सर्व विकून शेताबरोबर संपत्तीची मालकी मिळवतो. येशू सांगतो, देवाचे राज्य ह्या विश्वात दडलेल आहे. जेव्हा तुम्हांला ते सापडेल, तेव्हा सर्वस्वाचा त्याग करून किंवा सर्वकाही विकून देव-राज्याची मालकी मिळवा.
  • मौल्यवान मोती:

प्राचीन काळी मोतीला माणसाच्या हृदयात खास जागा होती. एखादा अत्यंत सुंदर मोती जवळ बाळगण्याची लोकांची तीव्र इच्छा होती. कारण सर्व मिळकतीमध्ये मोती हा आल्हाददायक आणि अत्यंत सुंदर वस्तू होती. म्हणजेच स्वर्गराज्यसुद्धा जगातील अत्यंत सुंदर वस्तू आहे.
जगात इतर मोतीसुद्धा आहेत परंतु एकच मोती अति मौल्यवान आहे. त्याचप्रमाणे जगातील विविध गोष्टी माणसाला आनंदमय बनवू शकतात, परंतु केवळ स्वर्गराज्यच माणसाला सार्वकालिक सुख आणि आनंद देऊ शकते. स्वर्गराज्यात असणे म्हणजे देवाच्या इच्छेला प्राधान्य देऊन त्याप्रमाणे वागणे होय. फक्त एकाच मार्गाद्वारे आपल्या हृदयाला शांतता, मनाला आनंद व जीवनाला सौंदर्य देऊ शकतो; आणि तो मार्ग म्हणजे देवाच्या इच्छेप्रमाणे वागणे होय.
मोती शोधणारा व्यापारी अति मौल्यवान मोतीची मालकी मिळविण्यासाठी मागचा-पुढचा विचार न करता त्या क्षणाला आपले सर्व विकून तो मोती विकत घेतो. त्याप्रमाणेच देवाचे राज्य शोधणा-या प्रत्येक शिष्याला आपली मालमत्ता विकून दारिद्र्यास द्यावी लागेल (मत्तय १९:१०), म्हणजेच त्याला स्वर्गातील संपत्तीची मालकी मिळेल.
  • समुद्राकाठी ओढलेले जाळे:

येशूचा उपदेश ऐकण्यासाठी सर्व प्रकारची लोक उपस्थित असायची. पहिले दोन दाखले शेतकरी आणि व्यापारी समुहासाठी होते तर तिसरा दाखला कोळी बांधवांसाठी होता.
किना-यावर ओढलेले जाळे कोणताही भेदभाव न करता आपल्याबरोबर सर्व प्रकारची मासळी आणि इतर वस्तू घेऊन येते. त्याप्रमाणेच स्वर्गराज्यात प्रवेश करण्याचे आमंत्रण सर्वांनाच दिले जाईल, परंतु न्यायाच्या दिवशी ज्यांनी देवाच्या वचनाप्रमाणे आणि येशूच्या शिकवणुकीप्रमाणे जीवन जगले आहे अश्यांचाच स्वर्गराज्यात प्रवेश होईल. इतरांना मात्र जसे निरुपयोगी मासे समुद्रात फेकले गेले तसे न विझणा-या अग्नीच्या भट्टीत फेकून दिले जाईल.

बोधकथा:
१. १९३६ साली एडवर्ड VIII हा इंग्लंडचा राजा होता. त्याला व्हॅलीस सिम्पसन  (Wallis Simpson) विवाह करायचा होता परंतु इंग्रजाच्या कायद्यानुसार राजाला कोणत्याही सामान्य मुलीबरोबर विवाह करता येत नसे. शिवाय सिम्पसन घटस्फोटीत होती. एडवर्ड राजा द्विधावस्थेत होता. त्याला प्रेमिका आणि राज्यपद यामध्ये निवड करायची होती. एकतर सिम्पसनशी विवाह करून राज्यपदाचा त्याग करायचा नाहीतर सिम्पसनला सोडून इंग्लंडचा राजा म्हणून राज्यकारभार सांभाळायचा. इतिहासामध्ये एडवर्डचे स्मरण केले जाते, ज्याने निर्भिडपणे केवळ प्रेमाखातीर राज्यपदाचा त्याग केला.

२.  ही गोष्ट आर्थर टोने ह्याने सांगितलेली आहे.                                 ऑलेरी नावाचा एक वृद्ध आयरिश (Irish) बाई इतकी गरीब होती की, तिचा राहण्याचा व जेवणाचा खर्च पॅरिश बघत असे. खरी वस्तुस्थिती बघता, तिचा मुलगा अमेरिकेला स्थलांतर होऊन श्रीमंत झाला होता. त्याने न्युयॉर्क शहरात किराणा मालाची दुकाने काढली होती. लोक नेहमी धर्मगुरूकडे चौकशी करत, “बॉब कशाला आपल्या आईला मदत करीत नाही?”
एके दिवशी धर्मगुरूने ऑलेरीच्या घरी जाऊन विचारले, “बॉब विषयी तु काही ऐकले आहे का? त्याने तुला कधी पत्र लिहिलेलं का?” ती मोठ्या अभिमानाने उद्गारली, “बॉब माझा मुलगा मला प्रत्येक आठवड्याला पत्र लिहितो व एक फोटोसुद्धा पाठवतो”. “तुम्ही ते जमा करून ठेवले आहेत का?” धर्मगुरूने विचारले. “नक्कीच”, ती बाई उद्गारली, “मी ते सर्व फोटो नवीन करारामध्ये जपून ठेवले आहेत”. धर्मगुरूने नवीन करार तपासाला आणि काय आश्चर्य, बेंजामिन फ्रॅन्कलीनाचे पन्नास फोटो $ १०० नोटावर आरामशीर विश्रांती घेत होते. ऑलेरीच्या हाती संपत्ती असून सुद्धा तिला त्याची जाणीव झाली नाही. त्याचप्रमाणे स्वर्गाची संपत्ती आपल्या हाती असून, आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. 

मनन-चिंतन:
आज जगात इच्छा-आकांक्षा आणि आरोग्य अपेक्षांना जास्त महत्व दिले जात आहे. सर्वत्र संपत्ती, प्रतिष्ठा, नाव-मान, सुख-समाधानासाठी वेडसर, अस्वस्थ आणि असाध्य शोध चालला आहे. ‘भरपूर-भरपूर, ह्या ब्रीद शब्दाद्वारे आज लोकांची मन वळली आहेत. त्यामुळे अफाट संपत्तीची तहान काही केल्या विझत नाही.
शलमोन राजा ह्या सर्व गोष्टींच्या मागे धावला नाही. त्याने देवाकडे राज्यकारभार चालविण्यासाठी विवेकबुद्धी, दूरदृष्टी आणि समजूतदारपणा विचारला. देवाने सढळ हस्ते त्याला ही दाने बहाल केली, त्यामुळे शांतीचे आणि न्यायाचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी शलमोन राजा समर्थ्य होता.
शुभवर्तमानातील दाखल्याचा केंद्रस्थान वर्तमानकाळावर आणि विश्वासू लोकांच्या कृतीवर आहे. दाखल्यात एकाला देवाचे राज्य नशिबाने मिळते तर दुस-याला लक्षपूर्वक शोधाने सापडते आणि इतरांना देवाच्या वचनाप्रमाणे नीतिमान, प्रामाणिक आणि सुसभ्य जीवनाने मिळवावे लागेल.
देवाचे राज्य ही एक जागा नसून न्याय, शांती, प्रेम आणि सत्य यासारख्या मूल्यांसाठी वापरलेले प्रत्यय आहे. तसेच येशू ही मूल्ये (देवाचे राज्य) प्रस्थापित करण्यासाठी आला होता. जर ही मुल्ये आपल्या हृदयात असतील, तर मग आपल्याकडे अति मौल्यवान वस्तूची मालकी आहे. कारण येशू म्हणतो, “देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे,” (लूक १७:२१) आणि “तुम्ही प्रथम देवाचे राज्य व त्याची धार्मिकता मिळवावयाची खटपट करा, म्हणजे याबरोबर सर्वकाही तुम्हास मिळेल” (मत्तय ६:३३).
ख्रिस्ती धर्माच्या सुरवातीपासून देवाच्या राज्यासाठी पुष्कळांनी आपले सर्वकाही विकले किंवा सर्वस्वाचा त्याग केला. सर्वप्रथम उदाहरण आहे प्रेषितांचे, ज्यांनी आपले सर्वकाही सोडून येशूचा पाठलाग केला. प्रेषितानंतर पुष्कळ थोर रक्तसाक्षी, संत आणि अध्यात्मवादी आहेत. ह्यामध्ये असिसिकार संत फ्रान्सीसचे उदाहरण सुप्रसिद्ध आणि जगप्रसिद्ध आहे. आजही असिसी आपणाला स्पष्टपणे संत फ्रान्सीसची आठवण करून देते.. तो एका गर्भ-श्रीमंत व्यापा-याचा मुलगा होता, परंतु देवाच्या दर्शनानंतर त्याने आपले सर्व काही गरीबामध्ये वाटले. इतकेच नव्हे, तर बिशपच्या न्यायालयामध्ये तो सर्वांसमोर नग्न उभा राहिला केवळ देवपित्याकडून स्वर्ग सौंदर्याने आच्छादण्यासाठी.
आज आपण संपत्तीला किंवा श्रीमंतीला तुच्छ मानत नाही. पैसा, मालमत्ता गरजेचे आहे, परंतु श्रीमंतीमुळे आपण कोणाला अग्रस्थान देतो हे महत्वाचे आहे. आज लोक सर्वकाही असून अशांत आणि दु:खी आहेत, कारण खरे सुख इतरांना मदत करण्यामध्ये आहे. जर आपली संपत्ती, मालमत्ता, प्रतिष्ठा, मान-सन्मान, सत्ता ह्या सर्वांचा उपयोग आपण इतरांच्या सेवेसाठी केला तर आपण देवाचे राज्य भूतलावर प्रस्थापित करू शकतो.
                    
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसादः  दयावंत येशू आमची प्रार्थना ऐक.
१. प्रभू परमेश्वरा, ख्रिस्तसभेची धुरा सांभाळणारे आमचे पोप महाशय, कार्डीनल्स, बिशप, धर्मगुरू, धर्मबंधू आणि धर्मभगिनी ह्यांच्यावर तुझा आशीर्वाद पाठव. त्यांनी आपल्या वचनाद्वारे व कृत्यांद्वारे तुझ्या न्यायचे, शांतीचे, प्रेमाचे आणि सत्याचे राज्य ह्या भूतलावर प्रस्तापित करावे म्हणून त्यांना तुझ्या कृपेने भर, म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपणाला देवाने बहाल केलेल्या देणग्यांचा, कला-गुणांचा आपण आपल्या  स्वार्थासाठी मान-सन्मान, नाव, प्रतिष्ठा व संपत्ती मिळविण्यासाठी न करता; दुस-यांच्या सेवेसाठी व भल्यासाठी, तसेच देवाची सुवार्ता पसरविण्यासाठी उपयोग करावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. सर्व पालकांनी आपल्या मुलांमध्ये चांगले गुणधर्म जोपासावेत, त्यांना देवराज्याविषयी शिकवण द्यावी. परमेश्वराच्या वचनाप्रमाणे व आज्ञेप्रमाणे वागून मुलांपुढे चांगला आदर्श ठेवावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. नोकरी व कामधंदा करण-या लोकांनी आपला व्यवसाय योग्यप्रकारे व प्रामाणिकपणे करावा. त्यांना आपल्या व्यवसायात भरपूर यश मिळावे, त्यांनी आपल्या कामकाजाद्वारे देवाच्या मुल्यांची साक्ष द्यावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आता आपण आपल्या सर्व गरजा शांतपणे प्रभूचरनाशी अर्पण करूया.        

No comments:

Post a Comment