Tuesday 26 August 2014

Reflections for Homily By: Chris Bandya.









सामान्य काळातील बाविसावा रविवार
“मनुष्याने सारे जग मिळविले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ?”





दिनांक: ३१/८/२०१४
पहिले वाचन: यिर्मया २०:७-९
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र १२:१-२
शुभवर्तमान: मत्तय १६:२०-२७

प्रस्तावना:

आजच्या शुभवर्तमानाद्वारे येशूख्रिस्त अखिल मानवजातीला सांगत आहे, “मनुष्याने सारे जग मिळविले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ?” पहिल्या वाचनात संदेष्टा यिर्मया शोक करत आपला संशय व्यक्त करतो परंतु परमेश्वरावर असलेल्या अखंड विश्वासामुळे यिर्मया परमेश्वराच्या वचनाप्रमाणे वागतो. आजच्या दुस-या वाचनात संत पौल रोमकरांस जीवनातील नवीकरणाबद्दल व येशूचे अनुकरण करण्यास प्रबोधन करतो, तसेच त्यांची शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करण्यास सांगतो.
आजची उपासना आपणा सर्वांस स्वतःच्या जीवनावर चिंतन करण्यास उपबोध करत आहे. परमेश्वराची उत्तम व परिपूर्ण इच्छा आपणासाठी काय आहे हे आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला समजून घ्यायला हवी. म्हणूनच आपण कधीही त्याच्यापासून दूर न जाता व आपल्या श्रद्धेच्या बळावर परमेश्वराजवळ येण्याचा प्रयत्न करावा ह्यासाठी ह्या मिस्साबलीदानात विशेष प्रार्थना करूया.

पहिले वाचन: यिर्मया २०:७-९

यिर्मया शोक करत सांगतो की, “हे परमेश्वरा, तू मला फसविले आणि मी फसलो” (२०:७). यिर्मया परमेश्वराविरूद्ध धरणा करतो कारण त्याला स्वतःच्या फसवणुकीची जाणीव होत होती व आपण परमेश्वरापेक्षा प्रबळ नाही म्हणून तो शोक करत होता. फसवणूक’ हाच शब्द ‘बायबल मध्ये १ राजे २२ ह्या पुस्तकात वापरला आहे व त्याद्वारे परमेश्वराने आहाबचा नाश केला. जर यिर्मयाची श्रद्धा दृढ नसती तर यिर्मयाला सुद्धा कठीण परिस्थितीतून जावे लागले असते आणि जर असे झाले असते तर त्याच्यामध्ये काही आश्चर्य नसते कारण लोकांना व दुस-या संदेष्ट्यांना यिर्मयाने केलेल्या चुकीची जाणीव होती (१७:१४-१८). तरीसुद्धा यिर्मयाची श्रद्धा व त्याचा परमेश्वरावर असलेला विश्वास भक्कम होता व परमेश्वराने ह्या दु:खदायक समयी यिर्मयाचा हाथ सोडला नाही. “मी म्हणालो, मी त्याचे नाव काढणार नाही, यापुढे मी त्याच्या नावाने बोलणार नाही, तेव्हा माझ्या हाडांत कोंडलेला अग्नी जळत आहे असे माझ्या हृदयाला झाले; मी स्वतःला आवरितां आवरितां थकलो, पण मला ते साधेना” (२०:९).

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र १२:१-२

नवीन जीवितक्रम: “आपली शरीरे जिवंत, पवित्र देवाला समर्पित करा”, संत पौल हे आवाहन प्रत्येक ख्रिस्ती लोकांपुढे ठेवत आहे, कारण आपली शरीरे पवित्र आत्म्याची मंदिरे आहेत तसेच पवित्र आत्म्याची कार्ये वाहण्याची साधने सुद्धा आहेत, म्हणूनच आपण आपली शरीरे देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी कारण ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे व परमेश्वराची खरी आराधना आहे. स्वत:चे शरीर परमेश्वराला अर्पण करणे हिच खरी आराधना आहे. पुढे संत पौल लोकांस याचना करून सांगतो की तुम्ही युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नविकरणाने स्वतःचे रुपांतर होऊ दया.

शुभवर्तमान: मत्तय १६:२०-२७

महान निषेध (मत्तय १६:२०-२३):
जरी शिष्यांना येशू “मसिहा” आहे हे ठाऊक होते तरी मसिहा ह्या शब्दाचा अर्थ त्यांना कळला नव्हता. त्यांना येशू मसिहा म्हणजे युद्ध लढणारा राजा, जो रोमन राज्यांस पेलेस्टांइन पासून वाचवेल व इस्रायल लोकांचे नेतृत्व करील म्हणूनच येशूने त्यांना शांत राहून त्याचे शब्द पाळायला सांगितले. जर ते बाहेर जाऊन प्रबोधन करत असते तर त्यांनी स्वतःचे विचार लोकांपुढे मांडले असते आणि त्यामुळे लोकांमध्ये वाद-विवाद झाला असता. म्हणून ज्याअगोदर ते येशूला मसिहा म्हणून जगापुढे ठेवतील त्याअगोदर येशू त्यांना मसिहा ह्या शिर्षकाची जाणीव करून देतो.
पेत्राच्या प्रतिसादावरून कळते की शिष्य येशूला समजून घ्यायला तयार नव्हते. त्यांना अधिक मार्गदर्शनाची गरज होती, व येशू मसिहा हा जगावर राज्य करण्यासाठी नव्हे तर त्यांच्या हृदयावर राज्य करण्यास आला आहे हे समजण्याची अधिक गरज त्यांना होती. येशूख्रिस्त त्यांना समजावून सांगतो ही, हा माझा मार्ग नसून माझा मार्ग क्रुसाचा आहे. “मी येरुशलेमेचे वडिलवर्ग, मुख्य याजक व शास्त्री यांच्याकडून दु:खे सोसावी” असे येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगतो. थोडक्यात सांगायचे म्हणजे येशू ह्या धार्मिक लोकांच्या हाती छळ सोसणार होता हे येशूला ठाऊक होते. परंतु हे सर्व ऐकून पेत्र मात्र गोंधळून गेला होता व त्याने येशूला निषेध करून म्हणाला, “प्रभुजी आपणावर दया असो, असे आपल्याला होणारच नाही” (१६:२२). पेत्राला येशूला वापरलेल्या शिर्षक ह्याचा अर्थ कळलाच नव्हता म्हणून त्याने येशूला निषेध केला. पेत्राला वाटले होते की येशू ख्रिस्त मसिहा म्हणजे त्याचा राजा जो रोमन साम्राज्याचा राजा होऊन त्यांची सुटका शत्रूंपासून करील व त्यांना सु:खात व आनंदात राहायला मिळेल.
     ह्या अध्यायातील सर्वात महत्वाचे व आश्चर्यकारक दृश्य म्हणजे येशूने पेत्राला वापरलेले शब्द, “अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा; तू मला अडखळण आहेस”. जेव्हा हे शब्द आपल्या कानी पडतात तेव्हा आपल्याला अनेक विचित्र विचार येतात परंतु हे नाट्यमयी दृश्य समजण्यासाठी आपल्याला काही गोष्टी जाणून घ्यायला हव्या आहेत. सर्वप्रथम येशूच्या भावना, जेव्हा येशूने हे शब्द वापरले नक्कीच येशूच्या मनात पेत्रासाठी राग नसेल कारण येशूने हे शब्द वापरले तेव्हा येशू एका साध्या हृदयाला दु:खापद झालेल्या व्यक्तीप्रमाणे त्याक्षणी होता.
परंतु एवढी प्रतिक्रिया?
येशूने असे केले कारण जेव्हा पेत्राने येशूला निषेध केला तेव्हा येशूसमोर रानांत घडणा-या प्रसंगाचे विचार येऊ लागले व पेत्र सुद्धा परिक्षा घेतो असे येशूला समजले म्हणून येशूने पेत्राला सैताना माझ्यापासून दूर जा अशा प्रकाराची प्रतिक्रिया व्यक्त केली कारण पेत्राचे विचार हे देवाच्या विचाराप्रमाणे नसून मानवाचे विचार होते.    
 महान आव्हान (मत्तय १६:२४-२६):
मत्तय १६:२४-२६ ह्या अध्यायात सर्वात महत्वाचा मुद्द्दा आपल्याला येशू ख्रिस्ताच्या शिकवणीत आढळतो (“मनुष्याने सारे जग मिळविले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ?”). अनेक अशा गोष्टी आपल्या लक्षात येतात ज्यांचा उच्चार येशू वारंवार करत असे (मत्तय १०:३७-३९; मार्क ८:३४-३७; लूक ९:२३-२७, १४:२५-२७, १७:३३; योहान १२:२५). ही सर्व ख्रिस्ती जीवनाची वैशिष्ठे ख्रिस्ताने लोकांपुढे ठेवली होती.
खरे ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी मनुष्याने ह्या तीन गोष्टी अंगीकारण्यास किंवा अनुकरण करण्यास सज्ज किंवा तयार रहायला हवे:
१.      स्वतःला नाकारणे/स्वतःचा त्याग करणे:
बहुतेकदा ‘स्वतःला नाकारणे’ हा नकारार्थी शब्द म्हणून वापरला जातो. आपल्यापासून काही वस्तूंचा त्याग म्हणून सुद्धा ह्या शब्दाचा वापर होतो. परंतु जेव्हा हा शब्द ख्रिस्त आपणांस पाळावयास सांगतो तेव्हा फक्त काही जीवनातल्या गोष्टींचा त्याग म्हणून नाही तर संपूर्ण जीवनाचा त्याग असा होतो व आपण स्वतःला नाकारून देवाला स्विकारतो. स्वतःला नाकारणे म्हणजे आपल्या जीवन नौकेचे सुकाणू आपल्या हातात न ठेवता परमेश्वरच्या हातात देतो. जेव्हा व्यक्ती स्वतःला नाकारतो तेव्हा त्याच्या जीवनातील महत्वाचे स्थान तो परमेश्वराला देत असतो व आपल्या जीवनाची सूत्रे परमेश्वराच्या चरणाशी समर्पित करतो.  
२.      स्वतःचा क्रुस घेणे:
स्वतःचा क्रुस घेणे म्हणजे आपल्या स्वतःच्या त्यागाचे भारी ओझे स्वतः वाहाणे, स्वतःचा क्रुस घेणे म्हणजे स्वतःच्या इच्छा आकांक्षा विसरून दुस-यांच्या चांगुलपणाचा विचार करणे व ख्रिस्ताच्या सेवेत मग्न होणे, कारण ह्या त्यागामध्ये जो आनंद आहे तो स्वर्गीय आनंद आहे. ज्या व्यक्तीला येशूचे अनुयायी व्हायचं आहे त्यांनी आपला स्वतःचा क्रुस वाहायला हवा व आपला वेळ व आनंदी समय ह्यांचा त्याग करून लोकांची सेवा करून देवाला आनंदी करायला हवे.
३.      ख्रिस्ताचे अनुयायी होणे:
ह्याचा अर्थ असा की मरण येईपर्यंत आपण ख्रिस्ताच्या आज्ञेत राहिलो पाहिजे. ख्रिस्ती जीवन हे येशूने जगलेल्या जीवनावर अवलंबून आहे म्हणूनच आपण येशूचे अनुयायी म्हणून हे जीवन स्विकारले पाहिजे. आपले विचार, शब्द व कृत्ये ही येशू ख्रिस्ताच्या आज्ञेप्रमाणे घडायला हवी.
जीव गमावणे आणि जीव मिळवणे
जगात ह्या दोन गोष्टीत खूप फरक आहे. पहिले म्हणजे ‘अस्तित्वात राहणे’ आणि दुसरे म्हणजे ‘जीवन जगणे’. ख्रिस्त आपणांस खरे जीवन हे फक्त अस्तित्वात राहणे नसून आपल्या जीवनाचा पुरेपूर उपयोग कसा होईल ह्याबद्दल माहिती देतो.
१.      जो मनुष्य आपला प्राण वाचवण्याचा प्रयत्न करतो तो हिरावून बसतो. ह्याचा अर्थ असा की, जो मनुष्य विश्वसनीय जीवन जगतो तो मरेल पण तरी तो त्याच्या चांगल्या कृत्यामुळे लोकांच्या हृदयात वस्ती करेल.
२.      ख्रिस्त लोकांना सूचित करतो व स्पष्ट शब्दांत त्यांस सांगतो, “मनुष्याने सर्व जग मिळविले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ?” जर मनुष्य सर्व कमावून स्वतःची शांती हिरावून बसत असेल तर त्या संपत्तीचा काय लाभ?
शेवटी ख्रिस्त विचारतो, “अदलाबदल म्हणून मनुष्य स्वतःच्या आत्म्यासाठी काय देईल?” कारण जगात कोणीही आपल्या स्वतःच्या जीवाची किंमत देऊ शकत नाही म्हूनच चांगले जीवन जगणे खूप महत्वाचे आहे, असे ख्रिस्त आपणास सांगतो.

बोधकथा:

एकदा एक व्यक्ती आपल्या स्वतःच्या छायेपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होता. त्याला स्वतःची छाया सुद्धा बघायची नव्हती, म्हणून त्याने खूप प्रयत्न व अनेक चालाखीच्या गोष्टी केल्या. तो दाही दिशेने धावला परंतु हे सर्व करून सुद्धा त्याला यश प्राप्त झाले नाही. शेवेती तो एका ऋषी-मुनी कडे गेला आणि त्याची समस्या त्या ऋषीला सांगितली. तेव्हा तो ऋषी त्याला हसत-हसत म्हणाला, “माझ्या मुला तू जाऊन कुठल्याही मोठ्या झाडामागे स्वतःला लपवून घे”. त्या व्यक्तीने ऋषी-मुनीने सांगितल्याप्रमाणे झाडामागे जाऊन लपला आणि लगेच त्याची छाया त्याच्या पासून गायब झाली.
(ह्या व्यक्तीप्रमाणे आपण सुद्धा दु:खाच्या छायेपासून लांब जाण्याचा प्रयत्न करतो परंतु जर आपल्याला यश मिळवायचे असेल तर आपल्याला ख्रिस्ताच्या दु:खमय छायेत जाऊन उभे रहायला लागेल).

मनन चिंतन:

आत्मत्यागाचे आमंत्रण: एका कवीने असे म्हटले आहे की, सर्वजण सु:खात तुमच्या बरोबर असतील पण दु:खात ते तुम्हांला ओळखणार सुद्धा नाहीत. जेव्हा आपण आनंदात असतो तेव्हा आपले मित्र खूप असतात पण जेव्हा दु:ख आपल्या सोबत असते तेव्हा आपले मित्र आपल्यापासून दुरावतात कारण त्यांना आपले सु:ख पाहिजे, दु:ख नको. जीवनात आनंदाचे अमृत पेय पिण्यास खूप लोक सोबतीस  असतात परंतु दु:खाचा कडू प्याला आपणा एकट्यास प्यावयास लागतो. जेव्हा आपण ह्या जगातील आनंदाच्या मागे धावतो तेव्हा आपण तात्पुरत्या मिळणा-या आनंदामागे धावत असतो आणि हा आनंद फक्त काही क्षणभर आपल्याबरोबर असतो.
आजच्या पवित्र वाचनात आपणांस अशी व्यक्ती भेटते की, जी व्यक्ती आपल्याला ‘दु:खे घ्या आणि सु:ख मिळवा’ असा उपदेश करते आणि ती व्यक्ती म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त होय. आपला क्रुस उचला आणि जीवन मिळवा, आपले जीवन द्या आणि अमर व्हा. दु:खाशिवाय जीवन नाही, संसार दु:खाची खाण आहे आणि हे सर्व आपण कधीच नाकारू शकत नाही किंवा टाळू शकत नाही म्हणूनच ह्या दु:खाना सामोरे जाणे हेच ह्या दु:खाचे उत्तर आहे. आपण हे विसरायला पाहिजे नाही की, दु:खाच्या प्रत्येक काळ्या घटनेनंतर आशेचा सूर्य सदा चमकत असतो कारण दु:ख हिच विजयाची आणि यशाची पहिली पायरी आहे.
आज येशू ख्रिस्त अमर जीवन व खरी सु:ख-शांती बद्दल आपणांस सागत आहे. जेव्हा आपण क्रुसाकडे बघतो तेव्हा ते आपल्याला अपमानाचे चिन्ह वाटते कारण क्रुस हे शिक्षा देण्यासाठी वापरलेले उपकरण(साधन) आहे त्याचप्रमाणे क्रुस दु:खाचे प्रतिक आहे आणि हाच क्रुस मरणाचे सुद्धा साधन आहे. अनेक वेळा क्रुसाबद्दल असेच विचार असतात कारण खुद्द येशू ख्रिस्ताला ह्याच क्रुसावर मरण सोसावं लागल आणि ते सुद्धा दोन चोरांमध्ये. मनुष्याच्या विचारात क्रुस अपमानाचा प्रतिक होता परंतु ख्रिस्ताने क्रुसाला महिमेचे व गौरवाचे चिन्ह म्हणून आपणासमोर ठेवले. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे हा क्रुस आपल्या तारणाचे प्रतिक व विजयाचे चिन्ह म्हणून आपणांस आदर्श बनला. खर तर वादळ-वा-या नंतरच शांती आपणांस जाणवते, अंधारानंतर प्रकाश आपल्या दृष्टीस पडतो, दुखानंतर सु:ख येते आणि ज्याप्रमाणे पाऊस व सूर्याची किरणे मिळून इंद्रधनुष्य बनतो त्यापमाणे आपले जीवनसुद्धा सु:ख आणि दु:खाने बनलेले आहे. आपले जीवन सु:ख, दु:ख, चांगुलपण, वाईटपण, अंधार आणि उजेड ह्या घटकाने बनलेले आहे. जेव्हा आपण संकटांना सामोरे जातो तेव्हा आपण मजबूत होत असतो. आपला स्वतःचा क्रुस आपण वाहिला पाहिजे व सर्व लोकांसमोर आदर्श ठेवला पाहिजे, तसेच जीवन ज्याप्रमाणे आपल्यासमोर येते त्याप्रमाणे आपण ते स्वीकारले  पाहिजे व नक्कीच आपला हा जीवनाचा क्रुस वाहताना ख्रिस्त आपल्या बरोबर असेल.

श्रद्धावंतांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक.
१. आपले पोप फ्रान्सीस, बिशप, धर्मगुरू आणि व्रतस्त जीवन जगणा-या सर्वांना प्रभूची कृपा लाभावी व त्यांनी स्विकारलेल्या जीवनात त्यांना स्वतःला नाकारण्यास व परमेश्वराच्या पावलावर पाऊल टाकून चालण्यास मदत मिळावी, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
२. आपल्या धर्मग्रामातील सर्व लोकांवर ख्रिस्ताचा आशीर्वाद यावा व स्वतःला नाकारून जगातील आनंदापासून वंचित राहून जागतिक मोहमायेचा त्याग करून आपण शुभवर्तमानाच्या मुल्यांप्रमाणे जगावे, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
३. जे लोक आजारपण, दुख, कष्ट, कठीण कसोटीच्या प्रसंगांनी त्रस्त झालेले आहेत, त्यांना दुख सहन करण्यासाठी धैर्य आणि सहनशक्ती मिळावी व परमेश्वराची स्तुती करण्यास ते सतत सज्ज असावेत, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
४. सर्व युवक-युवतींनी जगातील आनंदाच्या मागे न धावता शुभवर्तमानातील ख्रिस्ताने दिलेल्या मुल्यांप्रमाणे त्यांचे जीवन जगावे, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
५. आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
                 
    
    

  

     


   

1 comment: