Tuesday 19 August 2014

Reflections for the homily by: Amol Gonsalves.

सामान्य काळातील एकविसावा रविवार






पहिले वाचन:- यशया २२:१९-२३
दुसरे वाचन:- रोमकरांस पत्र ११:३३-३६
शुभवर्तमान:- मत्तय १६:१३-२०

“आपण ख्रिस्त, जिवंत देवाचे पुत्र आहात!”
प्रस्तावना:
     स्वर्गीय पित्याने दिलेले कार्य पूर्ततेस आणण्यासाठी ख्रिस्ताने बारा प्रेषितांची निवड केली. आपल्या शिष्यांना आपण कोण आहोत ह्याची जाणीव आहे की नाही, ह्याविषयी ख्रिस्ताच्या मनात आस्ता होती. आजच्या शुभवर्तमानात आपण पेत्राने ख्रिस्त हा जिवंत देवाचा पुत्र असल्याची दिलेली कबुली ह्याविषयी ऐकतो.
     दुस-या वाचनात संत पौल आपल्यासमोर देवाच्या प्राविण्याचे व वैभवाचे गीत सादर करतो. यशया संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात आपण, ‘राजा हिल्कीया ह्याचा पुत्र एल्याकिम हा आपल्याला दिलेली राज्यसत्ता कशी चालवेल’ ह्याविषयी ऐकतो.
आपण आपल्या जीवनात ख्रिस्ताला कोणत्या प्रकारचे स्थान देतो? व आपण ख्रिस्ताला कोणत्या दुष्टीकोनातून पाहतो? अश्या महत्वपूर्ण प्रश्नावर मनन-चिंतन करण्यास आजची पवित्र उपासना आपल्याला आमंत्रण देत आहे, ह्यासाठी लागणारी शक्ती व सामर्थ्य आपण परमेश्वर देवाकडून ह्या मिस्साबलीदानात मागूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन:
परमेश्वर देवाने तारणासाठी निवडलेल्या “इस्राएल” राष्ट्रावर अनेक अशा राजांनी राज्य केले. ह्यातील काही राजे स्वदेशी होते, तर काही राजे परदेशी होते. काही राजे चांगले होते तर काही राजे वाईट होते.
आजच्या पहिल्या वाचनात देखील, यशया संदेष्टा “शेबना” ह्या वरिष्ठ-कारभारी विषयी वृतांत मांडत आहे. अस्शुराचा राजा सन्हेरीब ह्यांचा प्रतिनिधी ख-शाके ह्याच्याबरोबर विचारविनिमय करण्यासाठी यहुद्यांचा राजा हिल्कीयाने जे त्रि-सदस्यीय शिष्यमंडळ पाठवले होते, त्याचा तो प्रमुख होता. “शेबना” हा इजिप्तची बाजू घेणा-या पक्षातील एक नेता होता.
यशायाच्या वृतांतावरून ‘एल्याकिम’ हा शेबनाच्या जागी येणार आहे व आपली सत्ता गाजविणार आहे असे स्पष्ट दिसून येते. यशया अध्याय ३६:३ मध्ये आपल्याला ह्या दोन्ही व्यक्तींचा उल्लेख केल्याचे दिसून येते. येथे एल्याकिमला बढती मिळून तो शेबनाचा वरिष्ठ झाल्याचे दिसून येते. हिल्कीयाचा पुत्र एल्याकिमला बोलावून त्याला जागा व सत्ता बहाल करील व तो यरुशलेमकरांचा व यहुद्यांच्या घराण्याचा पिता होईल असे दिसून येते.
पुढे यशया संदेष्टा “दाविदाच्या घराण्यातील किल्ली” ह्या गोष्टीचा उल्लेख करतो. हा उल्लेख जबाबदारीच्या दृष्टीकोनातून केला गेला आहे. त्याकाळी व आजदेखील ‘किल्ली’ किंवा ‘चावी’ ही एक महत्वाची वस्तू मानली जाते. ‘किल्ली’ ही कमरपट्ट्याला लटकवली जात असे किंवा साखळीला अडकवून खांद्यावर टाकली जात असे. वचन बाविसावे ह्या गोष्टीचे स्पष्टीकरण करते. येथे किल्लीबरोबर देवाने आपल्याला दिलेल्या जबाबदारीवर भर दिला गेला आहे.
यशया संदेष्टा ‘बंद करणे’ किंवा ‘उघडणे’ ह्या शब्दांचा वापर करतो. येथे ह्या शब्दाचा अर्थ “निर्णय घेण्याचा अधिकार असणे” असा होतो. ह्या निर्णयात फेरबदल करण्याचा अधिकार कोणाला नसून तो फक्त राजाला आहे असे नमूद करण्यात आले आहे.
नव्या करारात ख्रिस्ताने पेत्राला व पहिल्या ख्रिस्तीमंडळींना सोपवून दिलेल्या कामगिरीची ही पार्श्वभूमी आहे (मत्तय १६:१९; १८:१८).

दुसरे वाचन:
संत पौलाने रोमकरांस पाठविलेल्या पत्रातून घेतलेल्या आजच्या दुस-या वाचनात आपल्याला देवाच्या चांगुलपणाविषयी, दयेविषयी व ममतेविषयी भास होतो. जरी देव आपल्याहून कितीही पटीने महान, श्रेष्ठ असला व त्याचे मन कितीही अदभूत असले तरी त्याच्या चांगुलपणाचा व दयेचा हात सदोदीत आपल्यावर असतो असे संत पौल आपल्याला येथे कळवून देतो.
मानवाच्या तारणाचा इतिहास जर आपण पडताळून पाहिला तर आपल्याला दिसून येईल की; तारणासाठी निवडलेल्या लोकांनी देवाच्या आज्ञा मोडल्या, ते त्याच्या प्रेमाविरुद्ध गेले. यहूदी लोकांनी तर देवाचा व ख्रिस्ताचा धिक्कार केला. तरीदेखील देवाने मानवावर अखंड प्रीती केली व त्यांच्या तारणासाठी स्वतःच्या पुत्राला खंडणी म्हणून पाठविले.
ह्यास्तव; संत पौल देवाच्या अनंत उपकाराबद्दल, देणगीबद्दल, महान हृदयाबद्दल देवाची स्तुतिगीत गात म्हणतो; “देवाची बुद्धी, ज्ञान व संपत्ती किती प्रचंड आहे. तो जे काही ठरवितो ते मनुष्यांच्या ठरावापेक्षा श्रेष्ठ व अचूक आहे. देवाने आपले मार्ग आम्हांला समजावून सांगितल्याशिवाय आपल्याला कधीच ते समजणार नाहीत”. हे सत्य यशया संदेष्टा सुद्धा चाळीसव्या अध्यायातील तेरा ते चौदा ओवीमध्ये नमूद करतो.
संत पौल पुढे म्हणतो; आपण देवाला काही दिले नाही. मग! आपण देवाकडून लागेल तसे घेऊ शकतो का? तरीदेखील देव सर्व गोष्टींचा उगम आहे. त्याने सर्व काही निर्माण केले आहे व सर्वकाही त्याच्याचठायी आहे. अश्या या थोर देवाला सदोदीत मान, सन्मान व गौरव द्या.

शुभवर्तमान:
आजच्या शुभवर्तमानात आपण पेत्राने ख्रिस्त हा जिवंत देवाचा पुत्र असल्याची दिलेली कबुली ह्याविषयी वृतांत ऐकतो. यहूदी लोकांनी ख्रिस्ताला संपूर्णरीत्या ओळखले नव्हते. त्यांच्या मते त्यांचा “तारणारा” हा एक वैभवशाली, बलवान राजा असेल जो त्यांना राजकीय व धार्मिक स्वातंत्र्य प्राप्त करून देईल व सर्व दुष्ट राजांच्या बंदिवासातून सुटका करील.
आपल्या चांगल्या कार्यामुळे ख्रिस्त प्रेमळ, दयाळू, ममताळू व चांगला आहे, तो थोर व अनेक संदेष्ट्यापैकी तो एक संदेष्टा आहे असे मानले. परंतु! तो सर्वात चांगला आहे. सर्व मानवजातीत श्रेष्ठ व सर्वोच्च संदेष्टा व खुद्द देवाचा परमप्रिय पुत्र आहे असे यहूदी लोकांनी मानले नाही.
त्यामुळे जेव्हा ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना विचारले; ‘मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून ओळखतात?’ त्यावर त्यांनी अनेक प्रकारची उत्तरे दिली. कित्येकजण आपल्याला बाप्तिस्मा करणारा योहान, काही यिर्मया तर कित्येकजण संदेष्ट्यातील कोणी एक असे म्हणून ओळखतात, ह्या उत्तरावरून लोकांना आपली खरी ओळख न झाल्याचे ख्रिस्ताला कळून आले. आपल्या शिष्यांना आपली खरी ओळख झाली आहे की नाही हे पाहण्यासाठी ख्रिस्ताने त्यांना विचारले, “तुम्ही मला कोण म्हणून ओळखता?” तेव्हा पवित्र आत्म्याच्या शक्तीने प्रेरित होऊन पेत्र म्हणाला, “तुम्ही ख्रिस्त, जिवंत देवाचे पुत्र आहात (मत्तय १६:१६-१७)”. देवाने नेमलेला व अभिषेक केलेला याजक, राजा व संदेष्टा आहात. पेत्राने मानवी शक्तीमुळे नव्हे तर स्वर्गीय पित्याच्या प्रेरणादायी आत्म्याच्या सामर्थ्याने उत्तेजित होऊन, ख्रिस्त कोण आहे ह्याची कबुली सर्व मानवजातीला करून दिली. तोच! पेत्र ज्याला खडक म्हणून गणले गेले होते तो पुढे ख्रिस्तसभेचा भक्कम असा आधारस्तंभ व पाया बनला. ज्यावर ख्रिस्ताने आपली संपूर्ण ख्रिस्तसभा उभारली.
पुढे शुभवर्तमानात नमुद केल्याप्रमाणे ‘ख्रिस्ताने पेत्राला स्वर्गाच्या किल्ल्या बहाल केल्या व जे काही पृथ्वीवर बांधले जाईल ते स्वर्गात बांधले जाईल व जे काही पृथ्वीवर मोकळे केले जाईल ते स्वर्गात मोकळे केले जाईल असे अभिवचन दिले’. ह्याचा अर्थ असा होतो की; “ख्रिस्ताने आपल्या राज्याची संपूर्ण जबाबदारी पेत्रावर सोपवली”. ख्रिस्ताला ठाऊक होते की, त्याला ह्या जगातून निघून आपल्या पित्याकडे परतायचे होते. ह्यास्तव; पेत्राला आपल्या राज्याचा उच्चीत अधिकारी बनवून, जगात देवाचे कार्य पुढे चालविण्यासाठी व सुवार्तेची घोषणा जगभर पसरविण्यासाठी ख्रिस्ताने त्याला मानवी मध्यस्थीचा व मदतीचा उगमस्थान बनवले.
शुभवर्तमानाच्या शेवटी आपण पाहतो; ख्रिस्ताने आपली ओळख गुपित ठेवण्यास सांगितले. ह्याचे कारण म्हणजे, ‘ख्रिस्ताच्या प्रकटीकरणाची वेळ अजून आली नव्हती व त्याचे कार्य अजून शिल्लक होते’. मनुष्यांच्या पुत्राने अनेक हाल-अपेष्टा सहन करून क्रुसावर मरावे व मानवजातीचे तारण करावे ह्या सत्य घटनेचा स्विकार करण्यासाठी ख्रिस्ताचे शिष्य अजून तयार नव्हते. त्यामुळे त्यांना गोंधळात न पडता हळुवारपणे सर्व गोष्टींचा त्यांनी स्विकार करावा व सुवार्तेच्या प्रसारासाठी आपले जीवन अर्पण करावे ह्यासाठी ख्रिस्ताने आपली ओळख कोणालाही व कळविण्यास आपल्या शिष्यांस सांगितले.

बोधकथा:
काही वर्षा अगोदर ताबोर रिट्रीट आश्रमामध्ये एक विशिष्ट प्रकारचे शिबीर आयोजित करण्यात आले होते. हे शिबीर तीन दिवसांसाठी भरविण्यात आले होते व ह्या शिबिरासाठी अनेक नामांकित प्रवक्त्यांना बोलविण्यात आले होते. धर्म, जात-पात, संस्था, ठिकाण, रंग ह्यांच्या ह्या शिबिराबद्दल काहीच संबंध नव्हता. श्रीमंत, गरीब सर्वांसाठी हे शिबीर आयोजित करण्यात आले होते.
दुसरे वैशिष्ट म्हणजे; ह्या शिबिरामध्ये अनेक प्रकारचे हिलींग (Healing) सेशन ठेवण्यात आले होते. मानसिक, शारीरिक, वैयक्तिक, मनोविकारांवर हिलींग सेशन योजिले गेले होते. लोकांचा उत्तम प्रतिसाद होता. शिबिराच्या अखेरच्या दिवशी ज्यांनी-ज्यांनी हिलींग अनुभवले असेल व ज्या शक्तीच्या सामर्थ्याने ते अनुभवले असेल त्याविषयी त्यांनी साक्ष द्यायची होती.
पवित्र आत्माच्या प्रेरणेने, सतत प्रार्थनेने व विश्वासाने अनेक लोकांना हिलींगचा अनुभव येत होता. अनेकांची मानसिक, शारीरिक व वैयक्तिक आजारापासून सुटका होत होती. लोकांना नवजीवनाचा अनुभव येत होता. लोक आनंदित होती.
ठरविल्याप्रमाणे शिबिराच्या अखेरच्या दिवशी हिलींग विषयी साक्ष देण्याची वेळ आली होती. अनेकांनी सर्वसंमत, एकमुखी “ख्रिस्ताच्या दैवी शक्तीने आपण हिलींग अनुभवल्याचे मान्य केले”. देवाला धन्यवाद देत व देवाचा महिमा गात प्रवक्ताने लोकांसमोर एक वेगळ्याच प्रकारचा प्रश्न मांडला, “मला मान्य आहे की ख्रिस्ताच्या शक्तीने व पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आपण हिलींग अनुभवत आहोत. परंतु! हा ख्रिस्त कोण आहे? त्यांचे आपल्या जीवनात काय स्थान आहे?” हे प्रश्न ऐकून थोडा वेळ त्या हॉलमध्ये थोड्या वेळासाठी शांतता पसरली. सर्वजण थक्क झाले व काय उत्तर द्यावे ह्यावर विचार करू लागले. तेवढ्यातच एका अन्य धर्मीय बांधवाने ज्याने मानसिक हिलींग अनुभवली होती, उद्गारून म्हणाला, “प्रभू येशू ख्रिस्त हा खरा जिवंत देवाचा पुत्र आहे व मानवाच्या उद्धारासाठी व तारणासाठी तो या धरतीवर आला”. त्यांचे आपल्या जीवनात प्रथम स्थान आहे. ख्रिस्तच आपल्या जीवनाचा उगम व अंत आहे. होय! त्या अन्य धर्मीय बांधवाने ख्रिस्ताची खरी ओळख सर्वांपुढे मांडली.

मनन चिंतन:
ख्रिस्त ह्या पृथ्वीवर आपल्या स्वर्गीय पित्याचे राज्य प्रस्थापीत करण्यासाठी अवतरला होता. आपले हे कार्य पूर्ण करण्यासाठी ख्रिस्ताने बारा प्रेषितांची निवड केली. हे प्रेषित वेगवेगळ्या घराण्यातून आले होते. त्यांचे आचार-विचार वेगळे होते, त्यांचे धंदे भिन्न-भिन्न प्रकारचे होते. परंतु! ख्रिस्तासमवेत ते एक होते. एका मनाचे व एका हृदयाचे होते.
त्यातील; एक शिष्य म्हणजे “पेत्र” ज्याने “ख्रिस्त हा खरा कोण आहे”, ह्याविषयी साक्ष दिली. पेत्राचे मुळचे नाव शिमोन होते मात्र त्याला पेत्र किंवा केफास हे टोपण नाव देण्यात आके होते. ह्या नावाच अर्थ ‘खडक’ किंवा ‘शीला’ असा होतो. पेत्र हा गालील प्रांतातील कोळी होता. आंद्रेय त्याचा भाऊ होता. जरी योहान हा येशूचा ‘प्रिय शिष्य’ मानला गेला तरी पेत्र ह्या खडकावर येशूने आपली ख्रिस्तसभा उभारण्याचे ठरविले होते. बारा प्रेषितांमध्ये पेत्राचे स्थान सर्वोच्च आहे.
जब्दीची मुले योहान, याकोब व पेत्र हे येशूच्या आतल्या गोटातले शिष्य होते. फक्त त्यांनाच घेऊन येशू याईराच्या घरी गेला व तेथे त्याने त्याच्या मुलीला जिवंत केले. येशूचे रुपांतर झाले तेव्हादेखील हे तीन शिष्य येशूबरोबर हजर होते. गेथसेमनी बागेच्या आतल्या भागात येशूबरोबर जाणारे सुद्धा फक्त हे तिघे होते. येरुशलेमेत प्रवेश करण्यासाठी खेचर आणायला येशूने पेत्र व योहानाला पाठविले होते. येशूच्या रिकामी कबरेला सर्वप्रथम भेट देण्यासाठी पेत्र पुढे सरसावला होता. येशूच्या पुनरुत्थानानंतर शिष्यांना एकत्र करून त्यांच्या मनातील भयगंड दूर सारून देवाच्या राज्याची सुवार्ता पसरविण्यासाठी शिष्यांना प्रेरित करण्यासाठी पेत्राने सिंहाचा वाटा उचलला होता.
येशूचा जाबजबाब घेतला जात असताना येशू हाच ख्रिस्त देवाचा पुत्र आहे, असे त्याने मोठ्या धैर्याने सांगितले होते. मात्र हे त्याचे धैर्य थोड्याच काळात गळून पडले व त्याने येशूला तीन वेळा नाकारले.
जेव्हा जब्दीचा मुलगा याकोब ह्यास हेरोद अग्रिप्पा पहिला ह्याने अटक करून देहदंडाची शिक्षा दिली, तेव्हा पेत्रालाही अटक झाली होती. मात्र देवदूताने त्याची तुरुंगातून सुटका केली. पहिल्या पेन्टेकॉस्टच्या वेळी त्याने येरुशलेमातील ख्रिस्ती मंडळीला आपला अधिकार उघडपणे दाखवून दिला. त्याने अनेक चमत्कार केले. प्रेषित कार्यासाठी यहुदीया व सिरीयाचा प्रवास केला, यहूदेतर लोकांना सुंता न करता ख्रिस्ती धर्मात घेण्यात यावे, ह्या पौलाच्या मागणीला त्याने पाठिंबा दिला. शेवटी इ.स. ६४ ला रोममध्ये त्याला क्रुसावर उलटे टांगवून मारण्यात आले. त्याची रोममधील कबर अधीकृत असल्याची घोषणा पोपनी १९६८ मध्ये केली.
अश्या ह्या धाडशी व खंभीर पेत्राकडून आपल्याला बरेच काही शिकता येईल. जरी तो जीवनात ख्रिस्ताची खरी ओळख पटवून घेण्यास ब-याचवेळी असमर्थ ठरला तरी देखील त्याने शेवटपर्यंत अथांग परिश्रम करून ख्रिस्ताची खरी ओळख जाणून घेण्यास प्रयत्न केले. त्यामुळे; पेत्राने ख्रिस्ताविषयी दिलेली साक्ष आपल्या ख्रिस्ती विश्वासाचे एक भक्कम उदाहरण बनले आहे.
जेव्हा आपण ख्रिस्त हा जिवंत देवाचा पुत्र आहे असे आपल्या जीवनात स्विकारतो व आपल्या कृतीद्वारे जगापुढे मांडतो. तेव्हा आपण आपल्या ख्रिस्ती-विश्वासात वाढत असतो. परंतु! ब-याचवेळी आपल्या जीवनात आलेल्या दु:खामुळे, संकटांमुळे, गरिबीमुळे, आजारपणामुळे आपला ख्रिस्ती विश्वास डळमळत असतो. देव खरोखर आहे का? तो आपली काळजी घेतो का? ह्या सर्व गोष्टींपासून माझी सुटका होईल का? असे अनेक प्रश्न आपल्याला भेडसावत असतात. कधी-कधी ह्या सर्व गोष्टींमुळे आपण आपल्या विश्वासात खचून जातो. ख्रिस्ताच्या ख-या ओळखीपासून आपण वंचित राहतो. ख्रिस्त माझा तारणारा माझी सुटका करील की नाही ह्या भावनेची खिन्नता आपल्या मनात उगवते. परंतु! आपण जर पेत्रासारखे, “ख्रिस्त हा जिवंत देवाचा पुत्र आहे”, तो माझा तारणारा व माझा आधारस्तंभ आहे, ह्यावर विश्वास ठेवला तर आपले तारण दूर नाही.
यहुदी लोकांच्या ख्रिस्ताविषयी अपेक्षा निराळ्या होत्या. त्यांचे अंदाज निराळे होते. खुद्द शिष्यांचे येशूविषयी आशा-आकांक्षा निराळ्याच होत्या, पण! पेत्राचा अंदाज अचूक होता. अंर्तज्ञानानी प्रेरित होऊन ख्रिस्त कोण आहे ह्याविषयी त्याने साक्ष दिली.
ख्रिस्ताने पेत्राला अधिकार दिले, ते अधिकार सत्ता गाजविण्यासाठी नव्हे तर सेवा करण्यासाठी दिले होते, देवाच्या लेकरांस ख्रिस्तासमवेत एक आणण्यासाठी दिले होते. ख्रिस्ताने अधिकाराबरोबर अनेक जबाबदा-या देखील दिल्या. ज्यांच्या जीवनात येशूचा खरं-खुरा अनुभव येतो तो स्वतःसाठी न राहता दुस-यासाठी आपले आयुष्य खर्चीत करत असतो. पेत्राने देखील ख्रिस्तसभेच्या उभारणीसाठी आपले आयुष्य खर्चीत केले.
आज ख्रिस्तसभा आपल्याला लीन होण्यास बोलावत आहे. मिळालेल्या सत्तेचा व अधिकाराचा वापर दुस-याच्या फायद्यासाठी व चांगुलपाणासाठी करावयास ख्रिस्तसभा पेत्राद्वारे आमंत्रण देत आहे. ह्याचा आपल्याला स्विकार करता यावा, म्हणून आज देवाकडे प्रार्थना करू या.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे परमेश्वरा दया कर आणि तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.
  1. आपले परमगुरुस्वामी, फ्रान्सिस व महागुरुस्वामी यांना त्यांच्या कामात प्रभूचा सतत आधार लाभावा व त्यांच्या नेतृत्वाखाली अखिल ख्रिस्तसभेची प्रगती होत रहावी, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
  2. संत पेत्राने जसे “ख्रिस्त प्रभू हा ख-या जिवंत देवाचा पुत्र आहे” ह्याविषयी सर्व मानवजातीसमोर साक्ष दिली त्याचप्रमाणे आपणदेखील आपल्या कार्यातून व कृतीतून जगापुढे आपण ख्रिस्ताचे खरे अनुयायी आहोत ह्याची ग्वाही द्यावी, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
  3. आपल्या देशाचा कारभार सांभाळण्यासाठी जे राज्यकर्ते आपण नेमून दिले आहेत, त्यांना प्रभूचे विशेष मार्गदर्शन लाभावे व त्यांनी सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून जनतेचे प्रश्न सोडवावेत व प्रगतीसाठी झटावे, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
  4. आजच्या तरुण पिढीला जीवघेण्या स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे. प्रसंगी ती निराश होत आहेत, आपल्या विवेकबुद्धीला अनुसरून त्यांनी मार्गक्रमण करीत रहावे, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
  5. आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक हेतूसाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.                         

2 comments: