Wednesday 1 April 2015


Reflections for the Homily on Easter Sunday (05/04/2015)
By Baritan Nigrel.







पुनरुत्थान रविवार 
(पास्काचा सण)

दिनांक: ०५/०४/२०१५.
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये १०:३४अ ३७-४३
दुसरे वाचन: कलस्सैकरांस पत्र: ३:१-४
शुभवर्तमान: योहान २०:१-९





“तो उठला आहे.”




प्रस्तावना:

आज आपण प्रभू येशूचे पुनरुत्थान म्हणजेच पास्काचा सण साजरा करत आहोत. येशू ख्रिस्ताने क्रूसावरील मृत्युद्वारे आपल्यासाठी पापांची क्षमा मिळवली व तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित होऊन त्याने आपल्यासाठी पवित्र आत्माचे नवजीवन प्राप्त करून दिले.
पहिल्या वाचनात पेत्र ज्यांनी ख्रिस्ताची सुवार्ता ऐकली नाही व जे खऱ्या जिवंत देवाविषयी उत्सुक आहेत त्यांना प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देतो. दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला आपले लक्ष स्वर्गीय येशू ख्रिस्तावर केंद्रित करण्यास सांगत आहे. कारण प्रभू येशूने मृत्यूवर व जगावर विजय मिळविला आहे. तो मरणांतून उठला आहे हे आजच्या शुभवर्तमानात ऐकतो.
ख्रिस्ती जणांना मृत्यू हा जीवनाचा शेवट नाही, तर येशूने पुनरुत्थानाद्वारे  . मृत्यवर विजय मिळवला आहे. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपले पुनरुत्थान होणार आहे, अशी श्रद्धा प्रत्येक ख्रिस्ती माणसाची असावी. आपली ही पुनरुत्थित येशुवरील श्रद्धा अधिकाधिक दृढ व्हावी म्हणून आजच्या मिस्साबालीदानामध्ये प्रार्थना करूया

सम्यक विवरण:

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये १०:३४अ ३७-४३

पहिल्या वाचनात पेत्र लोकांना प्रभू येशू ख्रिस्त हा सर्वांचा प्रभू आहे व तो आपल्या सर्वांचा तारणारा आहे ह्याविषयी साक्ष देतो. पेत्राच्या भाषणात येशू ख्रिस्ताचे जीवन आणि सेवाकार्य याविषयीचे अधिक तपशील दिले आहेत. पेत्र लोकांना सांगतो जरी त्यांनी ख्रिस्ताला खांबावर टांगून मारले (३९) तरी देवाने त्याला तिसऱ्या दिवशी उठवले (४०); कारण देवाची कृपा त्याच्याबरोबर सदैव होती आणि देवाने त्याला पवित्र आत्म्याने व सामर्थ्याने अभिषिक्त केले होते. ज्या लोकांनी पेत्राचे ऐकले त्यांच्यावर पवित्र आत्मा उतरला व त्यांच्यासाठी तारणाचे दार खुले झाले. प्रभू येशू हा देवाने नेमलेला जीवितांचा व मेलेल्यांचा न्यायाधीश आहे (४२). जो कोणी ख्रिस्ताचा स्वीकार करतो त्याला पापांची क्षमा मिळते (४३).

दुसरे वाचन: कलस्सैकरांस पत्र: ३:१-४

कलस्सैकरांना ख्रिस्ताबरोबर केव्हाच उठवलेले आहे, हा मुद्दा संत पौल येथे मांडत आहे. आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या जीवनात सहभागी झालो आहोत म्हणून आपली मने व आपली आस्था ख्रिस्तावर केंद्रित केली पाहिजे असे संत पौल सांगत आहे. येथे “वरील गोष्टीवर मन लावा” (२), म्हणजे ज्या गोष्टी दिसत नाहीत व सर्वकाळ टिकणाऱ्या आहेत त्या गोष्टीवर मन केंद्रित करा. प्रभू येशू ख्रिस्त आज आपल्याला दिसत नाही, म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवण्यास व त्याच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने जगण्यास संत पौल आज आपल्याला सांगत आहे.

शुभवर्तमान: योहान २०:१-९

अ) मरिया मग्दालीया:
पहाटे मरिया मग्दालीया कदाचित क्लेपाच्या पत्नीबरोबर येशूला बघण्यासाठी, येशूच्या कबरीकडे वाटचाल करण्यास निघाली. तिच्यासमोर भेडसावणारा एकच प्रश्न होता: “सीलबंद केलेली कबरीवरील शिळा आपल्यासाठी कोण बाजूला सारील म्हणजे मरणोत्तर सोपस्कार पूर्ण करण्यासाठी आपण आत कबरेत शिरू शकू?” येशूच्या कबरेची धोंड बाजूला सरकवलेली त्यांनी पहिली. कबर सनाड खुली होती आणि कबरीसमोर पहारेकऱ्यांचा मागमूसही नव्हता. आश्चर्याने व कुतूहलाने त्या आत गेल्या. कबर रिकामी होती. त्या भांबावून गेल्या. ही शुभवार्ता पेत्राला कळविण्यासाठी त्या तशाच धावल्या. मरिया मग्दालीया एकटीच कबरेजवळ होती (१) असे योहान सांगतो, तर मत्तय व मार्क तिच्याबरोबर इतरांचाही समावेश करतात. मरिया मग्दालीया जेव्हा पेत्राला सांगते, “प्रभूला त्यांनी नेले व कुठे ठेवले आहे हे ‘आम्हास ठाऊक नाही (२). ह्या तिच्या वाक्यावरून मरिया मग्दालीया एकटीच नव्हती हे कळते.

ब) पेत्र व योहान कबरेकडे धावत सुटले:
रिकाम्या कबरीची बातमी मरिया मग्दालीयाने देताच पेत्र व योहान कबरीच्या दिशेने धावत सुटले. योहान प्रथम कबरेजवळ गेला पण त्याने कबरेत प्रवेश केला नाही (३:५). पेत्र मागून येऊ पोहचला व सरळ कबरेत गेला. पेत्र ज्येष्ठ असल्यामुळे योहानाने आदरयुक्त भावनेने त्याला प्रथम कबरेत प्रवेश करू दिला.

   क)   त्याने पाहून विश्वास ठेवला:
आतल्या दालनाच्या मंचावर ठेवलेले येशूचे शव तेथे नव्हते. प्रेतवस्रे गुंडाळलेले व डोक्याला असलेला रुमाल एका बाजूला पडलेले पाहून योहानाने विश्वास ठेवला (८) की जसे त्याने सांगितले होते, तसा प्रभू येशू पुनरुस्थित झाला आहे. येशूने शिष्यांना दर्शन दिल्यानंतरच त्यांचा विश्वास अधिक वाढला व दृढ झाला, मात्र योहानाच्या विश्वासाचा उदय येथेच येशूला काबरेतून गायब असताना पाहून झाला, हे आपणास कळते.
                                                             
बोध कथा:

हेलन केलर ही अमेरिकेतील एक लहान मुलगी! त्यातल्या त्यात बालपणापासून ती आंधळी, मुकी व बहिरी होती. ही पिडा देवाने अशी का दिली, असे तिच्या आईवडिलांना वाटे. इतरांना तिची द्या येई, कारण सर्वांना वाटे की तिने असे जीवन जगण्याऐवजी एकदाच मेलेले बरे. सर्वांसाठी ती मेलेली होती. पण तिने कधीच देवाला विचारले नाही की, ‘देवा मला तू असे जन्माला का घातलेस?’. उलट तिचा देवावर विश्वास होता. तिच्याद्वारे देवाचा गौरव होणार आहे, असे तिला वाटे.
मी एके दिवशी बोलू शकेल असा तिचा दृढ विश्वास होता आणि ती बोलू लागली. तिने बोलण्यासाठी तोंडाचा व्यायाम सुरु केला. समुद्राच्या लाटांबरोबर ती मोठमोठ्याने हाका मारू लागली. बोलणे हेच एकमेव ध्येय डोळ्यांसमोर ठेवून तिने रात्रंदिवस सराव सुरु केला. तिच्या आवाजात फरक पडत गेला. तिने विविध क्षेत्रांत शिक्षण घेतले. अंधत्वाला घाबरून ती देवाला दोष देत बसली नाही, उलट तिने आपल्या अंधत्वावरही विजय मिळवला.
लोकांच्या नजरेत मेलेली ‘हेलन केलर’ आता पुन्हा जिवंत झाली. ती बोलू लागली. लिहू लागली आणि म्हणूनच १९६५ साली अमेरिकेच्या न्यूयॉर्क येथील विश्व-उत्सवात जगातील ‘सर्वोत्कृष्ट स्त्री’ म्हणून तिला मानांकित करण्यात आले.
पुनरुत्थित नवजीवन प्राप्त करून घेण्यासाठी अथक परिश्रम, दुःख व हालअपेष्टांना सामोरे जाणे आवश्यक असते. हेलन केलर हिने तिच्या जीवनाशी संघर्ष केला. प्रत्येकदिवस दुःख व हालअपेष्टा सहन केल्या म्हणूनच तिने अंधत्वावर विजय मिळवून एक इतिहास रचला.

मनन चिंतन:

‘येशू ख्रिस्त! ‘मृत्युंजयी’ झाला!
सृष्टीच्या नियमानुसार प्राणीवर्गाला जन्मानंतर मृत्यू हा शब्द अटळ आहे. मृत्यूबद्दल अनेक शास्रज्ञांनी संशोधन केले, परंतु मृत्यूला जिंकणे त्यांना शक्य झाले नाही. पृथ्वीतलावर अनेक पराक्रमी राजे होऊन गेले. सर्व जग जिंकण्याच्या पराकोटी इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी अनेक राज्येही जिंकली, परंतु त्यांनाही मृत्यूला शरण जावे लागले. साधू व संत यांनी योगसाधनेद्वारे, तपश्चर्येतून देवाजवळ पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न केला तरीही त्यांना मृत्युपुढे शरणागति पत्करावी लागली. अद्यापही या मर्त्य मानवाला मृत्युच्या अभिशापावर विजय मिळवता आला नाही.
प्रत्येक नियमाला अपवाद हा असतोच. निसर्गाच्या कालचक्राचा नियम मोडला गेला. मर्त्य मानवाविषयीचा मरणावरील पहिला आणि शेवटचा विजय झाला. तो ‘मृत्युंजयी’ झाला. ‘येशू ख्रिस्त! देवाचा पुत्र!’ सुमारे २००० वर्षापूर्वी या पृथ्वीतलावर मानवी देह धारण करून जन्माला आला. सृष्टी नियमाप्रमाणे तहान-भूक,  थंडी-ताप, आनंद-दुःख, कष्ट सर्व काही मानवीय शरीर रूपाने प्रभू मानवाशी एकरूप झाला, एकजीव झाला. त्यालाही एकच कारण होते – ‘मानवावरील प्रेम’! ज्या मानवाच्या प्रेमासाठी देव स्वर्गातून उतरून आपल्याशी एकरूप झाला, सुख-दुःखात सहभागी झाला, तोच मानव त्याच्यावर बंड करून उठला! केवढा हा दैव दुर्विलास!
आजाऱ्यांना बरे करणारा, आंधळ्यांना दृष्टी देणारा, बहिरे, मुके, लंगडे, भूतग्रस्त यांना त्यांच्या समस्येतून सोडवणारा येशू ख्रिस्त हा आपणावरही अधिकार गाजवणार या भीतीने राज्यकर्ते भयभीत झाले. त्यांनी ख्रिस्ताला ओळखले नाही; त्यामुळेच आपला अधिकार, राज्य वाचवण्यासाठी त्याच्याविरुद्ध त्यांनी अपप्रचार सुरु केला. तर धर्मपंडित, शास्री, पुरुषांचे महत्व कमी होऊ लागले होते, त्यांनाही आपल्या अधिकाराची, पदाची चिंता वाटू लागली होती, त्यामुळे त्यांनी जनतेत आपले वर्चस्व वाढविण्यासाठी प्रभूवर खोटे आरोप करणे सुरु केले. सैतानी खेळ सुरु झाला. देव-दानव युद्ध सुरु झाले. खोटे आरोप ठेवून क्रुसावर मरणदंडाची शिक्षा देण्यात आली.
येशूचे मरण तेथील राज्यकर्त्यांना, धर्मपंडित, शास्री पुरुषांना आनंदाची बातमी होती. मरण म्हणजे शेवट असा त्यांचा विश्वास होता. पुन्हा जुलूम, जबरदस्ती, अन्याय करण्यास त मोकळे झाले होते. जनता मात्र दुःखी झाली. आपला तारणहार आपल्याला सोडून गेला. सर्व संपले. मरणापुढे सर्वच नतमस्तक होतात! तेही झाले.
पण त्यांचे हे स्वप्न अल्पजीवी ठरले, सर्व काही क्षणभंगुर असे होते. मरण म्हणजे शेवट, मरण म्हणजे दुःख, मरण म्हणजे अंधकार या मरणावर प्रभू येशूने विजय मिळवला. तो मृत्युंजयी झाला. ‘मरणातून तिसऱ्या दिवशी उठला!’ जिवंत देवाने अंधकाराला हरवले. दुःखावर विजय मिळवला.
माणसे मरणातून पुन्हा जिवंत झालेली उदाहरणे आपल्या ऐकिवात आलेली आहेत. या विषयावर पुस्तकेसुद्धा उपलब्ध आहेत. येशूनेसुद्धा लाझरसाला व नाईमच्या विधवेच्या मुलाला जिवंत केले, पण ते कालांतराने मरण पावले. येशू क्रुसावर मरण पावला. पण तो पुन्हा मरणातून उठला किंबहुना देवापित्याने त्याला मरणातून उठवले. येशू पुन्हा मरण पावला नाही तर त्याला अमरत्व प्राप्त झाले आहे. हे ऐतिहासिक व सार्वकालीक सत्य आहे.
संत पाँलची येशूच्या पुनरुत्थानाविषयी शिकवण अतिशय स्पष्ट आहे. ख्रिस्त अशासाठी मरण पावला व पुन्हा जिवंत झाला की त्याने मेलेल्यांचा व जिवंतांचाही प्रभू असावे (रोमकरांस पत्र १४:९). येशू आजही आपल्याबरोबर आहे. संत इरेनिउस म्हणतात, ‘तुम्ही देव बनावे म्हणून देव माणूस झाला’, म्हणजेच आपण अमर व्हावे ही देवाची योजना आहे.  

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे परमेश्वरा पुनरुत्थित ख्रिस्ताद्वारे आमची मने संपन्न कर.
  1.  ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप महाशय, सर्व महागुरू, धर्मगुरू व व्रतस्थ बंधू व भगिनी जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करत आहेत, ह्या सर्वांना परमेश्वराचा आशीर्वाद लाभावा व त्यांनी देवाचे कार्य चालू ठेवून एक उत्तम जीवन जगावं म्हणून आपण प्रार्थना करूया. 
 2. मृत्युनंतर प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपले पुनरुत्थान होईल ही श्रद्धा प्रत्येक ख्रिस्ती माणसाच्या हृदयामध्ये दृढ व्हावी व दिवसेंदिवस आपण प्रभूच्या प्रेमात वाढावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
   3.    जे लोक ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाही, त्यांना पुनरुत्थित ख्रिस्ताचा अनुभव यावा, तसेच त्यांनी पापाच्या अंधकारातून प्रभूच्या प्रकाशात एक नवीन जीवनाला सुरुवात करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
   4.   आपल्या धर्मग्रामात जे लोक वेगवेगळ्या आजाराने ग्रासलेले आहेत त्यांना पुनरुत्थित प्रभू परमेश्वराच्या कृपेचा स्पर्श व्हावा आणि नवीन जीवनाची वाट त्यांना दिसावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

  5. आता थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. 















No comments:

Post a Comment