Monday 13 April 2015


Reflections for the Homily on the Third Sunday of the Easter (19/04/2015) By Suresh Alphanso








पुनरुत्थित काळातील तिसरा रविवार


दिनांक: १९/०४/२०१५
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये ३:१३-१५
दुसरे वाचन: १योहान २:१-५
शुभवर्तमान: लुक २४:३५-३८




प्रस्तावना:

आज आपण पुनरुस्थित काळातील तिसरा रविवार साजरा करीत आहोत. आजची वाचने आपल्याला प्रभू येशु ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे महत्व पटवून देतात.
प्रेषितांची कृत्ये यातून घेतलेल्या पहिल्या वाचनात आपण पेत्राचे शलमोनाच्या देवडीवरील भाषण ऐकतो. पवित्र आत्माने भरलेला पेत्र पुनरुत्थित प्रभू येशूची सुवार्ता पसरवितो. दुसऱ्या वाचनात योहान आपणास पापांपासून परावृत्त कसे व्हावे यासाठी सल्ला देतो. पुढे योहान म्हणतो की, जो कोणी देवाच्या वचनाप्रमाणे चालतो, त्यांच्यामध्ये देवाची प्रिती खरोखर पूर्णत्व पावली आहे. शुभवर्तमानात आपण पाहतो की, प्रभू येशु पुनरुत्थित झाल्यावर प्रथम दोन शिष्यांना अमाउसच्या वाटेवर दर्शन देतो जेणेकरून प्रभू पुनरुत्थित झाला आहे यावर त्यांनी विश्वास ठेवावा.
पुनरुत्थित प्रभू येशु आम्हा प्रत्येकाला त्याच्या पुनरुत्थानाची घोषणा आपल्या जीवनाद्वारे करण्यास पाचारण करत आहे. त्यासाठी लागणारी विशेष कृपा ह्या मिस्साबलीत मागुया.

सम्यक विवरण:  

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये ३:१३-१५

येशूने आपल्या अध्यात्मिक शक्तीचा वारसा शिष्यांना दिला होता. त्या सामर्थ्याने शिष्य चमत्कार करत होते. त्याचे श्रेय त्यांनी कधीच स्वतःकडे घेतले नाही. येशू ख्रिस्ताची नाळ ही जुन्या कराराशी जोडलेली होती. म्हणूनच पेत्राने आपल्या भाषणात पुनरुस्थित प्रभू येशूची सुवार्ता गाजवताना अब्राहम, इसहाक व याकोब ह्यांच्या बरोबर प्रभू येशूची तुलना केली; कारण पेत्राचा मुख्य हेतू हाच होता की, लोकांना येशूची खरी ओळख व्हावी व तो पुनरुत्थित झालेला होता, इतकेच नव्हे तर तो देवाचा एकुलता एक पुत्र होता ह्यावर विश्वास ठेवावा! म्हणूनच पेत्र पुढे म्हणतो की, “देवाचा सेवक ‘येशू’ ह्याचा तुम्ही गौरव केला आहे” त्याला तुम्हीच धरिले व पिलाताने त्याला सोडण्याचा निश्चय केला असता, त्याच्यासमक्ष तुम्ही त्याला नाकारले आणि खुनी, लुटारुची (बराब्बा) मागणी केली. तुम्ही देवाच्या पुत्राला म्हणजेच ‘जीवनाच्या अधिपतीला’ जिवे मारिले, पण देवाने त्याला मेलेल्यांमधून उठविले ह्यांचे आम्ही साक्षी आहोत.
पेत्राचे पत्र अध्याय ३ मधील भाषण हे अतिशय सुप्त व अनुभवी होते, कारण ह्यात शुभवर्तमानाचा संदेश घेण्यास जमावातील काही लोकांना लायक आणि काहीतरी घेण्यायोग्य होते. पश्चाताप करणे म्हणजेच देवाकडे वळणे होय. ज्यू लोकांनी येशूचा स्विकार करावा आणि मूर्तींना देव न मानता येशूचा ‘उद्धारक’ म्हणून स्विकार करावा असा उपदेश पेत्राने केला.

दुसरे वाचन: १ योहान २:१-५

योहानाच्या पहिल्या पत्रात २ अध्यायात योहान चांगल्या प्रकारे पत्राची सुरुवात करतो. अगदी नम्रपणे व सेवामय वृत्तीद्वारे सर्वांना शुभेच्छा देतो. विशेषकरून ह्या शुभेच्छांद्वारे तो मुलांना प्रेमळपणाने उपदेश करतो, म्हणून योहान आपल्या पत्रात ‘प्रिय मुलांनो’, ‘तरुणांनो’ व ‘बापांनो’ असे शब्द वापरतो; अशासाठी की त्याला वाचकांना तीन निराळ्या पत्राद्वारे त्याच्या आध्यात्मिक जीवनाचे सादरीकरण करायचे होते. योहान पत्राच्या सुरुवातीलाच नम्रपणे मुलांना उपदेश करताना म्हणतो ‘माझ्या मुलांनो तुम्ही पाप करु नये म्हणून मी हे तुंम्हास लिहितो’. या पत्राचा मुख्य गाभा म्हणजे ‘देवाची ओळख’, ज्ञान म्हणजे देवाची आज्ञा पाळणे होय. ‘प्रीती’ ह्या शब्दावर पत्रात योहानाने जास्त भर दिला आहे. आपण जर देवाला खरोखर ओळखत असलो, तर त्याचा आपल्या रोजच्या जीवनावर निश्चितच परिणाम होतो. देवाच्या आज्ञा पाळणे व त्याच्या वचनाप्रमाणे चालणे म्हणजेच त्याच्या मध्ये ‘देवाची प्रीती’ पूर्णत्वास येणे होय. जर आपण असे केले नाही तर आपण लबाड व आपल्याठायी सत्य नाही असे योहान सांगतो.

शुभवर्तमान: लुक २४:३५-३८

     लूकच्या शुभवर्तमानात २४ व्या अध्यायात ‘प्रभू येशूचे पुनरुत्थान’ ह्या उताऱ्यात आपण प्रभू जिवंत झाला आहे हे पाहतो. पुढे ‘अमाउस गावच्या रस्त्यावर येशूचे दोन शिष्यांना दर्शन’ हा उतारा खूप प्रसिद्ध आहे. प्रभू येशुने पुनरुत्थित झाल्यावर प्रथम दोन शिष्यांना अमाउसच्या वाटेवर दर्शन दिले ह्यासाठी कि, त्याच्या शिष्यांनी प्रभू जिवंत झाला आहे यावर विश्वास ठेवावा. पुढे ओवी ३६-३८. मध्ये ‘येशूचे प्रेषितांना दर्शन’ हे पाहतो. लूक आपणास येशु पुनरुत्थित झाल्यानंतर त्याचे, त्याच्या शिष्यांना दर्शन कसे दिले ह्या गोष्टी कथित करतो. ओवी ३६-२८ आपण पाहतो प्रभू येशु त्यांच्यामध्ये उभा राहिला व म्हणाला “तुम्हांला शांती असो” पण शिष्य घाबरले व भयभीत झाले, कारण त्यांना भूत आहे असे वाटले. परंतु प्रभुने त्यांच्या मनातले विचार ओळखुन धीर देत म्हटले, “तुम्ही घाबरलात? तुमचा प्रभू पुनरुत्थित झाला आहे हे पहा, जसे मला हाडमांस आहे तसे भुताला नसते”. त्यांचा जास्त विश्वास बसावा म्हणून प्रभुने मांसाचा भाजलेला तुकडा खाल्ला, नंतर त्यांनी प्रभूला ओळखले व विश्वास ठेवला.

बोधकथा

     श्री. सिल्वेस्टर व त्यांचे कुटुंबीय कधीच मिस्साला जात नसे. थोडी श्रीमंती असल्याने ते फार स्व-केंद्रित जीवन जगत होते. स्वत:मध्ये व कुटुंबियांमध्ये खूप मी-पणा होता. मूलगामी चळवळ सुरु झाल्यानंतर त्यांच्या गावकीतील सेवक नेत्यांनी त्यांना गावपातळीवर सुरु असलेल्या कार्यक्रमास येण्यास व मिस्साला जाण्याचे आग्रहाने सांगीतले, पण त्यांच्या मी-पणा व गर्वामुळे ते उडवाउडवीची उत्तर देत. ‘लोक देवळात जाऊन काय फायदा करतात मला माहित आहे, तुम्ही आले मोठे मला शिकवायला’? वैगेरे उत्तर देऊन सेवक-नेत्यांची विनंती धुडकावून त्यांचा अपमान देखील करत.
     अचानक एक दिवस श्री. सिल्वेस्टर आजारी पडले. घरी कुणीच नव्हते. ते खूप घाबरले व देवाचा नामजप करु लागले. ज्या माणसांना त्यांनी उलट उत्तरे व अपमानास्पद वागणूक दिली होती तेच मुलगामी सेवकनेते त्यांच्या मदतीला धावून आले. त्यांनी इस्पितळात नेण्यापासून तर अगदी तज्ञ वैद्यांना बोलावण्यापर्यंत श्रम घेतले. रक्ताची गरज भासल्यावर के.ई.एम. इस्पितळामधून रक्त आणण्यासाठी सेवक नेत्यांनी खूप धावपळ केली. हे सर्व पाहून सिल्वेस्टर यांचे मनपरिवर्तन झाले. त्यांनी इस्पितळाच्या भिंतीवर पुनरुत्थित प्रभू येशूचा फोटो पहिला व त्याच्या खाली लिहिले होते, “तुम्हांस शांती असो”. त्याकडे पाहून श्री. सिल्वेस्टर यांचे फक्त मनपरिवर्तनच झाले नाही, तर त्यांनी पुनरुत्थित प्रभू येशूवर विश्वास ठेवला, कारण पुनरुत्थित प्रभू येशूने त्यांच्या धर्मग्रामातील लोकांच्या सेवाकार्याद्वारे त्यांच्यात बदल घडवून आणला होता. प्रभूच्या सेवकनेत्यांनी प्रभूवरील असलेल्या विश्वासाच्या साक्षामुळे श्री. सिल्वेस्टर यांनी ख्रिस्त खरोखर अनुभवला.

मनन चिंतन   
   
     ख्रिस्तसभा आज पुनरुत्थित काळातील तिसरा रविवार साजरा करीत आहे आणि आजची वाचने आपणास प्रभू येशूच्या पुनरुत्थानाची साक्ष देतात. प्रेषितांच्या कृत्यात आपण पाहतो कि, पेत्र हा प्रभू येशूचा एकदम जवळचा शिष्य होता. जरी प्रभूला त्याने तीन वेळा नाकारले तरी प्रभूचा त्याच्यावर विश्वास होता; म्हणूनच ख्रिस्ताने त्याच्यावर ख्रिस्तसभेची जबाबदारी सोपवली. पुनरुत्थित येशुचे त्यांच्या शिष्यांना दर्शन झाल्यावर पेत्राला नवचैतन्य प्राप्त होते, म्हणून पेत्र पुनरुत्थित ख्रिस्ताची सुवार्ता पसरवितो. ह्याच अध्यायात आपण सुरुवातीला पाहतो कि, पेत्र लंगड्या भिकाऱ्याला बरे करतो. हे बरे करण्याचे सामर्थ्य त्याला पुनरुत्थित येशुकडून प्राप्त होते आणि त्याचा उपयोग तो सुवार्तेसाठी करतो. त्यासाठी खूप काही संकटाना त्याला सामोरे जावे लागते व पुनरुत्थित प्रभू येशूच्या सुवार्तेसाठी तो सर्व सहन करतो.
     लूकने आपल्या शुभवर्तमानात स्रियांना नेहमी उजवे स्थान दिले आहे. येशूचे पुनरुत्थान झाले आहे, ही मंगलवार्ता स्रियांनाच प्रथम समजली. त्यांनी जाऊन ती अकरा शिष्यांना सांगितली. निराश झालेल्या व गोंधळून गेलेल्या शिष्यांना बाजूला घडणाऱ्या परिस्थितीचा वा स्रियांनी सांगितलेल्या मंगलवार्तेचा अनुभव घेता आले नाही किंवा त्या परिस्थितीचा प्रथम साक्षीदार होता आले नाही. तसेच त्यांचा गुरु प्रभू येशु ख्रिस्त पुनरुत्थित झाला आहे ह्या गोष्टीवर त्यांनी तत्काळ विश्वास ठेवला नाही. कारण  मेलेला माणूस कधीच जिवंत होत नाही  किंवा त्यास पुनरुत्थान नसते हे त्यांना ठाऊक होते.
     चर्चला, मिस्साला न जाणारे एक गृहस्थ म्हणतात, तुम्ही सर्वजण देवळात जातात पण कोणलाही देवळात जाण्यामुळे फरक पडत नाही. त्यापेक्षा देवळात न जाताही चांगले जीवन जगणारा मी काय वाईट आहे? त्याच्या बोलण्यात तथ्य आहे. आपण दररोज देवळात जातो. ख्रिस्ताला स्वीकारतो, पण आपणामध्ये काय फरक पडत नसेल तर आम्हीही ह्या शिष्यांप्रमाणे प्रभूला ओळखू शकणार नाही. प्रभुने जेव्हा भाकर मोडली तेव्हा शिष्यांनी त्याला ओळखले. आपल्या ख्रिस्ती धर्मातील सर्वात मोठा प्रार्थनाविधी म्हणजे मिस्सा होय. मिस्सामध्ये खुद्द येशूचे बलिदान आपण साजरे करत असतो. त्या बलिदानात प्रभू येशूची उपस्थिती असते, असा आपला विश्वास आहे. कॅथोलिक श्रध्येप्रमाणे भाकरीच्या रूपात येशु आमच्या मध्ये हजर असतो आणि येशूच्या उपस्थितीमुळे भाविकांच्या जीवनाला आशीर्वाद्युक्त कलाटणी मिळत असते.
     खुद्द येशु हजर असल्यामुळे आपल्या अंतकरणाला मिळणारा दिलासा व सार्वकालिक जीवनाविषयी वाटणारी शाश्वती आगळीवेगळी असते. आपण रोज मिस्सामध्ये हेच पाहत असतो. पण येशूला ओळखतो का? जोपर्यंत येशूने भाकर मोडली नव्हती, तोपर्यंत शिष्यामध्ये आध्यात्मिक अंधत्व आले होते. जर आपल्यामध्ये शिष्यांप्रमाणे अंधत्व आले असेल तर ते दूर केले पाहिजे. कारण त्यांची मने व अंतकरणे, जड झाले होते. परंतु येश हा देवाचा पुत्र होता व त्याने त्याच्या मरणाचे व पुनरूत्थानाचे त्याच्या समवेत वारंवार भाकीत केले होते. तरीही मानव असल्यामुळे त्यांना त्याचा विसर पडला होता. त्यांचा विश्वास वाढावा व त्यांनी त्याचा गुरु व प्रभू याला ओळखावे आणि प्रभू पुनरुत्थित झाला हे आहे त्यांना पटावे म्हणून येशु त्यांच्यामध्ये उभा राहतो व त्यांना शांती देतो.
पुनरुत्थित प्रभू अचानक येणे त्यांच्या विचारापलीकडचे होते. त्यामुळे ते भयभीत झाले, घाबरले आणि आपण भूत पाहत आहोत असे त्यांना वाटले. परंतु प्रभूने त्यांचे विचार ओळखून म्हटले “तुम्ही घाबरलात का? मी तुमचा पुनरुत्थित प्रभू ख्रिस्त; मला स्पर्श करा जसे मला हाडमांस आहे तसे भुताला नसते.
इतके वर्ष येशूचे शिष्य त्याला पुनरुत्थित झाल्यावर ओळखू शकले नाही. आपल्या जीवनात सुद्धा त्या शिष्यांप्रमाणे स्थिती होते. कधी कधी आपली मने व अंतकरणे, शिष्यांप्रमाणे जड होतात व आपण आपल्या प्रभूला ओळखू शकत नाही. आपण रोज मिस्साला जातो. प्रभूला भाकरीच्या रुपात आपल्या अंतकरणात स्वीकारतो. म्हणूनच आपण आपल्या वागण्यावरून, बोलण्याद्वारे व कृतीतून ते दिसून यायला हवे. आपले जीवन ख्रिस्ताच्या पुनरुत्थित आगमनाने बदलले पाहिजे तेव्हाच आपण प्रभू येशूला ओळखू शकू. तेंव्हाच आपल्या खऱ्या ख्रिस्ती जीवनाला अर्थ प्राप्त होतो.
भाकर मोडल्यावर शिष्य अध्यात्मिकदृष्ट्या डोळस झाले. त्यांचे अंतकरण आनंदाने उचंबळून आले. जेव्हा मिस्साबलिदानाद्वारे आपण प्रभूला स्वीकारतो तेव्हा जर आपण प्रभूला ओळखण्यास कमी पडलो असलो, तसेच जर आपल्या वागण्यात बोलण्यात किंवा कृतीत काही फरक पडत नसेल तर त्या पुनरुत्थित प्रभूला सांगूया हे पुनरुत्थित प्रभो आमच्यात बदल घडव व आम्हाला तुझी नेहमी ओळख होऊ दे. पुनरुत्थित झाल्यानंतर येशूने शिष्यांना दर्शन दिले, यामुळे भयग्रस्त शिष्य प्रतिकूल परिस्थितीतही निर्भयपणे सर्वांना सुवार्ता सांगू लागले. त्यासाठी शिक्षा भोगण्यास आणि मृत्यूला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली. पुनरुत्थित ख्रिस्ताने त्यांच्यात घडवून आणलेला हा प्रत्ययकारी बदल होता. हा बदल आपणामध्ये घडावा म्हणून विशेष प्रार्थना करूया.
               
विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे पुनरुत्थित प्रभू येशु आमचा विश्वास वाढव.
१. ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे आपले पोप, कार्डीनल्स, फादर्स, सिस्टर्स, ब्रदर्स व सर्व प्रापंचिक लोकांना देव राज्याची सुवार्ता पसरविण्यास कृपा व शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपल्या सर्व मिशनरी बंधुभगीनींवर व त्यांच्या कार्यावर देवाचा आशीर्वाद असावा तसेच ज्यांना छळाला सामोरे जावे लागत आहे त्यांना देवाच्या मदतीचा हात मिळून  मिशन कार्य चांगल्या प्रकारे पार पडावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आपल्या सर्व राज्यकर्त्यांनी आपला स्वार्थ, भ्रष्टाचार व इतर सर्व वाईट मार्ग बाजूला ठेवून लोकांची निस्वार्थीपणे सेवा करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. जे लोक देवापासून दूर गेले आहेत, जे अन्य धर्माकडे वळले आहेत व ज्यांचा देवावर विश्वास नाही अश्या लोकांवर पुनरुत्थित प्रभू येशूची कृपा यावी व त्यांनी पुनरुत्थित येशूवर विश्वास ठेवावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. जे लोक आजारी, दु:खी, कष्टी व निराश आहेत तसेच जे बेकार तरुण तरुणी आहेत अश्या सर्वांना पुनरुत्थित प्रभू येशूने त्यांच्या अडचणीत सहाय्य करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. थोडावेळ शांत राहून आपल्या सामाजिक, कौटुंबिक आणि वैयक्तिक हेतूंसाठी आपण प्रार्थना करूया.






No comments:

Post a Comment