Thursday 26 November 2015

Reflection for the Homily of 1st Sunday in Advent Time (29/11/2015) By: Baritan Nigrel.











आगमन काळातील पहिला रविवार





पहिले वाचन: यिर्मया ३३:१४-१६.
दुसरे वाचन: थेस्स ३:१२–४:२.
शुभवर्तमान: लूक २१:२५-२८,३४-३६.

“ख्रिस्त मोठ्या वैभवाने येईल”



प्रस्तावना:

आजपासून ख्रिस्तसभा आगमन काळाला सुरुवात करीत आहे. ह्या आगमन काळामध्ये देऊळ माता आम्हां प्रत्येकाला, आपल्या मनाची व अंतकरणाची तयारी करून प्रभू येशु ख्रिस्ताला पुन्हा एकदा नव्याने स्वीकारण्यासाठी आमंत्रित करत आहे.
आजच्या पहिल्या वाचनात परमेश्वर इस्राएल लोकांना, दाविदाचा पुत्र ‘मसिहा’ ह्याचा जन्म इस्रायली लोकांच्या तारणासाठी होईल असे अभिवचन देतो. दुसऱ्या वाचनात प्रभू न्यायनिवाडा करण्यासाठी येईल, म्हणून त्याला भेटण्यासाठी आपण निर्दोष व पवित्र असावे असे संत पौल आपल्याला सांगत आहे. आणि शुभवर्तमानात येशु आपल्याला सर्वप्रसंगी प्रार्थना करून जागृत राहण्यासाठी संबोधित आहे.
प्रभू येशूने आम्हा प्रत्येकाच्या हृदयात जन्म घेऊन, आपल्याला सर्व प्रकारच्या बंधनातून आणि पापातून मुक्त करावे तसेच त्याला स्विकारण्यासाठी आपण सदैव जागृत असावे, म्हणून आजच्या या पवित्र मिस्साबलीदानामध्ये प्रार्थना करुया.   

सम्यक विवरण:
पहिले वाचन: यिर्मया ३३: १४-१६
परमेश्वराने इस्रायल लोकांना दाविदाच्या नव्या राज्याचे अभिवचन दिले होते (यिर्मया २३:५,६). त्याचाच उल्लेख आजच्या पहिल्या वाचनात केल्याचे आपणास दिसून येते. दाविदाचे ऐतिहासिक राजघराणे संपुष्टात आले असले, तरी दावीद घराण्यात असा एक नवा राजा उदयास येईल, जो अगदी दावीद राजापेक्षा महान असेल. ‘देव आमची धार्मिकता’ हे त्याचे नाव मूळ हिब्रूमध्ये ‘सिद्द्कीया’ नावाशी जुळणारे आहे. हे नाव राजाला खरोखर सर्वांगी साजेसे असेल, पण हा राजा, हे नाव खरोखर सत्याने धारण करील. यिर्मया संदेष्टा, येथे दाविदाच्या पुत्राची (‘मसिहा’) दृष्टी रोखून वाट पाहत आहे, कारण त्याचा जन्म इस्राएलच्या तारणासाठी होणार आहे असे त्यास सांगण्यात आले होते (मत्तय १:१; लूक २:२९-३५).

दुसरे वाचन : १ थेस्स ३:१२ – ४:२
थेस्सलनिकर प्रीतीने भरलेले होते. हे पौलाने ऐकले होते. ती प्रीती प्रचंड प्रमाणात वाढावी व सर्वांपर्यंत पोहचावी अशी प्रार्थना पौल करतो. उफाळून वर येणाऱ्या झऱ्याप्रमाणे ही प्रीती असावी अशी पौलाची प्रार्थना होती (१२), अगदी त्याप्रमाणेच ही प्रीती त्यांच्यामधून नदीप्रमाणे ओसंडून वाहत होती.
प्रभू न्यायनिवाडा करण्यासाठी येईल (१३) तेव्हा आपल्या वाचकांनी त्याला भेटण्यासाठी निर्दोष व पवित्र असावे हीच त्याची इच्छा आहे. प्रभू लवकरच येईल, असे त्याला वाटते म्हणूनच देवाने त्यांच्या अंतःकरणात हे गुण स्थिर करावे आणि प्रभू येईपर्यंत ते टिकून राहावेत हीच त्याची प्रार्थना आहे.

शुभवर्तमान : लूक २१:२५-२८, ३४-३६
जुन्या करारात केलेल्या भाकितानुसार, विश्वात होणारी उलथापालथ हा अंतसमय येण्यासंबधातील दुसरा टप्पा आहे (११). येथे परराष्ट्रीयांच्या सत्ता उलथून टाकल्याचे रूपकात्मक वर्णन केले गेले आहे असे काही अभ्यासक म्हणतात. त्यानंतर मनुष्याचा पुत्र येईल, आणि दानिएल ७:१३-१४ मधील भाकीत परिपूर्ण होईल. तेथे त्याचे आगमन, न्यायाचा दिवस आणि देवाची सत्ता दृश्यरूपात प्रत्यक्षपणे प्रस्थापित होणे यांतील परस्पर संबंध येथे दर्शविण्याचा प्रयत्न  केला गेला आहे. पुढे येणारी संकटे, अनर्थ वगैरे मुक्ततेच्या या दिव्य कृत्याची प्रस्तावनाच आहे म्हणून शिष्यांनी भीती सोडावी आणि आशा धरून रहावे.
(२५-२८) या वचनात प्रभू येशूने या जगावर देवाचा क्रोध पडेल, त्यासमयी काय काय घडेल ह्याविषयी सांगितले आहे. या घटनांचे सविस्तर वर्णन प्रगटीकरण ६-१८ या अध्यायात आढळते. त्या काळी जगावर अरिष्टे कोसळतील व मग ख्रिस्त आपल्या वैभवाने उतरेल. तो येरुशलेमेत आपले राज्य स्थापील व सर्व जगावर राज्य करील (२७). तेव्हा इस्राएल लोक येशू हाच मसिहा आहे हे ओळखतील (२८).
प्रभू येशु पुढे आपल्याला सांगत आहे की, सर्वप्रसंगी प्रार्थना करीत सदैव जागृत राहा (३६), कारण तुमचा मुक्तीसमय जवळ आला आहे.

बोधकथा:
एके दिवशी आईने तिच्या मुलाला विचारले – ‘प्रत्येक दिवशी कामावरून आल्यावर तू एकटा त्या घराच्या झाडाखाली का बसतोस? मुलाने आईला म्हटले, ‘तिथे मी एकटा नसतो, तर मी शांततेत देवाच्या सानिध्यात असतो. माझा थोडासा वेळ बाजूला काढून, तो वेळ मी देवाला देत असतो.’
हे शब्द ऐकल्यावर आईला बरे वाटले, मात्र तिने त्याला विचारले, देव तर सर्व ठिकाणी आहे, मग तू दरदिवस फक्त त्याच जागी का जातोस? मुलाने आईचा हाथ पकडला आणि म्हणाला, ‘आई, खरच देव आपल्याबरोबर व सर्व ठिकाणी आहे, पण मी देवाबरोबर नसतो.’
माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, देव आपल्याबरोबर सदैव असतो, मात्र आपण देवाबरोबर नसतो. ह्या आगमन काळामध्ये आपण दिवसातून थोडा वेळ बाजूला काढून देवाबरोबर राहण्याचा प्रयत्न करुया. कारण देवाच्या सानिध्यात राहील्याने आपण निर्दोष व पवित्र बनतो. आपण सदैव प्रार्थना करून जागृत रहावे म्हणून आपण त्याच्याबरोबर राहूया आणि प्रत्येक दिवशी आपण त्याचा स्वीकार करुया.

मनन चिंतन:

ख्रिस्त जन्माची कथा अभ्यासताना मानवी स्वभावाचा एक मोठा गुण आपल्या निदर्शनास येतो तो म्हणजे “आशा”. माणसाच्या जीवनात आशा नसेल तर तो आत्महत्या करतो!
माणसाला आशेने भविष्याकडे पहायला लावून त्यांचे नैराश्य, दुःख दूर करण्याचे महान सामर्थ्य प्रत्येक धर्मात आहे; मग तो कोणताही धर्म असो. काबाडकष्ट करून तीन मुलांना वाढवणारी विधवा – ‘माझा देव माझ्या मुलांना चांगल्या उच्च पदवीवर कामाला लावेल!’ याच आशेने प्रार्थना करते, ती अधिक जोमाने काबाडकष्ट करते व मुलांसाठी लागणारी अभ्यासाची महागडी पुस्तके विकत आणते. तरुण विधवा, कुंकू लावून फिरते व आशेने म्हणते, ‘माझा पती वादळात वाचलाय, तो मेला नाही तर जिवंत आहे, एखादया बेटावर मदतीसाठी हाक मारत असेल आणि एकेदिवशी तो नक्कीच परत येईल!’
आज आगमन काळातील पहिला रविवार. आगमन काळ म्हणजे ‘प्रभू येण्याचा काळ आहे’ अशी आशा मनात बाळगून त्याच्या येण्याची पूर्व तयारी करणे होय. उत्पत्तीच्या पुस्तकात आपण वाचतो की, आपल्या पहिल्या माता-पित्यांनी देवाविरुद्ध पाप केले. परंतु त्यामुळे देवाने आपल्याला एकटे सोडले नाही. तो आपल्यापासून दूर गेला नाही, उलट देवाने त्याच मानवाला मी ‘माझा पुत्र तुमच्या तारणासाठी पाठवीन!’ अशी आशा दाखविली. ह्यास्तव देवाने अनेक संदेष्टे पाठवले व त्यांच्याद्वारे देवाने इस्रायली जनतेमध्ये ‘ख्रिस्त’ येईल आणि तो त्यांची सारी दुःखे नष्ट करील, त्यांचे अश्रू पुसून टाकील, असे भविष्य कथन करून त्यांच्या जीवनात आशादिप पेटत ठेवला होता.
दोन हजार वर्षापूर्वी देवाने त्याचा पुत्र या पृथ्वीतलावर पाठविला. येशु ख्रिस्त देवाचा पुत्र या जगात पाप्यांचे तारण करावयास आला. स्वर्ग सोडून तो या जगात मानवी देहात अवतरला. ह्याला प्रभू येशूचे पहिले येणे म्हणतात. तो या जगात लहानाचा मोठा झाला, वधस्तंभावर मरण पावला, पुन्हा उठला व स्वर्गात चढला. जाण्यापूर्वी त्याने आपणास सांगितले की, “मी पुन्हा येईन व तुम्हांस जवळ घेईन”. जसा तो स्वर्गात घेतला गेला तसाच तो पुन्हा येणार आहे (प्रेषितांची कृत्ये १:११). ही दिव्य आशा प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीच्या मनात असते.
प्रभू येशु दुसऱ्यांदा परत येईल, ह्याच आशेने देऊळमाता प्रत्येक वर्षी आपल्याला जागृत होण्यास व आपली अंतःकरणे, हृदये साफ ठेऊन ख्रिस्ताला स्वीकारण्यास या आगमन काळामध्ये बोलावत असते. आजच्या पहील्या वाचनात आपण ऐकले की, परमेश्वर पिता इस्रायल लोकांना, दाविदाच्या घराण्यातील जो पुत्र जन्माला येईल, तो इस्रायल लोकांचा तारणारा ‘मसिहा’ असेल असे अभिवचन देतो.
यशया संदेष्टा परमेश्वराला हाक मारून म्हणतो, ‘हे प्रभो, ये आणि अनादि काळापासून वाट पहात असलेल्या या मानवतेला तुझे दर्शन दे! आम्ही सारे अशुद्ध बनलो आहोत, कारण आम्ही दुष्कृत्यांची गलिच्छ वस्त्रे घातली आहेत. अधर्माच्या वादळाने आमची दाणादाण उडविली आहे, जळून आमचे भस्म झाले आहे. तूच आमचा पिता आहेस. आम्ही माती आहोत आणि तू आमचा कुंभार आहेस. ये आणि तूच आम्हाला घडव’ (यशया ६४:४-८).
येशू ख्रिस्त आपल्याला शुद्ध बनवण्यासाठी, आपल्याला सत्कर्माची शुभ्र वस्त्रे घालण्यासाठी, आपल्याला पापातून मुक्ती देण्यासाठी, आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी व अशांतीतून शांतीमध्ये व प्रितीमध्ये आपले जीवन जगण्यासाठी येशू ख्रिस्त पुन्हा येईल; कारण तोच आपला तारणारा आहे.
त्याने ‘देवाचे राज्य’ या भूतलावर प्रस्थापित केले. सर्वत्र दया, क्षमा, शांती आणि प्रीतीचे राज्य प्रस्थापित केले. येशू ख्रिस्ताने पूर्वजांच्या आशा पूर्ण केल्या आणि नव्या आशा मनाला लावून दिल्या. ख्रिस्ताने आंधळ्यांना दृष्टी, बहिऱ्यांना श्रवणशक्ती आणि पांगळ्यांना नवशक्ती दिली. शुभवर्तमानात आपण ऐकले की, प्रभू मेघांवरून, मोठया गौरवाने येईल. तो पवित्र दूतांसह येईल. त्याच्या येण्याची वेळ आपल्याला ठाऊक नाही परंतु सर्व चिन्हांवरून त्याच्या येण्याचा समय जवळ आला आहे, हे आपल्याला समजेल. त्यामुळे आपण सदोदित प्रार्थना करीत, वाट पाहत ख्रिस्तामध्ये जागृत राहिले पाहिजे. कारण तो चोरासारखा अचानक येईल. तो आपल्या लोकांसाठी, राज्य करावयास व जीवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास येईल (२ तिमथ्य ४:१). प्रभूच्या येण्याची तयारीसाठी लागणारी कृपा ह्या आगमन काळात मागुया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे, प्रभो, आम्हाला तुझे दर्शन घडू दे.
1.     ह्या आगमनकाळात आपण सर्वांनी आपल्या मनाची व अंतःकरणाची तयारी करून प्रभू येशू ख्रिस्ताला पुन्हा एकदा नव्याने आपला तारणारा म्हणून स्वीकारावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करुया.
2.     ह्या आगमन काळात आपण प्रत्येकांनी सर्व प्रसंगी प्रार्थना करून देवाबरोबर रहावे तसेच त्याच्यासारखं निर्दोष व पवित्र बनावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करुया.    
3.     प्रत्येक कुटुंबातील रागाचे व अशांतीचे वातावरण नाहीसे होऊन, देवाचे प्रेम व देवाची शांती आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबात वास करावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करुया.  
4.     आपल्या चर्चमधील ज्या व्यक्ती देवापासून दूर गेलेल्या आहेत, ज्या व्यक्ती चर्चमध्ये मिस्साला येत नाहीत, अश्या सर्वांना परमेश्वराचा स्पर्श व्हावा व त्यांनी पुन्हा ख्रिस्तमय जीवन जगावं म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करुया. 
5.     थोडावेळ शांत राहून आपल्या सामाजिक व कौटुंबिक हेतूंसाठी प्रभूकडे प्रार्थना करुया. 





No comments:

Post a Comment